व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचा क्रोध समाप्तीला आणला जातो

देवाचा क्रोध समाप्तीला आणला जातो

अध्याय ३२

देवाचा क्रोध समाप्तीला आणला जातो

१. सात वाट्या ओतल्यावर शेवटी काय घडेल आणि वाट्यांबद्दल आता कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

 सात वाट्या ओतण्याची आज्ञा देवदूतांना दिल्याचे योहानाने यापूर्वीच सांगितले आहे. तो म्हणतो की, “त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्यायोगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.” (प्रकटीकरण १५:१; १६:१) या पीडा यहोवाने पृथ्वीवरील दुष्टतेला चालू राहण्याबद्दल आतापर्यंत जी अनुज्ञा दिली होती, ती सरतेशेवटी संपुष्टात आली पाहिजे याचे प्रतीक होत्या. त्या संपल्यावर देवाच्या न्यायदंडांची अंमलबजावणी पूर्ण होणार होती. त्यानंतर सैतानाचे जग पुन्हा कधीच दिसणार नाही! तर मग, या पीडांचा मानवजातीसाठी तसेच सध्याच्या दुष्ट जगातील अधिपतींसाठी काय अर्थ होतो? या नाशपात्र जगासोबत पीडित होणे ख्रिश्‍चनांना कसे टाळता येईल? हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत आणि आता यांची उत्तरे दिली जातील. नीतीमत्तेचा विजय होण्याची आकांक्षा धरून आहेत अशांना, योहान पुढे जे पाहतो त्याबद्दल मोठी आस्था वाटेल.

‘पृथ्वीविरुद्ध’ यहोवाचा क्रोध

२. पहिल्या देवदूताने आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा काय परिणाम होतो आणि ‘पृथ्वी’ कशाला सूचित करते?

पहिला देवदूत पुढे होतो! तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली; तेव्हा त्या श्‍वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्‍या लोकांस वाईट व घाणेरडे फोड आले.” (प्रकटीकरण १६:२) पहिल्या कर्ण्याच्या नादाच्या बाबतीत होते तसेच, येथील “पृथ्वी” ही सैतानाने येथे पृथ्वीवर सुमारे ४,००० वर्षांआधी निम्रोदाच्या काळात स्थिर वाटणारी जी राजकीय व्यवस्था उभारण्यास सुरवात केली होती तिला सूचित आहे.—प्रकटीकरण ८:७.

३. (अ) पुष्कळ सरकारांनी भक्‍तीच्या तुल्य ठरणाऱ्‍या गोष्टींची मागणी आपल्या प्रजाजनांकडून कशी केली आहे? (ब) देवाच्या राज्याऐवजी राष्ट्रांनी कोणती निर्मिती केली आहे आणि जे त्याची भक्‍ती करतात त्यांच्यावर कोणता परिणाम घडतो?

या शेवटल्या काळी पुष्कळ सरकारांनी आपल्या प्रजेकडून अशा काही गोष्टींची अपेक्षा धरली ज्या भक्‍तीच्या प्रकारात मोडत होत्या; राज्याला देवापेक्षा किंवा इतर कोणत्याही निष्ठेपेक्षा अधिक प्राधान्य दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. (२ तीमथ्य ३:१; पडताळा लूक २०:२५; योहान १९:१५.) १९१४ पासून युवकांना सैन्यात भरती करणे किंवा लढण्यासाठी त्यांना तयार करणे हे राष्ट्रांमध्ये सर्वसाधारण बनल्यामुळे, एकंदर युद्धामुळे आधुनिक इतिहासाची पाने रक्‍तलांच्छित बनली. प्रभूच्या दिवसात राष्ट्रांनी देवाच्या राज्याऐवजी एक पर्याय शोधून काढला व तो, श्‍वापदाची मूर्ती—लिग ऑफ नेशन्स व तिचा वारस संयुक्‍त राष्ट्रसंघ—हा होता. ही मानवनिर्मित संघटना शांतीसाठी राष्ट्रांची एकमात्र आशा आहे हे जे पोपनी जाहीर केले ती केवढी निंद्य घोषणा होती! ही संघटना देवाच्या राज्याचा कडवा विरोध करते. या संघटनेची उपासना करणारे आध्यात्मिकरित्या अशुद्ध, गळव्यांनी ग्रस्त असे बनतात; मोशेच्या काळी यहोवाचा विरोध करणाऱ्‍यांना देखील अक्षरशः गळवे व फोडांची बाधा झाली होती.—निर्गम ९:१०, ११.

४. (अ) देवाच्या क्रोधाच्या पहिल्या वाटीतील पदार्थ कशावर अधिक जोर देतात? (ब) श्‍वापदाची खूण धारण करणाऱ्‍यांना यहोवा कोणत्या दृष्टीने बघतो?

या वाट्यात असणारा पदार्थ, सर्व मानवजातीपुढे असलेल्या निवडीबद्दलचे जोरदार वक्‍तव्य करतो. तिला या जगाची नापसंती किंवा यहोवाचा क्रोध यापैकी एक गोष्ट पत्करावी लागेल. मानवजातीने स्वतःवर श्‍वापदाचे चिन्ह करावे या हेतूने तिच्यावर अशी जबरदस्ती केली जाते की, “त्या श्‍वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीहि विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये.” (प्रकटीकरण १३:१६, १७) पण याची किंमत द्यावी लागणार! चिन्ह धारण करणाऱ्‍यांना यहोवा ‘वाईट व घाणेरड्या फोडाची’ बाधा लागल्यासारखे बघतो. अशांना १९२२ पासून, ते जिवंत देवाला नाकारणारे असे उघड करण्यात आले आहे. त्यांच्या राजकीय योजनांना यश मिळत नाही व त्यांची मोठी त्रेधा झाली आहे. ते आध्यात्मिकदृष्ट्या अशुद्ध आहेत. त्यांनी पश्‍चात्ताप केल्याशिवाय हा “वाईट” रोग संपुष्टात येणार नाही; कारण हा यहोवाच्या न्यायाचा दिवस आहे. या जगाचे व्यवस्थीकरण आणि ख्रिस्ताच्या बाजूला येऊन यहोवाची सेवा करणे यामध्ये कोणतीही तटस्थ राहण्याची जागा नाही.—लूक ११:२३; पडताळा याकोब ४:४.

समुद्र रक्‍तमय होतो

५. (अ) दुसरी वाटी ओतल्यावर काय घडते? (ब) लाक्षणिक समुद्रात राहणाऱ्‍यांना यहोवा कसे बघतो?

आता देवाच्या क्रोधाची दुसरी वाटी ओतण्यास हवी. याचा मानवजातीकरता काय अर्थ होईल? योहान आम्हास सांगतो: दुसऱ्‍याने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा समुद्र मृताच्या रक्‍तासारखा रक्‍तमय झाला, आणि त्यातील सर्व प्राणी मरून गेले.” (प्रकटीकरण १६:३) दुसऱ्‍या कर्ण्याच्या नादाप्रमाणे ही वाटी “समुद्रात” ओतण्यात आली, जो यहोवापासून दुरावलेल्या मानवजातीचा क्षुब्ध व बंडखोर समूह आहे. (यशया ५७:२०, २१; प्रकटीकरण ८:८, ९) यहोवाच्या दृष्टीने हा “समुद्र” रक्‍तमय आहे, ज्यात प्राणी राहूच शकत नाहीत. या कारणामुळेच ख्रिश्‍चनांनी या जगाचा भाग असता कामा नये. (योहान १७:१४) देवाच्या क्रोधाची दुसरी वाटी ओतणे याचा अर्थ हा होतो की, या समुद्रात राहणारी सर्व मानवजात यहोवाच्या दृष्टीने मृत बनली आहे. सामाजिक जबाबदारीच्या कारणामुळे ही मानवजात निर्दोष रक्‍त सांडण्याच्या दोषास पात्र आहे. यहोवाच्या क्रोधाचा दिवस येईल तेव्हा ते त्याचा न्यायदंड बजावणाऱ्‍यांच्या हातून अक्षरशः मरतील.—प्रकटीकरण १९:१७, १८; पडताळा इफिसकर २:१; कलस्सैकर २:१३.

त्यांना रक्‍त पिण्यास देणे

६. तिसरी वाटी ओतली जाते तेव्हा काय घडते आणि देवदूताकडील तसेच वेदीकडील कोणते शब्द ऐकण्यात आले?

