व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती धर्मजगतावर यहोवाच्या पीडा

ख्रिस्ती धर्मजगतावर यहोवाच्या पीडा

अध्याय २१

ख्रिस्ती धर्मजगतावर यहोवाच्या पीडा

दृष्टांत ५​—प्रकटीकरण ८:१–९:२१

विषय: सातांपैकी सहा कर्ण्यांचे निनाद

पूर्णतेचा काळ: १९१४ मध्ये ख्रिस्त येशूला सिंहासनाधिष्ट केल्यापासून ते मोठ्या संकटापर्यंत

१. कोकरा सातवा शिक्का फोडतो तेव्हा काय घडते?

 “चार वारे” हे १,४४,००० आध्यात्मिक इस्राएलावर शिक्का मारण्याचे होईपर्यंत तसेच, मोठ्या लोकसमुदायाला बचावासाठी कृपापात्र ठरवेपर्यंत अडवून धरण्यात आले आहेत. (प्रकटीकरण ७:१-४, ९) तथापि, ते तुफानी वादळ पृथ्वीवर येण्याआधी सैतानी जगासंबंधाने यहोवाने नियुक्‍त केलेल्या न्यायदंडाची घोषणा ही झालीच पाहिजे! कोकरा आता सातवा व शेवटचा शिक्का फोडण्यास पुढे जातो तेव्हा काय घडते, ते बघण्यास योहान खूपच उत्सुक झालेला असणार. आता त्याचा अनुभव आम्हाला तो याप्रकारे कळवितो: “त्याने [कोकरा] सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले; त्यांस सात कर्णे देण्यात आले.”—प्रकटीकरण ८:१, २.

कळकळीच्या प्रार्थनेची वेळ

२. स्वर्गात अर्धा तास लाक्षणिक शांततेच्या काळात काय घडते?

केवढी ही अभूतपूर्व शांतता! काही घडण्याआधी सुमारे अर्धा तास थांबून राहण्याचा काळ मोठा प्रदीर्घ वाटतो. या काळात, सतत गायिली जाणारी सांघिक स्वर्गीय स्तुतीही ऐकू येत नाही. (प्रकटीकरण ४:८) ते का? याचे कारण योहानाला दृष्टांतात कळते: “मग आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धूप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला.”—प्रकटीकरण ८:३, ४.

३. (अ) धूपाचे जाळणे आम्हाला कशाची आठवण करून देते? (ब) स्वर्गात अर्धा तास शांतता कशासाठी होती?

ही गोष्ट आपल्याला, यहूदी व्यवस्थेमध्ये आधी निवासमंडपात व नंतर काही वर्षांनी यरुशलेम मंदिरात दर दिवशी धूप जाळला जात होता याचे स्मरण देते. (निर्गम ३०:१-८) या धूप जाळण्याच्या समयी याजक नसणारे इतर इस्राएल लोक पवित्र जागेच्या बाहेर, कदाचित आपल्या अंतःकरणात शांतपणे, तो धूप ज्याच्याकडे वर जात होता त्याला प्रार्थना करीत थांबून राहात. (लूक १:१०) असेच काही स्वर्गात घडत असल्याचे आता योहान बघतो. देवदूताने जो धूप जाळला तो ‘पवित्र जनांच्या प्रार्थनांशी’ संबंधित आहे. खरे म्हणजे, आधीच्या दृष्टांतात धूप हा अशा प्रार्थनेचे प्रतिनिधीत्व करीत आहे असे सांगण्यात आले. (प्रकटीकरण ५:८; स्तोत्र १४१:१, २) तेव्हा, स्वर्गात जी लाक्षणिक शांतता पसरली होती ती, पृथ्वीवरील पवित्र जनांच्या प्रार्थना ऐकू येण्यासाठी होती हे उघड आहे.

४, ५. शांततेचा लाक्षणिक अर्ध्या तासाचा काळ केव्हा आहे ते ठरविण्यामध्ये कोणत्या ऐतिहासिक घडामोडी आपणास मदत देतात?

हे कधी घडले ते आपल्याला ठरवता येईल का? होय, हा संदर्भ प्रभूच्या दिवसात आरंभाला ज्या ऐतिहासिक घटना घडल्या त्यांच्याशी पडताळून पाहण्याद्वारे ते आम्हाला ठरवता येऊ शकते. (प्रकटीकरण १:१०) १९१८ व १९१९ च्या दरम्यान पृथ्वीवर ज्या घटना घडल्या त्या प्रकटीकरण ८:१-४ मधील कथानकाच्या रुपरेषेशी सुसंगत आहेत. १९१४ च्या आधी ४० वर्षांआधी, त्या काळी बायबल विद्यार्थी या नावाने ज्ञात असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांमार्फत विदेश्‍यांचे काळ हे १९१४ मध्ये समाप्त होतील असा जोरदार प्रचार करण्यात येत होता. १९१४ या वर्षाच्या त्रासमय काळाने साक्षीदार खरे असल्याचे दाखवून दिले. (लूक २१:२४, किंग जेम्स व्हर्शन; मत्तय २४:३, ७, ८) तथापि, पुष्कळांचा असाही विश्‍वास होता की, १९१४ मध्ये त्यांना या पृथ्वीवरून त्यांच्या स्वर्गीय वतनात नेण्यात येईल. पण हे घडले नाही. उलट, पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांना खडतर छळात टिकून राहावे लागले. ऑक्टोबर ३१, १९१६ मध्ये वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष चार्ल्स टी. रसेल निवर्तले. मग, जुलै ४, १९१८ मध्ये जोसेफ एफ. रदरफोर्ड व संस्थेच्या इतर सात पदाधिकाऱ्‍यांना अटलांटा, जॉर्जिया येथे बऱ्‍याच कालावधीसाठी बंदिवासाची चुकीने शिक्षा देऊन, स्थलांतरीत करण्यात आले.

योहान वर्गाचे हे प्रांजळ ख्रिस्ती गोंधळात पडले होते. आता काय करावे अशी देवाची त्यांच्याबाबत इच्छा होती? त्यांना स्वर्गात कधी घेतले जाणार होते? द वॉचटावर नियतकालिकात मे १, १९१९ मध्ये “द हार्वेस्ट एण्डेड—व्हॉट शाल फॉलो?” हा लेख प्रकाशित झाला. त्यात ही अनिश्‍चिततेची स्थिती परावर्तित झाली आणि विश्‍वासू जनांना सहनशील राहण्याचे उत्तेजन देऊन असे म्हटले गेले: “आमचा आता असा विश्‍वास आहे की, राज्याच्या वर्गाची कापणी ही पूर्ण झालेली असून अशा सर्वांवर शिक्का मारण्यात आला आहे व आता दार बंद झाले आहे.” या कठीण काळात योहान वर्गाच्या कळकळीच्या प्रार्थना, जसा धूपाचा मोठा धूर वर जातो तशा वर जात होत्या. त्यांच्या प्रार्थना ऐकल्या जात होत्या!

पृथ्वीवर अग्नी टाकणे

६. स्वर्गातील शांततेनंतर काय घडते व ते कशामुळे घडते?

योहान आम्हास सांगतो: “तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नि भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला.” (प्रकटीकरण ८:५) शांततेनंतर एकाएकी नाट्यमय हालचाली दिसतात! हे पवित्र जनांच्या प्रार्थनांचे उत्तर आहे हे स्पष्ट आहे, कारण ती घटना धूपवेदीवरील अग्नी घेण्यामुळे सुरु होते. मागे सा.यु.पू. १५१३ मध्ये सिनाय डोंगरावर गर्जना, विजा, प्रचंड नाद, आग आणि पर्वताचे थरथरणे या गोष्टी, यहोवाने आपल्या लोकांकडे त्याचे लक्ष वळवले होते याचे द्योतक होत्या. (निर्गम १९:१६-२०) आता योहानाने याच गोष्टी घडविल्याचे जे कळवले आहे ते, यहोवा पृथ्वीवरील आपल्या लोकांकडे लक्ष देत असल्याचे सूचित करते. पण योहान जे पाहतो ते चिन्हांनी दाखविण्यात आले आहे. (प्रकटीकरण १:१) तर मग, आज लाक्षणिक आग, थरथरणे, वाणी, विजा व भूकंप याचा कसा उलगडा करण्यास हवा?

