“सैतानाच्या खोल म्हणविलेल्या गोष्टी” यांचा तिरस्कार करणे
अध्याय १०
“सैतानाच्या खोल म्हणविलेल्या गोष्टी” यांचा तिरस्कार करणे
थुवतीरा
१. थुवतीरा इतर मंडळ्यांच्या संदर्भात कसे वसलेले होते, व तेथे कोणत्या प्रकारचे धार्मिक वातावरण होते?
बर्गमा (पर्गम) याच्या आग्नेय दिशेकडे साधारण ४० मैलावर, तुर्कांचे भरभराट होत असलेले अखिसार शहर आहे. साधारण १,९०० वर्षांपूर्वी हे शहर थुवतीराचे स्थळ होते. एखादा प्रवासी पर्यवेक्षक, पर्गमपासून आंतर्देशीय मार्गाने सहजरित्या थुवतीरा येथे पोहंचू शके व तेथून पुढे तो प्रकटीकरणाच्या ३ ऱ्या अध्यायातील उरलेल्या मंडळ्या म्हणजे, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या विभागांना भेटी देऊ शकत होता. पर्गमप्रमाणे थुवतीरा हे सम्राटाच्या भक्तीचे केंद्र नव्हते; पण येथे मूर्तिपूजक दैवतांना समर्पित केलेली पवित्र स्थळे व मंदिरे होती. थुवतीरा व्यापारी केंद्र म्हणून लक्षवेधक होते.
२, ३. (अ) थुवतीरा नगरात सुरवातीला ख्रिस्ती झालेल्यांची कोणती नोंद आहे? (ब) येशू हा “देवाचा पुत्र” आहे, तसेच त्याचे डोळे “अग्नीज्वालेसारखे” आहेत याची थुवतीरा येथील ख्रिश्चनांना कोणती अभूतपूर्वता आहे?
२ प्रेषित पौल मासेदोनियात प्रचार करीत होता तेव्हा त्याला जांभळी वस्त्रे विकणारी थुवतीरा नगरातील एक लुदिया नावाची स्त्री भेटली. लुदिया व तिच्या घराण्यातील सर्वांनी, पौल प्रचार करीत असलेल्या संदेशाचा आनंदाने स्वीकार केला आणि त्याला असामान्य असे आदरातिथ्य प्रदर्शित केले. (प्रे. कृत्ये १६:१४, १५) ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणारी पहिली थुवतीरा महिला अशी तिची अहवालात नोंद आहे. काही काळात तेथे एक ख्रिस्ती मंडळी स्थापन झाली. तिलाच उद्देशून येशू आपला लांबलचक संदेश देतो. तो म्हणतो: “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, आणि ज्याचे पाय सोनपितळेसारखे [ताम्रासारखे, NW] आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो.”—प्रकटीकरण २:१८.
३ प्रकटीकरणात इतर ठिकाणी येशू, यहोवाचा उल्लेख ‘माझा पिता’ असा करीत असला तरी हे एकच असे ठिकाण आहे जेथे “देवाचा पुत्र” ही संज्ञा आढळते. (प्रकटीकरण २:२७; ३:५, २१) या पदवीच्या उपयोगामुळे थुवतीरामधील ख्रिश्चनांना, येशूचा यहोवासोबत असणारा सलोखा याची जाणीव झाली असावी. या पुत्राचे डोळे अग्नीज्वालेसमान आहेत—ती थुवतीरा येथील ख्रिश्चनांना एक ताकीद आहे की, मंडळीस दूषित करणाऱ्या कशाविरुद्ध देखील त्याचा न्यायदंड भडकेल. उजळ ताम्रासमान त्याच्या पायांचा दुसऱ्यांदा उल्लेख करुन तो पृथ्वीवरील आपल्या विश्वासूपणाच्या तेजोमय उदाहरणावर जोर देतो. थुवतीरामधील ख्रिश्चनांनी त्या सल्ल्याकडे लक्ष दिले यात संशय नाही, तसेच आम्ही देखील आज त्याकडे लक्ष दिले पाहिजे.—१ पेत्र २:२१.
४, ५. (अ) थुवतीरा येथील ख्रिश्चनांची येशू का प्रशंसा करू शकला? (ब) थुवतीराची मंडळी ही आजच्या ७३,००० पेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांचा कसा प्रतिनमुना आहे?
