व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय अठरा

मी माझं जीवन देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे का?

मी माझं जीवन देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे का?

१. या पुस्तकाचा अभ्यास संपत असताना तुमच्या मनात कोणता प्रश्न आला असेल?

या पुस्तकाच्या अभ्यासातून तुम्हाला, सार्वकालिक जीवनाबद्दल देवाने दिलेलं वचन, मृतांची अवस्था, त्यांना पुन्हा जिवंत करण्याची आशा यांसारखी बायबलमधली अनेक सत्यं शिकायला मिळाली. (उपदेशक ९:५; लूक २३:४३; योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:३, ४) तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहायला सुरू केलं असेल आणि हेच लोक खऱ्या उपासनेचं आचरण करतात, अशी तुमची खातरी पटली असेल. (योहान १३:३५) यहोवाबरोबरची तुमची मैत्री हळूहळू वाढू लागली असेल आणि तुम्ही त्याचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला असेल. पण मग ‘त्याची सेवा करण्यासाठी मला काय करावं लागेल,’ असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.

२. इथियोपियन मनुष्याने बाप्तिस्मा घेण्याची इच्छा का व्यक्त केली?

येशूच्या काळातल्या एका इथियोपियन माणसाच्या मनातदेखील असाच प्रश्न आला होता. येशूचं पुनरुत्थान होऊन काही काळ उलटल्यानंतर फिलिप्प नावाच्या त्याच्या एका शिष्याने या इथियोपियन मनुष्याला प्रचार केला. येशूच मसीहा आहे, याची खातरी फिलिप्पने या माणसाला पटवून दिली. त्याने ऐकलेल्या गोष्टी त्याला इतक्या पटल्या की तो फिलिप्पला लगेच म्हणाला: “पाहा! इथे पाणी आहे; मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?”—प्रेषितांची कार्ये ८:२६-३६.

३. (क) येशूने त्याच्या अनुयायांना कोणती आज्ञा दिली? (ख) बाप्तिस्मा कशा प्रकारे झाला पाहिजे?

ज्यांना यहोवाची सेवा करायची इच्छा आहे त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे, अशी स्पष्ट शिकवण बायबलमध्ये दिली आहे. येशूने त्याच्या अनुयायांना अशी आज्ञा दिली: “सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि . . . बाप्तिस्मा द्या.” (मत्तय २८:१९) स्वतः येशूनेदेखील बाप्तिस्मा घेऊन सर्वांसमोर एक उदाहरण मांडलं. त्याला फक्त डोक्यावर पाणी शिंपडून बाप्तिस्मा देण्यात आला नाही तर पाण्यात पूर्णपणे बुडवून काढण्यात आलं. (मत्तय ३:१६) आज जेव्हा एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीचा बाप्तिस्मा होतो तेव्हा तिलादेखील पाण्यात पूर्णपणे बुडवून काढणं गरजेचं आहे.

४. तुमचा बाप्तिस्मा होतो तेव्हा इतरांना त्यावरून काय कळतं?

तुमचा बाप्तिस्मा होतो तेव्हा इतरांना हे कळतं की, तुम्हाला देवाशी मैत्री करून त्याची सेवा करण्याची मनापासून इच्छा आहे. (स्तोत्र ४०:७, ८) मग ‘बाप्तिस्मा घेण्यासाठी मला काय करावं लागेल?’ असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात येईल.

ज्ञान आणि विश्वास

५. (क) बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही काय केलं पाहिजे? (ख) तुम्ही ख्रिस्ती सभांना का उपस्थित राहिलं पाहिजे?

बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही यहोवा आणि येशू यांना जवळून ओळखलं पाहिजे. हे तुम्ही बायबलचा अभ्यास करण्याद्वारे सुरू केलं आहे. (योहान १७:३ वाचा.) पण एवढंच पुरेसं नाही. तुम्ही यहोवाचं “अचूक ज्ञान . . . भरपूर प्रमाणात” घ्यावं असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (कलस्सैकर १:९) यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमुळे तुम्हाला यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत मिळेल. या कारणामुळे तुम्ही सभांना नियमितपणे उपस्थित राहिलं पाहिजे.—इब्री लोकांना १०:२४, २५.

बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्हाला बायबलचा अभ्यास करावा लागेल

६. बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्हाला बायबलचं किती ज्ञान असण्याची गरज आहे?

अर्थात, बाप्तिस्म्याआधी तुम्हाला बायबलमधल्या सर्व गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत, अशी यहोवा अपेक्षा करत नाही. इथियोपियन माणसाने बाप्तिस्मा घेण्याआधी त्यालाही सर्व गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत, अशी यहोवाने अपेक्षा केली नाही. (प्रेषितांची कार्ये ८:३०, ३१) आपण यहोवाविषयी सर्वकाळ शिकत राहणार आहोत. (उपदेशक ३:११) पण बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही बायबलच्या मुख्य शिकवणी जाणून, त्या स्वीकारल्या पाहिजेत.—इब्री लोकांना ५:१२.

७. बायबलच्या अभ्यासामुळे तुम्हाला कोणती मदत मिळाली आहे?

बायबलमध्ये म्हटलं आहे: “विश्वासाशिवाय देवाला आनंदित करणे अशक्य आहे.” (इब्री लोकांना ११:६) याचा अर्थ, बाप्तिस्मा घेण्याआधी तुमच्या मनात विश्वास असला पाहिजे. प्राचीन करिंथ शहरातल्या काही लोकांनी, येशूचे अनुयायी शिकवत असलेल्या गोष्टी ऐकून “विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला,” असं बायबलमध्ये सांगितलं आहे. (प्रेषितांची कार्ये १८:८) बायबलच्या अभ्यासामुळे तुम्हालाही देवाच्या अभिवचनांवर, तसंच पाप व मृत्यूपासून आपली सुटका करणाऱ्या येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवायला मदत मिळाली आहे.—यहोशवा २३:१४; प्रेषितांची कार्ये ४:१२; २ तीमथ्य ३:१६, १७.

इतरांनाही बायबलमधल्या सत्याबद्दल सांगा

८. तुम्ही शिकत असलेल्या गोष्टी तुम्हाला कशामुळे इतरांना सांगाव्याशा वाटतील?

तुम्ही जसजसं बायबलचं ज्ञान घेत राहाल आणि या ज्ञानाचा तुम्हाला जीवनात किती फायदा होत आहे हे पाहाल, तसतसा तुमचा विश्वास आणखी वाढत जाईल. मग तुम्ही शिकत असलेल्या गोष्टी तुम्हाला इतरांनाही सांगाव्याशा वाटतील. (यिर्मया २०:९; २ करिंथकर ४:१३) पण तुम्ही या गोष्टी कोणाकोणाला सांगू शकता?

तुमचा विश्वास वाढेल तसतसं तुम्हाला इतरांनाही आपल्या विश्वासाबद्दल सांगावंसं वाटेल

९, १०. (क) तुम्ही शिकत असलेल्या गोष्टी सुरवातीला कोणाकोणाला सांगू शकता? (ख) मंडळीसोबत तुम्हाला प्रचार कार्यात जायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे?

तुम्हाला कदाचित कुटुंबातले सदस्य, मित्र, शेजारी किंवा सहकर्मी यांना तुम्ही शिकत असलेल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतील. ही चांगली गोष्ट आहे, पण असं करताना नेहमी त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने बोला. काही काळाने तुम्ही मंडळीसोबत प्रचार कार्यात भाग घेण्यासाठी तयार व्हाल. आपण मंडळीसोबत प्रचार कार्यात भाग घ्यावा असं जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास घेणाऱ्या बांधवाला अथवा बहिणीला हे सांगू शकता. त्यांना जर वाटलं की तुम्ही खरंच तयार आहात आणि बायबलच्या स्तरांचं पालन करत आहात, तर मग मंडळीतले दोन वडील, तुमच्याबरोबर काही गोष्टींवर चर्चा करतील; या चर्चेदरम्यान तुमच्यासोबत तुमचा अभ्यास घेणारा बांधव किंवा बहीणसुद्धा असेल.

