व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अगणित मोठा लोकसमुदाय

अगणित मोठा लोकसमुदाय

अध्याय २०

अगणित मोठा लोकसमुदाय

१. एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारल्याचे वर्णन दिल्यावर योहान आणखी कोणता दुसरा गट बघतो?

 आधी १,४४,००० वर शिक्का मारण्याचे वर्णन दिल्यानंतर योहान आता सबंध शास्त्रवचनातील अत्यंत थरारक अहवाल कळवतो. हा वृत्तांत कळविताना त्याचे अंतःकरण आनंदाने उचंबळून आलेले असणार. तो म्हणतो: “ह्‍यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला, मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.” (प्रकटीकरण ७:९) होय, चार वारे अडवून धरण्याचा परिणाम, १,४४,००० आध्यात्मिक इस्राएलांच्या गटाशिवाय आणखी एका गटाचे, बहुभाषीय व आंतरराष्ट्रीय मोठ्या लोकसमुदायाचे तारण साध्य करण्याची मुभा देते. *प्रकटीकरण ७:१.

२. मोठ्या लोकसमुदायाबद्दल जागतिक विवेचनकारांनी कोणते विवेचन मांडले होते आणि बायबल विद्यार्थ्यांनी देखील मागे या गटाबद्दल कोणता दृष्टिकोन धरला होता?

जागतिक विवेचनकारांनी या मोठ्या लोकसमुदायाबद्दल असा उलगडा दिला की, हा ख्रिस्ती धर्मात परिवर्तित झालेला दैहिक यहुद्देतरांचा गट किंवा स्वर्गात जाणारे हुतात्मिक ख्रिस्ती आहेत. खरे म्हणजे, बायबल विद्यार्थ्यांनीही मागे हा गट स्वर्गाला जाणारा दुसरा गट आहे अशी समज धरली होती. हे १८८६ मधील शास्त्रवचनांमधील अभ्यास, युगांबद्दलची ईश्‍वरी योजना (इंग्रजी) याच्या पहिल्या खंडातील लिखाणाद्वारे दिसते: “हे राजासन व ईश्‍वरी स्वभावाच्या बहुमानास गमावतात; पण सरतेशेवटी ईश्‍वरी स्वभावाच्या खालोखाल आत्मे, असा जन्म यांना मिळेल. यांनी जरी पवित्र कार्याला स्वतःचे अर्पण केलेले असले तरी, यांच्यावर जगाच्या आत्म्याचा अधिक प्रभाव पडतो व म्हणून ते आपले जीवन यज्ञार्पण या नात्याने सादर करण्यात मागे पडतात.” तसेच अलिकडे १९३० मध्ये प्रकाश (इंग्रजी) पुस्तकाच्या पहिल्या खंडात हा विचार देण्यात आला होता: “हा मोठा लोकसमुदाय ज्यांचा मिळून बनला आहे ते प्रभूचे आवेशी साक्षीदार होण्याच्या निमंत्रणास प्रतिसाद देण्यात मागे पडतात.” अशांना एक स्वनीतीमान गट असल्याचे, त्यांच्या ठायी सत्याचे ज्ञान असल्याचे पण, त्याबद्दलचा प्रचार करण्यात खूपच कमी परिश्रम घेणारे असे वर्णन करण्यात आले होते. अशांना स्वर्गात दुसरा गट या नात्याने प्रवेश मिळू शकेल पण ते ख्रिस्तासोबत राज्य करण्यात सहभागी होणार नाहीत असे त्यांजविषयी म्हणण्यात आले होते.

३. (अ) प्रचार कार्यात नंतर आवेशी बनलेल्या सरळ हृदयाच्या विशिष्ट लोकांसाठी कोणती आशा प्रस्तुत केली गेली? (ब) द वॉचटावर नियतकालिकाने १९२३ मध्ये मेंढरे व शेरडे यांच्या दाखल्याची कशी स्पष्टता पुरविली?

तथापि, नंतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसोबत सहवास राखणारे काहीजण प्रचाराच्या कामात अत्यंत आवेशी बनले. त्यांना स्वर्गात जाण्याची उत्कट इच्छा नव्हती. खरे म्हणजे, यांची आशा, १९१८ ते १९२२ पर्यंत यहोवाच्या लोकांनी जे जाहीर भाषण दिले त्याच्या शीर्षकानुसार होती. ते शीर्षक मूळ असे होते: “जगाचा शेवट आला आहे—आज जिवंत असणारे लाखो लोक कधीच मरणार नाहीत.” * यानंतर लवकरच, ऑक्टोबर १५, १९२३ च्या वॉचटावर नियतकालिकाने येशूच्या मेंढरे व शेरडे या दाखल्याची स्पष्टता पुरवली (मत्तय २५:३१-४६) आणि म्हटले: “मेंढरे हे राष्ट्रांतील सर्व लोकांचे प्रतिनिधीत्व करतात. ते आत्म्याने अभिषिक्‍त नाहीत, तरी त्यांचा कल धार्मिकतेकडे आहे व ते प्रभू म्हणून येशू ख्रिस्ताचा मानसिकरित्या स्वीकार करतात व ते त्याच्या राज्यकारकीर्दीत चांगला काळ पाहण्याची आशा बाळगून आहेत.”

४. पृथ्वीवरील वर्गाच्या बाबतीत १९३१, १९३२ व १९३४ मध्ये प्रकाश अधिकाधिक कसा प्रज्वलित होत गेला?