७. (अ) येशूने आपल्या पृथ्वीवरील सेवकपणात कोणता लाक्षणिक अग्नी पेटवला? (ब) येशूच्या आध्यात्मिक बांधवांनी ख्रिस्ती धर्मजगतात देखील असाच अग्नी कसा पेटवला?

एके प्रसंगी येशूने आपल्या शिष्यांना म्हटले होते: “मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे.” (लूक १२:४९) खरेच, त्याने आग पेटविली. येशूने यहूदी लोकांपुढे आपल्या आवेशी प्रचाराने देवाच्या राज्याला सर्वश्रेष्ठ विषय म्हणून सादर केले व यामुळे त्या सबंध राष्ट्रात तप्त स्वरुपाचे तीव्र मतभेद निर्माण झाले. (मत्तय ४:१७, २५; १०:५-७, १७, १८) १९१९ मध्ये, पहिल्या जागतिक महायुद्धाच्या कठीण काळातून बचावलेल्या येशूच्या पृथ्वीवरील आध्यात्मिक बांधवांनी, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या छोट्या गटाने अशा प्रकारचा ज्वलंत विषय ख्रिस्ती धर्मजगतामध्ये पेटवला. त्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील सीडर पॉईंट ओहायो, येथे जमलेल्या लांबच्या व जवळच्या निष्ठावंत साक्षीदारांवर यहोवाचा आत्मा प्रबळपणे दिसून आला. अलिकडेच तुरुंगातून सुटलेल्या व लवकरच संपूर्ण निर्दोष ठरणाऱ्‍या जोसेफ एफ. रदरफोर्ड यांनी या अधिवेशनात अगदी धैर्याने असे म्हटले: “आमच्या धन्याच्या आज्ञेला आज्ञाधारकपणा दाखविणे, तसेच लोकांना इतक्या काळ बंधनात जखडून ठेवलेल्या चुकीच्या दुर्गांविरुद्ध लढत देण्याचे आमचे कर्तव्य, याला अनुलक्षून आमचे ध्येय मशीहाच्या येत असलेल्या गौरवी राज्याची घोषणा करीत राहणे हे आधीही होते व आताही आहे.” देवाचे राज्य, हाच तो प्रमुख वाद आहे!

८, ९. (अ) युद्धाच्या कठीण वर्षांमध्ये देवाच्या लोकांची प्रवृत्ती व इच्छा कशी होती हे संस्थेच्या अध्यक्षांनी कसे वर्णन करून सांगितले? (ब) पृथ्वीवर अग्नी कसा टाकण्यात आला? (क) गर्जना, वाणी, विजा चमकणे आणि भूकंप या गोष्टी कशा घडल्या?

देवाच्या लोकांच्या अलिकडील कठीण अनुभवांबद्दल अनुलक्षून बोलताना वक्त्याने म्हटले: “शत्रूने एवढा निर्दयी हल्ला केला की, प्रभूचा प्रिय कळप विस्मित झाला व तो आश्‍चर्य करीत स्तब्ध राहात, प्रभूने आपली इच्छा कळवावी यासाठी प्रार्थना करीत थांबून राहिला. . . . ही क्षणिक निराशा होती तरी राज्याचा संदेश घोषित करण्याची इच्छा ज्वलंत होती.”—पहा, द वॉचटावर, सप्टेंबर १५, १९१९ चा अंक, पृष्ठ २८०.

मग, १९१९ मध्ये ती इच्छा सफल झाली. हा लहान पण क्रियाशील ख्रिश्‍चनांचा गट आध्यात्मिक दृष्टीने जणू अग्नीने वेष्टित असा जगजाहीर प्रचाराची मोहीम सुरु करण्यासाठी सामोरा आला. (पडताळा १ थेस्सलनीकाकर ५:१९.) पृथ्वीवर अग्नी टाकण्यात आला तो या अर्थी की, देवाच्या राज्याला येथे एक ज्वलंत विषय बनविले गेले व तो तसाच पुढे जात आहे! शांततेऐवजी मोठ्या वाण्या निनादू लागल्या व त्यांनी राज्याचा संदेश स्पष्ट रुपात चोहोकडे घोषित केला. बायबलमधून तुफानी गर्जनात्मक इशारे बाहेर पडले. चमकणाऱ्‍या विजेप्रमाणे यहोवाच्या भविष्यवादित वचनातून सत्याची प्रज्वलित किरणे चकाकली आणि जणू एखाद्या मोठ्या भूकंपाप्रमाणे धार्मिक क्षेत्र मुळासकट हादरविण्यात आले. खूप कार्य करायचे आहे हे योहान वर्गाला दिसले. आजतागायत ते काम पुढे चालू असून त्याचा सबंध पृथ्वीभर वैभवी रुपात विस्तार होत आहे!—रोमकर १०:१८.

कर्ण्यांचा निनाद करण्याची तयारी करणे

१०. सात देवदूत काय करण्यास सिद्ध झाले व का?

१० योहान पुढे म्हणतो: “मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णें वाजविण्यास सिद्ध झाले.” (प्रकटीकरण ८:६) त्या कर्ण्यांच्या वाजण्याचा काय अर्थ होणार होता? इस्राएलांच्या काळी, कर्ण्यांचा नाद विशिष्ट असा महत्त्वपूर्ण दिवस किंवा लक्षवेधी घटना लक्षात आणण्यासाठी केला जाई. (लेवीय २३:२४; २ राजे ११:१४) याचप्रमाणे, योहान आता जे कर्ण्यांचे नाद ऐकणार आहे ते जीवन-मरणासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधवतील.

११. योहान वर्ग १९१९ ते १९२२ पर्यंतच्या काळात पृथ्वीवर कोणत्या तयारीच्या कामात मग्न झाला होता?

११ हे देवदूत कर्णे वाजवण्यासाठी सिद्ध होत असताना, ते पृथ्वीवर तयारीच्या कामाचेही मार्गदर्शन करीत होते यात काही संशय नाही. १९१९ ते १९२२ पर्यंतच्या काळात पुन्हा शक्‍ती मिळवलेला योहान वर्ग जाहीर सेवकपणाची जाणीव ओळखण्यात तसेच प्रकाशन सुविधा उभारण्यात मग्न झाला होता. द गोल्डन एज, ज्याला सध्या अवेक! असे म्हटले जाते हे नियतकालिक १९१९ मध्ये सामोरे आले व ते “वस्तुस्थिती, आशा व दृढनिश्‍चय यांचे नियतकालिक” होते; ते असे कर्ण्यासमान उपकरण होते, जे खोट्या धर्मांच्या राजकीय हालचाली उघड करून दाखवण्यात प्रमुख भूमिका करणार होते.

१२. प्रत्येक कर्ण्याच्या नादाने काय घोषित केले व यामुळे मोशेच्या काळातील कशाचे स्मरण आपल्याला होते?

१२ आपण आता पाहणारच आहोत त्याप्रमाणे प्रत्येक कर्ण्याचा नाद एका नाट्यमय दृश्‍याची घोषणा करतो, ज्यात पृथ्वीतील काही भागावर भयंकर पीडांचा परिणाम होईल. यापैकीच्या काही पीडा आपणाला, यहोवाने मोशेच्या काळी मिसऱ्‍यांना शासन करण्यासाठी ज्या पीडा पाठवल्या होत्या त्यांचे स्मरण देतात. (निर्गम ७:१९–१२:३२) ते त्या राष्ट्रांवर यहोवाच्या न्यायदंडांचे वक्‍तव्य करत होते व त्या पीडांनी देवाच्या लोकांना दास्यत्वातून बाहेर पडण्याचा मार्ग उघडला. योहानाने पाहिलेल्या पीडादेखील असेच काही साध्य करतात. तथापि, त्या अक्षरश: पीडा नाहीत. त्या चिन्हरुपे असून, यहोवाच्या नीतीमान न्यायाचे प्रतीक आहेत.—प्रकटीकरण १:१.

