व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पहा! मी सर्व नवे करतो”

“पहा! मी सर्व नवे करतो”

“पहा! मी सर्व नवे करतो”

१-४. (अ) आमच्या मुखपृष्ठावरील कोणत्या गोष्टीत सहभागी होण्यात तुम्हाला आनंद वाटेल? (ब) येथे तुमच्यापुढे कोणते गौरवी भविष्य ठेवण्यात आले आहे? (क) अशा आशेला बळकटी देणारी काही शास्त्रवचने कोणती?

 या माहितीपत्रिकेच्या मुखपृष्ठावरील आनंदी लोक पहा. आपणही त्यांच्यापैकी असावे असे तुम्हाला वाटते का? तुम्ही म्हणाल, “वा, नक्कीच.” कारण सर्व मानवजातीला हवीशी शांती व ऐक्य तेथे दिसते. काळे, गोरे, पिवळे—सर्व वंशाचे लोक एका परिवाराप्रमाणे मिळून मिसळून आहेत. काय तो आनंद! काय ती एकता! खरेच, या लोकांना अण्विक स्फोटात बाहेर पडणाऱ्‍या विषारी पदार्थांची वा दहशतवाद्यांच्या धोक्याची चिंता दिसत नाही. लढाऊ जेट विमाने या सुंदर उपवनातील आकाशात शांतीचा भंग करत नाहीत. तेथे सैनिक, रणगाडे वा बंदुका नाहीत. सुव्यवस्थेसाठी पोलिसाच्या छोट्या काठीचीहि गरज दिसत नाही. युद्ध व गुन्हे मुळी अस्तित्वातच नाहीत. घरांचा तुटवडा नाही. कारण प्रत्येकाला स्वतःचे म्हणता येईल असे घर आहे.

त्या मुलांकडे पहा! त्यांचा खेळ पाहून आनंद होतो. खेळायला प्राणी तरी कोणते! सर्व प्राणी मानवांशी व आपसांत शांततेने रहात असल्याने या बागेमध्ये पिंजऱ्‍यांची गरज नाही. सिंह आणि करडूही मित्र झाले आहेत. ते सुंदर रंगाचे पक्षी इकडे-तिकडे उडताना पहा. त्यांची मंजुळ गाणी तसेच मुलांच्या हास्याने वातावरण भरून गेले आहे. पिंजरे नाहीत? नाही. कारण या राज्यात स्वातंत्र्य व निखळ आनंद आहे. जरा त्या फुलांचा सुगंध पहा, ओढ्यांचा खळखळाट ऐका, सूर्यप्रकाशाची रोमांचकारी उब घ्या. त्या टोपलीतल्या फळांची चव घेता आल्यास काय मजा येईल. कारण या सुंदर बागेमध्ये दिसणाऱ्‍या प्रत्येक गोष्टीप्रमाणे तेही उत्तम—उत्तमातील उत्तम आहे.

कोणी म्हणतील, ‘थांबा, वृद्ध कोठे आहेत? या सुखी समाजातील आनंदाचा उपभोग त्यांनाहि मिळू नये का?’ खरे तर म्हातारे लोकही तेथेच आहेत. फक्‍त ते पुन्हा तरूण बनत आहेत. या बागेत कोणीहि वार्धक्याने मरण पावत नाही, बालके मानवी प्रौढत्वापर्यंत वाढतात; म्हातारी होत नाहीत. २० वर्षांची असो वा २०० वर्षांची, या बागेमध्ये राहणाऱ्‍या लाखो लोकांतील प्रत्येक व्यक्‍ति पूर्ण स्वास्थ्याच्या तारूण्याच्या जोमाने जीवनाचा आनंद उपभोगत आहे. तुम्ही म्हणाल, ‘लाखो?’ होय, लाखो. कारण ही बाग प्रत्येक देशात पसरत आहे. त्यामध्ये जगाच्या प्रत्येक टोकापर्यंत फूजीपासून अँडीन पर्वतापर्यंत, हाँगकाँग पासून भूमध्य समुद्रापर्यंत जीवन, शांती व सौंदर्य यांनी ओतप्रोत भरून राहील. कारण सर्व पृथ्वी नंदनवनाच्या बागेमध्ये बदलली जात आहे. जगभर नंदनवनाची पुनर्स्थापना होईल.

‘विश्‍वास ठेवणे अशक्य’ म्हणता? पण प्रथम पुराव्यादाखल वस्तुस्थिती पहा. सध्याच्या त्रासदायक व्यवस्थेच्या अंतामधून वाचून, या माहिती पत्रिकेच्या मुखपृष्ठावर दाखवलेल्या नंदनवनात प्रवेश करणे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला शक्य आहे. a

नंदनवनाचा खुलासा करणारे पुस्तक

५. (अ) या गोष्टींचा खुलासा कोणते पुस्तक करते? (ब) हे पुस्तक कोणत्या कारणांमुळे उल्लेखनीय आहे?

या सर्व उत्कृष्ट गोष्टी व त्यांची खात्री याविषयी एका पुस्तकात—सर्वात आश्‍चर्यकारक पुस्तकात—खुलासा केलेला आहे. त्याला बायबल अथवा पवित्रशास्त्र म्हणतात. ते अतिशय प्राचीन पुस्तक आहे. त्याचे कांही भाग जवळपास ३,५०० वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत. तरीहि ते अद्ययावत आहे. कारण आजच्या आधुनिक जीवनासाठी अतिशय योग्य व व्यवहार्य सल्ला ते देते. त्यातील भविष्यवाद भावी काळासाठी उज्वल आशा उत्पन्‍न करतात. पूर्ण इतिहासामध्ये ते सर्वांत जास्त खपाचे पुस्तक आहे. संपूर्ण बायबल अथवा त्याचे प्रमुख भाग जवळपास १,८१० भाषांमध्ये असून त्याच्या २,००,००,००,००० प्रतींचे वितरण झाले आहे.

६. पवित्र मानलेल्या इतर साहित्यापासून पवित्र शास्त्र कशामुळे वेगळे दिसून येते?

इतर कोणत्याहि धर्मग्रंथाचे इतके जगभर वितरण झालेले नाही व बहुतेक इतके प्राचीनही नाहीत. मुसलमानांचे कुराण १४०० वर्षांपेक्षा कमी प्राचीन आहे. बुद्ध व कन्फ्यूशियस जवळपास २५०० वर्षांपूर्वी होऊन गेले व त्यांचे साहित्य तेव्हांच लिहिले गेले. शिंटोंचा धर्मग्रंथ त्याच्या सध्याच्या बनावटीमध्ये येऊन १२०० वर्षांचा काळ झाला. मरमॉन लोकांचे पुस्तक फक्‍त १६० वर्षें जुने आहे. बायबल प्रमाणे, यातील एकही पुस्तक मानवी इतिहासाचा ६००० वर्षांपूर्वीपर्यंत मागोवा घेत नाही. या कारणास्तव, मूळ धर्म समजण्यासाठी आपल्याला बायबलकडे गेले पाहिजे. सर्व मानवजातीसाठी संदेश देणारे ते एकमेव पुस्तक आहे.

७. पवित्र शास्त्राबद्दल विचारवंतांनी काय म्हटले आहे?

बायबलच्या संदेशातील सूज्ञता व सौंदर्याची, सर्व देशातील व भिन्‍न पार्श्‍वभूमीच्या विचारवंत लोकांनी प्रशंसा केली आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ व गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लावणाऱ्‍या सर आयझॅक न्यूटन यांनी म्हटले, “कोणत्याही शास्त्राच्या तुलनेत, बायबलच्या खरेपणाविषयी अधिक पुरावा आहे.” “मला स्वातंत्र्य द्या अन्यथा मृत्यू द्या” ही घोषणा करणारे सुप्रसिद्ध अमेरिकन क्रांतिकारी पॅट्रिक हेन्री यांनीही म्हटले: “बायबल, आतापर्यंत छापलेल्या समग्र पुस्तकांच्या मोलाचे आहे.” इतकेच नव्हे तर महात्मा गांधी यांनीही हिंदुस्तानच्या ब्रिटिश व्हाइसरॉयला एकदा सांगितले: “ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये दिलेल्या शिकवणीबद्दल जेव्हा तुमच्या व माझ्या देशाचे एकमत होईल तेव्हा आपण फक्‍त आपल्याच देशांचे नव्हे तर सर्व जगाचे प्रश्‍न सोडवलेले असतील.” पवित्र शास्त्रातील मत्तयाच्या ५ ते ७ अध्यायांबद्दल गांधी बोलत होते. तुम्ही स्वतः ते अध्याय वाचा. व त्यातील प्रभावी संदेशाने तुम्हालाही स्फुरण चढते की नाही पहा.

पवित्रशास्त्र—एक पौर्वात्य पुस्तक

८, ९. (अ) पवित्र शास्त्राला पाश्‍चिमात्य पुस्तक म्हणणे का चूक आहे? (ब) पवित्र शास्त्र कसे लिहिले गेले व त्याला किती काळ लागला? (क) पवित्र शास्त्राला ग्रंथालय का म्हणता येते? (ड) पवित्र शास्त्र लिहिण्यास किती माणसांचा उपयोग केला गेला? (इ) पवित्र शास्त्राच्या उगमाबद्दल यातील काही लोकांनी काय साक्ष दिली?

