व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या राज्याचा जन्म झाला आहे!

देवाच्या राज्याचा जन्म झाला आहे!

अध्याय २७

देवाच्या राज्याचा जन्म झाला आहे!

दृष्टांत ७​—प्रकटीकरण १२:१–१७

विषय: स्वर्गीय स्त्री जन्म देते, मीखाएल सैतानासोबत युद्ध करतो व त्याला पृथ्वीवर टाकतो

पूर्णतेचा काळ: १९१४ मध्ये ख्रिस्त येशूचे राजासनाधिष्ठ होण्यापासून ते मोठ्या संकटापर्यंत

१. प्रकटीकरणाच्या १२ ते १४ अध्यायात दिलेल्या चिन्हांची समज आम्हाला कशी मदत देईल?

 देवाचे पवित्र गूज आता उलगडण्यात आले आहे. (प्रकटीकरण १०:७) यहोवाचे मशीहाद्वारेचे राज्य आता सामर्थ्यशाली वास्तविकता आहे. ते राज्य करते! त्याचे अस्तित्व, सैतान व त्याचे संतान यांच्यासाठी नाश, तर देवाच्या स्वर्गीय संघटनेच्या संतानासाठी गौरवी विजय सूचित करते. परंतु सातव्या देवदूताने आपला कर्णा वाजविण्याचे अद्याप संपवलेले नाही, कारण त्याला अद्याप तिसऱ्‍या अनर्थाबद्दल बरेच काही प्रकट करायचे आहे. (प्रकटीकरण ११:१४) प्रकटीकरणाचे १२ ते १४ अध्याय आम्हाला त्या अनर्थामध्ये आणि देवाचे पवित्र गूज संपुष्टात आणण्यात आणखी काय समाविष्ट आहे त्याबद्दल, आमची रसिकता अधिक वाढविण्यात मदत करतील.

२. (अ) योहान कोणते मोठे चिन्ह बघतो? (ब) या मोठ्या चिन्हाचा अर्थ केव्हा प्रकट करण्यात आला?

योहान आता मोठे चिन्ह बघतो—ते देवाच्या लोकांसाठी मोठ्या आस्थेचे आहे. त्याची सुरवात मोठ्या रोमांचकारी भविष्यवादाच्या दृष्टांताने होते. याबद्दलचे स्पष्टीकरण प्रथम द वॉचटावर नियतकालिकाच्या मार्च १, १९२५ च्या अंकात “राष्ट्राचा जन्म” या लेखात व नंतर १९२६ मध्ये मुक्‍तता (इंग्रजी) पुस्तकात प्रसिद्ध झाले. बायबलची ही समज तेजोमयपणे चकाकण्यामुळे ती यहोवाच्या कामातील प्रगतीचा एक टप्पा ठरली. तेव्हा, उलगडू लागलेल्या नाट्याचे वर्णन योहानालाच करू द्या. तो सांगतो: “नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे: एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्‍यांचा मुगूट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती.”—प्रकटीकरण १२:१, २.

३. स्वर्गात पाहिलेल्या स्त्रीची कशी ओळख मिळते?

पहिल्यांदाच, योहान स्वर्गात एका स्त्रीला बघतो. ती, अर्थातच खरी स्त्री नाही. उलट, ती चिन्ह किंवा प्रतीक आहे. (प्रकटीकरण १:१) ती काय सूचित करते? प्रेरित भविष्यवादात कधी कधी स्त्रिया संघटनांना चित्रित करतात, ज्या, उल्लेखनीय व्यक्‍तीसोबत “विवाहित” असल्याच्या दाखवल्या आहेत. इब्री शास्त्रवचनात इस्राएल देशाला यहोवा देवाची पत्नी असे संबोधण्यात आले आहे. (यिर्मया ३:१४) ग्रीक शास्त्रवचनात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीला ख्रिस्ताची वधू म्हणण्यात आले आहे. (प्रकटीकरण २१:९-१४) योहानाने येथे पाहिलेली स्त्री देखील कोणाशी तरी विवाहबद्ध आहे व ती आता मुलास जन्म देण्याच्या स्थितीला आली आहे. तिचा पती कोण आहे? तिचे ते मूल नंतर “देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले.” (प्रकटीकरण १२:५) अशाप्रकारे, ते मूल स्वतःचे आहे असे यहोवा देव दाव्याने सांगतो. या कारणास्तव, योहानाने पाहिलेली ती स्त्री यहोवाची लाक्षणिक पत्नी असली पाहिजे.

४. देवाच्या लाक्षणिक स्त्रीचे पुत्र कोण आहेत आणि योहानाने पाहिलेल्या स्त्रीबद्दल प्रेषित पौल काय म्हणतो?

साधारण आठ शतके आधी, यहोवाने आपल्या या लाक्षणिक स्त्रीला उद्देशून असे म्हटले होते: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून [यहोवा, NW] शिक्षण पावतील.” (यशया ५४:५, १३) येशूने ही भविष्यवाणी उद्धृत केली व दाखविले की, ती मुले त्याचे विश्‍वासू अनुयायी होत, ज्यांनी नंतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळी स्थापन केली. (योहान ६:४४, ४५) अशाप्रकारे, देवाची मुले म्हणण्यात आलेले या मंडळीचे सदस्य, देवाच्या लाक्षणिक स्त्रीची देखील मुले आहेत. (रोमकर ८:१४) प्रेषित पौल याला आणखी शेवटली माहिती जोडून पुढे म्हणतो: “वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.” (गलतीकर ४:२६) अशाप्रकारे, योहानाने पाहिलेली “स्त्री” ही “वर असलेली यरुशलेम” आहे.