देवाच्या क्रोधाची तिसरी वाटी ओतण्याचा परिणाम तिसऱ्‍या कर्ण्याच्या नादाप्रमाणे ताज्या पाण्याच्या उगमावर होतो. तिसऱ्‍याने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे ह्‍यांत ओतली आणि त्याचे रक्‍त झाले. तेव्हा मी जलाच्या देवदूताला असे बोलताना ऐकले:जो तू आहेस व होतास जो तू पवित्र [“निष्ठावंत,” NW] आहेस त्या तू असा न्यायनिवाडा केला म्हणून तू न्यायी आहेस; कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्‍त पाडले आणि तू त्यांस रक्‍त प्यावयास लावले आहे; ह्‍यास ते पात्र आहेत.नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले:हो, हे प्रभु देवा [यहोवा, NW], हे सर्वसमर्था, तुझे न्याय सत्य व नीतीचे आहेत.’”प्रकटीकरण १६:४-७.

७. “नद्या व पाण्याचे झरे” याद्वारे काय चित्रित होते?

या “नद्या व पाण्याचे झरे” ह्‍या जगाने स्वीकारलेल्या मार्गदर्शन व ज्ञानाच्या तथाकथित ताज्या उगमास म्हणजे राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक तत्त्वज्ञानास चित्रित करतात. या उगमाद्वारे मानवी कार्यांना व निर्णयांना मार्गदर्शित केले जाते. जीवन-प्रदायक सत्यासाठी जीवनाचा झरा यहोवा याकडे बघण्याऐवजी लोकांनी आपल्यासाठी ‘फुटके हौद खोदून तयार केले’ आणि ‘देवास मूर्खपण वाटणाऱ्‍या जगाच्या ज्ञानाचे’ भरपूर प्राशन केले.—यिर्मया २:१३; १ करिंथकर १:१९; २:६; ३:१९; स्तोत्र ३६:९.

८. मानवजातीने स्वतःवर कोणत्या मार्गाने रक्‍तदोष ओढवून घेतला आहे?

अशा दूषित ‘पाण्यामुळे’ लोकांवर रक्‍तदोष आला. उदाहरणार्थ, या शतकाच्या युद्धात प्रचंड प्रमाणात रक्‍त सांडले किंवा ते काम करण्याचे प्रोत्साहन दिले यामुळे हा दोष ओढवला. अशा युद्धांमध्ये दहा कोटींपेक्षा अधिक लोकांचे बळी गेले. जेथे दोन महायुद्धे झाली त्या ख्रिस्ती धर्मजगतामध्ये प्रामुख्याने लोक ‘निर्दोष रक्‍तपात करण्यास त्वरेने’ धावले. त्यांनी देवाच्या स्वतःच्या लोकांचेही रक्‍त सांडले. (यशया ५९:७; यिर्मया २:३४) मानवजातीने रक्‍ताचा वापर मोठ्या प्रमाणात संक्रमणासाठी करून यहोवाच्या नीतीमान कायद्यांचा भंग केला व आपणावर रक्‍तदोष आणला. (उत्पत्ती ९:३-५; लेवीय १७:१४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) या कारणामुळे, अंगातील पेशींची नको असणारी वाढ, रक्‍तसंक्रमण, एडस्‌, यकृतरोग व इतर रोगांद्वारे दुःखाची कापणी करून घेतली. सर्व रक्‍तदोषाची पूर्ण शिक्षा ही आज्ञाभंजकांना “देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात” तुडविण्यात येईल तेव्हा मिळेल.—प्रकटीकरण १४:१९, २०.

९. तिसऱ्‍या वाटीच्या ओतण्यात कशाचा समावेश आहे?

मोशेच्या काळी नाईल नदीचे पाणी रक्‍तमय झाले तेव्हा मिसऱ्‍यांनी दुसऱ्‍या उगमाकडून पाणी मिळवून स्वतःचे जीवन रक्षिले. (निर्गम ७:२४) तथापि, आज सैतानी जगात लोकांना आध्यात्मिक पीडेत कोठेही जीवनदायी पाणी मिळत नाही. तिसरी वाटी ओतण्यामध्ये या घोषणेचाही समावेश आहे की, जगाच्या “नद्या व पाण्याचे झरे” रक्‍तमय झाले असून त्यात राहणाऱ्‍यांना आध्यात्मिक मृत्यू मिळेल. लोकांनी यहोवाकडे धाव घेतली नाही तर ते प्रतिकूल दंडाची कापणी मिळवतील.—पडताळा यहेज्केल ३३:११.

१०. ‘जलांचा देवदूत’ काय जाहीर करतो आणि याला ‘वेदी’ देखील कशी आपली साक्ष जोडते?

१० ‘जलांचा देवदूत’ म्हणजे जो पाण्यावर ती वाटी ओततो, तो यहोवाला विश्‍वाचा न्यायाधीश असे संबोधून त्याचे नीतीचे निर्णय पूर्ण आहेत असे म्हणतो. या कारणामुळेच यहोवाने केलेल्या न्यायासाठी “ते पात्र आहेत” असेही तो देवदूत म्हणतो. कदाचित या देवदूताने, हजारो वर्षांपासून या दुष्ट जगाचे खोटे शिक्षण व तत्त्वज्ञान यामुळे जो रक्‍तपात व क्रूरता यांची घाण वाढवली ती पाहिली असेल. यामुळे, यहोवाचे निर्णय न्यायी आहेत हे त्याला माहीत आहे. देवाची ‘वेदी’ देखील तेच म्हणते. ज्यांचा वध करण्यात आला अशांचे आत्मे वेदीखाली असल्याचे प्रकटीकरण ६:९, १० मध्ये सांगण्यात आले. याप्रकारे ‘वेदी’ देखील यहोवाचे निर्णय न्यायी व नीतीमान असल्याची साक्ष जोडते. * खरेच, ज्यांनी रक्‍त सांडले आहे आणि रक्‍ताचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग घडवून आणला आहे, अशांना यहोवाद्वारे मिळणाऱ्‍या मृत्युदंडाच्या शिक्षेच्या अनुरोधात रक्‍त पिण्यास लावावे हे योग्यच आहे.

लोकांना अग्नीने करपवून टाकणे

११. देवाच्या क्रोधाच्या चवथ्या वाटीचे लक्ष्य कोणावर आहे व ती ओतल्यावर काय घडते?

११ देवाच्या क्रोधाच्या चवथ्या वाटीचे लक्ष्य सूर्य आहे. योहान आम्हाला सांगतो: चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.प्रकटीकरण १६:८, ९.

१२. या जगाचा ‘सूर्य’ कोण आहे व या लाक्षणिक सूर्याला काय करण्याचे सोपवले आहे?

१२ आज, युगाच्या समाप्तीच्या काळात येशूचे आध्यात्मिक बांधव ‘आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशत’ आहेत. (मत्तय १३:४०, ४३) स्वतः येशूसुद्धा “न्याय्यत्वाचा सूर्य” आहे. (मलाखी ४:२) तथापि, मानवजातीचा आपला ‘सूर्य’ म्हणजे, देवाच्या राज्याच्या विरुद्ध चकाकणारे तिचे अधिपती होय. चवथ्या कर्ण्याच्या निनादाने घोषित केले की, ख्रिस्ती धर्मजगताच्या आकाशातील ‘सूर्य, चंद्र व तारे’ उजेडाचे नव्हे तर अंधःकाराचे उगम आहेत. (प्रकटीकरण ८:१२) आता देवाच्या क्रोधाची चवथी वाटी दाखवते की, जगाचा ‘सूर्य’ अधिकच तप्त होईल. जे त्यांच्याकडे सूर्यासारखे अधिपती या दृष्टीने बघतात ते मानवजातीला “करपवून” टाकतील. हे काम लाक्षणिक सूर्याला दिले जाईल. दुसऱ्‍या शब्दात म्हणायचे तर यहोवा त्याच्या अग्नीमय न्यायदंडाची पूर्ती मानवजातीवर अशा पद्धतीने होऊ देण्याची मुभा देईल. तेव्हा हे होरपळणे कशा पद्धतीने पूर्ण झाले?

१३. या जगाच्या सूर्यासारख्या अधिपतींनी मानवजातीला कशाप्रकारे “करपवून” टाकले आहे?

