व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुसरा अनर्थ—स्वारांचे सैन्य

दुसरा अनर्थ—स्वारांचे सैन्य

अध्याय २३

दुसरा अनर्थ—स्वारांचे सैन्य

१. टोळांना नेस्तनाबूद करण्याचा पाळकांनी प्रयत्न केला तरी काय घडले आणि येत असलेले आणखी दोन अनर्थ काय सुचवितात?

 लाक्षणिक टोळांनी १९१९ पासून पुढे ख्रिस्ती धर्मजगतावर केलेल्या हल्ल्यामुळे पाळक खूप बेजार झाले. त्यांनी या टोळांना नेस्तनाबूद करण्याचा प्रयत्न केला, पण ते तर अधिक जोरदारपणे व अधिक संख्येने सामोरे येत राहिले. (प्रकटीकरण ९:७) पण इतकेच सर्व नाही! योहान लिहितो: “पहिला अनर्थ होऊन गेला आहे; पाहा, ह्‍यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत.” (प्रकटीकरण ९:१२) ख्रिस्ती धर्मजगतासाठी आणखी यातनामय पीडा राखून ठेवल्या होत्या.

२. (अ) सहावा देवदूत कर्णा वाजवितो तेव्हा काय घडते? (ब) “सुवर्णवेदीच्या शिंगांमधून झालेली एक वाणी” कशाचे प्रतिनिधीत्व करते? (क) चार देवदूतांचा उल्लेख का करण्यात आला?

या दुसऱ्‍या अनर्थाचा उगम कोठून आहे? योहान लिहितो: “नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांमधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्णा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, ‘फरात महानदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे कर.’” (प्रकटीकरण ९:१३, १४) सुवर्ण वेदीच्या शिंगांमधून झालेल्या वाणीमुळे ते चार देवदूत मोकळे होतात. ही सोन्याची धूपवेदी आहे आणि यापूर्वी दोनदा सोन्याच्या धुपाटण्यामधून या वेदीवरुन जाणारा धूर हा पवित्र जनांच्या प्रार्थनांशी संबंधित असा दाखवण्यात आला. (प्रकटीकरण ५:८; ८:३, ४) या कारणास्तव, ही एक वाणी पृथ्वीवरील पवित्र जनांच्या संयुक्‍त प्रार्थनांचे प्रतिनिधीत्व करते. त्यांची ही याचना आहे की, त्यांना यहोवाचे “संदेशवाहक,” येथे “देवदूत” असे भाषांतर करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा मूळ अर्थ, या नात्याने आणखी उत्साहवर्धक सेवा करण्यासाठी मोकळीक मिळावी. पण चारच देवदूत का? ही लाक्षणिक संख्या हे सुचवते की, यांचे पृथ्वीच्या चारही सीमेपर्यंत जाण्यासाठी संघटन झालेले असणार.—पडताळा प्रकटीकरण ७:१; २०:८.

३. चार देवदूतांना “फरात महानदीवर बांधून” कसे ठेवण्यात आले होते?

पण ह्‍या देवदूतांना “फरात महानदीवर बांधून” कसे ठेवले गेले होते? प्राचीन काळी फरात महानदी ही यहोवाने अब्राहामाला वचन दिलेल्या प्रदेशाची ईशान्येकडील सीमा होती. (उत्पत्ती १५:१८; अनुवाद ११:२४) यास्तव, त्या देवदूतांना त्यांच्या देव-प्रणीत प्रदेश किंवा कार्यहालचालीच्या पृथ्वीवरील प्रदेशात जणू सीमेवरच, यहोवाने त्यांच्यासाठी तयार केलेल्या सेवेत पूर्ण सहभाग घेण्यापासून, अडकवून ठेवण्यात आलेले होते. फरात हिचा प्रामुख्यत्वे बाबेल शहरासोबत संबंध होता आणि यरुशलेमेचे सा. यु. पूर्वी ६०७ मध्ये पतन घडल्यावर दैहिक इस्राएलांनी तेथे ७० वर्षे “बाबेलच्या नद्यांजवळ” बंदिस्त स्थितीत घालवली. (स्तोत्र १३७:१) आध्यात्मिक इस्राएलांना १९१९ या वर्षीही अशाच बंधनात, खिन्‍न स्थितीत राहावे लागले व ते यहोवाला मार्गदर्शनार्थ विचारणा करीत राहिले.