५. यहोवाची लाक्षणिक पत्नी ही १२ ताऱ्‍यांनी सुशोभित आहे, तर वरील यरुशलेम हे नक्की काय असावे?

पण वरील यरुशलेम म्हणजे वस्तुतः काय? पौलाने तिला “वर असलेली” असे म्हटले आणि योहानाने तिला स्वर्गात पाहिले असल्यामुळे, ती पृथ्वीवरील नगरी नाही हे स्पष्ट आहे. तसेच ती “नवी यरुशलेम” ही नाही, कारण ही संघटना येशूची वधू आहे यहोवाची पत्नी नव्हे. (प्रकटीकरण २१:२) हिला १२ ताऱ्‍यांचा मुकुट आहे हे लक्षात घ्या. बारा ही संख्या संघटनात्मक रचनेच्या पूर्णतेला सूचित करणारी आहे. * यास्तव, हे १२ तारे, पृथ्वीवरील प्राचीन यरुशलेमेप्रमाणेच ती, स्वर्गातील एक संघटनात्मक व्यवस्था असल्याचे दाखविते. वरील यरुशलेम ही, सर्व आत्मिक प्राण्यांनी मिळून बनलेली यहोवाची सार्वत्रिक संघटना आहे, जी त्याची सेवा करण्यात व संतान उत्पन्‍न करण्यात, त्याच्या पत्नीची भूमिका करते.

६. (अ) योहानाने पाहिलेली स्त्री सूर्य पांघरलेली होती, तिच्या पायाखाली चंद्र, तिला ताऱ्‍यांचा मुकुट होता याद्वारे काय सूचित होते? (ब) गर्भवती स्त्रीच्या प्रसूती वेदनांद्वारे काय समजते?

योहानाने या स्त्रीला सूर्य पांघरलेल्या व पायाखाली चंद्र असलेल्या दशेत बघितले. यात आपण तिच्या मुकुटातील तारे जमेस धरतो तेव्हा, ती स्वर्गीय तेजांनी पूर्णपणे वेष्ठित असल्याचे दिसते. देवाची कृपा तिच्यावर रात्रंदिवस झळकते. यहोवाच्या वैभवी स्वर्गीय संघटनेचे हे किती यथोचित रुपक! ती गर्भवती असून प्रसूतीचे कष्ट सोसत आहे. ईश्‍वरी मदतीसाठी तिच्या हाका, तिच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्याचे सूचित करतात. बायबलमध्ये प्रसूतीच्या वेदना, एक महत्त्वाचा परिणाम घडवून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्‍या परिश्रमांना अनुलक्षून आहेत. (पडताळा स्तोत्र ९०:२; नीतीसूत्रे २५:२३; यशया ६६:७, ८.) या कारणामुळेच, यहोवाची स्वर्गीय संघटना जन्म देण्याच्या या ऐतिहासिक घटनेच्या तयारीत असताना अशा प्रकारच्या वेदना अनुभवाला आल्या यात शंका नाही.

मोठा अग्निवर्ण अजगर

७. योहान स्वर्गात आणखी कोणते दुसरे चिन्ह बघतो?

यानंतर योहान काय बघतो? “स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे: पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व दहा शिंगे होती, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुगूट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्‍यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्‍या स्त्रीपुढे उभा राहिला होता.”—प्रकटीकरण १२:३, ४.

८. (अ) मोठ्या अग्निवर्ण अजगराची ओळख कशी मिळते? (ब) या अजगराला सात डोकी, दहा शिंगे व प्रत्येक डोक्यावर एकेक मुकुट आहे याद्वारे काय सुचविले जाते?

हा अजगर, “जुनाट साप” म्हटलेला सैतान आहे. (प्रकटीकरण १२:९; उत्पत्ती ३:१५) तो तर भयानक नाशकर्ता आहे—तो सात डोक्यांचा अजगर किंवा गिळणारा असून आपल्या भक्ष्याला तो संपूर्णपणे घशात घालतो. तो किती भयानक दिसतो! त्याची सात डोकी व दहा शिंगे सुचवतात की, तो राजकीय जंगली श्‍वापदाचा रचनाकार आहे व हे श्‍वापद लवकरच प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायात आपणास बघावयास मिळणार आहे. या श्‍वापदाला देखील सात डोकी व दहा शिंगे आहेत. सैतानाला एकंदरीत सात—डोक्यावर प्रत्येकी एक मुकुट असल्यामुळे आपल्याला ही खात्री राखता येईल की, त्या श्‍वापदाकरवी चित्रित जागतिक साम्राज्ये त्याच्या अधिकाराखाली आहेत. (योहान १६:११) या जगात त्याने जे अधिपत्य गाजवले त्याचे दहा शिंगे हे योग्य प्रतीक आहे.

९. अजगराच्या शेपटाने ‘आकाशातील ताऱ्‍यांचा तृतीयांश ओढला जाऊन’ तो खाली पृथ्वीवर टाकला जातो याद्वारे काय समजते?

अजगराला आत्मिक क्षेत्रात देखील अधिकार आहे. तो आपल्या शेपटाने “आकाशातील ताऱ्‍यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून” काढतो. तारे देवदूतांनाही सूचित करतात. (ईयोब ३८:७) “तृतीयांश” हा उल्लेख दाखवितो की, सैतानाने मोठ्या संख्येच्या देवदूतांना फसविले आहे. ते एकदा त्याच्या वर्चस्वाखाली आल्यावर मग त्यांना तेथून सुटका नाही. ते देवाच्या पवित्र संघटनेकडे परतू शकले नाहीत. ते दुरात्मे बनले व त्यांना त्यांचा राजा किंवा अधिपती सैतान याने जणू ओढत नेले. (मत्तय १२:२४) सैतानाने त्यांना पृथ्वीवर देखील पाडले. हे निश्‍चित, जलप्रलयापूर्वीच्या नोहाच्या काळाला उद्देशून आहे. त्यावेळी सैतानाने या अवज्ञाकारी देवपुत्रांना पृथ्वीवर खाली पाठवून मानवकन्यांशी सहवास करायला लावला. शिक्षा म्हणून देवाने या ‘पाप केलेल्या देवदूतांना’ तार्तरस म्हटल्या गेलेल्या, तुरुंगासमान परिस्थितीत झोकून दिले.—उत्पत्ती ६:४; २ पेत्र २:४; यहूदा ६.

