व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय तेरा

जीवनाच्या देणगीचा आदर करा

जीवनाच्या देणगीचा आदर करा

१. आपल्याला जीवन कोणी दिलं?

यहोवा हा “जिवंत देव” आहे. (यिर्मया १०:१०) तो आपला सृष्टिकर्ता आहे आणि त्यानेच आपल्याला जीवन दिलं आहे. बायबलमध्ये म्हटलं आहे: “तू सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि तुझ्याच इच्छेने त्या अस्तित्वात आल्या आणि निर्माण करण्यात आल्या.” (प्रकटीकरण ४:११) यहोवाची इच्छा होती म्हणून त्याने आपल्याला घडवलं. जीवन यहोवाकडून आपल्याला मिळालेली एक मौल्यवान देणगी आहे.—स्तोत्र ३६:९ वाचा.

२. आपण जीवनात आनंदी व यशस्वी कसे होऊ शकतो?

यहोवा आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी, जसं की, अन्न व पाणी पुरवतो. (प्रेषितांची कार्ये १७:२८) पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण जीवनाचा आनंद लुटावा अशी त्याची इच्छा आहे. (प्रेषितांची कार्ये १४:१५-१७) जीवनात आनंदी व यशस्वी होण्यासाठी देवाने दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे.—यशया ४८:१७, १८.

जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन

३. काईनने जेव्हा हाबेलला ठार मारलं, तेव्हा यहोवाने काय केलं?

बायबल आपल्याला शिकवतं की आपलं व इतरांचं जीवन यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आदाम आणि हव्वाचा मुलगा काईन हा त्याच्या लहान भावावर म्हणजे, हाबेलवर क्रोधित झाला तेव्हा यहोवाने त्याला आपला राग आवरण्याची ताकीद दिली. पण त्याने ते ऐकलं नाही व तो इतका संतापला की, त्याने “आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले.” (उत्पत्ति ४:३-८) काईनने हाबेलचा खून केल्यामुळे यहोवाने त्याला शिक्षा केली. (उत्पत्ति ४:९-११) यावरून हेच कळतं की राग व द्वेष हे घातक आहेत. त्यामुळे एखादी व्यक्ती हिंसक व क्रूर बनते. अशा व्यक्तीला सर्वकाळाचं जीवन मिळणं अशक्य आहे. (१ योहान ३:१५ वाचा.) जर आपण सर्वांवर प्रेम करायला शिकलो, तरच आपण यहोवाचं मन आनंदित करू शकतो.—१ योहान ३:११, १२.

४. देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या एका नियमावरून जीवनाच्या देणगीबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?

या घटनेला हजारो वर्षं झाली असली, तरी यहोवाच्या नजरेत जीवन मौल्यवान आहे, हे त्याने मोशेला दिलेल्या दहा आज्ञांवरून दिसतं. त्यातला एक नियम होता, “खून करू नको.” (अनुवाद ५:१७) एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून कोणाची हत्या केल्यास तिलाही ठार मारण्याची आज्ञा होती.

५. गर्भपाताबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे?

गर्भपाताबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे? आईच्या गर्भात असलेलं बाळदेखील यहोवाच्या दृष्टीत मौल्यवान आहे. इस्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात यहोवाने म्हटलं होतं की, एखाद्याने गर्भवती स्त्रीला इजा पोहचवली आणि यामुळे तिच्या बाळचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला ठार मारण्यात यावं. तिथे असं म्हटलं आहे: “माणसे मारामारी करत असताना एखाद्या गर्भवती स्त्रीला मार लागला आणि वेळेआधीच तिने बाळाला जन्म दिला, पण कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर त्या स्त्रीच्या पतीने सांगितल्याप्रमाणे गुन्हेगाराला भरपाई करावी लागेल. . . . पण जर जीवितहानी झाली, तर जिवाबद्दल जीव देण्यात यावा.” (निर्गम २१:२२, २३, NW; स्तोत्र १२७:३) यावरून आपण हेच शिकतो की गर्भपात करणं चुकीचं आहे.—अंत्यटीप २८ पाहा.

