व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दोन साक्षीदारांचे पुनरुज्जीवन घडवणे

दोन साक्षीदारांचे पुनरुज्जीवन घडवणे

अध्याय २५

दोन साक्षीदारांचे पुनरुज्जीवन घडवणे

१. बलवान देवदूत योहानाला काय करण्याचे सांगतो?

 दुसरा अनर्थ पूर्णपणे सरुन जाण्याआधी तो बलवान देवदूत योहानाला आणखी एका भविष्यवादित सादरतेमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करतो. हे मंदिराच्या अनुषंगाने आहे. (प्रकटीकरण ९:१२; १०:१) योहान असे कळवतो: “नंतर काठीसारखा एक बोरू कोणीएकाने मला दिला, आणि म्हटले: ‘ऊठ, देवाचे मंदिर [पवित्र स्थान, NW], वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्‍यांचे माप घे.’”—प्रकटीकरण ११:१.

मंदिराचे पवित्र स्थान

२. (अ) कोणते मंदिर पवित्र स्थान आमच्या काळापर्यंत टिकून राहू शकते? (ब) या मंदिराच्या पवित्र स्थानाचा प्रमुख याजक कोण आहे व त्याचे परमपवित्र स्थान कोठे आहे?

येथे उल्लेखिण्यात आलेले मंदिर हे यरुशलेमेतील कोणतेही खरोखरचे मंदिर असू शकत नाही कारण, यापैकीच्या शेवटल्या मंदिराचा नाश रोमी लोकांनी सा.यु. ७० मध्ये केला. तथापि, प्रेषित पौलाने दाखवून दिले की, हा नाश होण्याआधी आणखी एका मंदिराचे पवित्र स्थान सामोरे आले जे आज आमच्या काळापर्यंत टिकून राहणार होते. हे असे थोर आध्यात्मिक मंदिर आहे ज्याने निवासमंडप व नंतर यरुशलेमेत बांधण्यात आलेल्या मंदिरातील नमुन्यांची भविष्यवादित पूर्णता करून दाखवली. तो ‘माणसाने नव्हे तर प्रभूने [यहोवा, NW] घातलेला खरा मंडप’ आहे. याचा प्रमुख याजक येशू आहे, ज्याच्याबद्दल पौल म्हणतो की, तो “स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला” आहे. याचे परमपवित्र स्थान हे स्वर्गात यहोवा प्रत्यक्ष जेथे आहे ते आहे.—इब्रीयांस ८:१, २; ९:११, २४.

३. निवासमंडपातील (अ) परमपवित्र स्थानाला पवित्र स्थानापासून वेगळा करणारा पडदा, (ब) प्राण्यांची यज्ञार्पणे आणि (क) यज्ञापर्णाची वेदी या गोष्टी कशाला सूचक आहेत?

प्रेषित पौल स्पष्ट करतो की, पवित्र जागा व परमपवित्र जागा यांना वेगळा करणारा पडदा येशूच्या देहास सूचित करणारा आहे. येशूने आपल्या जीवनाचे यज्ञार्पण केले तेव्हा हा पडदा दुभंगविला गेला व हे दिसले की, येशूचा देह आता स्वर्गातील यहोवाच्या सान्‍निध्यात त्याचा प्रवेश होऊ देण्यास अडथळा बनत नाही. येशूच्या यज्ञार्पणाच्या आधारावर त्याचे विश्‍वास राखून मृत झालेले अभिषिक्‍त सहयाजक हे नियुक्‍त वेळी स्वर्गात जाऊ शकतील. (मत्तय २७:५०, ५१; इब्रीयांस ९:३; १०:१९, २०) पौल आणखी दर्शवितो की, निवासमंडपात सतत होणाऱ्‍या प्राण्यांच्या यज्ञार्पणाने येशूच्या परिपूर्ण मानवी जीवनाच्या एकाच यज्ञार्पणाकडे निर्देश केला. अंगणातील वेदी ही, यहोवाने आपल्या इच्छेनुरुप येशूच्या यज्ञार्पणाचा “पुष्कळांसाठी” स्वीकार करण्याची जी तरतूद केली तिला सूचित करते. हे ‘पुष्कळ’ जण, प्रथमतः अभिषिक्‍त जन व नंतर दुसरी मेंढरे आहेत; हे सर्व ‘तारणासाठी त्याची वाट बघत आहेत.’—इब्रीयांस ९:२८; १०:९, १०; योहान १०:१६.

४. (अ) पवित्र स्थान आणि (ब) आतील अंगण हे कशाला चित्रित आहे?

या ईश्‍वरी प्रेरणेने लिहिलेल्या माहितीवरुन आम्ही याचा निर्वाळा घेऊ शकतो की, निवासमंडपातील पवित्र स्थान हे प्रथम ख्रिस्त व नंतर राजकीय याजकगणाचे १,४४,००० अभिषिक्‍त सदस्य ‘पडद्यामधून’ पार होण्याआधी या पृथ्वीवर असताना ज्या पवित्र स्थितीचा अनुभव घेतात त्याला सूचित करते. (इब्रीयांस ६:१९, २०; १ पेत्र २:९) देवाने सा.यु. २९ मध्ये येशूचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाल्यावर तो आपला पुत्र असल्याचे जाहीर केले होते त्याप्रमाणे, हे त्यांना देवाचे आध्यात्मिक पुत्र या नात्याने दत्तक घेतल्याचे सूचित करते. (लूक ३:२२; रोमकर ८:१५) पण आतील अंगण, निवासमंडपाचा एक असा भाग जो, याजक नसलेल्या इस्राएलांच्या दृष्टीस पडू शकत होता व जेथे यज्ञार्पणे वाहिली जात, त्याबद्दल काय? हे, येशू हा मनुष्य मानवजातीसाठी आपले जीवन देण्यास पात्र आहे या त्याच्या परिपूर्ण दर्जाला सूचित करणारे आहे. याशिवाय ते, येशूच्या यज्ञार्पणाच्या आधारावर प्राप्त होणाऱ्‍या व पृथ्वीवरील अभिषिक्‍त जन अनुभवीत असलेल्या पवित्र जनांच्या नीतीमान दर्जाला सूचित करणारे आहे. *रोमकर १:७; ५:१.

मंदिराच्या पवित्र स्थानाचे मोजमाप

५. इब्री शास्त्रवचनातील भविष्यवादात (अ) यरुशलेमेचे मोजमाप, (ब) यहेज्केलच्या दृष्टांतमय मंदिराचे मोजमाप कशाला सूचित करीत होते?