“तृतीयांश” काय आहे ते जाणणे

१३. पहिले चार कर्णे वाजल्यावर काय घडते आणि यामुळे कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

१३ आपण हे पाहणारच आहोत त्याप्रमाणे पहिल्या चार कर्ण्यांच्या नादामुळे पृथ्वी, समुद्र, नद्या व जलाशय आणि पृथ्वीला प्रकाश देणाऱ्‍या गोष्टी यांच्या “तृतीयांश” यावर पीडेचा परिणाम झाल्याचे दिसेल. (प्रकटीकरण ८:७-१२) एक तृतीयांश हा एखाद्या गोष्टीचा मोठा भाग असतो; पण तो संपूर्ण गोष्टीला सूचित करीत नाही. (पडताळा यशया १९:२४; यहेज्केल ५:२; जखऱ्‍या १३:८, ९.) तर मग, कोणता योग्य असा “तृतीयांश” या पीडेच्या परिणामात येऊ शकेल? बहुतेक मानवजात तर सैतान व त्याचे संतान याजकरवी अंधळी व भ्रष्टावलेली बनविण्यात आली आहे. (उत्पत्ती ३:१५; २ करिंथकर ४:४) ही परिस्थिती दाविदाने वर्णिल्याप्रमाणेच आहे: “ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूणएक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकहि नाही.” (स्तोत्र १४:३) होय, सबंध मानवजातीलाच प्रतिकूल दंड मिळण्याची भीती आहे. पण यामध्ये एक विभाग तर खासपणे अधिक दोषपूर्ण आहे. एक भाग—“एक तृतीयांश”—याने हे चांगले ओळखण्यास हवे होते! तो “तृतीयांश” कोण आहे?

१४. ज्याला यहोवाकडून पीडादायक संदेश मिळतो असा लाक्षणिक तृतीयांश कोणता आहे?

१४ तो ख्रिस्ती धर्मजगत आहे! १९२० शतकात तर याने मानवजातीचा एक तृतीयांश भाग व्यापला होता. त्याचा धर्म खऱ्‍या ख्रिस्ती धर्मापासून पतन पावलेल्या मोठ्या धर्मत्यागाचे फळ आहे; या धर्मत्यागाबद्दल येशू व त्याच्या शिष्यांनी आधीच भाकीत केले होते. (मत्तय १३:२४-३०; प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ थेस्सलनीकाकर २:३; २ पेत्र २:१-३) ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्गाने, आपण देवाच्या मंदिरात असल्याचा दावा केला आहे व स्वतःला ख्रिस्ती धर्माचे शिक्षक असल्याचे दाखविले आहे. पण त्यांची तत्त्वे तर बायबलच्या सत्यापासून खूपच दुरावलेली आहेत व ते देवाच्या नावाला सतत निंदा आणीत आहेत. अशाप्रकारे लाक्षणिक तृतीयांशांद्वारे चित्रित असल्यामुळे या ख्रिस्ती धर्मजगताला यहोवाकडून चिन्हे व पीडादायक संदेश मिळतो. मानवजातीच्या या तृतीयांशाला कसलीही ईश्‍वरी कृपा मिळत नाही!

१५. (अ) प्रत्येक कर्ण्याचा नाद हा केवळ एका वर्षापुरताच मर्यादित आहे का? विवेचीत करा. (ब) यहोवाचे न्यायदंड घोषित करण्यामध्ये योहान वर्गाच्या आवाजात कोणी आपला स्वर मिळवला आहे?

१५ कर्ण्यांच्या एकामागून एका नादाशी सुसंगत असे खास ठराव १९२२ ते १९२८ पर्यंत झालेल्या सात अधिवेशनात सादर करण्यात आले. पण तो नाद केवळ त्याच वर्षांपुरता मर्यादित नव्हता. ख्रिस्ती धर्मजगताच्या दुराचारी मार्गांना उघड करणे हे, प्रभूचा दिवस पुढे जात आहे तसतसे नित्याने होत आहे. आंतरराष्ट्रीय द्वेष व छळ असला तरीही यहोवाच्या न्यायदंडांना सार्वत्रिकपणे, सर्व राष्ट्रांत घोषित केले गेले पाहिजे. यानंतरच सैतानी व्यवस्थेचा नाश येऊ शकेल. (मार्क १३:१०, १३) अशाप्रकारच्या जागतिक महत्त्वाच्या गर्जनात्मक घोषणा करण्यामध्ये योहान वर्गासोबत मोठ्या लोकसमुदायाने देखील आपला स्वर मिळवला हे आनंदाचे आहे.

पृथ्वीचा तृतीयांश जळाला

१६. पहिला देवदूत कर्णा वाजवितो तेव्हा काय घडते?

१६ देवदूतांबद्दल कळवताना योहान लिहितो: “पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा रक्‍तमिश्रित गारा व अग्नि उत्पन्‍न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टि झाली आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.” (प्रकटीकरण ८:७) हे मिसरावर आलेल्या सातव्या पीडेसारखेच आहे; पण याचा आमच्या २० व्या शतकासाठी कोणता अर्थ होतो?—निर्गम ९:२४.

१७. (अ) प्रकटीकरण ८:७ मध्ये असलेला “पृथ्वी” हा शब्द कशाचे प्रतिनिधीत्व करतो? (ब) ख्रिस्ती धर्मजगताच्या पृथ्वीचा तृतीयांश कसा जळून जातो?

१७ बायबलमध्ये “पृथ्वी” हा शब्द बहुधा मानवजातीसाठी वापरल्याचा आढळतो. (उत्पत्ती ११:१; स्तोत्र ९६:१) दुसरी पीडा समुद्रावर आहे व ती देखील मानवजातीसंबंधानेच असल्यामुळे “पृथ्वी” ही सैतानाने उभारलेल्या व नाशाच्या बेतात असलेल्या स्थिर भासणाऱ्‍या अशा मानवी समाजाला अनुलक्षून असली पाहिजे. (२ पेत्र ३:७; प्रकटीकरण २१:१) पीडेचे कथानक प्रकट करते त्यानुसार पृथ्वीच्या ख्रिस्ती धर्मजगताचा तृतीयांश यहोवाच्या नापसंतीच्या दाहक आगीत होरपळून निघतो. त्याच्यामध्ये वृक्षासारखे उभे असणारे त्याचे प्रमुख लोक, यहोवाचा त्यांच्याबद्दलचा प्रतिकूल न्यायदंड घोषित झाल्यामुळे जळाले आहेत. त्याचे करोडो चर्च सदस्य जर ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांना प्राधान्य देत राहिले तर गवताच्या जळालेल्या पात्यासारखे, देवाच्या दृष्टीत आध्यात्मिक रितीने गळून जातील.—पडताळा स्तोत्र ३७:१, २. *

१८. यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश १९२२ मध्ये सीडर पॉईंट अधिवेशनात कशाप्रकारे घोषित करण्यात आला?

१८ हा न्यायदंडाचा संदेश कसा दिला जातो? सर्वसाधारणपणे, जगाच्या वृत्त माध्यमातून नव्हे, कारण हे माध्यम जगाचा भाग आहे व ते देवाच्या ‘दासांना’ अपमानकारक समजते. (मत्तय २४:४५) तर तो संदेश सप्टेंबर १०, १९२२ रोजी सीडर पॉईंट, ओहायो येथे देवाच्या लोकांच्या दुसऱ्‍या ऐतिहासिक मेळाव्यात घोषित करण्यात आला होता. त्या लोकांनी एकजुटीने व उत्साहपूर्ण रितीने, “जागतिक नेत्यांना आव्हान” या ठरावास आपली मंजुरी दिली. या ठरावाने अगदी स्पष्ट शब्दात अशाप्रकारे आधुनिक दिवसातील लाक्षणिक जगाला नोटीस दिली की, “या कारणास्तव आम्ही पृथ्वीवरील राष्ट्रांना, त्यांचे अधिपती व नेते यांना, तसेच पृथ्वीभरातील सर्व चर्चेसच्या सर्व धार्मिक पुढाऱ्‍यांना, त्यांचे अनुयायी व पाठीराखे, मोठे व्यवसाय व मोठे राजकारणी मुत्सद्दी यांना, त्यांनी या पृथ्वीवर शांती व समृद्धता प्रस्थापित करण्याचा आणि लोकांना आनंद प्राप्त करून देण्याचा जो दावा व समर्थन केले आहे त्याबाबतीत आपला पुरावा प्रस्तुत करण्याचे आव्हान करीत आहोत; ते याबाबतीत अपयशी झाले आहेत म्हणून आम्ही प्रभूचे साक्षीदार या नात्याने जी साक्ष देत आहोत, तिजकडे कान देण्याचे व मग आमची साक्ष खरी आहे की नाही ते सांगण्याचे निमंत्रण देत आहोत.”

