व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विजयाचे नवे गीत गाणे

विजयाचे नवे गीत गाणे

अध्याय २९

विजयाचे नवे गीत गाणे

दृष्टांत ९​—प्रकटीकरण १४:१–२०

विषय: कोकऱ्‍यासोबत १,४४,००० सीयोन डोंगरावर उभे आहेत; देवदूताची घोषणा सबंध जगभर होते; कापणी केली जाते

पूर्णतेचा काळ: १९१४ पासून ते मोठ्या संकटापर्यंत

१. आपण प्रकटीकरणाच्या ७, १२ व १३ व्या अध्यायातून काय शिकू शकलो व आता काय शिकणार आहोत?

 आता योहानाच्या पुढील दृश्‍याकडे वळणे किती उत्साहवर्धक वाटते! कारण येथे अजगराच्या विचित्र श्‍वापद संघटनेचे चित्र नव्हे तर यहोवाचे निष्ठावंत सेवक व प्रभूच्या दिवसातील त्यांच्या कार्यहालचाली पहावयास मिळतात. (प्रकटीकरण १:१०) आपण प्रकटीकरण ७:१, ३ मध्ये आधीच पाहिले आहे की, सर्व १,४४,००० अभिषिक्‍त दासांवर शिक्का मारुन होईपर्यंत पृथ्वीच्या चार नाशकारक वाऱ्‍यांना अडवून धरण्यात आले होते. प्रकटीकरण १२:१७ ने कळवले आहे की, स्त्रीच्या “संतानापैकी बाकीचे जे लोक” त्यावेळी सैतान या अजगराचे विशेष लक्ष्य बनले होते. प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायात सैतानाने यहोवाच्या विश्‍वासू सेवकांवर क्रूर छळ व प्रखर दबाव आणण्यासाठी पृथ्वीवर राजकीय संघटनांना कसे उदयास आणले त्याचे चित्र दिले आहे. पण त्या देवाच्या आद्य शत्रूला देवाचा उद्देश हाणून पाडता येत नाही! सैतानाने कितीही द्वेषपूर्ण हालचाली आचरल्या असल्या तरी, सर्व १,४४,००० जणांचे कसे विजयशाली एकत्रीकरण करण्यात येते तेच आपण आता पाहणार आहोत.

२. प्रकटीकरण १४:१ मध्ये योहान आनंदी शेवटाची कोणती झलक आम्हाला दाखवतो आणि हा कोकरा कोण आहे?

त्या आनंदी परिणामाची एक झलक योहान तसेच आजच्या योहान वर्गाला दिलेली आहे: नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते.” (प्रकटीकरण १४:१) आपण आधी पाहिले त्याप्रमाणे हा कोकरा तोच मीखाएल आहे, ज्याने दियाबल व त्याच्या दुरात्म्यांना हाकलून देऊन स्वर्ग शुद्ध केला होता. हा तोच मीखाएल आहे, ज्याच्याबद्दल दानीएलाने वर्णन करताना म्हटले की, तो यहोवाच्या नीतीमान न्यायदंडांची अंमलबजावणी करण्यासाठी “उठेल,” तेव्हा देवाच्या “लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपति” म्हणून उभा राहील. (दानीएल १२:१; प्रकटीकरण १२:७, ९) स्वतःचे आत्मबलिदान करणारा देवाचा कोकरा १९१४ पासून सीयोन डोंगरावर मशीही राजा या नात्याने उभा आहे.

३. जेथे कोकरा व १,४४,००० जण ‘उभे’ आहेत तो ‘सीयोन डोंगर’ कोणता आहे?

