व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोठी नगरी उजाड झाली

मोठी नगरी उजाड झाली

अध्याय ३६

मोठी नगरी उजाड झाली

दृष्टांत १२​—प्रकटीकरण १८:१–१९:१०

विषय: मोठ्या बाबेलचे पतन व नाश; कोकऱ्‍याच्या लग्नाची घोषणा केली जाते

पूर्णतेची वेळ: १९१९ पासून ते मोठे संकट होऊन जाईपर्यंत

१. मोठ्या संकटाची सुरवात कशाने चिन्हीत होईल?

 अचानक, धक्कादायक, विध्वंसक—अशा प्रकारात मोठ्या बाबेलचा मृत्यू घडेल! ती सबंध इतिहासातील अत्यंत विध्वंसक घटना असेल जी “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट” सुरु झाल्याचे चिन्हीत करील.—मत्तय २४:२१.

२. राजकीय साम्राज्ये आली व गेली, तरी कोणत्या प्रकारचे साम्राज्य टिकून राहिले?

खोट्या धर्माने आपले वास्तव्य बऱ्‍याच काळ राखले आहे. ज्याने यहोवास विरोध दर्शविला आणि लोकांना बाबेलचा बुरुज बांधावयास लावला त्या रक्‍तपिपासू निम्रोदच्या काळापासून कोठेही खंड न पडता या खोट्या धर्माचे अस्तित्व राहिले आहे. बाबेलच्या बुरुजापाशी असलेल्या बंडखोरांच्या भाषेत यहोवाने घोटाळा केला आणि सर्वांना पृथ्वीवर पांगवले तेव्हा बाबेलचा खोटा धर्मही त्यांच्याबरोबर गेला. (उत्पत्ती १०:८-१०; ११:४-९) त्यानंतर, राजकीय साम्राज्ये आली व गेली, पण बाबेली धर्म मात्र टिकून राहिला. त्याने वेगवेगळे आकार व स्वरुप घेतले व त्याचे मोठी बाबेल हे भाकीत केलेले खोट्या धर्माचे साम्राज्य तयार झाले. त्याचा प्रमुख भाग ख्रिस्ती धर्मजगत आहे व तो आरंभीचे बाबेलचे शिक्षण व धर्मत्यागी “ख्रिस्ती” तत्त्वे यांच्या संमिश्रणातून उद्‌भवला. मोठ्या बाबेलचा प्रदीर्घ इतिहास असल्यामुळे, ती नष्ट होईल असे पुष्कळांना विश्‍वास ठेवायला जड वाटते.

३. खोट्या धर्माच्या विनाशाबद्दल प्रकटीकरण कशी पुष्टी देते?

यामुळेच, अगदी योग्य कारणास्तव प्रकटीकरणाचे पुस्तक मोठ्या बाबेलच्या पतनाचा व तिचा ओघाओघाने होणारा उजाडपणा याबद्दल दोन विस्तृत घटना कळवून तिचा समूळ नाश जाहीर करते. आपण तिला आधीच ‘मोठ्या कलावंतिणीच्या’ रुपात पाहिले असून तिच्या गतकालीन राजकीय वर्तुळातील प्रियकरांद्वारे सरतेशेवटी तिला कसे उद्‌ध्वस्त केले जाते ते बघितले आहे. (प्रकटीकरण १७:१, १५, १६) आता, आणखी एका दृश्‍याद्वारे आपण तिला एका नगरीच्या रुपात, प्राचीन बाबेलच्या धार्मिक प्रतिनमुन्यामध्ये पाहणार आहोत.

मोठी बाबेल अडखळून पडते

४. (अ) योहान पुढचे कोणते दृश्‍य बघतो? (ब) त्या देवदूताची ओळख आपण कशी काढू शकतो आणि त्यानेच मोठ्या बाबेलच्या पतनाची घोषणा करावी हे का योग्य आहे?

योहान आपला अहवाल पुढे सांगतो व म्हणतो: “त्यानंतर मी दुसऱ्‍या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला: ‘पडली, मोठी बाबेल पडली.’” (प्रकटीकरण १८:१, २अ) स्वर्गीय दूतांकरवीची अशाप्रकारातील घोषणा योहान दुसऱ्‍यांदा ऐकतो. (प्रकटीकरण १४:८ पहा.) तथापि या खेपेला त्याची अभूतपूर्वता स्वर्गीय दूताच्या भव्य तेजाने अधिक प्रभावित होते, कारण त्याचे तेज सबंध पृथ्वी उजाळते! हा कोण असावा? काही शतकांआधी यहेज्केल संदेष्टा एका स्वर्गीय दृष्टांताबद्दल कळवताना म्हणाला की, “त्याच्या [यहोवाच्या] वैभवाने पृथ्वी प्रकाशित झाली.” (यहेज्केल ४३:२) यास्तव, यहोवाच्या वैभवाप्रमाणेच चकाकणारा एकमेव दूत हा केवळ प्रभु येशू असला पाहिजे, कारण तो “[देवाच्या] गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप” आहे. (इब्रीयांस १:३) १९१४ मध्ये “मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने” आला आणि तेव्हापासून येशू स्वर्गात ‘आपल्या वैभवशाली राजासनावर बसून’ यहोवाचा सहराजा व न्यायाधीश म्हणून या पृथ्वीवर आपला अधिकार चालवत आहे. या कारणामुळे, मोठ्या बाबेलच्या पतनाबद्दल त्यानेच घोषणा करावी हे योग्य आहे.—मत्तय २५:३१, ३२.

५. (अ) मोठ्या बाबेलचे पतन जाहीर करण्यासाठी तो देवदूत कोणाचा उपयोग करतो? (ब) ‘देवाच्या घरचे’ असल्याचा दावा करणाऱ्‍यांचा न्याय सुरु झाला तेव्हा ख्रिस्ती धर्मजगतावर काय गुदरले?

