व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९

नोहा तारु बांधतो

नोहा तारु बांधतो

नोहाला एक बायको आणि तीन मुलगे होते. त्याच्या मुलांची नावं होती, शेम, हाम व याफेथ. आणि या प्रत्येक मुलाला एक बायको होती. म्हणजे नोहाच्या कुटुंबात आठ माणसं होती.

आता देवानं नोहाकडून एक विलक्षण गोष्ट करवली. त्यानं त्याला एक प्रचंड तारू बांधायला सांगितलं. ते तारू जहाजासारखं मोठं, पण दिसायला एका मोठ्या लांबट पेटीसारखं होतं. देव म्हणाला: ‘ते तीन मजली ऊंच कर. आणि त्यात खोल्या बनव.’ नोहा आणि त्याचं कुटुंब, अनेक प्राणी आणि त्या सर्वांना लागणाऱ्‍या अन्‍नासाठी त्या खोल्या होत्या.

तसंच पाणी आत झिरपू नये, असं ते ठाकठीक करायला देवानं नोहाला सांगितलं. देव म्हणाला: ‘जलप्रलय पाठवून मी सर्व जगाचा नाश करणार आहे. तारवाच्या आत नसलेला प्रत्येक जण मरेल.’

नोहा आणि त्याच्या मुलांनी यहोवाची आज्ञा मानली; आणि ते तारू बांधायला लागले. परंतु इतर लोक नुसते हसले. ते दुष्टपणा करतच राहिले. देव करणार असलेल्या गोष्टीबद्दल नोहानं त्यांना सांगितलं तेव्हा, कोणीही त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही.

तारू इतकं मोठं असल्यानं, ते बांधायला खूप वेळ लागला. शेवटी, खूप वर्षांनी, ते बांधून पूर्ण झालं. आता तारवामध्ये प्राण्यांना आणायला, देवानं नोहाला सांगितलं. काही प्रकारचे प्राणी जोडीनं, नर व मादी असे, परंतु इतर प्रकारचे सात सात प्राणी आणायला सांगितले. तसंच सर्व निरनिराळ्या प्रकारचे पक्षीही आणायला त्यानं सांगितले. आणि देवानं सांगितलं तसंच नोहानं केलं.

त्यानंतर नोहा आणि त्याचं कुटुंब देखील तारवात गेलं. मग देवानं दार बंद केलं. आतमध्ये नोहा आणि त्याचं कुटुंब वाट पाहू लागलं. कल्पना करा की, तुम्ही तारवामध्ये त्यांच्याबरोबर वाट पाहात आहात. देवानं म्हटल्याप्रमाणे खरोखरच जलप्रलय होईल का?