४. चार देवदूतांना कोणती नेमणूक आहे व ती कशी पूर्ण करण्यात आली?

योहानाला हे आनंदाने कळवता आले: “तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे जिवे मारण्याकरिता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्‍यासाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे झाले.” (प्रकटीकरण ९:१५) यहोवा हा अचूक वेळेचा नियोजक आहे. त्याच्याकडे वेळापत्रक आहे व ते तो पाळून चालतो. यामुळेच त्या संदेशवाहकांना, करावयाच्या कामासाठी ठरल्याप्रमाणे अगदी वेळेवर मुक्‍त करण्यात आले. १९१९ मध्ये मुक्‍त होऊन काम करण्यासाठी सिद्ध बनल्यामुळे त्यांना केवढा आनंद झाला असावा त्याचा विचार करा! यांना केवळ पीडा नव्हे तर, शेवटी “तृतीयांश माणसे जिवे मारण्याकरिता” नियुक्‍ती मिळाली होती. याचा संबंध पहिल्या चार कर्ण्यांच्या नादांनी ज्या पीडा घोषित केल्या व ज्याचा परिणाम पृथ्वी, समुद्र, समुद्रातील जलचर, झरे, नद्या व स्वर्गातील दीपज्योती यांच्या तृतीयांशावर झाला त्याजशी आहे. (प्रकटीकरण ८:७-१२) पण हे चार देवदूत आणखी पुढे जातात. ते ‘जिवे मारतात,’ म्हणजे ख्रिस्ती धर्मजगतातील आध्यात्मिक मृत स्थिती संपूर्णरित्या उघडी करतात. १९२२ पासून पुढे झालेल्या व सध्याच्या काळातही चालू असलेल्या कर्ण्यांच्या निनादी घोषणांद्वारे हे साध्य करण्यात आले.

५. ख्रिस्ती धर्मजगताच्या बाबतीत, सहाव्या कर्ण्याचा निनाद १९२७ मध्ये कसा निनादविण्यात आला?

स्वर्गातील दूताने नुकताच सहावा कर्णा वाजविला होता हे लक्षात घ्या. याला अनुलक्षून बायबल विद्यार्थ्यांच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय अधिवेशन मालिकेतील सहावे, टोरन्टो, ओन्टारिओ, कॅनडा येथे भरवण्यात आले. येथे रविवार, जुलै २४, १९२७ रोजी झालेला कार्यक्रम त्या काळी उपलब्ध असलेल्या ५३ रेडिओ स्टेशनांच्या साखळीने, अधिक विस्तृत प्रमाणात सर्वत्र पोहंचविण्यात आला. तो संदेश कितीतरी लाखो लोकांच्या कानी गेला असावा. प्रथमतः, एका जोरदार ठरावाने ख्रिस्ती धर्मजगताच्या आध्यात्मिक मृत स्थितीला उघड केले आणि हे निमंत्रण दिले: “सध्याच्या या गोंधळाच्या काळी यहोवा देव लोकांना ‘ख्रिस्ती धर्मजगत’ किंवा ‘ख्रिस्ती धर्मसंघटना’ कायमची सोडून टाकण्याचे व त्यापासून पूर्णपणे दूर होण्याचे आर्जवितो. . . . ; लोकांनी आपल्या अंतःकरणातील भक्‍ती व मान्यता पूर्णपणे यहोवा देव व त्याचा राजा व राज्य यांना द्यावी.” यानंतर, “फ्रिडम फॉर द पीपल्स” हे जाहीर भाषण झाले. हे भाषण वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष, जे. एफ. रदरफोर्ड यांनी आपल्या ढंगदार, उत्स्फुर्त शैलीने दिले. ते “अग्नी, धूर व गंधक” याला साजेसे होते. याबद्दल योहान दृष्टांतात पुढे सांगतो.

६. योहान पुढे बघतो त्याप्रमाणे तो घोडदळांच्या सैन्यांचे कसे वर्णन देतो?

“घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यांवर बसलेले स्वार मला दिसले ते असे; त्यांस अग्नि, नीळ व गंधक यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नि, धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणाऱ्‍या अग्नि, धूर व गंधक ह्‍या तीन पीडांमुळे तृतीयांश मनुष्ये जिवे मारली गेली.”—प्रकटीकरण ९:१६-१८.

७, ८. (अ) कोणाच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली घोडदळ पुढे जाते? (ब) हे घोडदळ त्यांच्या आधी आलेल्या टोळांच्या बाबतीत कशाकशामध्ये साम्यतादर्शक आहेत?

हे घोडदळ चार देवदूतांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली पुढे जाते हे उघड आहे. ते केवढे भयानक दृश्‍य आहे! अशा या सैन्याचे तुम्ही निशाण बनला आहात, अशी कल्पना करुन तुमची काय प्रतिक्रिया होते ते बघा. त्याचे दृश्‍य बघताच तुमच्या हृदयात धडकी भरेल. तुम्हाला हे दिसले का की, हे घोडदळ, त्याच्या आधी जे टोळ दिसले त्यासारखेच आहे? टोळ हे घोड्यांच्या सारखे होते आणि घोडदळात घोडे आहेत. या कारणास्तव, ते दोघेही ईश्‍वरशासित युद्धात समाविष्ट आहेत. (नीतीसूत्रे २१:३१) टोळांना सिंहासारखे दात होते; घोडदळातील घोड्यांना सिंहासारखी डोकी आहेत. या कारणास्तव, दोघे जणही त्यांचा नेता, शास्ता व आदर्श, यहूदा वंशाचा सिंह, येशू ख्रिस्त याच्या धैर्याने वेष्टिलेले असे आहेत.—प्रकटीकरण ५:५; नीतीसूत्रे २८:१.

टोळ व घोडदळ, दोघेही यहोवाच्या न्यायदंडाच्या कामात सहभागी होतात. टोळ धुरातून बाहेर आले व तो धूर ख्रिस्ती धर्मजगताला अनर्थ व नाशकारक अग्नी असे चिन्ह ठरला आणि घोड्यांच्या तोंडातून देखील अग्नी, धूर व गंधक बाहेर पडत होता. टोळांना लोखंडी उरस्त्राणे होती व ती त्यांची अंतःकरणे कधीही न वाकणाऱ्‍या धार्मिकतेच्या निष्ठेने संरक्षित आहेत याला सूचित करीत होती; तसेच घोडदळाची उरस्त्राणे अग्नि, नीळ व गंधक रंगाची होती जी, घोड्यांच्या तोंडातून निघणाऱ्‍या अग्निमय, धुम्रमय व गंधकरुपी न्यायदंडाच्या प्राणनाशक संदेशाला प्रवर्तित करीत होती. (पडताळा उत्पत्ती १९:२४, २८; लूक १७:२९, ३०.) टोळांना विंचवासारख्या शेपट्या दंश करण्यासाठी होत्या; पण घोड्यांना तर सापासारख्या शेपट्या ठार मारण्यासाठी होत्या! यावरुन असे दिसते की, जे काही टोळांनी सुरु केले होते ते घोडदळांनी अधिक तीव्रपणे पुढे चालवून संपवावयाचे होते.

९. हे घोडदळ कोणाला सूचित आहेत?