मोठा अधिकार असलेला हा देवदूत ही आश्‍चर्यकारक वार्ता मानवजातीला घोषित करण्यासाठी कोणाचा वापर करतो? ते तर, तिच्या पतनामुळे ज्यांना मुक्‍तता लाभली तेच लोक म्हणजे पृथ्वीवर अवशिष्ट उरलेले अभिषिक्‍त जन, योहान वर्ग होत. यांना १९१४ पासून १९१८ पर्यंत मोठ्या बाबेलकडून खूप त्रास सहन करावा लागला; पण १९१८ मध्ये प्रभु यहोवा आपल्या ‘[अब्राहामासोबत केलेल्या] कराराच्या निरोप्यासह,’ येशू ख्रिस्तासह येऊन ख्रिस्ती आहोत असा दावा करणाऱ्‍यांची, ‘देवाच्या घराची’ तपासणी करू लागला. यावेळी धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताची चौकशी केली गेली. (मलाखी ३:१; १ पेत्र ४:१७) त्याने पहिल्या महायुद्धात घडवून आणलेला प्रचंड रक्‍तपात; यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांचा छळ करण्यात केलेली भागीदारी आणि त्याची बाबेली आचारसंहिता या गोष्टी त्याला न्यायकाळात काही मदत करू शकल्या नाहीत; तसेच मोठ्या बाबेलच्या इतर कोणत्याही भागाला देवाची कृपापसंती नाही.—पडताळा यशया १३:१-९.

६. मोठी बाबेल १९१९ मध्ये पडली असे का म्हणता येऊ शकते?

अशाप्रकारे, १९१९ पर्यंत मोठी बाबेल पडली व तिने देवाच्या लोकांच्या मुक्‍ततेसाठी व आध्यात्मिक समृद्धीच्या पुनर्वसनासाठी जणू एका दिवसात मार्ग मोकळा केला. (यशया ६६:८) त्या वर्षापर्यंत, यहोवा देव व येशू ख्रिस्त या थोर दारयावेश व थोर कोरेश यांनी अशा गोष्टी घडवून आणल्या की ज्यामुळे खोट्या धर्माला यहोवाच्या लोकांना अधिक जखडवून ठेवता आले नाही. त्याला त्यांना यहोवाची सेवा करण्यास तसेच कलावंतीणीसारख्या असलेल्या मोठ्या बाबेलला नाशपात्र ठरविले असून यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन होण्याचे समीप आले आहे हे जे ऐकू शकतील ते कळवण्यापासून थोपवून धरता आले नाही.—यशया ४५:१-४; दानीएल ५:३०, ३१.

७. (अ) मोठ्या बाबेलचा १९१९ मध्ये जरी नाश झाला नाही, तरी यहोवाने तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले? (ब) मोठी बाबेल १९१९ मध्ये पडली तेव्हा त्याचा यहोवाच्या लोकांना कोणता परिणाम मिळाला?

हे खरे की, सा. यु. पू. ५३९ मध्ये जसे प्राचीन बाबेल शहर कोरेश व पारसाच्या साम्राज्यापुढे पडले तेव्हा विनाश पावले तसे मोठ्या बाबेलचा १९१९ मध्ये नाश झाला नाही. पण यहोवाच्या दृष्टीने तर ती संघटना पडलीच होती. तिचा न्याय होऊन तिला धिक्कारण्यात आले व ती आता दंड मिळण्याची वाट पाहून आहे, त्यामुळे खोट्या धर्माला यहोवाच्या लोकांना बंदिस्त करून ठेवता आले नाही. (पडताळा लूक ९:५९, ६०.) त्या लोकांची धन्याचा विश्‍वासू व बुद्धिमान दास म्हणून सेवा करण्यासाठी आणि यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न देण्यासाठी सुटका झाली. त्यांना ‘शाब्बासकी’ मिळाली आणि पुन्हा नव्या जोमाने यहोवाच्या कामात मग्न होण्याची नियुक्‍ती लाभली.—मत्तय २४:४५-४७; २५:२१, २३; प्रेषितांची कृत्ये १:८.

८. यशया २१:८, ९ मधील पहारेकरी कोणती घटना घोषित करतो आणि त्या पहारेकऱ्‍याची पडछाया आज कोण आहे?

काही हजारो वर्षांआधी यहोवाने इतर संदेष्ट्यांना या लक्षणीय घटनेबद्दलची भविष्यवाणी करण्यासाठी उपयोगात आणले. यशयाने एका पहारेकऱ्‍याबद्दल म्हटले, जो “सिंहनाद करून म्हणाला: ‘प्रभू [यहोवा, NW] मी दिवसा [टेहळणीच्या, NW] बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढितो.’” मग, या पहारेकऱ्‍याने कोणती घटना न्याहाळली आणि ती सिंहनाद करून घोषित केली? ही: “बाबेल पडला हो पडला! त्याच्या देवांच्या सर्व मूर्ति [यहोवाने] जमिनीवर आपटून फोडिल्या.” (यशया २१:८, ९) हा पहारेकरी संपूर्णपणे जागा असलेल्या आजच्या योहान वर्गाची योग्य पडछाया आहे; तो वर्ग, वॉचटावर नियतकालिक आणि इतर ईश्‍वरशासित प्रकाशनांद्वारे बाबेल पडली असल्याची घोषणा सर्वांना जाहीर करीत आहे.

मोठ्या बाबेलचे पतन

९, १०. (अ) पहिल्या जागतिक महायुद्धापासून बाबेली धर्माने कोणते गडगडणे अनुभवले आहे? (ब) मोठ्या बाबेलच्या पतित स्थितीचे वर्णन बलवान देवदूत कसे करतो?

प्राचीन बाबेलचे सा. यु. पू. ५३९ मध्ये झालेले पतन हे दीर्घ पल्ल्याचे पडणे होते, जे सरतेशेवटी त्याच्या उजाड होण्यात परिणामित झाले. याचप्रमाणे, पहिल्या जागतिक महायुद्धापासून बाबेली धर्माचे वर्चस्व जगव्याप्त रुपात अभूतपूर्व मार्गाने गडगडले. जपानमध्ये दुसऱ्‍या जागतिक महायुद्धानंतर शिंतो सम्राटाची भक्‍ती नियमबाह्‍य ठरवली गेली. चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार सर्व धर्मांच्या नियुक्त्या व कार्यपद्धती हाताळते. उत्तर युरोपातील प्रॉटेस्टंट क्षेत्रात बहुतेक लोक धर्माबद्दल उदासीन झाले आहेत. तसेच रोमन कॅथलिक चर्च अलिकडेच मतभिन्‍नत्वामुळे व अंतर्गत दुफळीमुळे त्याच्या जगव्याप्त पसरलेल्या साम्राज्यात कमकुवत बनले आहे.—पडताळा मार्क ३:२४-२६.

