व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योहान गौरवी येशूला बघतो

योहान गौरवी येशूला बघतो

अध्याय ५

योहान गौरवी येशूला बघतो

दृष्टांत १​—प्रकटीकरण १:१०–३:२२

विषय: येशू पृथ्वीवरील आध्यात्मिक इस्राएलांचे परीक्षण करतो व उबदार उत्तेजन देतो

पूर्णतेचा काळ: प्रभूच्या दिवसातील हा भाग १९१४ पासून सुरु होऊन तो शेवटला विश्‍वासू अभिषिक्‍त निवर्ततो व त्याचे पुनरुत्थान होते, तेथपर्यंत जातो

१. पहिला दृष्टांत कसा प्रस्तुत करण्यात आला व त्याच्या खऱ्‍या अर्थाचा अवलंब केव्हा होणार त्या काळाबद्दल योहानाने काय सूचित केले?

 प्रकटीकरण या पुस्तकातील पहिल्या दृष्टांताची सुरवात अध्याय १ मधील १० व्या वचनाने होते. प्रकटीकरणातील इतर दृष्टांताप्रमाणेच या दृष्टांताची प्रस्तावना एका घोषणेने केलेली आढळते. येथे योहान काहीतरी असामान्य बघतो किंवा ऐकतो. (प्रकटीकरण १:१०, १२; ४:१; ६:१) हा पहिला दृष्टांत पहिल्या शतकाच्या मांडणीत सादर केला असून, योहानाच्या काळातील सात मंडळ्यांना उद्देशून संदेश दिलेला आहे. तथापि, योहान त्याच्या लागू होण्याच्या खऱ्‍या काळास स्पष्ट करतो. तो म्हणतो: “प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो.” (प्रकटीकरण १:१०अ) हा ‘दिवस’ केव्हा आहे? आजच्या तुफानी २० व्या शतकातील या नाट्यमय घटनांचा त्याच्याशी काही संबंध आहे का? तसे आहे तर, आम्ही भविष्यवाणीकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, कारण आमच्या जीवनावर व आमच्या बचावावर याचा परिणाम होऊ शकेल.—१ थेस्सलनीकाकर ५:२०, २१.

प्रभूच्या दिवसात

२. प्रभूचा दिवस केव्हा सुरु होतो व तो केव्हा संपतो?

प्रकटीकरणाची पूर्णता कोणत्या काळाच्या मांडणीत बसली जाते? बरे, प्रभूचा दिवस काय आहे? प्रेषित पौल या काळाचा उल्लेख न्यायाचा व ईश्‍वरी अभिवचनाच्या पूर्णतेचा काळ, असा करतो. (१ करिंथकर १:८; २ करिंथकर १:१४; फिलिप्पैकर १:६, १०; २:१६) त्या ‘दिवसाच्या’ आगमनासह, यहोवाच्या भव्य उद्देशांची पूर्तता त्याच्या कळसाकडे प्रगतीशीलपणे होते. तो ‘दिवस’ स्वर्गीय राजा या नात्याने येशूचे मुकुटमंडीत होण्यासह सुरु होतो. सैतानी जगावर येशूने न्यायदंड बजावल्यानंतरही हा दिवस पुढे चालू राहतो. या दिवसात नंदनवनाची पुनर्स्थापना आणि मानवजातीला पूर्णावस्था मिळणे याही गोष्टी होतात. सरतेशेवटी येशू “देवपित्याला राज्य सोपून” देतो.—१ करिंथकर १५:२४-२६; प्रकटीकरण ६:१, २.

३. (अ) आम्हाला दानीएलाचा ‘सात काळाबद्दलचा’ भविष्यवाद प्रभूचा दिवस केव्हा सुरु होतो ते पाहण्यास कसे साहाय्य करतो? (ब) पृथ्वीवरील कोणत्या घटना, प्रभूचा दिवस १९१४ या वर्षी सुरु झाल्याची पुष्टी देतात?