१३ पहिल्या जागतिक महायुद्धानंतर या जगाच्या अधिपतींनी जागतिक सुरक्षेचा प्रश्‍न सुटावा म्हणून राष्ट्र संघ या संघटनेची प्रस्थापना केली. पण ती अपयशी ठरली. या कारणामुळे फॅसिस्ट मतप्रणाली व नात्सी मतप्रणाली या प्रकारातील वेगळ्या अधिपत्याचा प्रयोग करून पाहण्यात आला. कम्युनिस्ट मतप्रणाली पसरत चालली. अशाप्रकारे मानवजातीची स्थिती सुधारण्याऐवजी या जगातील सूर्यासारखे शास्ते, लोकांना ‘कडक उन्हाने करपून टाकू लागले.’ स्पेन, इथियोपिया व मांचुरिया येथील मुलकी युद्धांनी दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाकडे वाट धरली. आधुनिक इतिहास अहवाल देतो की, मुसोलिनी, हिटलर आणि स्टॅलिन हे हुकुमशहा थेटपणे वा अप्रत्यक्षपणे करोडोंच्या मृत्यूकरता जबाबदार आहेत. यामध्ये त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रातील बळीही आहेत. अलिकडेच व्हिएतनाम, कंम्पुचिया, इराण, लेबनन आणि आयर्लंड तसेच लॅटिन अमेरिका व आफ्रिका येथील देशातील मुलकी आणि आंतरराष्ट्रीय झगड्यांमध्ये लोक ‘करपून निघाले.’ यामध्ये बलाढ्य सत्तांमधील सतत चालू राहणाऱ्‍या चकमकी आहेत, ज्यांच्यापाशी मानवजातीला संपूर्ण नष्ट करणारी भयानक अण्वस्त्रे आहेत. या शेवटल्या काळात मानवजातीला ‘सूर्याची’ दाहकता, तिच्या अधार्मिक अधिपतींद्वारे खरेच होरपळून टाकत आहे. देवाच्या क्रोधाची चवथी वाटी ओतल्यामुळे या ऐतिहासिक विधानाला सत्यता मिळाली आणि याची ग्वाही देवाच्या लोकांनी सबंध जगभर दिली.

१४. मानवजातीच्या समस्यांसाठी एकमात्र उपाय कोणता आहे असे यहोवाच्या साक्षीदारांनी सतत शिकवले आहे; पण याला मानवजातीचा एकंदर प्रतिसाद काय आहे?

१४ मानवजातीला गोंधळात टाकणाऱ्‍या समस्यांचा एकमात्र उपाय देवाचे राज्य आहे असे यहोवाच्या साक्षीदारांनी सतत शिकवले आहे. या राज्याद्वारेच यहोवा आपले नाव पवित्र करण्याचा उद्देश राखून आहे. (स्तोत्र ८३:४, १७, १८; मत्तय ६:९, १०) तथापि, या उपायाकडे मानवजातीने एकंदरीत दुर्लक्षच केले आहे. काही देवाच्या राज्याला नकार दर्शवतात व सोबत देवाच्या नावाची निंदाही करतात. हेच फारोने यहोवाच्या सार्वभौमत्वास ओळखण्याचे नाकारताना दाखवले. (निर्गम १:८-१०; ५:२) मशीही राज्याबद्दल मुळीच आस्था न बाळगल्यामुळे या विरोधकांना त्यांच्या स्वतःच्या ‘सूर्याकडून’, जाचक मानवी राजवटीपासून करपून घेणे बरे वाटते.

श्‍वापदाचे सिंहासन

१५. (अ) पाचवी वाटी कशावर ओतण्यात आली? (ब) ‘श्‍वापदाचे आसन’ काय आहे आणि त्यावर वाटी ओतणे यात काय समाविष्ट आहे?

१५ पुढचा देवदूत कशावर आपली वाटी ओततो? पाचव्याने आपली वाटी श्‍वापदाच्या आसनावर ओतली.” (प्रकटीकरण १६:१०अ) ‘श्‍वापद’ ही सैतानाची राजकीय व्यवस्था आहे. त्याला खरोखरचे आसन नाही; कारण प्रत्यक्षात श्‍वापद हे काही खरे श्‍वापद नाही. तरीपण आसन हा जो उल्लेख करण्यात आला आहे तो या श्‍वापदाने मानवजातीवर जो बादशाही अधिकार चालविला आहे त्याला अनुलक्षून आहे आणि हे, श्‍वापदाच्या प्रत्येक डोक्यावर बादशाही मुकुट आहे त्याजशी सुसंगत आहे. वस्तुतः ‘श्‍वापदाचे आसन’ हे त्या अधिकाराचा पाया किंवा उगम आहे. * श्‍वापदाच्या बादशाही अधिकाराच्या खऱ्‍या परिस्थितीबद्दल बायबल असे म्हणून स्पष्टता देते की, “त्याला [श्‍वापदाला] अजगराने आपली शक्‍ति, आपले आसन व मोठा अधिकार दिला.” (प्रकटीकरण १३:१, २; १ योहान ५:१९) अशाप्रकारे, श्‍वापदाच्या आसनावर वाटी ओतण्यामध्ये, सैतानाने श्‍वापदाला पाठबळ देण्यात व पुढे करण्यात जी खरी भूमिका केली आहे व करीत आहे ती प्रकटविण्याची घोषणा करण्याचे समाविष्ट आहे.

१६. (अ) राष्ट्रांना जाणीव असो की नसो, ते कोणाची भक्‍ती करीत आहेत? विवेचित करा. (ब) हे जग सैतानाचे व्यक्‍तिमत्व कसे परावर्तीत करते? (क) श्‍वापदाचे आसन केव्हा उलटविण्यात येणार?

१६ सैतान व राष्ट्रे यांजमधील हा संबंध कसा राखला जातो? सैतानाने येशूची परीक्षा घेतली तेव्हा त्याला दृष्टांतात जगातील सर्व राज्ये दाखवली आणि “ह्‍यांवरचा सर्व अधिकार व ह्‍यांचे वैभव” त्याला सादर केले. पण यामध्ये एक अट होती—येशूने प्रथम सैतानापुढे उपासनेचे एक कृत्य करून दाखवायचे होते. (लूक ४:५-७) तर मग जगातील सरकार त्यांचा अधिकार त्याच्यापासून काही कमी अटीवर मिळवू शकतील असा विचार करता येईल का? मुळीच नाही. बायबलच्या मते सैतान हा या व्यवस्थीकरणाचा देव आहे, यामुळे राष्ट्रांना याची जाणीव असो किंवा नसो, ते त्याची भक्‍ती करीत असतात. (२ करिंथकर ४:३, ४) * ही परिस्थिती सध्याच्या जागतिक व्यवस्थीकरणाच्या घडणीवर प्रकट होते, कारण त्याची उभारणी ही संकुचित असा राष्ट्रवाद, द्वेष व स्वार्थ यावर झालेली आहे. त्याचे संघटन सैतानाच्या इच्छेनुरुप, मानवजातीला आपल्या ताब्यात ठेवावे म्हणून झाले आहे. सरकारमधील भ्रष्टाचार, सत्तेची लालसा, चतुरपणे लबाडी करणे, शस्त्रस्पर्धा या सर्व गोष्टी सैतानाच्या हिणकस वृत्ती परावर्तीत करतात. सैतानाच्या अधार्मिक दर्जांना हे जग आपले सहमत देत आहे व याद्वारे ते त्याला आपला देव बनवीत आहे. जेव्हा श्‍वापदाचा नाश होईल आणि देवाचे स्त्री संतान सरतेशेवटी सैतानालाच अगाधकूपात टाकील तेव्हा श्‍वापदाचे आसन उलटविण्यात येईल.—उत्पत्ती ३:१५; प्रकटीकरण १९:२०, २१; २०:१-३.

अंधकार व यातना

१७. (अ) श्‍वापदाच्या राज्याला जो आध्यात्मिक अंधकार सातत्याने घेरून आहे त्याचा पाचवी वाटी ओतल्याशी कसा संबंध आहे? (ब) देवाच्या क्रोधाची पाचवी वाटी ओतण्यामुळे लोक कशी प्रतिक्रिया दाखवतात?

१७ या श्‍वापदाचे राज्य आरंभापासूनच आध्यात्मिक अंधःकारात राहिले आहे. (पडताळा मत्तय ८:१२; इफिसकर ६:११, १२.) पाचवी वाटी या अंधःकाराची प्रखर जाहीर घोषणा करते. त्यात नाट्यमय कृतीही करण्यात येते म्हणजेच, देवाच्या क्रोधाची वाटी लाक्षणिक श्‍वापदाच्या प्रत्यक्ष आसनावर ओतण्यात येते. तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले, आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या. आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही.प्रकटीकरण १६:१०ब, ११.

१८. पाचव्या कर्ण्याचा निनाद आणि देवाच्या क्रोधाची पाचवी वाटी यांजमध्ये कोणती साम्यता आहे?

१८ पाचव्या कर्ण्याचा निनाद हा देवाच्या क्रोधाच्या पाचव्या वाटीप्रमाणे नाही, कारण कर्ण्याच्या नादाने टोळांची पीडा घोषित केली. तरीपण टोळांची पीडा सुरु होत असता सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली हे लक्षात घ्या. (प्रकटीकरण ९:२-५) तसेच आपण, यहोवाने मिसरावर जी टोळधाडीची पीडा आणली होती त्याबद्दल निर्गम १०:१४, १५ मध्ये असे वाचतो: “ते असंख्य होते. ह्‍यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्‍यापुढेहि कधी येणार नाहीत. त्यांनी सर्व भूमि झाकून टाकिल्यामुळे साऱ्‍या देशावर अंधार पडला.” होय, अंधार! जगाची सध्याची अंधकारमय स्थिती ही पाचव्या कर्ण्याच्या निनादामुळे आणि देवाच्या क्रोधाची पाचवी वाटी ओतल्यामुळे सर्वांना दृश्‍यमान झाली. आधुनिक काळातील टोळधाडीने दिलेल्या दंशपूर्ण संदेशाने, “प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली” अशा दुष्ट माणसांना यातना व दुःख दिले.—योहान ३:१९.