आधी यहोवाने असेच भाकीत केले होते: “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.” (स्तोत्र २:६; ११०:२) हे, दाविदाच्या वंशातील मानवी राजे जेथे राज्य चालवीत ते, पार्थिव यरुशलेम भौगोलिक दृष्टीने जेथे होते त्या पृथ्वीवरील सीयोन डोंगराला अनुलक्षून नाही. (१ इतिहास ११:४-७; २ इतिहास ५:२) कारण, येशूचा सा. यु. ३३ मध्ये मृत्यू व पुनरुत्थान झाल्यावर त्याला स्वर्गीय सीयोनेचा कोनशिला असे करण्यात आले. हे स्वर्गीय सीयोन असे उच्च ठिकाण आहे जेथे यहोवाने “जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम” वसविण्याचे ठरविले आहे. यास्तव, ‘सीयोन डोंगर’ हा येशू तसेच त्याच्या सहवारीसांना प्राप्त होणारी उच्च स्थिती याला सूचित करतो; त्या सर्वांचे मिळून स्वर्गीय यरुशलेम, एक राज्य बनते. (इब्रीयांस १२:२२, २८; इफिसकर ३:६) ही अशी वैभवी बादशाही स्थिती आहे, जेथे यहोवा त्यांना प्रभूच्या दिवसामध्ये उंचावतो. अभिषिक्‍त ख्रिस्ती यांनी शेकडो वर्षांपासून ‘जिवंत धोंडे’ या नात्याने या स्वर्गीय सीयोन डोंगरावर उभे राहण्यासाठी आणि वैभवी येशू ख्रिस्तासोबत त्याच्या ऐश्‍वर्यशाली राज्यात येऊन मिळण्यासाठी मोठ्या उत्साहाने अपेक्षा धरली होती.—१ पेत्र २:४-६; लूक २२:२८-३०; योहान १४:२, ३.

४. सर्व १,४४,००० जण सीयोन डोंगरावर उभे आहेत हे कसे?

सीयोन डोंगरावर योहान केवळ येशूलाच नव्हे तर स्वर्गीय राज्याच्या १,४४,००० सहवारीसांच्या पूर्ण गटाला उभे असल्याचे बघतो. दृष्टांताद्वारे जो काळ सूचित आहे त्यावेळी १,४४,००० मधील सर्व नव्हे, परंतु पुष्कळजण आधीच स्वर्गात होते. नंतर याच दृष्टांतात योहानाला कळते की, पवित्र जनांपैकी काही जनांनी धीर धरला पाहिजे व मरणापर्यंत विश्‍वासू राहिले पाहिजे. (प्रकटीकरण १४:१२, १३) याचा अर्थ, या १,४४,००० पैकी काही जण अद्याप पृथ्वीवर आहेत हे उघड आहे. असे आहे तर मग, योहान त्या सर्वांना येशूसोबत सीयोन डोंगरावर उभे असल्याचे कसे बघतो? * ते या अर्थी की, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या मंडळीचे सदस्य या नात्याने ते “सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम” येथे आले आहेत. (इब्रीयांस १२:२२) पौल अद्याप या पृथ्वीवर असताना त्याच्यासारखेच हे देखील आधीच—आध्यात्मिक अर्थाने—ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गलोकी उठविले गेले आहेत. (इफिसकर २:५, ६) याशिवाय, १९१९ मध्ये त्यांनी “इकडे वर या” या निमंत्रणाला प्रतिसाद दिला व ते लाक्षणिक मार्गाने ‘मेघारूढ होऊन स्वर्गात गेले.’ (प्रकटीकरण ११:१२) या शास्त्रवचनांच्या दृष्टिकोनातून आपण सर्व १,४४,००० जनांना—आध्यात्मिक अर्थाने—येशू ख्रिस्तासोबत सीयोन डोंगरावर उभे असल्याचे पाहू शकतो.

५. कोणाची नावे १,४४,००० यांच्या कपाळावर लिहिण्यात आली आहेत आणि त्या प्रत्येक नावाची अभूतपूर्वता काय आहे?