बायबलमधील इतर भविष्यवादांची पूर्णता हा प्रभूचा दिवस केव्हा सुरु होतो ते पाहण्यास साहाय्य करतात. उदाहरणार्थ, दानीएलाने दाविदाच्या राजघराण्यातील राज्यसत्ता मोडण्याबद्दलचे वर्णन केले आहे; “सात काळ” गेल्यावर मग, हे ज्ञात करून दिले जाईल की, “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो.” (दानीएल ४:२३, २४, ३१, ३२) या भविष्यवादाची मोठी पूर्णता यहूदाच्या राज्याच्या विध्वंसासोबत सुरु झाली. बायबलच्या पुराव्यानुसार असे दिसते की, ती घटना सा.यु.पू. ६०७ च्या ऑक्टोबरमध्ये घडली. प्रकटीकरण १२:६, १४ दाखवून देते की, ३ १/२ काळ म्हणजे १,२६० दिवस होतात. यास्तव, सात काळ (या संख्येच्या दुप्पट) २,५२० दिवस होतात. ‘एका दिवसासाठी एक वर्ष’ हा हिशोब वा गणना जमेस धरुन “सात काळ” याची लांबी २,५२० वर्षे भरते. (यहेज्केल ४:६) या कारणामुळे, ख्रिस्त येशूने १९१४ च्या उत्तरार्धात आपली स्वर्गीय राज्यसत्ता आरंभिली. त्या वर्षी जे पहिले जागतिक युद्ध भडकले, त्याने “वेदनांचा काळ” सुरु केला व तो आजही मानवजातीला त्रस्त करीत आहे. पृथ्वीवरील ह्‍या रक्‍तलांच्छित घटनांनी ही केवढी विस्मयकारक खात्री दिली आहे की, १९१४ हे वर्ष म्हणजे येशूच्या उपस्थितीच्या दिवसाची सुरवात होय!—मत्तय २४:३-१४. *

४. (अ) पहिल्या दृष्टांताची पूर्णता केव्हा होणार याबद्दल प्रकटीकरणातील शब्द स्वतः काय सूचित करतात? (ब) पहिल्या दृष्टांताची पूर्णता केव्हा संपते?

यासाठीच, हा पहिला दृष्टांत व त्यातील सूचना प्रभूच्या दिवसासाठी, म्हणजे १९१४ पासून पुढे लागू होतात. या समयाला वस्तुस्थितीने असा पाठिंबा दिला आहे की, प्रकटीकरणात नंतर, देवाच्या सत्य व नीतीमान न्यायदंडाच्या अंमलबजावणीचे जे वर्णन देण्यात आले आहे त्यामध्ये, प्रभु येशू अप्रतिम भूमिका बजावत असल्याचे दाखवले आहे. (प्रकटीकरण ११:१८; १६:१५; १७:१; १९:२, ११) जर, १९१४ मध्ये पहिल्या दृष्टांताच्या पूर्णतेची सुरवात दाखवली आहे तर मग, त्याचा शेवट केव्हा होतो? त्यातील संदेश प्रत्यक्षात दाखवून देतात की, तेथे उल्लेखित असणारी संघटना देवाची पृथ्वीवरील अभिषिक्‍त जनांची मंडळी आहे. या कारणास्तव, पहिल्या दृष्टांताची समाप्ती ही, त्या अभिषिक्‍त मंडळीचा शेवटला विश्‍वासू सदस्य निवर्ततो व त्याचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान होते तेव्हा होईल. तरीपण, प्रभूचा दिवस पृथ्वीवरील दुसरी मेंढरे यांजवरील आशीर्वादासह, ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या समाप्तीपर्यंत चालत राहील.—योहान १०:१६; प्रकटीकरण २०:४, ५.

५. (अ) एक वाणी योहानाला काय करायला सांगते? (ब) ‘सात मंडळ्यांचे’ स्थान, एखादी गुंडाळी त्यांच्याकडे पाठविण्यास अनुकूल होते ते कसे?