१९. सैतानाला या व्यवस्थीकरणाचा देव असे जाहीरपणे उघड करून दाखवण्यात आल्यामुळे प्रकटीकरण १६:१०, ११ च्या अनुषंगाने कोणता परिणाम घडतो?

१९ सैतानाने जागतिक अधिपती या नात्याने पुष्कळ दुःख व त्रास दिला आहे. दुष्काळ, युद्धे, हिंसाचार, गुन्हे, मादक औषधांचा अतिरेक, अनैतिकता, लैंगिकदृष्ट्या संक्रमित होणारे आजार, अप्रामाणिकता, धार्मिक ढोंगीपणा—या सर्व सैतानी व्यवस्थीकरणाच्या छाप देणाऱ्‍या गोष्टी आहेत. (पडताळा गलतीकर ५:१९-२१.) याचप्रमाणे, सैतान हा या व्यवस्थीकरणाचा देव आहे हे जाहीरपणे उघड करण्यात आल्यामुळे देखील त्याच्या दर्जांनुरुप राहणाऱ्‍यांना यातना मिळत आहेत. खासपणे ख्रिस्ती धर्मजगतातील “लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या.” सत्यामुळे त्यांची राहणीमानाची जी पद्धत उघड केली जाते तिजमुळे पुष्कळांना राग येतो. काहींना ती दहशत वाटते म्हणून ते, ती प्रसिद्ध करणाऱ्‍यांचा छळ करतात. ते देवाच्या राज्याला धिक्कारतात आणि यहोवाच्या पवित्र नामाची निंदा करतात. त्यांची धार्मिक दृष्ट्या आजारी व रोगग्रस्त स्थिती उघड झाली यासाठी ते स्वर्गाच्या देवाची निंदा करतात. ते ‘आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप करीत नाहीत.’ यामुळे या व्यवस्थीकरणाच्या नाशाआधी प्रचंड समुदायाचे परिवर्तन होऊ शकेल अशी अपेक्षा आम्ही धरू शकत नाही.—यशया ३२:६.

फरात नदीचे पाणी आटले

२०. सहाव्या कर्ण्याचा निनाद आणि सहाव्या वाटीचे ओतणे यात फरात नदीचा संबंध असल्याचे कसे दाखवते?

२० सहाव्या कर्ण्याच्या निनादामुळे ‘फरात महानदीवर बांधून ठेवण्यात आलेल्या चार देवदूतांना’ मोकळे करण्याची सूचना मिळाली. (प्रकटीकरण ९:१४) ऐतिहासिकदृष्ट्या, बाबेल या मोठ्या नगरीने फरात नदीवर आपले वर्चस्व राखले होते. मग, १९१९ मध्ये चार लाक्षणिक दूतांची सुटका झाल्यामुळे मोठ्या बाबेलचे अभूतपूर्व पतन घडले. (प्रकटीकरण १४:८) या कारणामुळेच देवाच्या क्रोधाच्या सहाव्या वाटीचा संबंध फरात नदीसोबत आहे ते योग्यच आहे: सहाव्याने आपली वाटी फरात महानदावर ओतली तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे पाणी आटून गेले.” (प्रकटीकरण १६:१२) ही देखील मोठ्या बाबेलसाठी वाईट वार्ता आहे!

२१, २२. (अ) सा. यु. पूर्व ५३९ मध्ये बाबेलसाठी फरात नदीचे संरक्षक पाणी कसे आटले गेले? (ब) मोठी बाबेल ज्यावर बसली आहे ती ‘जले’ कोणती आहेत आणि हे लाक्षणिक जल आता देखील कसे आटत चालले आहे?

२१ प्राचीन बाबेलच्या भरभराटीच्या काळात, फरात नदीला असलेले मुबलक पाणी हे त्यांच्या संरक्षण व्यवस्थेचा भाग होते. तथापि, सा. यु. पूर्व ५३९ मध्ये पारसाचा नेता कोरेश ह्‍याने या पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवला तेव्हा ते पाणी आटले. अशाप्रकारे पारसाचा कोरेश व दारयावेश मेदी या “उगवतीपासून” (म्हणजे, पूर्वेकडून) येणाऱ्‍या राजांना बाबेलात येऊन त्यास जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. त्या मोठ्या शहराला कठीण काळात फरात नदीने संरक्षण देण्यात अपयश दाखवले. (यशया ४४:२७–४५:७; यिर्मया ५१:३६) आधुनिक बाबेल, खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य याच्या बाबतीत असेच काही घडणार आहे.

२२ मोठी बाबेल ‘अनेक जलप्रवाहांवर बसलेली’ आहे. प्रकटीकरण १७:१, १५ नुसार ही गोष्ट “लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे”—ज्यांनी तिला आपले संरक्षण मानले असे तिचे पाठीराखे, यांना सूचित करते. पण हे ‘जल’ आता आटत आहे! पूर्वी पश्‍चिम युरोपात तिचा खूप जम होता पण आता तेथे दहा कोटींनी उघडपणे धर्माचा त्याग केला आहे. इतर काही देशात धर्माचे प्राबल्य नष्ट करण्याचा प्रयत्न करणे हे घोषित धोरण बनले आहे. तेथील प्रचंड जनसमूह तिच्या वतीने उठला नाही. याचप्रमाणे, मोठ्या बाबेलची नष्ट होण्याची वेळ येईल तेव्हा तिला आधार देणाऱ्‍यांची घटणारी संख्या तिला मुळीच संरक्षक ठरणार नाही. (प्रकटीकरण १७:१६) मोठी बाबेल स्वतःपाशी हजारो, लाखो सदस्य असल्याचा दावा करते पण ‘सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्‍या राजांपुढे’ तिला कसलेही संरक्षण राहणार नाही.

२३. (अ) सा. यु. पूर्व ५३९ मध्ये ‘सूर्याच्या उगवतीपासून’ आलेले राजे कोण होते? (ब) प्रभूच्या दिवसात ‘सूर्याच्या उगवतीपासून येणारे राजे’ कोण आहेत आणि ते मोठ्या बाबेलचा कसा नाश करतील?

२३ हे राजे कोण आहेत? मागे, सा. यु. पूर्व ५३९ मध्ये यहोवाने प्राचीन बाबेल शहरास जिंकण्यासाठी ज्यांचा उपयोग केला होता ते दारयावेश मेदी व पारसाचा कोरेश होते. आता प्रभूच्या दिवसात मोठ्या बाबेलची खोटी धर्म व्यवस्था देखील मानवी अधिपतींकरवीच नष्ट केली जाईल. पण पुन्हा हा ईश्‍वरी न्यायदंड असेल. ‘सूर्याच्या उगवतीपासून येणारे राजे,’ यहोवा देव व येशू ख्रिस्त, मोठ्या बाबेलीस उलटवून तिला सर्वतोपरी नष्ट करण्याचे मानवी अधिपतींच्या ‘मनात घालतील.’ (प्रकटीकरण १७:१६, १७) सहावी वाटी ओतणे हे जाहीरपणे, हा न्यायदंड पूर्ण होण्याच्या बेतात असल्याचे जाहीरपणे घोषित करतो!

२४. (अ) यहोवाच्या क्रोधाच्या पहिल्या सहा वाट्यातील संदेश कसे घोषित करण्यात आले आहेत आणि कोणत्या परिणामासह? (ब) देवाच्या क्रोधाच्या राहिलेल्या वाटीबद्दल सांगण्याआधी प्रकटीकरण काय प्रकटविते?

२४ यहोवाच्या क्रोधाच्या पहिल्या सहा वाट्यांमध्ये शुद्धीवर आणणारा संदेश आहे. देवाचे पृथ्वीवरील सेवक, देवदूतांच्या पाठबळाने हा संदेश जगभर जाहीर करण्यात मग्न आहेत. अशाप्रकारे, सैतानाच्या जागतिक व्यवस्थेच्या सर्व भागावर योग्य तो इशारा देण्यात आला आहे आणि यहोवाने वैयक्‍तिकांना नीतीमत्तेकडे वळण्याची व जिवंत राहण्याची संधी दिली आहे. (यहेज्केल ३३:१४-१६) तरीपण देवाच्या क्रोधाची अजून एक वाटी शिल्लक आहे. पण याबद्दल सांगण्याआधी प्रकटीकरण, सैतान व त्याचे पृथ्वीवरील प्रतिनिधी, यहोवाच्या न्यायदंडाच्या जाहीर घोषणेबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवीत आहेत त्याबद्दल सांगते.