१० ही सर्व लक्षणे, मोठ्या बाबेलवर होणाऱ्‍या लष्करी हल्ल्याच्या तयारीत ‘फरात नदीच्या सुकण्याचा’ निःसंशये भाग आहेत. हे ‘सुकणे’ होत आहे याचे प्रतिबिंब पोपनी ऑक्टोबर १९८६ मध्ये केलेल्या घोषणेत दिसले की, चर्चला पुष्कळ तोटा आल्यामुळे “पुनः भिक्षेवरच उपजीविका केली पाहिजे.” (प्रकटीकरण १६:१२) मोठी बाबेल ही आध्यात्मिकरित्या ओसाड होत असल्याचे खासपणे १९१९ पासून लोकांच्या दृष्टीमध्ये भरत आहे. हे बलवान देवदूताने येथे घोषित केल्याप्रमाणे आहे: “ती भुतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.” (प्रकटीकरण १८:२ब) लवकरच तिची दशा या २० व्या शतकातील इराकमध्ये बाबेलचे जे अवशेष दिसत आहेत त्यासारखी खरोखरी होईल.—तसेच यिर्मया ५०:२५-२८ पहा.

११. मोठी बाबेल ही “भुतांची वस्ती,” व “सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय” कशी झाली आहे?

११ येथे आलेला “भुतांची” हा शब्द, पडलेल्या बाबेलच्या वर्णनात यशयाने लिहिलेला शब्द “बोकडाच्या रूपाची पिशाच्चे” (सेʽई․रीमʹ) याचे प्रतिबिंब असण्याची शक्यता आहे: “तेथे वनपशु बसतील; त्यांच्या घरात घुबडे भरतील; शहामृग तेथे राहतील; बोकडाच्या रुपाची पिशाच्चे तेथे नाचतील.” (यशया १३:२१) हे खरोखरीच्या भूतांना कदाचित अनुलक्षून नसेल तर वाळवंटातील भरभरीत केसांच्या प्राण्यांना उद्देशून असेल; ज्यांना बघताना ती जणू भूतेच असल्याचा भास होतो. मोठ्या बाबेलच्या उद्‌ध्वस्त स्थितीत अशा जनावरांचा लाक्षणिक रुपाने असणारा वास, तसेच रेंगाळलेली, अशुद्ध हवा (अशुद्ध आत्मा) आणि अशुद्ध पक्षी या गोष्टी ती आध्यात्मिक रितीने मृत झाली असल्याचे दाखवते. ती मानवजातीला जीवनाचे कसलेही भवितव्य देऊ शकत नाहीत.—पडताळा इफिसकर २:१, २.

१२. यिर्मयाने ५० व्या अध्यायात जो भविष्यवाद दिलेला आहे त्याबरोबर मोठ्या बाबेलची स्थिती कशी जुळते?

१२ तिची स्थिती यिर्मयाच्या भविष्यवादासोबत देखील जुळणारी आहे: “परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो: ‘खास्द्यांवर तरवार उपसली आहे आणि ती बाबेलाचे रहिवासी, तिचे सरदार व तिचे ज्ञानी यांजवर उपसली आहे. . . . त्याच्या जलप्रवाहांस झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातल्या लोकांस मूर्तींचे वेड लागले आहे. ह्‍यास्तव वनपशु रानकुत्र्यांसह तेथे राहतील, शहामृग तेथे राहतील; तेथे कदाकाळी वस्ती होणार नाही; पिढ्यानपिढ्या तेथे कोणी वस्ती करणार नाही.” मूर्तीपूजा तसेच रटाळ प्रार्थना या गोष्टी, देवाने सदोम व गमोरा यांना उलटविल्याप्रमाणे मिळणाऱ्‍या परिणामापासून मोठ्या बाबेलला वाचवू शकत नाही.—यिर्मया ५०:३५-४०.

वासना उफाळणारा द्राक्षारस

१३. (अ) बलवान देवदूत मोठ्या बाबेलच्या व्यापक शिंदळकीकडे कसे लक्ष वेधवतो? (ब) प्राचीन बाबेलात कोणती अनैतिकता अधिक प्रमाणात माजली होती, जी आज मोठ्या बाबेलात देखील दिसते?

१३ मोठ्या बाबेलने कलावंतीणीची कृत्ये ज्या विस्तारीत प्रमाणात आचरली आहेत, त्याकडे बलवान देवदूत लक्ष वेधवतो व म्हणतो: “कारण तिच्या वासना उफाळणाऱ्‍या जारकर्माच्या द्राक्षारसाला * सर्व राष्ट्रे बळी पडली आहेत; पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान्‌ झाले.” (प्रकटीकरण १८:३, NW)  तिने आपले अशुद्ध धार्मिक मार्ग मानवजातीच्या सर्व राष्ट्रांवर बिंबवले आहेत. हेल्लेणी इतिहासकार हेरोडोटसच्या मते प्राचीन बाबेलात मंदिरातील उपासनेसाठी प्रत्येक कुमारीला आपल्या कौमार्याला नीच कामासाठी लावावे लागत होते. बंडखोर स्वरुपाच्या लैंगिक भ्रष्टतेची चित्रे आजतागायत कंपुचियामध्ये अंगकोर वॅट येथील युद्धाने हानी झालेले कोरीव काम तसेच भारतातील खजुराओ येथील मंदिरात बघावयास मिळतात, जेथे विष्णू या हिंदू देवासभोवती ओंगळ अशी प्रणयरम्य दृश्‍ये चितारली आहेत. अमेरिकेत १९८७ मध्ये व नंतर पुन्हा १९८८ मध्ये जगाला दूरदर्शनवरील सुवार्तिकांनी दाखवलेले हलवून सोडणारे अनैतिकतेचे प्रदर्शन तसेच धर्माच्या पुढाऱ्‍यांद्वारे आचरले जाणारे व्यापक पुरुषगमन या गोष्टी ख्रिस्ती धर्मजगत देखील खऱ्‍या जारकर्माला कशी धक्कादायक रितीने अनुमती देते त्याचा पुरावा सादर करते. तरीपण सर्व राष्ट्रे ही सध्याच्या २० व्या शतकात आणखी एका गंभीर स्वरुपाच्या जारकर्मात पडली आहेत.

