व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पवित्र रहस्य उघड करणे

पवित्र रहस्य उघड करणे

अध्याय ६

पवित्र रहस्य उघड करणे

१. प्रकटीकरण १:१०-१७ मध्ये नोंद करून ठेवलेल्या झगझगीत दृश्‍याबद्दल आमची काय प्रतिक्रिया असावी?

 उंचावलेल्या त्या येशूचा तो दृष्टांत खरोखरीच भयप्रेरित आहे! आम्ही प्रेषित योहानासोबत तेथे असतो तर त्या तेजस्वी वैभवाने आम्हीसुद्धा भयग्रस्त होऊन त्याच्यासारखे मूर्च्छिंत होऊन पडलो असतो यात काही शंका नाही. (प्रकटीकरण १:१०-१७) हा अतिउत्कृष्ट प्रेरित दृष्टांत, आम्हाला कार्य करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून जतन करून ठेवण्यात आलेला आहे. त्या दृष्टांताच्या अर्थाविषयी आम्ही योहानाप्रमाणेच नम्रपणे रसिकता दाखवण्यास हवी. सिंहासनाधिष्ठ राजा, महायाजक व न्यायाधीश म्हणून असलेल्या येशूच्या पदांविषयी आम्हाठायी नेहमीच आदरणीय सन्मान असला पाहिजे.—फिलिप्पैकर २:५-११.

“पहिला व शेवटला”

२. (अ) येशू स्वतःला कोणत्या पदवीने सादर करतो? (ब) जेव्हा यहोवा म्हणतो की, “मी आदि आहे व अंत आहे,” त्याचा काय अर्थ होतो? (क) येशूची “पहिला व शेवटला” ही पदवी कोणत्या गोष्टीकडे लक्ष आकर्षित करते?

तरीपण, आम्हाठायी निर्माण झालेल्या भीतीचे दहशतीत रुपांतर व्हावयास नको. कारण येशूने योहानाला जी खात्री दिली, त्याविषयी तो पुढे असे म्हणतो: “त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले: ‘भिऊ नको. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे.’” (प्रकटीकरण १:१७ब) यशया ४४:६ मध्ये यहोवा आपल्या पदाविषयीचे केवळ एकच सर्वसमर्थ देव या नात्याने योग्यपणे वर्णन देऊन असे म्हणतो: “मी आदि आहे, मी अंत आहे; मजवेगळा देव नाहीच.” * जेव्हा येशू देखील स्वतःला “पहिला व शेवटला” या पदवीने सादर करतो, त्याचा अर्थ तो यहोवा, या महान निर्माणकर्त्याची बरोबरी करीत नाही. तर ही देवाकडून मिळालेली अशी संज्ञा मानून तो त्याचा योग्यपणे वापर करतो. यशयामध्ये यहोवा, सत्य देव या नात्याने आपले अद्वितीय स्थान उल्लेखित करत होता. तो चिरकालिक देव असून त्याच्याशिवाय खरच दुसरा कोणी देव नाही. (१ तीमथ्य १:१७) पण प्रकटीकरणात, येशू स्वतःला बहाल करण्यात आलेल्या पदवीचा, आपल्या अप्रतिम पुनरुत्थानाकडे लक्ष आकर्षित करण्याच्या उद्देशाने उपयोग करीत आहे.

३. (अ) येशू कोणत्या अर्थी “पहिला व शेवटला” असा होता? (ब) “मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या” स्वतःपाशी आहेत या येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे?

अमर आत्मिक जीवनात पुनरुत्थान होणाऱ्‍यांमध्ये येशू खरोखरी “पहिला” होता. (कलस्सैकर १:१८) तसेच तो, यहोवा ज्याचे व्यक्‍तिशः पुनरुत्थान करतो त्यामध्ये “शेवटला” आहे. अशाप्रकारे, तो “जिवंत” बनतो. त्याला अमरत्वाचा आनंद अनुभवण्यास मिळतो. या बाबतीत तो, “जिवंत देव” म्हटलेल्या त्याच्या अमर पित्यासारखा आहे. (प्रकटीकरण ७:२; स्तोत्र ४२:२) मानवजातीच्या इतर सर्वांसाठी येशू स्वतः “पुनरुत्थान व जीवन” आहे. (योहान ११:२५) याच्याच सहमतात, तो योहानास म्हणतो: “मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.” (प्रकटीकरण १:१८) मृतांचे पुनरुत्थान करण्याचा यहोवाने त्याला अधिकार दिला आहे. याकरताच, येशू म्हणू शकतो की, मरण व अधोलोक (कबर) यांची दारे उघडून मानवांना मोकळे करण्यासाठी त्याच्यापाशी किल्ल्या आहेत.—पडताळा मत्तय १६:१८.