१०. कोणत्या परस्परविरोधी संघटना दृष्टिपथात येतात आणि स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकण्यास तो अजगर का टपला आहे?

१० अशाप्रकारे, आता दोन परस्परविरोधी संघटना आपल्या दृष्टीपुढे आहेत—स्त्रीने चित्रित केलेली यहोवाची स्वर्गीय संघटना आणि देवाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी सैतानाची दुरात्मिक संघटना. सार्वभौमत्वाच्या मोठ्या विवादास निकालात काढलेच पाहिजे. पण कसे? आपल्या दुरात्म्यांना सोबत ओढत नेणारा सैतान, सावजाकडे नजर रोखून बघणाऱ्‍या विक्राळ पशूसारखा बनला आहे. आता तर तो, ती स्त्री केव्हा प्रसूत होते याची वाट पाहत आहे. त्या जन्मणाऱ्‍या मुलाला खाऊन टाकण्याची त्याची इच्छा आहे; कारण हे मूल त्याच्या अस्तित्वाला तसेच त्याचे प्रभुत्व असलेल्या जगाच्या अस्तित्वाला धोकादायक असल्याचे तो जाणून आहे.—योहान १४:३०.

पुत्र, पुसंतान

११. स्त्रीच्या मुलाच्या जन्माचे योहान कसे वर्णन देतो आणि या मुलाला “पुत्र म्हणजे पुसंतान” असे का म्हटले आहे?

११ देवाच्या हस्तक्षेपाशिवाय राष्ट्रांनी अधिपत्य गाजविण्याची नियुक्‍त वेळ १९१४ मध्ये संपली. (लूक २१:२४) मग, योग्य वेळी ती स्त्री मुलाला जन्म देते: “सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुसंतान ती प्रसवली; ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली; तेथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे.” (प्रकटीकरण १२:५, ६) ते मूल “पुत्र म्हणजे पुसंतान” आहे. योहान येथे दुहेरी शब्द का वापरतो? याद्वारे, राष्ट्रांवर पुरेश्‍या बळाने अधिपत्य करण्याची मुलाची कुवत तो आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. तसेच, जन्माचा हा प्रसंग किती लक्षणीय व आनंदाचा आहे ते देखील प्रभावीपणे लक्षात येते! हा जन्म, देवाच्या पवित्र गूजाची सांगता करण्यात प्रमुख भूमिका पार पाडतो. हे पुसंतान “सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य” करणार आहे!

१२. (अ) स्तोत्रसंहितेत यहोवाने येशूबद्दल भविष्यवादितपणे काय अभिवचन दिले? (ब) “सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील” अशा पुत्राला स्त्रीने जन्म देणे याद्वारे काय सूचित होते?

१२ ही संज्ञा काहीशी परिचित वाटते का? होय, यहोवाने येशूबद्दल भविष्यवादितपणे हे अभिवचन दिले होते: “लोहदंडाने तू त्यांस फोडून काढिशील; कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करिशील.” (स्तोत्र २:९) त्याच्याबद्दल असाही भविष्यवाद करण्यात आला: “परमेश्‍वर [यहोवा, NW] तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो: ‘तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.’” (स्तोत्र ११०:२) अशाप्रकारे, योहानाने पाहिलेल्या जननाशी येशू ख्रिस्ताचा जवळचा संबंध आहे. नाही, हा काही मागे, आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या शतकात कुमारीद्वारे झालेला येशूचा जन्म नाही; तसेच, सा.यु. ३३ मध्ये येशूला स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित करण्यात आले तीही ही घटना नाही. याचप्रमाणे हा काही रुपांतराचा साक्षात्कार नाही. उलटपक्षी, हा देवाच्या राज्याचा १९१४ मध्ये घडलेला खरा जन्म आहे आणि येशू—जो आता साधारण १९ शतके स्वर्गात आहे—त्याला राजा म्हणून अधिष्ठित करण्यात आले आहे.—प्रकटीकरण १२:१०.

१३. ते पुसंतान “देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले” याचा काय अर्थ होतो?

१३ यहोवा सैतानाला आपल्या स्त्रीला किंवा तिच्या नवजात बालकाला कधीही खाऊ देणार नाही! जन्म झाल्याबरोबर ते मूल “देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले.” अशाप्रकारे ते मूल यहोवाच्या पूर्ण संरक्षणाखाली येते; याचा अर्थ हा की, यहोवा या नव्याने जन्मलेल्या राज्याची पूर्ण रुपाने काळजी घेईल. कारण त्याच्या पवित्र नामास सन्मान मिळवून देण्याचे हेच त्याचे साधन आहे. याच वेळी ती स्त्री, देवाने तिला संरक्षणासाठी जी जागा तयार केली आहे तेथे, अरण्यात पळून जाते. याबद्दलची सविस्तर माहिती नंतर बघू. आता सैतानासाठी अशा घटनेचा मंच तयार झाला आहे की, ज्यामुळे त्याला येथून पुढे स्वर्गातील त्या राज्याला कधीही दहशत दाखवता येणारच नाही. ती घटना कोणती?

