व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बाबेलच्या नाशाबद्दल शोक व उल्लास

बाबेलच्या नाशाबद्दल शोक व उल्लास

अध्याय ३७

बाबेलच्या नाशाबद्दल शोक व उल्लास

१. मोठ्या बाबेलचा एकाएकी नाश झाल्यावर ‘पृथ्वीचे राजे’ कशी प्रतिक्रिया दाखवतील?

 बाबेलचा शेवट ही यहोवाच्या लोकांसाठी सुवार्ता आहे पण याबद्दल राष्ट्रांचा काय दृष्टिकोन आहे? योहान आम्हाला सांगतो: “पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरिता रडतील व ऊर बडवून घेतील. ते म्हणतील, अरेरे! बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती! एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”—प्रकटीकरण १८:९, १०.

२. (अ) मोठ्या बाबेलचा नाश किरमिजी रंगाचे, दहा शिंगे असणारे लाक्षणिक श्‍वापद करीत असल्यामुळे ‘पृथ्वीवरील राजे’ तिच्यासाठी दुःख का करतात? (ब) त्या नाश झालेल्या शहरापासून हे दुःखी राजे दूरवर का उभे राहतात?

बाबेलचा नाश दहा शिंगे असणाऱ्‍या लाक्षणिक किरमिजी रंगाच्या श्‍वापदाद्वारे झाला असल्यामुळे राष्ट्रांनी दाखवलेली अशी ही प्रतिक्रिया कदाचित विचित्रच वाटेल. (प्रकटीकरण १७:१६) पण बाबेल गेल्यावर ‘पृथ्वीवरील राजांना’ हे कळेल की, लोकांना समेट करण्यालायक बनवून स्वतःच्या अधीन राखण्यात ती केवढी उपयुक्‍त होती. धर्मपुढाऱ्‍यांनी युद्धे पवित्र ठरविली होती; युद्धात भरती करणारे प्रतिनिधी म्हणून होते आणि युद्ध क्षेत्रातील युवकांना प्रचार देखील यांनीच केला होता. धर्माने भ्रष्ट शासनकर्त्यांना असा एक पवित्रतेचा पडदा पुरवला होता की ज्याच्या आड राहून ते सर्वसाधारण लोकांना जाच देऊ शकत होते. (पडताळा यिर्मया ५:३०, ३१; मत्तय २३:२७, २८.) पण आता, हे दुःखी राजे त्या नाश झालेल्या शहरापासून दूर उभे राहिले आहेत हे लक्षात आणा. तिच्या मदतीसाठी काही करावे या हेतूने ते तिच्या जवळ देखील येत नाहीत. ती गेल्याचे त्यांना दुःख वाटते हे खरे पण तिच्याप्रीत्यर्थ काही जोखीम घेण्याइतके त्यांना दुःख वाटत नाही.

व्यापारी रडतात व शोक करतात

३. मोठ्या बाबेलच्या निघून जाण्यामुळे आणखी कोण दुःखी होतात आणि याबद्दलचे कोणते कारण योहान देतो?

मोठ्या बाबेलच्या निघून जाण्यामुळे दुःख करणारे केवळ पृथ्वीवरील राजे नाहीत. “पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करितात; कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही. सोने, रुपे, मोलवान रत्ने, मोत्ये, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अति मोलवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे; दालचिनी, सुगंधी उटणी [भारतीय मसाले, NW], धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम व मनुष्यांचे जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही. ज्या फळफळावळीची तुझ्या जिवाला चटक लागली आहे, ती तुझ्यापासून [मोठी बाबेल] गेली आहे आणि मिष्टान्‍ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत.”—प्रकटीकरण १८:११-१४.

४. मोठ्या बाबेलच्या नाशाबद्दल “व्यापारी” का रडतात व शोक करतात?

