गोड व कडू संदेश
अध्याय २४
गोड व कडू संदेश
दृष्टांत ६—प्रकटीकरण १०:१–११:१९
विषय: लहान पुस्तकाचा दृष्टांत; मंदिराचे अनुभव; सातव्या कर्ण्याचा निनाद
पूर्णतेचा काळ: येशूचे १९१४ मध्ये सिंहासनाधिष्ठ होण्यापासून ते मोठ्या संकटापर्यंत
१, २. (अ) दुसऱ्या अनर्थाने कसा परिणाम केला पण हा अनर्थ संपल्याचे केव्हा जाहीर होणार? (ब) आता योहान कोणाला स्वर्गातून उतरताना बघतो?
दुसरा अनर्थ खूपच पीडादायक होता. त्याने ख्रिस्ती धर्मजगत व त्याच्या पुढाऱ्यांना, “एक तृतीयांश माणसे” यांना पीडा दिली व त्याद्वारे ते आध्यात्मिक दृष्टीने मृत झालेले आहेत असे उघड केले. (प्रकटीकरण ९:१५) यानंतर योहानाला याचे आश्चर्य वाटले असावे की, आता येणारा तिसरा अनर्थ काय आणील. पण थांबा! दुसरा अनर्थ अद्याप संपलेला नाही—आपण प्रकटीकरण ११:१४ मध्ये नमूद केलेल्या मुद्याला येईपर्यंत तो संपत नाही. याआधी योहान अशा घटना बघणार आहे ज्यामध्ये तो स्वतःच क्रियाशील भाग घेईल. ते भयप्रेरित दृश्याने सुरु होते:
२ “मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला; तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे, व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.”—प्रकटीकरण १०:१.
३. (अ) हा “बलवान देवदूत” कोण आहे? (ब) त्याच्या डोक्यावर असणारे मेघधनुष्य कशाची अर्थसूचकता देणारे आहे?
३ हा “बलवान देवदूत” कोण आहे? तो तर निश्चये गौरवी येशू ख्रिस्त आहे पण तो एका वेगळ्या भूमिकेत आहे. तो अदृश्यतेच्या मेघाने वेष्टित आहे. हे आपल्याला येशूबद्दलच्या योहानाच्या आधीच्या शब्दांची आठवण करून देते, जेथे म्हटले आहे: “पाहा, तो मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहील; ज्यांनी त्याला भोसकले तेहि पाहतील.” (प्रकटीकरण १:७; पडताळा मत्तय १७:२-५.) त्याच्या डोक्यावरील मेघधनुष्य, आपल्याला योहानाने आधी यहोवाच्या सिंहासनाचे जे दृश्य पाहिले त्याचे स्मरण देते, जेथे “पाचेसारखे मेघधनुष्य” होते. (प्रकटीकरण ४:३; पडताळा यहेज्केल १:२८.) ते मेघधनुष्य देवाच्या राजासनाभोवती असणारी प्रसन्नता व शांती सुचवीत होते. त्याचप्रमाणे देवदूताच्या डोक्यावरील मेघधनुष्य, त्याला शांतीचा खास संदेशवाहक, यहोवाचा पूर्वभाकीत “शांतीचा अधिपति” असल्याचे दाखवते.—यशया ९:६, ७.
४. (अ) त्या बलवान देवदूताचे तोंड “सूर्यासारखे” होते आणि (ब) त्याचे पाय “अग्निस्तंभासारखे” होते हे कशाला अनुलक्षून आहे?
४ या बलवान दूताचे तोंड “सूर्यासारखे” होते. आधी योहानाने येशूला ईश्वरी मंदिरात बघितले तेव्हा त्याला त्याची मुद्रा “परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी” दिसली. (प्रकटीकरण १:१६) येशू, “न्याय्यत्वाचा सूर्य” या अर्थाने यहोवाच्या नावाचे भय मानणाऱ्यांवर उदय पावतो व आपल्या पंखाद्वारे त्यांना बरे करतो. (मलाखी ४:२) या देवदूताचे केवळ तोंडच नव्हे तर पाय देखील गौरवी, “अग्निस्तंभासारखे” आहेत. त्याचा पवित्रा, ज्याला यहोवाने “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” दिला आहे, त्यासारखा आहे.—मत्तय २८:१८; प्रकटीकरण १:१४, १५.
