व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ती पहिली प्रीती पुन्हा प्रज्वलित करा!

ती पहिली प्रीती पुन्हा प्रज्वलित करा!

अध्याय ७

ती पहिली प्रीती पुन्हा प्रज्वलित करा!

इफिस

१. येशूचा पहिला संदेश कोणत्या मंडळीस अनुलक्षून आहे आणि तो पर्यवेक्षकांना कशाची आठवण देतो?

 येशूचा पहिला संदेश इफिस मंडळीसाठी आहे, त्यावेळी आशिया मायनरमधील किनाऱ्‍यावरील उत्कर्ष पावणारे पात्म बेटाजवळ वसलेले ते शहर होते. तो योहानास आज्ञा करतो: “इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करितो, जो सोन्याच्या सात समयामधून चालतो, तो असे म्हणतो.” (प्रकटीकरण २:१) इतर सहा संदेशांप्रमाणेच येशू येथे त्याच्या अधिकारपदास सूचित करणाऱ्‍या विशेष गोष्टीकडे लक्ष आकर्षित करतो. इफिसमधील पर्यवेक्षकांना तो याचे स्मरण देतो की, सर्व वडील त्याच्या सुरक्षित देखरेखीखाली असून, तो मंडळ्‌यांची पाहणी करीत आहे. या २० व्या शतकापर्यंत तो त्याचे प्रेमळ मस्तकपद वापरुन, वडिलांवर कृपायुक्‍त नजर आणि मंडळ्यांसोबत सहवास ठेवून असलेल्यांवर दयाळू मेंढपाळकत्व करीत आहे. वेळोवेळी तो मंडळीच्या व्यवस्थांमध्ये फेरफार घडवून आणतो की ज्याद्वारे, प्रकाश अधिक तेजस्वीपणे झळकू शकतो. होय, देवाच्या मंडळीचा येशू हा खराच प्रमुख मेंढपाळ आहे.—मत्तय ११:२८-३०; १ पेत्र ५:२-४.

२. (अ) येशूने इफिसच्या मंडळीची कोणकोणत्या चांगल्या गोष्टींबद्दल प्रशंसा केली? (ब) पौलाने दिलेल्या कोणत्या सूचनेचा अवलंब इफिसमधील वडिलांनी केला होता हे उघडपणे दिसते?

आपल्या सात संदेशांपैकी दोघांना वगळून येशू सर्वांसाठी एक नमुना प्रस्थापित करतो. तो आरंभाला प्रशंसेचे उबदार शब्द बोलतो. इफिसकरांसाठी त्याचा संदेश असा आहे: “तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस.” (प्रकटीकरण २:२, ३) कित्येक वर्षे आधी, प्रेषित पौलाने इफिसच्या वडिलांना याची ताकीद दिली होती की, कळपाला त्रास देणारे धर्मत्यागी “क्रूर लांडगे” येतील व त्यांना म्हटले की, त्यांनी ‘सावध राहावे,’ व त्याचे स्वतःचे अविश्रांत उदाहरण अनुसरत राहावे. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३१) ज्या अर्थी येशू आता त्यांचे श्रम, धीर व थकून न जाणे याबद्दल त्यांची प्रशंसा करीत आहे, त्या अर्थी, त्यांनी तो सल्ला पाळला असावा हे उघड आहे.

३. (अ) आमच्या काळात “खोटे प्रेषित” यांनी विश्‍वासू लोकांना फसविण्याचा कसा प्रयत्न केला आहे? (ब) धर्मत्याग्यांबद्दल कोणता इशारा पेत्राने आधी देऊन ठेवला होता?

या प्रभूच्या दिवसात देखील ‘शिष्यांस आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलणारे,’ “खोटे प्रेषित” दिसले. (२ करिंथकर ११:१३; प्रेषितांची कृत्ये २०:३०; प्रकटीकरण १:१०) यांना पंथात विभाजन झालेल्या सर्व धर्मात चांगले दिसते आणि देवास विशिष्ट अशी संघटना नाही असा त्यांचा दावा आहे. तसेच १९१४ मध्ये येशूला राज्याधिकार मिळाला हे ते नाकारतात. ते २ पेत्र ३:३, ४ मधील भविष्यवाद पूर्ण करतात: “स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील: ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून, सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.’”