स्वर्गात युद्ध!

१४. (अ) योहान सांगतो त्याप्रमाणे कोणती घटना सैतानाला पुन्हा राज्याला दहशत घालण्यास मज्जाव करते? (ब) सैतान व त्याच्या दुरात्म्यांना आता कोठे स्थानबद्ध करण्यात आले आहे?

१४ योहान आम्हास सांगतो: “मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणहि उरले नाही. मग, तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.” (प्रकटीकरण १२:७-९) अशाप्रकारे, देवाचे पवित्र गूज पूर्ण करण्याच्या नाट्यमय घडामोडीत सैतानाला धरले जाऊन स्वर्गातून खाली ढकलून दिले जाते आणि त्याबरोबर त्याच्या दुरात्म्यांना देखील खाली टाकले जाते. ज्याने सर्व जगाला ठकवून स्वतःला त्याचा देव बनविले त्याला आता, त्याने जेथे पहिल्या बंडाळीचा उद्‌भव केला होता त्या परिसरात, या पृथ्वीग्रहाच्या परिसीमेत जखडविण्यात आले.—२ करिंथकर ४:३, ४.

१५, १६. (अ) मीखाएल कोण आहे व आम्ही ते कसे जाणतो? (ब) केवळ मीखाएलच सैतानाला स्वर्गातून खाली टाकू शकतो हे का योग्य आहे?

१५ यहोवाच्या नामात हा एवढा मोठा विजय कोण मिळवतो बरे? बायबल त्याबद्दल मीखाएल व त्याचे दूत असे म्हणते. पण हा मीखाएल कोण आहे? मीखाएल या नावाचा अर्थ “देवासमान कोण आहे?” असा होतो. यास्तव, या मीखाएलाठायी यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याची आस्था आहे आणि हे सिद्ध करण्याची कळकळ आहे की, देवाच्या तुलनेत कोणीही असू शकत नाही. यहूदाच्या पत्रातील ९ व्या वचनात त्याला “आद्य देवदूत मीखाएल” असे म्हटले आहे. आता “आद्य देवदूत” ही संज्ञा बायबलमध्ये केवळ एकट्याच्याच संदर्भात उपयोगात आणली आहे हे मोठे लक्षवेधक आहे व तो आहे, येशू ख्रिस्त. * पौल त्याच्याबद्दल म्हणतो: ‘आद्यदेवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभु स्वतः स्वर्गातून उतरेल.’ (१ थेस्सलनीकाकर ४:१६) “आद्य देवदूत” याचा अर्थ “देवदूतांमध्ये प्रमुख” असा होतो. या कारणामुळे प्रकटीकरण “मीखाएल व त्याचे दूत” असे जेव्हा म्हणते, तेव्हा ते तितके आश्‍चर्याचे वाटत नाही. इतर ठिकाणी, बायबल, देवदूतांना देवाच्या नीतीमान सेवकाच्या अधीन ठेवल्याचे म्हणते तेव्हा तो संदर्भ येशूला अनुलक्षून आहे. याप्रकारे, पौल “तो [प्रभू येशू] आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून” प्रकट होईल असे म्हणतो.—२ थेस्सलनीकाकर १:७; तसेच मत्तय २४:३०, ३१; २५:३१ पहा.

१६ ही, तशीच इतर शास्त्रवचने आम्हाला न चुकता या निर्णयाकडे नेतात की, मीखाएल हा दुसरा कोणी नसून स्वर्गातील आपल्या पदावर विराजमान असलेला प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभूच्या या दिवसात तो, सैतानाला “प्रभू [यहोवा, NW] तुला धमकावो” असे म्हणत नाही. हा न्यायाचा काळ असल्यामुळे येशू, मीखाएल या नात्याने, दुष्ट सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून खाली टाकतो. (यहूदा ९; प्रकटीकरण १:१०) तो आता नव्याने राजा या नात्याने नियुक्‍त झालेला असल्यामुळे तो हे कृत्य करायच्या पात्रतेचा आहे. येशू हा, मागे एदेनात वचन देण्यात आलेले संतान असल्यामुळे तो त्या जुनाट सापाचे डोके फोडील व त्याला कायमचे नष्ट करील. (उत्पत्ती ३:१५) सैतानाला स्वर्गातून घालवून दिल्यामुळे, येशूने त्या अंतिम चिरडण्याच्या कृतीकडे मजल घेतली आहे.

“स्वर्गांनो, . . . उत्साह करा”

१७, १८. (अ) सैतानाला स्वर्गातून टाकून दिल्यावर स्वर्गातील कोणती प्रतिक्रिया योहान कळवतो? (ब) योहान ऐकतो त्या मोठ्या वाणीचा उगम कोणता असावा?

१७ सैतानाच्या या विशाल पतनाबद्दल स्वर्गात जी जल्लोषाची प्रतिक्रिया दिसली, ती योहान कळवतो: “तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली: ‘आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्‍याच्या रक्‍तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीति केली नाही. म्हणून, स्वर्गांनो, व त्यांत राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा!’”—प्रकटीकरण १२:१०-१२अ.

१८ योहान ऐकतो ती कोणाची मोठी वाणी होती? बायबल त्याबद्दल काही सांगत नाही. परंतु अशाच प्रकारची प्रकटीकरण ११:१७ मधील मोठी वाणी ही पुनरुत्थित झालेले व स्वर्गात आपल्या पदी असणारे २४ वडील जे, १,४४,००० पवित्र जनांचे आता प्रतिनिधीत्व करू शकतात त्यांच्याकडून होती. (प्रकटीकरण ११:१८) वस्तुतः, अद्याप पृथ्वीवर असणारे देवाचे छळग्रस्त अभिषिक्‍त सेवक यांना, “आमच्या बंधूंना” असे म्हटले गेले असल्यामुळे ही वाणी त्याच उगमाकडून आली असावी. या विश्‍वासू जनांना आनंद करण्याचे खरोखर कारण आहे, कारण त्यांचे पुनरुत्थान हे सैतान व त्याचा दुरात्मिक समूह यांना स्वर्गातून खाली टाकल्यानंतर लगेचच सुरु होणार होते.