काही वर्षानंतर, म्हणजे १९३१ मध्ये, समर्थन (इंग्रजी) पुस्तकाच्या पहिल्या खंडात यहेज्केल पुस्तकाच्या ९ व्या अध्यायाची चर्चा दिली गेली. तेथे, कपाळावर चिन्ह करण्यात आलेल्या लोकांची जगाच्या नाशातून बचावणारे व वरील दाखल्यातील मेंढरे असल्याची ओळख देण्यात आली. १९३२ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या समर्थन पुस्तकाच्या ३ ऱ्‍या खंडात योनादाब या सरळ अंतःकरणाच्या यहुद्देतर माणसाचे वर्णन दिले गेले. हा इस्राएलाच्या अभिषिक्‍त राजा येहूच्या रथात गेला व त्याने खोट्या धर्मावर दंडाज्ञा बजावण्यातील येहूचा आवेश प्रत्यक्ष पाहिला. (२ राजे १०:१५-१७) पुस्तकाने हे विवेचन दिले: “सध्या [यहोवाचे न्यायदंड घोषित करण्याच्या] येहूच्या कामाचा पृथ्वीवर असणाऱ्‍या लोकांचा वर्ग योनादाबद्वारे सूचित किंवा प्रतिछायित आहे. ते सदेच्छु आहेत, सैतानाच्या संस्थेसोबत त्यांचे सहमत नाही, ते धार्मिकतेच्या बाजूने आपली भूमिका घेऊन आहेत व अशांनाच प्रभू हर्मगिदोनाच्या वेळी बचावून ठेवील. त्यांना तो त्या त्रासातून वाचवील आणि पृथ्वीवर सार्वकालिक जीवन देईल. या सर्वांचा मिळून ‘मेंढरे’ वर्ग तयार होतो.” द वॉचटावर नियतकालिकाने १९३४ मध्ये स्पष्ट केले की, पृथ्वीवर जगण्याची आशा असणाऱ्‍या या ख्रिश्‍चनांनी यहोवा देवाला स्वतःचे समर्पण करुन बाप्तिस्मा घेतला पाहिजे. या पृथ्वीवरील वर्गासंबंधीचा प्रकाश दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलित होत होता.—नीतीसूत्रे ४:१८.

५. (अ) मोठ्या लोकसमुदायाची १९३५ मध्ये कशी ओळख देण्यात आली? (ब) जे. एफ. रदरफोर्ड यांनी १९३५ मध्ये, पृथ्वीवर ज्यांची सदासर्वकाळ जगण्याची आशा आहे अशांना उभे राहण्यास सांगितले तेव्हा काय घडले?

आता प्रकटीकरण ७:९-१७ ची समज अधिक तेजोमय रितीने चकाकून दिसण्याची वेळ आली होती! (स्तोत्र ९७:११) वॉचटावर नियतकालिकाने वारंवार ही आशा प्रदर्शित केली की, मे ३० ते जून ३, १९३५ पर्यंत अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे होणारे अधिवेशन योनादाबाकरवी चित्रित असणाऱ्‍यांसाठी “खरे समाधान देणारे व लाभदायक ठरेल.” व ते तसेच असल्याचे सिद्ध झाले! “मोठा लोकसमुदाय” यावरील थरारक भाषणात, वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी सुमारे २०,००० उपस्थितांपुढे, आधुनिक काळातील दुसरी मेंढरे ही प्रकटीकरण ७:९ मधील मोठ्या लोकसमुदायाशी सदृश्‍य आहेत याचा शास्त्रवचनीय पुरावा सादर केला. या भाषणाच्या समारोपात वक्त्याने विचारले: “ज्यांना या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा आहे, ते कृपा करून उभे राहतील का?” सभागृहाचा बहुतेक भाग उभा राहिला तेव्हा अध्यक्षांनी जाहीर केले: “हा पहा, मोठा लोकसमुदाय!” थोडा वेळ स्तब्धता दिसली; पण नंतर मोठा जयघोष ऐकू आला. योहान वर्ग तसेच योनादाब वर्गाला केवढा आनंद झाला! दुसऱ्‍या दिवशी ८४० जणांचा बाप्तिस्मा झाला, यापैकीचे सर्व मोठ्या लोकसमुदायापैकीचे असण्याचा दावा करणाऱ्‍यांमधील होते.

मोठ्या लोकसमुदायाच्या ओळखीस पुष्टी देणे

६. (अ) मोठा लोकसमुदाय हा आधुनिक काळाचा समर्पित ख्रिश्‍चनांचा गट असून त्याला पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे, असे आम्ही स्पष्टपणे का समजू शकतो? (ब) मोठ्या लोकसमुदायाचे पांढरे झगे कशाचे प्रतिनिधीत्व करतात?

हा मोठा लोकसमुदाय आधुनिक काळाचा समर्पित ख्रिश्‍चनांचा गट असून तो देवाच्या पृथ्वीवर सार्वकालिकपणे जगण्याची आशा राखून आहे हे आम्ही इतक्या निश्‍चयाने कसे म्हणू शकतो बरे? आधी, योहानाने दृष्टांतात एका स्वर्गीय गटास पाहिले होते, ज्याला “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे [ह्‍यामधून] . . . देवासाठी विकत” घेण्यात आले होते. (प्रकटीकरण ५:९, १०) मोठ्या लोकसमुदायाची देखील अशीच पार्श्‍वभूमी आहे; पण त्यांचे भवितव्य वेगळे आहे. त्यांची संख्या देवाच्या इस्राएलाप्रमाणे आधी ठरविण्यात आलेली नाही. ती किती असेल हे कोणाही माणसाला अगाऊ सांगता येऊ शकणार नाही. त्यांचे झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत, जे त्यांना ख्रिस्ताच्या यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवण्यामुळे यहोवासमोर लाभलेल्या नीतीमान भूमिकेला सूचित करते. (प्रकटीकरण ७:१४) ते हाती झावळ्या हलवून मशीहा आपला राजा आहे असा जयघोष करीत आहेत.

७, ८. (अ) खजुरीच्या झावळ्या हाती हलवण्याच्या प्रसंगाने योहानाला निश्‍चये कोणत्या प्रसंगांची आठवण करून दिली असावी? (ब) मोठ्या लोकसमुदायातील लोक आपल्या हाती खजुरीच्या झावळ्या हलवीत आहेत ही गोष्ट कशाची सूचकता असावी?

हा दृष्टांत बघत असताना योहानाच्या मनाने त्याला मागे ६० वर्षांआधी येशूच्या पृथ्वीवरील शेवटल्या आठवडी जे घडले, तेथे नेले असावे. निसान ९, सा.यु. ३३ रोजी जमावातील लोक, येशूचे यरुशलेमेत स्वागत करण्यासाठी आला तेव्हा त्यांनी “खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले: ‘होसान्‍ना; प्रभूच्या [यहोवा, NW] नावाने येणारा इस्राएलाचा राजा धन्यवादित असो.’” (योहान १२:१२, १३) याचप्रमाणे, मोठ्या लोकसमुदायाने हाती झावळ्या हलवणे व जयजयकार करणे हे येशू हा यहोवाचा नियुक्‍त राजा आहे याचा ते आनंदाने स्वीकार करतात याचे सूचक आहे.

