दोन विक्राळ श्वापदांबरोबर लढत देणे
अध्याय २८
दोन विक्राळ श्वापदांबरोबर लढत देणे
दृष्टांत ८—प्रकटीकरण १३:१–१८
विषय: सात डोकी असणारे श्वापद, दोन शिंगांचे श्वापद आणि श्वापदाची मूर्ती
पूर्णतेचा काळ: निम्रोदाच्या दिवसापासून ते मोठ्या संकटापर्यंत
१, २. (अ) योहान त्या अजगराबद्दल काय सांगतो? (ब) लाक्षणिक भाषेचा वापर करून योहान, अजगर वापरीत असलेल्या दृश्य संघटनेचे कसे वर्णन देतो?
मोठा अजगर खाली पृथ्वीवर टाकण्यात आला आहे! प्रकटीकरणाच्या आमच्या अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे की, तो जुनाट साप व त्याच्या दुरात्मिक अनुयायांना पुन्हा कधीही स्वर्गात प्रवेश मिळू शकणार नाही. पण “सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप” याचे अद्याप सर्व काही संपलेले नाही. हा सैतान ‘स्त्री व तिचे संतान’ यांजबरोबर लढत देण्यासाठी आणखी कोणकोणत्या माध्यमाचा वापर करीत आहे याबद्दल हा अहवाल पुढे अधिक सविस्तरपणे सांगतो. (प्रकटीकरण १२:९, १७) योहान त्या नागमोडी अजगराबद्दल म्हणतो: “आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला.” (प्रकटीकरण १२:१८) यास्तव, आपण अंमळ थांबून हा अजगर आपली कार्यसिद्धी कशी करतो त्याचे परीक्षण करू या.
२ आता, स्वर्गातील पवित्र वातावरणास सैतान व त्याच्या दुरात्म्यांच्या अस्तित्वाचा धोका नाही. त्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून देऊन त्यांना पृथ्वीच्या परिसरात टाकण्यात आले आहे. यामुळे, तर आता या २० व्या शतकात दुरात्मिक हालचाली वाढल्या आहेत. तो कावेबाज सर्प अद्याप भ्रष्ट आत्मिक संघटना चालवीत आहे. पण मानवजातीला ठकविण्यासाठी तो एखाद्या दृश्य संघटनेचा उपयोग करीत आहे का? योहान आम्हास सांगतो: “नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले; त्याला दहा शिंगे व सात डोकी असून त्याच्या शिंगावर दहा मुगूट आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते; त्याला अजगराने आपली शक्ति, आपले आसन व मोठा अधिकार दिला.”—प्रकटीकरण १३:१, २.
३. (अ) दानीएल संदेष्ट्याने दृष्टांतात कोणती विक्राळ श्वापदे बघितली? (ब) दानीएलाच्या ७ व्या अध्यायातील मोठी श्वापदे कशाचे सूचक आहेत?
३ हे विलक्षण श्वापद काय आहे? बायबल स्वतःच त्याचे उत्तर देते. सा. यु. पूर्व ५३९ मध्ये बाबेलचे पतन होण्याआधी दानीएल या यहूदी संदेष्ट्याने विक्राळ श्वापदांचा दृष्टांत बघितला होता. दानीएल ७:२-८ मध्ये तो समुद्रातून वर येणाऱ्या अशा चार श्वापदांचे वर्णन देतो. पहिले सिंह, दुसरे अस्वल, तिसरे चित्ता व “पाहा, एक चौथे श्वापद विक्राळ, भयानक व अतिशयित बळकट असे होते; . . . त्याला दहा शिंगे होती.” हे तर, योहानाने सा. यु. ९६ च्या सुमाराला जे श्वापद बघितले त्याच्यासारखे दिसत आहे. या श्वापदामध्ये सिंह, अस्वल, चित्ता आणि दहा शिंगे ही लक्षणे आहेत. मग, दानीएलाने जी विक्राळ श्वापदे बघितली होती त्यांची ओळख कशी मिळते? तो आम्हाला कळवतो: “ती मोठाली चार श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे होत.” (दानीएल ७:१७) होय, ती श्वापदे “राजे” किंवा पृथ्वीवरील राजकारणी सत्तांना सूचक आहेत.
४. (अ) दानीएलाच्या ८ व्या अध्यायातील एडका व बकरा यांनी कशाचे प्रतिनिधीत्व केले? (ब) बकऱ्याचे मोठे शिंग मोडले व त्यानंतर तेथे चार शिंगे उद्भवली याद्वारे काय सूचित झाले?
४ आणखी एका दृष्टांतात दानीएल दोन शिंगाचा एक एडका बघतो; याला मध्यभागी मोठे शिंग असणारा एक बकरा धडक देतो. याचा काय अर्थ आहे ते गब्रीएल देवदूत दानीएलाला समजावून सांगतो: “एडका . . . मेदय व पारस यांचे राजे. तो दांडगा बकरा ग्रीसचा राजा.” गब्रीएल पुढे म्हणतो की, बकऱ्याचे एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे येतील. हे, थोर सिकंदर बादशहाचा मृत्यू झाल्यावर २०० पेक्षा अधिक वर्षानंतर घडले. त्याचे राज्य चार विभागात विभागले गेले आणि त्यावर चार सेनापती वर्चस्व करू लागले.—दानीएल ८:३-८, २०-२५. *
५. (अ) श्वापद यासाठी असणारा ग्रीक शब्द कोणकोणते अर्थ देतो? (ब) प्रकटीकरण १३:१, २ मधील श्वापद त्याच्या सात डोक्यांसोबत कशाची प्रतिमा आहे?
५ या कारणास्तव, प्रेरित बायबलचा लेखक पृथ्वीवरील राजकारणी सत्तांना श्वापदे का म्हणतो ते समजण्याजोगे आहे. पण कोणत्या प्रकारातील श्वापदे? एक भाष्यकार प्रकटीकरण १३:१, २ मधील श्वापदाला “क्रूर” असे संबोधतो व म्हणतो: “θηρίον [थे․रीʹऑन, “श्वापद” यासाठी असणारा ग्रीक शब्द] याद्वारे जो अर्थ अभिप्रेत आहे, जसे की, क्रूर, नाशकारक, भयानक, अधाशी, वगैरे, प्रचंड प्राणी—ते सर्व आम्ही स्वीकारतो.” * सैतानाने मानवजातीवर ज्या माध्यमाने वर्चस्व केले आहे त्या रक्ताने डागळलेल्या राजकीय व्यवस्थेचे हे केवढे हुबेहुब चित्र रेखाटते! या श्वापदाची सात डोकी बायबल इतिहासात योहानाच्या काळापर्यंत ज्या सहा प्रमुख जागतिक सत्तांनी आपले प्रभुत्व केले त्यांची प्रतिमा आहेत. इजिप्त, अश्शुर, बाबेलोन, मेद-पारस, ग्रीस आणि रोम या त्या सत्ता होत्या. सातवी जागतिक सत्ता नंतर येण्याचे भाकीत केले आहे.—पडताळा प्रकटीकरण १७:९, १०.
६. (अ) श्वापदाच्या सात डोक्यांनी काय करण्यात पुढाकार घेतला? (ब) यहूदी व्यवस्थीकरणावर आपला न्यायदंड बजावण्यासाठी देवाने रोमचा कसा उपयोग करून घेतला आणि यरुशलेमेतील ख्रिश्चनांचे काय झाले?
