व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”

“जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”

अध्याय १२

“जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”

फिलदेल्फिया

१. येशूचा सहावा संदेश कोणत्या शहरातील मंडळीस देण्यात आला आणि त्या शहराच्या नावाचा काय अर्थ होतो?

 बंधू प्रीती—केवढा हा इष्ट गुण! फिलदेल्फिया मंडळीला उद्देशून येशूने आपला सहावा संदेश दिला तेव्हा त्याच्या मनात हेच असावे, कारण त्या मंडळीच्या नावाचाही “बंधूप्रीती” असाच अर्थ होतो. ६० पेक्षा अधिक वर्षांपूर्वीचा तो प्रसंग वयोवृद्ध योहानाच्या अद्यापही स्मरणात असावा, जेव्हा पेत्राने येशूला तीन वेळा आग्रहाने म्हटले की, त्याला आपल्या प्रभुसाठी उबदार कळवळा आहे. (योहान २१:१५-१७) मग, फिलदेल्फिया मंडळीतील ख्रिस्तीजन आपल्या परीने ही बंधूप्रीती दाखवीत आहेत का? होय, ते दाखवीत आहेत!

२. फिलदेल्फिया हे कोणत्या प्रकारचे शहर होते, तेथे कोणत्या प्रकारची मंडळी वसलेली होती आणि या मंडळीच्या दूताला येशू काय म्हणतो?

सार्दीसच्या (सध्याचे अलसेहीर हे तुर्की शहर) आग्नेय दिशेच्या साधारण ३० मैलावर, योहानाच्या काळी फिलदेल्फिया हे समृद्ध शहर वसलेले होते. तथापि, तेथील ख्रिस्ती मंडळीची भरभराट लक्षणीय होती. बहुधा सार्दीसच्या मार्गाने प्रवास करीत जो फिरता सेवक त्यांच्याकडे आला त्याचे केवढे आनंदाने त्यांनी स्वागत केले असावे! त्याने आपल्यासोबत आणलेला संदेश त्यांना भारावून टाकणारा आहे. पण, हा संदेश सुरवातीला त्याच्या नामांकित प्रेषकाच्या अधिकाराचा उल्लेख करतो. तो म्हणतो: “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही: जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही, आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही,’ तो असे म्हणतो.”—प्रकटीकरण ३:७.

३. येशूला “पवित्र” असे संबोधणे का उचित आहे, तसेच त्याला “सत्य” का म्हणता येते?

योहानाने पेत्राला, येशू ख्रिस्त मनुष्यप्रकृतीत असताना त्याच्याबद्दल असे म्हणताना ऐकले होते: “सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्‍वास ठेवला आहे व ओळखिले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहां.” (योहान ६:६८, ६९) यहोवा स्वतः पावित्र्याच्या बाबतीत सर्वांगपूर्ण आहे, त्यामुळे त्याचा एकुलता एक पुत्रसुद्धा “पवित्र” असलाच पाहिजे. (प्रकटीकरण ४:८) येशू “सत्य” देखील आहे. येथे वापरण्यात आलेला ग्रीक शब्द (अ․ले․थि․नॉसʹ) अस्सलतेची सूचकता देतो. या अर्थाने, येशू खरा प्रकाश व स्वर्गातून आलेली खरी भाकर आहे. (योहान १:९; ६:३२) तो खरा द्राक्षवेल आहे. (योहान १५:१) येशू विश्‍वसनीय दृष्टिने देखील खरा आहे. तो नेहमीच खरे बोलतो. (पहा योहान ८:१४, १७, २६.) हा देवाचा पुत्र खरेपणाने राजा व न्यायाधीश या नात्याने सेवा करण्याच्या पात्रतेचा आहे.—प्रकटीकरण १९:११, १६.

“दाविदाची किल्ली”

४, ५. “दाविदाची किल्ली” कोणत्या कराराशी संबंधित होती?

येशूकडे “दाविदाची किल्ली” आहे. तिचा वापर करून ‘तो उघडतो आणि (ते) कोणी बंद करणार नाही, आणि . . . बंद करतो (ते) कोणी उघडीत नाही.’ तर ही “दाविदाची किल्ली” काय आहे?

इस्राएलांचा राजा दावीद याच्याबरोबर यहोवाने सार्वकालिक राज्याचा करार केला होता. (स्तोत्र ८९:१-४, ३४-३७) दाविदाच्या राजघराण्याने यहोवाच्या सिंहासनावर बसून यरुशलेमेत सा.यु.पू. १०७० ते ६०७ पर्यंत राज्य केले; पण मग त्याने दुष्टतेकडे धाव घेतल्यामुळे त्या राज्यावर देवाने न्यायदंड बजावला. अशाप्रकारे यहोवाने यहेज्केल २१:२७ मध्ये दिलेल्या भविष्यवादाच्या पूर्णतेस आरंभ केला: “मी त्याचा [पृथ्वीवरील यरुशलेम] विध्वंस करीन, करीनच करीन; ही स्थिती अशीच राहावयाची नाही. ज्याचा [कायदेशीर, NW] हक्क आहे तो आल्यावर त्यास मी [दाविदाच्या घराण्यातील राजदंडाची] सत्ता देईन.”