योहानाला “देवाचे [पवित्र स्थान, NW] मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्‍यांचे माप” घेण्यास सांगितले. हे कशाला सूचित करते? इब्री शास्त्रवचनातील भविष्यवादात अशा या मोजमापाने, दयेने समतोल केलेला न्याय हा यहोवाच्या परिपूर्ण दर्जांना अनुसरुन दिला जाईल याची हमी पुरविण्यात आली. दुष्ट राजा मनश्‍शे याच्या काळी यरुशलेमेच्या भविष्यवादित मोजमापाने त्या शहराचा नाश होण्याचा न बदलणारा न्याय झाला आहे याची साक्ष दिली. (२ राजे २१:१३; विलापगीत २:८) तथापि, नंतर यिर्मयाने पुन्हा यरुशलेमेची मोजणी झाल्याचे पाहिले ते, त्या शहराची पुनर्बांधणी करण्यात येईल याची खात्री देणारे ठरले. (यिर्मया ३१:३९; तसेच जखऱ्‍या २:२-८ पहा.) याचप्रमाणे यहेज्केलने दृष्टांतमय मंदिराची होणारी विस्तारीत व सविस्तर मोजणी बघितली ती, बाबेलात बंदिस्त असणाऱ्‍या यहूद्यांना, त्यांच्या स्वगृही खऱ्‍या भक्‍तीची पुन्हा उभारणी केली जाईल याची खात्री देणारी होती. हे इस्राएलांना, त्यांनी केलेल्या अपराधांच्या दृष्टिकोनातून, इस्राएलांनी यापुढे देवाच्या पवित्र दर्जानुरुप स्वतःला ठेवणे जरुरीचे आहे याचे स्मरण देणारे होते.—यहेज्केल ४०:३, ४; ४३:१०.

६. मंदिराच्या पवित्र स्थानाचे व तेथे उपासना करणाऱ्‍या याजकांचे मोजमाप करण्यास योहानाला जे सांगण्यात आले ते कशाचे चिन्ह आहे? स्पष्ट करा.

या कारणास्तव, योहानाला मंदिराचे तसेच त्यात उपासना करणाऱ्‍या याजकांचे मोजमाप करण्यास सांगितले तेव्हा, त्याचा अर्थ मंदिर व्यवस्था व त्याच्या संलग्न असणाऱ्‍यांबद्दल यहोवाने जो उद्देश राखला आहे त्याची पूर्णता होण्यास कसलाही अडथळा येऊ शकणार नाही आणि तो उद्देश आता आपल्या कळसास जात आहे. आता सर्व गोष्टी यहोवाच्या बलवान देवदूताच्या पायाखाली ठेवलेल्या असल्यामुळे ‘यहोवाच्या मंदिराचा डोंगर’ ‘सर्व डोंगरांहून उंच होण्याची’ वेळ झाली आहे. (यशया २:२-४) ख्रिस्ती धर्मजगताच्या शतकांच्या धर्मत्यागानंतर यहोवाची शुद्ध भक्‍ती उंचावलीच पाहिजे. शिवाय, येशूच्या मृत झालेल्या विश्‍वासू बांधवांचे ‘परमपवित्र स्थानी’ जाण्यासाठी पुनरुत्थान झालेच पाहिजे. (दानीएल ९:२४; १ थेस्सलनीकाकर ४:१४-१६; प्रकटीकरण ६:११; १४:४) तसेच, शिक्का मारण्यात आलेले ‘आमच्या देवाचे [पृथ्वीवरील] दास’ यांच्या शेवटल्या लोकांचे ईश्‍वरी दर्जांनुरुप मोजमाप होऊन त्यांना देवाच्या आत्म्याने जन्मलेले पुत्र या अर्थाने मंदिर व्यवस्थेत कायमची जागा मिळण्याची पात्रता लाभली पाहिजे. त्या पवित्र दर्जांची आज योहान वर्गास पूर्ण जाणीव आहे व त्यानुरुप भरण्याचा त्यांचा पूर्ण निश्‍चय आहे.—प्रकटीकरण ७:१-३; मत्तय १३:४१, ४२; इफिसकर १:१३, १४; पडताळा रोमकर ११:२०.

अंगणास तुडवणे

७. (अ) अंगणाचे माप घेऊ नये असे योहानाला का सांगितले गेले? (ब) पवित्र नगर ४२ महिने कधी तुडविण्यात आले? (क) ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्‍यांना ४२ महिने यहोवाच्या नीतीमान दर्जांना उंचावण्यात कसे अपयश दाखवले?

पण अंगणाचे मोजमाप घेऊ नये असे योहानाला का सांगण्यात आले? तो या शब्दात आपल्याला सांगतो: “तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको; कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी तुडवितील.” (प्रकटीकरण ११:२) आपण पाहिले की, आतील अंगण हे आत्म्याने जन्मलेल्या ख्रिश्‍चनांच्या नीतीमान दर्जाला सूचित करते. आपण पुढे पाहणारच आहोत त्याप्रमाणे, येथे असलेल्या खरोखरच्या ४२ महिन्यांचा संदर्भ खऱ्‍या महिन्यांना असून ती कालमर्यादा, ख्रिस्ती म्हणणाऱ्‍या सर्व ख्रिश्‍चनांची जी खडतर परीक्षा झाली त्या डिसेंबर १९१४ ते १९१८ च्या काळाला लागू होणारी आहे. तर या युद्धकालीन वर्षात ते सर्व यहोवाच्या नीतीमान दर्जांना चिकटून राहतील का? बहुतेक राहिले नाहीत. एकंदरीत, ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी ईश्‍वरी कायद्याला आज्ञाधारकता दाखविण्याऐवजी राष्ट्रीयवादाला उंचावून धरले. मुख्यतः, ख्रिस्ती धर्मजगतात लढल्या गेलेल्या युद्धातील दोन्ही बाजूस पाळकांनी तरुणांना झोंबणारा उपदेश केला. लाखोंची हत्या घडली. १९१८ मध्ये देवाच्या घरापासून न्यायाला आरंभ झाला तेव्हा अमेरिका सुद्धा त्या रक्‍तपातात सामील झाली आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या सर्व धार्मिक पुढाऱ्‍यांनी स्वतःवर असा रक्‍तदोष आणला; ज्याचा ईश्‍वरी सूड घेतला जावा अशी मागणी ते रक्‍त अजूनही करीत आहे. (१ पेत्र ४:१७) त्यांचे बाहेर टाकले जाणे हे कायमचे व पुन्हा न सुधारण्याजोगे आहे.—यशया ५९:१-३, ७, ८; यिर्मया १९:३, ४.

८. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात, पुष्कळ बायबल विद्यार्थ्यांना काय कळू शकले पण त्यांना कशाची पूर्ण समज नव्हती?