५. योहान त्या बलवान देवदूताच्या हातात काय बघतो?
५ योहान पुढे पाहतो: “त्याच्या हाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला.” (प्रकटीकरण १०:२) आणखी एक पुस्तक? होय, पण यावेळी ते शिक्के मारुन बंद केलेले नव्हते. योहानाबरोबर आपल्यालाही लवकरच थरारक गोष्टी घडताना दिसतील. तरीपण प्रथम, काय घडणार त्याची दृश्य रचना आपल्याला दाखविण्यात येते.
६. (अ) येशूचे पाय भूमी व समुद्र यावर आहेत हे योग्य का आहे? (ब) स्तोत्र ८:५-८ ची संपूर्ण पूर्णता केव्हा झाली?
६ आपण येशूबद्दलच्या वर्णनाकडे परत वळू या. त्याचे अग्निमय पाय, पृथ्वी व समुद्रावर आहेत, जेथे तो आपला पूर्ण अधिकार राखून आहे. एका भविष्यवादित स्तोत्रात आधी जे सांगण्यात आले होते, अगदी त्याचप्रमाणे हे आहे: “तू [यहोवा] त्याला [येशू] देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे; त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेविले आहे. शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही सारी; तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी.” (स्तोत्र ८:५-८; तसेच इब्रीयांस २:५-९ हेही पहा.) या स्तोत्राची संपूर्ण पूर्णता १९१४ मध्ये, जेव्हा येशूला देवाच्या राज्याचा राजा या अर्थाने अधिष्ठित करण्यात आले व शेवटला काळ सुरु झाला तेव्हा झाली. अशाप्रकारे, योहान या दृष्टांतात जे बघतो त्याच्या पूर्णतेचा काळ त्या वर्षापासूनचा आहे.—स्तोत्र ११०:१-६; प्रेषितांची कृत्ये २:३४-३६; दानीएल १२:४.
सात गर्जना
७. बलवान देवदूत कोणत्या पद्धतीने ओरडतो आणि त्याच्या ओरडण्यामुळे काय सूचित होते?
७ योहान या बलवान देवदूताबद्दल जे चिंतन करीत होता ते त्या देवदूतानेच भंगविले: “सिंहगर्जनेप्रमाणे तो [देवदूत] मोठ्याने ओरडला आणि तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले.” (प्रकटीकरण १०:३) अशा या मोठ्या गर्जनेमुळे योहानाचे लक्ष नक्कीच आकर्षित झाले असावे व यामुळे येशू हा “यहूदा वंशाचा सिंह” असण्याला पुष्टी मिळाली. (प्रकटीकरण ५:५) यहोवाने देखील कधी ‘गर्जना केली’ होती याची योहानाला आठवण झाली असावी. यहोवाचे गर्जना करणे हे आध्यात्मिक इस्राएलाचे एकत्र करणे व त्याच्या नाशकारक ‘दिवसाला’ भविष्यवादितपणे अनुलक्षून होते. (होशेय ११:१०; योएल ३:१४, १६; आमोस १:२; ३:७, ८) यास्तव, या बलवान देवदूताची गर्जना देखील समुद्र व पृथ्वीसाठी मोठ्या घटना घडणार असल्याचे सुचवणारे आहे. त्याला सात गर्जना असे म्हणण्यात आले.
८. ‘सात गर्जनांचे शब्द’ काय आहेत?