श्‍वापदाची उपासना करणाऱ्‍या व आपल्यावर ६६६ या लाक्षणिक संख्येची खूण धारण करणाऱ्‍या लोकांत १,४४,००० जणांचा कसलाही सहभाग नाही. (प्रकटीकरण १३:१५-१८) उलट, या निष्ठावानांच्या कपाळावर देवाचे तसेच कोकऱ्‍याचे नाव लिहिलेले आहे. योहान यहूदी असल्यामुळे त्याने देवाचे नाव יהוה या इब्री अक्षरात बघितले. * येशूच्या पित्याचे नाव सांकेतिकपणे आपल्या कपाळावर लिहिल्यामुळे हे शिक्का मारण्यात आलेले लोक सर्वांना, आपण यहोवाचे साक्षीदार, त्याचे दास आहोत हे जाहीर करतात. (प्रकटीकरण ३:१२) त्यांच्या कपाळावर येशूचे नाव दिसून येण्यामुळे ते त्याच्याही मालकीचे आहेत हे सूचित होते. तो त्यांचा वचनबद्ध “पति” असून ते त्याची भावी ‘वधू,’ “नवी उत्पत्ती” आहेत व ते देवाची सेवा, स्वर्गीय जीवन दृष्टीपथात ठेवून करतात. (इफिसकर ५:२२-२४; प्रकटीकरण २१:२, ९; २ करिंथकर ५:१७) यहोवा व येशू ख्रिस्ताबरोबर त्यांचे जवळीकीचे नातेसंबंध त्यांचे विचार व कृती यावर प्रभाव पाडतात.

जणू काय एक नवे गीत गातात

६. योहान कोणते गाणे ऐकतो व तो त्याचे वर्णन कसे देतो?

याच्याच सहमतात, योहान कळवतो: आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जी वाणी मी ऐकली ती, जसे काय वीणा वाजविणारे आपल्या वीणा वाजवीत आहेत, अशी होती. ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्‍यांच्यासमोर जसे काय एक ‘नवे गीत गात होते’; ते गीत, पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्‍यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.” (प्रकटीकरण १४:२, ३) योहानाने १,४४,००० जणांचे एकसुरातील गायन ऐकल्यावर त्याला गर्जनादायक धबधबा आणि प्रचंड गडगडाट यांची आठवण झाली असावी यात शंका नाही. त्याला वीणा या वाद्याची किती सुरेख जोड मिळाली आहे! (स्तोत्र ८१:२) पृथ्वीवरील असा कोणता सूर त्या भव्य सुरांची नक्कल करू शकेल?

७. (अ) प्रकटीकरण १४:३ मधील नवे गीत काय आहे? (ब) स्तोत्र १४९:१ चे गीत आमच्या दिवसात कसे नवे आहे?

पण हे “नवे गीत” काय आहे? आपण प्रकटीकरण ५:९, १० ची चर्चा करताना हे पाहिले की, यहोवाचे राज्य उद्देश आणि आध्यात्मिक इस्राएलांना “आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक” करण्यासाठी येशू ख्रिस्ताद्वारे करण्यात आलेली अद्‌भुत तरतूद याजशी त्याचा संबंध आहे. देवाचा इस्राएल याच्या खातर तसेच याच्याद्वारे यहोवा ज्या नवनवीन गोष्टी प्रसिद्ध करीत आहे त्याच्या स्तुतीस्तव हे गीत आहे. (गलतीकर ६:१६) आध्यात्मिक इस्राएलाचे सदस्य स्तोत्रकर्त्याच्या या निमंत्रणाला प्रतिसाद देतात: “परमेश्‍वराचे [याह, NW] स्तवन करा; नवे गीत गाऊन परमेश्‍वराचे [यहोवा, NW] गुणगान करा. भक्‍तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत.” (स्तोत्र १४९:१, २) हे खरे की, हे शब्द शतकांआधी लिहिण्यात आले, पण आमच्या दिवसात याचेच गायन नव्या अर्थाने गायिले जात आहे. मशीही राज्याचा १९१४ मध्ये जन्म झाला. (प्रकटीकरण १२:१०) यहोवाच्या पृथ्वीवरील लोकांनी १९१९ मध्ये ‘राज्याच्या वचनांची’ नव्या चैतन्याने घोषणा करण्याची सुरवात केली. (मत्तय १३:१९) संस्थेने १९१९ मध्ये योजिलेल्या वार्षिक वचनाने (यशया ५४:१७) चेतविले जाऊन आणि आध्यात्मिक नंदनवनाच्या पुनर्वसनामुळे उत्तेजित होऊन त्यांनी त्या वर्षी ‘आपल्या अंतःकरणात यहोवाला गायनवादन करण्याचे’ सुरु केले.—इफिसकर ५:१९.

