व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या इस्राएलावर शिक्का मारणे

देवाच्या इस्राएलावर शिक्का मारणे

अध्याय १९

देवाच्या इस्राएलावर शिक्का मारणे

दृष्टांत ४​—प्रकटीकरण ७:१-१७

विषय: १,४४,००० यांवर शिक्का मारण्यात येतो आणि एक मोठा लोकसमुदाय यहोवाचे राजासन व कोकऱ्‍यासमोर उभा राहिलेला दिसतो

पूर्णतेचा काळ: ख्रिस्त येशूचे १९१४ मध्ये राजासनाधिष्ठ होण्यापासून ते त्याची हजार वर्षांची राजकीर्द

१. ईश्‍वरी क्रोधाच्या महान दिवशी “कोणाच्याने टिकाव धरवेल?”

 “कोणाच्याने टिकाव धरवेल?” (प्रकटीकरण ६:१७) होय, खरोखरी कोण टिकेल? ईश्‍वरी प्रकोपाचा तो महान दिवस जेव्हा सैतानी व्यवस्थीकरण उद्‌ध्वस्त करील तेव्हा जगातील सत्ताधीश व लोक कदाचित हाच प्रश्‍न विचारतील. त्यांना असे दिसेल की, येणारा नाश हा सबंध मानवी जीवनासच समूळ ग्रासून टाकील. पण ते तसे असेल का? देवाचा संदेष्टा आनंदाने आम्हाला याची खात्री देतो की, “जो कोणी यहोवाचा धावा करील तो तरेल.” (योएल २:३२, NW) प्रेषित पेत्र व पौल देखील या वस्तुस्थितीला पुष्टी देतात. (प्रेषितांची कृत्ये २:१९-२१; रोमकर १०:१३) होय, जे यहोवाच्या नामाचा धावा करतील ते बचावतील. हे कोण आहेत? आता पुढील दृष्टांत उलगडत असता, आपण ते पाहणार आहोत.

२. यहोवाच्या न्यायाच्या दिवशी कोणी बचावणारे असतील हे अप्रतिम का आहे?

यहोवाच्या न्यायदंडाच्या दिवशी जिवंतपणे बचावून बाहेर पडणे हे खरोखरीच अप्रतिम असणार, कारण देवाचा दुसरा एक संदेष्टा याबद्दलचे असे वर्णन करतो: “पाहा, परमेश्‍वरापासून [यहोवा, NW] क्रोधरुप तुफान सुटले आहे; धुव्वा उडविणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल. परमेश्‍वर [यहोवा, NW] आपले कार्य संपवीपर्यंत व आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत त्याचा संतप्त क्रोध फिरावयाचा नाही; हे पुढील काळी तुम्हास समजेल.” (यिर्मया ३०:२३, २४) या तुफानाला तोंड देण्याची त्वरेने पावले आम्ही उचलली पाहिजेत!—नीतीसूत्रे २:२२; यशया ५५:६, ७; सफन्या २:२, ३.

चार वारे

३. (अ) देवदूतांनी सादर केलेली कोणती खास सेवा योहान बघतो? (ब) “चार वारे” याद्वारे काय सूचित होते?

यहोवा आपल्या क्रोधास वाट करून देण्याआधी, स्वर्गीय देवदूत एक खास सेवा सादर करतात. योहान आता हे दृष्टांतात बघतो: “ह्‍यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनांवर उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरुन व समुद्रावरुन वारा वाहू नये व कोणत्याहि झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरीत होते.” (प्रकटीकरण ७:१) याचा आज, आम्हासाठी काय अर्थ होतो? हे “चार वारे” त्या नाशकारक न्यायाचे प्रतीक आहेत जे, पृथ्वीतील दुष्ट समाजावर, अधर्मी मानवाच्या खवळत्या ‘समुद्रावर’ व पृथ्वीतील लोकांकडून आपले पोषण व आधार कमविणाऱ्‍या झाडांसारख्या उंच अधिपतींवर सुटणार आहेत.—यशया ५७:२०; स्तोत्र ३७:३५, ३६.