८ योहानाने आधी यहोवाच्या राजासनामधून गर्जना होत असल्याचे ऐकले होते. (प्रकटीकरण ४:५) दाविदाच्या काळी खरोखरीच्या गर्जनेला “परमेश्वराचा [यहोवा, NW] ध्वनि” म्हणण्यात आले. (स्तोत्र २९:३) येशूच्या पृथ्वीवरील सेवकपणात यहोवाने आपल्या नावाचे गौरव करण्याची जाहीरपणे घोषणा केली तेव्हा ती पुष्कळांना गर्जनेसमान वाटली. (योहान १२:२८, २९) या कारणामुळे, ‘सात गर्जनांचे शब्द’ हे यहोवाने आपल्या उद्देशांचे केलेले वक्तव्य आहे हे ग्राह्य मानता येईल. या गर्जना “सात” होत्या ही गोष्ट, योहानाने जे काही ऐकले ते पूर्णरुपात होते याचे सूचक होते.
९. स्वर्गातून निघालेली वाणी काय आज्ञा देते?
९ पण ऐका! आणखी एक आवाज ऐकू येतो. त्या वाणीत अशी आज्ञा आहे जी योहानाला विचित्र वाटली असावी: “त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली: ‘सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको.’” (प्रकटीकरण १०:४) ते गर्जनारुपी संदेश ऐकून लिहून काढण्याची योहानाला मोठी उत्कंठा वाटली असावी. आजही योहान वर्ग यहोवाकडील ईश्वरी उद्देश प्रकट होण्याची उत्सुकतेने वाट बघत राहिला आहे. पण ते प्रकट होणे यहोवा आपल्या नियुक्त वेळी करणार.—लूक १२:४२; तसेच दानीएल १२:८, ९ हेही पहा.
पवित्र गूजाची पूर्णता
१०. बलवान देवदूत कोणाची शपथ घेतो, व तो काय जाहीर करतो?
१० मध्यंतराच्या काळात यहोवापाशी योहानाने करण्याजोगी आणखी एक नेमणूक आहे. सात गर्जना संपल्यावर तो बलवान देवदूत पुन्हा बोलू लागतो: “ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला, आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले: ‘आणखी अवकाश लागणार नाही.’” (प्रकटीकरण १०:५, ६) हा बलवान देवदूत कोणाची शपथ वाहतो? गौरवी येशू स्वतःची नव्हे तर, सर्वात उच्च असणारा अधिकारी, यहोवा, स्वर्ग व पृथ्वी यांचा अमर निर्माता याची शपथ घेतो. (यशया ४५:१२, १८) या शपथेद्वारे तो देवदूत योहानाला खात्रीपूर्वक सांगतो की, यापुढे देवाकडून आणखी विलंब होणार नाही.
११, १२. (अ) “आणखी अवकाश लागणार नाही,” याचा काय अर्थ होतो? (ब) कोणती गोष्ट पूर्णतेस जाणार?
११ येथे ज्या ग्रीक शब्दाचे “अवकाश” असे भाषांतर करण्यात आले आहे त्या ख्रोʹनोस चा खरा अर्थ आहे “वेळ.” यामुळे काहींना वाटले की, त्या देवदूताच्या घोषणेचे असे भाषांतर होण्यास हवे की, “आता आणखी वेळ नाही.” म्हणजे, आपल्याला माहीत असणारी वेळ संपेल. पण ख्रोʹनोस या शब्दाचा वापर येथे निश्चित उपपदाशिवाय करण्यात आला आहे. या कारणामुळे, ती सर्वसाधारण वेळ नसून तो “एक वेळ” किंवा “विशिष्ट काळ” दर्शवतो. दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर यहोवाकडून आणखी काळ (किंवा, अवकाश) घेतला जाणार नाही. ख्रोʹनोस पासून तयार झालेल्या क्रियापदाचे एक रुप इब्रीयांस १०:३७ येथे वापरण्यात आले आहे, जेथे पौल हबक्कूक २:३, ४ चे अवतरण घेऊन लिहितो: “जो येणार . . . तो . . . उशीर करणार नाही.”
१२ “आणखी अवकाश लागणार नाही,” हे आजच्या वृद्ध होत चाललेल्या योहान वर्गाला किती उत्तेजक शब्द आहेत! पण कशाबाबतीत अवकाश लागणार नाही? योहान आम्हाला कळवतो: “तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांस सुवार्ता सांगितली तदनुसार त्याचे [पवित्र, NW] गूज पूर्ण होईल.” (प्रकटीकरण १०:७) आपले पवित्र गूज आनंदी कळसास, गौरवी यशस्वीतेने पूर्ण करण्याची यहोवाची वेळ आली आहे!