८. प्रकटीकरण १४:३ मधील नवे गीत केवळ १,४४,००० लोक गाऊ शकतात असे का?

प्रकटीकरण १४:३ मध्ये उल्लेखण्यात आलेले गीत केवळ १,४४,००० लोकांनाच गाता येते असे का आहे? कारण याचा संबंध, त्यांची देवाच्या राज्याचे वारसदार या अर्थी जी निवड झाली आहे त्याच्याशी आहे. देवाचे पुत्र म्हणून केवळ त्यांनाच दत्तक घेतले गेले आहे व त्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाला आहे. स्वर्गीय राज्याचा भाग बनण्यासाठी केवळ यांनाच पृथ्वीवरून विकत घेण्यात आले आहे आणि केवळ हेच लोक ‘याजक होतील आणि ते . . . [ख्रिस्ताबरोबर] हजार वर्षे राजे म्हणून राज्य करतील,’ आणि मानवजातीला परिपूर्णतेप्रत आणतील. हेच केवळ असे आहेत ज्यांना यहोवाच्या सान्‍निध्यापुढे “जसे काय एक नवे गीत” गाताना पाहण्यात आले आहे. * हे अद्वितीय अनुभव आणि भवितव्य त्यांची राज्याबद्दलची गुणग्राहकता वाढवते आणि त्यांना अशाप्रकारे गायन करायला लावते, जे इतर कोणालाही जमणार नाही.—प्रकटीकरण २०:६; कलस्सैकर १:१३; १ थेस्सलनीकाकर २:११, १२.

९. अभिषिक्‍तांच्या गाण्याला मोठ्या लोकसमुदायाने कसा प्रतिसाद दिला आहे आणि यामुळे त्यांनी कोणत्या आर्जवाची पूर्णता केली?

तरीपण इतर लोक हे गीत ऐकून त्याला प्रतिसाद देत आहेत. दुसरी मेंढरे याच्या वाढत्या लोकसमुदायाने १९३५ पासून हे विजयी गाणे ऐकले आहे आणि देवाच्या राज्याची प्रसिद्धी यांच्यासह मिळून करण्यात तेही प्रवृत्त झाले आहेत. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९) त्या नव्या लोकांना, देवाच्या राज्याचे त्यांचे भावी शासक जे नवे गीत गातात ते गाता येऊ शकत नाही. तरी हे देखील यहोवाच्या स्तुतीचे मंजूळ सांघिक ध्रुपद यहोवा त्यांच्यासाठी ज्या नव्या गोष्टी करीत आहे त्यासाठी वापरीत आहेत. हे यहोवाच्या स्तुतीस्तव धार्मिक गाणे आहे. अशाप्रकारे ते स्तोत्रकर्त्याच्या या आर्जवास पूर्ण करीत आहेत: “परमेश्‍वराचे [यहोवा, NW] गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी, परमेश्‍वराचे [यहोवा, NW] गुणगान कर. परमेश्‍वराचे [यहोवा, NW] गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्‌भुतकृत्ये जाहीर करा. अहो मानवकुलांनो, परमेश्‍वर यहोवाचे गौरव करा. परमेश्‍वराचे [यहोवा, NW] गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की, ‘परमेश्‍वर [यहोवा, NW] राज्य करितो’”—स्तोत्र ९६:१-३, ७, १०; ९८:१-९.

१०. त्या १,४४,००० लोकांना लाक्षणिक २४ ‘वडिलांपुढे’ कसे गायन करता येणे शक्य आहे?