सर्वसाधारण लोकमताच्या विरुद्ध पवित्रशास्त्र हे पाश्‍चिमात्य संस्कृतीमधून उत्पन्‍न झालेले नाही वा त्याची स्तुतीही करत नाही. जवळपास संपूर्ण पवित्रशास्त्र पौर्वात्य देशांमध्ये लिहिले आहे. ते लिहिणारी सर्व माणसे पौर्वात्य होती. बुद्धापूर्वी हजार वर्षे, इ.स.पू. १५१३ मध्ये मध्यपूर्वेत राहणाऱ्‍या मोशेला, उत्पत्ती म्हटलेले, पवित्रशास्त्राचे पहिले पुस्तक लिहिण्यास देवाने प्रेरणा दिली. येथपासून प्रकटीकरण या शेवटल्या पुस्तकापर्यंत पवित्रशास्त्रामध्ये एकच सुसंगत मध्यवर्ती कल्पना मांडलेली आहे. बुद्धानंतर जवळपास ६०० वर्षांनी इ.स. ९८ मध्ये पवित्रशास्त्र पूर्ण करण्यात आले. ते ६६ वेगवेगळ्या पुस्तकांचे मिळून बनलेले असल्याचे तुम्हाला माहीत होते कां? होय, पवित्रशास्त्र एक ग्रंथालयच आहे!

अशा रीतीने मोशेपासून १६०० वर्षाच्या काळात पवित्रशास्त्राचे सुसंगत वृत्त लिहिण्यात साधारण ४० माणसे सहभागी होती. मर्त्य मानवापेक्षा अधिक उच्च शक्‍तीने प्रेरित होऊन आपण हे लेखन केल्याची साक्ष ती माणसे देतात. ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे. आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिकवणे याकरता उपयोगी आहे.” b (२ तिमथ्यी ३:१६) आणि प्रेषित पेत्राने सांगितले “शास्त्रातील कोणत्याहि संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”—२ पेत्र १:२०, २१; २ शमुवेल २३:२; लूक १:७०.

१०. (अ) पवित्र शास्त्र आपल्यापर्यंत कसे आले? (ब) आजहि आपल्याजवळ मूळ पवित्र शास्त्राचा प्रेरित मसूदा असल्याची खात्री आपण का बाळगावी?

१० पवित्रशास्त्र आज आपल्यापर्यंत कसे आले तेहि उल्लेखनीय आहे. ५०० वर्षांपूर्वी मुद्रणाचा शोध लागेपर्यंत हजारो वर्षे पवित्रशास्त्राच्या नकला हाताने कराव्या लागत. प्राचीन काळातील इतर कोणत्याही साहित्याच्या नकला इतक्या तन्मयतेने झाल्या नाहीत. त्याच्या नकला पुनःपुन्हा केल्या गेल्या पण नेहमी त्यामध्ये अत्यंत काळजी घेतली गेली. नकला करणाऱ्‍यांनी कांही लहान-सहान चुका केल्या. आणि त्यांच्या तुलनेमुळे परमेश्‍वर-प्रेरित मूळ संदेशाचा मसुदा सिद्ध झाला. पवित्रशास्त्रांच्या हस्तलिखितांचे पंडित, सर फ्रेडरिक केन्यन म्हणतात: “पवित्रशास्त्र मुळात जसे लिहिले तसेच आपल्यापर्यंत आले याविषयी काही शंका असल्यास तिचा शेवटला आधारही नाहीसा झाला आहे.” संपूर्ण पवित्रशास्त्र वा त्याच्या कांही भागांच्या जवळपास १६,००० नकला आज अस्तित्वात आहेत. त्यातील कांही तर इ.स.पू. २ऱ्‍या शतकातील आहे. शिवाय जे पवित्रशास्त्र मुळात इब्री, अरामी व हेल्लेणी (ग्रीक) भाषामध्ये लिहिले होते. त्याची जगातल्या बहुतेक सर्व भाषांमध्ये अचूक भाषांतरे झालेली आहेत.

११. कोणत्या आधुनिक शोधांची पवित्र शास्त्राच्या वृत्तांताशी एकवाक्यता आहे?

११ पवित्रशास्त्रामध्ये अनेक चुका आहेत असे म्हणून काहींनी त्याची नालस्ती करण्याचा यत्न केला आहे. परंतु अलिकडच्या वर्षांत पुरातत्व शास्त्रज्ञांनी पवित्र शास्त्रातील प्रदेशाच्या प्राचीन शहरांच्या अवशेषांमध्ये केलेल्या उत्खननात शिलालेख व इतर असा पुरावा सापडला की पवित्रशास्त्रात उल्लेख केलेल्या सर्वात प्राचीन वृत्तांतामधील व्यक्‍ति व जागा खरोखर अस्तित्वात होत्या. जागतिक जलप्रलयाकडे संकेत करणारा बराच पुरावा त्यांनी खणून काढला आहे. त्या प्रलयाबद्दल पवित्रशास्त्र म्हणते की तो नोहाच्या काळी, ४००० वर्षांच्याही पूर्वी होऊन गेला. या मुद्याविषयी प्रिंस मिकासा हे प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणतात: “प्रलय खरोखरच झाला का? प्रलय होऊन गेला ही वस्तुस्थिती खात्रीलायकरित्या सिद्ध झालेली आहे.” c

पवित्र शास्त्राचा देव

१२. (अ) कांही थट्टेखोर देवाबद्दल काय म्हणतात? (ब) पवित्र शास्त्र देवाचा उल्लेख पिता असा का करते? (क) देवाचे नांव काय असल्याचे पवित्र शास्त्र दाखवते?

१२ कांही लोक जशी पवित्रशास्त्राची थट्टा करतात तर काहीजण सर्वसमर्थ देवाच्या अस्तित्वाचा उपहास करतात. (२ पेत्र ३:३-७) ते म्हणतात, ‘मी देवाला पाहू शकत नाही तर त्याच्यावर विश्‍वास तरी कसा ठेवू? माणसापेक्षा मोठा असा अदृश्‍य सृष्टिकर्ता खरोखरच असल्याबद्दल काही पुरावा आहे का? देव चराचरात नाही का?’ इतर काही म्हणतात, ‘देव किंवा बुद्ध असा कोणी नाही.’ परंतु पवित्रशास्त्र दाखवते की जसे आपल्याला पार्थिव पित्यामार्फत जीवन मिळाले तसे आपल्या मूळ पूर्वजांना एका स्वर्गीय पित्याकडून—सृष्टीकर्त्याकडून—ते मिळाले. त्याचे वैयक्‍तिक नांव यहोवा आहे.—स्तोत्रसंहिता ८३:१८; १००:३; यशया १२:२; २६:४.

१३. यहोवाने स्वतःस मानवजातीपुढे कोणत्या दोन मार्गांनी प्रकट केले आहे?

१३ यहोवाने दोन विशेष मार्गांनी स्वतःस मानवांसमोर प्रकट केले आहे. त्यातील प्रमुख म्हणजे पवित्र शास्त्रातून. त्यामध्ये त्याचे सत्य सनातन हेतू कळतात. (योहान १७:१७; १ पेत्र १:२४, २५) त्याने केलेली सृष्टी हा दुसरा मार्ग. आपल्या सभोवतालच्या अद्‌भुत वस्तु पाहून त्यांमध्ये ज्याच्या व्यक्‍तिमत्वाचे प्रतिबिंब दिसते असा सृष्टीकर्ता—परमेश्‍वर असलाच पाहिजे अशी जाणीव अनेकांना झाली आहे—प्रकटीकरण १५:३, ४.

१४. पवित्र शास्त्र यहोवाबद्दल आपल्याला काय सांगते?

१४ यहोवा देव हा पवित्रशास्त्राचा लेखक आहे. सनातन काळात अस्तित्वात असलेला तो महान आत्मा आहे. (योहान ४:२४; स्तोत्रसंहिता ९०:१, २) “यहोवा” हे त्याचे नाव त्याच्या, प्राणिमात्राविषयीच्या, हेतूकडे आपले लक्ष आकर्षित करते. दुष्टांचा नाश करून आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांना नंदनवन पृथ्वीवर राहता यावे यासाठी त्यांना वाचवून ते नाव शाबीत करण्याचा त्याचा हेतू आहे. (निर्गम ६:२-८; यशया ३५:१, २) सर्वसमर्थ देव असल्याने त्यासाठी लागणारी शक्‍ति त्याच्यापाशी आहे. सर्व विश्‍वाचा सृष्टीकर्ता या नात्याने सर्वसाधारण प्रादेशिक देव व मूर्तीपेक्षा तो उच्च आहे.—यशया ४२:५, ८; स्तोत्रसंहिता ११५:१, ४-८.

१५. बुद्धीमान लोकांनी केलेल्या सृष्टीच्या अभ्यासाने कोणता निष्कर्ष निघाला?

१५ अलिकडल्या शतकांमध्ये सृष्टीतील अनेक वस्तुंचा अभ्यास करण्यास शास्त्रज्ञांनी बराच वेळ खर्चिला आहे. ते कोणत्या निष्कर्षाला पोहोंचले आहेत? विद्युतशास्त्रात अग्रेसर असलेले एक प्रख्यात ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्विन म्हणाले: “माझ्या मते विज्ञान शास्त्राचा जितका अधिक अभ्यास होईल तितका तो आपल्याला नास्तिकतेपासून दूर नेतो.” नास्तिक म्हणून प्रख्यात असलेल्या व युरोपमध्ये जन्मलेल्या अल्बर्ट आइन्स्टाईन यांनीही प्रांजळ कबुली दिली: “आपल्याला अंधुकपणे दिसणाऱ्‍या विश्‍वाच्या अद्‌भुत रचनेचे चिंतन करणे व निसर्गामध्ये दृगोचर होणाऱ्‍या बुद्धीचा अगदी सूक्ष्म भाग समजून घेण्याचा नम्र प्रयत्न करणे मला पुरेसे आहे. नोबेल पारितोषिक पटकावणारे अमेरिकन शास्त्रज्ञ आर्थर हॅलि कॉम्प्टन म्हणाले, “सुसंगतपणे उलगडणारे विश्‍व, ‘आरंभी देवाने’ या उदात्त वाक्याची सत्यता पटवून देते.” पवित्रशास्त्राच्या सुरुवातीचे शब्द ते येथे उद्धृत करीत होते.

१६. निर्मितीतील देवाच्या बुद्धी व शक्‍तीची हे विश्‍व कशी स्तुती करते?