तर मग, हे घोडदळ काय सूचित करीत आहेत? ज्या अर्थी अभिषिक्‍त योहान वर्गाने ख्रिस्ती धर्मजगताविरुद्ध ईश्‍वरी सूडाचा यहोवाचा न्यायदंड मोठ्या अधिकाराने “पीडा व नांगी” डसण्याच्या स्वरुपात घोषित करण्याचे सुरु केले, त्या अर्थी, आता ‘जिवे मारण्यासाठी’ म्हणजे ख्रिस्ती धर्मजगत व त्यांचे पाळक हे आध्यात्मिक दृष्ट्या पूर्णपणे मृत झालेले आहेत, यहोवाने टाकून दिलेले आहेत आणि सार्वकालिक नाशाच्या ‘अग्नीच्या भट्टीसाठी’ तयार असल्याचे दाखवून देण्यासाठी याच गटाचा उपयोग केला जाणार हे अपेक्षिता येते. खरे म्हणजे, मोठी बाबेल संपूर्णपणे नष्ट झालीच पाहिजे. (प्रकटीकरण ९:५, १०; १८:२, ८; मत्तय १३:४१-४३) तथापि, तिच्या नाशाआधी, योहान वर्ग ख्रिस्ती धर्मजगताची मृतमय स्थिती उघड करून दाखवण्याकरता “आत्म्याची तरवार म्हणजे, देवाचे वचन” याचा उपयोग करीत आहे. “तृतीयांश माणसे” लाक्षणिकपणे जिवे मारण्यासाठी चार देवदूत व घोड्यावरील घोडदळ मार्गदर्शन देत आहेत. (इफिसकर ६:१७; प्रकटीकरण ९:१५, १८) राज्य घोषकांचा भयप्रेरित समूह लढाईसाठी पुढे जात असता हे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या देखरेखीखाली असणाऱ्‍या सुयोग्य संघटना व ईश्‍वरशासित मार्गदर्शनाची सूचकता देते.

वीस कोटी

१०. घोडदळांची संख्या दोन अयुतांची अयुते कोणत्या अर्थी आहे?

१० ही घोडदळांची संख्या दोन अयुतांची अयुते किंवा वीस कोटी कशी येते? एक अयुत म्हणजे १०,०००; त्यामुळे दोन अयुतांची अयुते ही २० कोटी इतकी भरतात. * आज राज्य घोषकांची संख्या कितीतरी लाख आहे हे आनंदाचे आहे, पण ती कोटींनी कमी भरते! तथापि, गणना १०:३६ मधील मोशेचे शब्द लक्षात घ्या: “हे यहोवा, इस्राएलांच्या अयुत लोकांकडे परत ये.” (NW) (पडताळा उत्पत्ती २४:६०.) याचा अक्षरशः अर्थ, ‘इस्राएलांच्या सहस्रावधिकडे परत ये’ असा होतो. पण मोशेच्या काळी तर इस्राएलांची प्रत्यक्षात संख्या केवळ वीस ते तीस लक्ष एवढीच होती. तर मग, मोशेच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? मोशेच्या मनात हे होते की, इस्राएलांची संख्या मोजण्यापेक्षा “आकाशातील ताऱ्‍यांइतकी, समुद्रतीरींच्या वाळूइतकी” अगणित व्हावी. (उत्पत्ती २२:१७; १ इतिहास २७:२३) यासाठी त्याने “अयुत” शब्दासाठी असा शब्द वापरला जो फार मोठी संख्यासूचक होता. या कारणामुळेच, द न्यू इंग्लिश बायबल हे वचन याप्रकारे देते: “हे अगणित अशा इस्राएलांच्या प्रभू, परत ये.” ही गोष्ट ग्रीक तसेच इब्री शब्दकोशात “अयुत” या शब्दाची जी दुसरी व्याख्या दिलेली आहे तिजसोबत जुळते. ती व्याख्या अशी: “अगणित असा मोठा समुदाय,” एक “समूह.”—द न्यू थायर्स ग्रीक-इंग्लिश लेक्सिकन ऑफ द न्यू टेस्टमेंट; जेसेनियस यांचा ए हिब्रु ॲण्ड इंग्लिश लेक्सिकन ऑफ द ओल्ड टेस्टमेंट, एडवर्ड रॉबिनसनद्वारा अनुवादित.

११. योहान वर्गाला लाक्षणिक अर्थाने देखील अयुते बनण्यासाठी कशाची जरुरी होती?

११ तरीपण, पृथ्वीवर उरलेल्या योहान वर्गाची संख्या १०,००० पेक्षाही कमी, म्हणजे एका खऱ्‍या अयुतापेक्षाही कमी आहे. तर मग, यांची तुलना घोडदळांच्या अगणित हजारोंमध्ये कशी होऊ शकते? लाक्षणिक अर्थाने जरी अयुते व्हावयाचे असल्यास त्यांना जादा कुमक जरुरीची नाही का? याचीच त्यांना खरी गरज होती व ती यहोवाच्या विपुल दयेमुळे पूर्ण करण्यात आली! मग, ही कुमक कोठून आली?

