व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचे नाव दृढ धरुन राहणे

येशूचे नाव दृढ धरुन राहणे

अध्याय ९

येशूचे नाव दृढ धरुन राहणे

पर्गम

१. येशूचा पुढचा संदेश कोणत्या मंडळीस प्राप्त झाला आणि कोणत्या प्रकारच्या शहरात ते ख्रिस्ती लोक वास्तव्य करून होते?

 स्मुर्णा पासून किनाऱ्‍यावरील रस्त्याने उत्तरेकडे वर ५० मैल व नंतर कॅकस नदीच्या दरीतून आतमध्ये १५ मैल प्रवास केल्यावर, ज्याला आता बर्गमा म्हणतात, त्या पर्गममध्ये आम्ही येतो. ते शहर, झियस किंवा ज्युपिटरच्या मंदिराविषयी प्रख्यात होते. पुराणवस्तू संशोधकांनी १८०० मध्ये त्या मंदिराची वेदी जर्मनीत स्थलांतरीत केली, ती बर्लिनमध्ये पर्गमन वस्तुसंग्रहालयात मूर्तिपूजक देवांच्या अनेक मूर्त्या व खोदीव कामासह अद्याप पाहावयास मिळते. तर त्या मूर्तिपूजेत वसणाऱ्‍या मंडळीस प्रभु येशू कोणता संदेश पाठवील?

२. येशू आपली ओळख कशी प्रस्थापित करतो आणि त्याच्याकडे “दुधारी तरवार” असण्याची अर्थसूचकता काय आहे?

प्रथम, येशू आपली ओळख या प्रकाराने देतो: “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तरवार आहे तो असे म्हणतो.” (प्रकटीकरण २:१२) येशू येथे प्रकटीकरण १:१६ मध्ये दिलेल्या त्याच्या वर्णनाचा पुनरुच्चार करतो. जे त्याच्या अनुयायांचा छळ करतात अशांचा तो न्यायाधीश व दंड देणारा या नात्याने नाश करील. ही हमी किती सांत्वनदायक आहे! तथापि, जे मंडळीच्या आत आहेत अशांना न्यायाबद्दल हा इशारा मिळो की, यहोवा लवकरच, ‘करार घेऊन येणारा निरोप्या,’ येशू ख्रिस्ताद्वारे मूर्तिपूजा, अनैतिकता, लबाडी व अप्रामाणिकता आचरणाऱ्‍या व गरजूंची काळजी घेण्यात मागे पडणाऱ्‍या सर्व तथाकथित ख्रिश्‍चनांविरुद्ध ‘साक्ष देण्याची त्वरा करील.’ (मलाखी ३:१, ५; इब्रीयांस १३:१-३) देव येशूला जो सल्ला व दोष देण्यास सांगतो तो ऐकला गेलाच पाहिजे!

३. पर्गममध्ये कोणती खोटी भक्‍ती चालत असे व तेथे “सैतानाचे आसन” होते असे का म्हटले गेले?

येशू आता मंडळीला सांगतो: “तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे, सैतानाचे आसन आहे तेथे.” (प्रकटीकरण २:१३अ) ते ख्रिस्ती खरोखरी सैतानी भक्‍तिने वेढलेले होते. झियसच्या मंदिराशिवाय, निरोगी करणारे दैवत एस्क्युलॅपियस याचे पवित्रस्थान तेथे होते. बादशहाची भक्‍ती करणारा पंथ या नात्याने पर्गम एक प्रसिद्ध केंद्र होते. “सैतान” या इब्री शब्दाचे भाषांतर “विरोधक” असे आहे व त्याचे “सिंहासन,” त्यास ईश्‍वरी अनुमतीने विशिष्ट कारणास्तव मिळालेले जगाचे अधिपत्य सूचित करते. (ईयोब १:६, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल, तळटीप) पर्गम येथील विपुल मूर्तिपूजेने त्या शहरात सैतानाचे “सिंहासन” अगदी दृढपणे प्रस्थापित झाल्याचे सूचित केले. तेथील ख्रिश्‍चनांनी राष्ट्रवादी भक्‍तिमध्ये सैतानाला नमन केले नाही याचा त्याला केवढा राग आला असावा!

४. (अ) पर्गम येथील ख्रिश्‍चनांबद्दल येशू कोणती प्रशंसा वदवितो? (ब) ख्रिश्‍चनांना कशी वागणूक द्यावी याबद्दल धाकटा प्लिनी याने त्र्याजन सम्राटाला काय लिहिले? (क) पर्गम येथील ख्रिश्‍चनांनी, धोका असताही, कोणते मार्गाक्रमण अनुसरले?

