अध्याय सहा
मेल्यावर आपण कुठे जातो?
१-३ माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आपल्या मनात कोणकोणते प्रश्न येतात? आणि जगातले वेगवेगळे धर्म यांची काय उत्तरं देतात?
‘यापुढे मरण नसेल,’ असं वचन बायबलमध्ये देण्यात आलं आहे. (प्रकटीकरण २१:४) येशूच्या खंडणीमुळे आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळणं शक्य झालं आहे, हे आपण अध्याय पाचमध्ये पाहिलं होतं. पण लोक अजूनही मरण पावतात. (उपदेशक ९:५) मग, ‘मेल्यावर आपण कुठे जातो?’ हा प्रश्न आपल्या मनात येतो.
२ आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा खासकरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं. ‘आपली प्रिय व्यक्ती कुठे गेली असेल? ती आपल्याला पाहू शकते का? आपल्याला मदत करू शकते का? आपण तिला पुन्हा भेटू शकू का?’ असे प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात.
३ जगातल्या वेगवेगळ्या धर्मांत या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरं दिली जातात. काही म्हणतात, तुम्ही जर आयुष्यभर चांगलं वागलात तर तुम्ही स्वर्गात जाल; आणि वाईट वागलात तर नरकात जळत राहाल. काही म्हणतात, मेल्यावर तुम्ही अदृश्य बनता आणि कुटुंबातल्या इतर मेलेल्या नातेवाइकांबरोबर राहता. आणखी काही जण म्हणतात, की मेल्यावर तुमचा न्याय केला जातो. त्याच्या आधारावर तुमचा पुनर्जन्म होतो आणि तुम्ही दुसरं शरीर धारण करून एकतर पुन्हा मानव बनता किंवा एखादा प्राणी बनता.
४. जगातल्या धर्मांची वेगवेगळी उत्तरं असली तरी ते कोणती एकच गोष्ट शिकवत असतात?
४ जगातल्या धर्मांची वेगवेगळी उत्तरं असली तरी, ते सर्व मुळात एकच गोष्ट शिकवतात. ती म्हणजे माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याच्यातलं काहीतरी, म्हणजे त्याचा आत्मा जिवंत राहतो. पण हे खरं आहे का?
मेल्यावर आपण कुठे जातो?
५, ६. आपण मरतो तेव्हा आपलं काय होतं?
५ आपण मरतो तेव्हा आपलं काय होतं, हे यहोवाला माहीत आहे आणि त्याने आपल्याला सांगितलं आहे की, एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचं जीवन संपतं. जीवन संपल्यानंतर त्याच्या भावना, त्याच्या आठवणी यादेखील नाहीशा होतात. * मेलेल्या व्यक्तीला पाहता येत नाही, ऐकू येत नाही किंवा विचारही करता येत नाही.
६ राजा शलमोन याने असं लिहिलं: “मृतांस तर काहीच कळत नाही.” मेलेली व्यक्ती कोणावर प्रेम करू शकत नाही किंवा कोणाचा द्वेषही करू शकत नाही. मेल्यावर ती कुठलंच काम करू शकत नाही. तिची “युक्ती-प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान” सर्व काही संपतं. (उपदेशक ९:५, ६, १० वाचा.) शिवाय, स्तोत्र १४६:४ मध्ये म्हटलं आहे, की माणसाचा मृत्यू होतो तेव्हा “त्याच्या योजनांचा शेवट होतो;” म्हणजे त्याच्या मनातले विचारही संपतात.
येशूने मृत्यूविषयी काय म्हटलं होतं?
७. येशूने मृत्यूविषयी काय म्हटलं?