होय, मोठी बाबेल ही धनाढ्य व्यापाऱ्‍यांची जवळची मैत्रीण व चांगली ग्राहक होती. उदाहरणार्थ, ख्रिस्ती धर्मजगतातील मठ, जोगिणींचा आश्रम व चर्चेसनी शतकांपासून मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, मूल्यवान पाषाण, मोलवान लाकूड आणि इतर प्रकारातील भौतिक धन गोळा केले आहे. याचप्रमाणे, ख्रिस्ताचा अपमान करणाऱ्‍या नाताळ सणाच्या व इतर तथाकथित सणासुदीच्या काळात धिंगाणा करणाऱ्‍या तसेच दारू पिऊन मौज करणाऱ्‍या व जिनसा विकत घेणाऱ्‍या ग्राहकांवर धर्माने आपले आशीर्वाद ओतले होते. ख्रिस्ती धर्मजगतातील मिशनऱ्‍यांनी दूरदूर जाऊन जगाच्या ‘व्यापाऱ्‍यासाठी’ नवनव्या बाजारपेठा उघडून दिल्या. १७ व्या शतकात जपानमध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेला कॅथलिक धर्म सरंजामशाही पद्धतीच्या युद्धात देखील गुंतला. ओसाका किल्ल्याच्या भिंतीलगत दिलेल्या निर्णायक युद्धाबद्दल माहिती देताना द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतो: “टोकुगावा सैन्याला शत्रूपक्षाचे झेंडे क्रूस, आमचा प्रभू आणि स्पेनचा संरक्षक संत, संत याकोब या चित्राचे दिसले.” मग विजेत्या सैन्याने, त्या देशातील कॅथलिक धर्माचा चांगलाच छळ करून त्याला तेथून जवळजवळ नाहीसे केले. जागतिक उलाढालीमध्ये चर्चने घेतलेला असा हा सहभाग त्याला काही आशीर्वाद मिळवून देणार नाही.

५. (अ) स्वर्गातून निघालेली वाणी “व्यापारी” लोकांच्या शोकाचे कसे वर्णन देते? (ब) हे व्यापारी देखील का “दूर उभे” राहतात?

स्वर्गातून निघालेली वाणी पुढे म्हणते: “तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थाचे व्यापारी रडत व शोक करीत तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील आणि म्हणतील, अरेरे, पाहा ही मोठी नगरी! तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोत्ये ह्‍यांनी शृंगारलेली नगरी! एका घटकेत ह्‍या इतक्या संपत्तीची राख झाली.” (प्रकटीकरण १८:१५-१७अ) मोठ्या बाबेलचा नाश झाल्यामुळे “व्यापारी” आपला व्यापारी भागधारक गेला म्हणून शोक करतात. त्यांच्यासाठी ते खरेपणाने “अरेरे” म्हणण्याजोगे आहे. पण त्यांच्या शोकाचे कारण केवढे स्वार्थी स्वरुपाचे आहे ते लक्षात घ्या व हे देखील—राजांप्रमाणेच—“दूर उभे” राहतात. जवळ जाऊन मोठ्या बाबेलला मदत करण्याची कसलीही इच्छा त्यांच्याठायी नाही.

६. स्वर्गातून आलेली वाणी जहाजांचे कप्तान व खलाशी यांचे रुदन कसे वर्णिते आणि ते का रडतात?

अहवाल पुढे म्हणतो: “सर्व तांडेल, गलबतांवरून बंदरोबंदरी जाणारे सर्व आणि खलाशी व समुद्रावर जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर उभे राहिले आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करीत म्हणाले, ह्‍या मोठ्या नगरीसारखी कोणती नगरी आहे? त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करीत व आक्रोश करीत म्हटले, अरेरे, जिच्या धनसंपत्तीने समुद्रातील गलबतांचे सगळे मालक श्रीमंत झाले ती मोठी नगरी! तिची एका घटकेत राखरांगोळी झाली.” (प्रकटीकरण १८:१७ब-१९) प्राचीन बाबेल मोठे व्यापारी शहर होते व त्याच्याकडे पुष्कळ जहाजे होती. याचप्रमाणे मोठी बाबेल देखील तिच्या ‘जलाशयाद्वारे’, म्हणजे तिच्या लोकांद्वारे मोठा व्यापार करते. यामुळे तिच्या धर्माच्या प्रजाजनांना व्यवसाय मिळतो. या सर्वांसाठी मोठ्या बाबेलचा नाश केवढा मोठा तडाखा असणार! तिच्यासारखा त्यांच्यासाठी उदरनिर्वाह पुरविणारा दुसरा उगम नसणार.