१० हे वडील तुमच्यासोबत काय चर्चा करतील? ते तुमच्यासोबत बोलून तुम्हाला बायबलच्या मूलभूत शिकवणी खरोखरच समजल्या आहेत; तुमचा त्यांवर विश्वास आहे आणि दररोजच्या जीवनात तुम्ही बायबलच्या स्तरांचं पालन करत आहात; तसंच, तुम्हाला खरोखरच यहोवाचे साक्षीदार बनायचं आहे, याची खात्री करतील. वडिलांना मंडळीतल्या सर्वांची म्हणजे तुमचीही काळजी आहे, म्हणून न घाबरता त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. (प्रेषितांची कार्ये २०:२८; १ पेत्र ५:२, ३) तुम्ही मंडळीसोबत प्रचार कार्य सुरू करू शकता का, हे वडील तुम्हाला या चर्चेनंतर सांगतील.

११. मंडळीसोबत प्रचार कार्यात भाग घेण्याआधी तुम्ही काही बदल करणं का महत्त्वाचं आहे?

११ मंडळीसोबत प्रचार कार्यात भाग घेण्याआधी तुम्हाला आणखी काही बदल करावे लागतील, असं कदाचित वडील तुम्हाला सांगतील. हे बदल करणं महत्त्वाचं का आहे? कारण, तुम्ही जेव्हा इतरांना यहोवा देवाबद्दल सांगता तेव्हा तुम्ही त्याचे प्रतिनिधी म्हणून बोलत असता. त्यामुळे तुमची जीवनशैली त्याला आदर देणारी असली पाहिजे.—१ करिंथकर ६:९, १०; गलतीकर ५:१९-२१.

पश्‍चात्ताप करा आणि मागे वळा

१२. सर्वांनीच पश्‍चात्ताप करण्याची गरज का आहे?

१२ बाप्तिस्मा घेण्याआधी तुम्ही आणखी एक पाऊल उचललं पाहिजे. “पश्‍चात्ताप करा आणि मागे वळा म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जातील,” असं प्रेषित पेत्रने म्हटलं. (प्रेषितांची कार्ये ३:१९) पश्‍चात्ताप करण्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, केलेल्या चुकांबद्दल मनापासून वाईट वाटणं. उदाहरणार्थ, बायबलचा अभ्यास सुरू करण्याआधी जर तुम्ही अनैतिक लैंगिक कृत्यं करत असाल, तर तुम्ही पश्‍चात्ताप केला पाहिजे. याउलट, जरी तुम्ही असं काही केलं नसेल आणि आयुष्यभर योग्य तेच करण्याचा प्रयत्न केला असेल तरीसुद्धा तुम्ही पश्‍चात्ताप केला पाहिजे. याचं कारण म्हणजे मुळात आपण सर्वच पापी आहोत आणि आपल्याला देवाच्या क्षमेची गरज आहे.—रोमकर ३:२३; ५:१२.

१३. “मागे वळा” याचा काय अर्थ होतो?

१३ पण मग केलेल्या पापांबद्दल फक्त वाईट वाटणं पुरेसं आहे का? नाही. पश्‍चात्ताप केल्यानंतर “मागे वळा,” असंही पेत्रने म्हटलं होतं. याचा अर्थ, तुम्ही करत असलेल्या वाईट गोष्टी किंवा वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत आणि जे बरोबर आहे ते करायला तुम्ही सुरू केलं पाहिजे. हे समजण्यासाठी एका उदाहरणावर विचार करा. समजा तुम्ही पहिल्यांदाच एका ठिकाणी जायला निघाला आहात. काही अंतर पार केल्यानंतर तुम्हाला जाणवतं, की तुम्ही चुकीच्या दिशेने जात आहात. आता तुम्ही काय कराल? तुम्ही लगेच गाडीचा वेग कमी कराल, थांबाल, गाडी वळवाल आणि योग्य दिशेने जाल. तसंच, बायबलचा अभ्यास करताना कदाचित तुम्हाला जाणवेल, की तुम्ही जीवनात अशा काही गोष्टी करत आहात किंवा तुम्हाला अशा काही सवयी आहेत ज्या बायबलनुसार योग्य नाहीत. तेव्हा तुम्ही त्या थांबवून, मागे वळण्यास म्हणजे जीवनात बदल करून जे योग्य ते करण्यास तयार असलं पाहिजे.

वैयक्तिक समर्पण करा

तुम्ही यहोवाची सेवा करण्याचं त्याला वचन दिलं आहे का?