१४-१६. (अ) फॅसिस्ट इटलीत कोणते धर्म-राजकीय निषिद्ध आध्यात्मिक नाते बळावले? (ब) इटलीने ॲबेसिनियावर हल्ला केला, तेव्हा रोमन कॅथलिक चर्चच्या बिशपांनी कोणते वक्‍तव्य केले?

१४ ज्या धार्मिक-राजकीय संबंधाने हिटलरला नात्सी जर्मनीच्या सत्तेवर आणून सोडले त्याबद्दलची उजळणी आपण आधी केलीच आहे. धर्माने प्रापंचिक घडामोडीत जी ढवळाढवळ केली तिच्यामुळे इतर राष्ट्रांना देखील त्रास सहन करावा लागला. उदाहरणार्थ: फॅसिस्टांच्या इटलीत फेब्रुवारी ११, १९२९ रोजी लेटरन ट्रिटी नावाचा तह मुसोलिनी व कार्डिनल गॅस्पारी यांनी सह्‍या करून संमत केला व याद्वारे व्हॅटिकन शहराला एक सार्वभौम राज्य बनवण्यात आले. पोप पायस अकरावे यांनी दावा केला की, त्यांनी “इटलीला देवाकडे सोपवले व देवाने इटलीला परत केले.” हे खरे होते का? सहा वर्षानंतर जे काही घडले त्याचा विचार करा. ऑक्टोबर ३, १९३५ रोजी इटलीने अबेसिनियावर स्वारी केली व म्हटले की, “तो गुलामगिरीची प्रथा आचरणारा रानटी देश आहे.” पण वस्तुतः कोण रानटी होते? मुसोलिनीने जो रानटीपणा दाखवला होता त्याचा कॅथलिक चर्चने धिक्कार केला होता का? पोपने दुहेरी अर्थाची विधाने केली तरी त्यांच्या बिशपांनी त्यांच्या इटली ‘देशाच्या’ शस्त्रबळाला आशीर्वाद देण्यात अगदीच बोलकेपणा दाखवला. हुकूमशाहीच्या युगातील व्हॅटिकन (इंग्रजी) या पुस्तकात अँथनी होड्‌स्‌ कळवतात:

१५ “ऑक्टोबर १९ [१९३५] च्या आपल्या पाळकीय पत्रात युडाईन [इटली] च्या बिशपांनी लिहिले: ‘या प्रकरणात कोण बरोबर व कोण चूक हे आम्ही सांगणे समयसूचक व योग्यही नाही. इटलीत राहणारे तसेच ख्रिस्ती या नात्याचे आमचे कर्तव्य आमच्या सैन्यबळाच्या यशस्वीयतेला हातभार लावणे हे आहे.’ पदुआ येथील बिशपांनी २१ ऑक्टोबर रोजी लिहिले: ‘आपण ज्या कठीण घटकेतून जात आहोत त्यात आम्ही आपणाला आमच्या मुत्सद्दी तसेच सैन्यबळावर विश्‍वास ठेवण्यास सांगतो.’ २४ ऑक्टोबर रोजी क्रमोना येथील बिशपाने पलटणीच्या कित्येक ध्वजांना पवित्र केले आणि म्हटले: ‘देवाचा आशीर्वाद आफ्रिकेत लढणाऱ्‍या या सैनिकांवर असो, ते नव्या व सुपीक जमिनीवर इटालियन कुळासाठी आपला विजय मिळवतील व त्याद्वारे त्याला रोमी व ख्रिस्ती संस्कृतीमध्ये आणतील. इटली सबंध जगापुढे अनुभवी व विश्‍वासू सल्लागार असा पुन्हा एकदा झळको.’”

१६ रोमन कॅथलिक पाळकांच्या आशीर्वादाने ॲबेसिनियाचा अपहार झाला. मग, यापैकी कोणालाही स्वतःविषयी पौलाप्रमाणे “मी सर्वांच्या रक्‍ताविषयी निर्दोषी आहे,” असे कोणत्याही बाबतीत म्हणता येऊ शकत होते का?—प्रेषितांची कृत्ये २०:२६.

१७. पाळकांनी “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ” करण्यात अपयश दाखवले म्हणून स्पेनला कोणता त्रास झाला?

१७ जर्मनी, इटली आणि ॲबेसिनिया यांच्यासोबत मोठ्या बाबेलच्या जारकर्माचा बळी ठरलेल्या आणखी एका देशाचा, स्पेनचा, क्रमांक जोडा. त्या देशात १९३६-३९ मध्ये भडकलेले मुलकी युद्ध हे काही अंशी लोकशाही सरकारांनी रोमन कॅथलिक चर्चचे मोठे प्राबल्य कमी करण्यासाठी जी पावले उचलली त्याच्या चकमकीने उडाले. युद्ध सुरु झाले तेव्हा क्रांतीकारी शक्‍तीचा कॅथलिक फॅसिस्ट नेता, फ्रँको, याने स्वतःला “पवित्र धर्मयुद्धातील ख्रिस्ती सर सेनापती” असे संबोधले; ही पदवी त्याने नंतर काढून टाकली. या लढ्यात हजारो स्पॅनिश लोक ठार झाले. एका पुराणमतवादी अंदाजाप्रमाणे फ्रँकोच्या नॅशनलिस्ट सदस्यांनी पॉप्युलर फ्रंट सदस्यांचे ४०,००० बळी घेतले, तर पॉप्युलर फ्रंट सदस्यांनी ८,००० पाद्रीवर्गातील साधु, याजक, जोगिणी व नवशिक्या लोकांना ठार केले. मुलकी युद्धात ही अशाप्रकारची दुर्घटना व भयंकर स्थिती घडली. ही गोष्ट, येशूचे शब्द ऐकण्यात केवढा सुज्ञपणा आहे त्याची प्रचिती देतात: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२) या प्रचंड रक्‍तपातामध्ये ख्रिस्ती धर्मजगताने समाविष्ट होणे ही किती किळसवाणी गोष्ट आहे! त्याच्या पाळकांनी “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ” बनवण्यात पूर्ण रूपाचे अपयश खरोखरी दाखवले आहे!—यशया २:४.

व्यापारी

१८. “पृथ्वीवरील व्यापारी” कोण आहेत?