१६ प्रबल देशांचे शासनकर्ते आपल्या बुद्धीच्या तसेच अंतरिक्षातील विजयाच्या विज्ञान शास्त्रीय करामतीच्या बढाया मारोत. परंतु, पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्‍या चंद्राच्या आणि सूर्याला प्रदक्षिणा घालणाऱ्‍या ग्रहांच्या तुलनेमध्ये त्यांचे अवकाशातील उपग्रह किती कःपदार्थ वाटतात! आपल्या सूर्यासारखे करोडो मिळून बनणाऱ्‍या तारापुंजासारख्या अब्जावधी तारापुंजांची यहोवाने केलेली निर्मिती, त्याने केलेली त्यांची गटवार मांडणी व अवकाशामध्ये अगणित काळासाठी केलेली त्यांची स्थापना यांच्या तुलनेत या मर्त्य मानवांनी साधलेल्या गोष्टी किती क्षुद्र आहेत! (स्तोत्रसंहिता १९:१, २; इयोब २६:७, १४) यहोवा मानवांना टोळासारखे व प्रबल राष्ट्रांना “कांहीच नाही” असे मानतो यात आश्‍चर्य करण्यासारखे काहीच नाही.—यशया ४०:१३-१८, २२.

१७. एखाद्या निर्मात्याच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवणे का वाजवी आहे?

१७ तुम्ही एखाद्या घरामध्ये राहता का? बहुधा तुम्ही ते बांधले नसेल व कोणी बांधले तेही तुम्हाला माहीत नसेल. परंतु बांधणारा तुम्हाला ठाऊक नाही म्हणून कोणा बुद्धीमान व्यक्‍तीने ते बांधले हे सत्य तुम्ही नाकारणार नाही. घर स्वतःच बनले गेले असे प्रतिपादन करणे किती मूर्खपणाचे दिसेल! हे अफाट विश्‍व व त्यातील सर्वकांही बनवण्यासाठी उच्चकोटीची बुद्धी लागलेली असल्याने कोणी बुद्धीमान निर्माता असावा असा निष्कर्ष काढणे योग्य नव्हे काय? खरोखर, फक्‍त मूढ माणूसच आपल्या हृदयात म्हणेल, “यहोवा अस्तित्वात नाही.”—स्तोत्रसंहिता १४:१; इब्रीयांस ३:४.

१८. देव एक व्यक्‍ति असून प्रशंसेला पात्र आहे हे कशावरून दिसून येते?

१८ फुले, पक्षी, प्राणी, मानव या नावाने ओळखला जाणारा आश्‍चर्यजनक प्राणी, जीवन व जननाचे चमत्कार ह्‍या आपल्या सभोवतालच्या सुंदर गोष्टी, त्यांना घडवणाऱ्‍या बुद्धीवंताविषयी साक्ष देतात. (रोमकर १:२०) जेथे बुद्धी असते तेथे मन असते. जेथे मन असते तेथे एक व्यक्‍ती असते. सर्वोच्च बुद्धी ही सर्व जीवनमात्रांच्या निर्मात्याची, जीवनाच्या स्त्रोताची, सर्वोच्च व्यनिकतची आहे. (स्तोत्रसंहिता ३६:९) सृष्टीकर्ता हा खरोखरच सर्व प्रशंसेला व आराधनेला पात्र आहे.—स्तोत्रसंहिता १०४:२४; प्रकटीकरण ४:११.

१९. (अ) आज, देवाने आपल्याला विजय दिला असा दावा कोणतेहि राष्ट्र का करू शकत नाही? (ब) राष्ट्रांच्या युद्धांशी देवाचा काहीहि संबंध का नाही?

१९ दुसऱ्‍या महायुद्धाच्या कठोर अनुभवांमुळे काही लोकांच्या देवावरील विश्‍वासाला धक्का बसला त्यावेळी, कॅथोलिक, प्रॉटेस्टंट वा पौर्वात्य धर्माचा असो, प्रत्येक देशाने आपापल्या “देवा”चा धावा केला. तर मग, “देवाने” त्यातील काही देशांना विजय दिला व इतरांना पराजित होऊ दिले असे म्हणता येईल का? पवित्रशास्त्र दाखवते की यातील कोणाही देशाने खऱ्‍या देवाचा धावा केला नाही. स्वर्ग व पृथ्वीचा निर्माता यहोवा देव, राष्ट्रांतील गोंधळ व युद्धांना जबाबदार नाही. (१ करिंथकर १४:३३) त्याचे विचार, या जगाच्या राजकारणी व लष्करी राष्ट्रांपेक्षा फार श्रेष्ठ दर्जाचे आहेत. (यशया ५५:८, ९) तसेच खऱ्‍या धर्माचा व यहोवाच्या भक्‍तीचा, राष्ट्रांच्या युद्धाशी किंचितही संबंध नाही. यहोवा हा राष्ट्रीय दैवतांपेक्षा खूप उच्च आहे. सर्व राष्ट्रांमधील शांतीप्रिय पुरुष व स्त्रियांचा देव या नात्याने तो अद्वितीय आहे. पवित्रशास्त्र म्हणते: “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) सर्व राष्ट्रांमध्ये नैतिकतेकडे झुकणारी माणसे पवित्रशास्त्राचा अभ्यास करत आहेत व सर्व मानवजातीच्या निर्मात्याची, ‘शांतीच्या देवा’ची उपासना करत आहेत.—रोमकर १६:२०; प्रे. कृत्ये १७:२४-२७.

२०. ख्रिस्ती धर्म जगत अख्रिस्त व देव-विरोधी असल्याचे कशावरून दिसून येते?

२० कांही लोक पवित्रशास्त्र पाळण्याचा दावा करणाऱ्‍या खिस्ती धर्म जगतातील धर्मांमधील फूट व ढोंगीपणाकडे बोटे दाखवतात. “ज्या देशांपाशी पवित्रशास्त्र आहे ती लगबगीने अण्वस्त्रे साठवत असताना, मी पवित्रशास्त्राच्या देवावर विश्‍वास कसा ठेवू” असेहि ते म्हणतात. वस्तुस्थिती अशी आहे की पवित्रशास्त्राच्या सत्यतेत कधीच फरक पडत नाही. परंतु ख्रिस्ती धर्मजगातील राष्ट्रे व पवित्रशास्त्राच्या ख्रिस्तीधर्मामध्ये उत्तर व दक्षिण ध्रुवांइतके अंतर झाले आहे. ख्रिस्ती धर्म पाळण्याचा त्यांचा दावा ढोंगी आहे. त्यांच्याजवळ पवित्रशास्त्र आहे पण ते त्याची शिकवण पाळत नाहीत. हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकण्याचा आदेश देणारे अमेरिकेचे राष्ट्रपती एकदा उद्‌गारले, माणसांना या जागतिक संकटात मार्गदर्शन करणारा “एखादा यशया वा एखादा प्रेषित पौल असता तर किती बरे झाले असते!” पवित्र शास्त्रातील यशयाशी ते सहमत असते तर त्यांनी कधीहि अणु बॉम्ब टाकला नसता. कारण ‘तलवारी मोडून त्यांचे फाळ व भाल्यांच्या कोयत्या’ करण्याचे समर्थन यशयाने केले. शिवाय पवित्र शास्त्रात पौलाने घोषणा केली की, “आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करीत नाही. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत.” (यशया २:४; २ करिंथकर १०:३, ४) परंतु पवित्र शास्त्राचा सूज्ञ सल्ला अनुसरण्याऐवजी ख्रिस्ती जगातील राष्ट्रे आत्मनाश ओढवणाऱ्‍या शस्त्रास्त्रस्पर्धेत गुंतली आहेत. पवित्र शास्त्र पाळणारे ख्रिस्ती असल्याचा त्यांचा कोणताही दावा खोटा आहे. देवाची इच्छा आचरण्यात उणे पडल्याने त्यांना देवाच्या कोपाला तोंड द्यावे लागेल.—मत्तय ७:१८-२३; सफन्या १:१७, १८.

यहोवाने केलेली निर्मिती व चमत्कार

२१. देवाच्या चमत्कारांविषयी शंका घेणे वाजवी का नाही?

२१ यहोवा निर्माण करतो व चमत्कार घडवतो. पवित्रशास्त्रात नमूद केलेल्या पाण्याचे रक्‍त करण्याच्या, लाल समुद्र दुभंगण्याच्या, येशूला कुमारी अवस्थेत जन्म देण्याच्या वा इतर चमत्कारांबद्दल तुम्हाला कुतुहल वाटत आहे कां? माणसाच्या बुद्धीमत्तेला मर्यादा असल्याने बहुधा यातील कांही चमत्कार कसे झाले हे त्याला कधीच कळणार नाही. उदाहरणार्थ, सूर्योदय व सूर्यास्ताचा चमत्कार त्याला पूर्णपणे कळलेला नाही. मानवाची सृष्टी हाही एक चमत्कार होता. आधुनिक मानवाने तो चमत्कार पाहिला नाही. तो झाला हे त्याला ठाऊक आहे. कारण त्याचे अस्तित्वच ते सिद्ध करते. खरोखर सर्व जीवन व सर्व विश्‍व हा एक अखंड चमत्कार आहे. तर मग, आज तशाच चमत्कारांची गरज नसली तरी देवाने विशेष प्रसंगी खास चमत्कार केले असे देवाचे वचन, पवित्रशास्त्र, आपणास सांगते तेव्हा आपण शंका घ्यावी का?

२२. देवाच्या प्रथम निर्मितीचे वर्णन करा.