४. (अ) चार देवदूत कशाचे प्रतिनिधीत्व करतात? (ब) जेव्हा चार वारे सोडण्यात येतील तेव्हा सैतानाच्या पृथ्वीवरील संघटनेवर कोणता परिणाम दिसेल?

ते चार देवदूत चार देवदूतीय गटाला सूचित करतात, यात कोणतीही शंका नाही. यांना यहोवा, नियुक्‍त समयापर्यंत न्यायदंडाची अंमलबजावणी अडवून धरण्याची नियुक्‍ती देऊन आहे. जेव्हा हे देवदूत ईश्‍वरी क्रोधाचे वारे चारही दिशांकडून, उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्‍चिम, याकडून सोडून देतील, तेव्हा खूपच मोठा विध्वंस होईल. प्राचीन एलामाचे तुकडे तुकडे करून चोहोकडे विखुरण्यास व नाश करण्यासाठी यहोवाने चार वाऱ्‍यांचा जो उपयोग केला होता त्याच्याशीच हे सदृश्‍य असणार; पण ते अती भव्य प्रमाणात असेल. (यिर्मया ४९:३६-३८) ज्या ‘तुफानाद्वारे’ यहोवाने अम्मोन राष्ट्राचा नाश केला त्यापेक्षा हे तुफानी वारे खूपच प्रचंड असतील. (आमोस १:१३-१५) यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी सैतानाच्या या पृथ्वीवरील संघटनेचा कोणताही भाग टिकाव धरून राहू शकणार नाही. त्यावेळी तो आपल्या सार्वभौमत्वाचे येणाऱ्‍या सर्वकाळासाठी समर्थन करणार आहे.—स्तोत्र ८३:१५, १८; यशया २९:५, ६.

५. देवाचा न्यायदंड सबंध पृथ्वीला ग्रासून टाकील हे समजावण्यात यिर्मयाचा भविष्यवाद आम्हाला कशी मदत देतो?

देवाचा न्यायदंड सबंध पृथ्वीस उद्‌ध्वस्त करील याची आम्ही खात्री बाळगू शकतो का? त्याचा संदेष्टा यिर्मया याकडे पुन्हा लक्ष द्या: “पाहा, राष्ट्राराष्ट्रातून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्‌भवेल. त्या दिवशी परमेश्‍वराने [यहोवा, NW] संहारिलेले पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील.” (यिर्मया २५:३२, ३३) ह्‍याच तुफानी वादळात अंधकार जगाला ग्रासून टाकील. त्यातील सर्व अधिपत्य गाजविणाऱ्‍या संघटनांना असे हलविले जाईल की, त्यांचे शेवटी विस्मरण होईल. (प्रकटीकरण ६:१२-१४) पण भविष्य प्रत्येकासाठी अंधारलेले नसणार. तर मग, ते चार वारे कोणासाठी अडवून धरलेले आहेत?

देवाच्या सेवकांवर शिक्कामोर्तब

६. देवदूतांना चार वारे अडवून धरण्यास कोण सांगतो व यामुळे काय करण्यासाठी वेळ मिळतो?

बचावासाठी काहींवर कसे चिन्ह करण्यात येईल त्याबद्दल योहान पुढे वर्णन करतो: “मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणालाः ‘आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.’”—प्रकटीकरण ७:२, ३.

७. हा पाचवा देवदूत खरोखरी कोण आहे आणि याची ओळख आम्हाला कोणत्या पुराव्याद्वारे कळून येते?