४ थुवतीरा येथील बांधवांची येशू आनंदाने प्रशंसा करतो. तो म्हणतो: “तुझी कृत्ये, आणि तुझी प्रीति, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत.” (प्रकटीकरण २:१९) येथील अभिषिक्त ख्रिश्चनांनी, इफिसकरांप्रमाणे, यहोवाविषयी असणारी आपली पहिली प्रीती गमावली नव्हती. त्यांची प्रीती बळकट आहे. याशिवाय त्यांची कृत्ये पहिल्यापेक्षा अधिक आहेत आणि या आधीच्या तीन मंडळ्यांप्रमाणे, थुवतीरा येथील ख्रिस्ती सहनशील आहेत. हे सबंध जगभरात आज यहोवाच्या साक्षीदारांच्या ७३,००० पेक्षा अधिक असणाऱ्या मंडळ्यांचा केवढा सुंदर प्रतिनमुना आहे! सेवकपणातील आवेशी आत्मा संघटनेत झिरपतो आणि तो तरुण व वृद्धांना उत्तेजित करतो तेव्हा यहोवासाठी असलेली प्रीती चकाकते. वाढत्या संख्येने लोक पायनियर या नात्याने स्वतःला खर्ची घालत आहेत व याद्वारे देवाच्या येणाऱ्या राज्याबद्दलची वैभवी आशा घोषित करण्यासाठी, उरलेला वेळ ते सुज्ञपणे उपयोगात आणीत आहेत!—मत्तय २४:१४; मार्क १३:१०.
५ आज अनेक दशकांपासून, अभिषिक्त शेष व मोठा लोकसमुदाय यातील विश्वासू जन देवाच्या सेवेत उदाहरणीय सहनशीलता दाखवीत आहेत पण त्याचवेळी त्यांच्या सभोवतालचे जग निराशा व नाशाच्या खिन्नतेत स्वतःला लोटत आहे. पण आपण धैर्यशील होऊ या! प्रकटीकरण देवाच्या सुरवातीच्या संदेष्ट्यांच्या साक्षीची खात्री देत आहे. “परमेश्वराचा [यहोवा, NW] मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.”—सफन्या १:१४; योएल २:१; हबक्कूक २:३; प्रकटीकरण ७:९; २२:१२, १३.
“ईजबेल नावाची स्त्री”
६. (अ) थुवतीराच्या मंडळीत स्तुतीपात्र लक्षणे असताना देखील येशूला अशी कोणती समस्या दिसते, जिच्याकडे त्वरित लक्ष द्यावयाचे होते? (ब) ईजबेल कोण होती आणि तिला संदेष्ट्री असण्याचा दावा खरेपणाने करता येत होता का?
६ येशूचे अग्नीज्वालेसमान डोळे आणखी सूक्ष्मरित्या पाहात आहेत. त्याला असे काही दिसते ज्याकडे त्वरेने लक्ष दिले पाहिजे. “तरी,” तो थुवतीरा येथील ख्रिश्चनांना सांगतो, “तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणविते, आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस.” (प्रकटीकरण २:२०) सा.यु. पूर्वीच्या दहाव्या शतकात इस्राएलाचा राजा अहाब याची बाल-उपासक बायको, ईजबेल राणी ही खूनी, व्यभिचारी व जुलमी सत्ता चालविण्याबद्दल कुविख्यात होती. येहू या यहोवाच्या अभिषिक्ताने तिला ठार केले. (१ राजे १६:३१; १८:४; २१:१-१६; २ राजे ९:१-७, २२, ३०, ३३) ती मूर्तिपूजक ईजबेल संदेष्ट्री असल्याचा दावा करू शकत नव्हती. ती, इस्राएलातील मिर्याम व दबोरा या विश्वासू संदेष्ट्र्यांसारखी नव्हती. (निर्गम १५:२०, २१; शास्ते ४:४; ५:१-३१) याचप्रमाणे, यहोवाच्या आत्म्याने वृद्ध संदेष्ट्री हन्ना व सुवार्तिक फिलिप्पाच्या चार मुलींना जसे संदेश कथन करण्याची प्रेरणा दिली तसे हिच्या बाबतीत घडले नाही.—लूक २:३६-३८; प्रेषितांची कृत्ये २१:९.