१९. (अ) देवाच्या पूर्ण होत असलेल्या पवित्र गूजाने येशूला काय करण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला? (ब) सैतानाला “आमच्या बंधूंना दोष देणारा” असे म्हणण्यात आल्यामुळे कोणता अर्थ अभिप्रेत होतो?

१९ देवाचे पूर्ण होत आलेले पवित्र गूज येशूला यहोवाच्या राज्याचा अधिकार ग्रहण करण्याची हाक देते. अशामुळे देवाला विश्‍वासू मानवजातीची मुक्‍तता करण्याचा महान उद्देश पूर्ण करण्यासाठी मार्ग मोकळा होतो. येशू या पृथ्वीवरील त्याच्या देवभिरु शिष्यांनाच तारण देतो असे नाही, तर तो देवाच्या स्मरणात असलेल्या त्या लाखो मृतजनांस देखील तारण प्रदान करतो. (लूक २१:२७, २८) “आमच्या बंधूंना दोष देणारा,” असे सैतानाच्या बाबतीत म्हणण्यात आल्यामुळे असे दिसते की, त्याने ईयोबावर लादलेले आरोप खोटे सिद्ध झाले होते तरी तो पृथ्वीवरील देवाच्या सेवकांच्या सचोटीबाबत आव्हान देतच राहिला. मनुष्य आपल्या जिवासाठी वाटेल ते करील हा दावा तो कित्येक वेळा करीत राहिला हे दिसते. पण यातही सैतान केवढ्या भयाणपणे अपयशी ठरला!—ईयोब १:९-११; २:४, ५.

२०. विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी सैतानाला कसे जिंकले आहे?

२० “कोकऱ्‍याच्या रक्‍तामुळे” नीतीमान झालेले अभिषिक्‍त ख्रिस्तीजन, छळ होत असला तरी देव व येशू ख्रिस्ताबद्दल आपली साक्ष देत आहेत. आता साधारण शंभर पेक्षा अधिक वर्षे योहान वर्ग, समाविष्ट असणाऱ्‍या मोठ्या वादविषयांकडे आणि १९१४ मध्ये विदेश्‍यांचे काळ समाप्त होतील याकडे लक्ष वेधवीत आला आहे. (लूक २१:२४, किंग जेम्स व्हर्शन) मोठा लोकसमुदाय आता त्याच्या बाजूला राहून निष्ठावंतपणे सेवा करीत आहे. यापैकी कोणीही, ‘जे शरीरास वधितात पण आत्म्यास वधावयास समर्थ नाहीत त्यांस भीत नाहीत.’ हे या २० व्या शतकात यहोवाच्या साक्षीदारांच्या खऱ्‍या जीवनी अनुभवांद्वारे पुनःपुन्हा प्रदर्शित करण्यात आले आहे. आपल्या मुखाच्या वचनाने व आपल्या योग्य ख्रिस्ती वर्तणूकीद्वारे त्यांनी सैतानाला जिंकले आहे व तो खोटा आहे हे सातत्याने सिद्ध करून दाखवले आहे. (मत्तय १०:२८; नीतीसूत्रे २७:११; प्रकटीकरण ७:९) पुनरुत्थान होऊन स्वर्गात गेल्यावर हे अभिषिक्‍त ख्रिस्ती केवढे आनंदी असणार, कारण आता सैतान त्यांच्या बंधूंना दोष देण्यास तेथे जाऊच शकत नाही! यास्तव, ही वेळ सर्व देवदूतांनी या निमंत्रणाला आनंदाने प्रत्युत्तर देण्याची आहे की, “स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा!”

प्रतिस्पर्धी पीडा!

२१. सैतानाने पृथ्वी व समुद्र यांजवर अनर्थ कसा ओढवून आणला आहे?

२१ तिसऱ्‍या अनर्थामुळे आता संतापून सैतान मानवजातीला त्याच्या नमुन्याच्या पद्धतीने अनर्थ आणून छळण्याच्या पावित्र्यात तयार आहे. तो असा: “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२ब) सैतानाला स्वर्गातून खाली टाकणे हे या खऱ्‍या पृथ्वीला, जिची सैतानाच्या नियंत्रणाखाली त्याच्या स्वार्थी मानवांद्वारे नासाडी होत आहे, एक खरा अनर्थ आहे. (अनुवाद ३२:५) यापेक्षा अधिक म्हणजे, ‘अधिपत्य करा किंवा नासाडी करा,’ या सैतानाच्या ब्रीदामुळे लाक्षणिक पृथ्वीची, म्हणजे मानवी समाज रचनेची आणि लाक्षणिक समुद्राची म्हणजे मानवजातीचा खळबळजनक लोकसमूह यांवर अनर्थ ओढवत आहे. गेल्या दोन जागतिक युद्धात सैतानाचा क्रोध त्याच्या वर्चस्वाखाली असणाऱ्‍या राष्ट्रांच्या क्रोधात दिसून आला आणि अशा प्रकाराच्या दुरात्मिक रागाचे झटके आजतागायत अनुभवण्यास मिळाले आहेत—पण ते अधिक काळ राहणार नाहीत! (मार्क १३:७, ८) दियाबलाच्या कारवाया इतक्या भयंकर असल्या तरी त्या, तिसरा अनर्थ, देवाच्या राज्याच्या कृतीने सैतानाच्या दृश्‍य संघटनेवर जे परिणाम निर्माण करतील तेवढ्या पातळीचे परिणाम आणणार नाहीत!