१० वैभवी स्वर्गीय दर्जावर स्थानापन्‍न झालेले २४ वडील तर १,४४,००० जण आहेत तरी हे १,४४,०००, लोक ‘वडिलांपुढे’ कसे गायन करू शकतात? आरंभाला प्रभूच्या दिवसात “ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत” त्यांचे आत्मिक प्राणी म्हणून पुनरुत्थान करण्यात आले. अशाप्रकारे, ज्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी विजय मिळवला ते आता स्वर्गात असून ते याजक वडिलांच्या २४ तुकड्यांच्या कर्तव्यांची पूर्णता लाक्षणिकपणे करीत आहेत. यांना यहोवाच्या स्वर्गीय संघटनेच्या दृष्टांतात सामील करण्यात आलेले आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:१५, १६; १ इतिहास २४:१-१८; प्रकटीकरण ४:४; ६:११) यामुळे १,४४,००० पैकी अद्याप पृथ्वीवर असणारे, ते नवे गीत जणू स्वर्गातील त्यांच्या पुनरुत्थित बांधवांच्या पुढे किंवा नजरेसमोर गात आहेत.

११. अभिषिक्‍त विजेत्यांना २४ वडील व १,४४,००० असे का संबोधण्यात आले आहे?

११ येथे आपल्याला कदाचित असे विचारता येईल: या अभिषिक्‍त विजेत्यांना लाक्षणिक २४ वडील तसेच १,४४,००० अशाप्रकारे का संबोधण्यात आले आहे? याचे कारण हे की, या गटाला प्रकटीकरण दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघते. २४ वडिलांना यहोवाच्या सिंहासनाभोवती स्वर्गातील राजे व याजक या त्यांच्या अंतिम स्थितीच्या अनुषंगाने नेहमी दाखवण्यात आले आहे. ते १,४४,००० यांच्या स्वर्गातील सबंध गटाच्या स्थितीचे चित्र देतात; यापैकीचा केवळ लहानसा शेष या पृथ्वीवर सध्या आहे. (प्रकटीकरण ४:४, १०; ५:५-१४; ७:११-१३; ११:१६-१८) तथापि, प्रकटीकरणाचा ७ वा अध्याय १,४४,००० यांवर, ते मानवजातीतून विकत घेण्यात आलेले या अर्थी लक्ष केंद्रित करतो व तो अध्याय आध्यात्मिक इस्राएलाच्या प्रत्येक सदस्यावर शिक्कामोर्तब करण्याचे आणि अगणित मोठ्या लोकसमुदायास तारण देण्यावर भर देतो. प्रकटीकरणाचा १४ अध्याय, १,४४,००० चा संपूर्ण राज्याचा वर्ग वैयक्‍तिक विजेते म्हणून कोकऱ्‍यासोबत सीयोन डोंगरावर एकत्रित होतील याचे चित्र देतो. १,४४,००० मध्ये समाविष्ट होण्यासाठी जी गुणविशेषता जरुरीची आहे तिचीही माहिती दिलेली आहे, जे आम्ही आता पाहणार आहोत. *

कोकऱ्‍याचे अनुयायी

१२. (अ) योहान १,४४,००० जनांचे आपले वर्णन पुढे कसे देतो? (ब) या १,४४,००० जनांना कोणत्या अर्थी कुमारी किंवा शुद्ध असे म्हणण्यात आले आहे?