१९. देवाच्या लोकांनी ख्रिस्ती धर्मजगताला देवाच्या राज्याबद्दल कोणती साक्ष दिली?

१९ या ख्रिश्‍चनांनी कोणती साक्ष दिली? ही: “आम्ही हे मानतो व घोषित करतो की, मशीही राज्य मानवजातीतील सर्व वाईट गोष्टींचा संपूर्ण इलाज असून तेच या पृथ्वीवर सर्व राष्ट्रांना हवी असणारी शांती व मनुष्यांत सदिच्छा आणील; जे त्याच्या सध्या चालू असलेल्या नीतीमान राजवटीस स्वेच्छेने अधीन राहतील अशांना चिरकालिक शांती, जीवन, स्वतंत्रता व चिरकालिक सौख्यानंद यांनी आशीर्वादित करण्यात येईल.” सध्याच्या भ्रष्ट काळात खासपणे ख्रिस्ती धर्मजगतातील मानव-निर्मित सरकार जगाच्या समस्या सोडवण्यात अत्यंत दयनीय रितीने अपयशी ठरली असल्यामुळे, १९२२ पासून कर्ण्याच्या नादाचे ते आव्हान अधिक मोठ्या प्रमाणात निनादत आहे. विजयशाली ख्रिस्ताच्या हातातील देवाचे राज्यच मानवजातीची एकमात्र व केवळ आशा आहे हे किती खरे आहे!

२०. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीद्वारे न्यायदंडाचे संदेश १९२२ मध्ये व त्यापासून पुढे कोणत्या माध्यमाने घोषित करण्यात आले? (ब) पहिल्या कर्ण्याच्या नादाचा ख्रिस्ती धर्मजगतावर कोणता परिणाम घडला?

२० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीने ठराव, हस्तपत्रिका, पुस्तिका, पुस्तके, नियतकालिके व भाषणे याद्वारे, या व नंतरच्या घोषणांचा नाद पसरविला. पहिल्या कर्ण्याच्या निनादाचा तडाखा ख्रिस्ती धर्मजगतावर जणू पाणी गोठून तयार झालेल्या मोठ्या गारांच्या तडाख्यासारखा बसला. त्याने या २० व्या शतकाच्या युद्धात सहभाग घेतल्यामुळे स्वतःवर जो रक्‍तदोष ओढवून घेतला आहे तो उघड करण्यात आला आहे व तो यहोवाकडील क्रोधाच्या जहाल वक्‍तव्याला पात्र आहे हे दाखवण्यात आले. योहान वर्ग, नंतर आलेल्या मोठ्या लोकसमुदायाच्या पाठबळाने पहिल्या कर्ण्याचा निनाद घोषित करीत राहिला असून त्याद्वारे त्याने लोकांचे लक्ष, यहोवाला ख्रिस्ती धर्मजगताबद्दल जे वाटते व तो कसा नाशास पात्र आहे त्याकडे वळविले.—प्रकटीकरण ७:९, १५.

अग्नीने पेटलेल्या डोंगरासारखे

२१. दुसऱ्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविला तेव्हा काय घडते?

२१ “दुसऱ्‍या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले; समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्‍त झाले आणि समुद्रातील प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले; तसेच एक तृतीयांश तारवांचा नाश झाला.” (प्रकटीकरण ८:८, ९) हे भीतीदायक दृश्‍य काय सूचित करते?

२२, २३. (अ) दुसऱ्‍या कर्ण्याच्या नादाचा परिणाम म्हणून निश्‍चये कोणता ठराव पुढे आला? (ब) ‘समुद्राचा तृतीयांश’ कशाला सूचित आहे?

२२ आपल्याला याची चांगली समज, यहोवाच्या लोकांच्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील लॉस एंजलेसमध्ये ऑगस्ट १८-२६, १९२३ रोजी भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर मिळू शकते. शनिवारी दुपारी वॉचटावर संस्थेच्या अध्यक्षांनी “मेंढरे व शेरडे” या विषयावर आपले भाषण दिले. “मेंढरे” ही धार्मिक प्रवृत्तीची माणसे असून त्यांना देवाच्या राज्यातील पृथ्वीवरील क्षेत्रात वतन मिळेल हे स्पष्टरित्या दाखवण्यात आले. यानंतर जो ठराव संमत करण्यात आला त्याने “धर्मत्यागी पुढारी आणि ‘त्यांच्या कळपाचे प्रमुख’ असणारे आर्थिक व राजकीय बळाचे जागतिक लोक,” यांच्या ढोंगीपणाकडे लक्ष आकर्षित केले. त्याने “शांती व सुव्यवस्थेवर प्रेम करणाऱ्‍या पंथीय चर्चेसमधील लाखो लोकांना . . . ‘बाबेल’ असे प्रभूने म्हटलेल्या अधार्मिक मंडळीच्या व्यवस्थेपासून बाहेर पडण्याची” व “देवाच्या राज्याकडील आशीर्वाद मिळवून घेण्याच्या” तयारीत राहण्याची हाक दिली.

२३ हा ठराव दुसऱ्‍या कर्ण्याच्या निनादाने पुढे आला यात काही शंका नाही. जे नियुक्‍त काळी या संदेशाला प्रतिसाद देतील ते शेरडांच्या गटापासून स्वतःला वेगळे करणार होते. यशयाने या शब्दात वर्णन केले: “दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत; त्यांच्याने स्थिर राहावत नाही. त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकितात.” (यशया ५७:२०; १७:१२, १३) अशाप्रकारे, ‘समुद्र’ हा गोंधळ व क्रांत्या घडविणाऱ्‍या बंडखोर मानवजातीच्या खवळलेल्या व अस्थिर समाजाला यथार्थपणे सूचित करतो. (पडताळा प्रकटीकरण १३:१.) असा हा ‘समुद्र’ पुढे अस्तित्वात राहणार नाही अशी वेळ येत आहे. (प्रकटीकरण २१:१) दरम्यान, दुसऱ्‍या कर्ण्याच्या नादामुळे यहोवा आपला न्यायदंड त्याच्या तृतीयांश भागावर—ख्रिस्ती धर्मजगतामध्येच अस्तित्वात असणाऱ्‍या अनावर भागावर—उच्चारतो.

२४. समुद्रात टाकण्यात आलेला मोठा पेटलेला डोंगर कशाचे चित्र आहे?

२४ अशा ‘समुद्रात’ अग्नीने पेटलेला मोठा डोंगर टाकण्यात आला. बायबलमध्ये डोंगर हा वेळोवेळी सरकारचे प्रतीक असे दाखवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, देवाच्या राज्याला डोंगराची उपमा देण्यात आली आहे. (दानीएल २:३५, ४४) विध्वंसक बाबेल “जळून कोळ झालेल्या पर्वतासमान” झाला. (यिर्मया ५१:२५) पण योहानाने पाहिलेला मोठा डोंगर अद्याप जळत आहे. त्याचे समुद्रात टाकून देणे हे, पहिल्या जागतिक युद्धाच्या दरम्यान व त्यानंतर सरकारचा प्रश्‍न मानवजातीत व खासपणे ख्रिस्ती धर्मजगतातील देशात केवढा ज्वलंत बनला होता याचे योग्य चित्र देते. इटलीत मुसोलिनीने फॅसिझम सुरु केले. जर्मनीने हिटलरच्या नात्झी प्रणालीस कवटाळले, तर इतर देशांनी वेगळ्या समाजसत्तावाद्यांचा प्रयोग केला. रशियात जहाल बदल घडला, तेथे बोल्शेविक क्रांतीने पहिले नास्तिक राज्य आणले व याचा परिणाम, एकेकाळी ख्रिस्ती धर्मजगताने जेथे आपले बळ व प्राबल्य जमवले होते ते सर्व हरवले.