होय, “सैतानाचे आसन” पर्गम येथे आहे. ‘तरीही,’ येशू म्हणतो, ‘तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा साक्षी, माझा विश्‍वासू अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला, त्याच्या दिवसातहि तू माझ्यावरील विश्‍वास नाकारला नाही.’ (प्रकटीकरण २:१३ब) केवढी ही जीवास हेलावून टाकणारी प्रशंसा! अंतिपाने दुरात्मिक प्रथा अनुसरण्याचे आणि रोमी सम्राटाची भक्‍ती करण्याचे नाकारल्यामुळे त्याला हुतात्मिक मरण मिळाले हे नक्की! योहानाला हा भविष्यवाद मिळण्याच्या काही काळानंतर रोमचा बादशहा त्र्याजन याचा व्यक्‍तिगत प्रतिनिधी धाकटा प्लिनी याने त्र्याजनला पत्राने, ज्यांच्यावर ख्रिस्ती असल्याचा आरोप होता अशांना कसे हाताळावे त्याच्या पद्धतीबद्दल लिहिले व याला बादशहाने संमती दर्शविली. ज्यांनी आपण ख्रिस्ती आहोत असे नाकारले त्यांची सुटका करण्यात आली. प्लिनीने म्हटले: “त्यांनी माझ्यामागे देवाच्या प्रार्थनेचा पुनरुच्चार केला, तुमच्या [त्र्याजन] मूर्तीस धूप व द्राक्षारस अर्पिला . . . आणि ख्रिस्ताला शाप दिला.” कोणी ख्रिस्ती असल्याचे आढळल्यावर त्याचा वध करीत. अशा प्रकारच्या धोक्यास तोंड देऊन असताही पर्गम येथील ख्रिश्‍चनांनी आपला विश्‍वास नाकारला नाही. ते ‘येशूचे नाव दृढ धरुन राहिले’ ते या अर्थी की, तो यहोवाचे समर्थन करणारा व त्याचा नियुक्‍त न्यायाधीश असल्याचा ते विश्‍वास बाळगून होते व त्याच्या स्थानाबद्दल उच्च आदर राखून होते. राज्याचे साक्षीदार या नात्याने त्यांनी एकनिष्ठेने येशूच्या पावलास अनुसरले.

५. (अ) आधुनिक काळातील सम्राटाच्या भक्‍तीच्या कोणत्या रुपाने या २० व्या शतकात ख्रिश्‍चनांवर कठीण छळ आणला? (ब) द वॉचटावरने ख्रिश्‍चनांसाठी कोणती मदत दिली?

येशूने विविध प्रसंगी, सैतान या दुष्ट जगावर प्रभुत्व गाजवीत असल्याचे स्पष्ट केले, पण येशूच्या सचोटीमुळे सैतानाला त्याच्यावर आपली पकड धरता आली नाही. (मत्तय ४:८-११; योहान १४:३०) या २० व्या शतकात, खासपणे “उत्तरेचा राजा” व “दक्षिणेचा राजा” ही शक्‍तिशाली राष्ट्रे जागतिक स्वामित्वासाठी झगडत आहेत. (दानीएल ११:४०) स्वदेशाभिमानाची चळवळ वाढलेली असून सम्राटाची भक्‍ती ही राष्ट्रवादाच्या रुपात सबंध पृथ्वीस पछाडून आहे. द वॉचटावर नोव्हेंबर १, १९३९ व पुढे नोव्हेंबर १, १९७९ आणि सप्टेंबर १, १९८६ यामध्ये तटस्थतेबद्दल प्रसिद्ध झालेल्या लेखांनी या वादविषयावरील बायबलची शिकवण, यहोवाच्या नावात चालू इच्छिणाऱ्‍या आणि येशूने जगाला जसे धैर्याने जिंकले तसे विजय मिळवू इच्छिणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना स्पष्टपणे विशद केले व मार्गदर्शन पुरवले.—मीखा ४:१, ३, ५; याहोन १६:३३; १७:४, ६, २६; १८:३६, ३७; प्रेषितांची कृत्ये ५:२९.

६. अंतिपाप्रमाणे आजच्या काळी यहोवाच्या साक्षीदारांनी कोणती खंबीर भूमिका घेतली आहे?