४. (अ) थट्टेखोरांचा गर्व व बंडखोरपणा कसा प्रदर्शित झाला आहे? (ब) या खोट्या विरोधकांविरुद्ध कोणती कृती आचरण्यामुळे आज ख्रिस्तीजन, आपण इफिसकरांसारखे आहोत असे दाखवतात?

आपल्या विश्‍वासाची जाहीर घोषणा केली पाहिजे या विचाराचा हे थट्टेखोर लोक उपहास करतात. (रोमकर १०:१०) आपल्या पूर्वीच्या सोबत्यांबद्दल खोटे वर्तमान पसरावे यासाठी त्यांनी ख्रिस्ती धर्मजगातील धर्मपुढाऱ्‍यांचा पाठिंबा मिळविला आणि वृत्तपत्रे तसेच दूरदर्शन केंद्रांचे साहाय्य मिळविले. पण विश्‍वासू जनांना लागलेच कळते की या फसव्या लोकांची भाषा व वागणूक यामध्ये काही तथ्य नाही. इफिसकरांप्रमाणे आज ख्रिस्ती लोक “दुष्ट लोक सहन” करू शकत नाही, यासाठी ते अशांना मंडळ्यातून बहिष्कृत करतात. *

५. (अ) इफिसकरांठायी कोणती दुर्बळता असल्याचे येशूने बोलून दाखवले? (ब) इफिसकरांनी कोणते शब्द आठवणीत ठेवण्यास हवे होते?

परंतु आता, सातपैकी पाच मंडळ्यांच्या बाबतीत तो जसे करतो, त्याप्रमाणे येशू एका गंभीर समस्येचा उल्लेख करतो. तो इफिसकरांना म्हणतो: “तरी तू आपली पहिली प्रीति सोडली ह्‍याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.” (प्रकटीकरण २:४) त्यांनी या बाबतीत मागे पडायला नको होते, कारण पौलाने त्यांना साधारण ३५ वर्षे आधीच देवाने ‘आपल्यावर [दाखवलेल्या] स्वतःच्या अपरंपार प्रेमाबद्दल’ लिहिले होते व त्याने त्यांना आर्जविले होते की, “देवाची प्रिय मुले ह्‍या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीति केली . . . त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.” (इफिसकर २:४; ५:१, २) शिवाय, येशूचे हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरले जाण्यास हवे होते की, “आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] हा अनन्य परमेश्‍वर आहे. आणि तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने प्रीति कर.” (मार्क १२:२९-३१) इफिसकरांनी ही पहिली प्रीती गमावली होती.

६. (अ) आम्ही मंडळीत जुने असू की, नव्याने सहवास राखणारे असू, आम्ही कोणते धोके व प्रवृत्त्या यांजबद्दल जागृत राहण्यास हवे? (ब) देवावरील आमच्या प्रेमाने आम्हाला काय करण्यास भाग पाडले पाहिजे?

आम्ही मंडळीत जुने किंवा नव्याने सहवास राखणारे असू, आम्ही यहोवासाठी जे पहिले प्रेम दाखविले ते गमावू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. हे कसे घडू शकते? प्रापंचिक कामाचा जादा लळा लावल्यामुळे, खूप पैसे कमविण्याची इच्छा धरल्याने व सुखविलास हाच आमच्या जीवनात सर्वात मोठा वाटा आहे हे गृहीत धरल्याने ते घडू शकते. यामुळे आम्ही आध्यात्मिक वृत्तीचे होण्याऐवजी दैहिक वृत्तीचे बनतो. (रोमकर ८:५-८; १ तीमथ्य ४:८; ६:९, १०) अशाप्रकारे दिसून येणारी कोणतीही प्रवृत्ती सुधारण्यास यहोवावरील प्रेमाने आम्हास उद्युक्‍त करावे आणि ‘प्रथम त्याचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळविण्याच्या मागे’ लागून ‘स्वतःसाठी स्वर्गात संपत्ती साठवावी.’—मत्तय ६:१९-२१, ३१-३३.

७. (अ) यहोवा देवास करीत असलेली आमची सेवा कशाने प्रवृत्त झालेली असावी? (ब) प्रेमाबद्दल योहानाने काय म्हटले?