२५. दुसऱ्‍या जागतिक युद्धानंतर देखील सरकार कसा ज्वलंत विषय चालूच राहिला?

२५ दुसरे महायुद्ध आले व त्यामध्ये फॅसिस्ट व नात्झी प्रयोग उधळले गेले. पण सरकार त्यानंतर देखील ज्वलंत विषय राहिला आणि मानवी समुद्र खवळत राहिला व त्यातून त्याने नव्या क्रांतीकारी सरकारांना बाहेर फेकले. असे सरकार १९४५ च्या दशकानंतर चीन, व्हिएतनाम, क्युबा आणि निकारागुआसारख्या विविध स्थळी स्थापिले गेले. ग्रीसमध्ये लष्करी हुकुमशाहीसंबंधाने करण्यात आलेली चाचणी अपयशी ठरली. कम्पुचिया (कंबोडिया) येथे मूलगामी कम्युनिस्ट मतप्रणालीचा परिणाम वीस लाखापेक्षा अधिक मृत्यू घडण्यात दिसला.

२६. ‘अग्नीने पेटलेला डोंगर’ मानवजातीच्या समुद्रात कशाप्रकारे लाटा उसळतच राहिला?

२६ ‘अग्नीने पेटलेला डोंगर’ मानवजातीच्या समुद्रात लाटा उधळतच राहिला. सरकारसंबंधाचे झगडे आफ्रिका, अमेरिका, आशिया खंडात व पॅसिफिक बेटांवर चालू राहिले. यापैकीचे बरेच झगडे ख्रिस्ती धर्मजगताच्या देशात किंवा जेथे ख्रिस्ती धर्मजगताचे मिशनरी सक्रिय भाग घेणारे ठरले तेथे होत आहेत. रोमन कॅथलिक पाळक सुद्धा कम्युनिस्ट गनिमी पद्धतीने युद्ध करणाऱ्‍या तुकडीस जाऊन मिळाले. याच वेळी, प्रॉटेस्टंट सुवार्तिकांच्या गटाने मध्य अमेरिकेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कम्युनिस्टांच्या ‘सत्ताप्राप्तीच्या क्रुद्ध व निर्दयी इच्छेविरुद्ध’ प्रतिकार करण्यासाठी कार्य सुरु केले. तथापि, मानवजातीत होत असलेल्या या प्रकारच्या कोणत्याही प्रचंड क्षोभाने शांती व निर्भयता आणली नाही.—पडताळा यशया २५:१०-१२; १ थेस्सलनीकाकर ५:३.

२७. (अ) ‘समुद्राच्या तृतीयांशाचे’ रक्‍त कसे झाले? (ब) “तृतीयांश प्राणी” कसे नाश पावले आणि “तृतीयांश तारवांचा” कसा नाश होणार?

२७ दुसऱ्‍या कर्ण्याचा नाद प्रकटवितो की, देवाच्या राज्यास अधीन होण्यापेक्षा सरकारसंबंधाने क्रांतीकारी झगड्यात मानवजातीतील ज्यांनी भाग घेतला ते सर्व रक्‍तदोषी आहेत. खासपणे, ख्रिस्ती धर्मजगताचा ‘समुद्राचा तृतीयांश’ रक्‍तमय झाला आहे. त्यात असणारे सर्व जीव देवाच्या दृष्टीने मृतवत्‌ झाले आहेत. समुद्राच्या त्या तृतीयांशामध्ये तारवाप्रमाणे तरंगणाऱ्‍या कोणत्याही पुरोगामी संस्थांना सरतेशेवटी नौकाभंग होण्याचा अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. तेव्हा, त्या संकुचित राष्ट्रवादी व रक्‍तपाती समुद्रात अद्याप लोळणाऱ्‍यांपासून वेगळे होण्याचा कर्ण्याचा नाद लाखो मेंढरासमान लोकांनी ऐकून घेतला हे किती आनंदाचे आहे!

एक तारा आकाशातून खाली पडतो

२८. तिसरा देवदूत कर्णा वाजवितो तेव्हा काय घडते?

२८ “तिसऱ्‍या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्‍यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला; त्या ताऱ्‍याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या एक तृतीयांशाचा कडूदवणा झाला आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली, कारण ते कडू झाले होते.” (प्रकटीकरण ८:१०, ११) परत एकदा, बायबलमधील इतर भाग आम्हाला हे शास्त्रवचन प्रभूच्या काळी कसे लागू होते ते पाहण्यात आमची मदत करते.

२९. “मशालीसारखा पेटलेला मोठा तारा” कोणाशी जुळतो व का?

२९ येशूने सात मंडळ्यांना दिलेल्या संदेशात तारा कशाचे प्रतीक होता ते आपण आधी पाहिलेच आहे, तेथे सात तारे मंडळीतील वडिलांना सूचित करतात. * (प्रकटीकरण १:२०) अभिषिक्‍त “तारे,” इतर सर्व अभिषिक्‍त जणांसोबत आध्यात्मिक अर्थाने आपले स्वर्गीय वतन, त्यांच्यावर पवित्र आत्म्याने स्वर्गीय वतनासाठी शिक्कामोर्तब होतो तेव्हापासून अनुभवण्यास सुरवात करतात. (इफिसकर २:६, ७) तथापि, प्रेषित पौलाने हा इशारा दिला की, अशा ताऱ्‍यांमधून काही धर्मत्यागी, फुटीर लोक सामोरे येतील, जे कळपाची दिशाभूल करतील. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) अशा अविश्‍वासूपणामुळे मोठा धर्मत्याग निर्माण होऊन हे अधःपतित वडील एकत्र मिळून स्वतःला संयुक्‍त धर्मत्यागी पुरुष करतील आणि स्वतःला मानवजातीवरील प्रभुत्व गाजविण्याच्या पदावर उंचावतील. (२ थेस्सलनीकाकर २:३, ४) जगाच्या दृश्‍यात ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाचे पदार्पण झाले तेव्हा पौलाने दिलेला इशारा पूर्ण झाला. हा गट “मशालीसारखा पेटलेला मोठा तारा” याचे योग्यपणे प्रतिनिधीत्व करीत आहे.

३०. (अ) बाबेलचा राजा आकाशातून पडला असे सांगण्यात आले तेव्हा त्याचा काय अर्थ होत होता? (ब) यास्तव, आकाशातून पडणे हे कोणत्या गोष्टीला अनुलक्षून आहे?

३० योहान हा विशिष्ट तारा आकाशातून पडलेला पाहतो. ते कसे? याबद्दल प्राचीन काळातील राजाला आलेले अनुभव आपल्याला मदत देतात. बाबेलच्या राजाबद्दल बोलताना यशयाने म्हटले: “हे देदीप्यमान ताऱ्‍या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास! राष्ट्रांस लोळविणाऱ्‍या, तुला धुळीत कसे टाकिले!” (यशया १४:१२) हा भविष्यवाद, कोरेशच्या सैन्याने बाबेलास उलथवून टाकले तेव्हा पूर्ण झाला. बाबेलच्या राजाला जागतिक स्वामित्वापासून खाली उतरण्याचा लांच्छनास्पद पराजय अनुभवण्यास मिळाला. अशाप्रकारे, आकाशातून पडणे ही गोष्ट एखाद्या उच्च पदास गमाविणे आणि कलंकित होणे याला लागू होणारी आहे.

३१. (अ) ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्ग केव्हा ‘स्वर्गीय’ स्थानापासून खाली पडला? (ब) पाळकांनी वाढलेले पाणी कसे “कडूदवणा” झाले व याचा पुष्कळांवर काय परिणाम झाला?

