भाग १९
येशू पुढे घडणाऱ्या गोष्टींविषयी भविष्यवाणी करतो
येशू काही घडामोडींविषयी भाकीत करतो ज्यांवरून स्वर्गात त्याचे राज्य सुरू झाल्याचे व जगाचा अंत जवळ आल्याचे सूचित होणार होते
जैतूनांच्या डोंगरावर असताना—जेथून जेरूसलेम शहराचे व त्यातील मंदिराचे भव्य दृश्य दिसते—येशूच्या चार शिष्यांनी त्याच्याजवळ येऊन त्याने केलेल्या काही विधानांचा अर्थ त्याला विचारला. जेरूसलेममधील मंदिराचा नाश करण्यात येईल असे येशूने नुकतेच म्हटले होते. आणि याआधी एका प्रसंगी, त्याने त्यांना ‘युगाच्या समाप्तीबद्दल’ सांगितले होते. (मत्तय १३:४०, ४९) आता प्रेषितांनी त्याला असे विचारले: “आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?”—मत्तय २४:३.
या प्रश्नाचे उत्तर देताना येशूने जेरूसलेमचा नाश होण्यापूर्वी घडणाऱ्या घटनांविषयी त्यांना सांगितले. पण, त्याचे शब्द फक्त त्या काळापुरतेच मर्यादित नव्हते. त्याची भविष्यवाणी कालांतराने जागतिक पातळीवर पूर्ण होणार होती. येशूने चिन्ह म्हणून एकाच कालावधीत घडणार असलेल्या निरनिराळ्या घटनांविषयी व जागतिक परिस्थितींविषयी भाकीत केले. या चिन्हामुळे स्वर्गात येशूचे राज्य सुरू झाले आहे हे पृथ्वीवर असलेल्यांना समजणार होते. दुसऱ्या शब्दांत, त्या चिन्हावरून हे सूचित होणार होते की यहोवा देवाने येशूला कितीतरी काळाआधी प्रतिज्ञा केलेल्या मशीही राज्याचा राजा बनवले आहे. हे राज्य दुष्टाईचा अंत करेल आणि मानवजातीसाठी खऱ्याखुऱ्या अर्थाने शांती आणेल असे त्या चिन्हावरून समजणार होते. अशा प्रकारे, येशूने पूर्वभाकीत केलेल्या गोष्टींवरून, जुन्या जगाचा म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या धार्मिक, राजनैतिक आणि सामाजिक यंत्रणांचा अंत जवळ आल्याचे व एक नवे जग लवकरच अस्तित्वात येणार असल्याचे दिसून येणार होते.
स्वर्गात येशूचे राज्य सुरू झाल्यावर पृथ्वीवर काय घडेल हे स्पष्ट करताना त्याने म्हटले की जागतिक पातळीवर युद्धे, अन्नटंचाई, मोठमोठे भूकंप आणि मोठ्या प्रमाणावर रोगराई असेल. अनीती वाढेल. येशूचे खरे अनुयायी जगभरात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतील. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, पूर्वी कधी आले नव्हते असे एक “मोठे संकट” येईल.—मत्तय २४:२१.
हे संकट जवळ आले आहे हे येशूच्या अनुयायांना कसे समजणार होते? येशूने म्हटले: “अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या.” (मत्तय २४:३२) अंजिराच्या झाडाला पाने फुटणे हे उन्हाळा जवळ असल्याचे स्पष्टपणे दिसणारे चिन्ह होते. त्याचप्रमाणे, येशूने पूर्वभाकीत केलेल्या गोष्टी एकाच कालखंडात घडणे हे अंत जवळ असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. मोठ्या संकटाची सुरुवात नेमक्या कोणत्या दिवशी व कोणत्या घटकेला होईल हे पित्याशिवाय कोणालाच माहीत नाही. म्हणून, येशूने आपल्या शिष्यांना असे आर्जवले: “जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.”—मार्क १३:३३.
—मत्तय अध्याय २४ आणि २५; मार्क अध्याय १३; लूक अध्याय २१ वर आधारित.