१८ हे “पृथ्वीवरील व्यापारी” कोण आहेत? आज आपण यांना व्यापार करणारे, बडे व्यापारी आणि मोठ्या उद्योगधंद्यात उलाढाली करणारे लोक असे म्हणतो यात काही संशय नाही. अर्थात, कायदेशीर व्यापार करणे हे गैर आहे असे आमचे म्हणणे नाही. बायबल व्यापाऱ्‍यांना सुज्ञ सल्ला देते व त्यांना अप्रामाणिकता, लोभ इत्यादि गोष्टी टाळण्याबद्दल सांगते. (नीतीसूत्रे ११:१; जखऱ्‍या ७:९, १०; याकोब ५:१-५) “स्वसंतोषासहित असलेली ईश्‍वरी भक्‍ती” हा मोठा लाभ आहे. (१ तीमथ्य ६:६, १७-१९, NW) तथापि, सैतानी जग धार्मिक तत्त्वांना अनुसरत नाही. भ्रष्टाचार वाढलेला आहे. तो धर्म, राजकारण व मोठा व्यापार यातही आढळतो. सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकडून पैशांचा अपहार तसेच अस्त्रांचा बेकादेशीर व्यापार करणाऱ्‍यांबद्दल वृत्तपत्रातून अधूनमधून बातम्या झळकत असतात.

१९. जगाच्या आर्थिक प्रकरणाची कोणती वस्तुस्थिती पृथ्वीवरील व्यापाऱ्‍यांचा प्रकटीकरणात असंमतीकारक उल्लेख आल्याचे कारण स्पष्ट करते?

१९ अस्त्रांचा आंतरराष्ट्रीय व्यापार दर वर्षी १०,००,००,००,००,००० पेक्षाही अधिक डॉलर्स होत असता जगभर लाखो लोकांना जीवनाच्या आवश्‍यक गोष्टींपासून वंचित राहावे लागते. हे खूपच वाईट आहे. पण शस्त्रे ही जगाच्या आर्थिक गोष्टीचा मूळाधार आहेत असे दिसते. लंडनच्या स्पेक्टेटर नियतकालिकात एप्रिल ११, १९८७ रोजी एका लेखात कळवण्यात आले: “थेट संबंध असणाऱ्‍या उद्योगधंद्याचा आढावा घेतल्यास, अमेरिकेत ४,००,००० तर युरोपात ७,५०,००० व्यवसाय आहेत. पण कुतूहल या अर्थाने बघितल्यास जरी शस्त्रास्त्रे उभारण्याची सामाजिक व आर्थिक भूमिका वाढलेली दिसते तरी व्यावसायिक उत्पादकांना योग्य आधार मिळतो का, हा प्रश्‍न मात्र पार्श्‍वभूमीतच मागे राहतो.” सर्व जगभर व खासपणे संभाव्य शत्रूंना बॉम्ब तसेच इतर शस्त्रास्त्रांचा व्यापार केल्यामुळे मोठा फायदा घडतो. एके दिवशी असेही घडेल की, विकण्यात आलेले बॉम्ब अग्नीनाशाच्या रुपाने या विक्रेत्यांवरच येऊन धडकतील. केवढा हा विरोधाभास! याला शस्त्रास्त्रांच्या कारखान्यांसभोवती अप्रामाणिक मार्गाने पैसा मिळविण्याचे जे कुंपण लागलेले आहे त्याचीही भर यात घाला. एकट्या अमेरिकेत स्पेक्टेटरच्या मते “दर वर्षी पेंटेगॉन गूढपणे ९० कोटी डॉलर्सची शस्त्रास्त्रे व हत्यारे यांना गमावीत आहे.” यामुळे, हे पृथ्वीवरील व्यापारी प्रकटीकरणात अवकृपेच्या छायेत दाखवले आहेत यात काही नवल नाही!

२०. कोणते उदाहरण याची स्पष्टता देते की, धर्माची भ्रष्ट व्यापारी प्रथेत गुंतवणूक आहे?

२० त्या वैभवी दूताने भाकीत केल्याप्रमाणे, धर्म हा या भ्रष्ट व्यापारी आचारसंहितेत खूप खोलवर गुंतलेला आहे. उदाहरणार्थ, १९८२ मध्ये इटलीच्या बँको ॲम्ब्रोसियानोचे पतन व्हॅटिकनच्या प्रवेशामुळेच घडले. हे प्रकरण १९८० च्या दशकापर्यंत रेटत आणले गेले आणि प्रश्‍न हाच होता: सर्व पैसा कोठे गेला? फेब्रुवारी १९८७ मध्ये मिलन न्यायाधिशांनी अमेरिकन आर्चबिशपसहित तीन व्हॅटिकन पुढाऱ्‍यांना लबाड दिवाळखोऱ्‍यांचे हस्तक म्हणून धरपकडीचा आदेश जारी केला. तथापि, व्हॅटिकनने आरोपींना स्वाधीन करण्याची विनंती नाकारली. तेव्हा जुलै १९८७ मध्ये तक्रारीचा गदारोळ होत असता इटलीतील अपीलाच्या उच्च न्यायालयाने ते वॉरंट, व्हॅटिकन आणि इटलीचे सरकार यांजमध्ये जो जुना तह झाला होता त्याच्या आधारावर निकामी ठरवण्यात येत आहे असा निर्णय जाहीर केला.

२१. येशूने त्याच्या काळी प्रश्‍नार्थक असणाऱ्‍या कसल्याही व्यापारासोबत आपले संबंध राखले नव्हते हे आपल्याला कसे कळते; पण आज आपल्याला बाबेली धर्माबद्दल काय बघायला मिळते?

२१ येशूच्या काळी जी प्रश्‍नार्थक व्यापारपद्धत होती तिजसोबत त्याने आपला कोणत्याही प्रकारचा संबंध राखला होता का? नाही. त्याच्याकडे जमीनजुमला असा काहीच नव्हता, कारण त्याला “डोके टेकावयास ठिकाण” नव्हते. एका श्रीमंत तरुण सरदाराला येशूने असा सल्ला दिला: “तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.” तो चांगला सल्ला होता, कारण त्यामुळे त्याला सर्व व्यापारी चिंतांपासून सुटका मिळाली असती. (लूक ९:५८; १८:२२) उलटपक्षी, बाबेलोनी धर्माने मोठ्या व्यापारी संस्थांसोबत अगदी निरस स्वरुपाचे संबंध राखले आहेत. उदाहरणार्थ, १९८७ मध्ये ॲल्बनी टाईम्स युनियनने कळवले की, फ्लॉरिडातील मियामीच्या कॅथलिक आर्चडायासिसच्या आर्थिक व्यवस्थापकाने, अण्वस्त्रे, अश्‍लील चित्रपट आणि सिगारेट बनविणाऱ्‍या औद्योगिक कंपन्यांमध्ये चर्चने रोखे घेतले असल्याचे कबूल केले.