यहोवावरील खोलवर रुजलेल्या प्रीतीने आम्हाला त्याची सेवा करण्यास चालना मिळाली पाहिजे. यहोवा व ख्रिस्त यांनी आम्हासाठी जे सर्व काही केले त्याजविषयी आम्हाठायी कळकळीची रसिकता असावी. हेच योहानाने स्वतः नंतर लिहिले: “प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.” योहान पुढे आम्हाला सांगतो: “देव प्रीति आहे; जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो.” आपण कधीही यहोवा, प्रभु येशू ख्रिस्त व देवाची सजीव वचने याबद्दलची आपली प्रीती कोमेजू देऊ नये! हे प्रेम आम्ही देवाच्या सेवेत केवळ आवेशी राहून प्रदर्शित करू शकतो असे नाही, तर “जो देवावर प्रीति करतो त्याने आपल्या बंधूवरहि प्रीति करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे” तिचे पालन करण्याद्वारे दाखवू शकतो.—१ योहान ४:१०, १६, २१; इब्रीयांस ४:१२; तसेच १ पेत्र ४:८; कलस्सैकर ३:१०-१४; इफिसकर ४:१५ पहा.

“पहिली कृत्ये कर”

८. इफिसकरांनी कसली हालचाल करावी असे येशूने कसे म्हटले?

त्या इफिसकरांनी हार खाऊ नये म्हणून त्यांच्याठायी होती ती पहिली प्रीती परत प्रज्वलित करण्यास हवी. “म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर.” असे येशू त्यांना सांगतो. “पश्‍चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर; तू पश्‍चात्ताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरुन काढून टाकीन.” (प्रकटीकरण २:५) त्या इफिसकर मंडळीतील ख्रिश्‍चनांनी या वचनांचा कसा स्वीकार केला? ते आम्हास ठाऊक नाही. त्यांनी पश्‍चात्ताप केला असावा आणि यहोवाबद्दलची आपली प्रीती ते प्रज्वलित करू शकले अशी आम्हास आशा वाटते. तसे झाले नसल्यास, त्यांचा दीप मालवला जाणार होता व त्यांची समई जागेवरुन काढून टाकण्यात येणार होती. सत्याचा प्रकाश प्रकाशविण्याचा आपला हक्क ते गमावून बसणार होते.

९. (अ) इफिसकरांच्या बाबतीत कोणते उत्तेजनात्मक शब्द येशूपाशी होते? (ब) योहानाच्या काळानंतरच्या मंडळ्या, येशूने इफिसकरांना दिलेला सल्ला अनुसरण्यात कशा मागे पडल्या?

तरीही, इफिसकरांच्या बाबतीत येशूकडे हे प्रोत्साहनदायक शब्द होते: “तरी पण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करितोस; मीहि त्यांच्या कृत्यांचा द्वेष करितो.” (प्रकटीकरण २:६) जसे प्रभु येशू ख्रिस्ताला फुट पडण्याबद्दल द्वेष वाटत होता तसेच यांनाही वाटत होता. परंतु जशी वर्षे निघून गेली तसे, अनेक मंडळ्या येशूची ही वचने अनुसरण्यात मागे पडल्या. यहोवाबद्दल, सत्याबद्दल तसेच एकमेकांबद्दलच्या प्रेमाच्या अभावामुळे ते आध्यात्मिक अंधारात वाहवत गेले. अनेक भांडखोर पंथात त्यांचे तुकडे झाले. ज्यांना यहोवाबद्दल प्रेम वाटत नव्हते अशा “ख्रिस्ती” नक्कलाकारांनी बायबलच्या ग्रीक हस्तलिखितातून देवाचे स्वतःचे नावही काढून टाकले. प्रीतीचा अभाव असल्यामुळे त्यांनी अग्नीनरक, परगेटरी व त्रैक्य या बाबेलोनी व ग्रीसच्या मतप्रणालींना ख्रिस्ती धर्माच्या नावात जागा करून दिली. देव व सत्य याबद्दलचे प्रेम नसल्यामुळे, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या बहुतेकांनी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे बंद केले. त्यांनी आपणावर स्वार्थी पाळक वर्गाकरवी वर्चस्व चालवू दिले; ज्यांनी येथे पृथ्वीवर स्वतःची राज्ये प्रस्थापिली.—पडताळा १ करिंथकर ४:८.