७. (अ) ‘ईजबेल नावाच्या स्त्रीचा’ उल्लेख करण्याद्वारे येशू निश्चये कोणत्या प्रभावाबद्दल बोलत असावा असे दिसते? (ब) सहवास राखणाऱ्या काही स्त्रियांनी आपल्या स्वैराचारी मार्गाचे कसे समर्थन केले असावे?
७ तेव्हा, थुवतीरामध्ये संदेष्ट्री असल्याचा दावा करणारी ती ‘ईजबेल नावाची स्त्री’ खोटी आहे. तिला देवाच्या आत्म्याचा पाठिंबा नाही. मग, ती कोण आहे? ती कदाचित एखादी स्त्री किंवा स्त्रियांचा गट असावा, जो मंडळीवर निर्लज्ज स्वरुपाचा प्रभाव पाडीत होता. मंडळीशी सहवास राखून असणाऱ्या काही स्त्रिया मंडळीतील सदस्यांना अनैतिक कामात गोवून घेत असाव्यात आणि आपल्या स्वैराचारी मार्गाचे समर्थन शास्त्रवचनांचा चुकीचा अवलंब दाखवून करीत असाव्यात. खरोखरी हे खोटे भविष्यकथनाचे कार्य होय! त्या ‘जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ही जी मूर्तिपूजा’ यामध्ये इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी वर्चस्व करीत असाव्या असे दिसते. (कलस्सैकर ३:५) आज, बहुतेक ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मात ज्याकडे डोळेझाक केली जाते किंवा ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले जाते अशी अनैतिक, स्वेच्छापूर्ण जीवनपद्धत आचरण्यात मंडळीतील अनेकांना त्या गुंतवून घेत असाव्यात.
८. (अ) थुवतीरामधील ‘ईजबेलबद्दल’ येशूने कोणता दंड घोषित केला? (ब) आजच्या काळात अयोग्य स्वरुपाचा स्त्री-प्रभाव कसा जाणवला गेला?
८ येशू थुवतीरा मंडळीतील वडिलांना पुढे सांगतो: “तिने पश्चात्ताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही. पाहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन, आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस, तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चात्ताप न केल्यास, मोठ्या संकटात पाडीन.” (प्रकटीकरण २:२१, २२) ज्याप्रमाणे मूळच्या ईजबेलने, प्रत्यक्षात अहाबावर प्रभुत्व केले आणि देवाचा दंड बजावणारा येहू याला तुच्छ लेखिले, तसेच हा स्त्री प्रभाव, पती तसेच मंडळीतील वडिलांवर आपले प्रभुत्व राखण्याचा प्रयत्न करीत असावा. थुवतीरातील वडील त्या असभ्य ईजबेलीचे सहन करीत होते असे दिसते. यासाठी येशू येथे त्यांना तसेच आजच्या यहोवाच्या लोकांच्या जगभरातील सर्व मंडळ्यांना जोरदार ताकीद देतो. आधुनिक काळातील अशा दृढ इच्छा बळावलेल्या स्त्रियांनी आपल्या पतींना धर्मत्यागी बनविण्याचा व यहोवाच्या विश्वासू सेवकांविरुद्ध न्यायालयीन हालचालींना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला.—पडताळा यहूदा ५-८.
९. (अ) येशूने ईजबेलीविषयी काढलेले उद्गार मंडळीतील सर्वच स्त्रियांवर प्रतिकूल ठपका का देत नाही? (ब) केवळ कोणत्या वेळी ईजबेल प्रभाव उदयास येत असतो?