६ हे खरे की, इतिहासात सातपेक्षा अधिक जगसाम्राज्ये होती जशी की, योहानाने श्वापदाला एक शरीर तसेच सात डोकी व दहा शिंगे असल्याचे बघितले होते. पण ती सात डोकी ही सात प्रमुख जागतिक सत्ता आहेत, ज्या प्रत्येकाने देवाच्या लोकांवर जाच आणण्यासाठी पुढाकार घेतला. सा. यु. ३३ मध्ये रोम अधिकारावर असताना सैतानाने श्वापदाच्या त्या डोक्याचा उपयोग देवाच्या पुत्राला ठार मारण्यासाठी करून घेतला. त्यावेळी देवाने विश्वासहीन यहूदी व्यवस्थीकरणाला नाकारले आणि रोमला सा. यु. ७० मध्ये त्या राष्ट्रावर देवाचा न्यायदंड पूर्ण करण्यास मुभा दिली. पण हे किती आनंदाचे आहे की, देवाचा खरा इस्राएल, म्हणजे अभिषिक्त ख्रिश्चनांची मंडळी हिला आधीच इशारा देण्यात आला होता त्यामुळे यरुशलेम व यहूदीया येथील ख्रिस्ती यार्देनेपलिकडे पळून गेले व सुरक्षित राहिले.—मत्तय २४:१५, १६; गलतीकर ६:१६.
७. (अ) युगाची समाप्ती आणि प्रभूचा दिवस आला तेव्हा काय घडणार होते? (ब) प्रकटीकरण १३:१, २ मधील श्वापदाचे सातवे डोके कोण असल्याचे सिद्ध झाले?
७ तथापि, पहिल्या शतकाच्या अंतापर्यंत या आरंभीच्या मंडळीतील बरेचसे सत्यापासून दूर गेले होते व त्यामुळे खऱ्या ख्रिस्ती गव्हाची, ‘राज्याच्या पुत्रांची,’ बहुतांशाने निदण, “दुष्टाचे पुत्र,” याकरवी वाढ खुंटविली गेली. तथापि, युगाची समाप्ती आली तेव्हा अभिषिक्त ख्रिस्ती पुन्हा एकदा एक संघटित गट या नात्याने सामोरे आले. प्रभूच्या दिवसात नीतिमान लोक ‘सूर्यासारखे प्रकाशणार’ होते. यास्तव, ख्रिस्ती मंडळीचे कार्यासाठी संघटन निर्माण करण्यात आले. (मत्तय १३:२४-३०, ३६-४३) यावेळेपर्यंत रोम साम्राज्य राहिले नव्हते. भव्य ब्रिटीश साम्राज्य तसेच प्रबळ अमेरिका यांनी जगाच्या रंगमंचावर आपले केंद्रस्थान स्थापले होते. ही जोड जागतिक सत्ता श्वापदाचे सातवे डोके असल्याचे सिद्ध झाले.
८. अँग्लो-अमेरिकन जोडसत्तेला श्वापदाची उपमा देणे हे धक्कादायक का नसावे?
८ अधिपत्य गाजवीत असलेल्या राजकीय साम्राज्याला श्वापद असे संबोधणे धक्कादायक नाही का? काही विरोधकांनी, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांच्या वैयक्तिक तसेच सामूहिक दर्जाला पृथ्वीभरातील न्यायालयात आव्हान दिले जात होते त्यावेळी हा दावा केला होता. पण जरा थांबा व विचार करा! जगातील राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय चिन्हासाठी पशू किंवा श्वापदांचा उपयोग करीत नाहीत का? उदाहरणार्थ, ब्रिटीशांचा सिंह, अमेरिकेचा गरुड आणि चीनचा अजगर ही प्रतीके आहेत. तर मग, बायबलचा ईश्वरी लेखक जर जागतिक सत्तांना सूचित करण्यात श्वापदांचा उपयोग करतो तर मग, कोणी आक्षेप का घ्यावा बरे?
९. (अ) सैतान श्वापदाला मोठा अधिकार देतो या बायबलच्या म्हणण्याबद्दल कोणी आक्षेप का घेऊ नये? (ब) बायबलमध्ये सैतानाचे कसे वर्णन आहे आणि तो सरकारांवर कसे प्रभुत्व गाजवतो?
९ याचप्रमाणे, सैतान श्वापदाला मोठा अधिकार देतो या बायबलच्या म्हणण्याला देखील कोणी का आक्षेप घ्यावा? त्या विधानाचा उगम देव स्वतः आहे व त्याच्यापुढे तर “राष्ट्रे पोहऱ्यातल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत.” या राष्ट्रांनी देवाचे भविष्यवादित वचन त्यांचे जसे वर्णन करते त्याबद्दल आक्षेप घेण्यापेक्षा देवाची मर्जी संपादित करणे हे त्यांच्या अधिक हिताचे आहे. (यशया ४०:१५, १७; स्तोत्र २:१०-१२) सैतान ही काही, निघून गेलेल्या आत्म्यांना अग्नीनरकात यातना देणारी दंतकथेतील व्यक्ती नाही. कारण अशाप्रकारातील स्थळ अस्तित्वातच नाही. उलटपक्षी, सैतानाला शास्त्रवचनात ‘तेजोमय देवदूत’ म्हटले असून तो, फसवणूक करण्यात अगदी सराईत आहे. तोच सर्वसाधारण राजकीय घडामोडींवर आपले प्रबळ प्रभुत्व राखून आहे.—२ करिंथकर ११:३, १४, १५; इफिसकर ६:११-१८.
१०. (अ) दहा शिंगावर प्रत्येकी एक मुकुट होता याद्वारे काय दिसते? (ब) दहा शिंगे व दहा मुकुट कशाचे प्रतिनिधीत्व करतात?
१० श्वापदाला सात डोक्यांवर दहा शिंगे आहेत. कदाचित चार डोक्यांना एकेक, तर राहिलेल्या तीन डोक्यांना दोन दोन शिंगे असावीत. याखेरीज, त्याच्या शिंगावर दहा मुकुट होते. दानीएलाच्या पुस्तकात विक्राळ श्वापदांचे वर्णन आहे आणि त्यांच्या शिंगांच्या संख्येच्या अर्थाचे प्रतिपादन शब्दशः आहे. उदाहरणार्थ, एडक्यावरील दोन शिंगे ही दोन भागीदारांनी म्हणजे मेदय व पारस यांनी मिळून बनलेल्या जागतिक साम्राज्याचे प्रतिनिधीत्व करतात, तर बकऱ्यावर असणारी चार शिंगे ही, सिकंदर बादशहाच्या ग्रीक साम्राज्यामधून जी चार राज्ये एकाच वेळी उदयास आली त्यांचे प्रतिनिधीत्व करीत होती. (दानीएल ८:३, ८, २०-२२) परंतु योहानाने जे श्वापद पाहिले त्याच्या एकंदर दहा शिंगाची संख्या ही मात्र लाक्षणिक आहे. (पडताळा दानीएल ७:२४; प्रकटीकरण १७:१२.) ती शिंगे, सैतानाच्या सबंध राजकारणी संघटनेने मिळून बनलेल्या पूर्ण सार्वभौम स्थितीला सूचक आहेत. ही सर्व शिंगे खूपच हिंसाचारी व आक्रमक आहेत, तथापि, सात डोक्यांद्वारे चित्रित केल्याप्रमाणे दर खेपेला एकाच जागतिक साम्राज्याचे वर्चस्व राहते. याचप्रमाणे दहा मुकुट, सर्व सार्वभौम राज्ये एकामागून एक असे त्या विशिष्ट काळी जागतिक साम्राज्य किंवा प्रबळ राज्य या नात्याने सत्ता गाजवणार होते.
११. श्वापदाला “देवनिंदात्मक नावे” होती याचा अर्थ काय?