या पहिल्या दृष्टांतात, योहान काही पाहण्यापूर्वी असे काहीतरी ऐकतो: “मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली: ‘तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठीव.’” (प्रकटीकरण १:१०ब, ११) त्या कर्ण्याची हाक जणू अधिकारयुक्‍त आणि जणू आज्ञा केल्याप्रमाणे आहे. ती वाणी योहानास ‘सात मंडळ्यांना’ उद्देशून लिहिण्यास सांगते. त्याला अनेक संदेशाची मालिका मिळणार होती व ज्या गोष्टी तो पाहणार व ऐकणार होता त्या त्याला प्रकाशित करायच्या होत्या. हे लक्षात घ्या की, येथे उल्लेखिलेल्या मंडळ्या योहानाच्या दिवसात खरोखर अस्तित्वात होत्या. त्या सर्व आशिया मायनर येथे पात्म बेटावरील समुद्राच्या पलिकडे होत्या. त्या परिसरातील रोमी लोकांनी बनविलेल्या उत्कृष्ट सडकांमुळे तेथे या मंडळ्यांकडे सहजगत्या पोहचता येत होते. संदेशवाहकाला गुंडाळी, एका मंडळीकडून दुसरीला नेऊन देण्यात कसलाही अडथळा होऊ शकत नव्हता. या सात मंडळ्या, आधुनिक दिवसातील, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका विभागाशी सदृश्‍य होऊ शकतील.

६. (अ) “जे आहे,” असे म्हणण्याचा काय अर्थ होतो? (ब) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीतील आजची परिस्थिती, योहानाच्या काळातील परिस्थितीप्रमाणे असू शकेल याची आम्हाला कशी खात्री वाटते?

प्रकटीकरणातील बहुतेक भविष्यवाद योहानाच्या काळानंतर पूर्ण होणार होते. ‘जे लवकर झाले पाहिजे,’ त्याला अनुलक्षून या गोष्टी लिहिण्यात आल्या. पण त्या सात मंडळ्याकरता “जे आहे” असा देण्यात आलेला बोध, त्यावेळी तेथे जी परिस्थिती अस्तित्वात होती, त्याला अनुलक्षून होता. त्या सात मंडळ्यात नियुक्‍त केलेल्या वडिलांना, त्याचप्रमाणे त्या काळातील इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळ्यांनाही ते संदेश महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होते. * या दृष्टांताचा प्रमुख अवलंब प्रभूच्या दिवसासाठी असल्यामुळे, येशू जे काही म्हणतो ते, आमच्या काळातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीत जे काही घडू शकेल त्याची पूर्वसूचना देते.—प्रकटीकरण १:१०, १९.

७. या पहिल्या दृष्टांतामध्ये योहान कोणास बघतो आणि हे आज आम्हासाठी इतके महत्त्वाचे व थरारक का आहे?

या पहिल्या दृष्टांतात योहान, तेजस्वी प्रभु येशू ख्रिस्ताला, त्याच्या गौरवी स्वर्गीय वैभवात पाहतो. या प्रभूला स्वर्गाद्वारे नियुक्‍ती मिळाली आहे. त्याच्या मोठ्या दिवसाशी संबंधित असणाऱ्‍या भविष्यवाण्यांच्या या पुस्तकात याशिवाय आणखी कोणते प्रास्ताविक उचित दिसणार? आम्ही आज जे सध्या त्या काळात राहात आहोत व त्याच्या प्रत्येक आज्ञेकडे काळजीपूर्वक लक्ष देत आहोत, त्या आम्हासाठी यापेक्षा अधिक महत्त्वाचे ते काय असणार? शिवाय यहोवाच्या सार्वभौमत्वाला उंचावून धरणाऱ्‍यांना, ज्याने सैतानाने आणलेला छळ व सर्व परीक्षा सहन केल्या, १,९०० वर्षांपूर्वी त्याची “टाच” डसली गेली, त्यामुळे आलेला यातनामय मृत्यू सहन केला, मशीही संतान, आता स्वर्गात जिवंत आहे व देवाचा भव्य उद्देश त्याच्या वैभवी पूर्णतेस आणण्यास त्याला सामर्थ्य मिळाले आहे, हे जाणणे किती थरारक वाटणारे आहे!—उत्पत्ती ३:१५.