९ तथापि, यामुळे ख्रिस्ती मंडळीतील विश्वासू स्त्रियांबद्दल कोणत्याही मार्गी प्रतिकूल ठपका येत नाही. आजच्या दिवसात, साक्षकार्याचा मोठा भाग विश्वासू बहिणींमार्फत पार पाडला जात आहे; त्या बायबल अभ्यास चालवीत आहेत आणि बहुतेक नवीन लोकांना मंडळीत आणीत आहेत. या व्यवस्थेवर देवाचा स्वतःचा आशीर्वाद आहे हे स्तोत्र ६८:११ मध्ये सूचित करण्यात आले आहे: “प्रभु [यहोवा, NW] अनुज्ञा देतो: मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना” आहे. “देवाच्या दृष्टीने बहुमूल्य” असणाऱ्या सौम्य व आदरणीय वागणूकीमुळे स्त्रिया आपल्या पतीवर हितकारी प्रभाव पाडू शकतात. (१ पेत्र ३:१-४) कर्तृत्ववान व उद्योगी पत्नीची लमुवेल राजाने स्तुती केलेली आहे. (नीतीसूत्रे ३१:१०-३१) पण जेव्हा स्त्रिया आपली चाकोरी सोडतात आणि पुरुषांना फूस लावतात किंवा मस्तकपदाला आव्हान देतात वा त्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा ईजबेलीसमान वर्चस्व उदयास येते.—इफिसकर ५:२२, २३; १ करिंथकर ११:३.
१०. (अ) ईजबेल व तिच्या मुलाबाळांना का न्यायदंड मिळेल? (ब) जे ईजबेलीची मुले बनतात ते कोणत्या धोकादायक स्थितीत आहेत आणि अशांनी काय केले पाहिजे?
१० त्या ‘ईजबेल नावाच्या स्त्रीला’ उद्देशून येशू पुढे म्हणतो: ‘मी तिच्या मुलाबाळांस मरिने जिवे मारीन; म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने [अंतर्याम, NW] व अंतःकरणे ह्यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’ (प्रकटीकरण २:२३) ईजबेल व तिच्या मुलाबाळांस येशूने पश्चात्ताप करण्यास वेळ दिला पण ते आपल्याच अनैतिक कृत्यांमध्ये गढून गेले होते, त्यामुळे त्यांना न्यायदंड दिलाच पाहिजे. येथे आजच्या ख्रिश्चनांसाठी शक्तिशाली संदेश आहे. जे कोणी ईजबेलीचे अनुकरण करतात, मग ते पुरुष असो की स्त्रिया, जे मस्तकपद व नैतिकता याबद्दलच्या बायबलच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात तसेच ईश्वरशासित व्यवस्था नजरेआड करुन हेकेखोर होतात असे सर्व, तिची मुलेबाळे बनतात व त्यामुळे ते गंभीररित्या आध्यात्मिक आजारी स्थितीत आहेत. हे खरे की, अशांपैकी कोणी मंडळीतील वडिलांना बोलावील व त्याच्यासाठी प्रार्थना करायला सांगेल तर, “विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचवील, आणि प्रभु [यहोवा, NW] त्याला उठवील,” पण त्याने, त्याच्यासाठी करण्यात आलेल्या प्रार्थनेच्या अनुषंगाने हालचाल केली पाहिजे. तथापि, आपली अनैतिक कृत्ये लपविता येऊन किंवा आवेशी सेवा करण्याचा केवळ बाह्य दिखावा दाखवून देवाला किंवा ख्रिस्ताला फसवता येणे शक्य आहे असे कोणीही समजू नये.—याकोब ५:१४, १५.
११. बेकायदेशीर स्त्री प्रभावाच्या घुसखोरीबद्दल जागृत राहण्यात आज मंडळ्यांना कशी मदत दिली जाते?
११ यहोवाच्या साक्षीदारांच्या बहुतेक मंडळ्या या धोक्याबद्दल जागृत आहेत हे आनंदाचे आहे. गैर ईश्वरशासित प्रवृत्त्या व चुकीची कामे याबद्दल वडील दक्ष आहेत. जे अशा धोक्याच्या मार्गात आहेत अशा पुरुषांना व स्त्रियांना ते मदत देण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांची उशीर होण्याआधीच आध्यात्मिक रितीने उभारणी व सुधारणा करता येऊ शकेल. (गलतीकर ५:१६; ६:१) ‘स्त्री-मुक्ती’ या सारख्या प्रवृत्तीस वाढविण्याकरता एखादा गट निर्माण करण्याच्या स्त्री प्रयत्नाला हे ख्रिस्ती पर्यवेक्षक प्रेमळ पण खंबीरपणाने लगाम घालतात. याखेरीज, वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनातून समयोचित सल्ला वेळोवेळी दिला जातो. *
१२. योहान वर्ग आज येहूप्रमाणेच आवेश कसा प्रदर्शित करीत आहे?