११ त्या श्वापदाला “देवनिंदात्मक नावे” आहेत; ते स्वतःचा असा मोठेपणा दाखवते की, जे यहोवा देव व ख्रिस्त येशू यांना खूपच अनादर दाखवते. त्याने देव व खिस्त यांच्या नावांचा वापर, आपले राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी ढोंगीपणाने केला. याखेरीज त्याने खोट्या धर्माला देखील खेळविले, धर्मपुढाऱ्यांना आपल्या राजकीय कारभारात देखील भाग घेऊ दिला. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये बिशपांचा समावेश आहे. फ्रान्स व इटली यामध्ये कॅथलिक पाळकांनी प्रमुख राजकीय भूमिका पूर्ण केल्या. अलिकडेच लॅटिन अमेरिकेमध्ये पाळकांनी राजकीय पद ग्रहण केले. सरकार आपल्या चलन नोटांवर “आम्ही देवावर आपला भाव ठेवतो,” यासारखे धार्मिक घोषवाक्य लिहितात; तसेच, आपल्या नाण्यांवर आपल्या अधिपतींसाठी ईश्वरी संमतीचा दावा करतात जसे की, हे “देवाच्या कृपेने” नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व काही खरे पाहता, देवनिंदात्मक आहे, कारण याद्वारे ते त्याला त्यांच्या कलंकित राष्ट्रीय राजकारणी आखाड्यात ओढू पहात असतात.
१२. (अ) श्वापद “समुद्रातून” बाहेर येते हे कशाला सूचित आहे व ते बाहेर येण्यास कधी सुरवात झाली? (ब) अजगर लाक्षणिक श्वापदाला आपला मोठा अधिकार देतो याकरवी काय सूचित होते?
१२ श्वापद “समुद्रातून” वर येते आणि समुद्र हा प्रचंड लाटांना सूचक आहे जेथून मानवी सरकारे बाहेर येतात. (यशया १७:१२, १३) मानवजातीच्या गोंधळलेल्या समुद्रातून, निम्रोदाच्या काळी (साधारणपणे सा. यु. पू. २१ व्या शतकात) जलप्रलयाआधी यहोवास विरोध करणारे व्यवस्थीकरण सामोरे आले तेव्हाच श्वापदाने बाहेर येण्यास सुरवात केली. (उत्पत्ती १०:८-१२; ११:१-९) तथापि, प्रभूच्या दिवसात या श्वापदाच्या सातव्या डोक्यानेच स्वतःला पूर्णपणे प्रकटविले. याकडेही लक्ष द्या की, अजगराने श्वापदाला “आपली शक्ति, आपले आसन व मोठा अधिकार दिला.” (पडताळा लूक ४:६.) अशाप्रकारे ते श्वापद सैतानाने मानवजातीच्या प्रचंड समुदायातून निर्माण केलेली राजकीय निर्मिती होय. सैतान हा खरोखरच “ह्या जगाचा अधिकारी” आहे.—योहान १२:३१.
प्राणघातक घाव
१३. (अ) प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला श्वापदावर कोणती विपत्ती ओढावते? (ब) एका डोक्याला प्राणघातक घाव झाला असला तरी त्यामुळे सबंध श्वापदाला कशा वेदना होतात?
१३ प्रभूच्या दिवसाच्या आरंभीच्या काळात श्वापदावर आपत्ती येते. योहान कळवतो: “त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले; तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला; तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या श्वापदामागून गेली.” (प्रकटीकरण १३:३) हे वचन सांगते की, श्वापदाच्या एका डोक्याला प्राणघातक घाव झाला; पण १२ वे वचन सांगते की, जणू सबंध श्वापदाला त्रास होत होता. ते का बरे? कारण श्वापदाची डोकी सर्वच एकामागून एक वर येत नाहीत. प्रत्येकाने आपापल्या वेळी मानवजातीवर, पण खासपणे देवाच्या लोकांवर आपले प्रभुत्व चालवले. (प्रकटीकरण १७:१०) यामुळे, प्रभूचा दिवस सुरु होतो तेव्हा केवळ एकच सातवे डोके जागतिक साम्राज्य म्हणून वर्चस्व गाजवते. या डोक्यावर झालेला प्राणघातक घाव सबंध श्वापदाला मोठे दुःख देतो.
१४. हा प्राणघातक घाव कधी करण्यात आला आणि याचा परिणाम सैतानाच्या श्वापदावर कसा झाला, त्याचे वर्णन एका लष्करी अधिकाऱ्याने कसे केले आहे?
१४ हा प्राणघातक घाव काय होता? याला नंतर तरवारीचा घाव असे म्हणण्यात आले आहे आणि तरवार ही तर युद्धाचे प्रतीक आहे. या कारणास्तव, प्रभूच्या दिवसाच्या आरंभाला घडलेला तरवारीचा घाव हा पहिल्या जागतिक महायुद्धाला अनुलक्षून असला पाहिजे; या युद्धाने सैतानाच्या राजकीय श्वापदाला उद्ध्वस्त करून हळूहळू कमजोर बनवले. (प्रकटीकरण ६:४, ८; १३:१४) त्या युध्दादरम्यान लष्करी अधिकारी असणारे मॉरीस गेनेवॉइक्स म्हणतात: “मानवजातीच्या सबंध इतिहासात ऑगस्ट २, १९१४ तारखेप्रमाणे फारच थोड्या तारखांना महत्त्व आहे हे प्रत्येक जण मान्य करतो. त्या भयानक घटनेत प्रथम युरोप व नंतर जवळजवळ सर्व मानवजात पडली. सर्व मेळावे, एकमत, नैतिक कायदे आणि सर्व पाये हादरले गेले; एका दिवसामागून दुसऱ्या दिवशी सर्वकाही प्रश्नार्थक बनले. ती घटना स्वाभाविक अपशकून आणि व्यवहार्य अपेक्षा यापलिकडे जाणार होती. प्रचंड गोंधळ आणि राक्षसी असे त्याचे स्वरुप आजही जागेपणी चक्रावून सोडते.”—मॉरीस गेनेवॉइक्स, ॲकॅडमी फ्रान्काइसचे सदस्य, यांच्या थोरपणाचे अभिवचन (इंग्रजी, १९६८) या पुस्तकातील अवतरण.
१५. श्वापदाच्या सातव्या डोक्याला कसा प्राणघातक घाव मिळाला?
१५ श्वापदाच्या त्या वर्चस्व गाजविणाऱ्या सातव्या डोक्याला ते युद्ध खूपच नाशकारक वाटले. इतर युरोपियन राष्ट्रांसोबत ब्रिटनने देखील आपल्या तरुणांना आघातजन्य संख्येने गमावले. बॅटल ऑफ रिवर सोमे या एकाच युद्धात, १९१६ मध्ये ४,२०,००० ब्रिटीशांसोबत, २,००,००० फ्रेंच, ४,५०,००० जर्मन सैनिक जखमी झाले—म्हणजे १०,००,००० पेक्षाही अधिक जखमी! आर्थिकदृष्ट्या पाहू जाता ब्रिटनची युरोपातील इतर भागासोबत खूपच हानी झाली. प्रचंड ब्रिटीश साम्राज्य मोठ्या आघाताखाली आले व ते पूर्णपणे केव्हाही बरे होऊ शकले नाही. खरेच, २८ श्रेष्ठ देशांनी भाग घेतलेल्या त्या युद्धाने सबंध जगाला जणू प्राणघातक गुद्दा मारला. पहिले जागतिक महायुद्ध झाल्यावर ६५ वर्षांनी म्हणजे ऑगस्ट ४, १९७९ मध्ये लंडन, इंग्लंडच्या द एकॉनॉमिस्ट वृत्तपत्राने असे म्हटले: “१९१४ मध्ये जगाने आपला तोल गमावला, जो त्याला तेव्हापासून पुन्हा सावरता आला नाही.”
