व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय दोन

बायबल—देवाकडून आलेलं पुस्तक

बायबल—देवाकडून आलेलं पुस्तक

१, २. बायबल ही देवाकडून एक मौल्यवान भेटवस्तू आहे, असं आपण का म्हणतो?

समजा तुमच्या एका मित्राने तुम्हाला एक भेटवस्तू दिली, तर ‘मी कधी ती उघडून बघतो,’ असं तुम्हाला होतं. तुमच्या मित्राने तुमच्याबद्दल विचार केला या जाणिवेने तुम्हाला फार आनंद होतो आणि तुम्ही त्याचे आभार मानता.

बायबलसुद्धा देवाने आपल्याला दिलेल्या एका भेटवस्तूप्रमाणेच आहे. त्यात दिलेली माहिती इतर कुठेही मिळणार नाही. उदाहरणार्थ, त्यात सांगितलं आहे की यहोवा देवाने स्वर्ग, पृथ्वी, पहिला पुरुष व स्त्री यांना बनवलं. तसंच, त्यात अशी तत्त्वं दिली आहेत ज्यांच्या आधारावर आपण आपल्या समस्या सोडवू शकतो. पृथ्वीवर चांगली परिस्थिती आणण्याचा देवाचा संकल्प आहे. तो हा संकल्प कसा पूर्ण करणार आहे हेही बायबलमध्ये सांगितलं आहे. खरंच, बायबल ही देवाकडून एक मौल्यवान भेटवस्तू आहे.

३. बायबलचा अभ्यास करताना तुम्हाला काय जाणवेल?

बायबलचा अभ्यास करताना तुम्हाला जाणवेल, की तुम्ही यहोवाचे मित्र बनावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही त्याच्याबद्दल जितकं जाणून घ्याल तितकीच तुमची त्याच्यासोबतची मैत्री घनिष्ठ होईल.

४. बायबलबद्दलची कोणती माहिती वाचून तुम्ही प्रभावित झालात?

बायबलचं भाषांतर २,८०० पेक्षा जास्त भाषांमध्ये करण्यात आलं आहे. त्याच्या कोट्यवधी प्रती छापण्यात आल्या आहेत. जगातले ९० टक्के लोक आपल्या मातृभाषेत बायबल वाचू शकतात. शिवाय, दर आठवडी बायबलच्या दहा लाखांपेक्षा अधिक प्रतींचा खप होतो. खरंच, बायबलसारखं दुसरं कुठलंच पुस्तक नाही!

५. बायबल हे “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले” आहे, असं आपण का म्हणू शकतो?

बायबल हे “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले” आहे. (२ तीमथ्य ३:१६ वाचा.) पण तुम्ही विचार कराल: ‘ते तर माणसांनी लिहिलं, मग ते देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलं, याचा काय अर्थ होतो?’ बायबलमध्ये असं म्हटलं आहे, “माणसे देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने बोलली.” (२ पेत्र १:२१) हे समजण्यासाठी एका उदाहरणावर विचार करा. समजा एका कंपनीचा मालक त्याच्या सेक्रेटरीला एक पत्र लिहायला सांगतो. मालकाने सेक्रेटरीला पत्र लिहायला सांगितलं असलं तरी, ते पत्र कोणाचं असेल? सेक्रेटरीचं की मालकाचं? तसंच, देवाने स्वतः बायबल लिहिलं नाही. त्याने माणसांचा उपयोग केला. पण या माणसांनी स्वतःचे विचार लिहिले नाहीत तर देवाने आपले विचार लिहिण्याची त्यांना प्रेरणा दिली. म्हणून, बायबल हे “देवाचे वचन” आहे.—१ थेस्सलनीकाकर २:१३; अंत्यटीप २ पाहा.

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स हे बायबल अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे

बायबलमधली माहिती अचूक आहे

६, ७. बायबलमधल्या भागांचा एकमेकांशी ताळमेळ आहे, हे आपण खातरीने का म्हणू शकतो?