६, ७. आपण जीवनाला मौल्यवान समजतो हे आपण कसं दाखवू शकतो?

आपण स्वतःचं आणि इतरांचं जीवन मौल्यवान समजतो हे आपण यहोवाला कसं दाखवू शकतो? आपलं व इतरांचं जीवन धोक्यात येईल असं कुठलंही कार्य आपण करणार नाही. आपण तंबाखू, सुपारी किंवा ड्रग्सचा वापर करणार नाही, कारण यांमुळे आपल्याला हानी पोहचू शकते आणि आपला जीवदेखील जाऊ शकतो.

आपलं जीवन व शरीर ही यहोवाचीच देणगी आहे. त्यामुळे आपण यहोवाच्या इच्छेनुसारच त्यांचा वापर केला पाहिजे. आपण आपल्या शरीराची चांगली काळजी घेतली पाहिजे. जर असं केलं नाही तर आपण यहोवाच्या नजरेत अशुद्ध ठरू. (रोमकर ६:१९; १२:१; २ करिंथकर ७:१) आपल्यासाठी जर जीवन मौल्यवान नसलं, तर आपला जीवनदाता यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही. आपल्याला चुकीच्या सवयी सोडणं कठीण वाटत असलं, तरी आपण करत असलेले प्रयत्न पाहून यहोवा आपल्याला मदत करेल. कारण त्याला हे माहीत आहे की आपण जीवनाला मौल्यवान समजतो.

८. आपला व इतरांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?

जीवन ही मौल्यवान देणगी आहे हे आपण शिकलो. आपला आणि इतरांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी आपण काळजी घेऊ, असा यहोवाचा आपल्यावर भरवसा आहे. यासाठी बाइक, कार किंवा इतर कुठलीही गाडी चालवताना आपण काळजी घेऊ. आपण जीवाला धोका असलेले किंवा हिंसक खेळ खेळणार नाही. (नीतिसूत्रे ३:३१) आपण आपलं घरदेखील सुरक्षित ठेवण्याचं प्रयत्न करू. इस्राएली लोकांना यहोवाने अशी आज्ञा दिली, “तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला [छताला] कठडा बांध; नाही तर एखादा मनुष्य तिथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील.”—अनुवाद २२:८.

९. आपण प्राण्यांशी कसा व्यवहार केला पाहिजे?

आपण प्राण्यांशी कसा व्यवहार करतो तेदेखील यहोवा पाहतो. आहारासाठी, वस्त्रासाठी, किंवा त्यांनी आपल्यावर हल्ला केला तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्राण्यांना मारण्याची तो आपल्याला अनुमती देतो. (उत्पत्ति ३:२१; ९:३; निर्गम २१:२८) पण फक्त मजा म्हणून प्राण्यांना त्रास देणं किंवा त्यांची हत्या करणं चुकीचं आहे.—नीतिसूत्रे १२:१०.

जीवनाच्या पवित्रतेचा आदर करा

१०. रक्त जीवनाला सूचित करतं हे आपल्याला कशावरून कळतं?

१० यहोवाच्या नजरेत रक्त पवित्र आहे कारण रक्त जीवनाला सूचित करतं. काईनने जेव्हा हाबेलला मारलं तेव्हा यहोवाने काईनला म्हटलं: “तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करत आहे.” (उत्पत्ति ४:१०) हाबेलचं रक्त त्याच्या जीवनाला सूचित करत होतं आणि काईनने हाबेलचा जीव घेतला यासाठी यहोवाने त्याला शिक्षा दिली. नोहाच्या काळातल्या जलप्रलयानंतरही यहोवाने पुन्हा दाखवून दिलं की रक्त जीवनाला सूचित करतं. त्याने नोहा आणि त्याच्या कुटुंबाला प्राण्यांचं मांस खाण्याची परवानगी दिली तेव्हा त्याने ही आज्ञादेखील दिली, “सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील; वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका.”—उत्पत्ति १:२९; ९:३, ४

११. देवाने इस्राएल राष्ट्राला रक्ताविषयी कोणती आज्ञा दिली होती?