१३. देवाचे पवित्र गूज काय आहे?
१३ हे पवित्र गूज काय आहे? यामध्ये प्रथम देवाने एदेनमध्ये अभिवचन दिलेल्या संतानाचा समावेश आहे, जे प्रधान अवस्थेत येशू ख्रिस्त असल्याचे सिद्ध झाले. (उत्पत्ती ३:१५; १ तीमथ्य ३:१६) हे संतान जेथून येणार त्या स्त्रीच्या ओळखीशी देखील याचा संबंध आहे. (यशया ५४:१; गलतीकर ४:२६-२८) पुढे यात संतानवर्गाच्या दुय्यम सदस्यांचा तसेच, प्रमुख संतान जे राज्य चालविते त्या राज्याचा समावेश होतो. (लूक ८:१०; इफिसकर ३:३-९; कलस्सैकर १:२६, २७; २:२; प्रकटीकरण १:५, ६) या अद्वितीय स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता अंतसमयात सर्व पृथ्वीवर गाजविली गेलीच पाहिजे.—मत्तय २४:१४.
१४. तिसऱ्या अनर्थाचा संबंध देवाच्या राज्यासोबत का जोडण्यात आला आहे?
१४ खरोखर, ही सर्वात उत्तम वार्ता आहे. तरीपण, प्रकटीकरण ११:१४, १५ मध्ये तिसऱ्या अनर्थाचा संबंध या राज्याशी दाखवण्यात आला आहे. ते का बरे? कारण, ज्यांना सैतानी व्यवस्थेचा भाग बनून राहणे मान्य आहे अशा मानवजातीतील लोकांना, देवाचे पवित्र गूज पूर्ण होण्याच्या बेताला आले आहे—म्हणजेच देवाचे मशीही राज्य आले आहे—ही सुवार्ता घोषित करणे ही अनर्थकारक बातमी आहे. (पडताळा २ करिंथकर २:१६.) याचा अर्थ हा की, त्यांना आवडणारी जागतिक व्यवस्था ही आता संपण्याच्या, नष्ट होण्याच्या बेताला आली आहे. सात गर्जनांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनिष्टसूचक तुफानाचे हे इशारे, यहोवाचा सूड घेण्याचा मोठा दिवस अधिक जवळ येत असता अधिक स्पष्ट व भरदार होत आहेत.—सफन्या १:१४-१८.
उघडलेले पुस्तक
१५. स्वर्गातून निघालेली वाणी व बलवान देवदूत योहानाला काय सांगतात आणि याचा योहानावर काय परिणाम होतो?
१५ सातव्या कर्ण्याचा निनाद होऊन देवाच्या पवित्र गूजाची समाप्ती होण्याची योहान वाट पाहून असता, त्याला आणखी एक नेमणूक मिळते: “स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली; ती म्हणाली: जा आणि ‘समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे.’ तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ‘ते लहानसे पुस्तक मला दे’ असे म्हटले. तो मला म्हणाला: ‘हे घे आणि खाऊन टाक. ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.’ तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले; ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले; तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले: ‘अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.’”—प्रकटीकरण १०:८-११.
१६. (अ) यहेज्केल संदेष्ट्याला योहानाप्रमाणेच कसा अनुभव आला होता? (ब) ते लहान पुस्तक योहानाच्या रुचिला मधुर का वाटले पण ते पचवण्यास कडू का होते?