१६. पहिल्या जागतिक महायुद्धात अमेरिकेने, आपण दुहेरी जागतिक साम्राज्याचे भाग आहोत हे कसे दाखवले?
१६ याच वेळी, तेव्हा मोठे युद्ध असे म्हटल्या जाणाऱ्या युद्धाने अमेरिकेस अँग्लो-अमेरिकन जागतिक साम्राज्याचा प्रशस्त भाग बनण्यास मार्ग मोकळा करून दिला. युद्धाच्या आरंभीच्या वर्षांत, अमेरिका युद्धात नाही असे लोकांचे साधारण मत झाले होते. पण एसमे विंगफिल्ड-स्ट्रॅटफोर्ड या इतिहासकाराने लिहिल्यानुसार, “अशा या खडतर घटकेला ब्रिटन आणि अमेरिका आपले मतभेद विसरुन ते आपणात ऐक्य व विश्वस्तता घडवून आणणार का, हा एक मोठा प्रश्न होता.” घडलेल्या घटनांनुसार तसेच दिसले. १९१७ मध्ये अमेरिकेने आपले धन व मनुष्यबळ, झगडणाऱ्या मित्रराष्ट्रांना देऊन युद्धाला अधिक चेतविले. अशाप्रकारे, ब्रिटन व अमेरिका यांचे बनलेले श्वापदाचे संयुक्त सातवे डोके विजयी ठरले.
१७. युद्धानंतर सैतानाच्या पृथ्वीवरील व्यवस्थेचे काय झाले?
१७ युद्धानंतरचे जग तर अगदीच भिन्न ठरले. सैतानाच्या पृथ्वीवरील व्यवस्थेला प्राणघातक घाव बसला होता तरी ती बरी झाली आणि मग पूर्वीपेक्षा अति बलवान झाली व स्वतःच्या बरे होण्याच्या शक्तीमुळे लोकांच्या कौतुकास्पद ठरली.
१८. सर्वसाधारण मानवजात “आश्चर्य करीत त्या श्वापदामागून गेली” हे कसे म्हणता येऊ शकते?
१८ चार्ल्स एल. मी, ज्युनि. हे इतिहासकार लिहितात: “[पहिल्या जागतिक युद्धाने] जुन्या व्यवस्थेचे कोलमडणे हे एक मध्यांतर ठरले व त्याने स्व-सत्ता, नव्या राष्ट्रांची व गटांची मुक्तता, नवे स्वातंत्र्य व स्वैराचार यांना मोकळीक दिली.” युद्धानंतरच्या घडामोडीत, आता बरे झालेल्या श्वापदाच्या सातव्या डोक्याने आघाडी घेतली आणि ते अमेरिकेसोबत प्रबळ भूमिका करण्यासाठी पुढे सरसावले. या जोड सत्तेने आधी लिग ऑफ नेशन्स व नंतर संयुक्त राष्ट्रसंघ यांचा पुरस्कार करण्यात पुढाकार घेतला. अमेरिकेच्या राजकीय सत्तेने १९८० च्या दशकात अधिक कृपापात्र राष्ट्रांना राहणीमानाचा उच्च दर्जा निर्माण करण्यात, रोगांविरूद्ध लढत देण्यात आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात मोठा हातभार लावला. त्याने १२ लोकांना चंद्रावर देखील पाठविले. यास्तव, सर्वसाधारण मानवजात “आश्चर्य करीत त्या श्वापदामागून गेली” हे तितके आश्चर्याचे नव्हते.
१९. (अ) श्वापदाचे नुसते कौतुक करण्याच्याही पलिकडे मानवजात कशी गेली आहे? (ब) पृथ्वीवरील सर्व राज्यांवर निर्विवादपणे कोणाचा ताबा आहे आणि हे आम्हाला कसे माहीत होते? (क) सैतान श्वापदाला कसा अधिकार देतो आणि याचा बहुतेक लोकांवर काय परिणाम झाला आहे?
१९ नुसते आश्चर्य किंवा कौतुक करण्याच्या पुढेही मानवजात गेली, असे योहान पुढे सांगतो: “अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, ‘ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?’” (प्रकटीकरण १३:४) पृथ्वीवरील सर्व राज्ये आपल्या ताब्यात आहेत असे सैतानाने, येशू पृथ्वीवर होता त्यावेळी दाव्याने म्हटले होते. येशूने याबद्दल वाद केला नाही आणि खरे पाहता त्यानेच स्वतः सैतानाला या जगाचा अधिकारी असल्याचे म्हटले आणि त्याच्या काळाच्या राजकारणात सहभागी होण्याचे नाकारले. खऱ्या ख्रिश्चनांबद्दल योहानाने नंतर असे लिहिले: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९; लूक ४:५-८; योहान ६:१५; १४:३०) सैतान श्वापदाला अधिकार देतो व हे तो राष्ट्रीयवादाच्या आधारावर करतो. त्यामुळे मानवजातीचे संघटन ईश्वरी प्रेमामध्ये होण्याऐवजी तिचे वंशाभिमान, जात व राष्ट्रे यांचा अभिमान यामध्ये विघटन झाले. अशाप्रकारे, मानवजातीतील बहुतेक लोक श्वापदाच्या ज्या भागात ते राहात आहेत त्या प्रदेशावर त्याचे वर्चस्व आहे व ते त्याची भक्ती करत आहेत. अशाप्रकारे, श्वापदाला हे कौतुक व भक्ती मिळते.
२०. (अ) लोक कोणत्या अर्थाने श्वापदाची भक्ती करीत आहेत? (ब) यहोवा देवाची भक्ती करणारे ख्रिस्ती, श्वापदाच्या अशा प्रकारच्या भक्तीत का सहभागी होत नाहीत आणि ते कोणाचे उदाहरण अनुसरतात?
२० ही भक्ती कशी दिली जाते? ती, देवावरील प्रेमापुढे राष्ट्रावरील प्रेमास ठेवण्याद्वारे दिली जाते. आपण जन्मलो त्या राष्ट्रावर बहुतेकांचे प्रेम आहे. खरे ख्रिस्ती देखील ते राहतात तेथील चांगले नागरिक या नात्याने आपल्या शासनकर्त्यांचा आणि राष्ट्राच्या बोधचिन्हांचा आदर करतात; शिवाय आपल्या वसाहतीच्या व शेजाऱ्यांच्या कल्याणाप्रीत्यर्थ विधायक स्वरुपाचे साहाय्य देखील करतात. (रोमकर १३:१-७; १ पेत्र २:१३-१७) तथापि, ते एका राष्ट्राला इतरांपेक्षा वरचढ मानून अंधश्रद्धेची निष्ठा देऊ शकत नाही. “बरोबर असो की, चूक, आमचेच राष्ट्र” अशी ख्रिस्ती शिकवण नाही. या कारणास्तव, यहोवा देवाची भक्ती करणारे ख्रिस्ती श्वापदाच्या कोणत्याही भागाला अहंकारी अशी देशभक्तीपर उपासना देण्यात सहभागी होऊ शकत नाहीत; कारण तसे करणे याचा अर्थ, श्वापदाच्या अधिकाराचा उगम, अजगर याची भक्ती करण्यासारखे आहे. “ह्या श्वापदासमान कोण आहे?” असे ते कौतुक करू शकत नाहीत. उलटपक्षी, ते यहोवाचे विश्वव्यापी सार्वभौमत्व उंचावून धरण्यात मीखाएलचे उदाहरण अनुसरतात; कारण त्याच्या नावाचा अर्थ, “देवासमान कोण आहे?” असा आहे. याच मीखाएल, ख्रिस्त येशूने जसे सैतानाला स्वर्गातून हाकलून देण्यात विजय मिळविला तसेच तो देवाच्या नियुक्त वेळी, श्वापदासोबत लढाई करून त्याच्यावर देखील विजय मिळवील.—प्रकटीकरण १२:७-९; १९:११, १९-२१.