१०. ख्रिस्ती धर्मजगताची १९१८ मध्ये धार्मिक स्थिती कशी होती?

१० देवाच्या घरापासून १९१८ मध्ये जेव्हा न्याय होण्यास सुरुवात झाली, तेव्हा ख्रिस्ती धर्मजगताचे विविध धर्मात विभागलेले पुढारी पहिल्या जागतिक युद्धास उघड पाठिंबा दर्शविण्यात मग्न झाले होते. ते दोन्ही पक्षातील कॅथलिक व प्रॉटेस्टंट सैनिकांना एकमेकांची कत्तल करण्याचे आर्जवीत होते. (१ पेत्र ४:१७) निकलाइताचा पंथ जे करीत होता त्याबद्दलचा द्वेष जसा इफिसच्या मंडळीने व्यक्‍त केला तसे करण्याऐवजी, ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मांनी बऱ्‍याच काळापासून परस्परविरोधी व देवाविरुद्धच्या मतप्रणालींना सहन केले आणि त्यांच्या पाळकांनी स्वतःला जगाचा भाग करण्यासाठी लोटून दिले. याचे भाग होऊ नये असे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते. (योहान १५:१७-१९) त्यांच्या मंडळ्यांना देवाचे राज्य हा बायबलचा मुख्य विषय आहे याबद्दलचे ज्ञान नसल्यामुळे, त्या शास्त्रवचनीय सत्याचा प्रकाश देणाऱ्‍या समया नव्हत्या आणि त्यांचे सदस्य यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराचे सदस्य नव्हते. त्यांच्यामधील नेतृत्व करणारे पुरुष (आणि स्त्रिया) तारे नव्हते तर, ते ‘धर्मत्यागी पुरुष’ याचे सदस्य असल्याचे उघड झाले.—२ थेस्सलनीकाकर २:३; मलाखी ३:१-३.

११. (अ) इफिसकरांना येशूने सांगितलेले शब्द १९१८ मध्ये जागतिक दृश्‍यात कोणत्या ख्रिस्ती गटाने आचरणात आणले? (ब) योहान वर्गाने १९१९ पासून पुढे काय केले?

११ तथापि योहान वर्ग, पहिल्या महायुद्धाच्या भयानक दिवसातून बाहेर पडला. त्यांच्याठायी यहोवा व सत्याबद्दलचे प्रेम होते व यामुळेच त्यांना देवाची सेवा मोठ्या आवेशाने करता आली. वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष चार्ल्स्‌ टी. रसेल यांच्या १९१६ मधील निधनानंतर त्यांची भक्‍ती करण्याचा सांप्रदायिक सराव अनुसरण्याचा ज्यांनी प्रयत्न केला व गटबाजी निर्माण करण्याचा यत्न केला अशांचा त्यांनी प्रतिकार केला. छळ व विपत्ती यांनी शिस्तबद्ध झालेल्या या ख्रिश्‍चनांच्या गटास त्यांच्या धन्याकडून ‘शाब्बासकी’ योग्यपणे मिळाली व यांना त्याच्या आनंदात येण्याचे निमंत्रण मिळाले. (मत्तय २५:२१, २३) जागतिक घटनांच्या ओघात तसेच आपल्या अनुभवाने त्यांना कळले की, येशूने त्याच्या राज्यसत्तेतील अदृश्‍य उपस्थितीबद्दल जे चिन्ह दिले होते त्याची पूर्णता होत आहे. १९१९ पासून पुढे ते, “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल,” या येशूच्या मोठ्या भविष्यवादाच्या पूर्णतेत अधिक सहभागी होण्यासाठी पुढे सरसावले. (मत्तय ६:९, १०; २४:३-१४) यहोवाबद्दल त्यांची प्रीती जर काही मार्गे कमी पडत आहे असे दिसत होते तर ती यामार्गी अधिक प्रज्वलित बनली.

१२. (अ) १९२२ मधील ऐतिहासिक अधिवेशनात कोणती हाक दिली गेली? (ब) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी १९३१ मध्ये कोणत्या नावास कवटाळले आणि त्यांनी कशाविषयीचा पश्‍चात्ताप केला?