अशा प्रकारच्या सल्ल्याची तातडीची गरज होती. असमंजस अशा राष्ट्रीय चळवळीच्या वातावरणात अभिषिक्‍त तसेच त्यांचे सोबती, या यहोवाच्या साक्षीदारांना विश्‍वासात खंबीर उभे राहायचे होते. अमेरिकेत शेकडो मुलांना व शिक्षकांना राष्ट्रीय ध्वजास वंदन न केल्यामुळे शाळेतून काढून टाकण्यात आले; तसेच जर्मनीत स्वस्तिक चिन्हाला वंदन करण्याचे नाकारल्यामुळे साक्षीदारांचा क्रूरपणे छळ करण्यात आला. आधी दाखवल्याप्रमाणे, हिटलरच्या नात्सींनी हजारो यहोवाच्या निष्ठावंत सेवकांचा, ते राष्ट्रीयत्वाच्या मूर्तिपूजेत सहभागी होत नाहीत म्हणून वध केला. १९३० च्या दरम्यान बादशहा शिन्तोच्या भक्‍तीचा जपानमध्ये बहर असताना, ताईवान येथील जपानी वसाहतीत दोघा पायनियर सेवकांनी राज्याचे बी विपुलतेने पेरले. लष्करी अधिकाऱ्‍यांनी या दोघांना तुरुंगात टाकले, जेथे त्यांच्यापैकीचा एक कठोर वागणुकीमुळे मरण पावला. दुसऱ्‍याला सोडण्यात आले पण केवळ त्याच्या पाठीत गोळी झाडण्यासाठी. ते दोघेही आधुनिक काळचे अंतिपा होते. आजही अनेक देशात राष्ट्रीयत्वाच्या द्योतकाची भक्‍ती व देशासाठी एकनिष्ठता अपेक्षिली जाते. ख्रिस्ती तटस्थतेच्या त्यांच्या खंबीर भूमिकेमुळे पुष्कळ युवक साक्षीदारांना तुरुंगात टाकण्यात आले आहे व कित्येकांना ठार करण्यात आले. अशा वादविषयाला तोंड देणाऱ्‍या युवकांपैकी तुम्ही असला तर देवाच्या वचनाचा प्रतिदिवशी अभ्यास करा की, ज्यामुळे सार्वकालिक जीवनाचा दृष्टिकोन समोर ठेवून “जिवाच्या तारणासाठी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांपैकी” असाल.—इब्रीयांस १०:३९–११:१; मत्तय १०:२८-३१.

७. भारतातील तरुण मुलांनी राष्ट्रीयवादाच्या भक्‍तीला कसे तोंड दिले आणि याचा काय परिणाम झाला?

शाळकरी तरुणांनाही अशाच प्रकारच्या वादविषयाला तोंड द्यावे लागले आहे. भारतातील केरळ या राज्यात १९८५ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या तीन मुलांनी आपल्या बायबल आधारित विश्‍वासाची हातमिळवणी करण्यास नकार दिला; त्यांनी राष्ट्रगीत गाण्याचे नाकारले. इतर ते गीत गात असताना ते शांतपणे आदराने उभे होते. तरीही त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. ही कृती केल्याबद्दल त्यांच्या वडिलांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला नेला, जेथे दोन न्यायाधिशांनी मुलांच्या पक्षात निर्णय देऊन हे धैर्याने घोषित केले: “आमचा सांप्रदाय सहिष्णुता शिकवतो, आमचे तत्त्वज्ञान सहिष्णुता शिकवते; आमची घटना सहिष्णुता आचरते; आपण तिला बिघडवू नये.” वर्तमानपत्रातील जाहिरातबाजी व अनुकूल संपादकीय लेखांनी, जवळजवळ पृथ्वीची एकपंचमांश लोकसंख्या असणाऱ्‍या या सबंध राष्ट्राला कळविले की, खरा देव यहोवा याची भक्‍ती करणारे व बायबलच्या तत्त्वांना निष्ठावंतपणा दाखविणारे ख्रिस्ती या देशात आहेत.

भ्रष्टावणारे प्रभाव

८. पर्गम येथील ख्रिश्‍चनांना कोणता दोष देणे येशूला आवश्‍यक दिसले?