१२, १३. अधिक कुमक कोठून येणार होती हे १९१८ ते १९३५ दरम्यान घडलेल्या कोणत्या घटना सुचवितात?

१२ योहान वर्गाने १९१८ पासून ते १९२२ पर्यंत संत्रस्त मानवजातीसमोर, “सध्या जिवंत असणारे लाखो कधीच मरणार नाहीत,” ही आनंदी भवितव्याची आशा धरली. १९२३ मध्ये हे देखील दाखवण्यात आले की, मत्तय २५:३१-३४ मधील मेंढरांना देवाच्या राज्याखाली पृथ्वीवर जीवनप्राप्ती होणार. याचप्रमाणे, १९२७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात प्रकाशित करण्यात आलेल्या लोकांकरता स्वातंत्र्य (इंग्रजी) या पुस्तिकेत देखील अशीच आशा दाखवण्यात आली. १९३० शतकाच्या आरंभीच्या काळात सात्विक योनादाब वर्ग आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या दयनीय आध्यात्मिक स्थितीमुळे ‘शोक व विलाप करणारे लोक’ हे पृथ्वीवरील जीवनप्राप्ती मिळविणारे लाक्षणिक मेंढरे आहेत असे दाखवण्यात आले. (यहेज्केल ९:४; २ राजे १०:१५, १६) अशा लोकांना आधुनिक काळच्या ‘शरणपुरांकडे’ निर्देश करताना ऑगस्ट १५, १९३४ च्या द वॉचटावर नियतकालिकाने असे म्हटले: “योनादाब वर्गाच्या लोकांनी देवाच्या कर्ण्याचा निनाद ऐकला आहे आणि देवाच्या संघटनेकडे धावत जाऊन देवाच्या लोकांशी सहवास राखण्याद्वारे त्या इशाऱ्‍याकडे त्यांनी कान दिला आहे. यामुळे त्यांनी येथे राहिले पाहिजे.”—गणना ३५:६.

१३ योनादाब वर्गाशी संबंधित असणाऱ्‍यांना खासपणे १९३५ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या अमेरिकेत वॉशिंग्टन डी.सी. येथे अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केले गेले. तेथे मे ३१ रोजी जे. एफ. रदरफोर्ड यांनी “द ग्रेट मल्टीट्यूड” हे प्रसिद्ध भाषण दिले. या भाषणात त्यांनी स्पष्टपणे दाखविले की, प्रकटीकरण ७:९ मध्ये दाखविण्यात आलेला हा गट मत्तय २५:३३ मध्ये दाखविलेल्या मेंढरांप्रमाणेच आहे, तो पृथ्वीवरील आशा असणारा समर्पितांचा गट आहे. पुढे होणाऱ्‍या गोष्टींची आगमनसूचकता म्हणून त्या अधिवेशनात ८४० नव्या साक्षीदारांचा बाप्तिस्मा झाला, हे बहुतेक मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य होते. *

१४. लाक्षणिक घोडदळांच्या सैन्यात मोठ्या लोकसमुदायाला सहभाग मिळणार होता का आणि १९६३ मध्ये कोणता ठराव संमत करण्यात आला?