१२ सीडर पॉईंट, ओहायो, अमेरिका येथे सप्टेंबर ५-१३, १९२२, दरम्यान झालेल्या एका ऐतिहासिक अधिवेशनाला असे १८,००० ख्रिस्ती उपस्थित होते. तेव्हा ही हाक दिली गेली: “अहो, सर्वसमर्थ देवाचे पुत्रहो, क्षेत्रात परत चला! . . . यहोवा हा देव आहे आणि येशू ख्रिस्त हा राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू आहे हे जगाला माहीत झाले पाहिजे. . . . यास्तव, राजा व त्याचे राज्य यांना जाहीर करा, जाहीर करा व जाहीर करा.” यहोवाचे बहुमूल्य नाव अधिक प्रसिद्ध केले जात होते. कोलंबस, ओहायो, अमेरिका येथील अधिवेशनात १९३१ मध्ये हे ख्रिस्ती एकत्र आले व देवाने यशयाच्या भविष्यवादात सूचित केले ते नाव, यहोवाचे साक्षीदार, यांनी आपणाला लावून घेतले. (यशया ४३:१०, १२) मार्च १, १९३९ या अंकापासून संस्थेच्या प्रमुख नियतकालिकाचे नाव द वॉचटावर अनाऊन्सिंग जेहोवाज्‌ किंग्डम असे बदलण्यात आले. अशाप्रकारे, आमचा निर्माता व त्याचे बादशाही सरकार यास प्रधानतेत आदर व्यक्‍त केला जात आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी, यहोवाबद्दलच्या नूतन प्रीतीने, त्याचे सुविख्यात नाम व राज्य यांचा आदर व स्तुती करण्यात मागे पडण्याच्या गतकाळातील कोणाही शक्यतेबाबत पश्‍चात्ताप केला आहे.—स्तोत्र १०६:६, ४७, ४८.

“जो विजय मिळवितो”

१३. (अ) इफिसकरांनी ‘विजय मिळविला’ तर त्यांच्यासाठी कोणते आशीर्वाद राखून ठेवण्यात आले होते? (ब) इफिसमधील ख्रिस्ती कसे ‘विजय मिळवू शकत होते’?

१३ शेवटी, येशू त्याच्या इतर संदेशात करतो तसे देवाच्या आत्म्याकडे लक्ष वेधवून विश्‍वासूपणासाठी जे प्रतिफळ त्याच्याद्वारे मिळणार ते स्पष्ट करतो. इफिसकरांना तो म्हणतो: “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला, देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.” (प्रकटीकरण २:७) ज्यांना ऐकणारे कान आहेत ते, तो महत्त्वाचा संदेश ऐकण्यास उत्सुक असतील. त्यांना हे ठाऊक असेल की, तो येशूच्या स्वेच्छेने आला नाही, पण सार्वभौम प्रभु यहोवा याजकडून त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे किंवा कार्यकारी शक्‍तीद्वारे वाहत आला आहे. पण ते कसे ‘विजय मिळवू शकतील’? ज्याने मरणापर्यंत सचोटी राखून ठेवली व त्यामुळेच जो असे म्हणू शकला की: “धीर धरा, मी जगाला जिंकले आहे,” त्या येशूच्या पावलांस जवळून अनुसरुन.—योहान ८:२८; १६:३३; तसेच १ योहान ५:४ पहा.

१४. येशूने उल्लेखिलेली ‘देवाची बाग’ ही काय असली पाहिजे?

१४ वस्तुतः अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पृथ्वीवरील नंदनवनात राहण्याचे भवितव्य नाही तर इफिसमधील अशा व्यक्‍तींना “देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ” कसे खाता येऊ शकेल बरे? हे पृथ्वीवर पुनर्स्थापित होणारे नंदनवन असू शकत नाही; कारण १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिस्ती, ज्यात इफिस मंडळीतील जनही समाविष्ट आहेत, ते मानवजातीतून विकत घेण्यात आलेले आणि कोकरा येशू ख्रिस्त याजसोबत स्वर्गीय सियोन डोंगरावर राज्य करण्यासाठी आत्मिक पुत्र बनलेले असतील. (इफिसकर १:५-१२; प्रकटीकरण १४:१, ४) यास्तव, तो संदर्भ हा स्वर्गातील बागेसमान क्षेत्राला अनुलक्षून आहे, जेथे हे विजेते जातील. तेथे “देवाच्या बागेत,” होय, स्वतः यहोवाच्या समक्षतेत या अमरत्व बहाल करण्यात आलेल्या विजेत्यांना चिरकालिक जीवन मिळेल, ज्याची सूचकता जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याद्वारे सूचित करण्यात आली आहे.