२२ यहोवाने केलेली सर्व सृष्टी चमत्कारपूर्ण व अद्‌भुत आहे! परंतु त्याने केलेली सर्वप्रथम सृष्टी सर्वात आश्‍चर्यकारक होती. ती म्हणजे एका आत्मिक पुत्राची, त्याच्या “ज्येष्ठ” अपत्याची निर्मिती. (कलस्सैकर १:१५) या स्वर्गीय पुत्राला “शब्द” म्हटले गेले. त्याच्या निर्मितीनंतर बऱ्‍याच काळाने तो या पृथ्वीवर आला व त्याला “ख्रिस्त येशू (नांवाचा) मनुष्य” असे म्हटले गेले. (१ तिमथी २:५) या कारणामुळे, “शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्‍यांनी परिपूर्ण होते.” असे त्याच्याबद्दल म्हटले गेले.—योहान १:१४.

२३. (अ) देव व त्याच्या पुत्रातील संबंधाचा खुलासा कसा करता येईल? (ब) आपल्या पुत्राद्वारे यहोवाने काय निर्माण केले?

२३ यहोवा व त्याच्या पुत्रामधील संबंधाची तुलना एका कारखान्यातील मालक व्यवस्थापक व त्याच्या योजनेनुसार वस्तु बनवण्यास मदत करणाऱ्‍या त्याच्या मुलाशी करता येईल. सोबतीने काम करणाऱ्‍या आपल्या ज्येष्ठ पुत्रामार्फत यहोवाने इतर अनेक आत्मिक व्यक्‍तींची, देवकुमारांची, निर्मीती केली. त्यानंतर यहोवाच्या पुत्राने, त्याच्या कुशल कारागिराने, अवकाशातील ग्रह ताऱ्‍यांची व पृथ्वीची निर्मिती केलेली पाहून या देवकुमारांनी हर्षोल्लास केला. या सर्वांची निर्मिती झाली अशी आशंका तुम्हास वाटते का? हजारो वर्षांनंतर यहोवाने एका विश्‍वासू माणसाला विचारले: “मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.”—इयोब ३८:४, ७; योहान १:३.

२४. (अ) यहोवाची कोणती पार्थिव निर्मिती लक्षणीय आहे व कोणत्या बाबतीत? (ब) माणूस प्राण्यापासून उत्क्रांत झाला असे म्हणणे अवाजवी का आहे?

२४ काळाच्या ओघामध्ये यहोवाने या पृथ्वीवर झाडे, वृक्ष, फुले, मासे, पक्षी व प्राणी अशा जिवंत भौतिक गोष्टींची निर्मिती केली. (उत्पत्ती १:११-१३, २०-२५) मग देव आपल्या कुशल कारागिराला म्हणाला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू . . . देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.” (उत्पत्ती १:२६, २७) प्रीती, बुद्धी, न्याय व शक्‍ति या देवाच्या थोर गुणांसह, त्याच्या सदृश व त्याच्या प्रतिरूपाचा असा बनवलेला असल्याने तो मूळ पुरुष प्राण्यांपेक्षा अतिशय उच्चकोटीचा होता. निर्मितीत मानव प्राण्यांपेक्षा खूपच श्रेष्ठ आहे कारण तो सारासार विचार करू शकतो, भविष्यासाठी योजना करू शकतो व त्याच्यामध्ये देवाची भक्‍ति करण्याची कुवत आहे. प्राण्यांमध्ये सारासार विचार करण्याची बुद्धी नाही. तर ते उपजत प्रवृत्तीने जगतात. तेव्हा, कोणी निर्माता नसून, अनेक गुणांनी युक्‍त, बुद्धीमान मानव निर्बुद्ध व खालच्या दर्जाच्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाला असे म्हणणे किती अयोग्य आहे!—स्तोत्रसंहिता ९२:६, ७; १३९:१४.

२५, २६. (अ) मानवापुढे कोणते उज्वल भविष्य ठेवण्यात आले? (ब) पृथ्वीवर अवास्तव लोकसंख्येची समस्या का उद्‌भवली नसती?

२५ ‘पूर्वेस एदेनांतील बागेत’ देवाने मनुष्याला ठेवले. मुखपृष्ठावरील बागेसारखी ती सुखसोयींनी युक्‍त बाग होती. परंतु त्यामध्ये तेव्हा फक्‍त आदाम व त्याची बायको असे दोनच मानव होते. नोहाच्या काळातील प्रलयामध्ये नाश झाल्याने ते मूळचे नंदनवन अस्तित्वात नाही. परंतु कांही नद्या, ज्या त्यातून वाहत असत असे पवित्रशास्त्र म्हणते, आजही अस्तित्वात असल्याने त्या बागेची जागा मध्यपूर्वेत कोठे असावी याचा अंदाज लागतो. (उत्पत्ती २:७-१४) या बागेला मध्यबिंदू मानून सर्व पृथ्वीवर जमिनीच्या मशागतीचा विस्तार करण्याची मोठी संधी मानवाला मिळाली होती. त्यामुळे ते जगव्याप्त नंदनवन झाले असते.—यशया ४५:१२, १८.

२६ जसे यहोवा व त्याचा पुत्र हे दोघे कामकरी आहेत तसेच देवाने माणसाला या पृथ्वीवर करण्यास काम दिले. (योहान ५:१७) पहिला पुरुष व स्त्री, आदाम व हव्वा यांना तो म्हणाला: “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे आकाशांतील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ती १:२८) माणसांनी बालके जन्माला आणावी, पृथ्वी भरून टाकावी, पृथ्वीवर मावणार नाहीत इतकी बालके जन्माला घालतच रहावीत असा याचा अर्थ होता का? नाही. कोणी तुम्हाला कपात चहा ओतण्यास सांगितल्यास तुम्ही कपातून ओतू जाऊन सर्व टेबलावर वाहीपर्यंत तो ओतत नाही. तुम्ही कप भरून थांबता. तसे, “पृथ्वी व्यापून टाका” ही यहोवाची आज्ञा दर्शविते की या पृथ्वीवर सुखाने रहाता येईल इतक्या माणसांनी पृथ्वी भरावी असा यहोवाचा उद्देश होता. त्यानंतर मानवांचे पृथ्वीवरील प्रजनन थांबेल. परिपूर्ण अवस्थेतील मानवी समाजात ही गोष्ट एक समस्या बनणार नाही. आजच्या अपूर्ण मानवजातीच्या जगात अति लोकसंख्या समस्या निर्माण करीत आहे.

वाईट गोष्टी—देव त्या का घडू देतो?

२७. आता कोणत्या प्रश्‍नाला उत्तर हवे आहे?

२७ नंदनवनाने व्याप्त पृथ्वी रचण्याचा देवाचा उद्देश होता तर आज पृथ्वी दुष्टता, यातना व दुःखाने कशी भरली गेली आहे? देव सर्वसमर्थ आहे तर अशी परिस्थिती इतक्या दीर्घ काळापर्यंत त्याने का राहू दिली? आपल्या सर्व दुःखांचा अंत होईल अशी काही आशा आहे का? पवित्रशास्त्र काय म्हणते?

२८. नंदनवनाच्या बागेमध्ये बंड कसे शिरले?

२८ पवित्रशास्त्र दाखवते की यहोवाच्या एका आत्मिक पुत्राने त्याच्या सार्वभौमत्वाविरुद्ध वा प्रभुत्वाविरुद्ध बंड केले तेव्हा मानवजातीच्या दुःखांना सुरुवात झाली. (रोमकरांस १:२०; स्तोत्रसंहिता १०३:२२ न्यू.व. रेफरन्स बायबल तळटीप.) मानवाची निर्मिती पाहून हर्षोल्लास करणाऱ्‍यांत हा देवदूतही होता यात शंका नाही. परंतु नंतर लोभीपणा व गर्वाने त्याच्या हृदयात घर केले आणि आदाम व हव्वा यांनी त्यांच्या निर्मात्याची, यहोवाची भक्‍ति करण्याऐवजी आपली करावी या वासनेच्या मोहात तो पडला. बाहुलेच बोलत आहे असे भासवणाऱ्‍या सारखे, एका सर्पामार्फत बोलून या देवदूताने हव्वेला सर्वसमर्थ देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त केले. नंतर तिच्या पतीने आदामानेहि अवज्ञा करून तिच्या पावलावर पाऊल ठेवले.—उत्पत्ती २:१५-१७; ३:१-६; याकोब १:१४, १५.

२९. (अ) कोणत्या वादांचा निकाल व्हावयाचा होता? (ब) देव त्या आव्हानाला कसा सामोरा गेला? (क) सैतानाच्या निंदेला उत्तर देण्यामध्ये तुम्ही कसे सहभागी होऊ शकाल?

२९ तो अवज्ञाकारी देवदूत “जुनाट साप” या नावाने ओळखला जाऊ लागला. (प्रकटीकरण १२:९; २ करिंथकर ११:३) त्याला सैतान म्हणजे “विरोधक” व दियाबल म्हणजे “निंदक” असेही नाव पडले. यहोवाच्या पृथ्वीवरील अधिपत्याच्या योग्यतेबद्दल तसेच नीतिमत्वाबद्दल त्याने वाद घातला व सर्व मानवजातीला खऱ्‍या भक्‍तीपासून तो—सैतान—परावृत्त करील असे आव्हान देवाला दिले. देवाने सैतानाला, आपले आव्हान शाबीत करण्यासाठी जवळपास ६,००० वर्षें दिली, अशासाठी की यहोवाच्या सार्वभौमत्वाविषयीच्या वादाचा कायमचा निकाल लागावा. देवापासून विभक्‍त अशा मानवी शासनाला घोर अपयश आलेले आहे. परंतु, ज्यांच्यामध्ये येशू सर्वांत विशेष होता, अशा विश्‍वासू स्त्री-पुरुषांनी अतिशय कठीण परिक्षांमध्ये आपले सत्व टिकवून, यहोवाचे समर्थन केले आणि सैतान खोटा असल्याचे सिद्ध केले आहे. (लूक ४:१-१३; इयोब १:७-१२; २:१-६; २७:५) सचोटी टिकवणाऱ्‍यांपैकी तुम्हीहि होऊ शकता. (नीतिसूत्रे २७:११) पण आपल्याला क्लेश देणारा सैतान हा एकच शत्रू नव्हे. तर तो दुसरा कोणता शत्रू आहे?