पवित्र जनांबरोबर लढाई करणे
२१. श्वापदाचा वापर करण्याच्या सैतानाच्या योजनेबद्दल योहान कसे वर्णन करतो?
२१ श्वापदाचा उपयोग करून आपल्या स्वार्थी इच्छा पूर्ण कराव्यात अशा कावेबाज सैतानाच्या योजना आहेत. याबद्दलचे स्पष्टीकरण देताना योहान लिहितो: “त्याला [सात डोकी असलेले श्वापद] मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले, व बेचाळीस महिने त्याला आपले काम चालविण्याची मुभा देण्यात आली. त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास तोंड सोडले. पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांस जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करितील.”—प्रकटीकरण १३:५-८.
२२. (अ) ४२ महिने हे कोणत्या काळाला अनुलक्षून आहेत? (ब) या ४२ महिन्यात अभिषिक्त जनांना कसे ‘जिंकण्यात आले’?
२२ येथे उल्लेखिण्यात आलेले ४२ महिने हा तोच साडेतीन वर्षांचा कालावधी आहे, ज्यामध्ये, दानीएलाच्या भविष्यवादात दाखविण्यात आलेल्या एका श्वापदाच्या उद्भवलेल्या शिंगाद्वारे पवित्र जनांना त्रास दिला जातो. (दानीएल ७:२३-२५; तसेच प्रकटीकरण ११:१-४ पहा.) अशाप्रकारे १९१४ चा उत्तरार्ध ते १९१८ पर्यंत युद्ध करीत असलेली राष्ट्रे जेव्हा खरेपणाने एकमेकांना जंगली श्वापदासारखी फाडून टाकत होती, त्यावेळी त्या राष्ट्रातील नागरिकांना श्वापदाची भक्ती करण्यासाठी, राष्ट्रीयवादाच्या धर्मात बुडून जाण्याचा आणि स्वतःच्या देशासाठी मरण्याची तयारी दाखवण्याचाही दबाव आणला जात होता. अशा या दबावामुळे अभिषिक्त जनांपैकी पुष्कळांना प्रखर त्रास सहन करावा लागला, कारण सर्वोच्च आज्ञाधारकता केवळ यहोवा देव व त्याचा पुत्र ख्रिस्त येशू यांच्या मालकीची आहे असा यांचा विश्वास होता. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) त्यांची ही परीक्षा, मे १९१८ मध्ये त्यांना ‘जिंकिले गेले’ तेव्हा कळसाला पोहंचली. अमेरिकेत वॉचटावर संस्थेचे प्रमुख अधिकारी व इतर प्रतिनिधी यांना चुकीने तुरुंगवास मिळाला व त्यांच्या ख्रिस्ती बांधवांचे संघटित प्रचारकार्य मोठ्या प्रमाणात भंगले. श्वापदाला ‘सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर अधिकार दिला होता’ त्यामुळे त्याने देवाचे जगभरातील काम दाबून टाकले.
२३. (अ) ‘कोकऱ्याचे जीवनी पुस्तक’ काय आहे आणि १९१८ पासून काय पूर्ण होत आहे? (ब) सैतानाच्या दृश्य संघटनेने ‘पवित्र जन’ यांवर जो विजय मिळविल्याचे दिसले तो का क्षणभंगुर आहे?
२३ ते जणू सैतान व त्याच्या संस्थेला विजय मिळाल्यासारखे दिसत होते. पण यामुळे यांच्यापैकी कोणालाही दीर्घ पल्ल्याचे लाभ मिळणार नव्हते; कारण सैतानाच्या दृश्य संघटनेतील कोणाचेही नाव “कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात” लिहिलेले नाही. त्या लाक्षणिक पुस्तकात येशूबरोबर त्याच्या स्वर्गीय राज्यात जे राज्य करणार आहेत अशांची नावे आहेत. यापैकीची पहिली नावे सा. यु. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या वेळी लिहिण्यात आली. त्यानंतर वर्षामागून वर्षे या यादीत भर पडत राहिली. १९१८ पासून १,४४,००० राज्य-वारसांच्या अवशिष्ट जनांवर शिक्कामोर्तब काम पूर्ण करण्यात येत आहे. लवकरच त्या सर्वांची नावे कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात पुसून टाकता येणार नाहीत अशी लिहिली जातील. जे श्वापदाची भक्ती करतात अशा विरोधकांपैकी कोणाचेही नाव त्या पुस्तकात लिहिले जाणार नाही. या कारणामुळे, यांनी ‘पवित्र जनांवर’ जो काही विजय मिळविल्याचे दिसत आहे तो केवळ पोकळ, तात्कालिक आहे.
२४. समजबुद्धी असणाऱ्यांनी काय ऐकावे म्हणून योहान आव्हान करतो आणि ऐकलेल्या शब्दांचा देवाच्या लोकांसाठी काय अर्थ होतो?
२४ ज्यांच्याठायी समज आहे अशांनी काळजीपूर्वक ऐकून घ्यावे असे आव्हान योहान आता करतो. तो म्हणतो: “ज्या कोणाला कान आहेत तो ऐको.” मग, तो पुढे म्हणतो: “जो कैदेत जावयाचा तो कैदेत जातो, जो तरवारीने जिवे मारील त्याला तरवारीने मरणे भाग आहे. ह्यावरुन पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो.” (प्रकटीकरण १३:९, १०) यिर्मयाने सा. यु. पू. ६०७ च्या आधी वर नमूद असणाऱ्या शब्दांसारखेच शब्द लिहून हे दाखवले की, यहोवाने अविश्वासू यरुशलेम शहराबद्दल जो न्यायदंड सांगितला आहे तो मागे फिरणार नाही. (यिर्मया १५:२; तसेच यिर्मया ४३:११; जखऱ्या ११:९ पहा.) येशूने आपल्या परीक्षेच्या काळात स्पष्ट केले की, त्याच्या अनुयायांनी हातमिळवणी करू नये; तो म्हणाला: “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२) अशाच प्रकारे आता या प्रभूच्या दिवसात देवाच्या लोकांनी बायबलच्या तत्त्वांना धरुन राहिले पाहिजे. श्वापदाची भक्ती करणाऱ्या अपश्चात्तापी लोकांना सुटका नसणार. आम्ही सर्वांनी पुढे असणाऱ्या परीक्षा व छळ यातून निभावण्यासाठी सहनशीलता व अटळ विश्वास राखला पाहिजे.—इब्रीयांस १०:३६-३९; ११:६.
दोन शिंगे असणारे श्वापद
२५. (अ) जागतिक दृश्यातून पुढे येणाऱ्या आणखी एका लाक्षणिक श्वापदाचे योहान कसे वर्णन देतो? (ब) या नव्या श्वापदाची दोन शिंगे, तसेच ते पृथ्वीतून वर येते याद्वारे काय सूचित होते?