१२ तथापि, जेथे गंभीर स्वरुपाची अनैतिकता आहे व जेथे ती एक सराव बनते, अशावेळी पश्चात्ताप न दाखवणाऱ्या पातक्यांना बहिष्कृत केलेच पाहिजे. इस्राएलातील ईजबेलीच्या प्रभावाचा सर्व मागमूस काढून टाकण्याच्या येहूच्या आवेशाचे आम्हाला स्मरण होते. याचप्रमाणे, योहान वर्ग आज खंबीरपणे हालचाल करून त्यांच्या “योनादाब” सोबत्यांना एक उदाहरण ठेवत आहेत आणि दुष्ट प्रवृत्तींबद्दल डोळेझाक करणाऱ्या खिस्ती धर्मजगतातील सेवकांपेक्षा आपण खूप वेगळे असल्याचे ते दाखवून देत आहेत.—२ राजे ९:२२, ३०-३७; १०:१२-१७.
१३. जे चुकीच्या स्त्री प्रभावाला वश होतात अशांचे काय होईल?
१३ यहोवाचा निरोप्या व न्यायाधीश या नात्याने देवाचा पुत्र आधुनिक ईजबेलला ओळखण्यात व तिला अंथरुणावर खिळून टाकण्यास अगदी योग्य हालचाल करतो, कारण तिचा आध्यात्मिक आजार खरोखरीच जुनाट आहे. (मलाखी ३:१, ५) जे कोणी ह्या चुकीच्या स्त्री-प्रभावास बळी पडले आहेत अशांना देखील मोठ्या संकटाचा त्रास होईल—तो म्हणजे ते बहिष्कृत केले जातील आणि जणू काय मेले म्हणून ख्रिस्ती मंडळीपासून पूर्ण संबंध तोडून टाकण्याचे दुःख त्यांना मिळेल. ते पश्चात्ताप करुन मागे फिरले नाहीत व मंडळीत स्वीकारले गेले नाही तर ‘मरीने’ म्हणजे, मोठ्या संकटात दैहिकरित्या मरतील. पण मध्यंतरात त्यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांचा पूर्ण पश्चात्ताप केल्यास त्यांचे पुनर्स्थापन होणे शक्य आहे.—मत्तय २४:२१, २२; २ करिंथकर ७:१०.
१४. (अ) येशू ईजबेलीच्या प्रभावासारख्या समस्यांना हाताळण्यासाठी वडिलांचा कसा उपयोग करतो? (ब) अशा समस्यांची हाताळणी करणाऱ्या वडिलांना मंडळीने कसा पाठिंबा द्यावा?
१४ “सर्व मंडळ्यांना” येशू “अंतर्याम,” अंतस्थ भावना तसेच ‘अंतःकरण,’ गुप्त मनुष्यपण व त्याच्या आंतरिक हेतूंचा देखील परीक्षक आहे हे कळून आले पाहिजे. यासाठीच तो विश्वासू तारे किंवा वडिलांचा उपयोग, ईजबेलीसारख्या दिसून येणाऱ्या प्रभावाची समस्या हाताळण्यासाठी करतो. (प्रकटीकरण १:२०) या वडिलांनी अशा प्रकारातील प्रकरणाची पूर्णपणे छानणी केल्यावर आणि न्यायदंड दिल्यावर, वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल का व कसा निर्णय घेतला गेला याची चौकशी करण्याचे काम कोणा विशिष्टाचे नाही. सर्वांनी नम्रपणे वडिलांनी या प्रकरणाबद्दल घेतलेल्या निर्णयाचा आदर करावा व मंडळीतील या ताऱ्यांना आपले पाठबळ दाखवावे. यहोवा व त्याच्या संघटनेच्या व्यवस्थेबद्दल निष्ठा दाखविणाऱ्यांना प्रतिफळ मिळेल. (स्तोत्र ३७:२७-२९; इब्रीयांस १३:७, १७) येशू जेव्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ देईल तेव्हा तुम्हाला आशीर्वादाचा सहभाग मिळो.—तसेच गलतीकर ५:१९-२४; ६:७-९ देखील पहा.