६, ७. “ज्याचा [कायदेशीर, NW] हक्क आहे तो” केव्हा व कसा सामोरा येणार होता?

“ज्याचा [कायदेशीर, NW] हक्क आहे तो” केव्हा व कसा सामोरा येणार होता? त्याला दाविदाच्या राज्याचा राजदंड कसा दिला जाणार होता?

याच्या साधारण ६०० वर्षांनी राजा दाविदाच्या वंशातून आलेली यहूदी कुमारी मरीया पवित्र आत्म्याने गर्भवती झाली. देवाने आपला देवदूत गब्रीएल याला पाठवून मरीयेला कळविले की, तिला एक पुत्र होईल ज्याचे नाव तिने येशू ठेवावे. गब्रीएलने पुढे म्हटले: “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभु देव [यहोवा, NW] त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील; व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”—लूक १:३१-३३.

८. दाविदाचे राज्यपद वारशाने मिळविण्यासाठी येशू कसा पात्र ठरला?

सा.यु. २९ मध्ये जेव्हा येशूचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला व त्याचा पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला तेव्हा तो दाविदाच्या वंशातील राजा असा नियुक्‍त झाला. देवाच्या राज्याचा सुवार्तेचा प्रसार करण्यात त्याने उदाहरणीय आवेश दाखविला आणि आपल्या शिष्यांना देखील त्याचप्रमाणे प्रचार करण्याची आज्ञा दिली. (मत्तय ४:२३; १०:७, ११) येशूने स्वतःला वधस्तंभावरील मरणापर्यंत लीन केले व त्याद्वारे दाविदाच्या राज्यपदाचा वारसदार होण्याची पूर्ण लायकी असल्याचे त्याने सिद्ध केले. यहोवाने येशूचे अमर आत्मा असे पुनरुत्थान केले व त्याने त्याला स्वर्गात उच्चपदी आपल्या उजव्या हाती बसविले. येथे त्याला दाविदाच्या राज्याचा सर्व हक्क वारशाने मिळाला. मग, लवकरच येशू नियुक्‍त वेळी आपल्या अधिकाराचा उपयोग करुन ‘आपल्या शत्रूंवर प्रभुत्व करणार’ होता.—स्तोत्र ११०:१, २; फिलिप्पैकर २:८, ९; इब्रीयांस १०:१३, १४.

९. येशू दाविदाच्या किल्लीचा वापर उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी कसा करतो?

मध्यंतरात, येशू दाविदाच्या किल्लीचा उपयोग करून देवाच्या राज्याशी संबंधीत असणाऱ्‍या सुसंध्या तसेच हक्क उघडणार होता. आता यहोवा, येशूद्वारे पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून” ठेवणार होता. (कलस्सैकर १:१३, १४) जे बेईमान असल्याचे दिसतील अशांना त्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी या किल्लीचा उपयोग येशू करणार होता. (२ तीमथ्य २:१२, १३) वस्तुतः, दाविदाच्या राज्याच्या या कायमच्या वारशाला यहोवाचे पाठबळ असल्यामुळे ही कार्ये पूर्ण करण्यापासून कोणा प्राणीमात्राला अडथळा निर्माण करता येऊ शकत नव्हता.—पडताळा मत्तय २८:१८-२०.

१०. फिलदेल्फिया येथील मंडळीला येशू कोणते उत्तेजन देतो?

१० अशा या अधिकारयुक्‍त उगमाकडून येशूचे शब्द येत असल्यामुळे ते फिलदेल्फिया येथील ख्रिश्‍चनांना खासपणे सांत्वन देणारे ठरले असावेत! तो त्यांची प्रशंसा करून म्हणतो: “तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत—पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही—तुला शक्‍ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही.” (प्रकटीकरण ३:८) ती मंडळी क्रियाशील होती व तिजपुढे दार उघडलेले होते—निःसंशये, ते उपाध्यपणाच्या सेवेचे दार होते. (पडताळा १ करिंथकर १६:९; २ करिंथकर २:१२.) यासाठी, येशू मंडळीला प्रचाराच्या संधीचा पूर्णपणे फायदा घेण्यास सांगतो. त्यांनी सहन केले व दाखवून दिले की, यहोवाच्या सेवेत अधिक “कृत्ये” करण्यासाठी देवाच्या आत्म्याकडून त्यांच्याठायी भरपूर सामर्थ्य आहे. (२ करिंथकर १२:१०; जखऱ्‍या ४:६) त्यांनी येशूची आज्ञा पाळली व ख्रिस्ताचा, आपल्या शब्दांनी किंवा कृतीने नकार केला नाही.

“ते . . . तुझ्या पायांजवळ नमन करतील”

११. येशू ख्रिश्‍चनांना कोणत्या आशीर्वादाचे अभिवचन देतो आणि हे कसे घडून येणार होते?