१२ “पृथ्वीवरुन विकत घेतलेले” १,४४,००० जण याबद्दलचे वर्णन पुढे देताना योहान म्हणतो: स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकऱ्‍यासाठी प्रथमफळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही; ते निष्कलंक आहेत.” (प्रकटीकरण १४:४, ५) हे १,४४,००० “शुद्ध आहेत” याचा हा अर्थ नाही की, त्यांचे दैहिकरित्या लग्न झालेले नाही. स्वर्गीय वतनदारी असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रेषित पौलाने लिहिले की, ख्रिस्ती सडेपणा काही अंशी लाभदायक असला तरी काही परिस्थितीत विवाह योग्य ठरू शकतो. (१ करिंथकर ७:१, २, ३६, ३७) तेव्हा ज्याद्वारे या वर्गाची ओळख मिळते ते आहे त्यांचे आध्यात्मिक कौमार्य किंवा शुद्धता. यांनी जगाचे राजकारण आणि खोटा धर्म याविरुद्ध आध्यात्मिक जारकर्म करण्याचे टाळले आहे. (याकोब ४:४; प्रकटीकरण १७:५) ख्रिस्ताची वधू या नात्याने वाग्दत्त असल्यामुळे ते स्वतःला ‘ह्‍या कुटिल व विपरीत पिढीत निर्दोष व निरुपद्रवी’ व शुद्ध ठेवतात.—फिलिप्पैकर २:१५.

१३. येशू ख्रिस्तासाठी १,४४,००० ही योग्य वधू का आहे आणि ते “जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे” कसे जातात?

१३ याखेरीज, “त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही.” याबाबतीत, ते त्यांचा राजा येशू ख्रिस्तासारखे आहेत. परिपूर्ण मानव या नात्याने “त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.” (१ पेत्र २:२१, २२) निर्दोष व सत्य असल्यामुळे या १,४४,००० जणांची यहोवाच्या प्रमुख याजकाची शुद्ध वधू या नात्याने तयारी होते. येशू पृथ्वीवर असताना त्याने सरळ अंतःकरणाच्या लोकांना त्याचे अनुकरण करण्यास सांगितले. (मार्क ८:३४; १०:२१; योहान १:४३) ज्यांनी प्रतिसाद दिला अशांनी त्याच्या मार्गांचे अनुकरण केले व त्याची शिकवण अनुसरली. अशाप्रकारे, ते आपल्या पृथ्वीवरील जीवनाक्रमणात “जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे” जातात व तो त्यांचे या सैतानी जगात मार्गदर्शन करतो.

१४. (अ) हे १,४४,००० लोक “देवासाठी व कोकऱ्‍यासाठी प्रथमफळ असे” कसे आहेत? (ब) मोठा लोकसमुदाय देखील कोणत्या अर्थी प्रथम फळ आहे?

१४ ते १,४४,००० जण “पृथ्वीवरुन विकत घेतलेले,” “माणसातून विकत घेतलेले,” आहेत. त्यांना देवाचे आत्मिक पुत्र असे दत्तक घेतले जाते व मग, पुनरुत्थानानंतर ते रक्‍तमांसाचे लोक राहात नाहीत. ४ थ्या वचनात सांगितल्याप्रमाणे ते “देवासाठी व कोकऱ्‍यासाठी प्रथमफळ” होतात. हे खरे की, मागे पहिल्या शतकात येशू हा “महानिद्रा घेणाऱ्‍यातले प्रथमफळ असा” होता. (१ करिंथकर १५:२०, २३) पण १,४४,००० हे अपूर्ण मानवजातीतील “जसे काय प्रथम फळ” असे असून त्यांना येशूच्या बलिदानामार्फत विकत घेण्यात आले. (याकोब १:१८) असे असले तरी, मानवजातीतून फळे गोळा करण्याचे काम यांच्याबरोबर संपत नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकाने अगणित अशा मोठ्या लोकसमुदायाचे एकत्रीकरण करण्याकडे निर्देश केला आहे. तो समुदाय मोठ्याने म्हणतो: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून तारण आहे.” हा मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून पार होईल व तो ‘जीवनी पाण्याच्या झऱ्‍यातून’ तजेला मिळवत राहील तसतशी त्यांची पृथ्वीवर परिपूर्ण मानव होण्यात वाढ होईल. मोठे संकट सरुन गेल्याच्या काही काळानंतर हेडीज रिकामे होईल आणि इतर अगणित लाखो जणांचे पुनरुत्थान होऊन यांनाही त्याच जीवनाच्या पाण्यातून पिण्याची संधी मिळेल. हे लक्षात घेता, मोठ्या लोकसमुदायाला दुसरी मेंढरे याजमधील प्रथम फळ आहे असे म्हणणे योग्य ठरेल—कारण ते प्रथम ‘आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र करतात,’ व पृथ्वीवर सर्वकाळ जिवंत राहण्याची आशा बाळगतात.—प्रकटीकरण ७:९, १०, १४, १७; २०:१२, १३.