“जे तुमच्याजवळ आहे ते . . . दृढ धरुन राहा”
१५. (अ) ज्यांनी स्वतःला ईजबेलीमार्फत भ्रष्ट होऊ दिले नाही अशांबद्दल येशूने काय म्हटले? (ब) मागे १९१८ मध्ये जे सर्व ख्रिश्चन म्हणविणारे होते त्या सर्वांनीच स्वतःला धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताद्वारे भ्रष्टावू दिले नव्हते हे कसे दिसते?
१५ येशूचे पुढचे शब्द सांत्वन देतात: “थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालणारे नाही, ज्यांस सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्या तुम्हास मी सांगतो की, मी तुम्हावर दुसरा भार लादणार नाही; इतकेच करा की, जे तुमच्याजवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरुन राहा.” (प्रकटीकरण २:२४, २५) ईजबेलमुळे प्रभावीत झालेले नाहीत असे विश्वासू जीव थुवतीरा येथे आहेत. तसेच १९१८ च्या ४० वर्षे आधी व त्यानंतर ख्रिस्ती धर्मातील महामूर अनैतिक व भ्रष्ट मार्गांना ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या सर्वांनीच सहन केलेले नाही. आता यहोवाचे साक्षीदार या नात्याने परिचित असलेल्या त्या काळच्या बायबल विद्यार्थ्यांच्या लहान गटाने ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक तत्त्वांचा उगम ख्रिस्ती नसल्याचे पाहण्यात चर्च सदस्यांना मदत दिली आणि यांनी धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताने स्वीकारलेल्या सर्व बाबेलोनी विश्वास व प्रथा यापासून स्वतःला वेगळे केले. यात ‘ईजबेल नावाच्या स्त्रीचे’ स्वैराचारी शिक्षण देखील समाविष्ट आहे.
१६. येशू तसेच पहिल्या शतकातील नियमन मंडळाने जरी अधिक भार घातलेला नाही, तरी कोणत्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत?
१६ योहान वर्गाने आपल्या सोबत्यांना, मोठ्या लोकसमुदायाला, हिणकस जगीक मनोरंजनासारख्या अनैतिक प्रभावाबद्दल दक्ष राहण्यास उत्तेजन दिलेले आहे. काय टाळावे हे जाणून घेण्यासाठी कुतुहलापायी भ्रष्टतेचा दृष्टिकोन बाळगण्याची किंवा त्याचा अनुभव घेण्याची काहीही गरज नाही. ‘सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टीपासून’ दूर राहणे हा सुज्ञतेचा मार्ग आहे. येशू म्हणतो, त्याप्रमाणे मी “तुम्हावर दुसरा भार लादणार नाही.” हे पहिल्या शतकातील ख्रिस्ती नियमन मंडळाने जे फर्मान काढले होते त्याचे आम्हाला स्मरण देते: “पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले; त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल, क्षेमकुशल असो.” (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) आध्यात्मिक समृद्धीसाठी खोटा धर्म, रक्ताचा गैरवापर (जसे की, रक्त संक्रमण) आणि अनैतिकता टाळा! यामुळे तुमचे शारीरिक आरोग्य देखील सुरक्षित राहील.
१७. (अ) सैतानाने ‘गहन म्हटलेल्या गोष्टीद्वारे’ लोकांना आज कशी भुरळ पाडली आहे? (ब) सैतानी जगाच्या गुंतागुंतीच्या ‘गहन म्हटलेल्या गोष्टीबद्दल’ आमची मनोवृत्ती कशी असावी?
१७ सैतानाच्या आणखी दुसऱ्या “गहन म्हटलेल्या गोष्टी” आहेत. त्या म्हणजे बुद्धिमान माणसांची खुशामत करणारे तत्त्वज्ञान आणि गुंतागुंतीच्या कल्पना किंवा तर्क. याशिवाय स्वैराचारी अनैतिक युक्तिवादासोबत भूतविद्या व उत्क्रांतीवादाचा सिद्धांत यांचाही यात समावेश आहे. या ‘गहन म्हटलेल्या गोष्टींकडे’ सर्वसूज्ञ देव कोणत्या दृष्टीने बघतो? प्रेषित पौल त्याचे अवतरण देऊन म्हणतो: “मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन.” उलटपक्षी, ‘देवाच्या गहन गोष्टी’ साध्या, सरळ व अंतःकरणाला उत्साह देणाऱ्या आहेत. सुज्ञ ख्रिस्ती सैतानी जगाच्या गुंतागुंतीच्या ‘गहन म्हटलेल्या गोष्टीपासून’ दूर राहतात. हे ध्यानात घ्या की, “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ करिंथकर १:१९, किंग्डम इंटरलिनियर; २:१०; १ योहान २:१७.