११ यहोवाने नोहाला रक्त न खाण्याविषयी सांगितल्याच्या ८०० वर्षानंतर त्याने आपल्या लोकांना पुन्हा या आज्ञेची आठवण करून दिली: “इस्राएल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशियांपैकी कोणी खाण्यालायक पशुची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.” त्याने पुढे असंही म्हटलं: “रक्त सेवन करू नये.” (लेवीय १७:१३, १४) आपल्या लोकांनी रक्ताला पवित्र मानावं अशी यहोवाची इच्छा आहे. ते मांस खाऊ शकत होते पण रक्त नाही. जेव्हा ते एखाद्या प्राण्याला खाण्यासाठी मारायचे तेव्हा त्यांना त्याचं रक्त जमिनीवर ओतून टाकायचं होतं.

१२. रक्ताविषयी ख्रिश्चनांचा काय दृष्टिकोन आहे?

१२ येशूच्या मृत्यूच्या काही काळानंतर प्रेषित आणि ख्रिस्ती मंडळीतले वडील यरुशलेममध्ये एकत्र जमले. इस्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्रातले कोणते नियम ख्रिस्ती लोकांना लागू होतात हे त्यांना ठरवायचं होतं. (प्रेषितांची कार्ये १५:२८, २९ वाचा; २१:२५.) रक्त मौल्यवान आहे आणि त्याला आताही पवित्र मानलं जावं हे यहोवाने त्यांना समजण्यास मदत केली. सुरुवातीचे ख्रिस्ती रक्त किंवा ज्यातून रक्त पूर्णपणे वाहू दिलेलं नाही, असं मांस खात नसत. जर त्यांनी असं केलं तर ते मूर्तिपूजा किंवा लैंगिक अनैतिकता करण्यासारखंच वाईट होतं. तेव्हापासून खरे ख्रिस्ती, खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी रक्ताचा वापर करत नाहीत. मग, आजच्याबद्दल काय? यहोवाची इच्छा आहे की आजही आपण रक्ताला तितकंच पवित्र मानलं पाहिजे.

१३. ख्रिस्ती लोक रक्त संक्रमण का स्वीकारत नाहीत?

१३ याचा अर्थ ख्रिश्चनांनी रक्त संक्रमणही स्वीकारू नये का? हो, कारण यहोवाने आपल्याला रक्ताचं सेवन न करण्याची आज्ञा दिली आहे. समजा, डॉक्टरांनी तुम्हाला दारू न पिण्याचं सांगितलं तर तुम्ही ती इतर मार्गांनी शरीरात घेणार का? मुळीच नाही! त्याच प्रकारे रक्त सेवन करू नका या आज्ञेचा हादेखील अर्थ होतो की आपण रक्त संक्रमण स्वीकारू नये.—अंत्यटीप २९ पाहा.

१४, १५. ख्रिश्चनांनी जीवनाप्रती आदर दाखवणं आणि यहोवाची आज्ञा पाळणं किती महत्त्वाचं आहे?

१४ पण समजा डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की आपण रक्त स्वीकारलं नाही तर आपला जीव जाऊ शकतो, अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे? रक्ताविषयी देवाने दिलेल्या आज्ञेचं पालन करायचं की नाही, हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे. देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीचा ख्रिस्ती मनापासून आदर करतात. त्यामुळे जिवंत राहण्याकरता आपण पर्यायी उपचार स्वीकारू शकतो, पण आपण रक्त संक्रमण स्वीकारणार नाही.

१५ आपण निरोगी राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, पण देवाच्या नजरेत जीवन अमूल्य असल्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी आपण रक्त संक्रमण स्वीकारत नाही. कारण आपला जीव वाचवण्यापेक्षा यहोवाला आज्ञाधारक राहणं जास्त महत्त्वाचं आहे. येशूने म्हटलं: “जो कोणी आपला जीव वाचवायचा प्रयत्न करतो, तो आपला जीव गमावून बसेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपला जीव गमावेल त्याला तो मिळेल.” (मत्तय १६:२५) आपलं यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण त्याची आज्ञा पाळायला हवी. आपल्यासाठी काय हिताचं आहे हे त्याला चांगलं माहीत आहे. म्हणून यहोवाप्रमाणेच आपणही जीवनाला मौल्यवान व पवित्र मानलं पाहिजे.—इब्री लोकांना ११:६.