४. येशू कोणती आज्ञा पुन्हा देतो व कोणाच्या लाभासाठी?

येशू त्या दृष्टांताची नोंद करण्यास पुनरपि एकदा आज्ञा करतो व योहानास सांगतो: “म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्‍यानंतर जे होणार ते लिहून ठेव.” (प्रकटीकरण १:१९) आणखी कोणत्या थरारक गोष्टी आमच्या माहितीसाठी अजूनही योहान कळविणार आहे?

तारे व समया

५. येशू “सात तारे” व “सात समया” यांचे स्पष्टीकरण कसे देतो?

योहानाने येशूला सोन्याच्या सात समयांच्या मध्यभागी उभा असलेला व त्याच्या उजव्या हातात सात तारे असलेला, असे पाहिले होते. (प्रकटीकरण १:१२, १३, १६) आता येशू हे स्पष्ट करतो: “जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे आणि सोन्याच्या त्या सात समयांचे गूज हे आहे: ते सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत आणि सात समया ह्‍या सात मंडळ्या आहेत.”—प्रकटीकरण १:२०.

६. सात ताऱ्‍यांकरवी काय चित्रित केलेले आहे आणि ते संदेश विशेषतः त्यांना उद्देशून का होते?

ते “तारे,” “सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.” प्रकटीकरणात तारे हे कधीकधी शब्दशः देवदूतांना चित्रित करतात; पण येशू आत्मिक प्राण्यांना काही लिहिण्यासाठी एखाद्या मानवी लेखनिकाचा उपयोग करील हे बहुधा अशक्य वाटते. यासाठीच, “तारे” हे मंडळीतील मानवी पर्यवेक्षक किंवा वडील असले पाहिजेत. ते येशूचे संदेशवाहक आहेत या दृष्टिने त्यांच्याकडे पाहिले जाते. * ते संदेश ताऱ्‍यांना उद्देशून आहेत कारण ते, यहोवाच्या कळपावर देखरेख करण्यास जबाबदार आहेत.—प्रेषितांची कृत्ये २०:२८.

७. (अ) मंडळीच्या केवळ एका दूतास येशू बोलत आहे याचा अर्थ प्रत्येक मंडळीत एकच वडील असतो असा नाही हे कसे दिसते? (ब) येशूच्या उजव्या हातातील सात तारे खरे पाहता कोणाचे प्रतिनिधीत्व करतात?

प्रत्येक मंडळीतील केवळ एकाच ‘देवदूताला’ येशू बोलतो, तर प्रत्येक मंडळीत केवळ एकच वडील आहे असा याचा अर्थ आहे का? नाही. सुरवातीला म्हणजे पौलाच्या दिवसात, इफिसकरांच्या मंडळीत केवळ एकच नव्हे तर अनेक वडील होते. (प्रकटीकरण २:१; प्रेषितांची कृत्ये २०:१७) यास्तव, योहानाच्या दिवसात, जेव्हा सात ताऱ्‍यांसाठी संदेश पाठविले होते व जे मंडळ्यांकरता वाचायचे होते (ज्यात इफिसचासुद्धा समावेश होता), ते तारे अर्थातच, यहोवाच्या अभिषिक्‍त मंडळीत ज्यांनी वडील वर्ग या नात्याने सेवा केली त्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. त्याचप्रकारे, येशूच्या मस्तकपदाखाली कार्य करणाऱ्‍या अभिषिक्‍त पर्यवेक्षकांचे मिळून बनलेल्या नियमन मंडळाकडून मिळालेली पत्रे, आज मंडळीतील पर्यवेक्षक मंडळीला वाचून दाखवतात. मंडळी येशूचा सल्ला अनुसरत आहे याची खात्री त्या स्थानिक वडील वर्गाने करायची असते. अर्थातच, तो सल्ला केवळ वडिलांच्याच नव्हे तर, मंडळीत सहवास राखून असणाऱ्‍या सर्वांच्या फायद्याकरता असतो.—पाहा प्रकटीकरण २:११अ.