पण बायबल विद्यार्थ्यांच्या लहान गटाबद्दल काय? त्यांनी ईश्‍वरी दर्जांना मानल्यामुळे त्यांचे १९१४ मध्ये लगेच मोजमाप होणार होते का? नाही. ख्रिस्ती धर्मजगतातील ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांप्रमाणे यांचीही परीक्षा होण्यास हवी. त्यांची खडतर परीक्षा व छळ होण्यासाठी त्यांना ‘परराष्ट्रीय लोकांस देण्यात आले.’ आपण आपल्या सहकाऱ्‍याची हत्या करु नये याची बहुतेकांना जाणीव होती पण अद्याप ख्रिस्ती तटस्थतेचा त्यांना पूर्ण अर्थ कळला नव्हता. (मीखा ४:३; योहान १७:१४, १६; १ योहान ३:१५) राष्ट्रांकडून आलेल्या दबावामुळे काहींनी हातमिळवणी केली.

९. राष्ट्रांनी पायाखाली तुडविलेली पवित्र नगरी काय आहे आणि या पृथ्वीवर त्या नगरीचे कोण प्रतिनिधीत्व करीत आहेत?

पण मग, त्या राष्ट्रांद्वारे पवित्र नगरी कशी तुडविण्यात आली? हे अर्थातच, प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिण्याच्या २५ वर्षांआधी नष्ट झालेल्या यरुशलेमेस लागू होऊ शकत नाही. तर ती पवित्र नगरी, नवे यरुशलेम आहे. याचे वर्णन प्रकटीकरणात योहानाने नंतर केले असून, त्याचे या पृथ्वीवर, मंदिराच्या आतील अंगणाच्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांमधील शेष लोकांद्वारे प्रतिनिधीत्व होत आहे. काही काळातच हे देखील त्या पवित्र नगरीचा भाग बनतील. या कारणास्तव, यांना पायाखाली तुडविणे हे त्या शहरालाच जणू तुडविण्यासारखे आहे.—प्रकटीकरण २१:२, ९-२१.

दोन साक्षीदार

१०. तुडविले जात असताना यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांनी काय करायचे होते?

१० पायाखाली तुडविण्यात आले असले तरी, ते निष्ठावंत जन यहोवाचे विश्‍वासू साक्षीदार नसण्याचे राहात नाहीत. यामुळेच भविष्यवाद पुढे म्हणतो: “‘माझे दोन साक्षी ह्‍यांस मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरुन एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.’ पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत.”—प्रकटीकरण ११:३, ४.

११. विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी “तरट पांघरुन” संदेश देण्याचा काय अर्थ होत होता?

११ या विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना सहनशीलतेची गरज होती; कारण यांना “तरट पांघरुन” संदेश द्यावयाचा होता. याचा काय अर्थ होतो? बायबल काळी तरट शोकाचे प्रतीक होते. ते पांघरणे म्हणजे ती व्यक्‍ती अतिशय दुःखात किंवा त्रासात डुबलेली आहे असा अर्थ होतो. (उत्पत्ती ३७:३४; ईयोब १६:१५, १६; यहेज्केल २७:३१) तरटाचा संबंध देवाच्या संदेष्ट्याला घोषित कराव्या लागणाऱ्‍या नाशाच्या शोक संदेशासोबत होता. (यशया ३:८, २४-२६; यिर्मया ४८:३७; ४९:३) तरट पांघरण्याची अपमानीत स्थिती किंवा ईश्‍वरी इशाऱ्‍यामुळे पश्‍चात्ताप दर्शविण्याचा अर्थ होत होता. (योना ३:५) तर, या दोन साक्षीदारांनी तरट पांघरण्याचा अर्थ, यहोवाच्या न्यायदंडाचा संदेश घोषित करण्यातील त्यांची सहनशीलता दाखवतो. ते त्याच्या सूडाचा संदेश घोषित करणारे त्याचे साक्षीदार होते व या संदेशामुळे राष्ट्रांना देखील शोक करावा लागणार होता.—अनुवाद ३२:४१-४३.

१२. पवित्र नगरी पायाखाली तुडविण्याचा जो कालावधी दिलेला आहे तो कालावधी शब्दशः का वाटतो?

१२ योहान वर्गाला हा संदेश एका निश्‍चित कालावधीसाठी करायचा होता: १,२६० दिवस किंवा पवित्र नगर पायाखाली तुडविण्याचा जो काळ होता, तोच म्हणजे ४२ महिने. हा काळ खरा वाटतो, कारण तो दोन वेगळ्या प्रकाराने म्हणजे, प्रथम महिन्यांच्या रुपात तर दुसऱ्‍यांदा दिवसांच्या रुपात सांगण्यात आला आहे. यासोबतच, प्रभुचा दिवस सुरु झाला तेव्हा साडे तीन वर्षे देवाच्या लोकांना कठीण काळ अनुभवण्यास मिळाला, हा अनुभव येथे भाकीत करण्यात आलेल्या घटनांशी जुळणारा होता—तो १९१४ च्या उत्तरार्धात सुरु झालेल्या पहिल्या महायुद्धापासून ते १९१८ च्या आरंभाच्या काळापर्यंत होता. (प्रकटीकरण १:१०) त्यांनी ख्रिस्ती धर्मजगत आणि बाकीचे जग याबद्दल ‘तरट पांघरुन’ सांगण्याचा संदेश घोषित केला.

१३. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना दोन साक्षीदारांकरवी चित्रित करण्यात आले या गोष्टीचा काय अर्थ होतो? (ब) योहानाने त्या दोन साक्षीदारांना, “दोन जैतुन झाडे व दोन समया” म्हणण्याद्वारे जखऱ्‍याचा कोणता भविष्यवाद आमच्या लक्षात येतो?

१३ ह्‍या दोन साक्षीदारांमार्फत सूचित करण्यात आलेली ही गोष्ट, त्यांचा संदेश अचूक व सबळ पायावर होता, असे सुचविते. (पडताळा अनुवाद १७:६; योहान ८:१७, १८.) योहान त्यांना “जैतुनाची दोन झाडे व दोन समया” असे संबोधून म्हणतो की, ते “पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे आहेत.” हा जखऱ्‍याच्या भविष्यवादाचा उघड उल्लेख आहे. येथे त्याने सात शाखा असणारी समई आणि दोन जैतुनाची झाडे बघितली होती. ती दोन जैतुनाची झाडे “दोन अभिषिक्‍त” यरुब्बाबेल प्रांताधिकारी व मुख्य याजक यहोशवा यांना चित्रित करणारी असून ते “अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे” आहेत.—जखऱ्‍या ४:१-३, १४.