१४ मागे १९२२ मध्ये जे घोडदळांचे सैन्य पुढे धावू लागले होते व ज्याला १९२७ च्या टोरंटो अधिवेशनात अधिक जोरदार पुष्टी मिळाली होती त्यामध्ये या मोठ्या लोकसमुदायाला सहभाग मिळाला का? चार देवदूत म्हणजे अभिषिक्‍त योहान वर्गाच्या मार्गदर्शनाखाली, त्याला ते मार्गदर्शन निश्‍चितपणे मिळाले! १९६३ मध्ये जगास वेढणाऱ्‍या “एव्हरलास्टिंग गुड न्यूज” संमेलनात योहान वर्गासोबत ठराव मंजूर करण्यात ह्‍या मोठ्या लोकसमुदायाने आपला स्वर उंचावला. या ठरावात घोषित करण्यात आले होते की, जगाला “जागतिक त्रासाचा मोठा भूकंप हादरा देत आहे व असा हा भूकंप पूर्वी कधीही झाला नव्हता आणि जगातील सर्व राजकीय संघटना व त्याचे आधुनिक धार्मिक बाबेल या सर्वांना हादरे बसून त्यांचे चूर्ण होणार.” पुढे हा निर्धार व्यक्‍त करण्यात आला की, “आम्ही तर देवाचे मशीही राज्य व त्याचे न्यायदंड याबद्दलची ‘सार्वकालिक सुवार्ता’ पक्षपात न करता सर्व लोकांना घोषित करीत राहू. देवाचे न्यायदंड त्याच्या शत्रूंसाठी पीडा आहेत, पण निर्मात्या देवाची आत्म्याने व खरेपणाने संमतीकारक रितीने भक्‍ती करू इच्छिणाऱ्‍या सर्व लोकांच्या मुक्‍ततेस्तव ते बजावले जातील.” हा ठराव जगभरात २४ संमेलनात एकंदर ४,५४,९७७ अधिवेशन प्रतिनिधींनी मोठ्या उत्सुकतेने संमत केला; यापैकी ९५ टक्के जमाव हा मोठ्या लोकसमुदायाचा होता.

१५. (अ) यहोवा क्षेत्रामध्ये ज्या कामकऱ्‍यांना वापरीत आहे त्याच्या किती टक्के मोठा लोकसमुदाय १९८८ मध्ये होता? (ब) येशूने योहान १७:२०, २१ मध्ये केलेली प्रार्थना मोठ्या लोकसमुदायाचे योहान वर्गाशी ऐक्य असल्याचे कसे व्यक्‍त करते?

१५ योहान वर्गासोबत ख्रिस्ती धर्मजगतावर पीडा ओतण्यात मोठ्या लोकसमुदायाने सतत अनिर्बंधित ऐक्य राखले आहे. यहोवाने क्षेत्रात वापरलेल्या या मोठ्या लोकसमुदायाचा कामकरी वर्ग १९८८ मध्ये ९९.७ इतका होता. याचे सदस्य योहान वर्गाशी पूर्ण अंतःकरणाने सहमत आहेत व याबद्दलच येशूने योहान १७:२०, २१ मध्ये हे प्रार्थिले होते की, “मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनांवरुन जे माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्यांच्यासाठीहि विनंती करितो; की त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्‍वास जगाने धरावा.” योहान वर्ग येशूच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेत असता, मोठा लोकसमुदाय देखील त्यांच्यासोबत आवेशाने मिळून घोडदळांच्या सैन्यानिशी आतापर्यंतच्या मानवी इतिहासातील अत्यंत विनाशकारी दौडीत पुढे जात आहे! *

१६. (अ) योहान लाक्षणिक घोड्यांच्या तोंडाचे व शेपटाचे वर्णन कसे करतो? (ब) यहोवाच्या लोकांची तोंडे त्याच्या सेवेसाठी कशी तयार करण्यात आली आहेत? (क) “त्यांची शेपटे सापांसारखी” आहेत हे कशासोबत जुळणारे आहे?