८. आता कोणती हालचाल करण्यास येशू सज्ज आहे?

सिंहासनाधिष्ठ झालेला राजा या नात्याने येशू आता हालचाल करण्यास सज्ज झालेला आहे हे उघड आहे. त्याची यहोवाचा प्रमुख दंडाधिकारी या नात्याने नेमणूक करण्यात आली असून त्याला हे जुने दुष्ट व्यवस्थीकरण व त्याचा दुष्ट, देव सैतान यांजविरुद्ध यहोवाचा अंतिम न्यायदंड बजावण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. याचवेळी अभिषिक्‍तांच्या त्या मंडळीचा, त्यांच्या सहवासातील मोठ्या लोकसमुदायाचा तसेच जगाचा न्याय देखील त्याला करावयाचा आहे.—प्रकटीकरण ७:४, ९; प्रेषितांची कृत्ये १७:३१.

९. (अ) सोन्याच्या समयांच्या मध्यभागी असलेल्या वैभवी येशू ख्रिस्ताचे योहान कसे वर्णन करतो? (ब) मंदिराची दृश्‍य रचना व येशूने घातलेले वस्त्र याद्वारे काय सूचित होते? (क) त्याच्या सोनेरी पट्ट्याने काय सूचित केले जाते?

योहान, मोठ्या वाणीच्या गर्जनेकडे वळतो व बघतो तो काय: “माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया.” (प्रकटीकरण १:१२) नंतर या सात समया काय आहेत ते योहानाला कळते. पण या समयांच्या मध्यभागी एक व्यक्‍ती उभी आहे जी त्याची नजर आकर्षून धरते. “आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला.” (प्रकटीकरण १:१३) येथे ‘मानवपुत्र’ येशू आश्‍चर्यचकित झालेला त्याचा साक्षी योहान याच्यासमोर स्वतःला भव्य झगझगीत प्रकाशातील आकृतीसमान सादर करतो. तो सोन्याच्या जळत्या समयांमध्ये अत्यंत तेजस्वी वैभवात प्रकट होतो. हे मंदिराची रचना असलेले दृश्‍य योहानावर या वस्तुस्थितीची छाप पाडते की, न्यायदानाच्या सामर्थ्यासह येशू यहोवाचा थोर प्रमुख याजक या भूमिकेत उपस्थित आहे. (इब्रीयांस ४:१४; ७:२१-२५) त्याचे पायघोळ वस्त्र त्याच्या याजकीय पदाला अनुरुप आहे. प्राचीन काळातील महायाजकाप्रमाणे तोही पट्टा—उरावर धारण केलेला सोन्याचा पट्टा—घालून आहे. यावरुन हे दिसते की, यहोवाकडून त्याला मिळालेली ईश्‍वरी नेमणूक तो पूर्ण हृदयाने पार पाडणार.—निर्गम २८:८, ३०; इब्रीयांस ८:१, २.

१०. (अ) येशूच्या बर्फासारख्या पांढऱ्‍या केसांनी व अग्नीच्या ज्वालेसमान डोळ्यांनी काय सूचित केले आहे? (ब) येशूचे पाय झगझगणाऱ्‍या ताम्रासारखे होते याची कोणती अपूर्वता दिसते?