१६. देवाचे सेवक त्याची आज्ञा का पाळतात?

१६ देवाने रक्ताविषयी दिलेला नियम पाळण्याचा ठाम निश्चय देवाचे विश्वासू सेवक करतात. ते खाण्यापिण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी रक्ताचा वापर करत नाहीत. * पण ते आपला जीव वाचवण्याकरता इतर पर्यायी उपचार पद्धती स्वीकारतात. तसंच त्यांना याचीही खात्री पटली आहे की, जीवनाचा आणि रक्ताचा निर्माणकर्ता या नात्याने आपल्यासाठी काय योग्य आहे, हे देवाला चांगलं माहीत आहे. तुमचाही तोच विश्वास आहे का?

रक्ताचा फक्त एकच योग्य वापर

१७. यहोवाने इस्राएली लोकांना रक्ताचा कशासाठी वापर करण्याची परवानगी दिली?

१७ देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात असं सांगितलं: “शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्‍चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे; कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्‍चित्त होते.” (लेवीय १७:११) इस्राएली लोकांच्या हातून काही पाप झालं, तर क्षमेसाठी ते यहोवाला एखाद्या प्राण्याचं बलिदान अर्पण करायचे आणि याजकाला मंदिरातल्या वेदीवर त्या प्राण्याचं थोडंसं रक्त ओतायला सांगायचे. रक्ताच्या फक्त याच एका वापराची परवानगी यहोवाने इस्राएली लोकांना दिली होती.

१८. येशूच्या बलिदानामुळे आपल्याला कोणती संधी मिळाली आहे?

१८ येशूने पृथ्वीवर येऊन आपल्या पापांसाठी त्याचं जीवन बलिदान केलं आणि त्यामुळे प्राण्याचं बलिदान व त्यांचं रक्त अर्पण करण्याचा नियम रद्द झाला. (मत्तय २०:२८; इब्री लोकांना १०:१) येशूचं जीवन इतकं मौल्यवान होतं की त्याच्या बलिदानाच्या आधारावर देवाने सर्वांना सर्वकाळाच्या जीवनाची संधी दिली आहे.—योहान ३:१६; इब्री लोकांना ९:११, १२; १ पेत्र १:१८, १९.

जीवनाबद्दल आणि रक्ताबद्दल आपण आदर कसा दाखवू शकतो?

१९. “सर्व लोकांच्या रक्ताविषयी निर्दोष” असण्याकरता आपल्याला काय करण्याची गरज आहे?

१९ खरंच, जीवनाच्या मौल्यवान देणगीबद्दल आपण यहोवाचे आभार मानले पाहिजेत. येशूवर विश्वास ठेवल्याने सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आपण लोकांवर प्रेम करतो म्हणून त्यांना सर्वकाळाचं जीवन कसं मिळेल हे शिकवण्याकरता आपण पुरेपूर प्रयत्न करतो. (यहेज्केल ३:१७-२१) तेव्हा आपणही प्रेषित पौलसारखं म्हणू शकतो: “मी सर्व लोकांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, कारण देवाच्या संपूर्ण इच्छेविषयी तुम्हाला सांगण्यापासून मी माघार घेतली नाही.” (प्रेषितांची कार्ये २०:२६, २७) आपण जेव्हा इतरांना यहोवाबद्दल व त्याला जीवन किती मौल्यवान आहे याबद्दल सांगतो, तेव्हा आपण दाखवून देतो की आपण रक्ताचा व जीवनाचा मनापासून आदर करतो.

^ परि. 16 रक्त संक्रमणाविषयी अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकाची पृष्ठं ८७-८९ पाहा.