१४. (अ) जखऱ्‍याने बघितलेल्या दोन जैतुनाच्या झाडांच्या, तसेच समयाच्या दृष्टांतामुळे काय सूचित करण्यात आले? (ब) पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळादरम्यान अभिषिक्‍त ख्रिस्ती कशाचा अनुभव घेणार होते?

१४ जखऱ्‍या पुर्नउभारणीच्या काळात राहात होता व त्याने दोन जैतुन झाडाच्या पाहिलेल्या दृष्टांताचा अर्थ लोकांना कामासाठी उत्तेजन देण्याचे यरुब्बाबेल आणि यहोशवा जे परिश्रम घेत आहेत, त्यामध्ये त्यांना यहोवाच्या आत्म्याचा आशीर्वाद मिळणार हा होता. समयांच्या दृष्टांताने जखऱ्‍याला ‘कार्याच्या अल्पारंभाचा दिवस तुच्छ मानू नये,’ याचे स्मरण दिले असावे, कारण यहोवाचे उद्देश ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे तर [यहोवाच्या] आत्म्याने सिद्धीस जातील असे सेनाधीश यहोवाने म्हटले.’ (जखऱ्‍या ४:६, १०; ८:९) पहिल्या महायुद्धाच्या काळादरम्यान सत्याचा प्रकाश सातत्याने वाहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या लहान गटाला पुर्नउभारणीच्या कामात अशाचप्रकारे वापरण्यात येईल. ते देखील प्रोत्साहनाचा उगम ठरतील आणि थोडे असल्यामुळे यहोवाच्या बळावर विसंबून राहण्याचे शिकतील आणि कार्याच्या अल्पारंभाचा दिवस तुच्छ मानणार नाहीत.

१५. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे वर्णन दोन साक्षीदार या अर्थी करण्यात आले होते, हे आम्हाला कशाचे स्मरण देते? स्पष्टीकरण करा. (ब) दोन साक्षीदारांना कोणत्या प्रकारची चिन्हे करण्याचा अधिकार दिलेला आहे?

१५ यांना दोन साक्षीदार म्हणून वर्णिण्यात आले होते ही गोष्ट आपल्याला रुपांतराच्या प्रसंगाची आणखी आठवण देते. या दृष्टांतात येशूच्या तीन प्रेषितांनी त्याला राज्य वैभवात असल्याचे व त्याच्यासोबत मोशे व एलिया असल्याचे पाहिले. हे, येशू १९१४ मध्ये आपल्या वैभवी राजासनावर बसल्याचे आणि तो त्या दोन संदेष्ट्याकरवी सूचित असणाऱ्‍या कार्याची पूर्ती करण्याला अनुलक्षून आहे. (मत्तय १७:१-३; २५:३१) यामुळेच ते दोन साक्षीदार मोशे व एलियासारखे अद्‌भुत चमत्कार करीत असल्याचे आता दिसले. उदाहरणार्थ, योहान त्यांच्याबद्दल कळवतो: “त्यांस कोणी उपद्रव करु पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नि निघून त्यांच्या वैऱ्‍यांस खाऊन टाकतो; कोणी त्यांस उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्‍याचप्रमाणे जिवे मारण्यात यावे. त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यांस अधिकार दिलेला आहे.”—प्रकटीकरण ११:५, ६अ.

१६. (अ) आग असलेले चिन्ह, इस्राएलात मोशेच्या अधिकाराला आव्हान करण्यात आले होते त्या काळची कशी आठवण देते? (ब) ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढाऱ्‍यांनी पहिल्या जागतिक युद्धात बायबल विद्यार्थ्यांचा उपहास करून त्यांच्याविरुद्ध कशा कुरापती काढल्या आणि यांनी कशी लढत दिली?

१६ हे आम्हाला मोशेच्या काळात जेव्हा इस्राएलातील त्याच्या अधिकाराला आव्हान प्रस्तुत करण्यात आले तेव्हाची आठवण करून देते. त्या संदेष्ट्याने न्यायदंडाचे अग्निमय शब्द उच्चारले आणि २५० बंडखोरांवर स्वर्गातून खरोखरचा अग्नी येऊन ते नष्ट झाले. (गणना १६:१-७, २८-३५) याचप्रमाणे, ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढाऱ्‍यांनी बायबल विद्यार्थ्यांचा, ते वेदांतीय शाळेत कधीच गेले नाहीत व त्यामुळे पदवीधर नाहीत असे म्हणून उपहास केला. तरीपण देवाच्या साक्षीदारांना सेवक म्हणून शास्त्रवचनीय संदेश ऐकणारे लीन लोक अशी उच्च ओळखपत्रे आहेत. (२ करिंथकर ३:२, ३) बायबल विद्यार्थ्यांनी १९१७ मध्ये संपलेले गूज (इंग्रजी) नावाचे प्रकटीकरण व यहेज्केल पुस्तकावर प्रबळ विवेचन करणारे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर बायबल विध्यार्थ्यांचे नियतकालिक (इंग्रजी) नावाच्या चार पानी पत्रिकेच्या १,००,००,००० प्रतींचे वितरण त्यांनी केले. यामध्ये “बाबेलचे पतन—ख्रिस्ती धर्मजगताला आता त्रास—का सहन करावा लागेल—शेवटला परिणाम” हा मुख्य लेख होता. अमेरिकेत क्रुद्ध धर्मपुढाऱ्‍यांनी युद्धाचा भावनोद्रेक एक सबब धरुन या पुस्तकावर बंदी आणली. दुसऱ्‍या देशात या पुस्तकाचे शासकीय परीक्षण झाले. तथापि, देवाचे सेवक राज्य वार्ता (इंग्रजी) नावाच्या चार पानी हस्तपत्रिकेद्वारे अग्निमय संदेश देत राहून लढत राहिले. प्रभूचा दिवस पुढे जात असता इतर प्रकाशने ख्रिस्ती धर्मजगताची आध्यात्मिक मृत स्थिती अधिक उघड करणार होती.—पडताळा यिर्मया ५:१४.

१७. (अ) एलियाच्या काळी दुष्काळ व अग्निच्या कोणत्या घटना घडल्या? (ब) दोन साक्षीदारांच्या तोंडातून अग्नी कसा आला आणि कोणत्या दुष्काळाचा संबंध होता?