१५. विजय मिळविण्यासंबंधाने येशूने दिलेले उत्तेजन आज मोठ्या लोकसमुदायासाठी देखील इतक्या आस्थेचे का आहे?

१५ पण या १,४४,००० अभिषिक्‍त जनांच्या पृथ्वीवरील निष्ठावंत पाठीराख्यांबद्दल काय? या सोबतीच्या साक्षीदारांचा एक मोठा समुदाय हा देखील विजय मिळवतो. पण यांची आशा पृथ्वीवरील नंदनवनात प्रवेश मिळविण्यावर स्थिरावलेली आहे. तेथे ते ‘जीवनाच्या पाण्याची नदी’ यातून पितील आणि नदीच्या काठावरील ‘झाडांच्या पानांद्वारे’ आरोग्य मिळवतील. (प्रकटीकरण ७:४, ९, १७; २२:१, २) तुम्ही या गटापैकी आहात तर मग, तुम्हालाही यहोवाप्रीत्यर्थ उबदार प्रीती दाखवता येईल आणि तुम्ही विश्‍वासाच्या शर्यतीत विजयी होऊ शकाल. अशाप्रकारे, पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक सौख्यानंदाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकेल.—पडताळा १ योहान २:१३, १४.

[तळटीपा]

^ खोटे प्रेषित दिसून आले याबद्दलच्या ऐतिहासिक माहितीसाठी शास्त्रवचनातून युक्‍तिवाद करणे (इंग्रजी) या पुस्तकातील ३७-४४ पृष्ठे पहा, ते या पुस्तकाच्या प्रकाशकांकडे मिळू शकेल.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३६ पानांवरील चौकट]

यहोवा व त्याचा पुत्र याजविषयीची प्रेमळ स्तुती

यहोवाच्या लोकांच्या १९०५ मधील गायनाच्या पुस्तकात यहोवाच्या स्तुतीप्रीत्यर्थ जितकी गाणी होती, तिच्या दुप्पटीने येशूच्या स्तुतीप्रीत्यर्थ होती. १९२८ मधील गायन पुस्तकात, येशूला उंचावणाऱ्‍या गीतांच्या इतकीच यहोवास उंचावणारी गीतांची संख्या होती. पण १९८४ च्या गायन पुस्तकात येशूपेक्षा चौपटीने यहोवाच्या सन्मानाची गीते आहेत. हे येशूने स्वतः जे म्हटले होते, त्याच्या सहमतात आहे की, “माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.” (योहान १४:२८) यहोवाबद्दलचे प्रेम सर्वोच्च असले पाहिजे व सोबत येशूबद्दल देखील, त्याने वाहिलेल्या बहुमूल्य यज्ञार्पणाखातर व तो देवाचा प्रमुख याजक व राजा आहे म्हणून, गाढ प्रीती असावयास हवी.

[३४ पानांवरील तक्‍ता]

येशूच्या सूचनेचा नमुना

(प्रकटीकरणातील अध्याय व वचने नमूद केलेली आहेत)

मंडळीला संदेश सूचना देणाऱ्‍या अधिकाराचा उगम प्रास्ताविक प्रशंसा स्पष्टपणे दाखविलेली समस्या सुधारणा व/किंवा प्रोत्साहन परिणामी आशीर्वाद

इफिस २:१ २:२, ३ २:४ २:५, ६ २:७

स्मुर्णा २:८ २:९ — २:१० २:११

पर्गम २:१२ २:१३ २:१४, १५ २:१६ २:१७

थुवतीरा २:१८ २:१९ २:२०, २१ २:२४, २५ २:२६-२८

सार्दीस ३:१ — ३:१, २ ३:३, ४ ३:५

फिलदेल्फिया ३:७ ३:८ — ३:८-११ ३:१२

लावदिकीया ३:१४ — ३:१५-१७ ३:१८-२० ३:२१