खरेच, पर्गम येथील ख्रिस्ती सचोटी राखणारे आहेत. “तथापि,” येशू म्हणतो, “तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे.” दोषास पात्र असे त्यांनी काय केले होते? येशू आम्हास सांगतो: “‘बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे हे अडखळण इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला शिकवले.”—प्रकटीकरण २:१४.

९. बलाम कोण होता व त्याने दिलेल्या सल्ल्यामुळे ‘इस्राएल संतानापुढे . . . अडखळण’ कसे ठेवले गेले?

मोशेच्या काळी मवाबाचा राजा बालाक याने इस्राएलेत्तर संदेष्टा बलाम याला भाड्याने घेतले होते. याला इस्राएलांना शाप देण्यासाठी यहोवाच्या मार्गाबद्दलची काही माहिती होती. यहोवाने बलामाला अडवून इस्राएलांसाठी आशीर्वाद व त्यांच्या शत्रूंसाठी शाप वदविण्यासाठी भाग पाडले. यामुळे क्रोधित झालेल्या बालाकाला शांत करण्यासाठी बलामाने मोठी कुयुक्‍ती सांगितली: इस्राएली लोकांना भयंकर लैंगिक अनैतिकता व बालपौर या खोट्या दैवताची भक्‍ती करण्यास भाग पाडावे म्हणून यांना मवाबी स्त्रियांनी फूस लावावी! हा डावपेच कामी आला. यहोवाचा धार्मिक क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने इस्राएलात मरी पाठवून २४,००० जारकर्म्यांना ठार केले. शेवटी फिनहास याजकाने इस्राएलातील दुष्टता काढण्यासाठी सकारात्मक हालचाल केली तेव्हा ही मरी संपुष्टात आली.—गणना २४:१०, ११; २५:१-३, ६-९; ३१:१६.

१०. पर्गमच्या मंडळीत कोणती दुष्टता शिरली होती आणि आपल्या पातकांकडे देव डोळेझाक करील असे त्या ख्रिश्‍चनांना का वाटले असावे?

१० आता योहानाच्या दिवसात, पर्गम येथे अशाच प्रकारची अडखळणे आहेत का? होय, आहेत! अनैतिकता व मूर्तिपूजा त्या मंडळीत शिरली होती. त्या ख्रिश्‍चनांनी प्रेषित पौलाने दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष दिले नव्हते. (१ करिंथकर १०:६-११) त्यांनी छळ सहन केला असल्यामुळे त्यांना वाटले की, यहोवा त्यांच्या लैंगिक पातकाकडे डोळेझाक करील. यामुळेच येशू त्यांना स्पष्ट करतो की, त्यांनी अशा स्वरुपातील दुष्टता थांबवलीच पाहिजे.

११. (अ) ख्रिश्‍चनांनी कशाविरुद्ध दक्ष राहिले पाहिजे व त्यांनी कशाप्रकारची विचारसरणी टाळावी? (ब) गेल्या काही वर्षांत ख्रिस्ती मंडळीतून किती जणांना बहिष्कृत करण्यात आले व बहुधा कोणत्या कारणास्तव?

११ याचप्रमाणे आज, ख्रिश्‍चनांनी, “आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप” आणण्याविरुद्ध दक्ष राहिले पाहिजे. (यहूदा ४) ख्रिस्ती सदाचरणाचा मार्ग धरावा यासाठी आम्ही वाईटाचा वीट मानला पाहिजे व ‘आपल्या शरीराला बुकलून’ त्याला स्वतःच्या ताब्यात ठेवले पाहिजे. (१ करिंथकर ९:२७; स्तोत्र ९७:१०; रोमकर ८:६) देवाच्या सेवेतील आवेश आणि छळात दाखविलेली सचोटी लैंगिकतेच्या गैरवर्तणुकीत गुंतविण्याचा परवाना देते असे आम्ही केव्हाही समजू नये. गेल्या कित्येक वर्षात लैंगिक अनैतिकतेच्या कारणामुळे ज्या अनेक अपराध्यांना मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले आहे त्यांची संख्या हजारोंच्या संख्येत गेली आहे. काही वर्षात, पुरातन इस्राएलातील बालपौरांच्या नादी लागल्यामुळे जितके ठार झाले त्यांच्या संख्येपेक्षाही अधिक जण वाईट मार्गाकडे गेले. आम्ही अशा प्रकारच्या संगतीत पडू नये यासाठी नेहमी दक्ष राहिले पाहिजे!—रोमकर ११:२०; १ करिंथकर १०:१२.