११ या कारणास्तव, येशू त्यांना फलप्राप्तीचे अभिवचन देतो. तो म्हणतो: “पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहूदी म्हणवितात, पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करितील’ व ‘मी तुझ्यावर प्रीति केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.” (प्रकटीकरण ३:९) या मंडळीला, कदाचित स्मुर्णाप्रमाणे स्थानिक यहूद्यांसोबत सामना करावा लागला असेल. येशू यांना ‘सैतानाची सभा’ असे संबोधितो. तथापि, यापैकीच्या काही यहुद्यांना हे समजून येऊ लागेल की, येशूबद्दलचा जो प्रचार ख्रिस्ती लोक करीत आहेत तो सत्य आहे. ते “नमन करितील” याचा अर्थ, पौलाने १ करिंथकर १४:२४, २५ मध्ये जे काही म्हटले आहे त्या पद्धतीने असेल आणि ते खरे पश्‍चात्तापी होऊन ख्रिस्ती बनतील व त्यांच्याठायी येशूने आपल्या अनुयायांसाठी आपला प्राण देऊन जी थोर प्रीती दाखविली तिजबद्दल पूर्ण रसिकता वाढवतील.—योहान १५:१२, १३.

१२. फिलदेल्फिया येथील यहूदी सभास्थानातील सदस्यांना हे जाणून का आश्‍चर्य होणार होते की, त्यांच्यापैकी काही स्थानिक ख्रिस्ती समाजापुढे “नमन करितील”?

१२ फिलदेल्फिया येथील यहूदी सभास्थानातील सदस्य, हे जाणून घेण्यात बहुधा आश्‍चर्यचकित झाले असणार की, त्यांच्यापैकी काही स्थानिक ख्रिस्ती समाजापुढे “नमन करितील.” खरे म्हणजे या मंडळीत अनेक यहुद्देत्तर लोक असल्यामुळे यहुद्यांना वाटले असावे की, अगदी उलटेच घडणार. का बरे? कारण यशयाने हे पूर्वभाकीत केले होते की, “[विदेशी] राजे बापासमान तुझे [इस्राएल लोकांचे] पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील; ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करितील.” (यशया ४९:२३; ४५:१४; ६०:१४) याच सुरात, जखऱ्‍यालाही हे लिहिण्यास प्रेरित केले होते की, “त्या दिवसात सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा [विदेशी] जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील: ‘आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.’” (जखऱ्‍या ८:२३) होय, यहुद्देत्तर किंवा विदेशी लोकांनी यहूद्यांपुढे नमन करायचे होते, याच्या उलट नाही!

१३. प्राचीन इस्राएलांना संबोधण्यात आलेल्या भविष्यवादाची पूर्णता कोणते यहूदी अनुभवणार होते?

१३ ते भविष्यवाद देवाच्या निवडलेल्या राष्ट्राला अनुलक्षून होते. ते उच्चारण्यात आले त्या वेळी दैहिक इस्राएल ते सन्माननीय स्थान बाळगून होते. पण जेव्हा यहूदी राष्ट्राने मशीहाचा धिक्कार केला तेव्हा यहोवाने त्यांना टाकून दिले. (मत्तय १५:३-९; २१:४२, ४३; लूक १२:३२; योहान १:१०, ११) सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्ट प्रसंगी त्याने त्यांच्याऐवजी देवाचे खरे इस्राएल, म्हणजेच ख्रिस्ती मंडळीस निवडले. त्याचे सदस्य आध्यात्मिक इस्राएल असून त्यांची अंतःकरणाची खरी सुंता झालेली आहे. (प्रे. कृत्ये २:१-४, ४१, ४२; रोमकर २:२८, २९; गलतीकर ६:१६) या कारणास्तव, केवळ येशूवर, मशीहा या नात्याने विश्‍वास ठेवण्याद्वारेच त्या दैहिक इस्राएलांच्या सदस्यांना यहोवासोबत आपले संमतीकारक नातेसंबंध परत मिळवता येऊ शकत होते. (मत्तय २३:३७-३९) हेच, फिलदेल्फियामधील काही विशिष्टांच्या बाबत प्रत्यक्षात घडून येणार होते हे उघड आहे. *

१४. आधुनिक काळात यशया ४९:२३ व जखऱ्‍या ८:२३ ची कशी अभूतपूर्व पूर्णता झाली?

१४ आधुनिक काळी यशया ४९:२३ व जखऱ्‍या ८:२३ ची अत्यंत अभूतपूर्व पूर्णता झाली आहे. योहान वर्गाच्या प्रचारकार्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी राज्य सेवेसाठी उघड्या दारातून प्रवेश केला. * यापैकीचे बहुतेक, जेथे ते आध्यात्मिक इस्राएल असल्याचा खोटा दावा केला जातो त्या ख्रिस्ती धर्मजगतातून आले आहेत. (पडताळा रोमकर ९:६.) हे, मोठा लोकसमुदाय या नात्याने येशूच्या खंडणी रक्‍तावर आपला विश्‍वास प्रकट करुन आपले झगे धुऊन शुभ्र करतात. (प्रकटीकरण ७:९, १०, १४) ख्रिस्ताच्या राज्याच्या अधिपत्याचे पालन करून ते, पृथ्वीवर त्याचे आशीर्वाद मिळविण्याची आशा बाळगून आहेत. ते येशूच्या अभिषिक्‍त बांधवांकडे येऊन त्यांना आध्यात्मिक अर्थाने ‘नमन करतात,’ कारण ‘देव त्यांच्यासोबत आहे असे त्यांनी ऐकले आहे.’ ते या अभिषिक्‍तांची सेवा करतात आणि ते स्वतः जागतिक बंधुत्वाच्या सहवासात संघटित होतात.—मत्तय २५:३४-४०; १ पेत्र ५:९.