१५. तीन वेगवेगळी प्रथम फळे आणि मोशेच्या नियमशास्त्रानुसार जे सण आचरले जात, त्यामध्ये कोणकोणत्या साम्यता आढळतात?

१५ ही तिन्ही प्रथमफळे (येशू ख्रिस्त, १,४४,००० व मोठा लोकसमुदाय) मोशेच्या नियमशास्त्रानुसार जे सण आचरण्यात येत होते त्यांच्याशी अगदी मनोरंजकपणे तुल्य आहेत हे पाहता येईल. निसान १६ रोजी, बेखमीर भाकरीच्या सणामध्ये सातूच्या हंगामातील पहिल्या पिकाची पेंढी यहोवाला दिली जात होती. (लेवीय २३:६-१४) येशूचे मृतातून पुनरुत्थान निसान १६ रोजीच झाले. निसान १६ पासूनच्या ५० व्या दिवशी, तिसऱ्‍या महिन्यात, इस्राएल लोक शेतात पेरलेल्या गव्हाच्या पहिल्या पिकांचा हंगाम म्हणून कापणीचा सण पाळीत. (निर्गम २३:१६; लेवीय २३:१५, १६) याला पेंटेकॉस्ट (ग्रीक शब्दातून आलेला, ज्याचा अर्थ “पन्‍नासावा” होतो) म्हणू लागले व सा. यु. ३३ च्या याच पेंटेकॉस्टच्या दिवशी १,४४,००० सदस्यांपैकी पहिल्या सदस्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला. शेवटी, सातव्या महिन्यात सगळे पीक कापून गोळा केल्यावर, मंडपाचा सण पाळला जात असे, हा आनंदी ईशोपकारस्मरणाचा काळ होता; यावेळी इस्राएल लोक एक आठवडाभर मंडपात राहात, हे मंडप इतर गोष्टींसमवेत झावळ्यांनी बांधीत असत. (लेवीय २३:३३-४३) यालाच अनुलक्षून, मोठ्या एकत्रीकरणाचा भाग असलेला मोठा लोकसमुदाय, राजासनासमोर आपल्या “हाती झावळ्या” घेऊन देवाचे आभार मानतो.—प्रकटीकरण ७:९.

सार्वकालिक सुवार्ता घोषित करणे

१६, १७. (अ) योहान देवदूताला कोठे उडताना बघतो आणि तो देवदूत काय घोषणा करतो? (ब) राज्य-प्रचार करण्याच्या कामात कोण सहभागी होत आहेत आणि कोणते अनुभव ते सूचित करतात?

१६ योहान पुढे लिहितो: नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला:देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.’” (प्रकटीकरण १४:६, ७) हा दूत, आकाशात पक्षी जेथे उडतात तेथे, “अंतराळाच्या मध्यभागी” उडत होता. (पडताळा प्रकटीकरण १९:१७.) या कारणामुळे त्याचा आवाज सबंध पृथ्वीभर ऐकू येऊ शकतो. देवदूताने जी जगभर घोषणा केली ती आधुनिक दूरदर्शन बातम्यांच्या पल्ल्यांपेक्षा किती मोठ्या पल्ल्याची असेल!