१२. देवाच्या आरंभाच्या काळातील सेवकांप्रमाणेच आज ख्रिश्‍चनांना कोणती तत्त्वे लागू होतात?

१२ येशू पर्गम येथील ख्रिश्‍चनांना ‘मूर्तीला अर्पिलेले’ खाण्याबद्दलही ताकीद देतो. यात कशाचा समावेश असावा? पौलाने करिंथकरांना लिहिलेले शब्द विचारात घेता काही जण आपल्या ख्रिस्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन इतरांच्या विवेकाला दुखवत असावेत. शिवाय बहुतकरुन ते कसेतरी प्रत्यक्ष मूर्तीच्या विधीत सहभागी होत असावेत. (१ करिंथकर ८:४-१३; १०:२५-३०) विश्‍वासू ख्रिस्ती जनांनी ख्रिस्ती स्वातंत्र्याचा उपयोग करताना, निस्वार्थी प्रेम दाखविले पाहिजे आणि इतरांना न अडखळविण्याची दक्षता राखली पाहिजे. त्यांनी आधुनिक काळातील मूर्तिपूजा, जसे की, कोणा दूरदर्शन, चित्रपट, खेळ कलाकारास आळविणे, पैशाला एवढेच काय पण स्वतःच्या पोटाला देव बनविण्याचेही टाळावे!—मत्तय ६:२४; फिलिप्पैकर १:९, १०; ३:१७-१९.

फुटीर गटबाजी टाळा!

१३. पर्गम येथील ख्रिश्‍चनांना येशू कोणता पुढील वाग्दंड देतो आणि मंडळीला याची का गरज होती?

१३ पर्गम येथील ख्रिश्‍चनांना येशू आणखी दटावतो. तो म्हणतो: “निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकहि तुझ्याजवळ आहेत.” (प्रकटीकरण २:१५) आधी येशूने इफिसकरांची, या पंथाच्या कृत्यांचा द्वेष करण्याबद्दल प्रशंसा केली होती. पण पर्गममधील ख्रिश्‍चनांना, मंडळीला गटबाजीपासून दूर राहण्यासाठी या सल्ल्याची जरुरी होती. योहान १७:२०-२३ मध्ये येशूने ज्या ऐक्यासाठी प्रार्थना केली होती ती टिकवून ठेवण्याकरता ख्रिस्ती दर्जांना उंचावून धरण्यासाठी अधिक दृढतेची गरज होती. “सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्‍यांना कुंठित करावयासहि समर्थ” होण्याची गरज होती.—तीत १:९.

१४. (अ) ख्रिस्ती मंडळीला आरंभापासूनच कशासोबत सामना द्यावा लागला आणि प्रेषित पौलाने याचे कसे वर्णन दिले? (ब) फुटीर गटास अनुसरण्याचा ज्यांचा कल झालेला आहे अशांनी येशूच्या कोणत्या शब्दांकडे लक्ष द्यावे?

१४ ख्रिस्ती मंडळीला आरंभापासूनच गर्विष्ठ स्वधर्मत्यागी लोकांशी सामना द्यावा लागला. हे आपल्या गोड व फसव्या भाषणांनी, “फुटी व अडथळे” आणतात आणि यहोवाच्या माध्यमाकरवी “जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध” जातात. (रोमकर १६:१७, १८) प्रेषित पौलाने या धोक्याविषयी जवळजवळ त्याच्या सर्व पत्रात इशारा दिला आहे. * आधुनिक काळात जरी येशूने खरी मंडळी, ख्रिस्ती शुद्धता व ऐक्यता यात आणली आहे तरी फुटीचा धोका अद्याप आहे. या कारणास्तव, फुटीर होण्याचा ज्यांचा कल आहे व जे एक वेगळाच गट स्थापन करु इच्छितात अशांनी येशूचे पुढील शब्द लक्षात घ्यावेत: “म्हणून पश्‍चात्ताप कर, नाही तर मी तुजकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तरवारीने त्यांच्याबरोबर लढेन.”—प्रकटीकरण २:१६.

१५. फुटीर गटाची सुरवात कशी होते?