१६ बाबेलच्या बंदिवासात यहेज्केल संदेष्ट्याला जो अनुभव आला होता, अगदी तसाच योहानाचा हा अनुभव आहे. यहेज्केलला देखील ग्रंथाचा एक पट खाण्यास सांगितले होते व तो त्याच्या तोंडात मधुर लागला. जेव्हा तो त्याच्या पोटात गेला तेव्हा बंडखोर इस्राएल घराण्यास कडू गोष्टी सांगण्यासाठी त्याला जबाबदार बनवले गेले. (यहेज्केल २:८–३:१५) याचप्रमाणे, गौरवी येशू ख्रिस्ताने योहानाला जे उघडलेले पुस्तक दिले तो देखील एक ईश्वरी संदेश आहे. योहानाला “अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे” यांना प्रचार करायचा होता. हे पुस्तक ईश्वरी उगमाकडून असल्यामुळे त्याचे सेवन करणे हे त्याच्यासाठी मधुर आहे. (पडताळा स्तोत्र ११९:१०३; यिर्मया १५:१५, १६.) पण ते पचवण्यास खूपच कडू आहे कारण, मागे यहेज्केलप्रमाणेच—येथेही बंडखोर लोकांसाठी कडू गोष्टींचे भाकीत आहे.—स्तोत्र १४५:२०.
१७. (अ) योहानाने संदेश “पुन्हा” कथन करावा असे त्याला कोण सांगतात आणि याचा काय अर्थ होतो? (ब) योहानाने पाहिलेले नाट्यमय वर्णन केव्हा पूर्ण होणार?
१७ योहानाला भविष्यकथन करायला सांगणारे हे अर्थातच, यहोवा देव व येशू ख्रिस्त आहेत. योहान आता जरी पात्म बेटावर कैदी होता तरी, प्रकटीकरणाच्या पुस्तकात आतापर्यंत लिखित केलेल्या माहितीच्या आधाराने त्याने लोक, राष्ट्रे, भाषा व राजे यांना साक्ष दिलेली आहे. तेव्हा “पुन्हा” असे म्हणण्याद्वारे योहानाने प्रकटीकरणात उरलेली माहिती लिखित करून ती प्रसिद्ध करावी हा उद्देश सूचित होतो. पण हे लक्षात घ्या की, योहान येथे वास्तविकपणे भविष्यवादित दृष्टांतात सहभागी झालेला आहे. तो जे लिहितो ते अर्थातच, १९१४ नंतर पूर्ण होणारे भविष्य आहे. तेव्हाच बलवान देवदूत भूमी व समुद्र यावर आपला पवित्रा घेऊन आहे. तर मग, या नाट्यमय पवित्र्याचा योहान वर्गासाठी आज काय अर्थ होत आहे?
आजचे लहानसे पुस्तक
१८. प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला योहान वर्गाने प्रकटीकरणाच्या पुस्तकासंबंधाने कोणता रस प्रकट केला होता?
१८ योहान जे काही बघतो ते प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला योहान वर्गाला आलेल्या अनुभवाशी सदृश्य आहे. तेव्हापर्यंत, यहोवाच्या उद्देशाबद्दल तसेच सात गर्जनेची पूर्णता याबद्दलची त्यांची समज अपूर्ण होती. तरीपण त्यांना प्रकटीकरणाबद्दल खूप रस होता आणि चार्ल्स टेझ रसेल यांनी आपल्या जीवनमानात प्रकटीकरणाच्या पुष्कळ भागाविषयी भाष्य केले होते. त्यांच्या १९१६ मधील मृत्युनंतर त्यांचे लिखाण गोळा करण्यात येऊन त्यांचे संपलेले गूज (इंग्रजी) हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. तथापि, हे पुस्तक प्रकटीकरणाच्या उलगड्यासंबंधाने नंतर असमाधानकारक वाटू लागले. ख्रिस्ताच्या बंधूतील शेषांना प्रेरित अहवालाच्या अचूक समजप्राप्तीसाठी दृष्टांतांची पूर्णता सुरु होण्याच्या वेळेपर्यंत थांबून राहावे लागले.
१९. (अ) सात गर्जनांच्या वाणी पूर्णपणे प्रसिद्ध होण्याआधीच यहोवा देवाने योहान वर्गाचा कसा उपयोग केला? (ब) योहान वर्गाला उघडलेले लहानसे पुस्तक कधी देण्यात आले आणि याचा त्यांच्यासाठी काय अर्थ होत होता?