याचप्रमाणे खजुरीच्या झावळ्या तसेच जयजयकार, यांनी योहानाला इस्राएलाच्या प्राचीन मंडपाच्या सणाची आठवण दिली असावी. या सणासाठी यहोवाने आज्ञापिले होते: “पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या, ओहळालगतचे वाळूंज ही आणून परमेश्‍वर [यहोवा, NW] तुमचा देव ह्‍यासमोर सात दिवस उत्सव करावा.” खजुरीच्या झावळ्या आनंदाचे प्रतीक मानल्या जात. तात्पुरते मंडपात राहणे हे इस्राएलांना, यहोवाने त्यांची इजिप्तमधून सुटका करून अरण्यात मंडप घालून राहू दिले, या गोष्टीचे स्मरण देणारे होते. या सणात “उपरी, अनाथ व विधवा” भाग घेत असत. सर्व इस्राएलांनी “आनंदोत्सव” करायचा होता.—लेवीय २३:४०; अनुवाद १६:१३-१५.

९. मोठा लोकसमुदाय कोणत्या आनंदी घोषणेत सहभागी होतो?

या कारणास्तव, मोठा लोकसमुदाय जरी आध्यात्मिक इस्राएलाचा भाग नसला तरी त्याने हाती खजुरीच्या झावळ्या घेऊन उंचावणे हे योग्य आहे, कारण ते आपल्या तारणाचे श्रेय आनंदाने व कृतज्ञतेने देव व त्याचा कोकरा यांना देऊन आहेत. योहानही तेच पाहतो: “ते उच्च स्वराने म्हणत होते: ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून तारण आहे.’” (प्रकटीकरण ७:१०) हे जरी सर्व मानवी वंशातून वेगळे झालेले असले तरी, ते एकाच “उच्च स्वराने” जयजयकार करीत आहेत. पण ते वेगवेगळ्या राष्ट्रांचे व भाषांचे आहेत, तरी हे करणे त्यांना कसे जमते?

१०. मोठा लोकसमुदाय हा विविध राष्ट्रे व भाषा यातून असला तरी एकोप्याने “उच्च स्वराने” कसा गजर करु शकतो?

१० हा मोठा लोकसमुदाय, आज पृथ्वीवर खरेपणाने एकमात्र बहुराष्ट्रीय संस्थेचा संघटित भाग आहे. त्यांचे वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी वेगवेगळे दर्जे नाहीत; तर जेथे कोठे ते राहतात तेथे ते बायबलच्या योग्य तत्त्वांना लागू करतात. ते राष्ट्रीय क्रांतीकारी चळवळीत भाग घेत नाहीत, तर त्यांनी खरेपणाने ‘तरवारी मोडून त्यांचे फाळ केले आहेत.’ (यशया २:४) ते विविध पंथ अथवा गटात विभाजित नाहीत आणि ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मांप्रमाणे गोंधळलेला किंवा परस्परविरोधी संदेशाचे कथन करीत नाहीत. याचप्रमाणे ते आपले स्तुतीकथनाचे कार्य व्यावसायिक धर्मपुढारी वर्गाकडे सोपवीत नाहीत. आपल्या तारणाचे श्रेय ते उच्च वाणीने पवित्र आत्म्याला देत नाहीत; कारण ते त्रैक्य देवाचे सेवक नाहीत. सबंध जगभरात २०० भौगोलिक क्षेत्रात ते सत्याची एकच शुद्ध वाणी बोलत असता एकमुखाने यहोवाच्या नावाचा धावा करत आहेत. (सफन्या ३:९) आपले तारण, यहोवा हा तारणाचा देव याजकडून, त्या तारणाचा प्रमुख प्रतिनिधी येशू ख्रिस्त याच्या मार्फत येत असल्याचे ते योग्यरितीने जाहीरपणे कबूल करतात.—स्तोत्र ३:८; इब्रीयांस २:१०.

११. आधुनिक तंत्रज्ञानाने मोठ्या लोकसमुदायाला आपली वाणी अधिकच भरदार करण्यासाठी कशी मदत दिली आहे?

११ या एकोप्याच्या मोठ्या लोकसमुदायाच्या उच्च वाणीला आधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिकच भारदस्त बनण्यास मदत मिळाली आहे. पृथ्वीवरील इतर धार्मिक गट, लोकांकडे ऐक्याचा संदेश घेऊन जाण्यामध्ये आस्थेवाईक नसल्यामुळे त्यांना २०० पेक्षा अधिक भाषांमध्ये बायबल अभ्यासाचे मदतगार साहित्य प्रकाशित करण्याची गरज दिसत नाही. मात्र मोठ्या लोकसमुदायाला आणखी मदत मिळावी यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या अभिषिक्‍त नियमन मंडळाने बहुभाषीय ऋण विद्युत चित्र जुळवणी यंत्रणा (मेप्स) शोधून काढली. या लिखाणाच्या प्रसंगी, १०० पेक्षा अधिक देशात मेप्स यंत्रणेद्वारे भाषांतरीत मजकूर विशिष्ट मांडणीत रचण्याचे काम चालू असून, त्यामुळे त्यांचे प्रमुख प्रकाशन द वॉचटावर साधारण ८५ भाषांत एकाच वेळी प्रसिद्ध करण्याची मदत मिळाली आहे. यहोवाचे लोक एकाच वेळी अनेक भाषांत या पुस्तकासारखे प्रकाशन प्रसिद्ध करीत आहेत. अशाप्रकारे, यहोवाचे साक्षीदार, ज्यात अधिक संख्या मोठ्या लोकसमुदायाची आहे ते, चांगल्या अवगत असणाऱ्‍या भाषांत दर वर्षी लाखो प्रकाशनांचे वितरण करीत आहेत व यामुळे सर्व वंश व भाषेच्या लोकांपैकी अधिकांना देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची व आपली वाणी मोठ्या लोकसमुदायाच्या उच्च वाणीत सामील करण्यासाठी मदत देत आहे.—यशया ४२:१०, १२.