तिच्या नाशाबद्दल आनंद

७, ८. स्वर्गातून निघालेली वाणी मोठ्या बाबेलबद्दल आपला कळस कसा वदविते आणि या शब्दांना कोण प्रतिसाद देतील?

मेद व पारस यांच्याद्वारे प्राचीन बाबेलचा विध्वंस घडला तेव्हा यिर्मयाने भविष्यवादितपणे असे म्हटले होते: “आकाश व पृथ्वी आणि त्यातील सर्व काही ही बाबेलावर जयजयकार करितील.” (यिर्मया ५१:४८) मोठ्या बाबेलचा नाश घडेल तेव्हा स्वर्गातून आलेली वाणी मोठ्या बाबेलबद्दलचा संदेश कळसास नेत असे म्हणते: “हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी आनंद करा; कारण देवाने तिला दंड करून तुम्हाला न्याय दिला आहे.” (प्रकटीकरण १८:२०) देवाची प्राचीन वैरीण नष्ट झालेली यहोवाला व देवदूतांना पहायला नक्कीच आनंद वाटेल; तसेच प्रेषित व आरंभीचे ख्रिस्ती संदेष्टे, ज्यांचे आतापर्यंत पुनरुत्थान होऊन ते २४ वडिलांच्या व्यवस्थेतील आपल्या पदावर असतील, त्यांनाही आनंद होणार.—पडताळा स्तोत्र ९७:८-१२.

होय, सर्व ‘पवित्र जन,’ मग ते स्वर्गात पुनरुत्थान होऊन गेलेले असोत की, अद्याप पृथ्वीवर जिवंत असोत, आनंदाने गजर करतील व त्यांच्यासोबत दुसरी मेंढरे यांचा मोठा लोकसमुदाय देखील उल्लास करील. काही काळातच, प्राचीन काळातील विश्‍वासू लोकांचे पुनरुत्थान नव्या व्यवस्थीकरणात घडेल व तेही या आनंदात सामील होतील. देवाच्या लोकांनी खोट्या धर्माच्या त्यांच्या छळकर्त्यांचा कधीही सूड घेतला नव्हता. त्यांनी यहोवाचे हे शब्द ध्यानी ठेवले होते की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभु [यहोवा, NW] म्हणतो.” (रोमकर १२:१९; अनुवाद ३२:३५, ४१-४३) आता यहोवाने ती फेड केली. मोठ्या बाबेलने जेवढे काही रक्‍त सांडले होते त्याचा बदला घेतला गेला असेल.

मोठ्या तळीसारखा धोंडा टाकणे

९, १०. (अ) आता एक बलवान देवदूत काय करतो व म्हणतो? (ब) प्रकटीकरण १८:२१ मधील बलवान दूताने जी कृती केली तशीच कोणती कृती यिर्मयाच्या काळी करण्यात आली व ती कशाचे प्रमाण होती? (क) योहानाने पाहिलेल्या बलवान दूताची कृती कशाची हमी देते?