१७ पण एलियाबद्दल काय? इस्राएलातील राजांच्या काळी, बाल-उपासक इस्राएलांवर यहोवाचा क्रोध दर्शविण्यासाठी या संदेष्ट्याने दुष्काळ घोषित केला. तो साडे तीन वर्षे टिकला. (१ राजे १७:१; १८:४१-४५; लूक ४:२५; याकोब ५:१७) नंतर, अहज्या राजाने शिपाई पाठवून जबरीने एलियाला आपल्या राजवाड्यात आणायला लावले तेव्हा, या संदेष्ट्याने स्वर्गातून अग्नी पाठवून त्यांना ठार मारले. परंतु जेव्हा लष्करी अधिकाऱ्‍याने संदेष्ट्याच्या स्थानास योग्य तो आदर दाखविला तेव्हा एलियाने त्याच्याबरोबर राजाकडे जाण्याची आपली संमती दर्शविली. (२ राजे १:५-१६) याचप्रमाणे, १९१४ ते १९१८ च्या काळात अभिषिक्‍त शेषांनी ख्रिस्ती धर्मजगताच्या आध्यात्मिक दुष्काळास मोठ्या धैर्याने प्रसिद्ध केले आणि ‘परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] मोठ्या व भयंकर दिवशी’ यांना अग्निमय न्याय मिळणार असा इशारा दिला.—मलाखी ४:१, ५; आमोस ८:११.

१८. (अ) दोन साक्षीदारांना कोणता अधिकार देण्यात आला आणि हे मोशेला दिलेल्या अधिकारासारखेच कसे होते? (ब) दोन साक्षीदारांनी ख्रिस्ती धर्मजगतास कसे उघड केले?

१८ योहान त्या दोन साक्षीदारांबद्दल पुढे म्हणतो: “पाण्याचे रक्‍त करण्याचा अधिकार त्यांस पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाहि त्यांस अधिकार आहे.” (प्रकटीकरण ११:६ब) फारोने इस्राएल लोकांना मोकळे करून जाऊ द्यावे म्हणून, यहोवाने इजिप्तवर जाचक पीडा आणण्यासाठी तसेच पाण्याचे रक्‍त करण्यासाठी मोशेचा उपयोग केला. काही शतकांनी इस्राएलाच्या फिलिस्टाईन शत्रूंनी, देवाने इजिप्तविरुद्ध केलेल्या या घटनेची आठवण काढली आणि हा आक्रोश केला: “अशा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार? ज्यांनी रानात मिसरी लोकांस तऱ्‍हेतऱ्‍हेच्या पीडांनी पीडिले तेच हे देव होत.” (१ शमुवेल ४:८; स्तोत्र १०५:२९) मोशेने येशूचे प्रतिबिंब पुरवले, त्याला त्याच्या काळी असलेल्या धार्मिक पुढाऱ्‍यांवर देवाचे न्यायदंड घोषित करण्याचा अधिकार मिळाला होता. (मत्तय २३:१३; २८:१८; प्रेषितांची कृत्ये ३:२२) आणि पहिल्या महायुद्धाच्या काळात ख्रिस्ताचे बांधव, ते दोन साक्षीदार, यांनी ख्रिस्ती धर्मजगत आपल्या कळपाला जे मरणप्राय प्रकारचे “पाणी” देत होते ते उघड करून दाखवले.

दोन साक्षीदारांची हत्या

१९. दोन साक्षीदारांनी आपले साक्षकार्य संपवले तेव्हा प्रकटीकरणाच्या अहवालानुसार काय घडते?

१९ ख्रिस्ती धर्मजगतावरील पीडा इतकी प्रखर होती की, दोन साक्षीदारांनी तरट पांघरुन ४२ महिने संदेश दिल्यानंतर, ख्रिस्ती धर्मजगताने आपला जगीक प्रभाव दाखवून त्यांना ‘ठार केले.’ योहान लिहितो: “त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्‍वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांस जिंकून जिवे मारील. आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर, आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्‍यांतील लोक ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाहीत. आणि त्यांच्यावरुन पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्लास करितील व एकमेकांस भेटी पाठवितील; कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्‍यांस पीडा दिली होती.”—प्रकटीकरण ११:७-१०.

२०. “अथांग डोहातून वर येणारे श्‍वापद” काय आहे?

२० प्रकटीकरणात श्‍वापदाचे जे ३७ संदर्भ आले आहेत त्यापैकीचा हा पहिला आहे. या श्‍वापदाचे तसेच इतर श्‍वापदांचे परीक्षण आपण सविस्तरपणे काही वेळातच करू. आता एवढेच म्हणणे पुरे ठरेल की, “अथांग डोहातून वर येणारे श्‍वापद” हे सैतानाची रचना, जिवंत अशी राजकीय व्यवस्था आहे. *—पडताळा प्रकटीकरण १३:१; दानीएल ७:२, ३, १७.

२१. (अ) दोन साक्षीदारांच्या धार्मिक शत्रूंनी युद्ध परिस्थितीचा कसा फायदा उचलला? (ब) दोन साक्षीदारांची प्रेते पुरण्यात आली नाहीत, ही गोष्ट काय सुचविते? (क) साडेतीन दिवसांचा कालावधी केवढा समजण्यास हवा? (तळटीप पहा.)

२१ राष्ट्रे १९१४ पासून ते १९१८ पर्यंत पहिल्या जागतिक युद्धात गुंतली होती. त्यावेळी राष्ट्रीयत्वाच्या भावना उचंबळल्या होत्या आणि १९१८ च्या वसंत ऋतुमध्ये दोन साक्षीदारांच्या धार्मिक शत्रूंनी परिस्थितीचा फायदा उचलला. देशाच्या कायदेशीर साधनसामग्रीचा व्यूह रचून वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या जबाबदार सेवकांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपावर तुरुंगात टाकले. विश्‍वासू कामकरी यामुळे तर स्तंभितच झाले. राज्याचे काम जवळजवळ बंदच पडले. जणू प्रचाराचे काम मृत बनले होते. बायबल काळी कोणाला स्मृती कबरेत न पुरणे हा मोठा अपमान समजत. (स्तोत्र ७९:१-३; १ राजे १३:२१, २२) या कारणास्तव, या दोन साक्षीदारांचे दफन न होणे ही मोठी अपमानकारक गोष्ट ठरणार होती. पॅलेस्टाईनच्या उष्ण प्रदेशात उघड्या रस्त्यावर पडलेल्या प्रेताला खरोखरच्या साडेतीन दिवसानंतर दुर्गंधी सुटे. * (पडताळा योहान ११:३९.) भविष्यवादात देण्यात आलेली ही माहिती त्या दोन साक्षीदारांना केवढी लज्जा सहन करावी लागली हे सूचित करते. वर उल्लेख करण्यात आलेल्या व तुरुंगात गेलेल्या लोकांना त्यांची प्रकरणे अपीलासाठी असताना देखील जामीन नाकारण्यात आला. त्यांना जाहीरपणे बऱ्‍याच काळासाठी उघडे ठेवण्यात आले की, ज्यामुळे “मोठे नगर” याच्या रहिवाशांना त्यांची दुर्गंधी येऊ शकेल. पण हे “मोठे नगर” काय होते?