शत्रू—मृत्यू

३०. अवज्ञेमुळे मानवाला मिळणाऱ्‍या दंडाविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते?

३० देवाने अवज्ञेचा दंड सांगितला होता—तो होता, मृत्यू. पहिल्या स्त्रीला शिक्षा फर्मावताना यहोवा म्हणाला: “मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील. तरी तुझा ओढा नवऱ्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” आदाम या पुरुषाला तो म्हणाला: “तू आपल्या निढळाच्या घामाने भाकरी मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेत आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ती ३:१६-१९) या अवज्ञाकारी जोडप्याला आनंदाच्या नंदनवनातून बाहेर, पडीक जमिनीवर हाकून लावले गेले. कालांतराने ते मरण पावले.—उत्पत्ती ५:५.

३१. पाप म्हणजे काय व मानवजातीवर त्याचा काय परिणाम झाला आहे?

३१ परिपूर्णतेचे चिन्ह गमावल्यानंतरच आदाम व हव्वा यांनी मुले जन्माला घातली. आजची सर्व माणसे, त्यांचे अपूर्ण अवस्थेतील वंशज आहेत, म्हणून सर्व मरतात. एक पवित्रशास्त्र लेखक त्याचे या शब्दात वर्णन करतो: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” हे “पाप” म्हणजे काय? ते म्हणजे परिपूर्ण वा पूर्णतेच्या कसोटीत उणे पडणे. जे कांही अपूर्ण असेल ते यहोवाला पसंत नसते वा तो त्यांना जिवंतही ठेवत नाही. पहिला पुरुष आदाम याजकडून पाप व दोष अनुवंशिकतेने सर्व माणसांना आलेले असल्याने त्यांच्यावर “मरणाने राज्य केले” आहे. (रोमकरांस ५:१२, १४) प्राणी मरतात तसाच हा पतित मानवही मरतो.—उपदेशक ३:१९-२१.

३२. आपल्याला वारसाने आलेल्या मृत्यूचे वर्णन पवित्र शास्त्र कसे करते?

३२ हे “मरण” म्हणजे काय? मरण हे जीवनाच्या विरुद्ध आहे. मानव आज्ञाधारक राहिल्यास अनंत जीवनाची आशा देवाने त्याच्यापुढे ठेवली होती. परंतु त्याने अवज्ञा केली व त्याचा दंड होता मृत्यू, बेशुद्धता, अस्तित्वहीनता. अवज्ञा करून मरण पावल्यास मानवाचे जीवन आत्मिक जगात वा जळत्या नरकात पाठवण्याबद्दल देवाने कांहीहि म्हटले नव्हते. “तू खास मरशील” अशी ताकीद त्याने माणसाला दिली होती. तथापि, मनुष्यवध करणाऱ्‍या दियाबलाने म्हटले होते: “तुम्ही खरोखर मरणार नाही.” (उत्पत्ती २:१७; ३:४; योहान ८:४४) आदामापासून सर्व माणसांना अनुवंशिकतेने मिळाला आहे, मातीसारखा मृत्यु.—उपदेशक ९:५, १०; स्तोत्र ११५:१७; १४६:४.

३३. (अ) मानवजात व ही पृथ्वी कोणत्या गौरवी भविष्याच्या प्रतिक्षेत आहेत? (ब) आपल्या पुत्रामार्फत यहोवा कोणत्या तीन महत्वाच्या गोष्टी साध्य करतो?

३३ तर मग मरणाऱ्‍या माणसाला कांही भविष्यच नाही का? एक अद्‌भुत भविष्य आहे! पवित्रशास्त्र दाखवते की आतापर्यंत मरण पावलेल्यांसकट सर्व मानवजातीसाठी नंदनवनाचा देवाने केलेला संकल्प कधीहि अपयशी ठरणार नाही. यहोवा म्हणतो: “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. माझे पादासन मी शोभायमान करीन.” (यशया ६६:१; ६०:१३) त्याच्या उदंड प्रेमामुळे यहोवाने आपला पुत्र—शब्द—या पृथ्वीवर पाठवला. अशासाठी की त्याच्यामार्फत मानवजातीला जीवन मिळावे. (योहान ३:१६; १ योहान ४:९) त्याच्या पुत्रामार्फत यहोवा साध्य करीत असलेल्या तीन महत्वाच्या गोष्टीची चर्चा आता आपण करणार आहोत त्या म्हणजे, (१) मृत्यूच्या मगरमिठीतून मुक्‍त करणे (२) मृतांना खरोखर पुन्हा जीवन देणे व (३) सर्व मानवजातीवर एका निर्दोष शासनाची स्थापना करणे.

मृत्युपासून मुक्‍ती

३४, ३५. (अ) मृत्युपासून माणसाची सुटका फक्‍त कशाने होणे शक्य होते? (ब) खंडणी म्हणजे काय?

३४ प्राचीन काळापासून देवाच्या संदेष्ट्यांनी मानवाच्या अमरत्वावर नव्हे तर देव “त्यांना मुक्‍त” करील या आशेवरील आपला विश्‍वास व्यक्‍त केला आहे. (होशेय १३:१४) परंतु माणसाला मृत्युच्या बंधनातून मुक्‍ती मिळणे कसे शक्य आहे? यहोवाच्या निर्दोष न्यायाप्रमाणे “जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा व दांताबद्दल दांत” देण्याची जरूरी होती. (अनुवाद १९:२१) या कारणामुळे, आदामाने जाणून-बुजून देवाची अवज्ञा करून स्वतःचे परिपूर्ण जीवन घालवून सर्व मानवजातीवर अनुवंशिक मृत्यू आणला असल्याने आदामाने घालवलेल्या गोष्टी पुन्हा प्राप्त करण्यासाठी दुसऱ्‍या एखाद्या परिपूर्ण माणसाला आदामाच्या जागी आपल्या निर्दोष जीवनाचे मोल द्यावे लागणार होते.

३५ ‘जशास तसे’ या तत्वाला इतिहासात विस्तृत मान्यता मिळाली आहे. सर्वसाधारपणे “खंडणी देणे” असा वाक्‌प्रचार वापरला जातो. “खंडणी” म्हणजे काय? “एखाद्या व्यक्‍तीला वा वस्तूला बंदी करून ठेवणाऱ्‍याला ती व्यक्‍ती वा वस्तु परत आणण्यासाठी दिलेली किंमत. म्हणून बरीच किंमत देऊन लढाईतील बंदी वा दासांना मुक्‍त केल्यास त्यांची खंडणी भरली असे म्हटले जाते. एखाद्यासाठी वा ऐवजी जो काही मोबदला दिला जातो ती त्याची खंडणी होय.” d आदामाने पाप केल्यापासून, युद्धातील कैदी वा दासांप्रमाणे सर्व मानवजात अपूर्णतेत व मृत्यूच्या बंधनात पडली आहे. त्यांना सोडवण्यासाठी खंडणी द्यावयाची होती. खंडणीची किंमत योग्य आहे किंवा नाही याविषयी आता व भविष्यात वाद होऊ नये म्हणून एका परिपूर्ण मानवी जीवाचा, म्हणजेच आदामाच्या तंतोतंत बरोबरीचा, यज्ञ देण्याची गरज होती.

३६. यहोवाने एका परिपूर्ण मानवी जीवाची, खंडणी म्हणून योजना कशी केली?

३६ परंतु असा परिपूर्ण मानवी जीव कोठे सापडणार? अपूर्ण आदामाचे वंशज असल्याने सर्व माणसे अपूर्ण वा सदोष जन्माला आली आहेत. “कोणाहि मनुष्यास आपल्या भावाला मुक्‍त करता येत नाही किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.” (स्तोत्रसंहिता ४९:७) मानवजातीविषयीच्या त्याच्या गाढ प्रेमाने प्रवृत्त होऊन, गरजेची दखल घेताना यहोवाने आवश्‍यक असणारे यज्ञार्पण बनण्याकरता आपला परमप्रिय “ज्येष्ठ” पुत्र दिला. या आत्मिक पुत्राचे, शब्दाचे, परिपूर्ण जीवन त्याने एका यहुदी कुमारीच्या, मरियेच्या, गर्भात पाठवले. ती तरूणी गरोदर राहिली. आणि कालांतराने तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव येशू असे ठेवले गेले. (मत्तय १:१८-२५) जीवनाच्या निर्मात्याला हा अद्‌भुत चमत्कार करता यावा हे तर्कशुद्ध आहे.

३७. जीवनाची इच्छा करणाऱ्‍या सर्व मानवांवरील आपले प्रेम येशूने कसे दाखवले?

३७ येशू तारुण्यात आला, त्याने स्वतःस यहोवाला अर्पण केले व त्याचा बाप्तिस्मा झाला. तेव्हा देवाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याची नियुक्‍ती केली. (मत्तय ३:१३, १६, १७) येशूचे पार्थिव जीवन स्वर्गातून आलेले असल्यामुळे त्याला आपले परिपूर्ण जीवन यज्ञार्पण असे वाहून मानवजातीची मृत्युपासून सुटका करणे साध्य झाले होते. (रोमकरांस ६:२३; ५:१८, १९) त्याने म्हटल्याप्रमाणे “मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.” “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.” (योहान १०:१०; १५:१३) सैतानाने येशूला वधस्तंभावर मारवले तेव्हा या खंडणीच्या योजनेद्वारे विश्‍वासू मानवांना जीवन मिळेल हे माहीत असल्याने येशूने हा क्लेशकारक मृत्यू पत्करला.—मत्तय २०:२८; १ तिमथ्यी २:५, ६.

जीवनाची पुनःप्राप्ती

३८. देवाच्या पुत्राला पुनर्जीवन कसे प्राप्त झाले व हे कशाने सिद्ध होते?