८. वडील येशूच्या उजव्या हातात आहेत याद्वारे काय सूचित होते?

येशू हा मंडळीचा मस्तक असल्याने वडील त्याच्या उजव्या हातात आहेत, याचा अर्थ ते त्याच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली आहेत असे योग्यपणाने म्हटले आहे. (कलस्सैकर १:१८) तो मुख्य मेंढपाळ असून ते सहमेंढपाळ आहेत.—१ पेत्र ५:२-४.

९. (अ) त्या सात समया कशाचे प्रतिनिधीत्व करतात आणि समया त्यासाठी समर्पक चिन्ह का आहेत? (ब) त्या दृष्टांताने योहानाला कशाची आठवण करून दिली असावी?

सात समया, या त्या सात मंडळ्या आहेत, ज्यांना उद्देशून योहान हे प्रकटीकरणाचे पुस्तक लिहितो. त्या: इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या आहेत. पण मंडळ्यांना समयांद्वारे का चित्रित करण्यात आले आहे? कारण ख्रिश्‍चनांनी, वैयक्‍तिक किंवा सामुहिकरित्या मंडळी या नात्याने या अंधाऱ्‍या जगात लोकांपुढे ‘आपला उजेड पाडायचा आहे.’ (मत्तय ५:१४-१६) यासोबतच, शलमोनाच्या मंदिरातील साहित्यात समया होत्या. मंडळ्यांना समया असे संबोधण्याद्वारे योहानाच्या लक्षात आले असावे की, अभिषिक्‍तांची प्रत्येक स्थानिक मंडळी, लाक्षणिकरित्या “देवाचे मंदिर,” देवाच्या आत्म्याचे निवासस्थान अशी आहे. (१ करिंथकर ३:१६) याचप्रमाणे यहुदी मंदिराच्या नमुन्याप्रमाणे, अभिषिक्‍तांच्या मंडळीचे सदस्य, यहोवाच्या मोठ्या आध्यात्मिक मंदिर व्यवस्थेमध्ये “राजकीय याजकगण” अशी सेवा करतात. येथेच येशू प्रमुख याजक असून, यहोवा स्वर्गातील परमपवित्र स्थानात व्यक्‍तिगतपणे वास करतो.—१ पेत्र २:४, ५, ९; इब्रीयांस ३:१; ६:२०; ९:९-१४, २४.

मोठा धर्मत्याग

१०. यहुदी व्यवस्थीकरण व त्याचे कठोर पाठीराखे यांचे सा.यु. ७० मध्ये काय घडले?

१० योहानाने प्रकटीकरण लिहिले तेव्हा ख्रिस्ती धर्माला ६० वर्षे होऊन गेली होती. सुरवातीला सतत ४० वर्षे यहुदी धर्माकडील विरोधात तो बचावून राहिला होता. यानंतर सा.यु. ७० मध्ये यहुदी व्यवस्थीकरणावर प्राणघातक आघात झाला तेव्हा पश्‍चात्तापहीन यहुद्यांनी आपली राष्ट्रीय ओळख गमावली आणि त्यांना प्रिय वाटणारी प्रतिमा, त्यांचे यरुशलेमेतील मंदिरही गमावले.

११. वाढत असलेल्या प्रवृत्तींबद्दल, प्रमुख मेंढपाळाने मंडळ्यांना ताकीद देण्यासाठी लिहिणे समयोचित का होते?

११ तथापि, प्रेषित पौलाने पूर्वभाकीत केले की, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांमध्ये धर्मत्याग उदयास येईल आणि येशूचे संदेश दाखवून देतात की, योहानाच्या वृद्धापकाळी हा धर्मत्याग वाढत होता. स्त्रीच्या संततीस भ्रष्ट करण्याच्या सैतानाच्या सर्वस्वी प्रयत्नास प्रतिबंध करण्यास ज्यांनी हालचाल केली त्यांच्यापैकी योहान हा शेवटला होता. (२ थेस्सलनीकाकर २:३-१२; २ पेत्र २:१-३; २ योहान ७-११) या कारणास्तव, यहोवाच्या प्रमुख मेंढपाळाने मंडळीतील वडिलांना, वाढत चाललेला कल याबद्दलची सूचना करण्यासाठी आणि सरळ अंतःकरणाच्या लोकांना धार्मिकतेकरता खंबीरपणे उभे राहण्याचे उत्तेजन देण्यासाठी लिहिण्याची ही योग्य वेळ होती.