१७ प्रत्येकाला श्‍वापद व त्याच्या मूर्तीची नव्हे तर, यहोवा जो, सैतानाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्‍या कोणत्याही लाक्षणिक श्‍वापदापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे, त्याची भीती बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. यहोवानेच आकाश व पृथ्वीची निर्मिती केली आहे व आता पृथ्वीचा न्यायनिवाडा करायची त्याची वेळ आली आहे! (पडताळा उत्पत्ती १:१; प्रकटीकरण ११:१८.) पृथ्वीवर असताना येशूने आमच्या काळाबद्दल असे भाकीत केले होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची मंडळी ती आज्ञा पूर्ण करीत आहे. (१ करिंथकर ९:१६; इफिसकर ६:१५) प्रकटीकरण येथे प्रकट करते की, या प्रचारकार्यात अदृश्‍य देवदूत देखील सहभाग घेत आहेत. जेथे एका घरी कोणी अत्यंत त्रासलेला माणूस आध्यात्मिक गोष्टीची कळकळीची इच्छा बाळगून होता व तो त्यासाठी प्रार्थना देखील करीत होता अशा ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाला स्वर्गीय देवदूतांनी मार्गदर्शन दिल्याचे कितीतरी वेळा उघड झाले आहे!

१८. अंतराळात मध्यभागी उडणाऱ्‍या देवदूताच्या मते, कशाची घटिका आली होती आणि आता पुढे कोण घोषणा करणार आहेत?

१८ देवदूत अंतराळात मध्यभागी उडत असता, त्याने न्यायनिवाडा करण्याची घटिका जवळ आल्याचे घोषित केले. आता देव कोणत्या प्रकारचा न्याय करणार आहे? यानंतर दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा देवदूत जी घोषणा करणार ते ऐकून आपले कान भणभणतील.—यिर्मया १९:३.

[तळटीपा]

^ पहिले करिंथकर ४:८ दाखवते तसे, अभिषिक्‍त ख्रिस्तीजन पृथ्वीवर असताना राज्य करीत नाहीत. तरी देखील, प्रकटीकरण १४:३, ६, १२, १३ च्या संदर्भानुसार ते सुवार्तेचा प्रचार करून नवे गीत गात आहेत आणि आपल्या पृथ्वीवरील जीवनाक्रमणाच्या शेवटापर्यंत टिकून राहात आहेत.

^ याला, इतर आवृत्त्यांमध्ये इब्री नामांचा ज्यापद्धतीने वापर करण्यात आलेला आहे त्याद्वारे पुष्टी दिली गेली आहे: येशूला “अबद्दोन,” (म्हणजे, “नाश”) हे नाव दिलेले आहे व तो न्यायाची अंमलबजावणी “इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या” ठिकाणी करतो.—प्रकटीकरण ९:११; १६:१६.

^ शास्त्रवचन सांगते की, “जसे काय एक नवे गीत,” कारण हे गीत प्राचीन काळी भविष्यवादित शब्दात लिखित करण्यात आले होते. तथापि, ते गाण्यास त्यावेळी कोणीही पात्र नव्हता. आता राज्याची प्रस्थापना व पवित्र जनांचे पुनरुत्थान झाल्यामुळे भविष्यवादांची पूर्णता होण्यास प्रचंड प्रमाणात सुरवात झाली आणि आता ते गीत त्याच्या पूर्ण सुरात व भव्य प्रमाणात गाण्याची वेळ झाली होती.

^ ह्‌या परिस्थितीची तुलना यथाकाळी आपल्या परिवाराला अन्‍न पुरविणाऱ्‍या विश्‍वासू व बुद्धिमान दासासोबत केली जाऊ शकते. (मत्तय २४:४५) हा दास, एक वर्ग या नात्याने अन्‍नाचा पुरवठा करण्यास जबाबदार आहे, पण परिवार या नात्याने या गटाचे वैयक्‍तिक सदस्य त्या आध्यात्मिक तरतूदीत सहभागी होऊन आपले पोषण करतात. तो तोच गट आहे, ज्याचे वेगवेगळ्या प्रकाराने—सामूहिक व वैयक्‍तिकपणे—वर्णन दिले आहे.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२०२, २०३ पानांवरील चित्रे]

१,४४,०००

२४ वडील

ख्रिस्त येशू या कोकऱ्‍याचे सहवारीस, यांना दोन वेगळ्‌या दृष्टीने पाहिले जाते