७ येशूचा जिवलग मित्र लाजर याचा मृत्यू झाला तेव्हा येशू त्याच्याविषयी आपल्या शिष्यांना म्हणाला, की “आपला मित्र लाजर झोपला आहे.” येशूला असं म्हणायचं नव्हतं की, लाजर आराम करत आहे. कारण पुढे तो खुलासा देत म्हणतो, की “लाजर मेला आहे.” (योहान ११:११-१४) येशूने इथे मृत्यूची तुलना झोपेशी केली. लाजर स्वर्गात गेला आहे किंवा त्याच्या मृत नातेवाइकांबरोबर अदृश्य रूपात आहे, असं येशूने म्हटलं नाही. किंवा तो नरकात यातना भोगत आहे अथवा त्याने दुसऱ्या मानवाचं किंवा प्राण्याचं शरीर धारण करून पुनर्जन्म घेतला आहे, असाही त्याच्या बोलण्याचा अर्थ नव्हता. त्याने अगदी सोप्या शब्दात म्हटलं, तो गाढ झोपेत आहे. आणखी एका प्रसंगी त्याने मृत्यूची तुलना झोपेशी केली. याईरच्या मृत मुलीला पुन्हा जिवंत करण्याआधी तो म्हणाला होता: “मुलगी मेली नाही, ती झोपली आहे.”—लूक ८:५२, ५३.
८. मानवांनी मरावं या उद्देशाने देवाने त्यांना बनवलं नाही, असं आपण का म्हणतो?
८ पण मग देवाने आदाम आणि हव्वा यांना असं बनवलं होतं का, की ते कालांतराने मरतील? नाही. यहोवाने त्यांना परिपूर्ण आरोग्य देऊन सदासर्वकाळ जिवंत राहण्याकरता बनवलं होतं. तसंच, त्यांना अनंतकाळ जगण्याची इच्छा दिली होती. (उपदेशक ३:११) जसं मुलांनी म्हातारं व्हावं आणि मरावं, अशी पालकांची इच्छा नसते, तसंच आपण मरावं अशी यहोवाचीदेखील इच्छा नाही. पण जर देवाने आपल्याला सर्वकाळ जगण्यासाठी बनवलं आहे तर आपण का मरतो?
आपण का मरतो?
९. यहोवाने आदाम व हव्वा यांना दिलेली आज्ञा योग्य का होती?
९ एदेन बागेत यहोवाने आदामला सांगितलं: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ति २:९, १६, १७) यहोवाने त्यांना स्पष्ट शब्दांत दिलेली ही आज्ञा कठीण नव्हती. तसंच योग्य व अयोग्य काय हे आदाम आणि हव्वाला सांगण्याचा हक्क यहोवाला होता. यहोवाची आज्ञा पाळून ते दाखवून देऊ शकत होते, की ते त्याच्या अधिकाराचा आदर करतात. शिवाय, यहोवाने त्यांना जे काही दिलं होतं त्याच्याबद्दल ते खरोखरच आभारी आहेत हेही ते त्यांच्या निर्णयावरून दाखवू शकले असते.
१०, ११. (क) सैतानाने आदाम व हव्वा यांची फसवणूक कशी केली? (ख) आदाम व हव्वा यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांना शिक्षा का मिळायला हवी होती?
१० पण आदाम व हव्वा यांनी यहोवाची आज्ञा मोडण्याची निवड केली. सैतानाने जेव्हा हव्वाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” असं विचारलं, तेव्हा हव्वाने त्याला म्हटलं: “बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.”—उत्पत्ति ३:१-३.
११ तेव्हा सैतान तिला म्हणाला: “तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” (उत्पत्ति ३:४-६) सैतानाची इच्छा होती की, योग्य आणि अयोग्य काय हे आपण स्वतः ठरवू शकतो, असा हव्वाने विचार करावा. तसंच तिने आज्ञा मोडल्यास काय होईल, याविषयीही त्याने खोटं सांगितलं. तू फळ खाल्लंस तर मरणार नाहीस, असं त्याने तिला सांगितलं. म्हणून हव्वाने ते फळ खाल्लं आणि आपल्या पतीलाही दिलं. तुम्ही ते फळ खाऊ नका, असं यहोवाने सांगितल्याचं आदाम आणि हव्वा या दोघांनाही चांगल्या प्रकारे माहीत होतं. त्यामुळे त्यांनी जेव्हा ते फळ खाल्लं तेव्हा त्यांनी देवाने स्पष्ट शब्दांत दिलेली योग्य आज्ञा मोडली. ते फळ खाऊन त्यांनी दाखवून दिलं, की त्यांच्या प्रेमळ पित्याबद्दल त्यांना कसलाच आदर नाही. म्हणून त्यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांना शिक्षा मिळणं योग्य होतं.