“माझ्या लोकांनो, . . . तिच्यामधून निघा”

२२. (अ) स्वर्गातून निघालेली एक वाणी काय म्हणते? (ब) देवाच्या लोकांना सा. यु. पूर्व. ५३७ व सा. यु. १९१९ मध्ये कशामुळे आनंद झाला?

२२ योहानाचे पुढचे शब्द आणखी भविष्यवादित नमुन्याची पूर्णता दाखवतात: “मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली: ‘माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा.’” (प्रकटीकरण १८:४) इब्री शास्त्रवचनात प्राचीन बाबेलच्या पतनाबद्दल जे भविष्यवाद नमूद करण्यात आले आहेत त्यात देखील यहोवाने त्याच्या लोकांना केलेली ही आज्ञा समाविष्ट आहे: “बाबेलातून पळून जा.” (यिर्मया ५०:८, १३) याचप्रमाणे, मोठ्या बाबेलचा भावी विध्वंस लक्षात घेऊन देवाच्या लोकांना बचाव प्राप्त करून घेण्याचा आर्जव करण्यात आला आहे. सा. यु. पू. ५३७ मध्ये बाबेलपासून सुटका मिळाल्यामुळे विश्‍वासू इस्राएलांना खूप आनंद झाला. याचप्रमाणे, १९१९ मध्ये बाबेलोनी बंधनातून देवाच्या लोकांची मुक्‍तता झाल्यामुळे त्यांनाही खूप आनंद झाला. (प्रकटीकरण ११:११, १२) त्या काळापासून पुढे लाखोंनी पळून जाण्याची आज्ञा मानली.—पडताळा मत्तय २४:१५, १६.

२३. मोठ्या बाबेलातून पळ काढण्याची जी निकड आहे त्यावर स्वर्गातून आलेली वाणी कसा जोर देते?

२३ जगाच्या धर्मातील आपले सदस्यत्व काढून घेण्याची आणि मोठ्या बाबेलापासून पळ काढून पूर्णपणे वेगळे करण्याची ही इतकी निकडीची वेळ आहे का? होय आहे, कारण देव मोठी बाबेल या जुन्या धार्मिक राक्षसिणीबद्दल जी दृष्टी राखून आहे ती आपण विचारात घेतली पाहिजे. त्याने तिला मोठी कलावंतीण म्हणण्यात फाजील बोलणे केले नव्हते. या कारणास्तव, आता स्वर्गातून आलेली वाणी त्या कसबिणीबद्दल योहानाला पुढील माहिती देते: “कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे आणि तिची अनीति देवाने लक्षात घेतली आहे. जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्मांप्रमाणे तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता. ज्या मानाने तिने आपले गौरव केले व विषयभोग घेतला त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या; कारण ती आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही. ह्‍यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एका दिवशीच येतील, आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा न्यायनिवाडा करणारा प्रभु [यहोवा, NW] देव सामर्थ्यवान्‌ आहे.”—प्रकटीकरण १८:५-८.

२४. (अ) देवाच्या लोकांनी काय टाळता येण्यासाठी मोठ्या बाबेलातून पळ काढण्यास हवा? (ब) मोठ्या बाबेलातून पळ काढण्यात मागे पडणारे तिच्या कोणत्या पापात सहभागी होतात?

२४ किती हे कडक शब्द! खरेच, कृतीची गरज आहे. यिर्मयाने त्याच्या काळातील इस्राएलांना कृती करण्याची निकड या शब्दात सांगितली होती: “बाबेलातून पळून जा, . . . कारण परमेश्‍वराचा [यहोवा, NW] सूड घेण्याचा समय आहे. त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे. माझ्या लोकांनो, तुम्ही त्याच्यातून निघून जा! परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.” (यिर्मया ५१:६, ४५) याचप्रमाणे, स्वर्गातून आलेली वाणी, आज देवाच्या लोकांना मोठ्या बाबेलवर येणाऱ्‍या पीडेपासून आपले रक्षण व्हावे म्हणून पळून जाण्याची सूचना करते. मोठ्या बाबेलसहित या जगावर येणारे यहोवाचे न्यायदंड आता घोषित होत आहेत. (प्रकटीकरण ८:१-९:२१; १६:१-२१) त्या पीडा येऊ नयेत आणि तिच्यासोबत सरतेशेवटी मरण येऊ नये म्हणून देवाच्या लोकांनी स्वतःला खोट्या धर्मापासून वेगळे करण्याची गरज आहे. ते त्या संस्थेशी जडून राहिल्यास तिच्या पापात सहभागी झाल्यासारखे होईल. मग, तिच्याप्रमाणेच यांच्यावर देखील आध्यात्मिक व्यभिचार करण्याचा व त्यांच्यात “पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्‍त” सापडल्याचा रक्‍तदोष येऊ शकतो.—प्रकटीकरण १८:२४; पडताळा इफिसकर ५:११; १ तीमथ्य ५:२२.

२५. प्राचीन बाबेलातून देवाचे लोक कोणकोणत्या मार्गांनी बाहेर पडले?

२५ पण देवाचे लोक मोठ्या बाबेलमधून कसे बाहेर निघू शकतात? प्राचीन बाबेलच्या प्रकरणात बघता, यहूद्यांना बाबेल शहर ते वाग्दत्त देश इतक्या लांब पल्ल्याचा प्रवास प्रत्यक्ष करावा लागला. पण त्यात यापेक्षाही अधिक समाविष्ट होते. यशयाने इस्राएलांना भविष्यवादितपणे म्हटले होते: “निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; त्याच्यामधून निघून जा. परमेश्‍वराची [यहोवा, NW] पात्रे वाहणाऱ्‍यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.” (यशया ५२:११) होय, त्यांना यहोवाची उपासना डागाळलेली व निरर्थक बनविणाऱ्‍या सर्व बाबेलोनी अशुद्ध आचाराला टाकून द्यायचे होते.