२२, २३. (अ) अजगराला पृथ्वीवर खाली टाकण्यामुळे काय घडते असे योहान म्हणतो? (ब) “पुसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा” छळ करण्याचे अजगराला कसे शक्य आहे?

२२ सैतानावर अचानक उद्‌भवलेल्या महासंकटामुळे त्याची जी हाकलपट्टी झाली त्यामुळे त्याचा रोष पृथ्वीवर हयात असणाऱ्‍या ख्रिस्ताच्या बांधवांना सहन करावा लागला. योहान कळवतो: “आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरूडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ व अर्धकाळ तिचे पोषण व्हावयाचे होते.”—प्रकटीकरण १२:१३, १४.

२३ येथे हा दृष्टांत ६ व्या वचनात कळवण्यात आलेला विचार पुन्हा प्रकटवतो. तेथे म्हटले आहे की, मुलास जन्म दिल्यावर स्त्री अजगरापासून रानात पळून जाते. आपल्याला कदाचित याचे आश्‍चर्य वाटेल की, ती स्त्री तर वर स्वर्गात आहे आणि अजगराला या पृथ्वीवर खाली टाकण्यात आले आहे, तर तो तिचा कसा पाठलाग करणार. कृपया हे लक्षात घ्या की, या स्त्रीला तिची पृथ्वीवरील मुलेही आहेत; ते तिचे संतान आहेत. या दृष्टांतात पुढे आम्हास कळविण्यात आले आहे की, सैतान तिच्या संतानाचा छळ करून त्या स्त्रीवर आपला राग व्यक्‍त करतो. (प्रकटीकरण १२:१७) स्त्रीच्या संततीला येथे पृथ्वीवर जे घडते ते प्रत्यक्षात स्त्रीच्याच बाबतीत घडते असे समजले जाऊ शकते. (पडताळा मत्तय २५:४०.) तसेच पृथ्वीवरील या संतानाच्या वाढत्या संख्येच्या सहकाऱ्‍यांना सुद्धा त्या छळाची झळ लागणार.

नवे राष्ट्र

२४. बायबल विद्यार्थ्यांना इजिप्तमधील इस्राएलांना आला तसाच सुटकेचा अनुभव कसा आला?

२४ पहिले जागतिक महायुद्ध लढले जात असता येशूचे भाऊ विश्‍वासूपणे त्यांना शक्य आहे त्या परिमाणापर्यंत आपले साक्षकार्य करीत होते. हे, त्यांनी सैतान व त्याच्या तैनातीला असणाऱ्‍या दुर्व्यसनी लोकांमार्फत प्रखर छळ होत असताना सुद्धा केले. सरतेशेवटी बायबल विद्यार्थ्यांचे जाहीर साक्षकार्य थांबले गेले. (प्रकटीकरण ११:७-१०) त्यांचा हा अनुभव, इस्राएलांना इजिप्तमध्ये जो मोठ्या त्रासाचा अनुभव आला त्यासारखा होता. पण यहोवाने नंतर इस्राएलांची जलदपणे सुटका केली, ते जणू त्यांना गरुडांच्या पंखावर बसवून सीनायच्या अरण्यात आणले. (निर्गम १९:१-४) याचप्रमाणे, १९१८-१९ च्या दाहक छळानंतर यहोवाने आपल्या स्त्रीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या त्याच्या साक्षीदारांची सुटका केली आणि इस्राएलांना अरण्यात आणले तसेच यांना आध्यात्मिकदृष्ट्या सुरक्षित स्थळी आणले. हे त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर होते.—पडताळा स्तोत्र ५५:६-९.

२५. (अ) अरण्यात इस्राएलांना राष्ट्र या नात्याने संघटित केले तसे १९१९ मध्ये यहोवाने काय संघटित केले? (ब) या राष्ट्राचे कोण सदस्य आहेत व यांना कशामध्ये एकत्र करण्यात आले?

२५ यहोवाने अरण्यात इस्राएलांना एक राष्ट्र या नात्याने एकत्र करून त्यांची आध्यात्मिक व शारीरिक दृष्टीने काळजी घेतली. याचप्रमाणे, यहोवाने १९१९ मध्ये स्त्रीच्या संतानाला आध्यात्मिक राष्ट्र असे सामोरे आणले. याचा १९१४ पासून स्वर्गात राज्य करीत असलेल्या मशीही राज्याशी गोंधळ करू नये. उलटपक्षी, हे नवे राष्ट्र पृथ्वीवरील अभिषिक्‍त साक्षीदारांच्या शेषांनी मिळून तयार झाले होते व यांना १९१९ मध्ये गौरवी आध्यात्मिक वतनात आणण्यात आले. आता “योग्य वेळी शिधासामुग्री” मिळू लागल्याने यांना पुढील कामासाठी बळकट करण्यात आले.—लूक १२:४२; यशया ६६:८.

२६. (अ) प्रकटीकरण १२:६, १४ मधील काळ किती लांबीचा आहे? (ब) साडे तीन वर्षांच्या काळाचा काय उद्देश होता, तो केव्हा सुरु झाला व केव्हा संपला?