“परीक्षाप्रसंग”

१५. (अ) येशूने फिलदेल्फियातील ख्रिश्‍चनांना कोणते अभिवचन दिले आणि त्यांना काय करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले? (ब) ते ख्रिस्ती कोणता “मुगूट” मिळविण्याची आशा धरुन होते?

१५ येशू पुढे म्हणतो: “धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनहि मी तुला राखीन. मी लवकर येतो; तुझा मुगूट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरुन राहा.” (प्रकटीकरण ३:१०, ११) योहानाच्या दिवसातील ख्रिस्ती (ज्याची सुरवात १९१४ मध्ये होते त्या) प्रभुच्या दिवसापर्यंत जरी बचावून राहणार नव्हते तरी देखील येशू येणार होता या त्यांच्या आत्मविश्‍वासाने, प्रचार करीत राहण्यामध्ये त्यांना सामर्थ्य प्राप्त होणार होते. (प्रकटीकरण १:१०; २ तीमथ्य ४:२) सार्वकालिक जीवनाचा “मुगूट” किंवा बक्षीस त्यांच्यासाठी स्वर्गात वाट पाहून होते. (याकोब १:१२; प्रकटीकरण ११:१८) ते मरणापर्यंत विश्‍वासू राहिल्यास ते बक्षीस कोणीही त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नव्हते.—प्रकटीकरण २:१०.

१६, १७. (अ) “जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे” तो कोणता आहे? (ब) “परीक्षाप्रसंग” याच्या आरंभाला अभिषिक्‍त शेषांची कशी स्थिती होती?

१६ तथापि, तो “परीक्षाप्रसंग” कोणता होता? त्या ख्रिश्‍चनांना रोमी साम्राज्याकडून भयंकर छळाच्या आणखी एका तडाख्याला तोंड द्यायचे होते यात काही संशय नाही. * तरीपण, त्या परीक्षाप्रसंगाची मोठी पूर्णता ही सरतेशेवटी प्रभूच्या दिवसात १९१८ पासून पुढे होत गेली, ज्या काळात चाळणे व न्याय करणे होत आहे. ही परीक्षा, एखादा देवाच्या प्रस्थापित राज्याच्या बाजूने आहे की, सैतानाच्या बाजूने आहे हे ठरविण्यासाठी घेण्यात येत आहे. ती खूपच थोडा वेळ, निव्वळ ‘प्रसंगापुरतीच’ किंवा ‘तासाभरापुरती’ आहे. पण ती अद्याप संपली नाही. ती संपेपर्यंत आपण ‘परीक्षाप्रसंगात’ आहोत हे कधीही विसरता कामा नये.—लूक २१:३४-३६.

१७ फिलदेल्फिया मंडळीप्रमाणे कट्टर असणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या योहान वर्गास १९१८ मध्ये आधुनिक काळातील ‘सैतानाच्या सभेकडून’ बराच रोष पत्करावा लागला. आध्यात्मिक यहूदी असल्याचा दावा करणाऱ्‍या ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मपुढाऱ्‍यांनी राजकीय शासनकर्त्यांना, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना दाबून टाकण्यासाठी युक्‍तिबाजपणे चिथाविले. तरीदेखील, ख्रिश्‍चनांनी ‘येशूच्या धीराचे वचन राखले,’ त्यामुळे ते, ‘त्यांची शक्‍ती थोडी होती’ तरी आध्यात्मिक मदतीने बचावले व त्यांच्यापुढे उघडून ठेवण्यात आलेल्या दाराने आत शिरू शकले. ते कोणत्या अर्थाने?

‘उघडलेले दार’

१८. येशूने १९१९ मध्ये कोणती नियुक्‍ती केली आणि ज्यांची नेमणूक झाली ते हिज्कियाच्या विश्‍वासू कारभाऱ्‍याप्रमाणे कसे बनले?