१९ तथापि, योहानाप्रमाणेच यांचाही यहोवाने, सात गर्जनांची पूर्णता प्रसिद्ध होण्याआधीच वापर करण्याचे सुरु केले. ते १९१४ च्या आधी ४० वर्षे मोठ्या परिश्रमाने प्रचार करीत होते आणि पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी क्रियाशील राहण्यासाठी मोठी लढत दिली. धनी आल्यावर आपल्या घराण्यास यथाकाळी अन्न पुरविणाऱ्या जागृत दासाप्रमाणे असल्याचे त्यांनी सिद्ध केले. (मत्तय २४:४५-४७) यामुळे, त्यांना १९१९ मध्ये उघडलेले लहानसे पुस्तक दिले गेले—हा मानवजातीस प्रचार करण्याजोगा उघडा संदेश होता. यहेज्केलप्रमाणेच यांच्यापाशी देखील, देवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्या पण प्रत्यक्षात ती न करणाऱ्या ख्रिस्ती धर्मजगत या अविश्वासू संस्थेकरता संदेश होता. योहानासारखेच यांनीही “लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे” यांच्याबद्दल काही अधिक प्रचार करायचा होता.
२०. योहानाने ते पुस्तक खाणे हे कशाला चित्रित करीत होते?
२० योहानाने ते पुस्तक घेऊन खाण्याने, येशूचे बांधव या नेमणूकीचा स्वीकार करतात हे चित्रित केले. ते पुस्तक त्यांचा एक भाग बनले ते असे की, देवाच्या या प्रेरित वचनाच्या भागाशी त्यांची ओळख मिळाली व ते त्याजकडून पोषण मिळवू लागले. पण त्यांनी ज्याचा प्रचार करायचा होता ते मानवजातीतील पुष्कळांना बेचव वाटणारे असे यहोवाचे न्यायदंड होते. खरे म्हणजे यात प्रकटीकरणाच्या ८ व्या अध्यायातील पीडांचे भाकीत होते. तथापि, ते न्यायदंड जाणून घेणे तसेच, त्यांची घोषणा करण्यासाठी यहोवा पुन्हा आपला वापर करीत आहे हे समजणे, प्रांजळ ख्रिश्चनांसाठी मधुर होते.—स्तोत्र १९:९, १०.
२१. (अ) त्या लहानशा पुस्तकाचा संदेश मोठ्या लोकसमुदायासाठी देखील कसा मधुर बनला? (ब) ही सुवार्ता शेरडासमान लोकांसाठी का वाईट वार्ता आहे?
२१ काही काळातच या पुस्तकातील संदेश, ख्रिस्ती धर्मजगतात केल्या जाणाऱ्या अमंगळ गोष्टीमुळे दुःख व विलाप करणाऱ्या “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी[चा] . . . मोठा लोकसमुदाय” यालाही मधुर वाटला. (प्रकटीकरण ७:९; यहेज्केल ९:४) हे देखील गोड व रुचिकर शब्दांद्वारे मेंढरासमान ख्रिश्चनांसाठी यहोवाने केलेल्या अद्भुत तरतूदीचे वर्णन करून आवेशाने सुवार्तेची घोषणा करतात. (स्तोत्र ३७:११, २९; कलस्सैकर ४:६) पण शेरडासमान लोकांसाठी ती वाईट वार्ता आहे. ते का? कारण, याचा अर्थ त्यांनी ज्या व्यवस्थीकरणावर विश्वास ठेवला आहे व ज्याने त्यांना क्षणिक समाधानही दिले असेल ते आता गेलेच पाहिजे. त्यांच्यासाठी सुवार्ता नाशाचे वक्तव्य करते.—मत्तय २५:३१-३४, ४१, ४६; पडताळा अनुवाद २८:१५; २ करिंथकर २:१५, १६.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६० पानांवरील चित्रे]
योहान वर्ग व त्यांचे सहकारी सर्व मानवजातीला गोड व कडू संदेश घोषित करतात