१६ त्या घोडदळांना युद्धासाठी शस्त्रे हवीत. ही शस्त्रे यहोवाने केवढ्या अद्‌भुतरितीने त्यांना दिली आहेत! योहान त्यांचे वर्णन देतो: “कारण त्या घोड्यांची शक्‍ति [“अधिकार,” NW] त्यांच्या तोंडात व शेपटात आहे; त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांनाहि डोकी आहेत, आणि त्यांनी ते उपद्रव करितात.” (प्रकटीकरण ९:१९) यहोवाने आपल्या सेवेसाठी आपल्या समर्पित, बाप्तिस्मा झालेल्या सेवकांची नियुक्‍ती केली आहे. ईश्‍वरशासित उपाध्यपणाची प्रशाला, तसेच इतर सभा व प्रशाला याद्वारे त्याने त्यांना वचनाचा कसा प्रचार करावा हे शिकवले आहे आणि यामुळेच ते “सुशिक्षितांच्या जिव्हेने” अधिकारयुक्‍तपणे बोलू शकतात. त्याने आपली वचने त्यांच्या मुखात घातली असून त्यांना “चार लोकात व घरोघरी” त्याचे न्यायदंड जाहीर करण्यास पाठविले आहे. (२ तीमथ्य ४:२; यशया ५०:४; ६१:२; यिर्मया १:९, १०; प्रेषितांची कृत्ये २०:२०) योहान वर्ग व मोठा लोकसमुदाय यांनी आपल्या ‘शेपटाने’ किंवा मागे लाखो बायबल, पुस्तके, माहितीपत्रके व नियतकालिके यांचे वर्षानुवर्षे वितरण करण्याद्वारे दंशकारी संदेश सोडला आहे. यहोवाकडून “उपद्रव” येत आहे असा संदेश मिळणाऱ्‍या त्यांच्या विरोधकांना हे घोडदळांचे सैन्य खरेच दोन अयुतांची अयुते किंवा वीस कोटी इतके वाटते.—पडताळा योएल २:४-६.

१७. कार्याची बंदी असल्यामुळे ज्या देशात प्रकाशनांचे वितरण करता येत नाही, तेथेही यहोवाच्या साक्षीदारांचा सैन्याच्या दौडीत सहभाग आहे का? विवेचीत करा.

१७ या घोडदळांची अत्यंत आवेशी तुकडी ही ज्या देशात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला बंदी आहे, तेथील बांधवांची मिळून बनल्याची आढळते. लांडग्यांमधील मेंढरांप्रमाणे यांना “सापासारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी” राहावे लागते. त्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या आहेत त्याबद्दल यहोवाच्या आज्ञेला अनुलक्षून ते गप्प राहू शकत नाहीत. (मत्तय १०:१६; प्रेषितांची कृत्ये ४:१९, २०; ५:२८, २९, ३२) त्यांच्याकडे अगदीच अल्प प्रमाणात छापील साहित्य असते किंवा बहुधा नसतेच, तर यांचा घोडदळांच्या दौडीत सहभाग नाही असा आम्ही निर्वाळा घ्यावा का? मुळीच नाही! बायबलच्या सत्याचे वक्‍तव्य करण्यासाठी त्यांना यहोवाकडून तोंड व अधिकार ही लाभली आहेत. याचा ते अनौपचारिक पद्धतीने व मन वळविण्याच्या मार्गाने वापर करुन बायबल अभ्यास प्रस्थापित करतात आणि “पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे” वळवीत आहेत. (दानीएल १२:३) यांना जणू आपल्या शेपटाने जबर तडाखा देणारी प्रकाशने मागे सोडता येत नसली तरी, ते यहोवाचे सार्वभौमत्व निनादविणाऱ्‍या त्याच्या जवळ आलेल्या दिवसाची साक्ष चतुरपणे व जागृतपणे देत असता आपल्या तोंडावाटे जणू लाक्षणिक अग्नी, धूर व गंधक सोडत आहेत.

१८. घोडदळांच्या सैन्याने छापील रुपात पीडादायक संदेश किती भाषेत व किती संख्येत वितरीत केला?

१८ पण इतर ठिकाणी, राज्याची प्रकाशने ख्रिस्ती धर्मजगताची बाबेलोनी तत्त्वे व मार्ग यांना उघड करीत आहेत व त्यांना लाक्षणिक मार्गाने उपद्रव देत आहेत. आधुनिक छपाई यंत्रणेचा वापर करून या प्रचंड घोडदळाला १९८७ आधीच्या ५० वर्षांमध्ये पृथ्वीवरील २०० पेक्षा अधिक भाषांमध्ये बायबल, पुस्तके, नियतकालिके व माहितीपत्रके यांच्या प्रतींचे ७,८२,१०,७८,४१५ इतक्या प्रचंड प्रमाणात वितरण करता आले. हे खरोखरीच्या दोन अयुतांच्या अयुतेपेक्षा कितीतरी अधिक होते. खरेच, त्या शेपटांनी किती प्रचंड दंश केला!