३१ ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्ग खऱ्‍या ख्रिस्ती धर्मातून निघून धर्मत्यागी झाला तेव्हा पौलाने इफिसकर २:६, ७ [NW] मध्ये वर्णिलेल्या उंच ‘स्वर्गीय’ स्थानातून ते खाली पडले. आता सत्याचे ताजे व शुद्ध पाणी पुरविण्याऐवजी ते, अग्नीनरक, परगेटरी, त्रैक्य, आधीच ठरवून दिलेली गती यासारख्या अत्यंत लबाडखोर गोष्टींचा “कडूदवणा” पाजू लागले. तसेच त्यांनी राष्ट्रांना देवाचे नैतिक सेवक बनविण्याऐवजी युद्धाप्रत निरवले. याचा परिणाम? ज्यांनी त्या लबाड गोष्टी मानल्या त्यांना आध्यात्मिक रुपाची विषबाधा जडली. त्यांची परिस्थिती, यिर्मयाच्या काळातील अविश्‍वासू इस्राएलांच्या स्थितीसारखीच बनली, ज्याबद्दल यहोवाने असे म्हटले: “मी त्यांस खावयास कडूदवणा व प्यावयास विष देईन; कारण यरुशलेमेच्या संदेष्ट्यांपासून अधर्म निघून देशभर पसरला आहे.”—यिर्मया ९:१५; २३:१५.

३२. आध्यात्मिक आकाशातून ख्रिस्ती धर्मजगताचे पतन केव्हा दृश्‍यमान झाले व ते नाट्यमय रितीने कसे दिसले?

३२ आध्यात्मिक आकाशातून घडलेले हे पतन १९१९ या वर्षी स्पष्ट दिसले, जेव्हा ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांऐवजी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या अल्प असणाऱ्‍या शेषांना राज्य आस्थेवर नियुक्‍ती मिळाली. (मत्तय २४:४५-४७) तसेच, १९२२ पासून जेव्हा या ख्रिश्‍चनांच्या गटाने ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाचे अपयश अगदी उघडपणे दाखविण्याची मोहीम पुन्हा उघडली, तेव्हा हे पतन नाट्यमयरितीने सामोरे आले.

३३. अमेरिकेतील कोलंबस, ओहायो येथील १९२४ च्या अधिवेशनात ख्रिस्ती धर्मजगातील पाळकवर्गास कसे उघड करण्यात आले?

३३ याबाबतीत एक घोषणा अगदी लक्षवेधी होती. द गोल्डन एज नियतकालिकाने ज्याचे, “युगात भरविण्यात आलेले बायबल विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे अधिवेशन” असे वर्णन दिले तेथे ती करण्यात आली. हे अधिवेशन कोलंबस, ओहायो, येथे जुलै २०-२७, १९२४ मध्ये भरविण्यात आले. निश्‍चये, तिसरा कर्णा वाजविणाऱ्‍या देवदूताच्या मार्गदर्शनाखाली, तेथे एक जोरदार ठराव संमत झाला व नंतर त्याचे एका पत्रिकेत मुद्रण करून त्याच्या ५ कोटी प्रतींचे वितरण करण्यात आले. हा ठराव मंडळ्यांवरील आरोप (इंग्रजी) या शिर्षकाखाली प्रसिद्ध झाला. एका पोटमथळ्याखाली हा वाद प्रस्तुत झाला: “वचनयुक्‍त संतान विरुद्ध सर्पाचे संतान.” त्या आरोपपत्राने ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्गाला, त्यांनी स्वतःला लावून घेतलेल्या उच्च धार्मिक पदव्या, आपल्या कळपावर व्यापारी धनाढ्य लोक तसेच व्यावसायिक राजकारणी लोकांना प्रमुख म्हणून नेमणे, लोकांपुढे झळकण्याची त्यांची इच्छा आणि लोकांना देवाच्या राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्याचा त्यांचा नकार याबद्दल उघड केले. त्या ठरावाने जोर देऊन म्हटले की, प्रत्येक समर्पित ख्रिश्‍चनाला ‘आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदीत करण्याची व सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करण्याची’ नेमणूक देवाकडून आहे.—यशया ६१:२, KJ. 

३४, ३५. (अ) तिसऱ्‍या देवदूताने आपला कर्णा वाजविण्यास आरंभ केला तेव्हापासून धार्मिक पुढाऱ्‍यांचे सामर्थ्य व प्रभाव याबद्दल काय घडत आले आहे? (ब) ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांसाठी कोणते भवितव्य वाट पाहून आहे?

३४ तिसऱ्‍या देवदूताने कर्णा वाजविण्यास आरंभ केल्यापासून पाळकांचा मानवजातीवर प्रभुत्व करण्याचा वचक आता सरु लागला आहे आणि सध्याच्या युगात व काळात यांच्यापैकी बऱ्‍याच थोड्यांना एकेकाळचे प्रभुत्वाचे सामर्थ्य अनुभवण्यास मिळत आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचारकार्यामुळे पुष्कळ लोकांना आता हे कळू लागले आहे की, पाळकांद्वारे शिकवल्या जाणाऱ्‍या बऱ्‍याच शिकवणी आध्यात्मिक विष—“कडूदवणा”—आहेत. याशिवाय, उत्तर युरोपात पाळकांचा प्रभाव जवळजवळ संपलाच आहे आणि काही इतर देशात सरकार त्यांच्या प्रभावावर कडक नियंत्रण घालीत आहे. युरोपातील कॅथलिक विभागात, अमेरिकेत पाळकांचे आर्थिक, राजकारणी व नैतिक घडामोडीतील धक्कादायक वर्तन त्यांची ख्याती बदनाम करण्यास कारणीभूत ठरले. आता येथून पुढे त्यांचे स्थान आणखी वाईट होत राहणार, कारण यांनाही लवकरच इतर सर्व खोट्या धार्मिक पुरोहितांप्रमाणेच अधोगती मिळणार आहे.—प्रकटीकरण १८:२१; १९:२.

३५ यहोवाने ख्रिस्ती धर्मजगतावर पाठविलेल्या पीडा अद्याप संपल्या नाहीत. चवथ्या कर्ण्याचा नाद झाल्यावर काय घडते त्याकडे लक्ष द्या.

अंधकार!

३६. चवथा देवदूत आपला कर्णा वाजवितो तेव्हा काय घडते?

३६ “चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व ताऱ्‍यांचा एक तृतीयांश ह्‍यावर प्रहार झाला; त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याहि तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.” (प्रकटीकरण ८:१२) मिसरावर आलेली नववी पीडा अक्षरशः अंधाराची होती. (निर्गम १०:२१-२९) पण, आमच्या २० व्या शतकात कोणता लाक्षणिक अंधकार लोकांना पीडा देतो?

३७. ख्रिस्ती मंडळीबाहेर असलेल्या लोकांच्या आध्यात्मिक वतनाचे प्रेषित पेत्र व पौल यांनी कसे वर्णन दिले?

३७ प्रेषित पेत्राने आपल्या समविश्‍वासू सहकाऱ्‍यांना म्हटले की, ते ख्रिस्ती होण्याआधी आध्यात्मिक अर्थाने अंधकारात होते. (१ पेत्र २:९) याचप्रमाणे पौलाने ख्रिस्ती मंडळीबाहेरील आध्यात्मिक स्थितीचे वर्णन करताना “अंधकार” हा शब्द वापरला. (इफिसकर ५:८; ६:१२; कलस्सैकर १:१३; १ थेस्सलनीकाकर ५:४, ५) पण देवावर विश्‍वास ठेवून असल्याचा दावा करणाऱ्‍या आणि येशूला आपला तारणारा मानणाऱ्‍या ख्रिस्ती धर्मजगतातील लोकांबद्दल काय?

३८. चवथा दूत ख्रिस्ती धर्मजगताच्या ‘प्रकाशाबद्दल’ कोणती गोष्ट कर्ण्यातून मोठ्याने सांगतो?

३८ येशूने म्हटले की, खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख त्यांच्या फळावरुन होईल आणि पुष्कळ जरी त्याचे अनुयायी असल्याचा दावा करतील तरी ते ‘अनाचार करणारे’ असतील. (मत्तय ७:१५-२३) ख्रिस्ती धर्मजगताकरवी व्यापलेल्या जगाच्या तृतीयांश भागाकडील फलप्राप्तीकडे नजर टाकल्यास तो आध्यात्मिक अंधकारात धडपडत असल्याचे कोणीही अमान्य करणार नाही. (२ करिंथकर ४:४) ख्रिस्ती असल्याचा दावा करीत असल्यामुळे तो अधिक दोषपात्र आहे. या कारणास्तव, चवथ्या दूताने कर्णा वाजवून ख्रिस्ती धर्मजगताचा “प्रकाश” हा वस्तुतः अंधकार असून त्याच्या ‘प्रकाशाचा’ उगम हा गैर ख्रिस्ती, बाबेलोनी आहे हे घोषित करणे योग्यच आहे.—मार्क १३:२२, २३; २ तीमथ्य ४:३, ४.