१८ येशूने त्याचे अभिवचन १९१९ मध्ये पूर्ण केले आणि खऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या त्या छोट्या गटास “विश्‍वासू व बुद्धिमान दास” अशी मान्यता दिली. (मत्तय २४:४५-४७) हिज्किया राजाच्या काळी विश्‍वासू कारभारी एल्याकीमने अनुभवला त्यासारख्या हक्कात यांनी प्रवेश मिळवला. * यहोवाने एल्याकीमबद्दल म्हटले: “दावीदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवीन; त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही; त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही.” दाविदाचा बादशाही पुत्र हिज्किया याच्यासाठी एल्याकीमने मोठी जबाबदारी खांद्यावर वाहिली. तसेच, आज, अभिषिक्‍त योहान वर्गाच्या खांद्यावर “दाविदाच्या घराण्याची किल्ली” आहे, ते या अर्थी की, यांना मशीही राज्याची पृथ्वीवरील आस्था सोपवून देण्यात आली आहे. यहोवाने आपल्या या सेवकांच्या थोड्या शक्‍तीला विपुल बळ देऊन बळकटी आणली व त्यांना प्रचंड गोलार्धव्याप्त साक्षीच्या कामासाठी तयार केले.—यशया २२:२०, २२; ४०:२९.

१९. येशूने १९१९ मध्ये दिलेल्या जबाबदारीस योहान वर्गाने कसे हाताळले आणि याचा काय परिणाम झाला?

१९ अभिषिक्‍त शेषांनी १९१९ पासून पुढे येशूच्या उदाहरणास अनुसरुन, राज्याची सुवार्ता सर्वत्र घोषित करण्यात एक जोरदार मोहीम हाती घेतली. (मत्तय ४:१७; रोमकर १०:१८) याचा परिणाम, सैतानाची आधुनिक सभा, ख्रिस्ती धर्मजगत, याच्या काही जणांनी अभिषिक्‍त शेषांकडे येऊन पश्‍चात्ताप केला व ‘नमन केले,’ म्हणजे दासाच्या अधिकारास मान्यता दाखवली. हे देखील योहान वर्गातील वृद्धांसोबत यहोवाची एकमतात सेवा करू लागले. हे, येशूच्या अभिषिक्‍त बांधवांना एकत्रित करून त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत चालले. यानंतर, ‘सर्व राष्ट्रे . . . यातील मोठा लोकसमुदाय’ अभिषिक्‍त दासाला ‘नमन करण्यास’ आला. (प्रकटीकरण ७:३, ४, ९) हा दास व मोठा लोकसमुदाय आता यहोवाच्या साक्षीदारांचा एक कळप या नात्याने एकत्रितपणे सेवा करीत आहे.

२०. यहोवाच्या साक्षीदारांनी आज खासपणे विश्‍वासात दृढ व देवाच्या सेवेत क्रियाशील का असले पाहिजे?

२० फिलदेल्फिया येथील ख्रिश्‍चनांप्रमाणे खरोखरच्या बंधुप्रीतीच्या बंधनात संघटित झालेले आजचे यहोवाचे साक्षीदार प्रचार करण्याचे त्यांचे काम तातडीने केले पाहिजे याची गुणग्राहकता बाळगतात. लवकरच मोठे संकट सैतानाच्या दुष्ट जगावर पडदा टाकणार आहे. त्या वेळी आपण प्रत्येकजण विश्‍वासात बळकट, देवाच्या सेवेत क्रियाशील असणारे असे आढळो; म्हणजे यहोवाच्या जीवनी पुस्तकातून आपले नाव काढून टाकले जाणार नाही. (प्रकटीकरण ७:१४) येशूने फिलदेल्फिया मंडळीस दिलेला सल्ला आपण गांभिर्याने घेऊ म्हणजे आपल्याला आपल्या सेवेच्या हक्काला दृढ धरून राहता येईल आणि सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळवता येईल.

विजेत्यांना मिळणारे आशीर्वाद

२१. आज अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी ‘येशूच्या धीराविषयीचे वचन कसे राखले आहे’ आणि त्यांच्यासाठी कोणते प्रतिफळ वाट पाहून आहे?

२१ योहान वर्गाने येशूचे ‘धीराविषयीचे वचन राखले आहे,’ याचा अर्थ त्यांनी त्याचे उदाहरण अनुसरले व सहनशीलता बाळगली. (इब्रीयांस १२:२, ३; १ पेत्र २:२१) यामुळे, येशूने फिलदेल्फिया मंडळीला उद्देशून पुढे म्हटलेल्या शब्दांद्वारे त्यांना मोठे उत्तेजन मिळू शकले. तो म्हणाला: “जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीहि बाहेर जाणार नाही.”—प्रकटीकरण ३:१२अ.

२२. (अ) येशूच्या देवाचे मंदिर हे काय आहे? (ब) विजय मिळवणारे अभिषिक्‍त ख्रिस्ती या मंदिरात खांब कसे बनतात?

