व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ९

इस्राएल लोक राजाची मागणी करतात

इस्राएल लोक राजाची मागणी करतात

इस्राएलचा पहिला राजा शौल यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन करतो. त्याच्यानंतर दावीद गादीवर बसतो. दाविदासोबत देव एका अविनाशी राज्याचा करार करतो

शमशोनाच्या मृत्यूनंतर इस्राएलात शमुवेल हा संदेष्टा व न्यायाधीश म्हणून कार्य करत होता. तेव्हा इतर राष्ट्रांप्रमाणेच आपल्यालाही एक राजा हवा, अशी मागणी इस्राएल लोक शमुवेलाकडे करू लागले. अशी मागणी करणे खरेतर यहोवाचा उघड अपमान करण्यासारखे होते. तरीही, यहोवाने शमुवेलाला लोकांच्या म्हणण्याप्रमाणे करण्यास सांगितले. देवाने शौल नावाच्या एका नम्र मनुष्याची राजा होण्याकरता निवड केली. पण, कालांतराने शौलाचे रूप पालटले. तो गर्विष्ठ बनला आणि त्याने देवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले. त्यामुळे यहोवाने शौलाचे राजपद काढून घेतले आणि त्याच्या जागी दावीद नावाच्या एका तरुणाला राजा म्हणून नेमण्याची शमुवेलाला सूचना दिली. पण दाविदाने प्रत्यक्षात राजपदाची सूत्रे हाती घेण्यास अजून कित्येक वर्षांचा अवकाश होता.

किशोरवयात असताना एकदा दावीद शौलाच्या सैन्यात सेवा करत असलेल्या आपल्या भावांना भेटायला गेला. त्यावेळी, शत्रूपक्षातला गल्याथ नावाचा एक महावीर शौलाच्या योद्ध्‌यांना आणि त्यांच्या देवाला सारखे टोमणे मारत होता. या महाकाय योद्ध्‌यामुळे शौलाच्या सगळ्या सैन्याचा थरकाप उडाला होता. हे पाहून दावीद त्वेषाने पेटून उठला व त्याने या महाकाय योद्ध्‌याशी लढण्याचे आव्हान स्वीकारले. फक्‍त एक गोफण आणि काही गुळगुळीत गोटे घेऊन दावीद तब्बल नऊ फूट उंच असलेल्या आपल्या शत्रूचा सामना करण्यास गेला. त्याला पाहून गल्याथ त्याची खिल्ली उडवू लागला. पण दाविदाने उत्तर दिले की गल्याथाजवळ कितीही शस्त्रे असली तरी आपण यहोवा देवाच्या नावाने लढत असल्यामुळे जास्त शक्‍तिशाली आहोत! मग दाविदाने आपली गोफण फिरवून फक्‍त एकाच गोट्याने गल्याथाला खाली पाडले आणि त्याच्याच तरवारीने त्याचा शिरच्छेद केला. हे पाहून पलिष्टी सैन्याने भयभीत होऊन तेथून पळ काढला.

सुरुवातीला शौलाला दाविदाच्या धाडसाचे अतिशय कौतुक वाटले आणि त्याने या तरुणाला आपल्या सर्व योद्ध्‌यांवर नेमले. पण नंतर मात्र दाविदाला मिळत असलेले यश शौलाच्या डोळ्यांत खुपू लागले व तो मत्सराने पेटला. शौलापासून आपला जीव वाचवण्यासाठी दाविदाला पळून जावे लागले आणि कितीतरी वर्षे इकडून तिकडे भटकावे लागले. तरीसुद्धा, शौल हा खुद्द यहोवा देवाने नियुक्‍त केलेला राजा आहे हे ओळखून, दावीद आपल्या जिवावर उठलेल्या शौलाला इमानदार राहिला. शेवटी शौल एका युद्धात मरण पावला. त्यानंतर लवकरच, यहोवाने वचन दिल्याप्रमाणे दावीद राजा बनला.

“मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन.”—२ शमुवेल ७:१३

यहोवासाठी एक मंदिर बांधावे अशी दावीद राजाची मनस्वी इच्छा होती. पण, यहोवाने दाविदाला सांगितले की त्याच्या वंशजांपैकी एक जण त्याची ही मनोकामना पूर्ण करेल. कालांतराने देवाचे मंदिर बांधण्याचा मान शलमोनाला मिळाला. पण देवाने दाविदालाही आशीर्वादित केले. त्याने दाविदासोबत करार केला की त्याच्या कुळातून असे एक राजघराणे उत्पन्‍न होईल, जे इतर सर्वांपेक्षा वेगळे ठरेल. हा खरोखर एक अतिशय मोठा बहुमान होता. कारण, एदेन बागेत प्रतिज्ञा केलेली संतती किंवा मुक्‍तिदाता याच राजघराण्यातून येणार होता. आणि तोच, मशीहा म्हणजे देवाने नियुक्‍त केलेला “अभिषिक्‍त” असणार होता. यहोवाने वचन दिले की हा मशीहा एका अनंतकालिक सरकारचा किंवा राज्याचा राजा असेल.

देवाच्या या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी दाविदाने मंदिराच्या बांधकामाला लागणाऱ्‍या सामानाचा व बहुमूल्य धातूंचा भरपूर प्रमाणात साठा जमवला. दाविदाने अनेक स्तोत्रेही रचली होती. त्या सर्वांचे श्रेय यहोवाला देत दाविदाने आपल्या जीवनाच्या शेवटल्या दिवसांत असे म्हटले: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्या द्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले.”—२ शमुवेल २३:२.

१ शमुवेल; २ शमुवेल; १ इतिहास; यशया ९:७; मत्तय २१:९; लूक १:३२; योहान ७:४२ वर आधारित.