३९. (अ) संमत झालेल्या ठरावाने १९२५ मध्ये ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या प्रकाशाला कसे उघड करून दाखविले? (ब) कशाप्रकारे १९५५ मध्ये आणखी पुढील उघड करणे झाले?

३९ या स्वर्गीय घोषणेस अनुलक्षून अमेरिकेत इंडियानापॉलिस, इंडियाना येथे अधिवेशनाला जमलेल्या देवाच्या लोकांच्या मोठ्या जमावाने ऑगस्ट २९, १९२५ रोजी “आशेचा संदेश” या शीर्षकाचा एक ठराव प्रकाशनासाठी मंजूर केला. याच्याही कित्येक भाषेत, ५ कोटी प्रतींचे वाटप करण्यात आले. त्यात लोभिष्ट व्यापारी, राजकारणी पुढारी व धार्मिक पुढारी यांनी मिळून संयुक्‍तपणे जो खोटा प्रकाश दाखविला त्याचे वर्णन दिले व याचा परिणाम “लोक अंधारात पडण्यात घडला.” या ठरावाने “शांती, समृद्धता, स्वास्थ्य, जीवन, स्वातंत्र्य आणि चिरकालिक सुख यांचा आशीर्वाद” प्राप्त करण्यासाठी देवाचे राज्य हीच खरी आशा आहे, याकडे निर्देश केला. अशाप्रकारचा संदेश ख्रिस्ती धर्मजगताच्या भव्य संघटनांविरुद्ध घोषित करण्यासाठी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या लहान गटाला खूप धैर्य लागले. पण हे त्यांनी १९२० च्या दशकापासून ते आतापर्यंत सातत्याने केले. अगदी अलिकडील काळात १९५५ मध्ये ख्रिस्ती धर्मजगत की, ख्रिस्ती विश्‍वास—कोण “जगाचा प्रकाश” आहे? (इंग्रजी) या पुस्तिकेचे प्रकाशन जगभर पुष्कळ भाषेत करून धार्मिक पुढारी वर्गाला आणखी उघडे केले गेले. आज तर ख्रिस्ती धर्मजगताचा ढोंगीपणा इतका विस्तृत बनला आहे की, तो कोणालाही सहजपणे दिसू शकेल. पण, यहोवाचे लोक ते अंधाराचे राज्य आहे हे उघड करून दाखवण्यात थांबले नाहीत.

उडता गरुड

४०. चार कर्ण्यांच्या नादांनी ख्रिस्ती धर्मजगत काय असल्याचे दाखविले?

४० या पहिल्या चार कर्ण्यांच्या नादांनी ख्रिस्ती धर्मजगताच्या ओसाड व मरणप्राय स्थितीला उघड करून दाखविण्यात खरेच परिणामी केले. ‘पृथ्वीतील’ त्याचा भाग यहोवाकडील न्यायदंड मिळविण्यास पात्र बनला आहे, हेही उघड करून दाखवण्यात आले. त्याच्या राष्ट्रात व इतरत्र उद्‌भवणारी क्रांतीकारी सरकारे आध्यात्मिक जीवनासाठी अपायकारक असल्याचे दाखवण्यात आले. त्याच्या धार्मिक पुढाऱ्‍यांची स्थिती उघडी करण्यात आली आणि त्याच्या आध्यात्मिक स्थितीचा सर्वसाधारण काळोख सर्वांना पाहण्यासाठी उघड केला गेला. खरेच, ख्रिस्ती धर्मजगत हा सैतानी व्यवस्थीकरणातील अगदी दोषी भाग आहे.

४१. कर्ण्यांच्या नादाच्या विश्रामात, योहान पुढे काय बघतो व ऐकतो?

४१ आता आणखी काय प्रकट व्हावयाचे आहे? या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्याआधी या कर्ण्यांच्या नादाच्या मालिकेस थोडासा विश्राम मिळतो. योहान पुढे काय बघतो त्याचे वर्णन देतो: “मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले: ‘जे तीन देवदूत कर्णा वाजविणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्‍या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!’”—प्रकटीकरण ८:१३.

४२. उडणाऱ्‍या गरुडाद्वारे काय सूचित होऊ शकते आणि त्याचा संदेश काय आहे?

४२ एखादा गरुड आकाशात उंच उडत असतो व त्याला पृथ्वीवरील मोठ्या भागातील लोक पाहू शकतात. त्याला विलक्षण सूक्ष्मदृष्टी असून तो खूप लांबपर्यंत पाहू शकतो. (ईयोब ३९:२९) देवाच्या सिंहासनाभोवती उभ्या असलेल्या चार करुबीय प्राण्यांपैकी एकाला उडणाऱ्‍या गरुडाच्या रुपात दाखविण्यात आले. (प्रकटीकरण ४:६, ७) हा तोच करुब असो की, इतर देवाचा दूरदृष्टीचा सेवक असो, त्याने “अनर्थ, अनर्थ, अनर्थ” असा जोरदार संदेश जोराने घोषित केला. यास्तव, पुढचे तीन कर्ण्याचे नाद होत असता ते पृथ्वीवरील निवासी ऐकोत, कारण या प्रत्येकाचा एकेका अनर्थाशी संबंध आहे.

[तळटीपा]

^ याच्या विरोधात प्रकटीकरण ७:१६ दाखविते की, मोठ्या लोकसमुदायाला यहोवाच्या नापसंतीच्या दाहक उष्णतेचा अनुभव येत नाही.

^ येशूच्या उजव्या हातातील सात तारे हे ख्रिस्ती मंडळीतील अभिषिक्‍त देखरेख्यांचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी, जगातील ७३,००० व त्यापेक्षा अधिक मंडळ्यात असणारे वडिल हे बहुतेक मोठ्या लोकसमुदायातील आहेत. (प्रकटीकरण १:१६; ७:९) यांचे स्थान कोठे आहे? यांची नेमणूक ही पवित्र आत्म्याने होऊन ती विश्‍वासू व बुद्धिमान दास वर्गाद्वारे होत असल्यामुळे हेही येशूच्या उजव्या हाताच्या नियंत्रणाखाली आहेत असे म्हणता येते; कारण ते देखील सहमेंढपाळच आहेत. (यशया ६१:५, ६; प्रेषितांची कृत्ये २०:२८) ते त्या “सात तारे” यांना आपले पाठबळ देतात, ते या अर्थी की, जेथे हे अभिषिक्‍त बांधव उपलब्ध नाहीत तेथे ते सेवा करतात.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३९ पानांवरील चौकट]

ख्रिस्ती धर्मजगताचे पाणी कडूदवणा असल्याचे दिसले

ख्रिस्ती धर्मजगताचे विश्‍वास व प्रवृत्त्या

देवाचे व्यक्‍तिगत नाव महत्त्वाचे नाही: “केवळ एकाच देवासाठी एखाद्या नामाचा वापर करणे . . . हे ख्रिस्ती चर्चच्या सार्वत्रिक विश्‍वासाला सर्वतोपरी अयोग्य वाटते.” (रिव्हाईज्ड स्टँडर्ड व्हशर्न यामधील प्रास्ताविक)

देव त्रैक्य आहे: “पिता देव आहे, पुत्र देव आहे आणि पवित्र आत्मा देखील देव आहे पण ते तीन देव नसून एकच देव आहे.” (द कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ, १९१२ चा खंड)

मानवी जीव अमर आहे: “मानव मरतो तेव्हा आत्मा व शरीर वेगवेगळे होतात. त्याचे शरीर . . . कुजते . . . पण मानवी आत्मा मात्र मरत नाही.” (मरणानंतर काय होते? [इंग्रजी] एक रोमन कॅथलिक प्रकाशन)