१२. (अ) योहानाच्या काळानंतरच्या शतकात धर्मत्यागीपणा कसा वाढत गेला? (ब) ख्रिस्ती धर्मजगत कसे अस्तित्वात आले?

१२ सा.यु. ९६ मध्ये मंडळ्यांनी येशूच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला ते आम्हास ज्ञात नाही. पण आम्ही हे सांगू शकतो की, योहानाच्या मृत्युनंतर मात्र धर्मत्याग झपाट्याने वाढत गेला. “ख्रिश्‍चनांनी” यहोवाच्या नावाचा वापर करणे बंद केले आणि त्यांनी बायबलच्या हस्तलिखित प्रतीत “प्रभु” व “देव” हे पर्यायी शब्द घातले. चवथ्या शतकापर्यंत त्रैक्याच्या खोट्या तत्त्वप्रणालीने मंडळ्यांमध्ये शिरकाव केला. याच काळात, जीवाच्या अमरत्वाची कल्पनाही उचलून घेण्यात येत होती. सरतेशेवटी, रोमी सम्राट कॉन्स्टंटाईन याने “ख्रिस्ती” धर्माला राज्याचा धर्म बनवला व यामुळे ख्रिस्ती धर्मजगत उदयास आले, जेथे चर्च व राज्य यांनी एकत्रपणे हजार वर्षे राज्यकारभार चालविला. नवीन पद्धतीचा “ख्रिस्ती” बनणे अगदी सोपे होते. सर्व वंशांनी आपल्या आधीच्या मूर्तिपूजक विश्‍वासांना या नवीन धर्माच्या प्रणालींसोबत जुळवून घेतले. ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक नेते जुलमी राजकीय शासक बनले व त्यांनी आपले धर्मत्यागी विचार तरवारीच्या जोरावर अंमलात आणले.

१३. येशूने विशिष्ट पक्षाभिमानाविरुद्ध ताकीद दिली असताना देखील धर्मत्यागी ख्रिश्‍चनांनी कोणता मार्ग अवलंबिला?

१३ धर्मत्यागी बनलेल्या ख्रिश्‍चनांनी, येशूने सात मंडळ्यांना लिहिलेले विचार पूर्णपणे दुर्लक्षिले. येशूने इफिसकरांना ताकीद दिली होती की, त्यांनी आपणाठायी असणारी पूर्वीची प्रीती परत मिळवून घ्यावी. (प्रकटीकरण २:४) तरीपण, ख्रिस्ती धर्मजगताच्या सदस्यांनी यहोवावरील प्रीतीसाठी एक न होता, क्रूर युद्धे लढविली व एकमेकांचा भयंकर छळ केला. (१ योहान ४:२०) येशूने पर्गमच्या मंडळीला विशिष्ट पक्षाभिमान बाळगण्यापासून दूर राहाण्याचा इशारा दिला होता. तरीही, दुसऱ्‍याच शतकात अनेक पंथ उदयास आले आणि आज ख्रिस्ती धर्मजगात क्षुल्लक कारणासाठी आपसात भांडणारे हजारो पंथ व धर्म अस्तित्वात आले आहेत.—प्रकटीकरण २:१५.

१४. (अ) आध्यात्मिकरित्या मृत बनण्याच्या बाबतीत येशूने इशारा दिला होता तरी, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांनी कोणता मार्ग अनुसरला? (ब) मूर्तिपूजा तसेच अनैतिकता याबद्दल येशूने दिलेल्या सूचनांकडे लक्ष देण्यामध्ये ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे कोणकोणत्या मार्गांनी मागे पडले?

१४ येशूने सार्दीस मंडळीला, आध्यात्मिक दृष्टिने मृत होऊ नये म्हणून इशारा दिला होता. (प्रकटीकरण ३:१) सार्दीसप्रमाणे, ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे लवकरच ख्रिस्ती कार्य विसरले आणि प्रचाराचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी एका छोट्या पगारी पाळकवर्गाकडे सुपूर्त केले. येशूने थुवतीरा मंडळीला मूर्तिपूजा व जारकर्म यांच्याविरुद्ध सूचना दिली होती. (प्रकटीकरण २:२०) तरीही, ख्रिस्ती धर्मजगताने मूर्त्यांच्या वापरास उघडपणे परवानगी दिली आणि राष्ट्रीयत्व या अधिक युक्‍तिबाज मूर्तिपूजेला आणि भौतिकवादाला मुभा दिली. याचप्रमाणे, जरी अनैतिकतेविरुद्ध बरेच काही सांगितले जात होते तरी, ती विस्तृतपणे आचरली व सहन केली जात होती.