हर्मगिदोनाकडे एकत्र होणे

२५. (अ) योहान आम्हास अशुद्ध, बेडकासारखा असा “प्रेरणेने निघालेला प्रचार” याबद्दल काय सांगतो? (ब) प्रभूच्या दिवसात बेडकासारखा किळसवाणा “अशुद्ध प्रेरणेने निघालेला प्रचार” कसा आला व याचा काय परिणाम होतो?

२५ योहान आम्हास सांगतो: नंतर बेडकांसारखे असलेले तीन, अशुद्ध आत्मे [“अशुद्ध प्रेरणेने निघालेला प्रचार,” NW] अजगराच्या तोंडातून, श्‍वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्हे दाखविणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांस एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात.” (प्रकटीकरण १६:१३, १४) मोशेच्या काळी यहोवाने फारोच्या मिसरावर बेडकांची किळसवाणी पीडा आणली व यामुळे “सर्व जमिनीवर घाण सुटली.” (निर्गम ८:५-१५) प्रभूच्या दिवसात देखील बेडकांची किळसवाणी भेट दिसली, पण ती वेगळ्या उगमाकडून होती. यात सैतानाद्वारे “अशुद्ध प्रेरणेने निघालेला प्रचार” समाविष्ट आहे, जो सर्व मानवी अधिपतींना, “राजांस,” यहोवा देवाविरुद्ध उभे राहण्याचे वक्‍तव्य करीत होता. याद्वारे सैतान याची खात्री करून घेतो की, ते देवाच्या क्रोधाची वाटी ओतल्यामुळे त्यात वाहवून जात नाही, तर उलटपक्षी, जेव्हा ‘सर्वसमर्थ देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई’ सुरु होईल तेव्हा ते सैतानाच्या बाजूस राहतील.

२६. (अ) हा सैतानी प्रचार कोणत्या तीन उगमापासून येतो? (ब) तो ‘खोटा संदेष्टा’ कोण आहे व हे आपल्याला कसे कळते?

२६ हा प्रचार ‘अजगर’ (सैतान) आणि ‘श्‍वापद’ (सैतानाची पृथ्वीवरील राजकीय संघटना) यांजकडून येतो आणि या प्राण्यांबद्दल आपल्याला प्रकटीकरणामधून आधीच शिकायला मिळाले. पण हा ‘खोटा संदेष्टा’ कोण आहे? हे नावीन्य केवळ नावातच आहे. मागे, आपण दोन शिंगे असणाऱ्‍या व कोकऱ्‍याप्रमाणे दिसणाऱ्‍या एका श्‍वापदाची ओळख मिळवली होती; हे श्‍वापद सात डोकी असलेल्या श्‍वापदापुढे चिन्ह करते. ह्‌या फसव्या प्राण्यानेच श्‍वापदासाठी संदेष्ट्याप्रमाणे काम केले. त्याने श्‍वापदाची भक्‍ती करण्याची चालना दिली आणि त्याची मूर्ती देखील स्थापन केली. (प्रकटीकरण १३:११-१४) अशाप्रकारे हे दोन शिंगे असणारे व कोकऱ्‍यासारखे दिसणारे श्‍वापद येथे उल्लेखिलेला ‘खोटा संदेष्टा’ आहे. याची पुष्टी म्हणून आम्हाला नंतर कळवले आहे की, या खोट्या संदेष्ट्याने, दोन शिंगे असणाऱ्‍या लाक्षणिक श्‍वापदाप्रमाणेच “श्‍वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्‍या लोकांस त्याच्यासमोर [सात डोकी असणारे श्‍वापद] चिन्हे करून ठकविले होते.”—प्रकटीकरण १९:२०.

२७. (अ) स्वतः येशू ख्रिस्त कोणता समयोचित इशारा देतो? (ब) येशूने पृथ्वीवर असताना कोणता इशारा दिला होता? (क) प्रेषित पौलाने येशूच्या इशाऱ्‍याचा प्रतिध्वनी कसा उमटवला?

२७ असा सैतानी प्रचार सभोवताली असताना, योहानाचे पुढील शब्द अगदी समयोचित आहेत: पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य.” (प्रकटीकरण १६:१५) हा कोण ‘चोरासारखा’ येतो? स्वतः येशू, यहोवाकडील दंडाज्ञा बजावणारा असा अघोषित समयी येतो. (प्रकटीकरण ३:३; २ पेत्र ३:१०) पृथ्वीवर असताना येशूने आपले येणे चोरासारखे असेल असे याप्रकारे म्हटले होते: “म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हांस ठाऊक नाही. म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्तय २४:४२, ४४; लूक १२:३७, ४०) याच इशाऱ्‍याबद्दल प्रतिध्वनी उमटवून प्रेषित पौल म्हणाला: “जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा [यहोवा, NW] दिवस येतो. शांति आहे, निर्भय आहे, असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात्‌ वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात्‌ नाश होतो.” सैतान आता देखील राष्ट्रांना “शांति आहे, निर्भय आहे,” ही घोषणा करण्याकडे निरवीत आहे!—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३.

२८. जागतिक दबावाचा प्रतिकार करण्यासंबंधाने येशूने कोणता इशारा दिला आणि “पाशाप्रमाणे” अकस्मात न येण्याची ख्रिश्‍चनांनी अपेक्षा बाळगण्याजोगा “तो दिवस” कोणता आहे?

२८ प्रचारामुळे भारावून जाऊन हे जग ख्रिश्‍चनांवर जो दबाव आणणार आहे त्याबद्दल देखील येशूने इशारा दिला. तो म्हणाला: “तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित्‌ अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; . . . तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.” (लूक २१:३४-३६) “तो दिवस” ‘सर्वसमर्थ देवाचा मोठा दिवस’ आहे. (प्रकटीकरण १६:१४) यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करणारा “तो दिवस” जवळ येत असता, संसाराच्या चिंतांमुळे अधिकच कठीण वाटत आहे. यामुळेच ख्रिश्‍चनांनी तो दिवस येईपर्यंत, दक्ष व जागृत राहिले पाहिजे.

२९, ३०. (अ) जे निद्रावश आढळतील अशांना त्यांची बाह्‍य “वस्त्रे” काढून लज्जा आणली जाईल या येशूच्या शब्दांद्वारे कोणता अर्थ ध्वनित होतो? (ब) बाह्‍य वस्त्रे, घालणाऱ्‍यांच्या बाबतीत कसली ओळख देतात? (क) एखादा आपली ही लाक्षणिक बाह्‍य वस्त्रे कशी गमावू शकतो आणि कोणत्या परिणामासह?

२९ पण जे झोपलेले आढळतील त्यांची “वस्त्रे” काढून घेतली जातील व लाज लोकांस दिसून येईल या इशाऱ्‍याचा काय अर्थ होतो? इस्राएलात प्राचीन काळी मंदिरात काम करणारा याजक किंवा पहारा देणारा लेवी यावर मोठी जबाबदारी होती. कोणाला झोपलेल्या स्थितीत धरण्यात आले तर, यहूदी विवेचनकार सांगतात की, त्याची वस्त्रे काढून जाळली जात व अशाप्रकारे त्याला जाहीरपणे लज्जा मिळे.

३० आजही असेच काही घडू शकते असा इशारा येशू देतो. याजक व लेवी हे येशूच्या अभिषिक्‍त बांधवांना चित्रित करतात. (१ पेत्र २:९) पण येशूचा हा इशारा पुढे मोठ्या लोकसमुदायाला देखील लागू होतो. येथे सांगण्यात आलेली बाह्‍य वस्त्रे, धारण करणाऱ्‍याला यहोवाचा ख्रिस्ती साक्षीदार असल्याची ओळख देतात. (पडताळा प्रकटीकरण ३:१८; ७:१४.) जर कोणी सैतानाच्या दबावाला आपणावर येऊ देतो आणि आपणावर झोपेची गुंगी किंवा अक्रियाक स्थिती आणू देतो तर ते त्यांची बाह्‍य वस्त्रे गमावू शकतील—याचा अर्थ ख्रिस्ती या नात्याने ते आपली ओळख गमावू शकतील. अशी परिस्थिती खरीच लज्जास्पद असेल. यामुळे स्वतःला कायमचाच गमावण्याचा धोका असू शकतो.

३१. (अ) प्रकटीकरण १६:१६ हे ख्रिश्‍चनांनी जागृत राहण्याच्या निकडीवर कशी अधिक भर देते? (ब) हर्मगिदोनबद्दल काही धर्मपुढाऱ्‍यांनी कोणता अंदाज काढला आहे?