बायबल लिहायला १,६०० पेक्षा अधिक वर्षं लागली. चाळीस लोकांनी बायबलचं लिखाण केलं. हे लोक वेगवेगळ्या काळात राहात होते. शिवाय, त्यांपैकी काही जण खूप शिकलेले तर काही कमी शिकलेले होते. जसं की, एक लेखक वैद्य होता तर इतर काही शेतकरी, मासे पकडणारे, मेंढपाळ, संदेषटे, न्यायाधीश व राजे होते. वेगवेगळ्या लोकांनी बायबल लिहिलं असलं तरी, त्यातल्या सर्व भागांचा एकमेकांशी ताळमेळ आहे. एका ठिकाणी एक गोष्ट लिहिली आहे तर दुसऱ्या ठिकाणी त्याच्या अगदी उलट, असं आढळत नाही. *

जगातल्या समस्यांची सुरुवात कुठून व कशी झाली ते बायबलमधल्या सुरुवातीच्या काही अध्यायांत सांगितलं आहे. तसंच, देव या समस्या काढून पृथ्वीला नंदनवन कसं बनवणार आहे ते बायबलच्या शेवटच्या काही अध्यायांत सांगितलं आहे. बायबलमध्ये मानवांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. शिवाय, देवाने नेहमी त्याचा संकल्प कसा पूर्ण केला तेही बायबल वाचल्यावर आपल्याला कळतं.

८. विज्ञानाविषयी बायबलमध्ये दिलेली माहिती अचूक आहे, याची उदाहरणं सांगा.

विज्ञान शिकवण्यासाठी बायबलचं लिखाण करण्यात आलं नसलं, तरी विज्ञानाविषयी त्यात दिलेली माहिती अगदी अचूक आहे. देवाकडून असलेल्या पुस्तकातच अशी अचूक माहिती असू शकते, नाही का? उदाहरणार्थ, बायबलमधल्या लेवीय नावाच्या पुस्तकात देवाने, रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून प्राचीन इस्राएली लोकांना विशिष्ट सूचना दिल्या होत्या. जीवाणूंमुळे रोग पसरतात याचा शोध लागण्याआधीच बायबलमध्ये या खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय, पृथ्वी अंतराळात निराधार टांगलेली आहे असं बायबलमध्ये जे सांगितलं होतं ते शंभर टक्के खरं आहे. पृथ्वीच्या आकाराविषयीदेखील लोकांचा चुकीचा समज होता. पण बायबलमध्ये स्पष्ट सांगितलं होतं, की पृथ्वीचा आकार गोल आहे. मराठीतल्या ईझी-टू-रीड व्हर्शन या भाषांतरात यशया ४०:२२ वचनात म्हटलं आहे: “[परमेश्वर] पृथ्वीगोलावर स्थानापन्न होतो.” या वचनावरून स्पष्टपणे कळतं, की पृथ्वीचा आकार गोल आहे.

९. बायबल लेखकांच्या प्रामाणिकतेवरून आपल्याला काय कळतं?

बायबलमध्ये इतिहासाबद्दल सांगितलेल्या गोष्टीसुद्धा अचूक आहेत. पण इतिहासाच्या बऱ्याच पुस्तकांमधली माहिती पूर्णपणे अचूक नसते, कारण ती पुस्तकं लिहिणारे खरी माहिती देत नाहीत. जसं की, त्यांच्या देशाचा युद्धात पराभव झाला असेल तर, ते नेहमीच त्याचा उल्लेख करत नाहीत. बायबलच्या लेखकांनी मात्र इस्राएल देशाचा जेव्हा-जेव्हा पराभव झाला तेव्हा-तेव्हा त्याचा अगदी प्रामाणिकपणे उल्लेख केला. एवढंच नव्हे तर या लेखकांच्या हातून जेव्हा चुका झाल्या, तेव्हा त्यांनी या चुकांचादेखील उल्लेख केला. गणना नावाच्या पुस्तकात मोशेने स्वतःच्या एका गंभीर चुकीबद्दल आणि देवाने त्याला कोणती शिक्षा दिली ते सांगितलं आहे. (गणना २०:२-१२) बायबल लेखकांच्या प्रामाणिकतेवरून स्पष्ट कळतं, की बायबल हे देवाचंच वचन आहे आणि आपण त्यावर भरवसा ठेवू शकतो.

सर्वोत्तम सल्ल्याचा खजिना!

१०. बायबलमधला सल्ला आपण आजही का लागू करू शकतो?

१० बायबल हे “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले असून ते शिकवण्यासाठी, ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी, न्यायनीतीनुसार शिस्त लावण्यासाठी उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) यहोवानेच आपल्याला बनवलं असल्यामुळे, आपण काय विचार करतो, आपल्या मनात कोणत्या भावना येतात ते त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आपण स्वतःला जितकं ओळखत नसू तितकं यहोवा आपल्याला ओळखतो. आपण आनंदी राहावं, अशीच त्याची इच्छा आहे. काय केल्याने आपलं भलं होईल आणि काय केल्याने आपलं नुकसान होईल, हे आपल्यापेक्षा त्याला चांगलं माहीत आहे. याचा अर्थ बायबलमधला सल्ला आपण आजही लागू करू शकतो.