२२ यहोवाच्या मंदिरातील एक खांब होणे हा केवढा विशेष हक्क आहे! प्राचीन यरुशलेमेत प्रत्यक्ष मंदिर हे यहोवाच्या भक्‍तीचे केंद्रस्थान होते. मंदिरामध्ये प्रमुख याजक यज्ञ करण्यात आलेल्या प्राण्यांचे रक्‍त वर्षातून एकदाच ‘परमपवित्रस्थानात’ यहोवाच्या उपस्थितीचे चिन्ह दाखवणाऱ्‍या अद्‌भुत प्रकाशासमोर सादर करीत असे. (इब्रीयांस ९:१-७) येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी आणखी एक मंदिर, यहोवाच्या भक्‍तीसाठी एक आध्यात्मिक मंदिररचना अस्तित्वात आली. या मंदिराचे परमपवित्र स्थान स्वर्गात आहे. तेथेच येशू “देवासमोर” उभा राहिला. (इब्रीयांस ९:२४) येशू प्रमुख याजक आहे आणि पापांची क्षमा होण्यासाठी केवळ एकच यज्ञार्पण देण्यात आले आहे व ते म्हणजे, परिपूर्ण मनुष्य येशू याचे ओतण्यात आलेले रक्‍त. (इब्रीयांस ७:२६, २७; ९:२५-२८; १०:१-५, १२-१४) अभिषिक्‍त ख्रिश्‍चन विश्‍वासू असेपर्यंत, या पृथ्वीवर या मंदिराच्या अंगणात सहयाजक म्हणून सेवा करतात. (१ पेत्र २:९) पण एकदा विजय मिळवल्यावर ते देखील स्वर्गातील परमपवित्र स्थानी प्रवेश मिळवतात आणि भक्‍तीसाठी असणाऱ्‍या मंदिर व्यवस्थेतील खांबाप्रमाणे अचल आधार बनतात. (इब्रीयांस १०:१९; प्रकटीकरण २०:६) येथून त्यांना ‘कधी बाहेर जाण्याचा’ धोका संभवत नाही.

२३. (अ) विजेत्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी येशू, पुढे कोणते अभिवचन देतो? (ब) ख्रिस्ती विजेत्यांवर यहोवाचे तसेच नव्या यरुशलेमेचे नाव लिहिल्यामुळे काय परिणाम होतो?

२३ येशू पुढे म्हणतो: “त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.” (प्रकटीकरण ३:१२ब) होय, या विजेत्यांनी त्यांचा देव व येशूचा देव यहोवा याचे नाव त्यांच्यावर लिहिले आहे. हे अगदी स्पष्ट दाखवते की, यहोवा आणि येशू हे एका त्रैक्य देवाचे किंवा त्रैक्याचे दोन भाग नसून या दोन वेगवेगळ्या व्यक्‍ती आहेत. (योहान १४:२८; २०:१७) हे अभिषिक्‍त यहोवाच्या मालकीचे आहेत हे सर्व निर्मितीला दिसून आलेच पाहिजे. ते त्याचे साक्षीदार आहेत. त्यांनी आपणावर नवे यरुशलेम, स्वर्गीय नगर याचेही नाव लिहिले आहे. ते स्वर्गातून उतरत असल्याचे दाखवले आहे ते या अर्थी की, त्याची परोपकारी सत्ता सर्व विश्‍वासू मानवजातीपर्यंत पोहंचते. (प्रकटीकरण २१:९-१४) यामुळे पृथ्वीवरील सर्व ख्रिस्ती मेंढरांना हे समजेल की, हे अभिषिक्‍त विजेते देवाचे राज्य, स्वर्गीय यरुशलेम याचे नागरिक आहेत.—स्तोत्र ८७:५, ६; मत्तय २५:३३, ३४; फिलिप्पैकर ३:२०; इब्रीयांस १२:२२.

२४. येशूचे नवे नाव कशाचे प्रतिनिधीत्व करते आणि विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांवर ते कसे लिहिले जाते?

२४ शेवटी, अभिषिक्‍त विजेत्यांनी आपणावर येशूचे देखील नवे नाव लिहिले आहे. हे येशूचे नवे स्थान व यहोवाने त्याला बहाल केलेल्या अप्रतिम हक्कांची सूचकता दर्शविते. (फिलिप्पैकर २:९-११; प्रकटीकरण १९:१२) ते नाव इतर कोणाला कळत नाही; ते या अर्थी की, अशा प्रकारचे अनुभव इतर कोणालाही नाहीत किंवा ते हक्क दुसऱ्‍या कोणालाही सोपवून दिले नाहीत. तरीपण, जेव्हा येशू आपले नाव त्याच्या विश्‍वासू बांधवांवर लिहितो तेव्हा ते त्या स्वर्गीय क्षेत्रात त्याच्या सोबतच्या अत्यंत जवळच्या नातेसंबंधात येतात आणि त्याच्या हक्कात देखील सहभागी होतात. (लूक २२:२९, ३०) याच कारणास्तव, येशू आपल्या संदेशाची समाप्ती या सल्ल्याची पुनरावृत्ती करून करतो ते आश्‍चर्याचे नाही की, “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको.”—प्रकटीकरण ३:१३.

२५. येशूने फिलदेल्फिया मंडळीला दिलेल्या सल्ल्यामागील तत्त्वाचे अनुकरण प्रत्येक ख्रिश्‍चनाला आज कसे करता येणे शक्य आहे?