१५ या फुटीर वृत्तीच्या गटबाजीची सुरवात कशी होते? कदाचित, स्व-पद्धत आवडणारे शिक्षक शंकांची पेरणी करतात, बायबल सत्याबद्दल (जसे की आम्ही शेवटल्या दिवसात आहोत) वाद घालतात व अशाप्रकारे एक छोटा गट फुटून बाहेर पडतो व त्याला अनुसरतो. (२ तीमथ्य ३:१; २ पेत्र ३:३, ४) किंवा कोणी, यहोवा ज्या पद्धतीने त्याचे कार्य पार पाडतो त्याविषयी टीका करतो आणि मग, घरोघर राज्याचा संदेश घेऊन जाणे हे शास्त्रवचनीय नाही व जरुरीचे नाही असे स्वतःचे अंग काढून घेण्याच्या प्रवृत्तीस वाढवतो. खरे म्हणजे, येशू व त्याच्या प्रेषितांच्या अनुकरणार्थ अशा सेवेमध्ये सहभागी होणे हे एखाद्यास नम्र ठेवते, पण ते बाजूला होण्याचे पसंद करतात आणि खाजगी गटात अधूनमधून बायबलचे वाचन करणे पुरे एवढेच ते समजतात. (मत्तय १०:७, ११-१३; प्रेषितांची कृत्ये ५:४२; २०:२०, २१) असे लोक येशूच्या मृत्युचा स्मारकविधी, रक्‍तापासून दूर राहा ही शास्त्रवचनीय आज्ञा, सणाचे दिवस आचरणे आणि तंबाखूचा वापर याबद्दल आपल्याच कल्पना लढवतात. याशिवाय, ते यहोवाच्या नावाचा दर्जा कमी करतात; लवकरच ते मोठ्या बाबेलच्या स्वैराचारी मार्गाकडे मागे वळतात. यापेक्षा अधिक वाईट म्हणजे, काही, सैतानाद्वारे प्रभावीत होऊन एकेकाळी त्यांचे बंधू असलेले सोबतीचे दास यांच्यावर उलटतात व त्यांना ‘मारू लागतात.’—मत्तय २४:४९; प्रेषितांची कृत्ये १५:२९; प्रकटीकरण १७:५.

१६. (अ) धर्मत्यागी प्रभावाने जे अस्थिर बनलेले आहेत अशांनी लगेच पश्‍चात्ताप करण्याची का गरज आहे? (ब) जे पश्‍चात्ताप करण्याचे नाकारतात अशांना काय होईल?

१६ धर्मत्याग्यांच्या प्रभावाने जे कोणी अस्थिर झालेले आहेत, अशांनी येशूच्या हाकेकडे लक्ष देऊन त्वरित पश्‍चात्ताप करावा! धर्मत्यागाचा प्रचार विषाप्रमाणेच त्यागला पाहिजे! त्याचे मूळ, येशू आपल्या मंडळीला जी धार्मिक, शुद्ध व प्रिय सत्ये भरवीत असतो त्याच्या अगदी उलट म्हणजे द्वेष व मत्सर यावर जडलेले आहे. (लूक १२:४२; फिलिप्पैकर १:१५, १६; ४:८, ९) जे कोणी पश्‍चात्ताप करण्याचे नाकारतील अशांबरोबर प्रभु येशू ‘आपल्या तोंडातल्या तरवारीने लढेल.’ तो लोकांना सध्या चाळीत आहे ते अशासाठी की, त्याने आपल्या पृथ्वीवरील वास्तव्याच्या शेवटी आपल्या शिष्यांसमवेत ज्या ऐक्यतेबद्दल प्रार्थिले होते ती टिकवून ठेवावी. (योहान १७:२०-२३, २६) येशूच्या उजव्या हातातील ताऱ्‍यांद्वारे देण्यात आलेल्या प्रेमळ सूचना व मदतीचा अव्हेर धर्मत्यागी करीत असल्यामुळे, येशू त्यांचा न्याय करुन त्यांना “कठीण शिक्षा [NW]” देतो आणि तो त्यांना “बाहेरील अंधारात” टाकून देतो. अशांनी देवाच्या लोकात खमीरासारखे कार्य करू नये म्हणून त्यांना बहिष्कृत केले जाते.—मत्तय २४:४८-५१; २५:३०; १ करिंथकर ५:६, ९, १३; प्रकटीकरण १:१६.

‘राखलेला मान्‍ना व पांढरा खडा’

१७. ‘विजयी’ होणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी कोणते बक्षीस वाट पाहून होते आणि पर्गममधील ख्रिश्‍चनांनी कशावर मात करायची होती?