१४. तुम्ही देवाला स्वतःचं जीवन समर्पित कसं कराल?

१४ बाप्तिस्मा घेण्याआधी आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्वतःचं जीवन यहोवाला समर्पित करणं. हे समर्पण तुम्ही प्रार्थनेद्वारे करता. प्रार्थनेत तुम्ही यहोवाला वचन देता, की ‘इथून पुढे मी फक्त तुझीच उपासना करेन आणि जीवनात तुझ्याच इच्छेला नेहमी प्रथम स्थान देईन.’—अनुवाद ६:१५.

१५, १६. एक व्यक्ती आपलं जीवन यहोवाला समर्पित करण्यास कशामुळे प्रवृत्त होते?

१५ यहोवाचीच सेवा करण्याचं वचन देण्याची तुलना, तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन देण्याशी करता येईल. समजा, एक तरुण व तरुणी लग्न करण्याच्या हेतूने एकमेकांशी गाठीभेटी करतात. तो तरुण जसजसं त्या तरुणीचा स्वभाव ओळखू लागतो तसतसं त्याला ती जास्त आवडू लागते आणि तो तिच्याबरोबर लग्न करण्याचं ठरवतो. हा एक मोठा निर्णय असला तरी, त्या तरुणाचं तिच्यावर प्रेम असल्यामुळे हा निर्णय किंवा ही जबाबदारी घ्यायला तो तयार होतो.

१६ यहोवाबद्दल तुम्ही शिकू लागता तेव्हा त्याच्यावरचं तुमचं प्रेम वाढू लागतं आणि त्याची सेवा करण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न करू लागता. मग त्याची सेवा करण्याचं तुम्ही त्याला प्रार्थनेत वचन देता. जो कोणी येशूचा अनुयायी होऊ इच्छितो त्याने, “स्वतःला नाकारावं,” असं बायबलमध्ये सांगितलं आहे. (मार्क ८:३४) याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, जीवनात स्वतःच्या इच्छा बाजूला सारून यहोवाच्या आज्ञा पाळण्याला प्रथम स्थान देणं. कारण आपल्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षांपेक्षा यहोवाची इच्छा जास्त महत्त्वाची आहे.—१ पेत्र ४:२ वाचा.

चुका होतील म्हणून घाबरू नका

१७. काही लोक यहोवाला त्यांचं जीवन समर्पित का करत नाहीत?

१७ काही लोक यहोवाला आपलं जीवन समर्पित करत नाहीत, कारण त्याची सेवा करण्याचं त्याला दिलेलं वचन आपल्याला पाळता येणार नाही अशी भीती त्यांना वाटते. त्यांना यहोवाला निराश करायचं नसतं; किंवा ते असा विचार करतात की, जर त्यांनी त्यांचं जीवन यहोवाला समर्पित केलंच नाही, तर तो त्यांच्या चुकांसाठी त्यांना जबाबदार धरणार नाही.

१८. यहोवाला निराश करण्याच्या भीतीवर तुम्ही कशी मात करू शकाल?

१८ यहोवावर तुमचं खरंच प्रेम असेल, तर त्याला निराश करण्याच्या भीतीवर तुम्ही मात करू शकाल. तुमचं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे तुम्ही नेहमी त्याला दिलेलं वचन पाळायचा पुरेपूर प्रयत्न कराल. (उपदेशक ५:४; कलस्सैकर १:१०) यहोवाच्या इच्छेनुसार वागणं कठीण आहे, असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. प्रेषित योहानने लिहिलं: “देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचे पालन करावे; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहान ५:३.

१९. आपलं जीवन यहोवाला समर्पित करण्यास तुम्ही का घाबरू नये?

१९ यहोवाला तुमचं जीवन समर्पित करण्याकरता तुम्ही परिपूर्ण असणं गरजेचं नाही. आपल्या शक्तीपलीकडे असलेल्या गोष्टींची यहोवा आपल्याकडून कधीच अपेक्षा करत नाही. (स्तोत्र १०३:१४) उलट तो आपल्याला जे योग्य ते करायला मदत करतो. (यशया ४१:१०) तेव्हा, यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा आणि तो तुमचा “मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.

तारणासाठी जाहीर रीत्या कबूल करणं गरजेचं

२०. यहोवाला जीवन समर्पित केल्यानंतर पुढचं पाऊल कोणतं आहे?