२६ देवाच्या स्त्री संतानाची ती विश्रांती किती काळ टिकली? प्रकटीकरण १२:६ म्हणते की, ती १,२६० दिवस होती. प्रकटीकरण १२:१४ या अवधीला एक काळ, दोन काळ व अर्धकाळ किंवा साडेतीन काळ असे म्हणते. खरे म्हणजे ती दोन्ही वचने साडे तीन वर्षांच्या काळाला सूचित करतात, जो उत्तर गोलार्धात १९१९ च्या वसंत ऋतुपासून १९२२ च्या शरद ऋतुपर्यंत जातो. हा पुनर्स्थापित योहान वर्गासाठी तजेला देणारा शक्‍तिवर्धक असा व पुनर्संघटनेचा काळ होता.

२७. (अ) योहानाने कळविल्यानुसार अजगराने १९२२ नंतर काय केले? (ब) साक्षीदारांविरुद्ध छळाचा पूर आणण्याचा सैतानाचा काय उद्देश होता?

२७ पण अजगर हताश झाला नाही! “मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला.” (प्रकटीकरण १२:१५) हे ‘नदीसारखे पाणी’ किंवा “पाण्याचा प्रवाह” (द न्यू इंग्लिश बायबल) याचा काय अर्थ होतो? प्राचीन काळच्या दावीद राजाने दुष्ट लोकांबद्दल बोलताना म्हटले की, ते त्याच्यामागे ‘निरूपयोगी लोकांच्या नाशाच्या पुरासारखे’ लागले होते [“व्यर्थ लोकांचा लोंढा,” यंग]. (स्तोत्र १८:४, ५, १६, १७) आता, सैतान व्यर्थ किंवा ‘निरुपयोगी लोकांद्वारेचा’ छळ आणतो. त्याने १९२२ मध्ये साक्षीदारांविरुद्ध छळाचा पूर आणला. (मत्तय २४:९-१३) यात शारीरिक हिंसाचार, “न्याय करण्याच्या मिषाने उपद्रव,” तुरुंगवास आणि फाशी, गोळ्या झाडणे व डोके छाटणे या हत्येचाही समावेश होता. (स्तोत्र ९४:२०) अधःपतित झालेल्या सैतानाला आता देवाच्या स्वर्गीय स्त्रीकडे जाता येत नसल्यामुळे, त्याने आपला क्रोध पृथ्वीवरील तिच्या उरलेल्या संतानावर हल्ल्याद्वारे आणून त्यांचा नाश एकतर थेटपणे किंवा सचोटी भंगवून देवाची मर्जी गमावण्याद्वारे करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण यांचा निर्धार ईयोबाप्रमाणे होता, ज्याने असे म्हटले की, “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही!”—ईयोब २७:५.

२८. दुसऱ्‍या जागतिक महायुद्धात छळाचा पूर कसा वाढला गेला?

२८ छळाचा हा निष्ठुर पूर दुसऱ्‍या जागतिक महायुद्धात उच्च स्तरावर गेला. युरोपात नात्झी छळ छावण्यात दहा हजार साक्षीदारांना कैदेत टाकण्यात आले आणि हजारो यात मरण पावले. याचप्रमाणे इटली, जपान, कोरिया व ताईवान येथे युद्धकाळात ज्यांनी अधिपत्य केले त्यांच्या हातून साक्षीदारांना अशीच क्रूर वागणूक मिळाली. लोकशाही म्हटल्या जाणाऱ्‍या देशात देखील साक्षीदारांवर कॅथलिक ॲक्शन ग्रुप याद्वारे हल्ला केला; त्यांच्यावर डांबर टाकून पिसे चिटकवण्यात आली व त्यांना गावातून पळवले. ख्रिस्ती संमेलनाचा भंग केला गेला आणि साक्षीदारांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

२९. (अ) अनपेक्षित मार्गाने मिळणाऱ्‍या सुटकेबद्दल योहान कशी माहिती देतो? (ब) कशाप्रकारे “स्त्रीला भूमीने साहाय्य केले”? (क) अजगराने काय करणे चालू ठेवले?

२९ तथापि, एका अनपेक्षित मार्गाने सुटका आली: “परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला.” (प्रकटीकरण १२:१६, १७) ‘भूमी’—सैतानाच्या स्वतःच्या व्यवस्थेतील घटक—हिने ती “नदी” किंवा “प्रवाह” गिळून टाकला. १९४० च्या दशकामध्ये साक्षीदारांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातून तसेच इतर देशाच्या अधिपत्य गाजविणाऱ्‍या सत्तेकडून संमतीकारक असे एकामागून एक विजय मिळत गेले; यात भक्‍तिस्वातंत्र्याचा समावेश होता. सरतेशवेटी राष्ट्रांच्या संघजुटीने नात्झी-फॅसिस्ट संस्थेला गिळून टाकले आणि क्रूर हुकुमशाहीत पुष्कळ त्रास घेतलेल्या साक्षीदारांची सुटका केली. तथापि, छळ संपूर्णपणे थांबला नाही. कारण, अजगराचा क्रोध अद्याप शमला नाही व तो “येशूविषयी साक्ष देणारे” यांजविरुद्ध आपली लढाई चालूच ठेवून आहे. कित्येक देशात निष्ठावंत साक्षीदार अद्याप कैदेत आहेत आणि काही आपल्या निष्ठेमुळे मरत आहेत. तथापि, काही देशात अधिकारी वर्ग अधूनमधून त्यांचा दबाव कमी करतात, यामुळे साक्षीदारांना अधिक प्रमाणात स्वातंत्र्य अनुभवण्यास मिळते. * अशाप्रकारे भविष्यवादाच्या पूर्णतेस अनुलक्षून भूमी, छळाची नदी गिळून टाकत आहे.

३०. (अ) काय घडू देण्यासाठी पृथ्वीने पुरेसा विरंगुळा दिला? (ब) देवाच्या लोकांची सचोटी कशामध्ये परिणामित होते?