२५ फिलदेल्फिया येथील विश्‍वासू ख्रिश्‍चनांसाठी तो संदेश किती मोठे उत्तेजन देणारा ठरला असावा! तोच आज प्रभूच्या दिवसातील योहान वर्गाकरिता खचितच जोरदार धडा देतो. परंतु त्याची तत्त्वे कोणी अभिषिक्‍त असो की, दुसरी मेंढरे यापैकीचा असो, या सर्वांना महत्त्वाची आहेत. (योहान १०:१६) फिलदेल्फियामधील ख्रिश्‍चनांनी जशी राज्याची फलप्राप्ती आणली तशीच आम्ही प्रत्येकाने निपजविली पाहिजे. आम्हा सर्वांपाशी थोडी तरी शक्‍ती आहे. आम्हा सर्वांना यहोवाच्या सेवेत काही ना काही करता येणे शक्य आहे. तर या शक्‍तीचा आपण वापर करू या! राज्याच्या वाढीव हक्कासंबंधाने बघता, आम्हाला ज्या उघड्या दाराने प्रवेश करता येणे शक्य आहे तेथून शिरण्याची दक्षता राखावी. असे द्वार उघडण्यासाठी आम्ही यहोवाला प्रार्थनाही करू शकतो. (कलस्सैकर ४:२, ३) आम्ही येशूच्या सहनशीलतेच्या नमुन्याचे अनुकरण करतो व त्याच्या नावासाठी खरे असल्याचे सिद्ध करतो तेव्हा, आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो ते ऐकण्यासाठी आम्हाला कान आहेत हे आम्ही दाखवीत असतो.

[तळटीपा]

^ पौलाच्या काळी करिंथ येथील यहूदी सभास्थानाचा अध्यक्षीय अधिकारी सोस्थनेस, हा ख्रिस्ती बंधू बनला.—प्रेषितांची कृत्ये १८:१७; १ करिंथकर १:१.

^ योहान वर्गाद्वारे प्रकाशित होणाऱ्‍या द वॉचटावर या नियतकालिकाने प्रचारकार्यात शक्य आहे तितक्या अधिक प्रमाणात सहभागी होण्याची संधी साधून घेण्याची निकड सतत मांडली आहे. उदाहरणार्थ, डिसेंबर १५, १९८५ च्या अंकातील “डिक्लेर अब्रॉड द किंग्डम ऑफ गॉड” व “अर्जंटली निडेड—मोअर हार्वेस्ट वर्कर्स!” हे लेख बघा. फेब्रुवारी १, १९८७ च्या अंकात “डुईंग आवर अटमोस्ट टू डिक्लेर द गुड न्यूज” या लेखात पूर्ण वेळेच्या ‘उघड्या द्वारातून’ आत शिरण्यावर अधिक भर देण्यात आली होती. १९९३ च्या कार्यवर्षात एका महिन्यात ८,९०,२३१ पायनियरांचा उच्चांक गाठण्यात आला.

^ हिज्किया या नावाचा अर्थ, “यहोवा बळकटी देतो,” असा आहे. पाहा २ राजे १६:२०, तळटीप, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल.

^ मॅक्लीनटॉक आणि स्ट्राँग यांचा सायक्लोपिडिआ (खंड १०, पृ. ५१९) कळवतो: “मूर्तिपूजक याजकांनी लोकांना चिथवून सम्राटांना ख्रिस्ती धर्माविरुद्ध फर्मान काढण्यास भाग पाडले. ख्रिस्ती विश्‍वासाची वाढ होत आहे व आपणाला धोका निर्माण झाला असल्याचे या याजकांनी पाहिले होते. तसेच त्र्याजन [सा.यु. ९८-११७] याला सुद्धा या नव्या शिक्षणाला दडपण्यासाठी फर्मान काढण्याकरता भाग पाडले गेले, कारण ते नवे शिक्षण लोकांमध्ये दैवतांविरुद्धचा द्वेष निर्माण करीत होते. ख्रिस्ती धर्माच्या जलद वाढीबद्दल बिथुनिया [आशियाच्या उत्तरेकडील रोमी प्रांताच्या सरहद्दीवरील शहर] सरकारचा प्रांताधिकारी या नात्याने धाकटा प्लिनी याच्या कारभाराने तर अधिक गुंतागुंत निर्माण केली व यामुळे त्याच्या प्रांतात मूर्तिपूजकांचा रोष वाढत राहिला.”

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[६३ पानांवरील चौकट]

पुष्कळांना नमन करण्यास मदत देणे

स्वर्गीय राज्याचे वतन ज्यांना मिळणार आहे त्या १,४४,००० अभिषिक्‍त लोकांपैकी ९,००० पेक्षा कमी संख्येच्या योहान वर्गाच्या शेषांना अद्याप पृथ्वीवरील आपले मार्गाक्रमण संपवायचे आहे. पण याच वेळेस, मोठ्या लोकसमुदायाचा विस्तार ४०,००,००० पेक्षा अधिक वाढलेला आहे. (प्रकटीकरण ७:४, ९) ही इतकी प्रचंड वाढ कशामुळे साध्य होऊ शकली? यहोवाच्या साक्षीदारांमार्फत ज्या विविध प्रशाला चालवण्यात येतात त्यांनी यात मोठे सहकार्य दिले. या प्रशाला ख्रिस्ती धर्मजगतातील वेदांत प्रशालेसारख्या, जेथे जागतिक तत्त्वज्ञान शिकवले जाते व बायबलला कमीपणा आणला जातो तशा नाहीत. तर त्या देवाच्या वचनावरील विश्‍वास खोलवर बिंबवतात. शुद्ध, नैतिक जीवन व देवाची समर्पित स्वरुपाची सेवा याविषयीचा बायबलचा व्यावहारिक अवलंब या प्रशाला शिकवतात. जगभरात १९४३ पासून यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रत्येक मंडळीतील राज्य सभागृहात स्थानिक ईश्‍वरशासित सेवा प्रशाला चालविली जाते. या प्रशालेला दर आठवडी लाखो उपस्थित राहतात. यात बायबल शिक्षणाचा एकसूत्री कार्यक्रम अनुसरला जातो.