स्वर्गात की पृथ्वीवर?

१२, १३. मोठा लोकसमुदाय कोणत्या अर्थाने “राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला” आहे?

१२ मोठा लोकसमुदाय “राजासनासमोर उभा” आहे, याचा अर्थ तो स्वर्गात नाही हे आपल्याला कसे कळू शकते? याबद्दल अधिक स्पष्ट पुरावा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, येथे “समोर” असे ज्या शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे तो ग्रीक शब्द (एनो․पिʹओन) खऱ्‍या अर्थाने “दृष्टीसमोर” किंवा “सन्मुख” असा अर्थ देतो व पृथ्वीवरील मनुष्यांसंबंधाने, ते यहोवा “समोर” किंवा त्याच्या “दृष्टीसमोर” आहेत या अर्थाने वापरण्यात आला आहे. (१ तीमथ्य ५:२१; २ तीमथ्य २:१४; रोमकर १४:२२; गलतीकर १:२०) इस्राएल लोक अरण्यात असताना एकदा मोशे अहरोनास म्हणाला होता: “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की, ‘तुम्ही परमेश्‍वरासमोर [यहोवा, NW] या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.’” (निर्गम १६:९) त्या प्रसंगी यहोवासमोर उभे राहण्यासाठी इस्राएलांना स्वर्गात स्थलांतरित होण्याची गरज नव्हती. (पडताळा लेवीय २४:८.) उलटपक्षी, त्या अरण्यात, ते यहोवाच्या दृष्टीसमोर होते व त्यांच्याकडे त्याचे लक्ष होते.

१३ तसेच, आम्ही आणखी असे वाचतो: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने . . . येईल तेव्हा . . . त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील.” * हा भविष्यवाद पूर्ण होतो त्यावेळी सबंध मानवजात ही काही स्वर्गात जात नाही. तसेच, “सार्वकालिक शिक्षा भोगावयास” जाणारे निश्‍चितपणे स्वर्गात नाहीत. (मत्तय २५:३१-३३, ४१, ४६) या उलट, मानवजात येशूच्या दृष्टीसमोर पृथ्वीवर उभी राहते, तो त्याचे लक्ष त्यांच्याकडे वळवून त्यांचा न्याय करतो. तसेच, मोठा लोकसमुदाय “राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला” आहे याचा अर्थ, तो यहोवा व त्याचा राजा ख्रिस्त येशू यांजपुढे उभा असून त्याला त्यांच्याकडून कृपायुक्‍त न्याय मिळतो असा आहे.

१४. (अ) कोण “राजासनाभोवती,” व स्वर्गीय “सीयोन डोंगरावर” उभे असल्याचे वर्णिण्यात आले आहे? (ब) मोठा लोकसमुदाय देवाची सेवा “त्याच्या मंदिरात” करीत असला तरी, यामुळे तो याजक वर्ग का होत नाही?

१४ चोवीस वडील तसेच १,४४,००० चा अभिषिक्‍त गट यहोवाच्या “राजासनाभोवती” आणि स्वर्गीय “सीयोन डोंगरावर” उभे असल्याचे दाखवण्यात आले. (प्रकटीकरण ४:४; १४:१) मोठा लोकसमुदाय हा काही याजकीय वर्ग नाही, त्यामुळे त्याला असे उच्च पद मिळत नाही. हे खरे की, नंतर प्रकटीकरण ७:१५ मध्ये तो देवाची “त्याच्या मंदिरात” सेवा करीत आहे असे वर्णिण्यात आले आहे. पण हे मंदिर आतील निवासमंडप किंवा परमपवित्र स्थानाला सुचवीत नाही. उलटपक्षी, ते देवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणाचा भाग आहे. ना․ओसʹ या ग्रीक शब्दाचे येथे “मंदिर” असे जे भाषांतर करण्यात आले आहे, तो यहोवाच्या भक्‍तीसाठी उभारण्यात आलेल्या सबंध प्रासादाचे भव्य चित्र उभे करतो. आज ती, स्वर्ग व पृथ्वीला वेष्टिणारी आध्यात्मिक इमारत आहे.—पडताळा मत्तय २६:६१; २७:५, ३९, ४०; मार्क १५:२९, ३०; योहान २:१९-२१, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.

स्तुतीची सार्वत्रिक घोषणा

१५, १६. (अ) मोठा लोकसमुदाय दिसताच स्वर्गीय क्षेत्रातून कोणता प्रतिसाद उमटतो? (ब) यहोवाची आत्मिक निर्मिती त्याच्या उद्देशाच्या प्रत्येक प्रकटीकरणाच्या वेळी कशी प्रतिक्रिया दर्शवते? (क) या स्तुती गीतामध्ये आपण या पृथ्वीवर कसे सहभागी होऊ शकतो?

१५ मोठा लोकसमुदाय यहोवाची स्तुती करीत असला तरी, आणखी इतर जण देखील त्याची स्तुती गात आहेत. योहान कळवितो: “तेव्हा राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी ह्‍यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले: ‘आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुति, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत, आमेन.’”—प्रकटीकरण ७:११, १२.