२५ पण आता दुसरे एक श्वापद पृथ्वीच्या दृश्यात येते. योहान कळवतो: “नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले; त्याला कोकरासारखी दोन शिंगे होती; ते अजगरासारखे बोलत होते. ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्यासमक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करिते. ते मोठी चिन्हे करिते; माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नि पडावा असे देखील करिते.” (प्रकटीकरण १३:११-१३) या श्वापदाची दोन शिंगे आहेत हे दोन राजकीय साम्राज्यांची भागीदारी कळवते. हे श्वापद समुद्रातून नव्हे तर भूमीतून वर येताना दाखवले आहे. याचा अर्थ याची निर्मिती ही, सैतानाच्या आधीच प्रस्थापित असणाऱ्या पृथ्वीवरील व्यवस्थेमधून आहे हे स्पष्ट आहे. ते आधीच अस्तित्वात असणारे जागतिक साम्राज्य असले पाहिजे, जे प्रभूच्या दिवसात एक अभूतपूर्व भूमिका धारण करते.
२६. (अ) हे दोन शिंग असलेले श्वापद काय आहे व याचा मूळच्या श्वापदाबरोबर कोणता संबंध आहे? (ब) दोन शिंगे असलेल्या श्वापदाची ती शिंगे कोणत्या अर्थाने कोकऱ्यासारखी आहेत आणि ते बोलताना “अजगरासारखे” कसे आहे? (क) राष्ट्रभक्ती आचरणारे लोक खरेपणाने कशाची उपासना करीत असतात आणि राष्ट्रभक्तीची तुलना कशासोबत होते? (तळटीप पहा.)
२६ ते काय असू शकेल? अँग्लो-अमेरिकन जागतिक साम्राज्य—पहिल्या श्वापदाचे सातवे डोके, पण आता एका खास भूमिकेत! दृष्टांतात याला एक वेगळे श्वापद दाखविल्यामुळे ते जागतिक रंगमंचावर स्वतंत्रपणे कसे काम करते हे अधिक स्पष्टपणे पाहण्यात आमची मदत होते. दोन शिंगांचे हे लाक्षणिक श्वापद एकाच वेळी अस्तित्वात असणाऱ्या दोन, स्वतंत्र परंतु एकमेकांना सहकार्य देणाऱ्या राजकीय साम्राज्यांचे मिळून बनले आहे. त्याची “कोकरासारखी” असणारी दोन शिंगे, त्याच्याबद्दल ते, खूपच नम्र व आक्रमक नसणारे असे दाखवते; पण त्यासोबतच, ज्याकडे सर्व जगाने धाव घ्यावी असे प्रज्वलित स्वरुपाचे सरकार असल्याचे देखील ते स्वतःला दाखवते. ते “अजगरासारखे” बोलते म्हणजे, ते दबाव व धाक वापरते आणि जेथे कोठे त्याचे अधिपत्य जुमानले जात नाही तेथे ते उघड हिंसाचार देखील घडवते. त्याने देवाच्या कोकऱ्याच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या देवराज्याला अधीनता दाखवण्याचे प्रोत्साहन दिलेले नाही, उलट त्याने मोठा अजगर, दियाबल सैतान याच्या इच्छापूर्तीचे काम केले. त्याने राष्ट्रीय विभाजन आणि द्वेष उभारला, ज्यामुळे पहिल्या श्वापदाची उपासना करण्यास बढती मिळाली. *
२७. (अ) दोन शिंगे असणारे श्वापद स्वर्गातून अग्नी पडावा असे करते याद्वारे, त्याची कोणती वृत्ती प्रदर्शित होते? (ब) या दोन शिंगे असणाऱ्या श्वापदाच्या आधुनिक नमुन्याबद्दल पुष्कळांची कोणती समज आहे?
२७ दोन शिंगांचे हे श्वापद मोठमोठी चिन्हे करते; ते आकाशातून अग्नी पडावा असेही करते. (पडताळा मत्तय ७:२१-२३.) आकाशातून अग्नी पाडण्याच्या प्रकाराबाबत आपल्याला एलिया या देवाच्या प्राचीन संदेष्ट्याची आठवण होते, त्याची व बालाच्या संदेष्ट्यांची स्पर्धा लागली होती. त्याने स्वर्गातून यहोवाच्या नामाने अग्नी पाडून दाखवला तेव्हा तो खरा संदेष्टा होता आणि बालाचे सर्व संदेष्टे खोटे होते हे निसंशये सिद्ध झाले. (१ राजे १८:२१-४०) त्या बालाच्या संदेष्ट्यांप्रमाणेच दोन शिंगे असणाऱ्या श्वापदाला स्वतःबाबतीत संदेष्टा असणारी गुणलक्षणे आहेत असे वाटते. (पडताळा प्रकटीकरण १३:१४, १५; १९:२०.) दोन जागतिक महायुद्धातील वाईट शक्तींना पराभूत केल्याचा त्याचा दावा आहे व आता तर ते तथाकथित अभक्त नास्तिकवाद्यांच्या विरुद्ध उभे ठाकले आहे! दोन शिंगे असलेल्या श्वापदाच्या आधुनिक नमुन्याला पुष्कळजण स्वातंत्र्याचा रक्षक व चांगल्या भौतिक गोष्टींचे भांडे समजतात.
श्वापदाची मूर्ती
२८. दोन शिंगे असणारे श्वापद, त्याची शिंगे कोकऱ्यासारखी असली तरी ते प्रत्यक्षात कोकऱ्यासारखे साळसूद नाही, हे योहान कसे दाखवतो?
२८ हे दोन शिंगे असणारे श्वापद, कोकऱ्याची शिंगे भासवते तसे साळसूद आहे का? योहान पुढे म्हणतो: “जी चिन्हे त्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपविले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकविते; म्हणजे तरवारीचा घाव लागला असताहि, जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ति करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली, ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जिवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे.”—प्रकटीकरण १३:१४, १५.
२९. (अ) श्वापदाच्या मूर्तीचा कोणता उद्देश आहे व तिची प्रस्थापना केव्हा घडली? (ब) श्वापदाची मूर्ती ही निर्जीव वस्तू का नाही?
२९ आता ही ‘श्वापदाची मूर्ती’ कोणती व तिचा काय उद्देश आहे? तिचा उद्देश, ज्याची ती मूर्ती आहे त्या सात डोकी असलेल्या श्वापदाच्या भक्तीला चालना देणे व याद्वारे श्वापदाचे अस्तित्व चिरस्थायी राखणे हा आहे. ही मूर्ती, सात डोकी असणाऱ्या श्वापदाचा तरवारीने मिळालेला मरणप्राय घाव बरा झाल्यावर, म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर बनवण्यात आली आहे. ती काही, नबुखद्नेस्सर राजाने दुरा मैदानात उभारलेल्या पुतळ्यासारखी निर्जीव वस्तू नाही. (दानीएल ३:१) दोन शिंगे असणारे श्वापद या मूर्तीत प्राण घालते ज्याद्वारे ती मूर्ती सजीव होते व जागतिक इतिहासात आपला भाग पूर्ण करू लागते.
३०, ३१. (अ) ही मूर्ती कोण असल्याचे इतिहासातील वस्तुस्थिती पुष्टी देतात? (ब) या मूर्तीची उपासना करण्याचे नाकारल्यामुळे कोणाला ठार करण्यात आले का? विवेचित करा.