२६. करिंथकर ख्रिश्‍चनांनी ‘त्यातून निघा व वेगळे व्हा आणि अशुद्ध वस्तुला शिवू नका,’ ही आज्ञा कशी पाळली?

२६ प्रेषित पौलाने यशयाचे ते शब्द करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात उद्धृत केले व म्हटले: “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्‍यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्‍यांचा कसा मिलाफ होणार? . . . ‘म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभु [यहोवा, NW] म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका.’” या आज्ञेचे पालन करण्यासाठी करिंथकरांना करिंथ शहर सोडण्याची गरज नव्हती. तरीपण शारीरिकदृष्ट्या बघता, त्यांनी खोट्या धर्माची अशुद्ध मंदिरे यापासून व आध्यात्मिकरितीने त्या मूर्तिपूजकांच्या सर्व अशुद्ध आचारापासून स्वतःला वेगळे राखायचे होते. याच पद्धतीने १९१९ पासून देवाचे लोक मोठ्या बाबेलमधून बाहेर निघू लागले व त्यांनी राहिलेल्या सर्व अशुद्ध शिक्षण व आचारापासून स्वतःला शुद्ध केले. अशाप्रकारे त्यांना शुद्ध लोक या नात्याने देवाची सेवा करता आली.—२ करिंथकर ६:१४-१७; १ योहान ३:३.

२७. प्राचीन बाबेल व मोठी बाबेल यावर येणाऱ्‍या दंडाज्ञांमध्ये कोणत्या गोष्टींचे साम्य दिसते?

२७ प्राचीन बाबेलचे पतन व त्याचा ओघाओघाने झालेला विनाश ही त्याच्या पापांची शिक्षा होती. कारण “त्याचा गुन्हा गगनापर्यंत पोहंचला आहे.” (यिर्मया ५१:९) याचप्रमाणे, मोठ्या बाबेलच्या “पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे” त्यामुळे यहोवाचे लक्ष त्याकडे गेले आहे. ती अन्याय, मूर्तिपूजा, अनैतिकता, जाच, लूट आणि खून याबद्दल दोषी आहे. प्राचीन बाबेलने यहोवाचे मंदिर आणि त्याच्या खऱ्‍या उपासकांबद्दल जे केले त्याच्या सूडाप्रीत्यर्थ त्याचे पतन झाले होते. (यिर्मया ५०:८, १४; ५१:११, ३५, ३६) याचप्रमाणे, मोठ्या बाबेलचे पतन आणि तिचा ओघाओघाने होणारा नाश या गोष्टी तिने खऱ्‍या उपासकांना जी कित्येक शतके वागणूक दिली त्याच्या सूडाचे वक्‍तव्य करणाऱ्‍या आहेत. खरेच, तिचा नाश होण्यास सुरवात होणे हे “आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस” सुरु झाल्यासारखे आहे.—यशया ३४:८-१०; ६१:२; यिर्मया ५०:२८.

२८. यहोवा मोठ्या बाबेलीस न्यायाचे कोणते सूत्र लावतो व का?

२८ कोणा इस्राएलाने आपल्या शेजाऱ्‍याचे काही चोरले असेल तर मोशेच्या नियमशास्त्रानुरुप त्याला भरपाई म्हणून ती चोरलेली वस्तू दुपटीने परत करावी लागत असे. (निर्गम २२:१, ४, ७, ९) मोठ्या बाबेलच्या येणाऱ्‍या नाशात, यहोवा देखील न्यायाचे हेच तुलनात्मक सूत्र लावणार आहे. तिने जे दिले त्याच्या दुप्पट मोबदल्यात तिला परत मिळायचे आहे. या न्यायाला दयेची झालर नसणार; कारण मोठ्या बाबेलने बळी घेतलेल्या लोकांबद्दल कसलीही दया दाखवली नव्हती. आपला “[निर्लज्ज] विषयभोग” साधता यावा यासाठी तिने पृथ्वीच्या लोकांना आपले भक्ष्य बनवले. यामुळे तिला आता पीडा व दुःख अनुभवण्यास मिळणार. प्राचीन बाबेलला सुद्धा स्वतःच्या बाबतीत अगदीच सुरक्षित असल्याचे वाटत होते; त्या शहराने असे म्हटले होते: “मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही.” (यशया ४७:८, ९, ११) मोठ्या बाबेलला देखील असेच सुरक्षित वाटते. पण “सामर्थ्यवान” यहोवा देवाने तिचा नाश करण्याचे ठरवले आहे व तो जणू अचानक ‘एके दिवशी’ येईल!

[तळटीपा]

^ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६३ पानांवरील चौकट]

“राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले”

१८०० च्या दशकाच्या आरंभाला युरोपियन व्यापाऱ्‍यांनी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात अफूची चोरटी आयात चालवली होती. मार्च १८३९ मध्ये चिनी अधिकाऱ्‍यांनी ब्रिटीश व्यापाऱ्‍यांकडून २०,००० मादक औषधांची खोकी काढून घेऊन या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे ब्रिटन व चीन यात तणाव निर्माण झाला. या दोन्ही देशाचे संबंध अधिक खालावले गेले तेव्हा प्रॉटेस्टंट मिशनऱ्‍यांनी ब्रिटनला युद्धावर जाण्याची गळ घातली. त्यांनी त्याला असे काही म्हटले:

“या अडचणी माझ्या अंतःकरणात केवढा आनंद निर्माण करतात, कारण मला वाटते की, इंग्लिश सरकार क्रोधी होईल आणि देव आपल्या शक्‍तीने अडखळण दूर करून ख्रिस्ताचे शुभवर्तमान चीनमध्ये शिरकाव करायला मार्ग मोकळा करील.”—हेन्रीटा शक, दक्षिण बॅप्टिस्ट मिशनरी.

शेवटी, युद्ध धुमसले—याला आज अफू युद्ध या नावाने ओळखण्यात येते. मिशनऱ्‍यांनी ब्रिटनला अशा प्रकारची निवेदने देऊन आपल्या संपूर्ण अंतःकरणाने पाठिंबा दिला:

“मला सध्याची परिस्थिती पाहून, अफू किंवा इंग्लिश घडामोडीबद्दल नव्हे, तर मानवाची दुष्टाई ही चीनची भिंत फोडून आत शिरण्यासाठी ईश्‍वरी दयेच्या करणीला कारणीभूत ठरत नसल्याचे पाहून खरोखरी पेचात पडल्यासारखे वाटते.”—पीटर पार्कर, काँग्रिगेशनलिस्ट मिशनरी.