१० योहान पुढे असे वर्णन देतो: “त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्‍या लोकरीसारखे, पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते.” (प्रकटीकरण १:१४) त्याचे बर्फासारखे पांढरे केस, त्याच्या अधिक वयोमानामुळे त्याच्या ठायी असलेले सुज्ञान दाखवून देते. (पडताळा नीतीसूत्रे १६:३१.) आणि त्याचे अग्नीज्वालेसमान डोळे दाखवून देतात की, जेव्हा तो शोध घेतो, परीक्षा करतो किंवा संताप व्यक्‍त करतो तेव्हा तो मर्मभेदक व दक्ष असतो. येशूचे पायसुद्धा योहानाचे लक्ष आकर्षित करतात: “त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे [ताम्रासारखे NW] होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.” (प्रकटीकरण १:१५) ह्‍या दृष्टांतात येशूचे पाय, ताम्रासारखे, झगझगणारे, लख्ख प्रकाशासारखे आहेत—जे यहोवा देवाच्या सान्‍निध्यात आवेशाने चालतात व उत्तम भूमिका बाळगून आहेत, अशांसाठी ते यथायोग्यतेत आहेत. शिवाय बायबलमध्ये ईश्‍वरी गोष्टी सोन्याद्वारे वारंवार चित्रित केल्या आहेत, याकरता मानवी गोष्टींचे कधी कधी ताम्राद्वारे प्रतिनिधीत्व केले जाते. * अशाप्रकारे, उत्तम ताम्रासारखे झगझगणारे येशूचे पाय, याची आठवण करुन देतात की, तो पृथ्वीवर असताना सुवार्तेचा प्रचार करतेवेळी त्याचे पाय किती “मनोरम” होते.—यशया ५२:७; रोमकर १०:१५.

११. (अ) येशूचे वैभवी पाय आम्हास कशाची आठवण देतात? (ब) येशूची वाणी “अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती,” याद्वारे काय सूचित होते?

११ खरोखरी, एक परिपूर्ण मानव या नात्याने, येशूठायी, असे तेज होते, जे देवदूतांना व मानवांना दिसू शकत होते. (योहान १:१४) त्याचे वैभवी पाय आम्हास ही आठवण करून देतात की, तो जेथे महायाजक आहे त्या यहोवाच्या संघटनेतील पवित्र भूमीवर ये-जा करीत आहे. (पडताळा निर्गम ३:५.) त्याची वाणी एखाद्या अवाढव्य पाण्याच्या धबधब्याप्रमाणे प्रचंड प्रतिध्वनी उठवीत आहे. ती प्रभावी, भयप्रेरित असून ज्यास अधिकृतरित्या देवाचा शब्द म्हटले आहे व जो ‘जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करण्यास’ आला आहे, त्यास ती समर्पक आहे.—प्रेषितांची कृत्ये १७:३१; योहान १:१.

१२. “तीक्ष्ण, दुधारी तरवार,” हिची अर्थसूचकता काय आहे?

१२ “त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तरवार निघाली आणि त्याची मुद्रा परमतेजाने प्रकाशणाऱ्‍या सूर्यासारखी होती. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो.” (प्रकटीकरण १:१६, १७अ) या सात ताऱ्‍यांचा अर्थ स्वतः येशू काहीसे नंतर स्पष्ट करतो. परंतु त्याच्या तोंडातून काय निघत आहे त्याकडे लक्ष द्या: “तीक्ष्ण, दुधारी तरवार.” केवढे हे समर्पक स्वरुप! कारण येशूची नेमणूक, त्याच्या शत्रूंच्या विरुद्ध, यहोवाचा अंतिम न्यायदंड घोषित करण्यासाठी झालेली आहे. त्याच्या तोंडातून निघणाऱ्‍या निर्णयात्मक वाणीचा परिणाम दुष्टांच्या उच्छेदनात होतो.—प्रकटीकरण १९:१३, १५.

१३. (अ) येशूची तेजस्वी, चकाकणारी मुद्रा आम्हास कशाची आठवण करून देते? (ब) योहानाने येशूचे जे वर्णन केले त्याद्वारे आम्हावर एकंदर कोणती छाप पडते?