दुष्टांना मृत्युनंतर नरकात शिक्षा मिळते: “सांप्रदायिक ख्रिस्ती विश्‍वासानुसार नरक हे उद्विग्नता व त्रास यांची न संपणारी जागा आहे.” (द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ, १९८७ आवृत्ती)

“मिडिआट्रीक्स [स्त्री मध्यस्त] ही पदवी आमच्या मातेला अनुलक्षून आहे.” (न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ, १९६७ आवृत्ती)

बालकांचा बाप्तिस्मा झालाच पाहिजे: “अगदी सुरवातीपासूनच चर्चने बालकांच्या बाप्तिस्म्याचा पवित्र विधी ठेवला आहे. ही पद्धत केवळ कायदेशीर आहे असे नव्हे, तर ती तारणासाठी अत्यंत आवश्‍यक आहे असे शिकवण्यात येत होते.” (न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ, १९६७ आवृत्ती)

पुष्कळ चर्चेसमध्ये सर्वसामान्य वर्ग व पाळक वर्ग हे दोन विभाग आहेत. पाळक सभासदांची सेवा करतात. पाळकांना त्यांच्या कामाबद्दल पगार दिला जातो आणि ते सभासदांपेक्षा दर्जाने उंच असून त्यांना “रेव्हरंड,” “फादर” व “हिज इमिनन्स” या पदव्यांनी विभूषित केले जाते.

प्रतिमा, पवित्र मूर्त्या व क्रूस यांचा भक्‍तीमध्ये उपयोग केला जातो: “ख्रिस्त, देवाची कुमारी माता व इतर संतांच्या मूर्त्या . . . चर्चमध्ये ठेवल्या पाहिजेत आणि त्यांना योग्य सन्मान व भक्‍ती दिली गेली पाहिजे.” (त्रेंत येथील परिषदेत झालेली घोषणा, [१५४५-६३])

चर्च सदस्यांना शिकवले जाते की, देवाचे उद्देश राजकारणाद्वारे पूर्ण केले जातील. दिवंगत कार्डिनल स्पेलमॅन म्हणाले होते की, “शांतीचा केवळ एकच मार्ग आहे . . . तो म्हणजे लोकशाहीचा राजमार्ग.” धर्माचे जागतिक राजकारणात लुडबुडणे (तसेच प्रस्थापित सरकारांविरुद्ध संघटित स्वरुपाचा देखील दंगा) असतो याबद्दल व शिवाय ते संयुक्‍त राष्ट्रसंघाला “ऐक्य व शांती यांची शेवटली आस्था” आहे असे वृत्त माध्यम कळविते.

बायबल खरेपणाने काय सांगते

येशूने प्रार्थना केली की देवाचे नाव पवित्र मानिले जावो. पेत्राने म्हटले: “जो कोणी परमेश्‍वराचा [यहोवा, NW] धावा करील तो तरेल.” (प्रेषितांची कृत्ये २:२१; योएल २:३२; मत्तय ६:९; निर्गम ६:३; प्रकटीकरण ४:११; १५:३; १९:६)

बायबल म्हणते की, यहोवा हा येशूपेक्षा मोठा असून तो ख्रिस्ताचा देव व मस्तक आहे. (योहान १४:२८; २०:१७; १ करिंथकर ११:३) पवित्र आत्मा ही देवाची कार्यकारी शक्‍ती आहे. (मत्तय ३:११; लूक १:४१; प्रेषितांची कृत्ये २:४)

मनुष्य हा स्वतः जीव आहे. मृत्युच्या वेळी जीव विचार करण्याचे थांबतो, त्याला जाणीव राहात नाही आणि जेथून त्याची निर्मिती झाली त्या मातीला परत जाऊन मिळतो. (उत्पत्ती २:७; ३:१९; स्तोत्र १४६:३, ४; उपदेशक ३:१९, २०; ९:५, १०; यहेज्केल १८:४, २०)

पापाचे वेतन हे मरण आहे, यातनामधील जीवन नव्हे. (रोमकर ६:२३) मृत जाणीव नसलेल्या स्थितीत नरकात (हेडीज, शिओल) राहतात, त्यांचे पुनरुत्थान होण्यासाठी थांबून आहेत. (स्तोत्र ८९:४८; योहान ५:२८, २९; ११:२४, २५; प्रकटीकरण २०:१३, १४)

देव व मनुष्य यांजमधील एकमात्र मध्यस्त येशू आहे. (योहान १४:६; १ तीमथ्य २:५; इब्रीयांस ९:१५; १२:२४)

ज्यांना शिष्य बनविण्यात आले आहे व येशूच्या आज्ञांचे पालन करावयास शिकवण्यात आले आहे असेच बाप्तिस्मा घेऊ शकतात. बाप्तिस्मा घेण्यास लायक बनण्यासाठी त्या व्यक्‍तीला देवाचे वचन समजले पाहिजे व त्याने विश्‍वास ठेवला पाहिजे. (मत्तय २८:१९, २०; लूक ३:२१-२३; प्रेषितांची कृत्ये ८:३५, ३६)

पहिल्या शतकातील सर्व ख्रिस्ती सेवक होते व त्यांनी सुवार्तेच्या प्रचारात सहभाग घेतला. (प्रेषितांची कृत्ये २:१७, १८; रोमकर १०:१०-१३; १६:१) ख्रिश्‍चनांनी “फुकट” दिले पाहिजे; त्याकरता पगार नको. (मत्तय १०:७, ८) येशूने धार्मिक पदव्यांचा वापर करण्यावर कडक मनाई घातली. (मत्तय ६:२; २३:२-१२; १ पेत्र ५:१-३)

ख्रिश्‍चनाने हर प्रकारातील मूर्तिपूजेपासून दूर राहण्यास हवे; त्यात तथाकथित सापेक्ष भक्‍तीही येता कामा नये. (निर्गम २०:४, ५; १ करिंथकर १०:१४; १ योहान ५:२१) ते देवाची भक्‍ती डोळ्यांना दिसते तशी नव्हे, तर आत्म्याने व खरेपणाने करतात. (योहान ४:२३, २४; २ करिंथकर ५:७)

येशूने मानवजातीची आशा म्हणून कोणा राजकीय व्यवस्थेचा नव्हे तर देवाच्या राज्याचा प्रचार केला. (मत्तय ४:२३; ६:९, १०) त्याने राजकारणात समाविष्ट होण्याचे नाकारले. (योहान ६:१४, १५) त्याचे राज्य या जगाचे नव्हते; यामुळे त्याच्या अनुयायांनीही या जगाचे भाग व्हावयाचे नव्हते. (योहान १८:३६; १७:१६) याकोबाने जगाची मैत्री न राखण्याबद्दल इशारा दिला. (याकोब ४:४)

[१३२ पानांवरील चित्रे]

सात शिक्क्यांच्या फोडण्यामुळे सात कर्ण्यांचा निनाद होण्याला वाट मिळते

[१४० पानांवरील चित्रे]

“जगाच्या शासनकर्त्यांना आव्हान.” (इंग्रजी) (१९२२) या ठरावामुळे यहोवाने ‘पृथ्वीबद्दल’ ठरवलेली पीडा घोषित करण्यात मदत मिळाली

[१४० पानांवरील चित्रे]

“सर्व ख्रिश्‍चनांना इशारा.” (इंग्रजी) (१९२३) यहोवाने ‘समुद्राच्या तृतीयांशाबद्दल’ ठरविलेला प्रतिकूल न्यायदंड या ठरावामुळे घोषित केला गेला

[१४१ पानांवरील चित्रे]

“मंडळ्यांवरील आरोप.” (इंग्रजी) (१९२४) या पत्रिकेच्या विस्तारित वितरणामुळे ख्रिस्ती धर्मजगतातील “तारे” पडले आहेत अशी लोकांना सूचना केली गेली

[१४१ पानांवरील चित्रे]

“आशेचा संदेश” (इंग्रजी) (१९२५) या स्पष्ट व सरळ ठरावाचा उपयोग, ख्रिस्ती धर्मजगताचे तथाकथित प्रकाश देणारे खरे पाहता अंधकाराचे उगम आहेत हे उघड करण्यासाठी केला गेला