यहोवाच्या साक्षीदारांनी १९५९ पासून मंडळीतील वडील व सेवा सेवकांच्या शिक्षणासाठी राज्य सेवा प्रशालेला चालविले आहे. शिवाय १९७७ पासून पायनियर सेवा प्रशालेने २,००,००० पेक्षा अधिक बंधू-भगिनींना पूर्ण वेळेचे प्रचारकार्य करून यहोवाची सेवा खऱ्‍या फिलदेल्फियाच्या आत्म्याने करण्यासाठी तयार केले. १९८७ मध्ये सेवा प्रशिक्षण प्रशालेची सुरवात झाली. ही प्रशाला जगातील क्षेत्राच्या खास नेमणूकीकरता पुरुष साक्षीदारांना तालीम देते.

यहोवाच्या साक्षीदारांनी चालविलेल्या शाळांमध्ये वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला ही उल्लेखनीय प्रशाला आहे. न्यूयॉर्क शहरात असलेल्या या मिशनरी प्रशालेने १९४३ पासून दर वर्षी दोन गटांना प्रशिक्षित केले आहे. विदेशी सुवार्तिक कार्यासाठी या प्रशालेने ६,००० पेक्षा अधिक यहोवाच्या सेवकांना प्रशिक्षित केले आहे. या प्रशालेतील पदवीधरांनी शंभरापेक्षा अधिक देशात सेवा केली आहे, यामध्ये पुष्कळ ठिकाणी ते राज्याचे काम सुरु करण्यामध्ये साधन असे बनले. सुमारे ४० वर्षांनी अद्याप मूळ मिशनऱ्‍यांतील पुष्कळ जण तेथे काम करीत आहेत, येणाऱ्‍या नव्या सुवार्तिकांसोबत आपल्या अनुभवांची सहभागिता करीत आहेत आणि यहोवाच्या संघटनेची जगव्याप्त वाढ करीत आहेत. ही केवढी अद्‌भुत वाढ झाली आहे!

[६४ पानांवरील तक्‍ता]

राज्य करीत असलेला राजा येशू याने १९१९ मध्ये ख्रिस्ती सेवेच्या संधीचे एक द्वार उघडे केले. या सुसंधीचा फायदा भक्‍तीमान ख्रिश्‍चनांच्या वाढत्या संख्येने घेतला आहे.

वर्ष प्रचार झालेले देश प्रचारात भाग घेतलेले ख्रिस्ती * पूर्ण-वेळेचे प्रचारक *

१९१८ १४ ३,८६८ ५९१

१९२८ ३२ २३,९८८ १,८८३

१९३८ ५२ ४७,१४३ ४,११२

१९४८ ९६ २,३०,५३२ ८,९९४

१९५८ १७५ ७,१७,०८८ २३,७७२

१९६८ २०० ११,५५,८२६ ६३,८७१

१९७८ २०५ २०,८६,६९८ १,१५,३८९

१९९३ २३१ ४४,८३,९०० ६,२३,००६

[तळटीप]

^ वरील आकडे महिन्याची सरासरी दाखवितात.

^ वरील आकडे महिन्याची सरासरी दाखवितात.

[६५ पानांवरील तक्‍ता]

यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यहालचाली पूर्ण हृदयाच्या आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी प्रचारात व शिक्षण देण्यात जो वेळ खर्च केला तसेच लोकांच्या घरी केवढ्या मोठ्या संख्येत मोफत बायबल अभ्यास चालविले ते विचारात घ्या.

वर्ष प्रचाराचे तास (वार्षिक बेरीज) चालविलेले बायबल अभ्यास (महिन्यांची सरासरी)

१९१८ १९,११६ लिहिण्यात आले नाहीत

१९२८ २८,६६,१६४ लिहिण्यात आले नाहीत

१९३८ १,०५,७२,०८६ लिहिण्यात आले नाहीत

१९४८ ४,९८,३२,२०५ १,३०,२८१

१९५८ ११,०३,९०,९४४ ५,०८,३२०

१९६८ २०,८६,६६,७६२ ९,७७,५०३

१९७८ ३०,७२,७२,२६२ १२,५७,०८४

१९९३ १,०५,७३,४१,९७२ ४५,१५,५८७

[५९ पानांवरील चित्रे]

पहिल्या शतकातील रोमी किल्ली