३१ प्रकटीकरणाचे पुढील वचन पूर्णतेला येत असता ख्रिश्‍चनांनी जागृत राहण्याची गरज, अधिकच निकडीची बनते: त्यांनी [दुरात्म्यांद्वारे प्रेरित असलेल्या प्रचाराने] त्यांना [पृथ्वीवरील राजे किंवा अधिपती] इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.” (प्रकटीकरण १६:१६) याला सर्वसाधारणपणे आर्मगिदोन या नावाने संबोधले जाते व हे नाव बायबलमध्ये केवळ एकदाच दिसते. पण त्याने तर मानवजातीच्या विचाराला चक्रावून सोडले आहे. जागतिक नेत्यांनी संभाव्य अशा अण्वस्र आर्मगिदोनाचा इशारा दिला आहे. आर्मगिदोनाचा संबंध, बायबलच्या काळी जेथे अनेक निर्णायक युद्धे लढविण्यात आली त्या मगिद्दोच्या प्राचीन शहरासोबत बहुधा लावण्यात येतो व यामुळेच काही धर्मपुढाऱ्‍यांनी असा अंदाज केला आहे की, पृथ्वीवरील शेवटले युद्ध याच मर्यादित क्षेत्रात होईल. पण याबाबतीत, ते सत्यापासून खूपच दूर आहेत.

३२, ३३. (अ) हर्मगिदोन किंवा आर्मगिदोन हे खरोखरचे स्थळ असण्याऐवजी ते कशाचे प्रतिनिधीत्व करते? (ब) बायबलमधील इतर कोणत्या संज्ञा “आर्मगिदोन” याच्याशी संबंधित किंवा त्याला अनुलक्षून आहेत? (क) देवाच्या क्रोधाची शेवटची वाटी ओतण्याची सातव्या देवदूताची वेळ केव्हा येईल?

३२ हर्मगिदोन या शब्दाचा अर्थ “मगिद्दोचा डोंगर” असा होतो. पण हे खरोखरचे ठिकाण असण्याऐवजी, ते जेथे सर्व राष्ट्रे यहोवा देवाविरुद्ध उभी ठाकतील त्या जागतिक परिस्थितीला अनुलक्षून आहे आणि या परिस्थितीमध्येच तो त्यांचा शेवटी नाश करील. याचे क्षेत्र जगव्याप्त आहे. (यिर्मया २५:३१-३३; दानीएल २:४४) ते ‘देवाच्या क्रोधाचे मोठे द्राक्षकुंड,’ ‘निर्णयाचे खोरे,’ व ‘यहोशाफाटाचे खोरे’ यासारखेच आहे; येथे सर्व राष्ट्रांना यहोवा एकत्र जमवून त्यांची हत्या करणार. (प्रकटीकरण १४:१९; योएल ३:१२, १४) ते ‘इस्राएलाच्या देशासोबत’ देखील संबंधित आहे, जेथे मागोगचा गोग या सैतानाच्या सैन्याचा संहार केला जातो; तसेच ते “समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान” जेथे मीखाएल या मोठ्या अधिपतीद्वारे उत्तरेच्या राजाचा “एकंदर नाश” केला जाईल, त्याला अनुलक्षून आहे.—यहेज्केल ३८:१६-१८, २२, २३; दानीएल ११:४५–१२:१, NW.

३३ सैतान तसेच त्याच्या पृथ्वीवरील प्रतिनिधींद्वारे केल्या जाणाऱ्‍या कर्कश प्रचारामुळे जेव्हा राष्ट्रांना त्या परिस्थितीकडे निरवण्यात येईल तेव्हाच सातव्या देवदूताने देवाच्या क्रोधाची आपली शेवटची वाटी ओतण्याची वेळ असेल.

“झाले!”

३४. सातवा देवदूत आपली वाटी कोठे ओततो आणि “मंदिरातून, राजासनापासून” कोणती वाणी निघते?

३४ सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी वाणी मंदिरातून, राजासनापासून निघाली; ती म्हणाली:झाले!’”प्रकटीकरण १६:१७.

३५. (अ) प्रकटीकरण १६:१७ मधील ‘अंतराळ’ काय आहे? (ब) आपली वाटी अंतराळात ओतण्याद्वारे तो सातवा देवदूत काय व्यक्‍त करतो?

३५ ज्यावर पीडा येते ते ‘अंतराळ,’ जीवन टिकवून ठेवणारे असे शेवटले माध्यम आहे. पण हे काही खरोखरीचे अंतराळ नाही. कारण यहोवाचा प्रतिकूल न्यायदंड येऊ शकेल असे खऱ्‍या अंतराळाने काही केले नाही; तसेच खरी पृथ्वी, समुद्र, ताज्या पाण्याचे झरे किंवा सूर्य यांना यहोवाच्या हातून न्यायदंड मिळण्याची काहीही आवश्‍यकता नाही. उलटपक्षी, ते ‘अंतराळ’ तेच आहे, ज्याबद्दल पौल चर्चा करताना सांगत होता की, सैतान हा “अंतरिक्षातील राज्याचा अधिपति” आहे. (इफिसकर २:२) तर ते सैतानी ‘अंतराळ’ आहे ज्यामधून हे जग सध्या श्‍वासोच्व्छास करीत आहे, तो आत्मा किंवा सर्वसाधारण मानसिक स्थिती जी सबंध दुष्ट व्यवस्थीकरणाचे लक्षण दाखवते. यहोवाच्या संघटनेबाहेरील जीवनात सैतानी विचारांचा आत्मा सर्वत्र भरला आहे. यास्तव, सातवा देवदूत आपली वाटी अंतराळात ओततो तेव्हा तो सैतान, त्याची संघटना आणि मानवजातीला यहोवाच्या सार्वभौमत्वाला झुगारून ज्या गोष्टी सैतानाचे पाठीराखे बनण्यात मदत करीत आहेत त्या सर्वांवर देवाचा क्रोध व्यक्‍त करतो.

३६. (अ) सात पीडांमध्ये काय समाविष्ट आहे? (ब) यहोवाने “झाले!” असे जे म्हटले त्याचा काय अर्थ होतो?

३६ ही आणि आधीच्या सहा पीडा, सैतान व त्याच्या व्यवस्थीकरणाविरुद्ध यहोवाच्या न्यायदंडांचा सारांश देतात. ते सैतान व त्याच्या संतानासाठी नाशाची घोषणा करतात. ही शेवटली वाटी ओतल्यावर यहोवा स्वतः जाहीर करतो: “झाले!” याशिवाय आणखी काही सांगायचे नाही. यहोवाच्या क्रोधाच्या वाट्यातील विषयांची यहोवाच्या मनाप्रमाणे जाहीर घोषणा होईल तेव्हा, या संदेशाद्वारे जे काही घोषित करण्यात आले त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात कसलीही दिरंगाई होणार नाही.

३७. देवाच्या क्रोधाची सातवी वाटी ओतल्यावर काय घडते याचे वर्णन योहान कसे करतो?

३७ योहान पुढे म्हणतो: तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला, की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूमिकंप कधी झाला नव्हता. मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला तीव्र क्रोधरुपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला द्यावा म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले. प्रत्येक बेट पळून गेले, आणि डोंगरांचा ठावठिकाणाहि राहिला नाही. सुमारे एक मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा अतिभयंकर होती.प्रकटीकरण १६:१८-२१.

३८. याद्वारे काय सूचित होते: (अ) “मोठा भूमिकंप”? (ब) ‘मोठी बाबेल नगरी तीन विभागात’ फुटली? (क) “प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगरांचा ठावठिकाणाहि राहिला नाही”? (ड) ‘गारांची पीडा’?

३८ परत एकदा, यहोवा न चुकता मानवजातीबद्दल कार्यहालचाल करतो व हे “विजा, वाणी व मेघगर्जना” याद्वारे दाखवण्यात आले आहे. (पडताळा प्रकटीकरण ४:५; ८:५.) मनुष्यजातीला जणू एका मोठ्या विध्वंसक भूकंपाद्वारे, पूर्वी कधीही नव्हते इतक्या भयानकपणे हादरविण्यात येईल. (पडताळा यशया १३:१३; योएल ३:१६.) या भयानक स्फोटाच्या हादऱ्‍यामुळे ‘मोठ्या बाबेल नगरीचे’ ‘तीन विभागात’ तुकडे होतात—हे त्या पतनाचे लाक्षणिक रुप आहे की ज्या नाशापासून पुन्हा जुळणी होऊ शकत नाही. शिवाय, “राष्ट्रांची नगरे” कोसळतील. “प्रत्येक बेट,” व ‘डोंगर’—या व्यवस्थीकरणात स्थिर भासणाऱ्‍या सर्व संघटना व संस्था—नाहीशा होतील. मिसरात सातव्या पीडेच्या वेळी जी गारांची वृष्टी झाली तिच्याही कैक पटीने “मोठ्या गारा” ज्या प्रत्येकी एक मण वजनाच्या आहेत, त्यांची वृष्टी होईल व यामुळे मानवजातीला पराकाष्ठेच्या वेदना होणार. * (निर्गम ९:२२-२६) पाणी थिजून झालेल्या गारांची ही वृष्टी, साधारणपणे यहोवाच्या न्यायदंडाच्या भारी वक्‍तव्यास म्हणजेच, सरतेशेवटी या व्यवस्थीकरणाचा नाश आलाच आहे याला सूचित करतात. या नाशाच्या कार्यात यहोवा खऱ्‍या गारांचाही उपयोग करू शकतो.—ईयोब ३८:२२, २३.