१७ यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने दिलेला येशूचा सल्ला जे स्वीकारतात अशांसाठी एक भव्य बक्षीस वाट पाहून आहे. ऐका! “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्‍याशिवाय कोणालाहि ठाऊक होणार नाही.” (प्रकटीकरण २:१७) अशाप्रकारे, स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांप्रमाणेच पर्गम येथील ख्रिश्‍चनांना ‘विजयी’ होण्याचे उत्तेजन दिले आहे. जेथे सैतानाचे आसन आहे त्या पर्गममध्ये ज्या कोणाला विजयी व्हावयाचे आहे त्यांनी मूर्तिपूजा टाळलीच पाहिजे. त्यांनी बालाक, बलाम व निकलाइताचे शिक्षण याजशी संबंधित असणारी अनैतिकता, फुटीर पंथ आणि धर्मत्यागीपणा सोडून दिला पाहिजे. असे केल्यामुळे त्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “गुप्त राखलेल्या मान्न्यातून” काही खावयास मिळेल. याचा काय अर्थ होतो?

१८, १९. (अ) यहोवाने इस्राएलांना कोणता मान्‍ना दिला होता? (ब) कोणता मान्‍ना राखून ठेवला होता? (क) तो राखलेला मान्‍ना खाणे कशाला चित्रित करते?

१८ मोशेच्या काळी अरण्यातील इस्राएलांचे पोषण होण्यासाठी यहोवाने मान्‍ना पुरविला होता. तो मान्‍ना गुप्त नव्हता, कारण शब्बाथाशिवाय तो दरदिवशी सकाळी थिजलेल्या बर्फाच्या थराप्रमाणे जमिनीवर पूर्णपणे आच्छादिलेल्या स्थितीत दिसत होता. इस्राएलांचे पोषण होण्यासाठी ती एक ईश्‍वरी तरतूद होती. याचे स्मरण राहावे यासाठी यहोवाने मोशेला या ‘भाकऱ्‍यांपैकी’ काही “[इस्राएलांच्या] पुढील पिढ्यांसाठी” सोन्याच्या भांड्यात भरुन कराराच्या पवित्र कोशामध्ये राखून ठेवण्यास सांगितले.—निर्गम १६:१४, १५, २३, २६, ३३; इब्रीयांस ९:३, ४.

१९ किती योग्य असे द्योतक! हा मान्‍ना निवासमंडपाच्या परमपवित्र स्थानात लपवून ठेवण्यात आला होता व येथेच कोशासभोवती पसरलेल्या अद्‌भुत प्रकाशाद्वारे यहोवाचे अस्तित्व प्रतिध्वनित होत होते. (निर्गम २६:३४) हा राखलेला मान्‍ना खाण्यासाठी कोणासही त्या पवित्र जागेत डोकावण्याची अनुमती नव्हती. तथापि, येशूने म्हटले की, त्याचे विजय मिळवणारे अभिषिक्‍त अनुयायी ह्‍या “राखलेल्या मान्न्यातून” खातील. यांना देखील ख्रिस्ताप्रमाणेच, “खऱ्‍या गोष्टीचे प्रतिरुप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्‍यात . . . नाही, तर . . . स्वर्गात” जायचे आहे. (इब्रीयांस ९:१२, २४) त्यांच्या पुनरुत्थानासमयी ते अविनाशीपण व अमरत्व परिधान करतात. ही यहोवाकडील एक अद्‌भुत तरतूद आहे जी अविनाशी ‘राखलेल्या मान्न्याला’ चित्रित करते. त्या विजयी होणाऱ्‍या लहान गटासाठी तो किती विशेष असा हक्क आहे!—१ करिंथकर १५:५३-५७.

२०, २१. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पांढरा खडा देण्याचा काय अर्थ होत होता? (ब) वास्तविकपणे, केवळ १,४४,००० पांढरे खडे असल्यामुळे मोठ्या लोकसमुदायास कोणती आशा आहे?

२० यांना “पांढरा खडा” देण्यात येणार होता. रोमी न्यायालयात न्यायदंड बजावताना खड्यांचा वापर केला जात असे. * पांढऱ्‍या खड्याचा अर्थ दोषमुक्‍तता, तर काळ्या खड्याचा अर्थ बहुधा मृत्युची शिक्षा असा होत होता. येशू पर्गममधील ख्रिश्‍चनांना “पांढरा खडा” देणार होता याचा अर्थ तो त्यांना निरपराधी, शुद्ध व स्वच्छ असे समजणार होता. पण येशूच्या शब्दांचा आणखी अर्थ होणार होता. रोमी काळात खड्यांचा वापर कोणा महत्त्वपूर्ण घटनांच्या स्थळी प्रवेश देण्यासाठी करीत. यास्तव पांढऱ्‍या खड्याचा त्या विजेत्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी खास अर्थ होत होता—कोकऱ्‍याच्या विवाहप्रसंगी स्वर्गात सन्माननीय स्थानासाठी प्रवेश. असे केवळ १,४४,००० खडे दिले जातात.—प्रकटीकरण १४:१; १९:७-९.