१६ यहोवाने पृथ्वीची निर्मिती केली तेव्हा सर्व पवित्र देवदूतांनी “मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.” (ईयोब ३८:७) यहोवाच्या उद्देशाच्या प्रत्येक प्रकटीकरणाने असाच जयजयकार प्रतिध्वनित केला असावा. जेव्हा २४ वडील म्हणजे आपल्या स्वर्गीय वैभवात असणारे १,४४,००० जण कोकऱ्‍यासंबंधाने आपली मान्यता कळवताना उच्च वाणीने जयघोष करतात तेव्हा, स्वर्गातील देवाचे इतर सर्व प्राणिमात्र देखील येशू व यहोवा देवाबद्दल एकमताने व एकसुराने स्तुतीचा गजर करतात. (प्रकटीकरण ५:९-१४) या प्राणिमात्रांनी आधीच यहोवाच्या उद्देशानुरुप त्याच्या विश्‍वासू अभिषिक्‍त मानवांचे आध्यात्मिक क्षेत्रात वैभवी स्थानावर पुनरुत्थान झाल्याचे पाहिले व ते पाहून त्यांना अत्यानंद झाला. आता मोठा लोकसमुदाय सामोरा आलेला पाहून ते अधिकच गौरवी स्तुतीची घोषणा करतात. यहोवाच्या सर्व सेवकांसाठी प्रभूचा दिवस हा खरेपणाने जिवंत राहण्याचा अभूतपूर्व काळ आहे. (प्रकटीकरण १:१०) येथे या पृथ्वीवर राहून, यहोवाच्या राज्याची साक्ष देऊन या स्तुतीगायनात सहभागी होण्याचा केवढा विलोभनीय हक्क आम्हास मिळाला आहे!

मोठा लोकसमुदाय सामोरा येतो

१७. (अ) चोवीस वडिलांपैकी एकाने कोणता प्रश्‍न विचारला आणि वडिलाला त्याचे उत्तर शोधून काढता आले ही गोष्ट काय सुचविते? (ब) त्या वडिलाच्या प्रश्‍नाला कधी उत्तर मिळाले?

१७ प्रेषित योहानाच्या काळापासून ते प्रभूच्या दिवसापर्यंत अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना मोठ्या लोकसमुदायाच्या ओळखीचे मोठे कोडे वाटत होते. या कारणामुळेच, आधीच स्वर्गातील अभिषिक्‍तांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या २४ वडिलांपैकी एकाने हा विशिष्ट प्रश्‍न विचारून योहानाच्या विचाराला चालना देणे अगदीच योग्य होते: “तेव्हा वडीलमंडळापैकी एकाने मला म्हटले, ‘शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?’” मी त्याला म्हटले: ‘प्रभो, हे तुला ठाऊक आहे.’” (प्रकटीकरण ७:१३, १४अ) होय, त्या वडिलाला उत्तर मिळू शकले व तो ते योहानाला देऊ शकला. यावरुन असे दिसते की, २४ वडील गटाचे पुनरुत्थित लोक आज विविध ईश्‍वरी सत्यांना कळविण्यात सहभाग घेत असतील. पृथ्वीवरील योहान वर्गाच्या बाबतीत पाहू जाता, त्यांना मोठ्या लोकसमुदायाची ओळख, यहोवा त्यांच्यामध्ये जे काही घडवीत होता त्याचे बारकाईने निरीक्षण करून मिळवून घ्यायची होती. या कारणामुळेच १९३५ मध्ये यहोवाच्या नियुक्‍त वेळी ईश्‍वरशासित, आकाशाच्या घुमटावर ईश्‍वरी प्रकाशाचे झळकलेले तेज त्यांनी चटकन ओळखले.

१८, १९. (अ) योहान वर्गाद्वारे १९२० व १९३० शतकात कोणत्या आशेबद्दल अधिक भर देण्यात आला होता पण कोणी मोठ्या संख्येने संदेशाला प्रतिसाद दिला? (ब) मोठ्या लोकसमुदायाची १९३५ मध्ये जी ओळख मिळू शकली, तिने, १,४४,००० बद्दल काय दर्शविले? (क) स्मारक विधीची आकडेवारी काय दाखविते?

१८ योहान वर्गाने १९२० व १९३० शतकाच्या आरंभाला आपल्या प्रकाशनांद्वारे तसेच, प्रचार कार्याद्वारे या स्वर्गीय आशेवर भर दिला होता. तेव्हा १,४४,००० संख्या पूर्ण होणे बाकी होते असे दिसते. पण संदेश ऐकून घेणाऱ्‍या आणि साक्षकार्यात रस दाखवणाऱ्‍या अधिकाधिक लोकांची आशा, नंदनवनमय पृथ्वीवर जिवंत राहण्याची असण्याचा दावा होता. त्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा नव्हती. ते त्यांना मिळालेले पाचारण नव्हते. ते लहान कळपातील नव्हे तर, दुसरी मेंढरे वर्गातील सदस्य होते. (लूक १२:३२; योहान १०:१६) या कारणास्तव, १९३५ मध्ये त्यांची दुसरी मेंढरे यांचा मोठा लोकसमुदाय असल्याची जी ओळख मिळाली त्यामुळे, १,४४,००० जणांची निवड करण्याचे संपुष्टात आले असल्याचे सूचित केले.

१९ आकडेवारी या निर्णयाला पुष्टी देते का? होय, देते. जगभर १९३८ मध्ये ५९,०४७ जणांनी साक्षकार्यात भाग घेतल्याचा अहवाल आहे. यापैकी ३६,७३२ जणांनी येशूच्या मृत्यूच्या वार्षिक सणाच्या वेळी बोधचिन्हांची सहभागिता घेऊन आपल्याला स्वर्गीय पाचारण असल्याचे स्पष्ट दर्शविले. त्यानंतरच्या वर्षांपासून पुढे, सहभागिता घेणाऱ्‍यांच्या संख्येत घट दिसू लागली; कारण प्रामुख्यत्वे यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांनी आपले पृथ्वीवरील जीवनाक्रमण मृत्यूमध्ये संपविले होते. १९९३ मध्ये तर केवळ ८,६९३ जणांनीच त्या स्मारकविधीच्या चिन्हांची सहभागिता घेतली—हा आकडा त्या समारंभाची जागतिक उपस्थिती १,१८,६५,७६५ याच्या ०.१ टक्क्यापेक्षाही कमी होता.

२०. (अ) दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात वॉचटावर संस्थेच्या अध्यक्षांनी खाजगीपणे कोणते विवेचन केले? (ब) पण आता कोणती वस्तुस्थिती मोठा लोकसमुदाय हा खराच मोठा असल्याचे दाखवते?

२० दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा, सैतानाने मोठ्या लोकसमुदायाच्या कापणीच्या कामाला जोराचा विरोध केला. यहोवाच्या कामावर कित्येक देशात बंदी आली. त्या भयाण दिवसात आणि जानेवारी १९४२ मध्ये वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधी त्यांनी असे म्हटल्याचे ऐकले गेले: “एकंदरीत असे दिसते की, मोठा लोकसमुदाय हा तितका मोठा होणार हे दिसत नाही.” पण ईश्‍वरी मार्गदर्शनाने तर वेगळाच कौल दिला! साक्षीदार सेवकांची संख्या १९४६ पर्यंत १,७६,४५६ पेक्षा वर गेली, यापैकीचे तर बहुतेक मोठ्या लोकसमुदायापैकीचे होते. १९९३ मध्ये २३१ देशात ४७,०९,८८९ साक्षीदार यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करीत होते—खराच मोठा लोकसमुदाय! हा आकडा अधिकाधिक वाढतच आहे.

२१. (अ) प्रभूच्या दिवसात देवाच्या लोकांची जमवाजमव योहानाच्या दृष्टांतानुरुप कशी होत आहे? (ब) काही विशिष्ट भविष्यवाद पूर्ण होण्यास कशी सुरवात झाली?

२१ याप्रकारे, प्रभूच्या दिवसातील देवाच्या लोकांची कापणी करणे हे योहानाच्या दृष्टांताच्या पूर्ण सहमतात घडले: आधी १,४४,००० मधील शेषांचे गोळा करणे व मग मोठ्या लोकसमुदायाची जमवाजमव करणे. यशयाने भाकीत केल्याप्रमाणे “शेवटल्या दिवसात” सर्व राष्ट्रातील लोक यहोवाच्या खऱ्‍या भक्‍तीकडे झुंडीने येत आहेत. आम्ही, यहोवाचे “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांच्या निर्मितीसंबंधाने खरी कदर दाखवीत आहोत. (यशया २:२-४; ६५:१७, १८) देव पुन्हा, “स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र” करीत आहे. (इफिसकर १:१०) येशूच्या काळापासून ते कित्येक शतके स्वर्गीय राज्यासाठी अभिषिक्‍त जनांची होत असलेली निवड ही “स्वर्गात” असणाऱ्‍या गोष्टी आहेत. आता, दुसरी मेंढरे यांचा मोठा लोकसमुदाय “पृथ्वीवर जे आहे” त्या गोष्टींचा आरंभ दर्शवतो. या व्यवस्थेनुरुप तुम्ही जी सेवा करीत आहात ती तुम्हाला चिरकालिक आशीर्वाद ठरू शकते.

मोठ्या लोकसमुदायाला मिळणारे आशीर्वाद

२२. योहानाला मोठ्या लोकसमुदायाबद्दल आणखी कोणती माहिती मिळते?

२२ योहानाला ईश्‍वरी माध्यमाद्वारे मोठ्या लोकसमुदायाबद्दल आणखी माहिती मिळते: “तो [वडील] मला म्हणाला, ‘मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; ह्‍यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत. ह्‍यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करितात आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील.’”—प्रकटीकरण ७:१४ब, १५.

२३. ज्यामधून मोठा लोकसमुदाय ‘येतो’ ते मोठे संकट काय आहे?

२३ आधी एके प्रसंगी येशूने म्हटले होते की, राज्य वैभवातील त्याच्या उपस्थितीचा कळस अशा एका मोठ्या संकटात गाठला जाईल, जे “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले [नव्हते] व पुढे कधीहि येणार नाही.” (मत्तय २४:२१, २२) या भविष्यवादाच्या पूर्णतेस अनुलक्षून देवदूत, सैतानाच्या जागतिक व्यवस्थेस उद्‌ध्वस्त करण्यासाठी पृथ्वीचे चार वारे सोडतील. या नाशात मोठी बाबेल, खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य याचा पहिला क्रमांक असेल. मग, हे संकट कळसाला जात असता, येशू पृथ्वीवरील १,४४,००० च्या अवशिष्टांना अगणित अशा मोठ्या लोकसमुदायासह सोडवील.—प्रकटीकरण ७:१; १८:२.

२४. मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य बचावासाठी कसे पात्र ठरतात?

२४ मोठ्या लोकसमुदायाचे लोक बचावासाठी कसे पात्र ठरतात? तो वडील योहानाला सांगतो की, “ह्‍यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.” दुसऱ्‍या शब्दात सांगायचे तर, त्यांनी येशूवर आपला खंडणीदाता या नात्याने विश्‍वास ठेवला असून, यहोवाला आपले समर्पण केले आहे व त्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला आहे आणि आपल्या सद्वर्तणूकीद्वारे ‘चांगला विवेकभाव धरला आहे.’ (१ पेत्र ३:१६, २१; मत्तय २०:२८) अशाप्रकारे ते यहोवाच्या दृष्टीमध्ये शुद्ध व नीतीमान बनतात. तसेच ते “स्वतःला जगापासून निष्कलंक” ठेवतात.—याकोब १:२७.

२५. (अ) मोठा लोकसमुदाय यहोवाची “अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा” कशी करतो? (ब) यहोवा मोठ्या लोकसमुदायावर आपला ‘मंडप कसा विस्तृत करतो’?

२५ याशिवाय, “अहोरात्र [देवाच्या] मंदिरात त्याची सेवा” करून ते यहोवाचे आवेशी साक्षीदार बनले आहेत. अशा या समर्पित मोठ्या लोकसमुदायापैकी तुम्ही एक आहात का? तर यहोवाची सेवा त्याच्या मोठ्या आध्यात्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात नित्याने करीत राहण्याचा तुमचा सुहक्क आहे. आज, अभिषिक्‍त जनांच्या मार्गदर्शनाखाली मोठा लोकसमुदाय साक्षकार्याचा मोठा भाग पार पाडीत आहे. प्रापंचिक जबाबदाऱ्‍या असतानाही हजारो जणांनी पायनियर या नात्याने पूर्ण वेळेच्या सेवकपणासाठी स्वतःला देऊ केले आहे. तुम्ही या गटात असा वा नसा, मोठ्या लोकसमुदायाचे एक समर्पित सदस्य या अर्थाने, तुमचा विश्‍वास व कृत्ये या आधारावर तुम्हाला देवाचे मित्र या नात्याने नीतीमान धरले गेले आहे व त्याच्या मंडपात पाहुणा म्हणून वस्ती करण्याचे निमंत्रण आहे म्हणून आनंद करू शकता. (स्तोत्र १५:१-५; याकोब २:२१-२६) यहोवा, अशाप्रकारे आपणावर प्रीती करणाऱ्‍यांवर ‘आपला मंडप विस्तृत करतो’ आणि एक चांगला यजमान या अर्थी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतो.—नीतीसूत्रे १८:१०.