३८ शत्रूंनी देवाच्या पुत्राला ठार मारले तरी, देवाशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याने परिपूर्ण मानवी जीवनावरील आपला हक्क, कधीच गमावला नव्हता. परंतु कबरेमध्ये मृतावस्थेत असतांना, मानवजातीच्या फायद्यासाठी, येशू ही मौल्यवान चीज, मानवी जीवनावरील त्याचा हक्क, कसा वापरणार? या ठिकाणी यहोवाने अद्वितीय असा आणखी एक चमत्कार घडवून आणला. अशा प्रकारचा हा पहिला चमत्कार होता. येशू कबरेमध्ये असल्याच्या तिसऱ्‍या दिवशी यहोवाने त्याला मृत्युतून, एक आत्मिक, व्यक्‍ति म्हणून उठवले. (रोमकर ६:९; १ पेत्र ३:१८) पुनरुत्थानाबद्दल लोकांची खात्री पटावी म्हणून वेगवेगळ्या प्रसंगी येशूने रूपांतरित होणारे मानवी शरीर धारण करून आपल्या शिष्यांना दर्शन दिले. एका प्रसंगी ५००हून अधिक लोकांनी त्याला पाहिले. यातील कोणालाही तसेच गौरवी अवस्थेतीत येशूच्या दर्शनाने आंधळा झालेल्या प्रेषित पौलालाहि त्याच्या पुनरुत्थानाच्या चमत्काराविषयी कोणतीही शंका घेण्यास कारण नव्हते.—१ करिंथकर १५:३-८; प्रे. कृत्ये ९:१-९.

३९. (अ) आपल्या यज्ञार्पणाच्या मोलाचा उपयोग येशू कसा करतो व प्रथम कोणासाठी करतो? (ब) येशू कोणत्या आणखी मोठ्या चमत्काराविषयी बोलला?

३९ पुनरुत्थानानंतर ४० दिवसांनी, मानवजातीच्या मुक्‍ततेसाठी आपल्या अव्यंग मानवी यज्ञार्पणाचे मोल देवाला अर्पण करण्यासाठी येशू त्याच्या समक्ष उपस्थित होण्यास स्वर्गास गेला. “परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. आणि तेव्हापासून त्याचे वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे.” (इब्रीयांस १०:१२, १३) या खंडणीने प्रथम मुक्‍त होणारा “जे ख्रिस्ताचे (आहेत)” अशा विश्‍वासू ख्रिस्तीजनांचा “लहान कळप” आहे. (लूक १२:३२; १ करिंथकर १५:२२, २३) ते “माणसातून विकत घेतलेले” असल्यामुळे पुनरुत्थानामध्ये ते स्वर्गात ख्रिस्ताचे आत्मिक सहकारी बनतात. (प्रकटीकरण १४:१-५) परंतु सध्या कबरेमध्ये मृतावस्थेत असलेल्या जनसमूहांबाबत काय? येशू पृथ्वीवर असतांना म्हणला की न्याय करण्याचा व जीवन देण्याचा अधिकार त्याच्या पित्याने त्याला दिला होता. तो पुढे म्हणाला: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका. कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२६-२९) नंदनवन झालेल्या पृथ्वीवर तो त्यांना पुनर्जीवन देईल.

४०, ४१. (अ) “पुनरुत्थान” या शब्दाचा नेमका अर्थ काय ते सांगा. (ब) देवाच्या, पुनरुत्थानाच्या वचनावर आपण विश्‍वास का ठेवू शकतो?

४० “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका” या येशूच्या शब्दांची नोंद घ्या. तरीहि, खूप पूर्वी मरण पावलेली व्यक्‍ति मृत्यूपासून मुक्‍त होऊन परत जिवंत कशी होईल? त्याचे शरीर मातीला मिळाले नाही का? त्याच्या शरिराचे कांही अंश, प्राणी वा वनस्पती अशा दुसऱ्‍या जीवामध्ये शोषले गेले असतील. परंतु मूळचीच रासायनिक द्रव्ये एकत्रित करणे असा पुनरुत्थानाचा अर्थ नव्हे. देव ती व्यक्‍ती तिच्या मूळ व्यक्‍तिमत्वासह पुनर्निर्मित करतो असा अर्थ आहे. पार्थिव मूल द्रव्यापासून देव एक नवीन शरीर बनवतो व त्या व्यक्‍तिने मरणापर्यंत घडलेली त्यामध्ये मूळचीच लक्षणे, मूळचेच विशेष गुण, मूळच्या आठवणी व मूळचा जीवनक्रम घालतो.

४१ तुमचे आवडते घर जळून भस्म झाल्याचा अनुभव कदाचित तुम्हाला असेल. परंतु त्याच्या नमुन्याचा बारीकसारिक तपशील तुमच्या आठवणीत स्पष्ट असल्याने तुम्ही तेच घर पुन्हा बांधून घेऊ शकाल. तर मग, ज्यांच्यावर त्याचे प्रेम आहे अशांना देवाने स्मरणात ठेवल्याने, स्मरण शक्‍तीचा निर्माता देव नक्कीच त्यांची पुनर्निर्मिती करील. (यशया ६४:८) याच अर्थाने न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या पवित्र शास्त्र आवृत्तीत “स्मृती कबर” असा शब्द वापरला आहे. पहिला मानव निर्माण करण्यात जसा देवाने चमत्कार घडवला तसाच, मृतांना जीवन देण्याची देवाची वेळ आली म्हणजे तो तसा चमत्कार करील. फक्‍त या वेळी तो चमत्कार अनेकदा करील—उत्पत्ती २:७; प्रे. कृत्ये २४:१५.

४२. पृथ्वीवर अनंत जीवनाची शक्यता व खात्री का आहे?

४२ पृथ्वीवरून मरून न जाण्याच्या भविष्यासह, देव मानवजातीला पुनर्जीवन देईल. परंतु पृथ्वीवर अनंत जीवन कसे शक्य आहे? ते शक्य आहे व त्याची खात्री आहे. कारण ती देवाची इच्छा व तसा देवाचा हेतू आहे. (योहान ६:३७-४०; मत्तय ६:१०) आदामाकडून वारसाने मृत्यू आल्यामुळे आज मानव मरतो. परंतु माणसाने उपभोगाव्या अशा, पृथ्वीवरच्या, अनंत प्रकारच्या अद्‌भुत गोष्टींचा विचार केल्यास शंभराहून कमी वर्षांचे आयुष्य फारच तोकडे आहे! मानवाच्या वंशजांना ही पृथ्वी देतांना, फक्‍त शंभर वा हजारच वर्षें नव्हे तर अनंत काळापर्यंत जगून त्यांनी सृष्टीच्या शोभेचा आस्वाद घ्यावा असा देवाचा हेतू होता!—स्तोत्रसंहिता ११५:१६; १३३:३.

शांतीचे परिपूर्ण सरकार

४३. (अ) परिपूर्ण सरकारची कशी गरज आहे? (ब) या बाबतीत यहोवाचा उद्देश काय आहे?

४३ आपल्या पहिल्या माता-पित्याने देवाच्या आज्ञेला अव्हेरल्यामुळे, मानवी सरकार सैतानाच्या वर्चस्वाखाली आहे. त्याला अनुसरुन पवित्रशास्त्र सैतानाला ‘या युगाचे दैवत’ म्हणते. (२ करिंथकर ४:४) तो तसा आहे हे युद्धे, क्रूरपणा, भ्रष्टाचार व मानवी सरकाराची अस्थिरता सिद्ध करतात. या गोंधळातून शांती आणण्यामध्ये लीग ऑफ नेशन्स्‌ व संयुक्‍त राष्ट्रसंघालाहि अपयश आलेले आहे. शांतीच्या सरकारसाठी मानवजात टाहो फोडीत आहे. जो सृष्टीकर्ता या पृथ्वीवरील नंदनवनाची पुनर्स्थापना करणार आहे तो त्या नंदनवनासाठी एका परिपूर्ण सरकारची योजना करील हे व्यवहार्य वाटत नाही का? आणि तेच करण्याचा यहोवाचा हेतू आहे. या सरकार मध्ये त्याचे प्रतिनिधित्व करणारा राजा हा त्याचा “शांतीचा अधिपती” येशू ख्रिस्त असेल व “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार”—यशया ९:६, ७.

४४. (अ) हे सरकार कोठे असेल? (ब) ते कसे बनेल?

४४ पवित्रशास्त्र दर्शविते की हे परिपूर्ण सरकार स्वर्गात असेल या मोक्याच्या ठिकाणाहून राजा येशू ख्रिस्त सर्व भूतलावर नीतीने चोख राज्य करील. शिवाय त्या अदृश्‍य स्वर्गीय सरकारमध्ये राज्य करण्यास त्याला सहकारीही असतील. यांची निवड, परिक्षांमध्ये येशूला धरून रहाणारे त्याचे अनुयायी, ज्यांना तो म्हणला की, “जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो” अशा विश्‍वासू माणसांतून करण्यात आलेली आहे. (लूक २२:२८, २९) मानवजातीतील फारच मोजके लोक येशू ख्रिस्ताबरोबर राज्य करण्यास स्वर्गाला नेले जातात. आज राष्ट्रांमध्ये जसे लोकसभेमध्ये राज्य करण्यास थोड्यांची निवड होते तसेच हे आहे. पवित्रशास्त्र दाखवते की येशू ख्रिस्ताचे फक्‍त १,४४,००० सहराजे असतील. याचा अर्थ देवाच्या राज्यात वा स्वर्गीय सरकार मध्ये येशू ख्रिस्त व पृथ्वीवरून स्वर्गात घेतलेले १,४४,००० लोक असतील. (प्रकटीकरण १४:१-४; ५:९, १०) आणि पृथ्वीचे काय होणार? स्तोत्रसंहिता ४५:१६ म्हणते की, राजा “सर्व पृथ्वीवर . . . अधिपती” नेमील. नैतिक तत्वांवर गाढ श्रद्धा असलेल्या लोकांची मानवी “अधिपती” वा शासकीय पर्यवेक्षक म्हणून स्वर्गातून नेमणूक होईल.—यशया ३२:१ पडताळा.