१५. येशूने सात मंडळ्यांना लिहिलेली वचने ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मांविषयी काय उघड करतात आणि ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक काय असल्याचे सिद्ध झाले आहे?

१५ या कारणास्तव, येशूने सात मंडळ्यांना लिहिलेली वचने, ख्रिस्ती धर्मजगतातील धर्म यहोवाचे खास लोक असण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात असिद्ध असल्याचे दिसून आले ते उघड करतात. ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक तर खरेपणाने सैतानाच्या संततीमधील सर्वात प्रमुख भाग असल्याचे दिसून आले. यांना ‘धर्मत्यागी’ संबोधून पौलाने असे भाकीत केले की, “सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्‌भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्‍यांनी युक्‍त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.”—२ थेस्सलनीकाकर २:९, १०.

१६. (अ) ख्रिस्ती धर्मजगातील नेत्यांनी विशेषतः कोणाविरुद्ध द्वेष प्रकट केला? (ब) मध्ययुगात ख्रिस्ती धर्मजगात काय घडले? (क) प्रॉटेस्टंट बंड किंवा सुधारणा यांनी ख्रिस्ती धर्मजगताचा धर्मत्यागी मार्ग बदलला का?

१६ देवाच्या कळपाचे मेंढपाळ असल्याचा दावा करीत असता, ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक व प्रापंचिक नेत्यांनी, बायबलच्या वाचनास उत्तेजन देणाऱ्‍या व ज्यांनी त्यांच्या अशास्त्रीय प्रथांना उघड केले अशांसाठी विशेष द्वेष प्रदर्शित केला. जॉन हस व बायबलचे भाषांतरकार विल्यम टिंडेल यांचा छळ करण्यात आला व त्यांना हुतात्मिक मरण आले. मध्ययुगातील अंधारी काळात धर्मत्यागी सत्तेने अधम कॅथलिक चौकशी सत्र आंरभून कळस गाठला. ज्यांनी चर्चच्या शिकवणींना किंवा अधिकाराला आव्हान दिले अशांना क्रुरतेने दाबून टाकण्यात आले आणि अगणित हजारो जणांना पाखंडी म्हणून मरेपर्यंत छळले किंवा वधस्तंभावर जाळले. अशाप्रकारे, देवाच्या स्त्री संस्थेतील कोणतेही खरे बीज तात्काळ चिरडले जावे याची खात्री करण्याचा प्रयत्न सैतानाने केला. जेव्हा प्रॉटेस्टंट बंड किंवा सुधारणा घडून आली (१५१७ पासून पुढे), तेव्हा अनेक प्रॉटेस्टंट चर्चेसने त्याचप्रकारचा असहिष्णुतेचा आत्मा प्रकट केला. देव व ख्रिस्त यांजशी निष्ठावंत राहू इच्छिणाऱ्‍यांना हुतात्मिक मरण देऊन यांनी देखील आपणावर रक्‍तदोष ओढवून घेतला. खरेच, ‘पवित्र जनांचे रक्‍त’ मुक्‍तपणे सांडले गेले!—प्रकटीकरण १६:६; पडताळा मत्तय २३:३३-३६.

संतती टिकून राहते

१७. (अ) येशूच्या गहू व निदणाच्या दाखल्याने काय पूर्वभाकीत केले? (ब) कोणती गोष्ट १९१८ मध्ये घडली व याचा परिणाम कशाचा नकार करण्यात व कशाची नियुक्‍ती करण्यात झाला?

