व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १३

अब्राहाम​—देवाचा मित्र

अब्राहाम​—देवाचा मित्र

जलप्रलयानंतर लोक ज्या अनेक ठिकाणी राहायला गेले, त्यातल्या एकाचं नाव होतं ऊर. काही चांगली घरं असलेलं, ते एक महत्त्वाचं शहर झालं. पण तिथले लोक खोट्या देवांची भक्‍ती करायचे. बाबेलातही त्यांनी असंच केलं. ऊर आणि बाबेलमधले लोक, यहोवाची सेवा करणारा नोहा व त्याचा मुलगा शेम, यांच्यासारखे नव्हते.

शेवटी, जलप्रलयानंतर ३५० वर्षांनी विश्‍वासू नोहा मरण पावला. त्यानंतर दोनच वर्षांनी, या चित्रात तुम्हाला दिसणाऱ्‍या माणसाचा जन्म झाला. देवाच्या लेखी तो एक विशेष माणूस होता. त्याचं नाव होतं अब्राहाम. तो आपल्या परिवारासोबत, ऊर नावाच्या त्या शहरात राहात होता.

एका दिवशी यहोवानं अब्राहामाला सांगितलं: ‘ऊर आणि तुझे नातेवाईक सोड, आणि मी तुला दाखवीन त्या देशाला जा.’ देवाची आज्ञा मानून अब्राहामानं ऊर आणि तिथल्या सगळ्या सुखसोयी मागे सोडल्या का? होय. आणि अब्राहामानं नेहमी देवाची आज्ञा मानल्यामुळे त्याला देवाचा मित्र म्हटलं गेलं.

अब्राहामानं ऊर सोडलं तेव्हा, त्याच्या कुटुंबातले काही जण त्याच्या बरोबर गेले. त्याचे वडील तेरह गेले. तसाच त्याचा पुतण्या लोट गेला. आणि अर्थात, त्याची बायको सारा देखील गेली. काही काळानं ते हारान नावाच्या जागी येऊन पोहोचले. तिथे तेरह मरण पावला. आता ते ऊरपासून खूप दूर होते.

काही काळानंतर अब्राहाम आणि त्याच्या कुटुंबानं हारान सोडलं, आणि ते कनान नावाच्या देशात आले. तिथे यहोवा म्हणाला: ‘मी तुझ्या मुलांना देणार आहे, तो हा देश.’ अब्राहाम कनानमध्ये तंबूंत राहिला.

देव अब्राहामाला मदत करायला लागला. त्यामुळे त्याच्यापाशी मेंढरं, इतर प्राण्यांचे मोठे कळप आणि शेकडो दास झाले. पण त्याला आणि साराला स्वतःचं मूल-बाळ नव्हतं.

अब्राहाम ९९ वर्षांचा असताना यहोवा म्हणाला: ‘तू अनेक देशांचा पिता होशील, असं मी वचन देतो.’ परंतु अब्राहाम आणि साराचं मूल होण्याचं वय केव्हाच उलटून गेलं असताना, हे कसं शक्य होतं?