ह्‍या पाचव्या देवदूताचे नाव जरी सांगितलेले नसले तरी, तो वैभवी प्रभू येशू आहे हे सर्व पुराव्यावरुन सिद्ध होते. येशू स्वतः आद्य देवदूत असल्यामुळे त्याला येथे इतर देवदूतांवर अधिकार आहे हे दाखविण्यात आले आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:१६; यहूदा ९) ‘सूर्याच्या उगवतीपासून येणारे राजे’—यहोवा व त्याचा ख्रिस्त—यांसारखा तो पूर्वेकडून न्यायदंड बजावण्यास येतो. हेच पूर्वी दारयावेश व कोरेश यांनी प्राचीन बाबेलला नमविले तेव्हाही केले. (प्रकटीकरण १६:१२; यशया ४५:१; यिर्मया ५१:११; दानीएल ५:३१) हा देवदूत येशूसारखा दिसतो ते या अर्थी की, त्याच्याकडे अभिषिक्‍तांवर शिक्का मारण्याचे काम सोपवलेले आहे. (इफिसकर १:१३, १४) याशिवाय, हे वारे सोडल्यावर येशूच राष्ट्रांवर न्यायदंड बजावण्यासाठी स्वर्गीय सेनेचे नेतृत्व करतो. (प्रकटीकरण १९:११-१६) या सर्व कारणांमुळे हे तर्कशुद्ध आहे की, देवाच्या दासांवर शिक्का मारीपर्यंत सैतानाच्या पृथ्वीवरील संघटनेचा नाश रोखून धरण्याची आज्ञा केवळ येशूच देऊ शकतो.

८. हा शिक्का काय आहे व तो कधी मारण्यास आरंभ झाला?

हा शिक्का काय आहे व ते देवाचे दास कोण आहेत? हे शिक्कामोर्तब सा.यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या दिवशी सुरु झाले; त्यावेळी पहिल्या यहूदी ख्रिश्‍चनांचा पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला. नंतर देवाने ‘परराष्ट्रीयांना’ देखील पाचारण देऊन अभिषिक्‍त केले. (रोमकर ३:२९; प्रेषितांची कृत्ये २:१-४, १४, ३२, ३३; १५:१४) हे अभिषिक्‍त ख्रिस्ती, ‘ख्रिस्ताचे’ आहेत अशी त्यांना खात्री दिलेली आहे, असे प्रेषित पौलाने लिहिले व पुढे म्हटले की, देवाने “आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला.” (२ करिंथकर १:२१, २२; पडताळा प्रकटीकरण १४:१.) अशाप्रकारे, या दासांना जेव्हा देवाचे आध्यात्मिक पुत्र असे दत्तक घेण्यात येते तेव्हा त्यांना त्यांच्या भावी स्वर्गीय वतनाचा शिक्का—एक खूण किंवा विसार दिला जातो. (२ करिंथकर ५:१, ५; इफिसकर १:१०, ११) यानंतर ते म्हणू शकतात: “तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो आणि जर मुले तर वारीसहि आहो, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच.”—रोमकर ८:१५-१७.

९. (अ) देवाच्या आत्म्याने जन्मलेल्या पुत्रांपैकी उरलेल्यांच्या बाबतीत कोणती सहनशीलता अपेक्षित आहे? (ब) अभिषिक्‍तांची ही परीक्षा कोठवर चालू राहणार?