२६. आणखी कोणते आशीर्वाद मोठा लोकसमुदाय अनुभवील?

२६ तो वडील पुढे म्हणतो: “ते ह्‍यापुढे भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेहि होणार नाहीत; त्यांस सूर्य किंवा कोणतीहि उष्णता बाधणार नाही; कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटीकरण ७:१६, १७) होय, यहोवा खराच अतिथीप्रिय आहे! पण या शब्दांचा केवढा सखोल अर्थ होतो?

२७. (अ) त्या वडिलाने उद्‌गारिलेल्या शब्दांसारखाच भविष्यवाद यशयाने कसा केला? (ब) यशयाच्या त्या भविष्यवादाची, पौलाच्या काळातील ख्रिस्ती मंडळीवर पूर्णता होण्यास सुरवात झाली होती हे कशामुळे दिसते?

२७ आपण अशाच वाक्यरचनेच्या आणखी एका भविष्यवादाचा विचार करू या: “परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो: ‘प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले. . . . त्यांस तहानभूक लागणार नाही, झळई व ऊन यांची बाधा त्यांस होणार नाही; कारण त्यांजवर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झऱ्‍यांवर तो त्यांस नेईल.” (यशया ४९:८, १०; तसेच स्तोत्र १२१:५, ६ पाहा.) प्रेषित पौलाने या भविष्यवादातील काही भागाचे अवतरण घेऊन ते, सा.यु. ३३ मधील पेंटेकॉस्टपासून सुरु झालेला “तारणाचा दिवस” लागू केला. त्याने लिहिले: “कारण तो [यहोवा] म्हणतो: ‘अनुकूलसमयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.’ पाहा, आताच समय अनुकूल आहे; पाहा, आताच तारणाचा दिवस आहे!”—२ करिंथकर ६:२.

२८, २९. (अ) यशयाच्या शब्दांची पूर्णता पहिल्या शतकात कशी झाली? (ब) प्रकटीकरण ७:१६ मधील शब्दांची पूर्णता मोठ्या लोकसमुदायाच्या बाबतीत कशी होत आहे? (क) मोठ्या लोकसमुदायाला “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍याजवळ” निरविण्याचा काय परिणाम दिसेल? (ड) मोठा लोकसमुदाय मानवजातीत अद्वितीय का असेल?

२८ मग, त्या काळी भुकेले व तान्हेले न होणे, तसेच दाहक उष्णतेची बाधा न होणे या गोष्टी कशा लागू झाल्या? खरे म्हणजे, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी कधीकधी खरी तहानभुक अनुभवली. (२ करिंथकर ११:२३-२७) तथापि, त्यांच्याकडे आध्यात्मिकरित्या सर्वकाही मुबलक होते. त्यांना आध्यात्मिक गोष्टींसंबंधाने भूक किंवा तहान लागू नये, म्हणून समृद्धरित्या पुरवण्यात आले होते. तसेच यहोवाने जेव्हा सा.यु. ७० मध्ये यहूदी व्यवस्थेचा नाश केला तेव्हा, त्याने आपल्या क्रोधाची दाहकता या ख्रिश्‍चनांवर ओतली नाही. प्रकटीकरण ७:१६ वचनातील शब्दांची अशी आध्यात्मिक पूर्णता आज मोठ्या लोकसमुदायाच्या बाबतीत घडत आहे. ते अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसह भरपूर आध्यात्मिक तरतुदींचा लाभ घेत आहेत.—यशया ६५:१३; नहूम १:६, ७.

२९ तुम्ही त्या मोठ्या लोकसमुदायापैकीचे एक आहात तर, सध्या जरी सैतानी व्यवस्थेच्या या संधी प्रकाशात तुम्हावर दबाव व व्यक्‍तिगत अडचणी येत असल्या तरी तुमच्या अंतःकरणाची चांगली स्थिती, तुम्हाला “हर्षित चित्ताने जयजयकार” करायला लावील. (यशया ६५:१४) त्यामुळे, त्या अर्थाने आज देखील यहोवा ‘तुमच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकू शकतो.’ मग, देवाकडील प्रतिकूल न्यायदंडाचा अति उष्ण “सूर्य” तुम्हाला भेडसावणार नाही आणि जेव्हा नाशाचे चार वारे सोडण्यात येतील तेव्हा, यहोवाच्या असंतुष्टतेच्या ‘उष्णतेपासून’ तुम्हाला वाचवण्यात येईल. तो नाश सरल्यावर, कोकरा तुम्हाला “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍याजवळ” नव्या शक्‍तीचा पूर्ण लाभ घेण्याकडे निरवील; हे, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळवता यावे म्हणून यहोवा, ज्या ज्या तरतूदी पुरवील त्याचे प्रतिनिधीत्व करते. तुम्ही कोकऱ्‍याच्या रक्‍तावर प्रदर्शित केलेला विश्‍वास, तुम्हाला तुमचे हळूवारपणे मानवी पूर्णतेकडे उत्थान होण्याकडे निरवील तेव्हा विजयी झाल्याचे दिसेल. मोठ्या लोकसमुदायापैकीचे तुम्ही मानवजातीत त्या ‘लाखोंसारखे’ कधीही न मरण्यामध्ये अद्वितीय असू शकाल! तेव्हा, पूर्णार्थाने तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकला गेला असणार.—प्रकटीकरण २१:४.

आपल्या पाचारणाची खात्री बाळगणे

३०. योहानाच्या दृष्टांतामध्ये आपणापुढे कोणता प्रचंड देखावा उभा आहे आणि कोण ‘टिकाव धरू शकेल’?