१३ येशूची तेजस्वी, चकाकणारी मुद्रा आम्हाला, यहोवाने मोशेसोबत सिनाय डोंगरावर संभाषण केल्यावर त्याचा चेहरा जसा प्रकाशमान झाला होता, त्याची आठवण करून देते. (निर्गम ३४:२९, ३०) तसेच, हे सुद्धा लक्षात घ्या की, येशूचे १,९०० वर्षांपूर्वी त्याच्या प्रेषितांसमोर रुपांतर घडले, तेव्हा “त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.” (मत्तय १७:२) आता, प्रभूच्या दिवसातील दृष्टांतीय वर्णनात देखील येशूचे मुख, तो यहोवाच्या सान्‍निध्यात राहात आलेला असल्यामुळे तेजस्वी वैभव प्रतिबिंबित करते. (२ करिंथकर ३:१८) वस्तुतः योहानाच्या दृष्टांताने जी सर्वसमावेशक छाप शब्दध्वनित केली आहे ती, वैभवाच्या एका तेजाची, चकाकीची आहे. बर्फासारखे पांढरे केस, अग्नीज्वालेसारखे डोळे आणि चकाकणारी मुद्रा येथपासून ते झगझगणारे पाय येथपर्यंतच्या सर्व गोष्टी, तो “अगम्य प्रकाशात” राहात असल्याचा अभूतपूर्व दृष्टांत देतात. (१ तीमथ्य ६:१६) या दृश्‍याची यथार्थता खूपच जोमदार आहे! हे सर्व पाहून भयचकित झालेल्या योहानाची कोणती प्रतिक्रिया दिसली? प्रेषित आम्हास सांगतो: “मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो.”—प्रकटीकरण १:१७.

१४. वैभवी येशूबद्दल योहानास झालेल्या दृष्टांताचे वाचन करताना आपल्यावर कसा परिणाम होण्यास हवा?

१४ योहानाच्या दृष्टांताचे रंगपूर्ण, सविस्तर वर्णन आज देवाच्या लोकांना अंतःकरणपूर्वक गुणग्राहकतेने ग्रासून टाकत आहे. आता, तर आम्ही प्रभूच्या दिवसात ७० पेक्षा अधिक वर्षे पुढे आलेलो आहोत आणि सध्याही त्या दृष्टांताची थरारक पूर्णता चालू आहे. येशूची राज्यसत्ता आम्हासाठी केवळ भवितव्यातील आशा नसून ती एक जिवंत व सद्य वास्तवता आहे. यासाठीच, आम्हास निष्ठावंत प्रजाजन या नात्याने या पहिल्या दृष्टांतात योहान आणखी कसले वर्णन करतो ते अचंब्याने पाहणे, तसेच वैभवी येशू ख्रिस्ताची वाणी ऐकून तिचे आज्ञाधारकपणे श्रवण करणे हे योग्यच आहे.

[तळटीपा]

^ याच्या सविस्तर माहितीसाठी, या पुस्तकाच्या प्रकाशकांमार्फत वितरीत होणारे पुस्तक “तुझे राज्य येवो,” याची १२८-३९, १८६-९ ही पृष्ठे पहा.

^ पहिल्या शतकात जेव्हा एखाद्या मंडळीला कोणा प्रेषिताकडून पत्र येई तेव्हा ते, इतर मंडळ्यांना पाठविण्याची प्रथा होती. त्यामुळे सर्वांनासूचनेकडून लाभ मिळवता येत होता.—पडताळा कलस्सैकर ४:१६.

^ शलमोनाच्या मंदिरातील आतील सजावट तसेच सामान सोन्याचे बनविले किंवा त्याला त्याचा मुलामा दिला होता, पण अंगणात मात्र सोनपितळ किंवा ताम्र वापरण्यात येत असे.—१ राजे ६:१९-२३, २८-३५; ७:१५, १६, २७, ३०, ३८-५०; ८:६४.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्रे]

सात मंडळ्या जेथे होत्या तेथील उत्खननातील अवशेष बायबल अहवालास पुष्टी देतात. येशूचा प्रोत्साहनदायक संदेश येथेच पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना मिळाला; हाच संदेश या २० व्या शतकातील जगभर असणाऱ्‍या मंडळ्यांना प्रोत्साहित करीत आहे

पर्गम

स्मुर्णा

थुवतीरा

सार्दीस

इफिस

फिलदेल्फिया

लावदिकीया