१७ गहू व निदणाच्या दाखल्यात, येशूने अंधाराचा समय पूर्वभाकीत केला जेव्हा ख्रिस्ती धर्मजगत आपली सत्ता सर्वोच्चपणे गाजवितील. तरीपण धर्मत्यागाच्या या सर्व शतकात, गव्हासारखे असणारे ख्रिस्तीजन, म्हणजे अभिषिक्‍त ख्रिस्ती अस्तित्वात राहणार होते. (मत्तय १३:२४-२९, ३६-४३) अशाप्रकारे, ऑक्टोबर १९१४ मध्ये प्रभूच्या दिवसाची पहाट झाली तेव्हाही खरे ख्रिस्ती या पृथ्वीवर होते. (प्रकटीकरण १:१०) मग, साडेतीन वर्षांनी, १९१८ मध्ये यहोवा, ‘करार घेऊन येणाऱ्‍या निरोप्यासोबत,’ म्हणजे येशूसोबत न्याय करण्यासाठी आपल्या आध्यात्मिक मंदिरात आला. (मलाखी ३:१; मत्तय १३:४७-५०) या वेळी धन्याने खोट्या ख्रिश्‍चनांना नाकारुन, ‘आपल्या सर्वस्वावर विश्‍वासू व बुद्धिमान दास’ याची नियुक्‍ती करायची होती.—मत्तय ७:२२, २३; २४:४५-४७.

१८. कोणता ‘प्रसंग’ १९१४ मध्ये आला आणि दासाने काय करण्याची ती वेळ होती?

१८ याचप्रमाणे ती वेळ, येशूने त्या सात मंडळ्यांना लिहिलेल्या वचनाकडे या दासाने लक्ष देण्याची होती; हे आपल्याला त्यात जे काही लिहिले आहे त्यावरुन दिसू शकते. उदाहरणार्थ, येशू, मंडळ्यांचा न्याय करण्यासाठी येत असल्याचा त्यामध्ये उल्लेख आहे व हा न्याय १९१८ मध्ये सुरु झाला. (प्रकटीकरण २:५, १६, २२, २३; ३:३) तो, “पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षाप्रसंग येणार आहे,” त्यापासून फिलदेल्फिया मंडळीचे संरक्षण करण्याबद्दल बोलतो. (प्रकटीकरण ३:१०, ११) हा “परीक्षाप्रसंग” प्रभूचा दिवस १९१४ मध्ये उजाडल्यावर येतो व यानंतर देवाच्या प्रस्थापित झालेल्या राज्यासंबंधी एकनिष्ठता दाखविण्याविषयी ख्रिश्‍चनांची परीक्षा घेतली गेली.—पडताळा मत्तय २४:३, ९-१३.

१९. (अ) त्या सात मंडळ्या आज काय चित्रित करतात? (ब) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसोबत आज कोण मोठ्या संख्येने सहवास ठेवीत आहेत, त्यामुळे यांनाही येशूचा सल्ला व त्याने वर्णिलेली परिस्थिती ही तितक्याच प्रमाणात का लागू होते? (क) पहिल्या शतकातील सात मंडळ्यांना देण्यात आलेला येशूचा संदेश आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघावा?

१९ या कारणास्तव, येशूची वचने मंडळ्यांना १९१४ पासून पुढे मोठ्या प्रमाणात लागू होतात. या दृश्‍यात, प्रभूच्या दिवसातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या सर्व मंडळ्या त्या सात मंडळ्यांचे प्रतीक ठरतात. याशिवाय गेल्या ५० पेक्षा अधिक वर्षात योहानाकरवी चित्रित केल्या गेलेल्या त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना, नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा असणाऱ्‍या विश्‍वासधारकांची मोठी संख्या येऊन मिळाली आहे. यांनाही, येशू ख्रिस्ताने दिलेला सल्ला व त्याने केलेल्या परीक्षणामुळे सात मंडळ्यात आढळलेली परिस्थिती ही तितक्याच प्रमाणात लागू आहे; कारण यहोवाच्या सर्व सेवकांसाठी धार्मिकता व विश्‍वासूपणाचा केवळ एकच दर्जा आहे. (निर्गम १२:४९; कलस्सैकर ३:११) अशाप्रकारे, पहिल्या शतकातील आशिया मायनर येथील सात मंडळ्यांना देण्यात आलेला येशूचा संदेश केवळ ऐतिहासिक कुतुहलाच्या गोष्टी नाहीत. त्याचा आम्हा प्रत्येकासाठी जीवन किंवा मरण असा अर्थ होतो. यासाठीच, आपण येशूचे शब्द काळजीपूर्वक ऐकू या.