२२. (अ) मोठे नगर काय आहे? (ब) दोन साक्षीदारांना स्तब्ध करण्यामुळे पाळकांना आनंद झाला त्यावेळी जाहीर प्रकाशकांनी देखील त्याला आपली पुष्टी कशी दिली? (पेटी पहा.)

२२ योहान आम्हाला काही संकेत पुरवतो. येशूला तेथे खिळण्यात आले होते असे तो म्हणतो. यामुळे आम्हाला लगेच यरुशलेमेचे स्मरण होते. तथापि, योहान असेही म्हणतो की, त्या मोठ्या नगराला सदोम व इजिप्त देखील म्हटले आहे. अर्थात, खरोखरीच्या यरुशलेमेला एकेकाळी त्याच्या अशुद्ध प्रथांमुळे सदोम म्हणण्यात आले होते. (यशया १:८-१०; पडताळा यहेज्केल १६:४९, ५३-५८.) आणि इजिप्त हे पहिले जागतिक साम्राज्य कधीकधी या जगाच्या व्यवस्थीकरणाचे चित्र असे दिसले. (यशया १९:१, १९; योएल ३:१९) यास्तव ते मोठे नगर, देवाची उपासना करण्याचा दावा करणाऱ्‍या गलिच्छ “यरुशलेम” याला पण मग, सदोमप्रमाणे अशुद्ध व पापी बनलेल्या आणि इजिप्तप्र्माणे या सैतानी जागतिक व्यवस्थेला चित्रित करते. ते अविश्‍वासू यरुशलेमेच्या आजच्या तुलनेत असलेल्या ख्रिस्ती धर्मजगताला चित्रित करते. दोन साक्षीदारांच्या त्रासदायक प्रचाराला स्तब्ध करण्याचा या संघटनेतील सदस्यांना खूप आनंद झाला होता.

पुन्हा उठविण्यात आले!

२३. (अ) साडेतीन दिवसानंतर त्या दोन साक्षीदारांचे काय होते आणि याचा त्यांच्या शत्रूंवर काय परिणाम घडला? (ब) प्रकटीकरण ११:११, १२ तसेच यहोवाने शुष्क अस्थी असलेल्या खोऱ्‍यावर आपली घातलेली फुंकर या यहेज्केलच्या भविष्यवादाची आधुनिक पूर्णता केव्हा घडली?

२३ देवाच्या लोकांची बदनामी करण्यामध्ये जाहीर वर्तमानपत्रांनीही पाळकांना साथ दिली. एका वृत्तपत्राने म्हटले: “संपलेले गूज (इंग्रजी) या पुस्तकाचा शेवट झाला आहे.” पण सत्य, या पलिकडे अधिक जाऊ शकले नाही! ते दोन साक्षीदार मृत स्थितीत राहिले नाहीत. आम्ही वाचतो: “पुढे साडेतीन दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. मग ते मेघारुढ होऊन त्यांच्या वैऱ्‍यांच्या देखत स्वर्गात वर गेले.” (प्रकटीकरण ११:११, १२) अशाप्रकारे हा, यहेज्केलला शुष्क अस्थींचा जो दृष्टांत पाहण्यास मिळाला त्यासारखा अनुभव आहे. यहोवाने त्या शुष्क अस्थींवर आपली फुंकर घातली तेव्हा ते जिवंत झाले; हे बाबेलच्या ७० वर्षे दास्यत्वानंतर इस्राएल राष्ट्राचा जो नवा जन्म घडला त्याचे चित्र ठरले. (यहेज्केल ३७:१-१४) यहेज्केल तसेच प्रकटीकरण यातील त्या दोन भविष्यवादांची आधुनिक समयातील थरारक पूर्णता १९१९ मध्ये, यहोवाने आपल्या “मृत” साक्षीदारांना तेजोमय जीवनासाठी पुन्हा उठविले तेव्हा घडली.

२४. दोन साक्षीदार जिवंत झाले तेव्हा, त्यांच्या धार्मिक छळकर्त्यांवर याचा काय परिणाम झाला?

२४ त्या छळकर्त्यांना केवढा मोठा धक्का बसला! त्या दोन साक्षीदारांची प्रेते एकाएकी जिवंत झाली व ती क्रियाशील बनली. त्या ख्रिस्ती सेवकांना तुरुंगात घालण्याची योजना फसली, ते पुन्हा मोकळे झाले व नंतर त्यांची पूर्ण दोषमुक्‍तता घडली या सर्वांमुळे धर्मपुढाऱ्‍यांना प्राशन करण्यास ती गोळी कडू होती. हा धक्का तर १९१९ च्या सप्टेंबरमध्ये बायबल विद्यार्थ्यांनी अमेरिकेत सीडर पॉईंट, ओहायो येथे जे अधिवेशन भरविले त्यामध्ये अधिक जाणवला असावा. येथे नुकतेच मुक्‍त झालेले वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी प्रकटीकरण १५:२ व यशया ५२:७ वर आधारित असलेल्या “राज्याची घोषणा” या विषयाद्वारे अधिवेशनास जमलेल्या प्रतिनिधींना थरारुन टाकले. योहान वर्गाच्या सदस्यांनी पुन्हा एकदा “संदेश सांगण्यास,” जाहीरपणे प्रचार करण्यास सुरवात केली. त्यांचे बळ दिवसेंदिवस वाढत गेले व ते ख्रिस्ती धर्मजगताची दांभिकता निर्भयपणे उघड करीत राहिले.

२५. (अ) दोन साक्षीदारांना “येथे वर या,” असे केव्हा सांगण्यात आले व हे कसे घडले? (ब) दोन साक्षीदारांच्या पुनर्स्थापनेचा त्या मोठ्या नगरावर कोणता धक्कादायक परिणाम घडला?