“त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच,” याचा काय अर्थ होतो? अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी धीर धरला पाहिजे व मरणापर्यंत विश्‍वासू राहिलेच पाहिजे. (प्रकटीकरण २:१०) हा काही, ‘एकदा तारण झाले म्हणजे कायमचे झाले’ असा प्रकार नाही. (मत्तय १०:२२; लूक १३:२४) उलटपक्षी, त्यांना ही सूचना आहे: “तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा.” प्रेषित पौलाप्रमाणे त्यांना असे म्हणता आले पाहिजे की, “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे.” (२ पेत्र १:१०, ११; २ तीमथ्य ४:७, ८) या कारणास्तव, येशूने आपल्या देवदूतांसमवेत आत्म्याने अभिषिक्‍त अशा देवाच्या पुत्रांच्या “कपाळावर” पक्का शिक्का मारुन, ते परीक्षिलेले व विश्‍वासू असे ‘देवाचे दास’ आहेत हे ठामपणे व निर्णायकपणे घोषित करुपर्यंत यांची या पृथ्वीवर परीक्षा व चाळण झाली पाहिजे. यानंतर तो शिक्का कायमचे चिन्ह बनतो. संकटाचे चार वारे मोकळे होईपर्यंत सर्व आध्यात्मिक इस्राएलांचे, जरी यापैकीचे काही शरीरात जिवंत राहिले तरी, सर्वांचे शिक्कामोर्तब होऊन पूर्ण झाले असणार हे स्पष्ट आहे. (मत्तय २४:१३; प्रकटीकरण १९:७) तेव्हा सबंध सदस्यत्व पूर्ण झालेले असणार!—रोमकर ११:२५, २६.

किती जणांवर शिक्का मारण्यात येतो?

१०. (अ) शिक्कामोर्तब झालेल्यांची संख्या मर्यादित आहे हे कोणती शास्त्रवचने दाखवतात? (ब) शिक्का मारलेल्यांची एकंदर संख्या किती आहे आणि यांचा अनुक्रम कसा देण्यात आला आहे?

१० ज्यावर शिक्का मारला जाणार आहे अशा भावी सदस्यांना येशूने म्हटले होते: “हे लहान कळपा, भिऊ नको, कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक १२:३२) प्रकटीकरण ६:११ तसेच रोमकर ११:२५ सारखी वचने स्पष्ट करतात की, या लहान कळपाची संख्या मर्यादित आहे व खरे पाहता, आधीच निश्‍चित करण्यात आली आहे. योहानाचे पुढील शब्द याची पुष्टी देतात: “ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला. यहूदा वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला; रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर; आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्‍शे वंशापैकी बारा हजारांवर; शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर; जबलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामीन वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला.”—प्रकटीकरण ७:४-८.

११. (अ) बारा वंशांसंबंधाने दिलेला संदर्भ खऱ्‍या दैहिक इस्राएलांना का लागू होणारा नाही? (ब) प्रकटीकरण १२ वंशांची यादी का देते? (क) देवाच्या इस्राएलात बादशाही किंवा याजकीय रुपात कोणताही वंश सर्वश्रेष्ठ का नाही?

११ हा संदर्भ खरोखरच्या दैहिक इस्राएलांना अनुलक्षून नाही का? नाही, कारण प्रकटीकरण ७:४-८ हे नेहमीच्या यादीपासून वेगळीच यादी देते. (गणना १:१७, ४७) येथे देण्यात आलेली यादी ही दैहिक इस्राएलांची ओळख वंशपरत्वे देण्यासाठी नव्हे, तर आध्यात्मिक इस्राएलांसाठी देखील तीच संघटनात्मक रचना आहे हे दाखविण्यासाठी दिली आहे हे उघड आहे. ती समतोल आहे. त्या नव्या राष्ट्राचे प्रत्येक वंशाचे १२,००० प्रमाणे १२ वंशाचे, बरोबर १,४४,००० सदस्य व्हावयाचे आहेत. या देवाच्या इस्राएलात कोणताही वंश बादशाही किंवा याजकीय रुपात सर्वश्रेष्ठ नाही. सबंध राष्ट्राने राजा म्हणून राज्य करायचे आहे व सबंध राष्ट्राने याजक म्हणून सेवा करायची आहे.—गलतीकर ६:१६; प्रकटीकरण २०:४, ६.

१२. कोकऱ्‍यासमोर २४ वडील प्रकटीकरण ५:९, १० मधील गायन गात आहेत हे का योग्य आहे?