योहान यानंतर जे काही बघतो त्याद्वारे, यहोवाने मोठ्या बाबेलविरुद्ध बजावलेला न्यायदंड शेवटला आहे हे कळते: “नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व ह्‍यापुढे कधीहि सापडणार नाही.” (प्रकटीकरण १८:२१) यिर्मयाच्या काळी सुद्धा प्रबळ भविष्यवादित अर्थाची अशाच प्रकारची एक कृती करण्यात आली. यिर्मयाला एका पुस्तकात “बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते” ते लिहिण्यास सांगितले गेले. ते पुस्तक त्याने सराया याला दिले व ते बाबेलला घेऊन जाण्यास सांगितले. तेथे, यिर्मयाच्या सूचनेला अनुसरून सरायाने त्या शहराविरुद्ध ही घोषणा वाचली: “हे परमेश्‍वरा [यहोवा, NW], तू या स्थानाविषयी म्हणाला आहेस की ते नष्ट होईल, त्यात कोणी मनुष्य अथवा पशु राहणार नाही, ते कायमचे ओसाड होईल.” यानंतर सरायाने त्या पुस्तकाला एक धोंडा बांधून फरात नदीत टाकून दिले व म्हटले: “याच प्रकारे मी बाबेलावर जे अरिष्ट आणणार त्यामुळे तो बुडेल वर येणार नाही.”—यिर्मया ५१:५९-६४.

१० पुस्तकाला धोंडा बांधून ते नदीत फेकून देणे हे बाबेलची विस्मृति होईल; त्याचे परत उत्थान होणार नाही याची हमी होती. प्रेषित योहानाने एका देवदूताला अशीच कृती करताना पाहिले ती गोष्ट, मोठ्या बाबेलविरुद्ध यहोवाचे उद्देश निश्‍चये पूर्ण होतील याची शक्‍तिशाली खात्री आहे. प्राचीन बाबेलची पूर्ण रुपात दिसणारी उद्‌ध्वस्त स्थिती खोट्या धर्माला नजीकच्या काळात जे काही घडणार आहे त्याबद्दल प्रबळ साक्ष देते.

११, १२. (अ) तो बलवान देवदूत आता मोठ्या बाबेलबद्दल काय म्हणतो? (ब) यिर्मयाने धर्मत्यागी यरुशलेमेबद्दल काय भाकीत केले आणि हे आमच्या दिवसात कसली सूचकता देते?

११ तो बलवान दूत आता मोठ्या बाबेलीस उद्देशून असे म्हणतो: “वीणा वाजविणारे, गवई, पावा वाजविणारे व कर्णा वाजविणारे ह्‍यांचा नाद तुझ्यात ह्‍यापुढे ऐकूच येणार नाही; कसल्याहि कारागिरीचा कोणताहि कारागीर तुझ्यात सापडणारच नाही आणि जात्याचा आवाज तुझ्यात ह्‍यापुढे ऐकूच येणार नाही; दिव्याचा उजेड तुझ्यात ह्‍यापुढे दिसणारच नाही आणि नवरानवरीचा शब्द तुझ्यात ह्‍यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली.”—प्रकटीकरण १८:२२, २३.

१२ याच शब्दात यिर्मया संदेष्ट्याने धर्मत्यागी यरुशलेमेबद्दल असे भाकीत केले: “त्यामधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवऱ्‍याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन. हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल.” (यिर्मया २५:१०, ११) ख्रिस्ती धर्मजगत मोठ्या बाबेलचा प्रमुख भाग म्हणून निर्जीव व नष्ट होईल व हे यरुशलेमेला सा. यु. पूर्व ६०७ नंतर जी वैराण स्थिती आली त्यात अगदी ठळकपणे चित्रित होते. एकेकाळी उल्लास केलेल्या आणि दरदिवशी गजबजलेल्या ख्रिस्ती धर्मजगताला जिंकण्यात आलेले व टाकून दिलेले दिसेल.

१३. मोठ्या बाबेलवर अचानक कोणता बदल येऊन धडकतो व यामुळे तिच्या “व्यापारी” वर्गावर कोणता परिणाम होतो?