१२. आदाम आणि हव्वा यांनी यहोवाचा अनादर केला त्याबद्दल आपल्याला वाईट का वाटतं?
१२ निर्माणकर्त्याबद्दल आपल्या पहिल्या पालकांनी दाखवलेला अनादर पाहून आपल्याला खरंच वाईट वाटतं. समजा, तुम्ही तुमच्या मुलांना अतिशय कष्टाने मोठं करता; पण मोठी झाल्यावर ती तुमच्या विरुद्ध बंड करतात आणि तुमच्या इच्छेच्या विरुद्ध वागतात. तेव्हा तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला खूप दुःख होईल, नाही का?
१३. ‘तू मातीला परत जाऊन मिळशील’ असं यहोवाने आदामला म्हटलं, तेव्हा त्याचा काय अर्थ होता?
१३ देवाची आज्ञा मोडून आदाम व हव्वा यांनी पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची संधी गमावली. आदामने आज्ञा मोडल्यानंतर यहोवाने त्याला म्हटलं: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९ वाचा.) याचा अर्थ, आदाम पुन्हा माती बनणार होता, जणू त्याला घडवण्यातच आलं नव्हतं. (उत्पत्ति २:७) आदामने पाप केल्यावर, तो मेला आणि त्याचं अस्तित्व मिटलं.
१४. आपण का मरतो?
१४ आदाम व हव्वा यांनी देवाची आज्ञा पाळली असती तर ते आजही जिवंत असते. पण आज्ञा मोडल्यामुळे ते पापी बनले आणि काही काळाने मरण पावले. पाप हे एका भयंकर आजाराप्रमाणे आहे, जे आपल्याला वारशाने रोमकर ५:१२) पण मानवांसाठी देवाचा हा संकल्प नव्हता. माणसाने मरावं अशी देवाची मुळीच इच्छा नव्हती म्हणूनच बायबलमध्ये मृत्यूला “शत्रू” म्हटलं आहे.—१ करिंथकर १५:२६.
आपल्या पहिल्या आईवडिलांकडून मिळालं. आपण जन्मतःच पापी आहोत आणि म्हणून आपण मरतो. (सत्य आपल्याला मुक्त करतं
१५. मृत्यूबद्दल सत्य माहीत झाल्याने आपण कशापासून मुक्त होतो?
१५ मृत्यूविषयी बायबलमध्ये दिलेलं सत्य माहीत झाल्यावर आपण अनेक खोट्या विचारांपासून मुक्त होतो. मृत व्यक्तींना कसल्याही यातना किंवा दुःख होत नाही. आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही तसंच ते आपल्याशी बोलू शकत नाहीत. ते आपली मदत करू शकत नाहीत किंवा आपण त्यांना मदत करू शकत नाही. ते कुठल्याही प्रकारे आपली हानी करू शकत नसल्यामुळे आपण त्यांना घाबरण्याची गरज नाही. पण पुष्कळ धर्मांत अशी शिकवण दिली जाते, की मृत लोक कुठेतरी जिवंत असतात आणि आपण पाळकांना किंवा पुजाऱ्यांना पैसे देऊन त्यांना मदत करू शकतो. पण मेल्यानंतर माणसाची स्थिती काय होते याबद्दलचं सत्य माहीत झाल्यावर आपण अशा प्रकारच्या खोट्या शिकवणींना बळी पडत नाही.
१६. अनेक धर्मांत मृतांविषयी कोणती खोटी शिकवण दिली जाते?
