भाग ७
देव इस्राएल लोकांची गुलामगिरीतून सुटका करतो
यहोवा इजिप्तवर अनेक पीडा आणतो आणि मोशे इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर नेतो. देव मोशेद्वारे इस्राएल लोकांना नियमशास्त्र देतो
अनेक वर्षे इस्राएल लोक इजिप्तमध्ये राहिले; ते समृद्ध होत गेले व त्यांची संख्या वाढत गेली. पण नंतर, एक नवीन राजा इजिप्तवर राज्य करू लागला. या राजाला योसेफाविषयी माहीत नव्हते. इस्राएल लोकांची संख्या वाढत असल्यामुळे या जुलमी राजाला भीती वाटली. म्हणून त्याने त्यांना गुलाम बनवले व त्यांच्या नवजात मुलग्यांना नाईल नदीत टाकून देण्याचे फरमान काढले. पण, एका धाडसी आईने आपल्या तान्ह्या मुलाला वाचवण्यासाठी त्याला एका पेटीत ठेवून नदीकाठच्या गवतात लपवले. ते बाळ फारोच्या मुलीला सापडले. तिने त्याचे नाव मोशे ठेवले आणि इजिप्तच्या राजघराण्यात त्याला लहानाचे मोठे केले.
मोशे ४० वर्षांचा असताना, एका मुकादमाच्या हातून एका इस्राएली गुलामाला वाचण्याच्या प्रयत्नात तो मोठ्या पेचात अडकला. त्यामुळे तो तेथून पळून गेला आणि एका दूर देशात जाऊन राहू लागला. मोशे ८० वर्षांचा असताना, यहोवाने त्याला फारोकडे जाऊन देवाच्या लोकांच्या सुटकेची मागणी करण्यास परत इजिप्तला पाठवले.
फारोने इस्राएल लोकांना सोडण्यास साफ नकार दिला. म्हणून देवाने इजिप्तवर दहा पीडा आणल्या. प्रत्येक वेळी, मोशे फारोला पुढील पीडा टाळण्याची संधी देण्यासाठी त्याच्याकडे गेला. पण फारो अडून राहिला आणि त्याने मोशे व त्याचा देव यहोवा याला तुच्छ लेखले. शेवटी, दहाव्या पीडेमुळे देशातील सर्व ज्येष्ठ मुलांचा मृत्यू झाला. पण, ज्यांनी यहोवाच्या आज्ञेनुसार बलिदान केलेल्या कोकऱ्याचे रक्त आपल्या घराच्या दरवाजाच्या चौकटीला लावले होते त्यांच्या ज्येष्ठ मुलांना काहीच झाले नाही. नाश करणारा देवदूत ही घरे ओलांडून पुढे गेला. तेव्हापासून, इस्राएल लोक या अद्भुत सुटकेची आठवण करण्याकरता वल्हांडण नावाचा वार्षिक सण साजरा करू लागले.
फारोच्या ज्येष्ठ मुलाचाही मृत्यू झाला. तेव्हा, त्याने मोशे व सर्व इस्राएलांनी इजिप्त सोडून जावे असा हुकूम केला. त्यांनी लगेच तेथून बाहेर पडण्याची व्यवस्था केली. पण, फारोने आपले मन बदलले. मोठे सैन्य व रथ घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला. तांबड्या समुद्राच्या काठावर इस्राएल लोकांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली. पण, यहोवाने तांबड्या समुद्राचे दोन भाग केले. समुद्राचे पाणी दोन्ही बाजूला भिंतींसारखे उभे राहिले. आणि इस्राएल लोक कोरड्या समुद्रतळातून पार गेले. त्यांच्या पाठोपाठ इजिप्शियन सेना समुद्रात गेली, तेव्हा देवाने पाण्याचे लोट त्यांच्यावर कोसळतील असे केले आणि अशा प्रकारे फारो व त्याची सेना पाण्यात बुडाली.
नंतर, इस्राएल लोकांनी सीनाय पर्वताजवळ तळ दिला असताना यहोवाने त्यांच्याशी एक करार केला. मोशेचा एक मध्यस्थ या नात्याने उपयोग करून, देवाने इस्राएल लोकांना जीवनातल्या जवळजवळ हरएक पैलूविषयी मार्गदर्शन व संरक्षण देण्यासाठी एक नियमशास्त्र दिले. जोपर्यंत इस्राएल लोक देवाच्या शासनाला विश्वासूपणे अधीन राहतील, तोपर्यंत यहोवा त्यांच्या पाठीशी राहील आणि त्या राष्ट्राद्वारे इतरांनाही आशीर्वाद प्राप्त होतील असे त्या कराराद्वारे देवाने इस्राएलांना सांगितले.
पण, दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी बहुतेक जण देवाला विश्वासू राहिले नाहीत. त्यामुळे यहोवाने त्या पीढीला ४० वर्षे अरण्यात भटकायला लावले. मोशेने आपल्यानंतर इस्राएल लोकांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी यहोशवा नावाच्या देवभीरू पुरुषावर सोपवली. शेवटी, इस्राएल लोक त्या देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचले ज्याविषयी देवाने अब्राहामाला वचन दिले होते.
—निर्गम; लेवीय; गणना; अनुवाद; स्तोत्रसंहिता १३६:१०-१५; प्रेषितांची कृत्ये ७:१७-३६ वर आधारित.