१२ सुरवातीला स्वाभाविक यहूदी व यहूदी मतात परिवर्तित झालेल्यांना आध्यात्मिक इस्राएल बनण्याची संधी प्रस्तुत केली गेली, तरी त्या राष्ट्रातील केवळ थोड्या जणांनीच प्रतिसाद दर्शविला. यासाठी यहोवाने ते निमंत्रण विदेशी लोकांना दिले. (योहान १:१०-१३; प्रेषितांची कृत्ये २:४, ७-११; रोमकर ११:७) “इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे” होते त्या इफिसकरांप्रमाणेच आता यहुद्देत्तरांना देवाच्या आत्म्याने शिक्कामोर्तब होऊन, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीचा एक भाग बनता येऊ शकत होते. (इफिसकर २:११-१३; ३:५, ६; प्रेषितांची कृत्ये १५:१४) या कारणास्तव, २४ वडिलांनी कोकऱ्‍यासमोर हे गीत गाणे अगदीच योग्य होते की, “तू आपल्या रक्‍ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्‍यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.”—प्रकटीकरण ५:९, १०.

१३. येशूचा सावत्र भाऊ याकोब याने आपले पत्र “बारा वंशांतील पांगलेल्या लोकांस” उद्देशून लिहिणे का योग्य होते?

१३ ख्रिस्ती मंडळी ही “निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र” अशी आहे. (१ पेत्र २:९) याची स्वाभाविक इस्राएल याऐवजी देवाचे राष्ट्र या नात्याने बदली झाल्यामुळे ते नवे इस्राएल, “खरे ‘इस्राएल’” होतात. (रोमकर ९:६-८, NW; मत्तय २१:४३) * या कारणास्तव, येशूचा सावत्र भाऊ याकोब याने आपले पाळकीय पत्र, “बारा वंशांतील पांगलेल्या लोकांस,” म्हणजेच, ज्यांची संख्या नंतर १,४४,००० पूर्ण होणार होती, त्या जगभरातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीस लिहिणे अगदी योग्यच होते.—याकोब १:१.

आज देवाचे इस्राएल

१४. आध्यात्मिक इस्राएल १,४४,००० संख्येचा मिळून बनतो, हा यहोवाच्या साक्षीदारांचा नित्याचा दृष्टिकोन राहिलेला आहे हे कशावरुन दिसते?

१४ आध्यात्मिक इस्राएलांची १,४४,००० ही एकंदर संख्या खरी आहे हे वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष, चार्ल्स टी. रसेल यांनी ओळखले होते, हे पाहणे मनोरंजक आहे. १९०४ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शास्त्रवचनामधील अभ्यास (इंग्रजी) याचा सहावा खंड नवी निर्मिती (इंग्रजी) यामध्ये त्यांनी असे लिहिले: “निवडलेल्यांची [निवडण्यात आलेले अभिषिक्‍त जन] ठराविक संख्या आहे हे प्रकटीकरणात (७:४; १४:१) वारंवार दाखविलेले आहे; म्हणजेच ‘मानवजाती मधून विकत घेतलेले’ १,४४,००० लोक.” याचप्रमाणे वॉचटावर संस्थेच्या दुसऱ्‍या अध्यक्षांनी, जे. एफ. रदरफोर्ड यांनी १९३० मध्ये प्रकाशित केलेल्या प्रकाश (इंग्रजी) या पुस्तकात असेच म्हटले होते: “ख्रिस्ताच्या शरीराचे १,४४,००० सदस्य निवडलेले, अभिषिक्‍त झालेले व शिक्के मारिलेले असे संघटित झाल्याचे दाखविले आहे.” १,४४,००० संख्येच्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा मिळून आध्यात्मिक इस्राएल बनतो, हा यहोवाच्या साक्षीदारांचा नित्याचा दृष्टिकोन राहिलेला आहे.

१५. प्रभूच्या दिवसाच्या थोड्या आधी प्रांजळ बायबल विद्यार्थ्यांना विदेशी काळाची समाप्ती झाल्यावर यहूदी कोणत्या हक्काचा आनंद उपभोगतील असे वाटू लागले होते?