३० ते शब्द आपल्या नजरेसमोर दूरवरील गोष्टींचा केवढा प्रचंड देखावा उभा करतात! यहोवा स्वतः आपल्या राजासनावर असून स्वर्ग व पृथ्वीवरील त्याचे सर्व सेवक ऐक्याने त्याची स्तुती गात आहेत. त्याचे पृथ्वीवरील सेवक अशा या स्तुतीच्या भारदस्त आवाजात आपला आवाज मिसळण्याचा केवढा अद्‌भुत हक्क आहे हे जाणतात. लवकरच, यहोवा व ख्रिस्त येशू दंडाज्ञा बजावतील आणि मग हा स्वर निनादेल: “त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?” (प्रकटीकरण ६:१७) याचे उत्तर काय आहे? शिक्का मारण्यात आलेल्या १,४४,००० पैकीच्या पृथ्वीवरील अवशिष्टांसमवेत दुसरी मेंढरे यांचा मोठा लोकसमुदाय, जो मानवजातीचा क्षुल्लक भाग असेल तो, ‘टिकाव धरेल,’ म्हणजे बचावला जाईल.—पडताळा यिर्मया ३५:१९; १ करिंथकर १६:१३.

३१. योहानाच्या दृष्टांताच्या पूर्णतेचा परिणाम अभिषिक्‍त जन तसेच मोठा लोकसमुदाय यावर कसा होण्यास हवा?

३१ या सर्व गोष्टींचा दृष्टिकोन राखूनच योहान वर्गाचे अभिषिक्‍त ख्रिस्ती अत्यंत उत्साहाने “ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे” धावत आहेत. (फिलिप्पैकर ३:१४) सध्याच्या दिवसात घडत असणाऱ्‍या घटनांमुळे आपल्याला खास प्रकारची सहनशीलता राखायची आहे याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. (प्रकटीकरण १३:१०) कित्येक वर्षे यहोवाची निष्ठावंतपणे सेवा केल्यामुळे, ते आपल्या विश्‍वासाला धरून आहेत आणि आपली नावे “स्वर्गात लिहिलेली आहेत” याचा त्यांना आनंद होत आहे. (लूक १०:२०; प्रकटीकरण ३:५) तसेच मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांना देखील याची जाणीव आहे की, “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) मोठा लोकसमुदाय एक गट या नात्याने जरी मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी चिन्हीत असला तरी, त्यातील विशिष्टांनी स्वतः शुद्ध व क्रियाशील राहण्याची पराकाष्ठा केली पाहिजे.

३२. यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी केवळ दोनच गट ‘टिकाव धरतील’ हे पाहता कोणती तातडीची स्थिती याद्वारे ठळकपणे दिसते?

३२ यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी या दोन गटांपैकी इतर कोणी ‘टिकाव धरेल’ याबद्दल काही पुरावा दिसत नाही. याचा, जे लाखो लोक येशूच्या यज्ञार्पणावर थोडाबहुत आदर प्रदर्शित करून दर वर्षी त्याच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहतात; पण ज्यांनी तो विश्‍वास यहोवा देवाचे समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले सेवक बनून त्याच्या सेवेत क्रियाशील असण्यापर्यंत दाखविला नाही त्यांच्यासाठी काय अर्थ होतो? तसेच, जे एकेकाळी क्रियाशील होते; पण ज्यांनी आपली अंतःकरणे “संसाराच्या चिंता ह्‍यांनी . . . भारावून” दिली त्यांच्याबद्दल काय? अशा सर्वांनी, “ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास” आणि येशू ख्रिस्त या “मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून” जागृत झाले पाहिजे व जागृत राहण्यास हवे. वेळ थोडा उरलेला आहे!—लूक २१:३४-३६.

[तळटीपा]

^ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप पहा.

^ द वॉचटावर, एप्रिल १, १९१८, पृष्ठ ९८.

^ अक्षरशः “त्याच्या समोर,” द किंग्डम इंटरलिनियर ट्रान्सलेशन ऑफ द ग्रीक स्क्रिपचर्स.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११९ पानांवरील चौकट]

अर्थ सांगणे देवाकडे आहे

योहान वर्ग बरीच दशके मोठ्या लोकसमुदायाबाबत ओळख मिळवण्यासाठी खटपटीत राहिला; पण त्याला समाधानकारक स्पष्टीकरण मिळू शकले नाही. का बरे? याचे उत्तर आपल्याला विश्‍वासू योसेफाच्या शब्दात दिसते, जेव्हा त्याने म्हटले: “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना?” (उत्पत्ती ४०:८) देव आपल्या भविष्यवादांच्या पूर्णतेचा अर्थ व उलगडा केव्हा व कसा प्रतिपादित करतो? बहुधा हे भविष्यवाद पूर्ण होण्याच्या लागास असताना किंवा पूर्ण होण्याच्या बेतात असताना करतो, यामुळे त्यातील संदेश त्याच्या शोधक सेवकांना स्पष्टपणे लक्षात येतो. ही समज ‘आपल्याला शिक्षण मिळण्याकरता [दिली जाते]; यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्‍या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी.’—रोमकर १५:४.

[१२४ पानांवरील चौकट]

मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य

▪ सर्व राष्ट्रे, वंश, भाषा व लोक यामधून बाहेर येतात

▪ यहोवाच्या राजासनासमोर उभे आहेत

▪ त्यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत

▪ आपल्या तारणाचे श्रेय यहोवा व येशूला देतात

▪ मोठ्या संकटातून बाहेर येतात

▪ यहोवाच्या मंदिरात त्याची सेवा अहोरात्र करतात

▪ यहोवाची प्रेमळ सुरक्षा व काळजी मिळवतात

▪ येशूद्वारे जीवनी पाण्याच्या झऱ्‍याजवळ निरवले जातात

[१२१ पानांवरील चित्र]

[१२७ पानांवरील चित्रे]

मोठा लोकसमुदाय आपल्या तारणाचे श्रेय देव व कोकरा यांना देतो

[१२८ पानांवरील चित्रे]

कोकरा मोठ्या लोकसमुदायाला जीवनी पाण्याच्या झऱ्‍याकडे निरवील