४५, ४६. (अ) येशूने भूतलावर केलेल्या प्रचाराचा मुख्य विषय कोणता होता? (ब) परिपूर्ण सरकारची स्थापना तत्काल का करण्यात आली नाही? (क) भविष्यवाणी व जागतिक घटना यामध्ये इ.स. १९१४ हे वर्ष कसे विशेष होते?

४५ हे परिपूर्ण सरकार कधी व कसे स्थापन होईल? येशू भूतलावर असतांना राज्य हाच त्याच्या प्रचाराचा मुख्य विषय होता. (मत्तय ४:१७; लूक ८:१) परंतु, त्याने त्यावेळी वा त्याच्या पुनरुत्थानाच्या वेळी त्या राज्याची स्थापना केली नाही. (प्रे. कृत्ये १:६-८) स्वर्गात चढून गेल्यावर यहोवाची नियुक्‍त वेळ येईपर्यंत त्याला थांबावयाचे होते. (स्तोत्रसंहिता ११०:१, २; इब्रीयांस १:१३) पवित्रशास्त्रातील भविष्यवाणी दर्शवते की ती नियुक्‍त वेळ इ.स. १९१४ मध्ये आली. परंतु कोणी विचारील, ‘परिपूर्ण सरकार ऐवजी १९१४ पासून जागतिक कष्ट अधिक वाढले नाहीत काय?’ तोच तो मुद्दा आहे! देवाचे राज्य येण्याचा व अलिकडच्या काळातील आपत्तींचा कसा घनिष्ट संबंध आहे ते आता आपण पाहू.

४६ १९१४च्या जवळपास ३५ वर्षें आधीपासून, १९१४ हे वैशिष्ठ्यपूर्ण वर्ष आहे असे पवित्रशास्त्रातील भविष्यवाद दाखवतो याकडे द वॉचटावर (सध्या जगातील सर्वांत जास्त वितरणाचे धार्मिक नियतकालिक) लक्ष वेधवीत होते. १९१४ मध्ये या भविष्यवादांच्या पूर्ततेची उल्लेखनीय सुरुवात झाली. येशू राज्यसामर्थ्यासह उपस्थित असल्याचे सिद्ध करणाऱ्‍या व या व्यवस्थेच्या अंतकाळी दिसणाऱ्‍या “चिंन्हां” विषयींचा एक भविष्यवाद येशूने स्वतः १९०० वर्षांपूर्वी सांगितला होता. या चिन्हाविषयी आपल्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना तो म्हणाला: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत.” (मत्तय २४:३, ७, ८) आधीच्या २५०० वर्षांमध्ये झालेल्या एकूण ९०० युद्धांपेक्षा सातपट हानी करणारे पहिले महायुद्ध १९१४ मध्ये सुरु होऊन या भविष्याची लक्षणीय पूर्तता झाली! तेव्हापासून सतत वेदना चालू आहेत. १९१४ पासून जगाला क्लेष देणाऱ्‍या, युद्ध हानीचा, अन्‍न तुटवड्याचा वा मोठमोठ्या धरणीकंपांचा अनुभव तुम्हाला आला आहे का? तसे असल्यास या व्यवस्थेच्या “समाप्ती”चे “चिन्ह” पाहणाऱ्‍यांतील तुम्ही एक साक्षीदार आहात.—दानिएल १२:४.

४७. “चिन्हा”ची पूर्तता करणाऱ्‍या घटना अलिकडल्या वर्षात कशा तीव्र झाल्या आहेत?

४७ पहिल्या महायुद्धापेक्षा चौपट हानीकारक अशा दुसऱ्‍या महायुद्धात तसेच या आण्विक युगात “वेदना” अधिक तीव्र झाल्या असून “पृथ्वीवर . . . राष्ट्रे घाबरी होऊन पेंचात पडतील भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील” ही येशूने पुढे दिलेली भविष्यवाणी पूर्ण करत आहेत. (लूक २१:२५, २६) गुन्हे व दुष्टपणा, मुलांमधील आज्ञाभंग व अपराध यांची वाढ तसेच फोफावलेली निरीश्‍वरवादीवृत्ती व अनीती अशी भीतीदायक परिस्थिती या दुष्ट व्यवस्थेच्या “शेवटल्या काळी” ठळकपणे दिसेल असेहि भविष्य करण्यात आले होते.—२ तिमथ्यी ३:१-५; मत्तय २४:१२.

४८. पृथ्वीवरील दुःखांना कोण जबाबदार आहे व ती १९१४ पासून का वाढली आहेत?

४८ परंतु १९१४ मध्ये स्वर्गीय राज्याची स्थापना झाली आहेच तर मग पृथ्वीवर हा सर्व त्रास का? याला सैतान-दियाबल जबाबदार आहे, ख्रिस्ताला राजसत्ता मिळाल्यावर त्याने सर्व प्रथम अदृष्य स्वर्गात सैतानाशी लढण्याचे काम केले. परिणामी, “सर्व जगाला ठकविणारा” सैतान याला त्याच्या सर्व दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले. आपला नाश जवळ येत असल्याचे कळल्याने तो पृथ्वीवर गदारोळ माजवीत आहे. “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान, आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”—प्रकटीकरण १२:७-९, १२.

४९. (अ) “पृथ्वीची नासाडी” करणाऱ्‍यांचे काय होईल? (ब) यहोवा, राष्ट्रांवर आपला “निर्णय” कसा अमलात आणील?

४९ या दुःखांचा कधी अंत होईल का? होय!—जेव्हा प्रत्यक्ष स्वर्गीय सरकार, सर्वसमर्थ देवाचे राज्य, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करण्यास पाऊल उचलेल तेव्हा. (प्रकटीकरण ११:१८; दानिएल २:४४) देव त्याच्या हस्तकामाचा—पृथ्वीचा—नाश आण्विक अस्रांनी करण्यास राजकीय सत्ता वा खोटे ख्रिस्ती वा इतरहि कोणाला मुभा देणार नाही. उलट तो म्हणतो: “राष्ट्रे एकत्र जमवावी, राज्ये एकत्र मिळवावी, त्यांवर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पाडावा हा माझा निश्‍चय आहे.” (सफन्या ३:८) पृथ्वीवरील, सैतानाच्या सर्व अनुयायांवर फार मोठा नाश आणण्यास यहोवा, आपल्या ख्रिस्तातर्फे, त्याच्या कह्‍यात असलेल्या, विश्‍वातील प्रचंड शक्‍तींचा, उपयोग करील. नोहाच्या काळातील प्रलयाप्रमाणेच हा विनाश जागतिक प्रमाणावर असेल.—यिर्मया २५:३१-३४; २ पेत्र ३:५-७, १०.

५०. (अ) “हर्मगिदोन” म्हणजे काय? (ब) कोणते विशिष्ठ लोक हर्मगिदोनातून वांचतील?

५० पवित्रशास्त्रामध्ये दुष्ट राष्ट्रांच्या या नाशाला देवाची हर्मगिदोनची लढाई असे म्हटले आहे. (प्रकटीकरण १६:१४-१६) फक्‍त यहोवा व धार्मिकतेच्या शोधात असलेले नम्र लोकच हर्मगिदोनातून वाचून देवाच्या शांतीपूर्ण नव्या व्यवस्थेत दाखल होतील. (सफन्या २:३; यशया २६:२०, २१) अशांबद्दल पवित्रशास्त्र म्हणते: “पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील. ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्रसंहिता ३७:११) त्यावेळी पृथ्वीवर नंदनवनाच्या भव्य पुनस्थापनेची सुरुवात होईल.

नंदनवनात प्रवेश मिळूवन देणारे शिक्षण

५१. तुम्ही आताच कारवाई करण्याची आवश्‍यकता का आहे?

५१ तुम्हाला नंदनवनात रहावयाला आवडेल का? तुमचे उत्तर ‘होय’ असल्यास, आजची संकटग्रस्त व्यवस्था व येणाऱ्‍या विनाशाच्या ‘चिन्हा’ बद्दल बोलतांना येशूचे पुढील शब्द ऐकून तुम्हाला अतिशय आनंद होईल. तो म्हणाला, “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” १९१४ मध्ये “वेदनांचा प्रारंभ” पाहणाऱ्‍या पिढीतील काही लोक पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना झालेली पाहतील. (मत्तय २४:३-८, ३४) परंतु आज बहुतेक लोक विनाशाकडे जाणाऱ्‍या रुंद मार्गावर आहेत ही खेदाची परिस्थिती आहे. (मत्तय ७:१३, १४) त्यांना बदलण्यासाठी फार थोडा वेळ उरला आहे. यहोवाने वेळीच इशारा दिलेला आहे याविषयी तुम्हाला किती कृतज्ञता वाटेल! तुम्हाला जीवन मिळावे अशी यहोवाची इच्छा असल्याने योग्य पाऊले टाकण्यास तो तुम्हाला मदत करील.—२ पेत्र ३:९; यहेज्केल १८:२३.

५२. धर्माविषयी सूज्ञ निवड करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज भासते?

५२ तुम्हाला आता अचूक ज्ञानाची मोठी गरज आहे. (१ तिमथ्यी २:४; योहान १७:३) ते तुम्हाला कोठे मिळेल? ते कोठल्याही धर्मात मिळेल का? जसे डोंगरावरचे सर्व रस्ते शिखराकडे जातात तसे सर्व धर्म एकाच ध्येयाकडे नेतात असे काही लोक म्हणतात. पण त्यांचे केवढे चुकते आहे! योग्य रस्ता शोधण्यासाठी गिर्यारोहक नकाशा वापरतात व वाटाडेही घेतात. तसेच सार्वकालिक जीवनाकडे नेणारा सत्याचा एकच धर्म आहे व तो शोधण्यास मार्गदर्शन लागेल.—प्रे. कृत्ये ८:२६-३१.