१३ तो देवदूत योहानाला सांगतो त्याप्रमाणे सर्वच्या सर्व मोठी बाबेल प्रबळ, आंतरराष्ट्रीय साम्राज्यापासून ते रुक्ष, वाळवंटी प्रदेशासारखी बनेल. तिचे “व्यापारी,” तसेच कोट्याधीश लोकांनी तिच्या धर्माचा स्वतःच्या लाभास्तव किंवा आडपडदा होण्यासाठी उपयोग करून घेतला आणि धार्मिक पुढाऱ्‍यांना तर तिच्यासोबत प्रकाशझोतात असणे खूपच लाभदायक वाटले. पण त्या व्यापाऱ्‍यांना आता मोठी बाबेल पुढे सोबतीण म्हणून असणार नाही. ती पुढे पृथ्वीवरील राष्ट्रांना तिच्या गूढ धार्मिक आचारांद्वारे फसवू शकणार नाही.

भयानक रक्‍तदोष

१४. यहोवाच्या कडक न्यायदंडाबद्दलचे कोणते कारण तो बलवान देवदूत देतो आणि येशूने देखील पृथ्वीवर असताना अशाचप्रकारे काय म्हटले?

१४ मोठ्या बाबेलवर एवढी घोर दंडाज्ञा यहोवा का बजावत आहे त्याचे कारण तो बलवान दूत समारोपाला सांगतो. तो म्हणतो: “तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त सापडले.” (प्रकटीकरण १८:२४) येशूने पृथ्वीवर असताना यरुशलेमेतील धार्मिक पुढाऱ्‍यांना त्याने म्हटले होते की, ते “नीतिमान्‌ हाबेल ह्‍याच्या रक्‍तापासून” पुढे “जे सर्व नीतिमान्‌ लोकांचे रक्‍त पृथ्वीवर पाडण्यात आले” त्याबद्दल जबाबदार होते. या कारणामुळे त्या दुष्ट पिढीचा सा. यु. ७० मध्ये नाश झाला. (मत्तय २३:३५-३८) आज, धर्मपुढाऱ्‍यांची दुसरी एक पिढी, देवाच्या सेवकांचा छळ करून ठार मारण्यात रक्‍तदोषी आहे.

१५. नात्सी जर्मनीतील कॅथलिक चर्च कोणत्या दोन प्रकाराने रक्‍तदोषी होते?

१५ कॅथलिक चर्च आणि नात्सी जर्मनी (इंग्रजी) या पुस्तकात गुंटर लेवी लिहितात: “बावारिया येथे एप्रिल १३ [१९३३] मध्ये यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी घालण्यात आली, तेव्हा या बंदी आणलेल्या धर्माचा कोणी सभासद प्रचार करीत आहे का हे कळविण्यासाठी शिक्षण व धर्म खात्याने दिलेली नेमणूक चर्चने पुढे होऊन स्वीकारली.” अशाप्रकारे हजारो साक्षीदारांना राजकीय बंद्यांच्या छावण्यात डांबण्याच्या जबाबदारीत आणि शेकडो साक्षीदारांची हत्या करून आपले हात त्यांच्या जीवनी रक्‍ताने डागळण्यात सहभागी होण्याचा दोष कॅथलिक चर्चवर येतो. व्हिलेम कुसरो यासारख्या तरुण साक्षीदारांनी, ते गोळ्या झाडणाऱ्‍या पथकाच्या पुढे जाऊन मरणास धैर्याने सामोरे जाऊ शकतात हे दाखवले तेव्हा हिटलरने हे ठरवले की, जाणीवपूर्वक नकार दर्शवणाऱ्‍यांसाठी गोळ्या झाडणारे पथक ही सौम्य स्वरुपाची शिक्षा वाटते म्हणून त्याने विल्यमचा २० वर्षांचा भाऊ वोल्फगँग याचा शिरच्छेद करून ठार मारले. याचवेळी कॅथलिक चर्च तरुण जर्मन कॅथलिकांना आपल्या भूमीसाठी सैन्यात दाखल होऊन मरावे म्हणून उत्तेजन देत होते. अशाप्रकारे चर्चचा रक्‍तदोष स्पष्टच दिसत आहे!