१८. शेवटपर्यंत विश्वासू राहणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी येशूने कोणत्या आशीर्वादांचे अभिवचन दिले आणि या पुनरुत्थितांना हर्मगिदोनाच्या वेळी कोणता हक्क असेल?
१८ थुवतीरा येथील ख्रिश्चनांना आता येशू अंतःकरणास उत्साह देणाऱ्या शब्दांनी भाष्य करतो. ते आजच्या अभिषिक्त ख्रिश्चनांना देखील प्रोत्साहनदायक आहे. “जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्याला, माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन; आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करितात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील.” (प्रकटीकरण २:२६, २७) केवढा हा अद्भुत सुहक्क! अभिषिक्त विजेत्यांना त्यांच्या पुनरुत्थानासमयी प्राप्त झालेला या अधिकाराची सहभागिता ते येशूसोबत हर्मगिदोनात बंडखोर राष्ट्रांचा “लोहदंडाने” चुराडा करून नाश करण्यात करतील. ख्रिस्त आपल्या शत्रूंचे, मातीच्या भांड्यांना धडक देऊन चुराडा करतात तसेच चूर्ण करील तेव्हा त्या राष्ट्रांचे सर्वोत्तम असलेले आण्विक अग्नीसामर्थ्य जणू ओल्या फटाक्यासारखा फुसका आवाज करतील.—स्तोत्र २:८, ९; प्रकटीकरण १६:१४, १६; १९:११-१३, १५.
१९. (अ) ‘पहाटचा तारा’ कोण आहे आणि जे जय मिळवतात त्यांना तो कसा मिळेल? (ब) मोठ्या लोकसमुदायास कोणते उत्तेजन सादर करण्यात आले आहे?
१९ येशू पुढे म्हणतो: “मी त्याला प्रभाततारा देईन.” (प्रकटीकरण २:२८) हा “तारा” काय आहे हे स्वतः येशूच नंतर याप्रकारे स्पष्ट करतो: “मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानहि; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.” (प्रकटीकरण २२:१६) होय, तो येशू आहे जो या भविष्यवादाची पूर्णता करणारा आहे. हा भविष्यवाद बलामाची इच्छा नसताना यहोवाने त्याच्या तोंडून वदवला होता: “याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल.” (गणना २४:१७) पण जे विजय मिळवतात अशांना येशू कसा ‘पहाटचा तारा’ देणार आहे? स्पष्टपणे तो स्वतःला त्यांना देईल, म्हणजे, तो त्यांना आपल्या निकटच्या अगदी सलोख्याच्या नातेसंबंधात घेईल. (योहान १४:२, ३) खरेच, सहनशील राहण्यासाठी ही केवढी प्रबळ प्रेरणा! हाच “पहाटचा तेजस्वी तारा” लवकरच आपला राज्याधिकार पृथ्वीवर स्थापून तिजवर नंदनवनाची स्थापना करील हे जाणून घेणे मोठ्या लोकसमुदायासाठी देखील किती उत्तेजक आहे!
सचोटी राखणे
२०. ख्रिस्ती धर्मजगतातील कोणत्या घडामोडी आपल्याला थुवतीरा मंडळीतील काही अशक्तपणाची आठवण करुन देतात?
