व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १४

देव अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतो

देव अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतो

अब्राहाम इथे काय करत आहे, ते तुमच्या लक्षात आलं का? त्याच्यापाशी एक सुरा आहे. आणि असं दिसतं की, आता तो आपल्या मुलाला ठार मारणार आहे. पण तो असं का करील? प्रथम, अब्राहाम आणि सारेला मुलगा कसा झाला, ते पाहू या.

त्यांना मुलगा होईल असं वचन देवानं दिलं होतं, याची आठवण करा. पण अब्राहाम आणि सारा इतके म्हातारे झाल्यामुळे, ते अशक्य वाटत होतं. असं असलं तरी, अशक्य वाटणारी गोष्ट देव करू शकतो, असा अब्राहामाला विश्‍वास होता. तर मग काय झालं?

देवानं वचन दिल्यानंतर एक पूर्ण वर्ष उलटलं. मग, अब्राहाम १०० वर्षांचा आणि सारा ९० वर्षांची असताना, त्यांना इसहाक नावाचा मुलगा झाला. देवानं आपलं वचन पाळलं होतं!

परंतु इसहाक मोठा झाल्यावर यहोवानं अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतली. त्यानं अब्राहामाला हाक मारली: ‘अब्राहाम!’ त्यावर अब्राहाम म्हणाला: ‘काय आज्ञा?’ मग देव म्हणाला: ‘तुझ्या एकुलत्या एका मुलाला, इसहाकाला, घेऊन, मी दाखवीन त्या पर्वतावर जा. तिथे त्याला ठार करून, त्याचं होमार्पण कर.’

या शब्दांमुळे अब्राहामाला फार दुःख झालं, कारण अब्राहामाचं त्याच्या मुलावर अतिशय प्रेम होतं. आणि अब्राहामाची मुलं कनानमध्ये राहतील असं वचनही देवानं दिलं होतं, ते आठवा. पण इसहाक मरण पावल्यास हे कसं शक्य होईल? ते अब्राहामाला कळेना. तरीही त्यानं देवाची आज्ञा पाळली.

डोंगरापाशी पोचल्यावर अब्राहामानं इसहाकाला बांधलं आणि त्यानं बनवलेल्या वेदीवर ठेवलं. मग, आपल्या मुलाला मारण्यासाठी त्यानं सुरा काढला. पण त्याच क्षणी देवाच्या दूतानं आवाज दिला: ‘अब्राहाम, अब्राहाम!’ त्यावर अब्राहाम म्हणाला: ‘काय आज्ञा?’

देव म्हणाला: ‘तू मुलावर हात चालवू नकोस, किंवा त्याला काही करू नकोस. तू आपल्या मुलाला, एकुलत्या एका मुलाला, माझ्यापासून राखून ठेवलं नाहीस. यावरून मला कळलं की, तुझा माझ्यावर विश्‍वास आहे.’

अब्राहामाचा देवावर किती गाढ विश्‍वास होता! त्याला खात्री होती की, देवाला काहीही अशक्य नव्हतं, आणि यहोवा इसहाकाला मेलेल्यांतूनही उठवू शकत होता. अब्राहामानं इसहाकाला मारावं अशी, देवाची खरोखरची इच्छा नव्हती. म्हणून देवानं एका मेंढराला जवळपासच्या झुडपात अडकवलं; आणि अब्राहामाला त्याच्या मुलाऐवजी, त्या मेंढराचे अर्पण करायला सांगितलं.