१९, २०. (अ) पीडादायक संदेशाचे प्रमुख लक्ष्य ख्रिस्ती धर्मजगत असले तरी, ख्रिस्ती धर्मजगताच्या पलिकडे असणाऱ्‍या काही देशांनी कसा प्रतिसाद दाखवला? (ब) योहान सर्वसाधारण लोकांच्या प्रतिक्रियेचे कसे वर्णन देतो?

१९ या पीडादायक संदेशाने “एक तृतीयांश माणसे जिवे मारली” जावी हा यहोवाचा उद्देश आहे. यामुळेच त्या पीडेचे प्रमुख लक्ष्य ख्रिस्ती धर्मजगताकडे होते. तरीपण हा संदेश ख्रिस्ती धर्मजगताच्या पुढेही दूरवरील देशात, जेथे की, ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांची दांभिकता चांगली माहीत आहे तेथेही गेला. तर मग, त्या भ्रष्ट धार्मिक संघटनेवरील पीडा बघून या देशातील लोक यहोवाच्या जवळ आले का? होय, पुष्कळ आले! ख्रिस्ती धर्मजगताच्या वर्चस्वाच्या परिघाबाहेर राहणाऱ्‍या नम्र व प्रिय लोकांमध्ये तत्परतेचा प्रतिसाद दिसला. परंतु सर्वसाधारण लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल योहान म्हणतो: “त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्‍चात्ताप केला नाही; म्हणजे भुतांची व ज्यांस पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जारकर्म व चोऱ्‍या ह्‍यांबद्दलहि पश्‍चात्ताप केला नाही.” (प्रकटीकरण ९:२०, २१) अशा अपश्‍चात्तापी लोकांचे जागतिक परिवर्तन होणार नाही. दुष्टाईच्या मार्गाचे आचरण चालू ठेवणाऱ्‍या सर्वांना यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या महान दिवसात प्रतिकूल न्यायदंड प्राप्त होईल. पण, “जो कोणी परमेश्‍वराचा [यहोवा, NW] धावा करील तो तरेल.”—योएल २:३२; स्तोत्र १४५:२०; प्रेषितांची कृत्ये २:२०, २१.

२० आतापर्यंत आपण ज्याची चर्चा केली तो दुसऱ्‍या अनर्थाचा भाग होता. हा अनर्थ पूर्ण होण्याआधी आणखी काही येणे अजून बाकी आहे व हेच आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत.

[तळटीपा]

^ हेन्री बर्कले स्वेटे याकरवीचे प्रकटीकरणावरील भाष्य (इंग्रजी) हे पुस्तक “दोन अयुतांची अयुते” या संख्येबद्दल म्हणते: “ही मोठी संख्या आम्हाला त्याची खरी पूर्णता शोधण्याचा मज्जाव करते व या निर्वाळ्याला, त्यानंतर देण्यात आलेले वर्णन पाठबळ देते.”

^ अधिक विवेचनार्थ आधीची ११९-२६ पृष्ठे पहा; तसेच १९३२ मध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले समर्थन (इंग्रजी) पुस्तक तिसरे, पृष्ठे ८३-४ पहा.

^ योहानाने पाहिलेल्या घोडदळांच्या सैन्याला टोळांप्रमाणे “डोक्यांवर सोन्याच्या मुगुटासारखे” नव्हते. (प्रकटीकरण ९:७) हे, या सैन्याचा अधिकांश भाग असणारा मोठा लोकसमुदाय देवाच्या स्वर्गीय राज्यात राज्य करण्याची आशा बाळगून नाही या गोष्टीशी सुसंगत आहे.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४९ पानांवरील चित्रे]

सहाव्या कर्ण्याच्या निनादाने दुसरा अनर्थ सामोरा येतो

[१५०, १५१ पानांवरील चित्रे]

इतिहासातील अति भव्य घोडदळांच्या सैन्याचे मार्गदर्शन चार देवदूत करतात

[१५३ पानांवरील चित्रे]

अगणित घोडदळांनी बायबलवर आधारित प्रकाशनांच्या लाखो प्रतींचे वितरण केले आहे

[१५४ पानांवरील चित्रे]

बाकीच्या लोकांनी पश्‍चात्ताप केला नाही