३० इतिहासात घडलेल्या गोष्टींनी हे दाखवले की, ही मूर्ती, ब्रिटन व अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाठबळ दिलेली, पुढे आणलेली व उद्देशिलेली अशी संघटना आहे जी, आधी लिग ऑफ नेशन्स या नावाने ओळखली गेली. पुढे प्रकटीकरणाच्या १७ व्या अध्यायात ही एका वेगळ्या रुपात, म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असलेल्या जिवंत, श्वासवान अशा किरमिजी रंगाच्या श्वापदाच्या रुपात दिसेल. ही आंतरराष्ट्रीय संघटना ‘बोलते’ म्हणजे ती स्वतःबद्दल, मानवजातीत शांती व सुरक्षा आणणारी एकमात्र संस्था आहे असा उद्दामपणाचा दावा करते. पण खरे पाहता ती, सदस्य राष्ट्रांची एक संघटना बनली असून तेथे त्यांच्या शाब्दिक चकमकी व उपहास यांची देवाणघेवाण होत असते. आपल्या अधिकारास अवमानणाऱ्या कोणाही राष्ट्राला वा लोकांना जिवंतपणीच मृत्यू देण्याचा धाक ती घालते. तिने तर तिच्या तत्त्वप्रणालींचे पालन न करणाऱ्या राष्ट्रांना काढून टाकण्याची धमकी दिली आहे. मोठ्या संकटास आरंभ होईल त्यावेळी श्वापदाच्या मूर्तीची लष्करी “शिंगे” विध्वंसक प्रकारची मोठी भूमिका पूर्ण करील.—प्रकटीकरण ७:१४; १७:८, १६.
३१ दुसऱ्या जागतिक महायुद्धापासून श्वापदाची मूर्ती, जी सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या रुपात दिसली आहे, तिने अक्षरशः जिवे मारण्याचे काम केले आहे. उदाहरणार्थ, १९५० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्याने उत्तर व दक्षिण कोरियाच्या युद्धात भाग घेतला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्याने दक्षिण कोरियाची बाजू घेऊन अदमासे १४,२०,००० उत्तर कोरियातील लोकांना व चिनी लोकांना ठार केले. याचप्रमाणे, १९६० ते १९६४ पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाचे सैन्य काँगो (सध्याचे झाईर) येथे क्रियाशील होते. याचप्रमाणे, जागतिक नेते आणि पोप पॉल सहावे आणि जॉन पॉल दुसरे यासारख्या धर्मनेत्यांनीही ही मूर्ती, मानवाच्या शांतीसाठी असणारी शेवटली व सर्वोत्तम आशा आहे या शब्दांनी तिचा गौरव केला आहे. मानवजातीने तिची सेवा केली नाही तर ते म्हणतात की, मानवजात स्वतःच नष्ट होईल. अशाप्रकारे मूर्तीसोबत आपली वाटचाल ठेवण्याचे नाकारणाऱ्या व तिची उपासना करीत नाहीत अशा मानवांचा ते लाक्षणिकपणे मृत्यू आणतात.—पडताळा अनुवाद ५:८, ९.
श्वापदाचे चिन्ह
३२. सैतान देवाच्या स्त्री संतानाच्या उरलेल्या लोकांना अधिक त्रास देण्यासाठी, आपल्या दृश्य संघटनेमधील राजकीय भागाचा कसा उपयोग करतो याचे वर्णन योहान कसे देतो?
३२ सैतान आपल्या दृश्य संघटनेमधील राजकीय भागाला, देवाच्या स्त्री संतानाच्या उरलेल्या लोकांना अधिक त्रास देण्यासाठी कसे उपयोगात आणतो ते आता योहान बघतो. (उत्पत्ती ३:१५) तो परत ‘श्वापदाच्या’ वर्णनाकडे वळतो: “लहानथोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीहि विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करिते. येथे अकलेचे काम आहे; ज्याला बुद्धि आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे; त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो [“ती संख्या मनुष्याची आहे,” NW]; ती त्याची संख्या सहाशे सहासष्ट होय.”—प्रकटीकरण १३:१६-१८.
३३. (अ) श्वापदाचे नाव काय आहे? (ब) सहा हा आकडा कशाशी संबंधित आहे? विवेचित करा.
३३ श्वापदाला एक नाव आहे आणि ते नाव ६६६ ही संख्या आहे. सहा हा आकडा यहोवाच्या शत्रूंसोबत निगडित आहे. रेफाई येथील एक पलिष्टी माणूस “मोठा धिप्पाड” होता आणि “त्याच्या प्रत्येक हातास व पायास सहा सहा अशी” बोटे होती. (१ इतिहास २०:६) नबुखद्नेस्सर राजाने आपल्या राजकीय अधिकाऱ्यांना उपासनेत एकत्र करावे यासाठी ६ हात रुंद व ६० हात उंच असलेल्या एका मूर्तीची स्थापना केली. देवाच्या सेवकांनी या सोन्याच्या मूर्तीला दंडवत घालण्यास नकार दिला तेव्हा त्यांना आगीच्या भट्टीत टाकण्यात आले. (दानीएल ३:१-२३) सहा ही संख्या सात या संख्येला एकाने उणी आहे आणि सात ही संख्या देवाच्या दृष्टीने पूर्णतेची आहे. या कारणास्तव, सहाच्या तीन पटीतील संख्या ही एकंदर अपूर्णतेची सूचकता आहे.
३४. (अ) श्वापदाची संख्या ‘मनुष्याची आहे,’ यामुळे कोणता अर्थबोध होतो? (ब) सैतानाच्या जागतिक राजकारणी व्यवस्थेला ६६६ हे संख्या-नाव अगदी योग्य का आहे?
३४ नाव हे व्यक्तीचा परिचय देते. पण मग, संख्या ही त्या श्वापदाची कशी ओळख देणार? योहान तर म्हणतो की, ती संख्या ‘मनुष्याची आहे,’ आत्मिक प्राणी वर्गातील नाही. या कारणास्तव नाव हे या गोष्टीची पुष्टी देते की, ते श्वापद पृथ्वीवरील आहे व ते मानवी सरकारला सूचित करते. जसे सहा ही संख्या सातापुढे एकाने उणी आहे, तसेच ६६६ ही सहाच्या तीन पटीत असणारी संख्या, जगातील प्रचंड राजकारणी व्यवस्थेचे योग्य नाव आहे, कारण ती देवाच्या परिपूर्ण दर्जाच्या बरोबरीत असण्यामध्ये अत्यंत दयनीयरित्या उणी पडली आहे. जगाचे राजकारणी श्वापद ६६६ या संख्या-नावाने सर्वोच्चपणे आपला अधिकार गाजवीत आहे आणि याच वेळी मोठी राजकीय व्यवस्था, मोठी धर्मव्यवस्था व मोठी व्यापारव्यवस्था या गोष्टी, या श्वापदाला मानवजातीचा जाच करणारा आणि देवाच्या लोकांचा छळ करणारा या अर्थाने कार्यवाहित करीत आहेत.
३५. श्वापदाच्या नावाची खूण आपल्या कपाळावर किंवा उजव्या हातावर करून घेणे याचा काय अर्थ होतो?
३५ आता, श्वापदाच्या नावाने आपल्या कपाळावर किंवा उजव्या हातावर खूण करून घेणे याचा काय अर्थ होतो? यहोवाने इस्राएलांना नियमशास्त्र देताना असे म्हटले होते: “तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हादाखल आपल्या हातांस बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा.” (अनुवाद ११:१८) याचा हा अर्थ होता की, इस्राएलांनी देवाचे नियमशास्त्र सतत आपल्यासमोर ठेवायचे होते, ज्यामुळे त्यांच्या कृतीवर व विचारांवर त्याचा प्रभाव राहू शकेल. १,४४,००० अभिषिक्त जनांच्या कपाळावर पित्याचे व येशूचे नाव लिहिले असल्याचे म्हटले आहे. हे, ते लोक यहोवा देव व येशू ख्रिस्त यांच्या मालकीचे असल्याचे सूचित करते. (प्रकटीकरण १४:१) याचेच अनुकरण करून, सैतान श्वापदाच्या दुरात्मिक चिन्हाचा उपयोग करतो. जे खरेदी विक्रीच्या दैनंदिन व्यवहारात समाविष्ट आहेत अशांवर श्वापदाच्या इच्छेनुसार सर्व काही करण्याचा, जसे की, सणाचे दिवस त्याच्या इच्छेनुरूप आचरावे म्हणून दबाव आणला जातो. लोकांनी श्वापदाची भक्ती करावी, त्यांच्या जीवनावर प्रभुत्व राखावे अशी अपेक्षा धरली जाते व याद्वारे ते आपणावर त्याचे चिन्ह करून घेतात.