१६, १७. (अ) मोठ्या बाबेलवर कसल्या रक्‍तपाताचा दोष आहे आणि नात्सी कत्तलीमध्ये ज्या यहूद्यांची हत्या घडली त्याबद्दल व्हॅटिकन कसे रक्‍तदोषी बनले? (ब) या एकट्याच शतकात जी शेकडो युद्धे झाली व त्यात ज्या लाखो लोकांची हत्या झाली त्याबद्दल खोट्या धर्मावर ठपका ठेवण्याचे एक कारण कोणते आहे?

१६ तथापि, भविष्यवाद असेही म्हणतो की, “पृथ्वीवरील वधलेल्या सर्वांचे” रक्‍त मोठ्या बाबेलच्या माथ्यावर लादले पाहिजे. हे आधुनिक काळात खरे घडले आहे. उदाहरणार्थ, कॅथलिकांच्या कारस्थानामुळे हिटलरला जर्मनीमध्ये सत्तेवर येण्यास मदत मिळाली असली, तरी नात्सींनी केलेल्या कत्तलीत जी साठ लाख यहूद्यांची हत्या घडली त्या भयंकर रक्‍तपाताचा दोष व्हॅटिकनवर देखील येतो. तसेच या २० व्या शतकामध्येच शेकडो युद्धात दहा कोटींपेक्षा अधिक लोकांना ठार व्हावे लागले. याबद्दल खोट्या धर्माला ठपका द्यावा का? होय, दोन मार्गाने.

१७ एक गोष्ट ही की, पुष्कळ युद्धांचा संबंध धार्मिक मतभेदांशी आहे. उदाहरणार्थ, भारतात १९४६-४८ च्या दरम्यान हिंदू व मुस्लीमात जो हिंसाचार घडला तो धार्मिक गोष्टींमुळे प्रवृत्त झाला होता. तेव्हा शेकडो हजारोंना बळी पडावे लागले. १९८० च्या दशकात पेटलेले इराक व इराण युद्ध पंथीय मतभेदामुळे घडले व यातही शेकडो हजारोंना बळी पडावे लागले. उत्तर आयर्लंडमध्ये कॅथलिक व प्रॉटेस्टंट लोकात झालेल्या हिंसाचारामुळे हजारो मृत्यू पावले. लेबननमध्ये सतत होत असलेला हिंसाचार धार्मिक कारणामुळे आहे. या क्षेत्राबद्दल परीक्षण करताना स्तंभलेखक सी. एल. सुल्झबर्गर यांनी १९७६ मध्ये असे म्हटले: “जगभरात होत असलेली अर्धी किंवा त्यापेक्षा अधिक युद्धे ही एकतर उघड धार्मिक संघर्ष आहेत किंवा त्यात धार्मिक मतभेदांचा समावेश आहे हे एक भयाण सत्य आहे.” होय, हेच मोठ्या बाबेलच्या प्रक्षुब्ध इतिहासात घडत आले आहे.

१८. जागतिक धर्म कोणत्या दुसऱ्‍या मार्गाने रक्‍तदोषी आहेत?