३९. सात पीडांचे ओतणे झाले तरी मानवजातीतील बहुतेक कोणत्या प्रकारची वृत्ती दाखवतील?

३९ अशाप्रकारे सैतानी जगाला यहोवाच्या नीतीमान न्यायदंडाचा तडाखा मिळेल. तरीपण मानवजातीतील बहुतेक लोक देवाची अवहेलना व निंदा करीत राहतील. फारोप्रमाणेच यांची अंतःकरणे देखील कितीही पीडा आल्या व शेवटी मरणात विलीन करणारी पीडा आली तरी द्रवणार नाहीत. (निर्गम ११:९, १०) शेवटल्या घटकेला अंतःकरणाचे मोठे परिवर्तन घडून येऊ शकणार नाही. “तेव्हा त्यांस समजेल की, मी परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे,” अशी घोषणा करणाऱ्‍या देवाविरुद्ध आपला श्‍वास चालला तरी ते ओरड करीत राहतील. (यहेज्केल ३८:२३) असे असले तरी, सर्वसत्ताधारी यहोवा देवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन होईल.

[तळटीपा]

^ निर्जीव गोष्टी साक्ष बनू शकतात किंवा साक्ष देऊ शकतात याच्या उदाहरणांसाठी उत्पत्ती ४:१०; ३१:४४-५३; इब्रीयांस १२:२४ पडताळा.

^ “आसन” या शब्दाचा अशाच प्रकारातील वापर, येशूला जे शब्द भविष्यवादितपणे संबोधण्यात आले त्यात सापडतो. तेथे म्हटले आहे: “देव तुझे सिंहासन असून ते युगानुयुगीचे आहे.” (स्तोत्र ४५:६, NW) यहोवा हा येशूच्या बादशाही अधिकाराचा उगम किंवा पाया आहे.

^ एक मण म्हणजे योहानाच्या मनात हेल्लेणी तलांत हे प्रमाण असेल तर प्रत्येक गार ही साधारणपणे ४५ पौंडाची भरेल; मग ती गारांची वृष्टी मोठी भयानक असणार.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२१ पानांवरील चौकट]

“पृथ्वीवर”

योहान वर्गाने ‘पृथ्वीविरुद्ध’ यहोवाच्या क्रोधाची जाहीर घोषणा पुढील विधानांनी केली:

“शतकांच्या प्रयत्नानंतर राजकीय पक्षांना सध्याच्या परिस्थितींना तोंड देण्यात व त्रस्त समस्यांचे निवारण करण्यात अपयश आले आहे. या प्रश्‍नांचा परिश्रमाने अभ्यास करणारे अर्थतज्ज्ञ व मुत्सद्दी यांना याबद्दल काही करता येऊ शकत नाही असे आढळले आहे.”—सध्या जिवंत असणारे लाखो कधीच मरणार नाहीत (इंग्रजी), १९२०, पृष्ठ ६१.

“जगातील प्रमाणबद्ध भागाची तृप्ती व्यवहार्य मार्गाने करू शकणारे असे कोणतेही सरकार या पृथ्वीवर नाही. कित्येक राष्ट्रांवर हुकुमशहांचे वर्चस्व चालत आहे. सबंध जग बहुतेक कर्जबाजारी बनले आहे.”—एक मनपसंत सरकार (इंग्रजी), १९२४, पृष्ठ ५.

“हे व्यवस्थीकरण संपुष्टात आणणे . . . हाच जगाला दुष्टतेपासून वाचवण्याचा आणि शांती व धार्मिकता बहरु देण्यास वाव देण्याचा एकमेव मार्ग आहे.”—“राज्याची ही सुवार्ता,” १९५४, पृष्ठ २५.

“सध्याची जगव्यवस्था ही वाढते पाप, अधार्मिकता व देव आणि त्याच्या इच्छेविरुद्ध बंड यांनी अगदी वेगळीच ठरली आहे. . . . तिची सुधारणा होणे शक्य नाही. यासाठीच ती गेली पाहिजे!”—वॉचटावर नोव्हेंबर १५, १९८१, पृष्ठ ६.

[२२३ पानांवरील चौकट]

“समुद्रात”

यहोवापासून दूर झालेल्या अभक्‍त मानवजातीचा खवळलेला व बंडखोर “समुद्र” याच्याविरुद्ध योहान वर्गाने देवाचा क्रोध घोषित करण्यामध्ये अनेक वर्षात जी विधाने प्रकाशित केली त्यापैकीची काही ही आहेत:

“प्रत्येक राष्ट्राचा इतिहास वेगवेगळ्या वर्गातील व गटातील झगड्यांची माहिती देतो. त्यात थोड्या जणांविरुद्ध अधिक असेही झगडे होते. . . . हे झगडे मोठमोठ्या क्रांत्या, त्रास व पुष्कळ रक्‍तपात यात परिणामित झाले.”—सरकार (इंग्रजी), १९२८, पृष्ठ २४४.

नव्या जगात, “दियाबलाने उपयोगात आणलेले लाक्षणिक श्‍वापद जेथून फार पूर्वी वर आले होते तो खळबळणारा, बंडखोर व अभक्‍त लोकांचा लाक्षणिक ‘समुद्र’ राहणार नाही.”—वॉचटावर सप्टेंबर १५, १९६७, पृष्ठ ५६७.

“सध्याचा मानवी समाज हा आध्यात्मिक रितीने आजारी असून रोगीष्ट आहे. आम्हाला कोणालाही त्याला वाचवता येणार नाही, कारण त्याचा हा आजार त्याला मरणापर्यंत नेणार आहे असे देवाचे वचन स्पष्ट करते.”—खरी शांती व सुरक्षा—कोणत्या उगमाकडून? (इंग्रजी), १९७३, पृष्ठ १३१.

[२२४ पानांवरील चौकट]

“नद्या व पाण्याचे झरे ह्‍यात”

तिसऱ्‍या पीडेने “नद्या व पाण्याचे झरे” यांना पुढील विधानांद्वारे उघड केले:

“[ख्रिस्ताच्या] तत्त्वप्रणालींचे शिक्षक असल्याचा दावा करणाऱ्‍या पाळकांनी युद्धाला आशीर्वाद देऊन ती पवित्र गोष्ट बनवली आहे. त्या रक्‍तपातातील योद्‌ध्यांच्या बाजूला उभे राहून काढलेल्या चित्रांचे व पुतळ्यांचे प्रदर्शन करण्यात त्यांना आनंद वाटला.”—वॉचटावर सप्टेंबर १५, १९२४, पृष्ठ २७५.

“आत्मिकता [भूतविद्या] ही मोठ्या लबाडीवर आधारलेली आहे. मानवी जीव मृत्यूनंतर बचावतो व तो अमर आहे ही ती लबाडी आहे.”—“मृत्युनंतर बचाव” याबद्दल शास्त्रवचने काय म्हणतात? (इंग्रजी), १९५५, पृष्ठ ५१.

“मानवी तत्त्वज्ञान, राजकीय पद्धती, सामाजिक संघटक, आर्थिक सल्लागार आणि धार्मिक संप्रदायाचे वकील यांनी कसलाही जीवनप्रदायक तजेला दिला नाही. . . . अशा पाण्यांनी त्यांच्या प्राशनकर्त्यांना, रक्‍ताबद्दलच्या पावित्र्याच्या देवाच्या कायद्याचा भंग करण्यास व धार्मिक छळात समाविष्ट होण्यास प्रवृत्त केले.”—“सार्वकालिक सुवार्ता” आंतरराष्ट्रीय अधिवेशन, १९६३ मध्ये संमत करण्यात आलेला ठराव.

“मानवासाठी वैज्ञानिक तारण नव्हे, तर मानवी वंशाचा ऱ्‍हास अशी अपेक्षा धरली जाते. . . . मानवजातीच्या विचारांना बदलण्यासाठी आपल्या जगातील सर्व मानस शास्त्रज्ज्ञांकडे व मानस रोगतज्ज्ञांकडे बघता येणार नाही. . . . ही पृथ्वी जगण्यास सुरक्षित बनण्यासाठी . . . एखादे आंतरराष्ट्रीय पोलिस दल तयार करून त्यावर आपल्याला विसंबून राहता येणार नाही.”—मानवी वंशाचा बचाव—राज्याच्या पद्धतीने (इंग्रजी), १९७०, पृष्ठ ५.