३६. ज्यांनी श्वापदाची खूण पत्करली नाही अशांना कोणत्या समस्या आल्या?
३६ जे श्वापदाची खूण धारण करीत नाहीत अशांना सतत समस्यांना तोंड द्यावे लागले. उदाहरणार्थ, १९३० या दशकाच्या काळापासून त्यांना पुष्कळसे न्यायालयीन लढे द्यावे लागले आणि जमावाचा हिंसाचार व इतर छळात टिकून राहावे लागले. हुकुमशाही राष्ट्रांत त्यांना छळ छावण्यात डांबण्यात आले, येथे पुष्कळ जणांना मृत्यू आला. दुसऱ्या महायुद्धापासून पुढे बहुसंख्य युवकांना लांब पल्ल्याचा कारावास सहन करावा लागला; काहींना तर, त्यांनी आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या तटस्थतेची हातमिळवणी करण्यास नकार दिल्यामुळे खूपच यातना सहन करून शेवटी मरावे लागले. दुसऱ्या देशात तर ख्रिस्ती लोकांना काहीही विकत घेणे किंवा विकता येत नाही; काहींना मालमत्ता विकत घेता येत नाही; इतरांवर बलात्कार होतात, त्यांची हत्या होते तर काहींना त्यांच्या देशातून हाकलून दिले जाते. पण का? कारण ते चांगल्या विवेकभावाने राजकीय पक्षाचे कार्ड विकत घेण्यास नकार देतात. *—योहान १७:१६.
३७, ३८. (अ) श्वापदाची खूण धारण करण्यास नकार देणाऱ्यांसाठी या जगात राहणे कठीण का होत आहे? (ब) कोण सचोटी राखीत आहेत आणि त्यांचा काय करण्याचा निश्चय आहे?
३७ पृथ्वीवरील काही देशात धर्म हा वसाहती जीवनात इतका खोलवर रुजला गेला आहे की, बायबलच्या सत्याची कड घेणाऱ्याचा, त्याचे कौटुंबिक सदस्य व पूर्वीच्या मित्रांकडून उपहास होऊ लागतो. अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी मोठा विश्वास लागतो. (मत्तय १०:३६-३८; १७:२२) जगात जेथे बहुतेक जन धनसंपदेची पूजा करीत आहेत आणि अप्रामाणिकता अधिक बोकाळली आहे तेथे खऱ्या ख्रिश्चनाला यहोवावर, सदाचाराचा मार्ग जोपासण्यासाठी त्याला उंचावून धरावे म्हणून पूर्णपणे विसंबून राहावे लागते. (स्तोत्र ११:७; इब्रीयांस १३:१८) जगात जेथे अनैतिकतेचा प्रवाह वाहत आहे अशा ठिकाणी शुद्ध व स्वच्छ राहण्यासाठी मोठा निर्धार असावा लागतो. आजारी पडणाऱ्या ख्रिश्चनांच्या मागे डॉक्टर्स व नर्सेस यांचा पिच्छा असतो व ते यांच्यावर रक्ताचे पावित्र्य राखण्याबद्दलच्या देवाच्या नियमांचा भंग करण्यासाठी दबाव आणतात; अशांना आपल्या विश्वासाविरुद्ध असणाऱ्या न्यायालयीन निकालासोबत झुंज द्यावी लागते. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; १ पेत्र ४:३, ४) आणि आता वाढत्या बेकारीच्या काळात, देवासमोर आपल्या सचोटीची हातमिळवणी करण्यास लावणाऱ्या कामाचा त्याग करण्यासाठी खऱ्या ख्रिश्चनांना वाढत्या अडचणी सोसाव्या लागत आहेत.—मीखा ४:३, ५.
३८ होय, ज्यांनी आपणावर श्वापदाची खूण धारण केलेली नाही अशांसाठी हे जग, जीवन जगण्यास खूपच अडचणीचे बनले आहे. तरी देखील, स्त्रीच्या संतानापैकी बाकीचे लोक व त्यांच्यासोबत असणारे ४० लाखांपेक्षा अधिक लोक, देवाच्या नियमांचा भंग करण्याचा दबाव आला तरी आपली सचोटी राखत आहेत, हे यहोवा देवाच्या सामर्थ्याचे व आशीर्वादाचे अप्रतिम प्रदर्शन आहे. (प्रकटीकरण ७:९) तर मग, सबंध जगभर आपण श्वापदाची खूण धारण करण्यास प्रतिकार करीत असता, यहोवा देवाला व त्याच्या नीतीमान मार्गांना सतत उंचावून धरीत एकोप्याने राहू या.—स्तोत्र ३४:१-३.
[तळटीपा]
^ याच्या सविस्तर माहितीसाठी कृपया “पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” (इंग्रजी) हे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकातील पृष्ठे १६६-२०१ पहा.
^ संत योहानाच्या प्रकटीकरणाचे स्पष्टीकरण (इंग्रजी) लेखक, आर. सी. एच. लेंन्स्की, पृ. ३९०-१.
^ राष्ट्रभक्ती ही वस्तुतः एक धर्मच होय, असे काही भाष्यकारांचे मत आहे. यास्तव, जे लोक राष्ट्रवादी आहेत ते वस्तुतः, ते राहात असलेल्या देशाकरवी श्वापदाच्या ज्या भागाचे प्रतिनिधीत्व होत आहे त्याची भक्ती करीत असतात. अमेरिकेतील राष्ट्रभक्तीबद्दल आम्ही असे वाचतो: “धर्म मानली जाणारी राष्ट्रभक्ती हिजमध्ये मागील मोठ्या धर्मव्यवस्थेतील साम्यता दिसते. . . . राष्ट्रभक्ती आचरणारा सध्याचा माणूस त्याच्या स्वतःच्या राष्ट्रीय दैवतावर अवलंबून असल्याची जाणीव राखतो. त्याची शक्तीशाली मदत आपल्याला जरुरीची आहे असे त्याला वाटत असते. त्याच्यामध्येच आपल्या पूर्णत्वाचा व आनंदाचा उगम आहे असे तो मानतो. धार्मिक अर्थाने तो त्याच्याच अधीन राहतो. . . . राष्ट्र चिरायु आहे अशी भावना जोपासली जाते आणि त्याच्या निष्ठावंत पुत्रांचे मरण हे त्याच्या अविनाशी कीर्ती व वैभवात भर टाकणारे असे मानण्यात येते.”—कार्लटन जे. एफ. हेयस, यांचे अमेरिकेतील लोक काय मानतात आणि ते कशी भक्ती करतात (इंग्रजी) या जे. पॉल विल्यम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकातील पृष्ठ ३५९ वरील अवतरण.
^ उदाहरणार्थ, वॉचटावर अंकाचे सप्टेंबर १, १९७१, पृष्ठ ५२०; जून १५, १९७४, पृष्ठ ३७३; जून १, १९७५, पृष्ठ ३४१; फेब्रुवारी १, १९७९, पृष्ठ २३; जून १, १९७९, पृष्ठ २० आणि मे १५, १९८०, पृष्ठ १० पहा.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१९५ पानांवरील चित्रे]
त्याच्या हाती श्वापदाच्या मूर्तीमध्ये प्राण घालण्याचे दिले होते