२० मग यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्यास तुम्ही तयार आहात का? यहोवाला जीवन समर्पित केल्यानंतर तुम्ही पुढचं पाऊल उचलायला तयार होता. ते म्हणजे बाप्तिस्मा घेणं.

२१, २२. तुम्ही तुमचा विश्वास जाहीर रीत्या “कबूल” कसा करू शकता?

२१ तुम्ही यहोवाला तुमचं जीवन समर्पित केलं आहे आणि तुमची बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे, हे तुम्ही तुमच्या मंडळीतल्या वडील वर्गाच्या संयोजकाला सांगितलं पाहिजे. मग ते इतर काही वडिलांना तुमच्यासोबत बायबलच्या मूलभूत शिकवणींची उजळणी करायला सांगतील. तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला तयार आहात असं या वडिलांनी ठरवलं तर ते यहोवाच्या साक्षीदारांच्या पुढच्या संमेलनात किंवा अधिवेशनात तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता, असं सांगतील. संमेलनात किंवा अधिवेशनात, बाप्तिस्म्याचा अर्थ काय होतो या विषयावर एक भाषण दिलं जाईल. हे भाषण देणारा वक्ता, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्यांना दोन साधे प्रश्न विचारेल. या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही तुमचा विश्वास जाहीर रीत्या “कबूल” करता.—रोमकर १०:१०.

२२ यानंतर तुमचा बाप्तिस्मा होतो. बाप्तिस्म्याच्या वेळी तुम्हाला पाण्यात पूर्णपणे बुडवून काढलं जातं. त्या प्रसंगी हजर असलेल्या सर्वांना दिसून येतं, की तुम्ही यहोवाला तुमचं जीवन समर्पित केलं आहे आणि आता तुम्ही यहोवाचे साक्षीदार बनला आहात.

तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ

२३. “पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा,” घेण्याचा काय अर्थ होतो?

२३ येशूने म्हटलं, की त्याचे शिष्य “पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा” घेतील. (मत्तय २८:१९ वाचा.) याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ तुम्ही यहोवाचा अधिकार, यहोवाच्या संकल्पात असलेली येशूची भूमिका, तसंच आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवा आपला पवित्र आत्मा वापरतो, हे मान्य करता.—स्तोत्र ८३:१८; मत्तय २८:१८; गलतीकर ५:२२, २३; २ पेत्र १:२१.

इथून पुढे तुम्ही देवाची इच्छा पूर्ण कराल, हे तुमच्या बाप्तिस्म्यावरून दिसून येतं

२४, २५. (क) तुमच्या बाप्तिस्म्याचा काय अर्थ होतो? (ख) या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात कोणत्या प्रश्‍नाचं उत्तर मिळेल?

२४ तुमच्या बाप्तिस्म्यावरून एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते. जेव्हा तुम्ही पाण्याखाली जाता तेव्हा तुम्ही आधीचं जीवन जगायचं सोडून देता. म्हणजे एका अर्थाने तुमचा मृत्यू होतो. मग जेव्हा तुम्ही पाण्यातून वर येता, तेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक नवीन जीवन सुरू करत आहात, असा याचा अर्थ होतो. इथून पुढे तुम्ही यहोवाची सेवा कराल, असंही त्यावरून दिसतं. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, तुम्ही कुठल्याही मानवाला, संघटनेला किंवा कार्याला नाही, तर यहोवाला तुमचं जीवन समर्पित करत आहात.

२५ समर्पणामुळे यहोवासोबत तुमचं नातं आणखीन मजबूत होईल. (स्तोत्र २५:१४) पण फक्त बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपला बचाव किंवा तारण होईल, असा आपण विचार करू नये. प्रेषित पौलने लिहिलं: “तुम्ही भीतभीत व थरथर कापत आपले तारण मिळवून घेण्याचा प्रयत्न करत राहा.” (फिलिप्पैकर २:१२) याचा अर्थ, बाप्तिस्मा हे तारण मिळवण्याचं पहिलं पाऊल आहे. मग बाप्तिस्म्यानंतर नेहमी यहोवाच्या जवळ राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता? या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हाला या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात मिळेल.