१५ तरीही, आज स्वाभाविक इस्राएलांना काही अंशी खास कृपा नाही का? प्रभूच्या दिवसाच्या थोड्या आधीच्या काळात, जेव्हा प्रामाणिक बायबल विद्यार्थी देवाच्या वचनातून पुष्कळ मूलभूत सत्यांचा शोध घेत होते तेव्हा, अशी कल्पना केली गेली की, विदेश्‍यांच्या काळाची समाप्ती झाल्यावर यहूद्यांना देवासमोर पुन्हा विशेष हक्क अनुभवण्यास मिळतील. या कारणास्तव, १८८९ मध्ये प्रकाशित झालेल्या सी. टी. रसेल यांच्या वेळ जवळ आली आहे (शास्त्रवचनामधील अभ्यास [इंग्रजी] याचा दुसरा खंड) या पुस्तकात यिर्मया ३१:२९-३४ वचने स्वाभाविक इस्राएलांना लागू करण्यात आली व म्हटले गेले: “विदेशी वर्चस्वाखाली यहूद्यांना सा.यु.पू. [६०७] पासून शिक्षा मिळत आहे याबद्दल जग साक्षी आहे व ती चालूच आहे आणि हे इ.स. १९१४, म्हणजे ‘सात काळ’—२५२० वर्षांच्या काळाची पूर्णता होण्याआधी संपून त्यांचे राष्ट्रीय संघटन होईल असे अपेक्षिता येणार नाही.” यामुळे यहूद्यांचे पुन्हा राष्ट्रीय पुनर्वसन होईल असे वाटले गेले आणि १९१७ मध्ये जेव्हा बालफोर जाहीरनाम्याने पॅलेस्टाईन हे यहूद्यांचे राष्ट्रीय घर व्हावे म्हणून ब्रिटीशांनी पाठिंबा द्यावा यासाठी विनंती केली तेव्हा, ती आशा अधिकच तेजोमय दिसू लागली.

१६. स्वाभाविक यहूद्यांकडे ख्रिस्ती संदेश नेण्यासंबंधाने यहोवाच्या साक्षीदारांनी कोणते प्रयत्न केले आणि याला कसा प्रतिसाद मिळाला?

१६ पहिल्या जागतिक महायुद्धानंतर पॅलेस्टाईन ग्रेट ब्रिटनच्या मुखत्याराखाली आले तेव्हा आपल्या स्वगृही जाण्यासाठी पुष्कळ यहूद्यांना मार्ग मोकळा झाला. राजकीय इस्राएलाच्या सत्तेची स्थापना १९४८ मध्ये झाली. हे सर्व यहूदी, ईश्‍वरी आशीर्वाद मिळवण्याच्या मार्गावर होते असे दिसून येत नव्हते का? कित्येक वर्षे यहोवाच्या साक्षीदारांनाही असेच वाटत होते. यामुळेच १९२५ मध्ये त्यांनी १२८ पृष्ठांचे यहूद्यांसाठी सांत्वन (इंग्रजी) पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी १९२९ मध्ये ३६० पृष्ठांचा जीवन (इंग्रजी) हा खंड प्रकाशित केला, ज्यामध्ये यहूद्यांना अपील केले होते व ईयोब या बायबल पुस्तकाची चर्चाही होती. खासपणे न्यूयॉर्क शहरात यहूद्यांकडे मशीही संदेश घेऊन जाण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला. थोड्या लोकांनी आनंदाने प्रतिसाद दिला; पण इतर बहुतेक यहूद्यांनी पहिल्या शतकातील आपल्या पूर्वजांप्रमाणेच मशीहाच्या अस्तित्वाचा पुरावा अमान्य केला.

१७, १८. देवाचे पृथ्वीवरील सेवक, नव्या कराराच्या बाबतीत तसेच बायबलच्या पुनर्वसनाच्या भविष्यवादाबद्दल काय समजू शकले?