३० अशाप्रकारे, भूमीने पुरेसा विरंगुळा दिल्यामुळे देवाचे कार्य २०० पेक्षा अधिक देशात विस्तृत होऊ शकले आणि ४० लाखांपेक्षा अधिक सुवार्तेच्या विश्‍वासू प्रचारकांची निर्मिती झाली. स्त्रीच्या बाकीच्या राहिलेल्या संतानासोबत नव्या विश्‍वासू जनांचा मोठा आंतरराष्ट्रीय जमाव, जगापासून वेगळे राहणे, नैतिक शुद्धाचरणी असणे, बंधुजनांवर प्रीती दाखवणे या देवाच्या आज्ञा पाळून मशीही राज्याची साक्ष सर्वांना देत आहेत. त्यांची सचोटी सैतानाच्या निंद्य आव्हानाला पुरेपूर उत्तर देते; यामुळे, आता सैतान व त्याच्या व्यवस्थीकरणाची मृत्यूसूचकता अधिकच दाट बनत आहे.—नीतीसूत्रे २७:११.

[तळटीपा]

^ पडताळा दैहिक इस्राएलांचे १२ वंश, १२ प्रेषित, आध्यात्मिक इस्राएलांचे १२ वंश आणि नवीन यरुशलेमेच्या १२ वेशी, १२ देवदूत व १२ पाये.—प्रकटीकरण २१:१२-१४.

^ तथापि, प्रकटीकरण १२:९ ‘मोठा अजगर . . . व त्याच्या दूतांविषयी’ सांगते याकडे लक्ष द्या. याप्रकारे, दियाबल स्वतःला एक बनावट देव बनविण्याच्याच नव्हे तर, स्वतःला आद्य देवदूत बनवण्याच्या प्रयत्नात होता असे दिसते. पण वस्तुतः बायबल त्याला कधीच ही पदवी देत नाही.

^ कित्येक देशातील सर्वोच्च न्यायालयांनी यहोवाच्या साक्षीदारांना सुटका प्रदान केली; यापैकीचे काही निर्णय ९२ पृष्ठावर दिले आहेत.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८५ पानांवरील चौकट]

‘भूमीने आपले तोंड उघडले’

सैतानाने छळाचा पूर अभिषिक्‍त ख्रिस्ती व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्ध कित्येक देशात धडकविला. तथापि, सैतानाच्या स्वतःच्याच व्यवस्थीकरणात अशा घडामोडी झाल्या ज्यांनी तो पूर गिळून टाकला.

अमेरिकेत जमावाचा हल्ला व तुरुंगवास यांचा पूर १९४० दशकाच्या दरम्यान जे सर्वोच्च न्यायालयीन निकाल मिळाले त्यात गिळून टाकला गेला.

१९४५: जर्मनी व जपान यांनी नियंत्रित केलेल्या देशातील नाठाळ छळ दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान राष्ट्रांच्या संघटनांनी थांबविला.

डॉमिनिकन रिपब्लिक येथे यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी आणण्यात आली, तेव्हा त्यांना तुरुंगात टाकले, चाबकाने मारले गेले व रायफलीच्या दस्त्याने चोपले गेले. १९६० मध्ये हुकुमशहा रफाएल ट्रुजिल्लो व रोमन कॅथलिक चर्च यांजमधील वितुष्टतेमुळे यहोवाच्या साक्षीदारांवरील बंदी उठविण्यात आली.

नायजेरिया येथील मुलकी युद्धात जाळपोळ, बलात्कार, मारहाण, यातना व हत्या या गोष्टींचा साक्षीदारांना आलेला अनुभव १९७० मध्ये सरकारने ज्या प्रांतात या गोष्टी होत होत्या त्यावर आपला जम बसविला तेव्हा संपुष्टात आल्या.

स्पेनमध्ये घरांची झडती घेतली गेली आणि ख्रिश्‍चनांना देवाबद्दल बोलणी करण्याचा आणि ख्रिस्ती सभा घेण्याचा “गुन्हा” करण्याच्या कारणावरुन दंड व तुरुंगवास या शिक्षा झाल्या. हा छळ १९७० मध्ये सरतेशेवटी संपला तेव्हा, गैर-कॅथलिक धर्मांबद्दल सरकारच्या बदललेल्या धोरणामुळे यहोवाच्या साक्षीदारांना कायदेशीररित्या अधिकृत नोंदणी करून घेण्याची मुभा मिळाली.

पोर्तुगलमध्ये धरपकडीच्या लेखी हुकूमाशिवाय शेकडो घरांची झडती घेण्यात आली. साक्षीदारांना शारीरिक इजा देऊन त्यांना तुरुंगात टाकण्यात आले; त्यांच्याकडील बायबल इतस्ततः जप्त करण्यात आली. पण १९७४ मध्ये लष्करी क्रांती घडली आणि सरकारमध्ये बदल झाला व मुक्‍त संमेलनाचा कायदा संमत झाला तेव्हा तो दहशतवाद ‘गिळून टाकला गेला.’

अर्जेंटिनामध्ये लष्करी सरकारखाली यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आणि देशभरातील साक्षीदारांची, सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कारणावरुन धरपकड झाली. हा छळ सरतेशेवटी १९८४ मध्ये संपला, जेव्हा अधिपत्य गाजवणाऱ्‍या सरकारने यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेला कायदेशीर मंजूरी दिली.

[१८३ पानांवरील रेखाचित्र]

१९१४ राज्याचा जन्म

१९१९ नव्या राष्ट्राचा जन्म

१९१९—१९२२ तजेलाप्राप्तीचा काळ

१९२२— छळाचा प्रवाह

[१८२ पानांवरील चित्रे]

पृथ्वीवर अनर्थ