२५ ख्रिस्ती धर्मजगताने १९१८ मध्ये मिळविलेल्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. त्याने पुन्हा जमावाचे दंगे, कायदेशीर युक्त्या, तुरुंगवास आणि हत्या या सर्वांचा प्रयोग केला पण सर्व काही व्यर्थ ठरले! दोन साक्षीदारांचे १९१९ नंतरचे आध्यात्मिक क्षेत्र त्याच्यापासून दूर होते. त्या वर्षी यहोवाने त्यांना म्हटले की, “येथे वर या” आणि ते आध्यात्मिक स्थितीच्या अशा उच्च पातळीपर्यंत गेले की जेथे त्यांच्या शत्रूंना केवळ पाहता आले; पण त्यांना धरता येऊ शकत नव्हते. या पुनर्स्थापनेचा परिणाम मोठ्या नगरावर कसा झाला त्याचे वर्णन योहान देतो: “त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला, तेव्हा त्या नगराचा दहावा भाग पडला. भूमिकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचे गौरव केले.” (प्रकटीकरण ११:१३) धार्मिक क्षेत्रात खरेच मोठे कंप झाले. पुन्हा सचेतन झालेल्या ख्रिश्‍चनांचा गट काम करू लागला तेव्हा, प्रस्थापित चर्चेसच्या धर्मपुढाऱ्‍यांच्या पायाखालची जमीन जणू हलते आहे असे वाटायला लागले. या शहराचा दहावा भाग किंवा लाक्षणिकपणे ७,००० लोकांवर इतका परिणाम झाला की, ते जणू ठार झाले असे म्हणण्यात आले.

२६. प्रकटीकरण ११:१३ मधील “नगराचा दहावा भाग” आणि “सात हजार मनुष्ये” कोणाचे सूचक आहेत? विवेचीत करा.

२६ “नगराचा दहावा भाग” ही संज्ञा आम्हाला यशयाने प्राचीन यरुशलेमेबद्दल केलेल्या भविष्यवादाचे स्मरण देते. त्याने म्हटले की, शहराच्या नाशातून दहावा हिस्सा पवित्र बीज म्हणून वाचेल. (यशया ६:१३) याचप्रमाणे, ७,००० ही संख्या आपल्याला याचे स्मरण पुरविणारी आहे की, जेव्हा एलियाला तो एकटाच इस्राएलात विश्‍वासू असा उरलेला आहे असे वाटायला लागले तेव्हा यहोवाने त्याला म्हटले की, खरे पाहता ७,००० असे जण होते की, जे बालमूर्तीच्या पाया पडले नाहीत. (१ राजे १९:१४, १८) पहिल्या शतकात प्रेषित पौलाने असे म्हटले की, ते ७,००० जण यहूद्यांच्या अवशिष्टांचे सूचक आहेत, ज्यांनी ख्रिस्ताच्या सुवार्तेला प्रतिसाद दिला. (रोमकर ११:१-५) ही शास्त्रवचने आपल्याला प्रकटीकरण ११:१३ मधील “नगराचा दहावा भाग,” आणि “सात हजार माणसे” याबद्दल अशी समज देतात की, ते लोक पुनर्स्थापित दोन साक्षीदारांच्या प्रचाराला प्रतिसाद देणारे आणि पापिष्ट मोठ्या नगराचा त्याग करणारे आहेत. ते जणू ख्रिस्ती धर्मजगतास मरतात. त्यांची नावे त्याच्या सदस्याच्या पटावरुन काढून टाकली जातात. त्याच्या दृष्टीने ते लोक अस्तित्वातच नाहीत. *

२७, २८. (अ) “बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचे गौरव” कसे केले? (ब) ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मपुढाऱ्‍यांना कशाची कबूली देणे भाग पडले?

२७ पण ख्रिस्ती धर्म जगतातील ‘बाकीच्या लोकांनी स्वर्गीय देवाचे [कसे] गौरव केले’? आपला धर्मत्यागी पंथ सोडून आणि खऱ्‍या देवाचे सेवक बनून निश्‍चितच नाही. उलटपक्षी, “त्यांनी स्वर्गीय देवाचे गौरव केले,” याबद्दल विन्सेंट यांचे नव्या करारातील शब्दांचा अभ्यास (इंग्रजी) या पुस्तकात जी चर्चा आहे त्याप्रमाणे ते आहे. तेथे सांगण्यात आले आहे: “ही संज्ञा धर्मांतर, पश्‍चात्ताप, उपकारस्मरण याला अनुलक्षून नव्हे तर कबूली याच्या अनुषंगाने आहे आणि हाच शास्त्रवचनात नित्याचा अर्थ आहे. पडताळा यहो. ७:१९ (सेप्ट्यु.). योहान ९:२४; प्रेषितांची कृत्ये १२:२३; रोम. ४:२०.” आपल्या पराभवाचे दुःख होऊन ख्रिस्ती धर्मजगताला कबूल करावेच लागले की, बायबल विद्यार्थ्यांच्या देवाने ख्रिस्ती कार्यहालचालीची पुनर्स्थापना करण्यात अद्‌भुत कृत्य घडवून आणले आहे.

२८ कदाचित ही कबुली धर्मगुरुंनी आपल्या मनातच, स्वतःला दिली असावी. यापैकी कोणीही जाहीरपणे दोन साक्षीदारांच्या देवाबद्दल कबुली दर्शविल्याचे ज्ञात नाही. तथापि, यहोवाने योहानाद्वारे दिलेला हा भविष्यवाद १९१९ मध्ये धर्मपुढाऱ्‍यांना जेव्हा मानहानीकारक धक्का बसला तेव्हा, त्यांच्या मनात आणि अंतःकरणात काय होते त्याची समज पुरवितो. त्या वर्षापासून पुढे ख्रिस्ती धर्मजगताच्या पुढाऱ्‍यांनी आपल्या मेंढरांना थोपविण्याचा प्रयत्न केला तरी “सात हजार” त्यातून बाहेर पडले; त्यामुळे धर्मपुढाऱ्‍यांना हे कबूल करावे लागले की, त्यांच्या देवांपेक्षा योहान वर्गाचा देव प्रबळ आहे. यानंतरच्या वर्षात जेव्हा अधिकाधिक कळप त्यांना सोडून जाणार होता, तेव्हा तर त्यांना याची अधिक खात्री होणार होती. मुक्‍त होणारे लोक, एलियाने कर्मेल डोंगरावर बाल पुजाऱ्‍यांविरुद्ध विजय मिळवल्यावर, लोकांनी जो गजर केला, तसाच हेही करणार होते: ‘परमेश्‍वर यहोवा हाच खरा देव, परमेश्‍वर यहोवा हाच खरा देव!’—१ राजे १८:३९.

२९. काय लवकर येत असल्याचे योहान म्हणतो आणि आणखी कोणता हादरा बसण्याचे ख्रिस्ती धर्मजगताच्या वाटेवर आहे?