११, १२. (क) मत्तय पुस्तकाच्या अध्याय ५-७ मध्ये येशूने कोणकोणत्या बाबतीत उत्तम सल्ला दिला आहे? (ख) बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

११ मत्तय पुस्तकाच्या अध्याय ५-७ मध्ये येशूने विविध गोष्टींबाबत उत्तम सल्ला दिला. आपण सुखी कसं होऊ शकतो, इतरांबरोबर आपण कसं वागलं पाहिजे, प्रार्थना कशी केली पाहिजे, पैशाबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, यांबद्दल येशूने सल्ला दिला. हा सल्ला २,००० वर्षांपूर्वी दिलेला असला, तरी आजही तो तितकाच प्रभावी आणि फायदेकारक आहे.

१२ कौटुंबिक जीवन आनंदी बनवण्यासाठी, कामाच्या बाबतीत मेहनती असण्यासाठी आणि इतरांसोबत शांतीने राहण्यासाठी बायबलमध्ये यहोवाने तत्त्वं दिली आहेत. आपण कोणत्याही पार्श्वभूमीचे असलो, कुठेही राहत असलो किंवा आपल्याला कोणत्याही समस्या असल्या तरी बायबलमधल्या तत्त्वांचा आपल्याला फायदा होऊ शकतो.—यशया ४८:१७ वाचा; अंत्यटीप ३ पाहा.

बायबलमधल्या भविष्यवाण्या भरवशालायक आहेत

बॅबिलॉनचा नाश होईल अशी यशया नावाच्या एका बायबल लेखकाने भविष्यवाणी केली होती

१३. बॅबिलॉन शहराच्या नाशाविषयी यशयाने काय भविष्यवाणी केली होती?

१३ बायबलमधल्या बहुतेक भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आहेत. उदाहरणार्थ, बॅबिलॉनचा नाश होईल, अशी यशयाने केलेली भविष्यवाणी. (यशया १३:१९) या शहराचा नाश कसा होईल त्याची अगदी बारीकसारीक माहिती त्याने दिली होती. बॅबिलॉन शहराभोवती उंच भिंती होत्या आणि त्याला भली मोठी दारं होती. शिवाय, संपूर्ण शहराभोवती एक नदी होती. यामुळे हे शहर अगदी सुरक्षित आहे, असं समजलं जायचं. पण यशयाने अशी भविष्यवाणी केली की, शहराच्या नाशाच्या वेळी नदीचं पाणी आटवलं जाईल, दारं उघडी ठेवली जातील आणि शत्रू हे शहर युद्ध न करताच जिंकतील. तसंच, बॅबिलॉनवर कब्जा मिळवणाऱ्या राजाचं नाव कोरेश असेल हेही त्याने सांगितलं.—यशया ४४:२७–४५:२ वाचा; अंत्यटीप ४ पाहा.

१४, १५. यशयाने केलेली भविष्यवाणी खरी कशी ठरली?

१४ यशयाने ही भविष्यवाणी केल्यावर २०० वर्षांनी, एका सैन्याने बॅबिलॉनवर हल्ला चढवला. हे सैन्य कोणाचं होतं? भविष्यवाणीनुसार ते पर्शियाचा राजा कोरेश याचं सैन्य होतं. पण, त्याला बॅबिलॉनवर विजय मिळवता आला का?

१५ बॅबिलॉनवर हल्ला झाला त्या रात्री, तिथल्या लोकांची मेजवानी चालली होती. शहराभोवती असलेल्या उंच भिंती आणि नदी यांमुळे आपण अगदी सुरक्षित आहोत, असं त्यांना वाटत होतं. इकडे शहराबाहेर, कोरेश राजाच्या सैन्याने नदीचं पाणी दुसरीकडे वळवल्यामुळे, नदीचं पाणी कमी झालं. त्यामुळे पर्शियन सैन्य सहज रीतीने दारापर्यंत पोहचू शकलं. पण ते शहराच्या आत कसं शिरलं? भविष्यवाणीत म्हटल्यानुसार शहराची भली मोठी दारं उघडी होती. त्यामुळे कोरेशच्या सैन्याने अगदी सहज शहरात प्रवेश केला.

१६. (क) बॅबिलॉनचं शेवटी काय होईल, याविषयी यशयाने काय भविष्यवाणी केली? (ख) यशयाने केलेल्या भविष्यवाणीतला शब्द न्‌ शब्द पूर्ण झाला, असं आपण का म्हणू शकतो?