१६ सैतान खोट्या धर्माचा उपयोग करून आपल्याला फसवतो. मृत लोक कुठेतरी जिवंत आहेत, असा विचार तो आपल्याला करायला लावतो. म्हणून काही धर्मांत अशी शिकवण दिली जाते, की माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीरातलं काहीतरी म्हणजे त्याचा आत्मा जिवंत राहतो. तुम्हालाही तुमच्या धर्मात अशीच शिकवण मिळाली आहे का? की, बायबलमध्ये मृतांच्या स्थितीविषयी जे सांगितलं आहे तशी शिकवण तुम्हाला मिळाली आहे? लोकांना यहोवापासून दूर नेण्यासाठी सैतान अशा खोट्या शिकवणींचा उपयोग करतो.
१७. लोकांना नरकात जळत ठेवण्याच्या शिकवणीने यहोवाचा अनादर का होतो?
१७ अनेक धर्मांत जे शिकवलं जातं ते धक्कादायक आहे. उदाहरणार्थ, वाईट लोकांना नरकात जळत ठेवलं जातं असं काही लोक शिकवतात. या खोट्या शिकवणीमुळे यहोवाचा अनादर होतो. तो कधीच लोकांना अशा प्रकारे यातना देणार नाही. (१ योहान ४:८ वाचा.) समजा एका पालकाने आपल्या लहान मुलाला शिक्षा देण्यासाठी त्याचा हात आगीवर धरला, तर अशा पालकाबद्दल तुम्ही काय विचार कराल? तो क्रूर आहे, असाच तुम्ही विचार कराल. तुम्ही अशा व्यक्तीशी मैत्री कराल का? मुळीच नाही. यहोवाविषयी आपल्याला असंच वाटावं, अशी सैतानाची इच्छा आहे.
१८. आपण मृत लोकांना घाबरण्याची का गरज नाही?
१८ काही धर्मांत शिकवलं जातं, की लोक मेल्यानंतर आत्मा म्हणून जिवंत राहतात. ते असंही शिकवतात की, आपण मेलेल्या लोकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना घाबरलं पाहिजे कारण ते त्यांच्या शक्तीचा वापर करून आपलं भलं करू शकतात किंवा आपलं नुकसानही करू शकतात. पुष्कळ लोक या खोट्या शिकवणीला मानतात. त्यामुळे मेलेल्या व्यक्तींची त्यांना भीती वाटते आणि ते यहोवाच्याऐवजी त्या मेलेल्या लोकांची उपासना करतात. पण लक्षात ठेवा मेलेल्या लोकांना कसल्याही भावना नसतात, त्यांना कसलीही जाणीव होत नसते त्यामुळे आपण त्यांना घाबरण्याची गरज नाही. यहोवा आपला निर्माणकर्ता आहे. तोच खरा देव असल्यामुळे आपण फक्त त्याचीच उपासना केली पाहिजे.—प्रकटीकरण ४:११.
१९. मेलेल्या लोकांच्या स्थितीबद्दल बायबलमधलं सत्य जाणल्यावर आपल्याला काय फायदा होतो?
१९ मेलेल्या लोकांच्या स्थितीबद्दल बायबलमधलं सत्य माहीत झाल्यावर अनेक धर्मांत शिकवल्या जाणाऱ्या खोट्या शिकवणींपासून आपली सुटका होते. या सत्यामुळेच यहोवाने आपल्याला जीवनाबद्दल आणि भविष्याबद्दल जी अभिवचनं दिली आहेत ती समजायला मदत होते.
२०. पुढच्या अध्यायात आपण कशाविषयी शिकणार आहोत?
२० प्राचीन काळात ईयोब नावाच्या, यहोवाच्या एका सेवकाने त्याला असं विचारलं: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” (ईयोब १४:१४) मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होईल, हे खरंच शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर देवाने बायबलमध्ये दिलं आहे आणि ते खूप रोचक आहे. पुढच्या अध्यायात आपण याविषयी शिकू.
^ परि. 5 काही लोक असं मानतात, की माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यातलं काहीतरी, म्हणजे त्याचा आत्मा जिवंत राहतो. याविषयी अधिक माहितीसाठी अंत्यटीप १७ आणि १८ पाहा.