[तळटीपा]

^ यशया ४४:६ येथील मूळ इब्री भाषेत “आदि,” व “अंत,” या शब्दांसोबत निश्‍चित उपपद असल्याचे दिसत नाही; पण येशूने स्वतःविषयी दिलेल्या वर्णनात मात्र प्रकटीकरण १:१७ मधील मूळ ग्रीक भाषेत निश्‍चित उपपद असल्याचे आढळते. यास्तव, व्याकरणदृष्ट्या बघता, प्रकटीकरण १:१७ मधील ही पदवी सूचित करते, तर यशया ४४:६ मध्ये यहोवाच्या देवत्वाबद्दलचे वर्णन आहे.

^ ॲगʹगे․लॉस या ग्रीक शब्दाचा (ज्याचा उच्चार “एंजेलोस” असा होतो) अर्थ “संदेशवाहक” तसेच “दूत” असा होतो. मलाखी २:७ मध्ये एका लेवी याजकाला एक “संदेशवाहक” असे दाखविण्यात आले आहे (इब्री, मल․ʼआखʹ).—पहा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३२ पानांवरील चौकट]

परीक्षेचा व न्यायाचा काळ

सा.यु. २९ च्या साधारण ऑक्टोबर महिन्यात येशूचा यार्देन नदीत बाप्तिस्मा झाला, तेव्हा त्याला नेमस्त राजा या नात्याने अभिषिक्‍त करण्यात आले. याच्या साडेतीन वर्षानंतर, सा.यु. ३३ मध्ये तो यरुशलेम मंदिरात आला व तिला लुटारूंची गुहा करणाऱ्‍या लोकांना त्याने बाहेर हाकून लावले. अशाच प्रकारची समांतरता, येशूचे ऑक्टोबर १९१४ मध्ये स्वर्गात ‘आपल्या वैभवी सिंहासनावर बसण्यानंतर’ साडेतीन वर्षांनी जेव्हा खिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांचा न्याय करण्यासाठी देवाच्या घरापासून सुरवात केली, तेव्हा दिसून येते. (मत्तय २१:१२, १३; २५:३१-३३; १ पेत्र ४:१७) १९१८ च्या सुरवातीस यहोवाच्या लोकांच्या राज्य हालचालीला मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले. तो पृथ्वीभरात परीक्षेचा काळ होता आणि भ्याड लोकांना त्यातून चाळून काढण्यात आले. मे १९१८ मध्ये ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मपुढाऱ्‍यांनी वॉचटावर सोसायटीच्या अधिकाऱ्‍यांना कारागृहात टाकण्याची चिथावणी दिली पण नऊ महिन्यांनी त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांना त्यांच्यावरील खोट्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविण्यात आले. परीक्षा व शुद्धिकरण घडल्यामुळे देवाच्या लोकांची संघटना, १९१९ पासून पुढे, ख्रिस्ताद्वारे यहोवाचे राज्य मानवजातीसाठी एकमेव आशा आहे हे घोषित करण्यास आवेशाने पुढे सरसावली.—मलाखी ३:१-३.

येशूने आपले परीक्षण १९१८ मध्ये आरंभिले तेव्हा ख्रिस्ती धर्मजगतच्या धार्मिक पुढाऱ्‍यांना प्रतिकूल न्यायदंड मिळाला यात शंकाच नाही. त्यांनी देवाच्या लोकांविरुद्ध छळ उठवला होता इतकेच नव्हे तर पहिल्या महायुद्धात झगडत असलेल्या राष्ट्रांना पाठिंबा देऊन त्यांनी आपल्यावर मोठा रक्‍तदोषही ओढवून घेतला होता. (प्रकटीकरण १८:२१, २४) त्या धार्मिक पुढाऱ्‍यांनी आपली आशा तेव्हा राष्ट्र संघ या मानवनिर्मित संस्थेवर ठेवली. १९१९ पर्यंत जगाच्या इतर खोट्या धर्म साम्राज्यासोबत ख्रिस्ती धर्मजगत देखील देवाच्या मर्जीतून पूर्णपणे पडले.

[२८, २९ पानांवरील नकाशा]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

पर्गम

स्मुर्णा

थुवतीरा

फिलदेल्फिया

सार्दीस

इफिस

लावदिकीया

[३१ पानांवरील चित्रे]

ज्यांनी बायबलचे भाषांतर केले, वाचले किंवा स्वतः जवळ बाळगले अशांचा छळ व वध करण्याद्वारे ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्माने रक्‍तदोष ओढवून घेतला