१६ यशयाने अशी भविष्यवाणी केली होती की बॅबिलॉन शहर शेवटी पूर्णपणे ओसाड पडेल. त्याने असं लिहिलं: “त्यात पुनः कधी वस्ती होणार नाही.” (यशया १३:२०) ही भविष्यवाणी पूर्ण झाली का? इराकमधल्या बगदाद शहराच्या दक्षिणेकडे एकेकाळी बॅबिलॉन शहर होतं. आज त्या ठिकाणी या शहराचे फक्त अवशेष उरले आहेत. आज तिथे कोणीही राहत नाही. यहोवाने बॅबिलॉनविषयी म्हटलं होतं की “नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकेन.”—यशया १४:२२, २३. *

बॅबिलॉनचे अवशेष

१७. देवाने दिलेल्या सर्व अभिवचनांवर आपण भरवसा का ठेवू शकतो?

१७ बायबलमधल्या कितीतरी भविष्यवाण्या पूर्ण झाल्या असल्यामुळे येणाऱ्या काळाबद्दलच्या भविष्यवाण्यासुद्धा नक्की पूर्ण होतील, असा भरवसा आपण बाळगू शकतो. पृथ्वीला नंदनवन बनवण्याचं, यहोवाने दिलेलं वचन तो नक्की पूर्ण करेल, याबद्दल आपण खातरी बाळगू शकतो. (गणना २३:१९ वाचा.) देव “कधीही खोटे बोलू शकत नाही.” म्हणूनच त्याने आपल्याला “फार पूर्वीच” दिलेल्या सर्वकाळाच्या जीवनाच्या आशेचं वचन तो नक्की पूर्ण करेल.—तीत १:२. *

बायबलचं ज्ञान घेतल्याने जीवन बदलू शकतं

१८. देवाच्या वचनाबद्दल पौलने काय म्हटलं?

१८ बायबलसारखं दुसरं कुठलंच पुस्तक नाही, हे आपण शिकलो. त्यात ताळमेळ आहे. विज्ञान किंवा इतिहास यांबद्दलची त्यातली माहिती अचूक आहे. त्यात उत्तम सल्ला आहे. त्यातल्या बऱ्याच भविष्यवाण्या आधीच पूर्ण झाल्या आहेत. पण बायबलविषयी फक्त इतकंच म्हणता येईल का? प्रेषित पौलने असं लिहिलं: “देवाचे वचन जिवंत व प्रभावशाली” आहे. याचा काय अर्थ होतो?—इब्री लोकांना ४:१२ वाचा.

१९, २०. (क) बायबलचं ज्ञान घेतल्याने तुम्हाला स्वतःबद्दल काय समजेल? (ख) या मौल्यवान भेटवस्तूबद्दल तुम्ही आभारी आहात, हे तुम्ही कसं दाखवू शकता?

१९ बायबलमुळे तुमचं जीवन बदलू शकतं. तुम्ही खरोखर कशा प्रकारची व्यक्ती आहात हे तुम्हाला बायबलचा अभ्यास केल्याने समजेल. तसंच, तुमच्या मनातले खोल विचार व भावनाही तुम्हाला समजतील. उदाहरणार्थ, आपल्याला कदाचित वाटेल की आपलं देवावर प्रेम आहे पण ते प्रेम बायबलमध्ये दिलेल्या गोष्टी जीवनात लागू केल्यानेच सिद्ध होईल.

२० बायबल खरोखर देवाकडून मिळालेलं पुस्तक आहे. तुम्ही ते वाचावं, त्याचा अभ्यास करावा आणि तुम्हाला त्याची गोडी लागावी अशी देवाची इच्छा आहे. या मौल्यवान भेटवस्तूबद्दल त्याचे आभार माना आणि त्याचा मनापासून अभ्यास करा. तेव्हाच तुम्हाला मानवांसाठी असलेला त्याचा संकल्प समजेल. या संकल्पाबद्दलची अधिक माहिती आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत.

^ परि. 6 बायबलमधल्या वेगवेगळ्या भागांचा एकमेकांशी ताळमेळ नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण हे खरं नाही. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकाची पृष्ठं १६ आणि १७ पाहा.

^ परि. 16 बायबलमधल्या इतर भविष्यवाण्यांविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकातली पृष्ठं २७-२९ पाहा.

^ परि. 17 बॅबिलॉनच्या नाशाविषयी खरी झालेली भविष्यवाणी, बायबलमधल्या इतर भविष्याण्यांच्या उदाहरणांपैकी केवळ एक उदाहरण आहे. येशू ख्रिस्ताविषयी करण्यात आलेल्या भविष्यवाण्यांबद्दलची अधिक माहिती तुम्ही अंत्यटीप ५ मध्ये वाचू शकता.