५३. (अ) अनंत जीवन मिळवण्यासाठी तुम्ही काय करत राहिले पाहिजे? (ब) सैतानाच्या कोणत्या परिक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल?

५३ तुम्हाला मदत करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी हे माहितीपत्रक उपलब्ध केले आहे. पवित्रशास्त्रातील काही मूलभूत सत्ये समजण्यास त्याने तुम्हाला आधीच मदत केलेली आहे, नाही का? प्रत्येक मुद्दा देवाच्या प्रेरित वचनावर आधारित असल्याची खात्री तुम्ही निःसंशय केलीच असेल. आता आपले ध्येय गाठण्यासाठी तुम्ही शिकत राहिले पाहिजे. समाजातील जागेसाठी योग्यता मिळवण्यासाठी व्यक्‍तीला लौकिक शिक्षणाची जशी गरज असते तशी नंदनवनमय पृथ्वीवर बचावून राहणाऱ्‍या समाजात प्रवेश करण्यासाठी सुसज्ज होण्यास पवित्रशास्त्राच्या शिक्षणाची गरज आहे. (२ तिमथ्यी ३:१६, १७) घनिष्ठ सहकाऱ्‍यांकडून विरोध करवून वा स्वार्थी भौतिक वा अनैतिक मार्गांचे प्रलोभन दाखवून सैतान तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करील. सैतानाला शरण जाऊ नका. तुमची व तुमच्या सबंध कुटुंबाची सुरक्षा व भविष्य तुमचा पवित्रशास्त्र अभ्यास पुढे चालू ठेवण्यावर अवलंबून आहे.—मत्तय १०:३६; १ योहान २:१५-१७.

५४. तुमच्या जवळपास ज्ञानार्जनाची आणखी कोणती तरतूद यहोवाने केली आहे?

५४ सध्याचा तुमचा पवित्रशास्त्राचा अभ्यास चालू ठेवण्याव्यतिरिक्‍त शिकण्याचा आणखीन एक मार्ग आहे. पवित्रशास्त्राच्या अभ्यासात रुची असलेले तुमच्या शेजारपाजारचे लोक स्थानिक राज्यसभागृहातील सभांना नेमाने उपस्थित राहतात. सर्व उपस्थित लोक पवित्रशास्त्रापासून शिक्षण घेण्यास तेथे येतात व अधिक चांगल्या व्यक्‍ति बनण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करतात: “चला, आपण यहोवाच्या पर्वतावर [त्याचे भक्‍तीचे स्थळ] . . . चढून जाऊ. तो आम्हांस आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” असे म्हणून ते नव्या लोकांचे तत्परतेने स्वागत करतात. (यशया २:३) पवित्र शास्त्राच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी चांगली कारणे इब्री १०:२४, २५ मध्ये सांगितली आहेत. तेथे म्हटले आहे: “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा. आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.”

५५. (अ) यहोवाची संस्था इतर संस्थाहून कोणत्या बाबतीत वेगळी आहे? (ब) इतर लोकांच्या तुलनेत यहोवाच्या साक्षीदारांची एकता कशी आहे?

५५ यहोवाच्या संस्थेच्या सान्‍निध्यात राहिलात की, तेथील वातावरण देऊळ, वा चर्चपेक्षा अगदी वेगळे असल्याचे तुम्हाला दिसेल. तेथे पैशांची मागणी नसते, उखाळ्या-पाखाळ्या व भांडणे नाहीत. कौटुंबिक पार्श्‍वभूमि वा सांपत्तिक स्थितीमुळे भेद केला जात नाही. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये प्रीती हा सर्वात उल्लेखनीय गुण आहे. प्रथम ते यहोवावर व नंतर इतर लोकांवर प्रीती करतात. खऱ्‍या ख्रिस्ती लोकांची ही वैशिष्ट्ये आहेत. (मत्तय २२:३७-३९; योहान १३:३५) त्यांच्या सभांना उपस्थित राहून याची खात्री तुम्ही स्वतः केली पाहिजे. त्यांच्या एकतेची तुमच्यावर छाप पडेल यात संशय नाही. २००हून अधिक देशांमध्ये तीस लाखांपेक्षा अधिक साक्षीदार आहेत. पण सर्व जगातील साक्षीदार आपापल्या सभांमध्ये सारखाच कार्यक्रम चालवतात. अनेक भाषांमध्ये एकाचवेळी छपाई केल्याने सर्व जगातील बहुतांश साक्षीदार त्यांच्या साप्ताहिक सभांमध्ये कांही तासांच्या अंतराने एकच शास्त्रीय विषय शिकतात. यहोवाच्या संस्थेतील एकता या विभक्‍त जगातील एक आधुनिक चमत्कारच आहे.

५६. (अ) यहोवाच्या संस्थेशी संलग्न राहिल्याने तुम्हाला कोणते फायदे होऊ शकतात? (ब) समस्या उत्पन्‍न झाल्यास तुमची प्रतिक्रिया कशी असावी? (क) आपले जीवन यहोवाला समर्पण करणे तुम्हाला महत्वाचे का वाटावे?

५६ तुम्ही नेमाने यहोवाच्या लोकांच्या सान्‍निध्यात रहाल तेव्हा “नवा मनुष्य” धारण करण्याचा तसेच “प्रीती, आनंद शांती सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा सौम्यता, इंद्रीयदमन” ही देवाच्या आत्म्याची फळे जोपासण्याची तुम्हाला गरज भासेल. (कलस्सैकर ३:१०, १२-१४; गलतीकर ५:२२, २३) यामुळे तुम्हाला गाढ समाधान मिळेल. भ्रष्ट जगात रहात असल्याने व स्वतःच्या अपूर्णत्वामुळे वेळोवेळी तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल. परंतु यहोवा तुम्हाला मदत करील. त्याला संतोषविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्‍यांना त्याचे वचन खात्री देते की “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिपैकर ४:६, ७) यहोवाचे प्रेम तुम्हाला आकर्षित करील व त्यामुळे त्याची सेवा करावी असे तुम्हाला वाटेल. या प्रेमळ देवाला आपले जीवन कसे समर्पित करावे व त्याचा विशेष साक्षीदार कसे बनावे हे दाखवण्यात यहोवाच्या साक्षीदारांना आनंद होईल. (स्तोत्रसंहिता १०४:३३; लूक ९:२३) तो एक विशेषाधिकार आहे. विचार करा! यहोवाचा साक्षीदार या नात्याने या पृथ्वीवरील नंदनवनात अनंत जीवनाच्या ध्येयाकडे तुम्ही वाटचाल करू शकता.—सफन्या २:३; यशया २५:६, ८.

५७. (अ) नवीन व्यवस्थेमध्ये देव व मानवजातीमध्ये कसा घनिष्ठ संबंध असेल? (ब) त्यावेळी तुम्ही ज्यांचा आनंद लुटाल अशा काही ईश्‍वरी देणग्या कोणत्या?

५७ यास्तव, शिक्षण तसेच यहोवा देव, त्याचा पुत्र व धार्मिकतेच्या स्वर्गीय सरकाराविषयी प्रेम व कदर वाढवणे पुढे चालू ठेवा. देवाचे सरकार व त्याकडून मानवजातीवर होणाऱ्‍या आशीर्वादांच्या वर्षावाचे वर्णन करताना पवित्रशास्त्राचा भविष्यवाद म्हणतो: “पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील. आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील.” आजच्या स्वार्थी नाशकारक मानवी सरकारांपेक्षा अतिशय उन्‍नत असा “देव स्वतः” नवीन व्यवस्थेमध्ये त्याला प्रेम व उपासना करणाऱ्‍या सर्वांपाशी एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे राहील. खरोखर, यहोवा देवाची खरी भक्‍ति हा एकच धर्म तेथे असेल व त्याचे उपासक पिता-पुत्रांसारख्या घनिष्ठ संबंधाचा आनंद लुटतील. तो अतिशय प्रेम पिता असल्याचे किती भव्य अर्थाने सिद्ध करील! “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्‍यापुढे मरण नाही. शोक, रडणे, कष्ट हीहि नाहीत. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.

५८. यहोवा ‘सर्व नवे करील’ याबद्दल तुम्हाला खात्री का वाटावी?

५८ अशाप्रकारे परिपूर्ण स्वर्गीय सरकारखाली नंदनवन पृथ्वीची स्थापना करण्याचा महान चमत्कार सिद्धीस जाईल. उद्याच्या सूर्योदया व सूर्यास्ता इतकाच तो निश्‍चित आहे. कारण स्वर्ग व पृथ्वीच्या निर्मात्या यहोवा देवाची वचने नेहमी “विश्‍वसनीय व सत्य” आहेत. आपल्या स्वर्गीय सिंहासनावरून अशी घोषणा करणारा तोच आहे की, “पहा! मी सर्व नवे करतो.”—प्रकटीकरण २१:५.

[तळटीपा]

b विशेष उल्लेख नसल्यास, या प्रकाशनातील अवतरणे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स या पवित्र शास्त्रामधून घेतली आहेत.

c मोनार्कस अन्ड टोम्बस्‌ ॲन्ड पीपल्स्‌—द डॉन ऑफ द ओरिएंट, पृष्ठ २५.

d सायक्लोपीडिया ऑफ बिब्लीकल, थिऑलॉजिकल ॲन्ड एक्लीझिॲस्टिकल लिटरेचर. लेखक जे. मॅकलिन्टॉक व जे. स्ट्राँग. भाग ८, पृष्ठ ९०८.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्रं]

निर्मितीमध्ये मानव हा जनावरांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे

[१८ पानांवरील चित्रं]

येशू परिपूर्ण मानव आदाम याच्या तुल्य होता