[२२५ पानांवरील चौकट]

“सूर्यावर”

मानवजातीच्या ‘सूर्याने’ मानवजातीला प्रभूच्या दिवसात “करपून” टाकले तेव्हा योहान वर्गाने जे घडत होते त्याकडे या विधानांद्वारे लक्ष आकर्षित केले:

“आज हिटलर व मुसोलिनी या लवादी हुकुमशहांनी, सबंध जगाच्या शांतीला दहशत घातली आहे आणि त्यांनी स्वातंत्र्याचा जो विनाश घडवून आणला आहे त्याला रोमन कॅथलिक अधिकाऱ्‍यांनी परंपरेने आपले पूर्ण पाठबळ दिले आहे.”—फॅसिस्ट तत्त्वज्ञान की स्वतंत्रता (इंग्रजी), १९३९, पृष्ठ १२.

“सबंध इतिहासभर मानवी हुकुमशहांनी, अधिपत्य गाजवा किंवा नाश करा ही प्रणाली आचरली! पण हा नियम आता सबंध पृथ्वीला देवाने अधिष्ठित केलेला राजा येशू ख्रिस्त याच्यानुसार असा लागू केला जाईल की, त्याच्या राज्याचा पत्कर करा किंवा नष्ट व्हा.”—जेव्हा सर्व राष्ट्रे देवाच्या राज्याखाली एकत्रित होतील (इंग्रजी), १९६१, पृष्ठ २३.

“१९४५ पासून पुढे सबंध जगभर जी साधारण १५० युद्धे झाली त्यात २ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक लोक ठार झाले.”—वॉचटावर जानेवारी १५, १९८०, पृष्ठ ६.

“जगभर असलेली राष्ट्रे . . . आंतरराष्ट्रीय जबाबदारी किंवा वागणूकीच्या नियमाबद्दल खूपच कमी काळजी घेतात. आपला हेतू पूर्ण करण्यामध्ये काही राष्ट्रांना प्रचंड हत्या, खून, अपहरण, बॉम्बस्फोट इत्यादिपैकी कोणतेही उपकरण वापरण्यात आपण पूर्ण समर्थनीय आहोत असे वाटते . . . अशा या मूर्ख व बेजबाबदार वागणूकीत राष्ट्रे एकमेकांना किती काळ सहन करीत राहणार?”—वॉचटावर फेब्रुवारी १५, १९८५, पृष्ठ ४.

[२२७ पानांवरील चौकट]

“श्‍वापदाच्या आसनावर”

यहोवाच्या साक्षीदारांनी श्‍वापदाचे आसन उघड केले आणि यहोवाला त्याचा केवढा तिटकारा वाटतो ते अशा प्रकारातील विधानांनी जाहीर केले:

“राष्ट्रांचे अधिपती व राजकीय मार्गदर्शक यांजवर घातकी अतिमानवी शक्‍तींचे प्राबल्य आहे व ते त्यांना सातत्याने हर्मगिदोनच्या निर्णायक झगड्याकडे आत्महत्येकरता रांगेने नेत आहेत.”—हर्मगिदोनानंतर—देवाचे नवे जग (इंग्रजी), १९५३, पृष्ठ ८.

“गैर ईश्‍वरशासित मानवी सरकारचे ‘श्‍वापद’ याला त्याचा अधिकार व आसन अजगराकडून मिळाले. यामुळे त्याने आपल्या पक्षाच्या वतीने, दियाबलाच्या वतीने आपला मार्ग आक्रमला पाहिजे.”—हर्मगिदोनानंतर—देवाचे नवे जग, (इंग्रजी) १९५३, पृष्ठ १५.

“विदेशी राष्ट्रे स्वतःला . . . केवळ देवाचा प्रमुख शत्रू दियाबल सैतान याच्या बाजूने असल्याचे बघू शकतात.”—“ईश्‍वरी विजय” या १९७३ च्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात संमत केलेला ठराव.

[२२९ पानांवरील चौकट]

“त्याचे पाणी आटून गेले”

सध्या देखील बाबेलोनी धर्माचे पाठबळ कित्येक जागी आटत चालले आहे व हे, “सूर्याच्या उगवतीपासून येणारे राजे” आपला हल्ला करतील तेव्हा काय घडू शकेल याची पूर्वसूचना देते.

“[थायलंडच्या] महापालिका विभागात राहणाऱ्‍या लोकांच्या राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या चाचणीत असे आढळले की, ७५ टक्के लोक बुद्धाच्या मंदिरात प्रवचन ऐकण्यास मुळीच जात नाहीत आणि शहरातील जे मंदिरात जातात त्यांची संख्या पन्‍नास टक्क्यांपर्यंत कमी होत आहे असे दिसून येते.”—बँकॉक पोस्ट, सप्टेंबर ७, १९८७, पृष्ठ ४.

“सुमारे दोन हजार वर्षांआधी [चीन] देशात ताओई धर्मात जी जादू होती ती आता राहिली नाही. . . . जादूच्या उपकरणांपासून आता वंचित असल्यामुळे मोठ्या जनसमूहाला आकर्षित करता येत नाही आणि याजकीय सदस्यांना देखील वारस लाभण्याचे कठीण होत आहे; एकंदरीत ताओई हा संघटित विश्‍वास प्रमुख प्रदेशातून नष्ट होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.”—द ॲटलांटा जर्नल ॲण्ड कॉन्स्टिट्युशन, सप्टेंबर १२, १९८२. पृष्ठ ३६-ए.

“जपान . . . विदेशी मिशनऱ्‍यांचे जगातील सर्वात मोठे गर्दीचे केंद्र आहे. येथे ५,२०० मिशनरी येतात; तरीही . . . येथे १ टक्क्यापेक्षाही कमी ख्रिस्ती आहेत. . . . येथे १९५० पासून काम करीत असलेल्या फ्रान्सिस्कन पाळकांना . . . वाटते की, ‘जपानमधील विदेशी मिशनऱ्‍यांचा दिवस आता संपुष्टात आला आहे.’”—द वॉल स्ट्रीट जर्नल, जुलै ९, १९८६, पृष्ठ १.

इंग्लंडमध्ये गेल्या तीन दशकात “१६,००० अँग्लीकन चर्चेसपैकी जवळजवळ २,००० चर्चेस वापर होत नसल्यामुळे बंद पडली आहेत. ख्रिस्ती म्हणविणाऱ्‍या देशात देखील उपस्थिती अगदीच कमी पातळीपर्यंत ढासळली आहे. . . . ‘इंग्लंड हे ख्रिस्ती राष्ट्र आहे अशी बाब आता राहिली नाही,’ असे [डरहामच्या बिशपांनी] म्हटले.”—द न्यूयॉर्क टाईम्स, मे ११, १९८७, पृष्ठ ए-४.

“कित्येक तासांच्या संतप्त वादविवादानंतर [ग्रीसच्या] संसदेने आज हा कायदा संमत केला की, ग्रीक कर्मठ चर्चने जी मोठी मिळकत आपणापाशी ठेवली आहे ती समाजवादी सरकारकडे सुपूर्त करावी. . . . याखेरीज, कायदा पाळकवर्गाच्या नसणाऱ्‍यांना, चर्च समित्या तसेच चर्चच्या मोलवान मिळकतींवर, हॉटेल्स, मार्बलच्या खाणी व कचेऱ्‍या यावर देखरेख ठेवणाऱ्‍या समित्यांचा ताबा देत आहे.”—द न्यूयॉर्क टाईम्स, एप्रिल ४, १९८७, पृष्ठ ३.

[२२२ पानांवरील चित्रे]

देवाच्या क्रोधाच्या पहिल्या चार वाट्या, पहिल्या चार कर्ण्यांनी केलेल्या नादासारख्याच पीडा आणीत आहेत

[२२६ पानांवरील चित्रे]

पाचवी वाटी श्‍वापदाचे सिंहासन, श्‍वापदाला सैतानाकडून अधिकार मिळाल्याचे उघड करते

[२३१ पानांवरील चित्रे]

दुरात्मिक प्रचार राष्ट्रांच्या अधिपतींना हर्मगिदोन या केंद्र परिस्थितीत एकवटत आहे; येथे यहोवाच्या न्यायदंडांची अंमलबजावणी त्यांच्यावर करण्यात येईल

[२३३ पानांवरील चित्रे]

सैतानाचे प्रदूषित ‘अंतराळ’ यामुळे प्रभावित होणाऱ्‍यांवर यहोवाच्या नीतीमान न्यायदंडाचा त्रास नक्कीच ओढवेल