१७ या कारणास्तव, यहूदी हे लोक व राष्ट्र या नात्याने प्रकटीकरण ७:४-८ मधील किंवा प्रभूच्या दिवसाशी संबंधित असणाऱ्‍या इतर बायबल भविष्यवादात वर्णिण्यात आलेले यहूदी नव्हते हे उघड झाले. यहुद्यांनी सांप्रदायाचा मागोवा अनुसरुन ईश्‍वरी नामाचा वापर टाळला. (मत्तय १५:१-३, ७-९) वॉचटावर संस्थेने १९३४ मध्ये यहोवा (इंग्रजी) हे पुस्तक प्रकाशित केले. यामध्ये यिर्मया ३१:३१-३४ ची चर्चा करताना त्यात निर्णायकपणे म्हटले गेले: “नव्या कराराचा इस्राएलाचे स्वाभाविक वंशज तसेच सर्वसाधारण मानवजात याजशी कसलेही कर्तव्य नाही; पण . . . तो केवळ आध्यात्मिक इस्राएलांपुरता मर्यादित आहे.” बायबलमध्ये पुनर्वसनाची भाकीते स्वाभाविक यहूदी किंवा राजकीय यहूद्यांशी संबंधित नाहीत. ते तर संयुक्‍त राष्ट्र संघाचे सदस्य असून येशूने योहान १४:१९, ३० व १८:३६ मध्ये म्हटले त्या जगाचे भाग आहेत.

१८ पृथ्वीवरील देवाच्या दासांनी १९३१ मध्ये यहोवाचे साक्षीदार हे नाव मोठ्या आनंदाने स्वतःला लावून घेतले. त्यांनी स्तोत्र ९७:११ मधील शब्द अंतःकरणपूर्वक स्वतःला लावले: “नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरिला आहे.” नव्या करारात केवळ आध्यात्मिक इस्राएलांना घेण्यात आले आहे हे त्यांनी स्पष्टपणे निरीक्षिले. (इब्रीयांस ९:१५; १२:२२, २४) प्रतिसाद न देणाऱ्‍या हेकेखोर स्वाभाविक इस्राएलास तसेच सर्वसाधारण मानवजातीला त्यामध्ये कोणताही भाग नव्हता. या समजदारीने, प्रतिवार्षिक ईश्‍वरशासित इतिहासातील उल्लेखनीय ईश्‍वरी प्रकाशाच्या तेजोमय झोतासाठी मार्ग मोकळा केला. यावरुन हे स्पष्ट होते की, यहोवा आपणाजवळ येणाऱ्‍या सर्व मानवांबद्दल केवढ्या मुबलकपणे आपली दया, कनवाळूपणा व सत्य देत असतो. (निर्गम ३४:६; याकोब ४:८) होय, देवदूतांनी जे नाशाचे वारे अडवून धरले होते त्याचा देवाचे इस्राएल याखेरीज इतरांनाही लाभ मिळणार होता. हे कोण असावेत? तुम्हाला त्यांच्यापैकीचे एक होता येईल का? आपण पाहू या.

[तळटीपा]

^ इस्राएल या नावाचा अर्थ “देवाची झोंबी; देवाशी झोंबी (चिकटून राहणारा) करणारा,” असा होतो हे योग्य आहे.—उत्पत्ती ३२:२८, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११४ पानांवरील चित्र]

[११६, ११७ पानांवरील चित्रे]

देवाचे खरे इस्राएल याची सर्वसाधारण निवड सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून पुढे १९३५ पर्यंत होत राहिली. त्या वर्षी यहोवाच्या साक्षीदारांच्या वॉशिंग्टन डी. सी. येथील ऐतिहासिक अधिवेशनात तेथून पुढे पृथ्वीवरील जीवनाचे भवितव्य असणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायाच्या एकत्रीकरणावर अधिक भर देण्यात आला (प्रकटीकरण ७:९)