१८ आता दुसरा मार्ग कोणता? यहोवाच्या दृष्टीने जगातील धर्म रक्‍तदोषी असण्याचे कारण, यांनी आपल्या अनुयायांना, यहोवा त्याच्या सेवकांबद्दल अपेक्षून असणाऱ्‍या गरजा पटतील अशा पद्धतीने शिकवल्या नाहीत हे आहे. देवाच्या खऱ्‍या भक्‍तांनी येशू ख्रिस्ताचे अनुकरण केले पाहिजे व आपला राष्ट्रीय उगम कोणताही असला तरी इतरांबाबतीत प्रीतीच दाखवली पाहिजे याबद्दल लोकांना त्यांनी खात्रीपूर्वक शिक्षण दिले नाही. (मीखा ४:३, ५; योहान १३:३४, ३५; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; १ योहान ३:१०-१२) मोठी बाबेल बनलेल्या धर्मांनी या गोष्टी शिकवल्या नसल्यामुळे, त्यांना पाठबळ देणाऱ्‍यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय युद्धाच्या वावटळीत लोटू दिले. हे, या शतकाच्या अर्ध्याला जी दोन जागतिक युद्धे घडली व जी ख्रिस्ती धर्मजगतात सुरु झाली व ज्यांचा परिणाम सहधर्मीयांची कत्तल करण्यात घडला त्यात केवढ्या प्रकर्षाने दिसले! ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या सर्वांनी जर बायबलमधील तत्त्वांना कवटाळले असते, तर ती युद्धे केव्हाही उद्‌भवली नसती.

१९. मोठ्या बाबेलवर कोणता भयानक रक्‍तदोष आहे?

१९ या सर्व रक्‍तपाताचा दोष यहोवा मोठ्या बाबेलच्या माथी लादतो. धार्मिक पुरोहितांनी व खासपणे ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्गाने लोकांना बायबलचे सत्य शिकवले असते तर एवढा प्रचंड रक्‍तपात कधीच घडला नसता. या कारणामुळेच मोठी कलावंतीण व खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य असणाऱ्‍या मोठ्या बाबेलने यहोवाला केवळ “संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे” रक्‍त याबद्दल नव्हे तर “पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे” रक्‍त याबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाब दिलाच पाहिजे. मोठ्या बाबेलवर भयानक रक्‍तदोष आहे. तिचा अंतिम नाश घडेल तेव्हा केवढी मुक्‍तता मिळेल!

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७१ पानांवरील चौकट]

हातमिळवणीची किंमत

गुंटर लेवी आपल्या कॅथलिक चर्च आणि नात्सी जर्मनी (इंग्रजी) या पुस्तकात लिहितात: “जर्मन कॅथलिकांनी आधीपासूनच नात्सी सत्तेला विरोध करण्याचे धोरण स्वीकारले असते तर जगाचा इतिहास वेगळ्या पद्धतीने घडला गेला असता. हा लढा हिटलरला पराजित करण्यात व त्याच्या कित्येक गुन्हेगारींना थोपवण्यात अपयशी झाला असता, तरी या दृष्टीने निदान चर्चची नैतिक प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. अशाप्रकारच्या प्रतिकारामुळे मानवी किंमत निःसंशये मोठी झाली असती तरी ही यज्ञार्पणे चांगल्या कारणास्तव वाहिली गेली असती. स्वतःची आघाडी अनिश्‍चित असल्यामुळे हिटलरने युद्धात उतरण्याचा कदाचित निश्‍चय केला नसता व यामुळे अक्षरशः लाखो जीव वाचले असते. . . . हिटलरच्या राजकीय बंद्यांच्या छावण्यात नात्सी विरोधी हजारो जर्मन लोकांना जाच देऊन मृत्यू घडवला गेला, जेव्हा पोलिश बुद्धीवादी वर्गाची हत्या झाली, जेव्हा हजारो रशियनांना मानवांपेक्षा खालच्या योनीतले स्लेविक अशी वागणूक देऊन ठार मारले आणि ‘आर्य-नसलेल्या’ जेव्हा ६०,००,००० लोकांची हत्या घडवण्यात आली तेव्हा जर्मनीतील कॅथलिक चर्च अधिकाऱ्‍यांनी या हिंसाचारात आपली सहभागी देऊन सत्तेला टेकू दिला. रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च नैतिक शिक्षक व आध्यात्मिक मस्तक, रोमचे पोप याबाबतीत स्तब्ध राहिले.”—पृष्ठे ३२०, ३४१.

[२६८ पानांवरील चित्रे]

“अरेरे!” असे राजे म्हणतात

[२६८ पानांवरील चित्रे]

“अरेरे!” असे व्यापारी म्हणतात