आणखी एक काँग्रिगेशनलिस्ट मिशनरी, सॅम्युएल डब्ल्यू. विल्यम्स्‌ यांनी असे म्हटले: “जे काही इतक्या अद्‌भुत प्रकाराने घडून आले आहे त्यात देवाचा हात असल्याचे उघड होत आहे आणि ज्याने असे म्हटले की मी पृथ्वीवर तरवार चालवावयास आलो आहे तो येथे आला आहे आणि आपल्या शत्रूंचा त्वरेने नाश करून स्वतःचे राज्य स्थापन करणार याबद्दल आम्ही संशय बाळगत नाही. तो सर्व गोष्टी उलथून टाकून शेवटी शांतीचा राजपुत्र म्हणून स्थापित होणार.”

चिनी लोकांची जी भयंकर कत्तल झाली त्याबद्दल जे. लुईस शक या मिशनऱ्‍यांनी लिहिले: “हे कृत्य, . . . ईश्‍वरी सत्याच्या प्रगतीला खिळ घालणाऱ्‍या केरकचऱ्‍याला काढून टाकण्याचे प्रभूचे साधन असल्याचे मी मानतो.”

काँग्रिगेशनलिस्ट मिशनरी एलिजा सी. ब्रीजमन यांनी म्हटले: “आपल्या राज्याची तयारी करण्यासाठी देवाने मुलकी शक्‍तीच्या मजबूत बाहूंचा सातत्याने उपयोग केला आहे. . . . या महत्त्वाच्या क्षणी त्याचे माध्यम मानव आहे; ज्याला ईश्‍वरी शक्‍तीचे मार्गदर्शन आहे. सर्व राष्ट्रांचा थोर चालक याने चीनचा घमेंड उडवून लावून त्याला लाजिरवाणे करण्यासाठी इंग्लंडचा उपयोग केला आहे.”—ही अवतरणे “शेवट आणि साधने,” (इंग्रजी) १९७४, या स्टुअर्ट क्रेगटन मिलर यांच्या निबंधातून घेतली आहेत; याचे प्रकाशन चीन व अमेरिकेतील धाडसी मिशनरी कृत्ये (इंग्रजी) यामध्ये करण्यात आले (जॉन के. फेअरबँक यांनी संपादित केलेला हेवर्ड अभ्यास).

[२६४ पानांवरील चौकट]

“व्यापारी . . . धनवान झाले”

“१९२९ ते दुसरे महायुद्ध सुरु होईपर्यंत [बर्नांडिनो] नोगरा [व्हॅटिकनचे आर्थिक व्यवस्थापक] यांनी व्हॅटिकन राजधानी आणि व्हॅटिकनच्या प्रतिनिधींना इटालीच्या आर्थिक व्यवहारातील विविध क्षेत्रात काम करण्याची नेमणूक दिली—खासपणे विद्युत शक्‍ती, दूरसंचार, उधार व पतपेढी, लहान लोहमार्ग आणि शेती अवजारांची उत्पादने, सिमेंट व कापड तयार करण्यासाठी लागणाऱ्‍या कृत्रिम वस्तू यापैकीच्या बऱ्‍याच उपक्रमांना चांगले यश मिळाले.

“नोगरा यांनी ला सोसायटीआ इटालियाना डेला व्हिस्कोसा, ला सुपरटिसिले, ला सोसायटीआ मेरिडिओनेल इंडस्ट्री टेसिलि आणि ला किसाराऑन यासारख्या अनेक कंपन्यांचा भरपूर फायदा घेतला. या सर्व कंपन्यांचे एकत्रीकरण किसा—व्हिस्कोसा यात करून त्या व्हॅटिकनमधील अत्यंत भरवशाचे धर्मपुढारी बॅरोन फ्रँन्सिस्को मारिया ओडासो यांच्या अधिकाराखाली ठेवल्या. नोगरांनी या नव्या कंपनीचे शोषण इटलीच्या सर्वाधिक मोठ्या कापड उद्योजक स्निआ-व्हिस्कोसा या कंपनीद्वारे मोठ्या युक्‍तीने सुरु केले. यामुळे स्निआ-व्हिस्कोसाबद्दल व्हॅटिकनची आस्था अधिकाधिक वाढत राहिली व तिचा परिणाम त्याचा ताबा शेवटी व्हॅटिकनने घेतला व बॅरोन ओडासो यांना उपाध्यक्ष बनवण्यात आले.

“अशाप्रकारे नोगरा यांनी कापड गिरण्याच्या कारभारात प्रवेश मिळवला. त्यांनी इतर कंपन्यांमध्येही इतर मार्गांनी प्रवेश केला. कारण त्यांना वेगवेगळ्या युक्त्या येत होत्या. स्वतःचे काही नसणाऱ्‍या माणसापेक्षा . . . इतर कोणीही इटलीच्या इतिहासातील आर्थिक उलाढालीत इतकी ढवळाढवळ केली नसेल. . . . बेनेटो मुसोलिनीने जे साम्राज्य हस्तगत करण्याचे स्वप्न बघितले होते ते त्याला साध्य करण्याचे जमले नाही; पण त्याने व्हॅटिकनला तसेच बर्नांडिनो नोगरा यांना एक वेगळ्या प्रकारचे स्वामित्व मिळवण्यास समर्थ केले.”—व्हॅटिकन साम्राज्य (इंग्रजी), लेखक, निनो लो बेलो, पृ. ७१-३.

पृथ्वीचे व्यापारी व मोठी बाबेल यांजमध्ये केवढे जवळचे सहकार्य होते याचे हे एक उदाहरण आहे. आपले व्यापारी सहकारी निघून जातील तेव्हा हे व्यापारी रूदन करतील यात काही शंका नाही!

[२५९ पानांवरील चित्रे]

मानव सर्व पृथ्वीवर पांगले, तसे त्यांनी आपणासोबत बाबेली धर्माच्या कल्पना नेल्या

[२६१ पानांवरील चित्रे]

पहारेकऱ्‍याप्रमाणे योहान वर्ग बाबेल पडली आहे हे घोषित करतो

[२६६ पानांवरील चित्रे]

प्राचीन बाबेलचे अवशेष मोठ्या बाबेलच्या येणाऱ्‍या विनाशाचे चित्र देतात