२० थुवतीरा येथील ख्रिश्चनांना या संदेशामुळे मोठे उत्तेजन मिळाले असेल. कल्पना करा की, स्वर्गातील वैभवी देवाचा पुत्र याने थुवतीरा ख्रिश्चनांसोबत त्यांच्या काही समस्यांच्या बाबतीत व्यक्तिशः बोलणी केली आहे! अशा या प्रेमळ देखरेखीला काहींनी निश्चये उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला असावा. सात संदेशांपैकी या सर्वात मोठ्या संदेशाद्वारे आज आपल्याला खऱ्या ख्रिस्ती मंडळीची ओळख मिळू शकते. येशू, १९१८ मध्ये यहोवाच्या मंदिरी न्याय करण्यासाठी आला तेव्हा ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या बहुसंख्य संघटना मूर्तिपूजा व आध्यात्मिक अनैतिकता यांनी कलंकित झाल्या होत्या. (याकोब ४:४) काहींनी आपला विश्वास १९ व्या शतकातील दृढनिश्चयी स्त्रियांच्या जसे की, सेवंथ डे ॲडव्हेंटिस्टची एलन व्हाईट, व ख्रिश्चन सायंटिस्टची मेरी बेकर एडी यांच्या शिक्षणावर आधारला होता. आणि आता तर अनेक स्त्रिया व्यासपीठावरुन प्रचार करीत आहेत. (१ तीमथ्य २:११, १२ बरोबर फरक पडताळा.) कॅथलिकांच्या बहुतेक पंथात देव व ख्रिस्ताच्या आधी मरीयेचा जास्त सन्मान करण्यात येतो. पण येशूने तसा तिचा सन्मान केला नव्हता. (योहान २:४; १९:२६) ज्या संघटना अशाप्रकारे स्त्री वर्चस्वाला बेकायदेशीरपणे मान्यता देत आहेत अशांना ख्रिस्ती म्हणून मानता येईल का?
२१. येशूने थुवतीराला दिलेल्या संदेशामध्ये वैयक्तिकांसाठी कोणता संदेश आढळतो?
२१ यास्तव, योहान वर्ग किंवा दुसरी मेंढरे या वर्गातील वैयक्तिक ख्रिश्चनाने हा संदेश विचारात घेणे चांगले आहे. (योहान १०:१६) काहींना कदाचित थुवतीरा ईजबेली शिष्यांप्रमाणे सोपा मार्ग अनुसरण्याचा मोह होईल. याचप्रमाणे हातमिळवणी करण्याचा मोह देखील आहे. आज, रक्ताचे पदार्थ खाणे किंवा रक्त संक्रमण स्वीकारणे अशा प्रकारच्या वादविषयांना तोंड द्यायचे आहे. काहींना वाटेल की, क्षेत्र सेवेतील आपल्या आवेशी धोरणामुळे किंवा सुंदर भाषण देण्यामुळे आपल्याला इतर क्षेत्रात, जसे की, हिंसाचारी अनैतिक चित्रपट किंवा व्हिडीओ टेप्स् पाहण्यासाठी आणि मद्याचे अतिरेकी प्राशन करण्यास मुभा मिळू शकते. पण, येशूने थुवतीरामधील ख्रिश्चनांना दिलेला इशारा आम्हास सांगतो की, आम्ही अशी मोकळीक घेऊच नये. यहोवा आम्हाबाबत थुवतीरातील अनेक ख्रिश्चनांप्रमाणे विभागलेले नव्हे तर शुद्ध व पूर्ण जीवाचे असावे अशी अपेक्षा धरतो.
२२. ऐकणारा कान असण्याचे महत्त्व येशू कसे जोर देऊन सांगतो?
२२ शेवटी, येशू हे जाहीर करतो: “आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको.” (प्रकटीकरण २:२९) येथे पुन्हा चवथ्यांदा येशू तेच उत्तेजक धृपद उच्चारतो. अशाचप्रकारे पुढील तीन संदेशाचा समारोप देखील याच कडव्याने केला जाईल. तुम्हास तो प्रतिसाद देणारा कान आहे का? तर मग, देव आपल्या आत्म्याद्वारे त्याच्या माध्यमाकरवी जी सूचना प्रदान करतो ती लक्षपूर्वक ऐका.
[तळटीपा]
^ उदाहरणार्थ, अवेक! मासिकाच्या मे २२, १९७८ च्या अंकातील “वुमन्स रोल इन द फर्स्ट सेंच्युरी काँग्रिगेशन” हा लेख पहा.
[अभ्यासाचे प्रश्न]
[५१ पानांवरील चित्रे]
आज, साक्षकार्याचा मोठा भाग विश्वासू बहिणींमार्फत, ईश्वरशासित अधिकाराला नम्रपणे पाठबळ देऊन पूर्ण केला जात आहे