२९ पण ऐका! योहान आम्हाला सांगतो: “दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. पाहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे.” (प्रकटीकरण ११:१४) आतापर्यंत घडलेल्या घटनांमुळे ख्रिस्ती धर्मजगतास जे हादरे बसले ते बघता, तिसरा अनर्थ जेव्हा घोषित होईल, सातवा देवदूत आपला कर्णा वाजवेल आणि देवाचे पवित्र गूज सरतेशेवटी पूर्ण होईल तेव्हा काय होईल?—प्रकटीकरण १०:७.

[तळटीपा]

^ या आध्यात्मिक मंदिराच्या संपूर्ण चर्चेसाठी द वॉचटावर नियतकालिकाच्या डिसेंबर १, १९७२ अंकातील “द वन ट्रु टेंपल ॲट वीच टू वर्शिप” हा लेख पहा.

^ “अथांग डोह” (ग्रीक, ॲʹबीस․सॉस; इब्री, तेहोहमʹ) हा लाक्षणिकरित्या अक्रियाक स्थितीच्या स्थळाला सूचित करतो. (पहा प्रकटीकरण ९:२.) तथापि, खऱ्‍या अर्थी तो प्रचंड समुद्रास देखील सूचित होतो. इब्री शब्दाचे भाषांतर बहुधा ‘जलाशयाचे खोल स्थळ’ असे करण्यात आले आहे. (स्तोत्र ७१:२०; १०६:९; योना २:५) याच कारणामुळे, “अथांग डोहातून वर येणारे श्‍वापद” याची ओळख “समुद्रातून वर येणारे श्‍वापद” याच्याशी मिळू शकते.—प्रकटीकरण ११:७; १३:१.

^ या काळातील देवाच्या लोकांच्या अनुभवांची छाननी करताना हे लक्षात घ्या की, ४२ महिने ही खरी साडेतीन वर्षे असली तरी, साडेतीन दिवस खरोखरीच्या ८४ तासांच्या अवधीला सूचित करीत नाही. साडेतीन दिवसांचा जो दोनदा उल्लेख करण्यात आलेला आहे (वचने ९ व ११ मध्ये), तो हा काळ, यानंतर जो साडेतीन वर्षांचा खरा काळ आला त्याच्या तुलनेत अगदी अल्प आहे असे सूचित करतो.

^ “मृत,” “मेले” आणि “जिवंत” या शब्दांच्या वापराबद्दल रोमकर ६:२, १०, ११; ७:४, ६, ९; गलतीकर २:१९; कलस्सैकर २:२०; ३:३ या शास्त्रवचनांचा पडताळा करा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६८ पानांवरील चौकट]

प्रकटीकरण ११:१० मधील आनंद

१९३३ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रचारक शस्त्रे सादर करतात (इंग्रजी) या पुस्तकात लेखक रे एच. अब्राम्स यांनी वॉचटावर संस्थेच्या संपलेले गूज (इंग्रजी) या पुस्तकाला धर्मपुढाऱ्‍यांनी जो कडवा विरोध दाखवला त्याची माहिती दिली आहे. बायबल विद्यार्थी आणि त्यांची “पीडादायक गळ” यापासून स्वतःला दूर करण्यासाठी ते पाळकांनी केलेल्या प्रयत्नांची उजळणी देतात. यामुळे न्यायालयीन खटला भरला जाऊन त्यात जे. एफ. रदरफोर्ड यांना व त्यांच्या सात सहकाऱ्‍यांना लांब मुदतीच्या कारावासाची शिक्षा झाली. डॉ अब्राम्स म्हणतात: “सबंध प्रकरण व त्याचा शेवट याचे परीक्षण केल्यावर दिसते की, रसेल वर्गाला नामशेष करावे हा चर्च आणि पाळकांच्या चळवळीमागील उद्देश होता. कॅनडात फेब्रुवारी १९१८ मध्ये पुरोहितांनी त्यांच्याविरुद्ध व त्यांच्या प्रकाशनांविरुद्ध, खासपणे संपलेले गूज (इंग्रजी) विरुद्ध पद्धतशीर मोहीमा उघडल्या. विनिपेगच्या ट्रिब्यून याच्या मते, . . . या पुस्तकावर ‘धर्मपुढाऱ्‍यांच्या प्रतिनिधींद्वारे’ थेटपणे बंदी आणण्यात आली असा विश्‍वास आहे.”

डॉ एब्रॅम्स पुढे म्हणतात: “धार्मिक प्रकाशनांच्या छापखान्याच्या संपादकांना २० वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची बातमी मिळाली, तेव्हा लहान मोठ्या, बहुतेक सर्व प्रकाशनांना मोठा आनंद झाला. कर्मठ धार्मिक नियतकालिकात सहानुभूती दाखविणारे शब्द मला कोठे वाचण्यास मिळाले नाहीत. “हा छळ,” अपटॉन सिनक्लेअर म्हणतात, ‘त्यांनी “कर्मठ” धार्मिक गटाचा द्वेष जिंकल्यामुळे आला हे निःसंशये आहे.’ चर्चेसना संयुक्‍त प्रयत्नात जे अपयश मिळाले ते आता सरकारने त्यांच्यासाठी करून दाखविल्यामुळे यशस्वी होऊ शकले.” कित्येक धार्मिक प्रकाशनांतील अपमानकारक विवेचने उद्धृत केल्यावर लेखक, अपील न्यायालयाने निर्णय बदलून टाकल्याची माहिती देतात व म्हणतात: “ह्‍या निर्णयामुळे चर्चमध्ये स्तब्धता पसरली.”

[१६३ पानांवरील चित्रे]

योहान आध्यात्मिक मंदिराचे मोजमाप करतो—अभिषिक्‍त याजकांद्वारे दर्जे पूर्ण करायचे आहेत

[१६५ पानांवरील चित्रे]

यरुब्बाबेल व यहोशवा यांनी केलेल्या पुर्नउभारणीच्या कामाद्वारे सूचित केले की, प्रभूच्या दिवशी यहोवाच्या साक्षीदारांची सुरवात लहान असेल पण नंतर तिच्यामध्ये प्रचंड वाढ होईल. वर दाखवण्यात आलेली ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील छपाई यंत्रणा गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक वाढवावी लागली

[१६६ पानांवरील चित्रे]

दोन साक्षीदारांनी घोषित केलेल्या अग्नीमय न्यायदंडाच्या संदेशाची प्रतिछाया मोशे आणि एलीया यांच्या भविष्यवादित कार्याद्वारे दिसली

[१६९ पानांवरील चित्रे]

यहेज्केलच्या ३७ व्या अध्यायातील शुष्क अस्थींप्रमाणे, दोन साक्षीदारांना आधुनिक काळच्या प्रचाराच्या कामासाठी पुन्हा क्रियाशील करण्यात आले