२१ याचा अर्थ हा होतो का की, जर तुम्ही सोबतीच्या उपासकांतील मोठ्या लोकसमुदायापैकीचे आहात तर, तुम्हाला विचारात घेण्यात आलेले नाही? मुळीच नाही! स्वर्गातील प्रवेशासाठी तुम्हाला पांढरा खडा मिळत नाही तरी, तुम्ही टिकून राहिल्यास पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना करण्याच्या आनंदी कार्यात सहभाग मिळविण्यासाठी तुम्हाला मोठ्या संकटातून वाचविण्यात येईल. तुम्हासोबत या कार्यात सहभागी होण्यासाठी ख्रिस्तापूर्वीच्या काळातील विश्‍वासू जनांचे तसेच जे अलिकडेच वारले अशी दुसरी मेंढरे यांचे पुनरुत्थान करण्यात येईल. सरतेशेवटी मुक्‍तता पावलेले मृतजन, पृथ्वीवरील नंदनवनातील जीवनासाठी, पुनरुत्थानाची कृपापसंती मिळवितील.—स्तोत्र ४५:१६; योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९, १४.

२२, २३. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना देण्यात येणाऱ्‍या खड्यावर लिहिण्यात आलेल्या नावाची अर्थसूचकता काय आहे आणि यामुळे कोणते उत्तेजन मिळाले पाहिजे?

२२ त्या खड्यावर लिहिलेले नवे नाव काय आहे? नाव, एखाद्या व्यक्‍तीची ओळख देण्यास व एखाद्याला दुसऱ्‍यापासून वेगळे ओळखण्यासाठी उपयोगी पडत असते. या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना विजयी या नात्याने त्यांचे पृथ्वीवरील मार्गाक्रमण संपविल्यावर खडा दिला जातो. यास्तव हे स्पष्ट आहे की, त्या खड्यावरील नावाचा संबंध, स्वर्गात ख्रिस्तासोबत एकत्र येण्याचा जो विशेष हक्क त्याच्याशी आहे—स्वर्गीय राज्याचे जे वारसदार बनतात केवळ अशांनाच त्या बादशाही सेवेचे अत्यंत सलगीचे स्थान अनुभवण्याचा हक्क आहे. यास्तव, ते असे नाव, किंवा कार्याचा हुद्दा आहे की, जो ते “घेणाऱ्‍याशिवाय कोणालाहि ठाऊक नाही.”—पडताळा प्रकटीकरण ३:१२.

२३ “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो” ते ऐकण्याचे व त्याचा अवलंब करण्याचे योहान वर्गाला केवढे उत्तेजन आहे! तसेच त्यांच्या सोबतीत विश्‍वासूपणे सेवा करीत असलेल्या मोठ्या लोकसमुदायास पृथ्वीवर असताना त्यांची सोबत अनुभवण्यास व त्यांच्याबरोबर यहोवाच्या राज्याची घोषणा करीत राहण्यासाठी हे किती उत्तेजनात्मक ठरते!

[तळटीपा]

^ पहा प्रेषितांची कृत्ये २६:१०न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल तळटीप.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४३ पानांवरील चित्रे]

मूर्तिपूजक उपासना केवढ्या प्रमाणात बोकाळली होती याचे पुरावे बर्लिन येथील पर्गमन संग्रहालयात प्रदर्शनात ठेवलेले आहेत

[४५ पानांवरील चित्रे]

कराराच्या कोशात काही मान्‍ना राखून ठेवण्यात आला होता. विजेत्या अभिषिक्‍त जनांना लाक्षणिक राखलेला मान्‍ना देण्याचा अर्थ त्यांना अमरत्व मिळते असा होतो

[४५ पानांवरील चित्रे]

कोकऱ्‍याच्या विवाहप्रसंगी प्रवेश मिळविणाऱ्‍यांसाठी पांढरा खडा आहे