व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३२

दहा पीडा

दहा पीडा

या चित्रांकडे पहा. एकेकात यहोवानं इजिप्तवर आणलेली एक एक पीडा दाखवली आहे. पहिल्या चित्रात अहरोन त्याच्या काठीनं नील नदीला मारत असलेला तुम्हाला दिसतो. त्यानं मारल्यावर, नदीतल्या पाण्याचं रक्‍त झालं. नदीतले मासे मेले आणि पाण्याला दुर्गंधी सुटली.

त्यानंतर, यहोवानं नील नदीतून बेडूक बाहेर येतील असं केलं. ते सगळीकडे होते—भट्यांत, थाळ्यांत, बिछान्यांत—सगळीकडे. ते बेडूक मेल्यावर, ईजिप्शियन लोकांनी त्यांचे ढीग रचले. देशभर त्यांची दुर्गंधी सुटली.

मग अहरोनानं जमिनीवर काठी मारली. आणि धुळीच्या उवा झाल्या. हे चावणारे नि उडणारे लहान किडे असतात. इजिप्तवरची तिसरी पीडा होती उवांची.

बाकीच्या पीडांचा त्रास फक्‍त ईजिप्शियन लोकांना झाला, इस्राएलांना नाही. चौथी पीडा होती गोमाशांची. त्या सगळ्या ईजिप्शियन लोकांच्या घरांमध्ये घोंघावू लागल्या. पाचवी पीडा जनावरांवर होती. ईजिप्शियन लोकांची अनेक गुरं, मेंढरं आणि शेरडं मरण पावली.

पुढे, मोशे आणि अहरोनानं राख घेऊन हवेत टाकली. तिच्यामुळे लोकांवर व जनावरांवर गळवं आली. ही होती सहावी पीडा.

त्यानंतर मोशेनं आपला हात आकाशाकडे केला. आणि यहोवानं ढगांचा गडगडाट आणि गारा पाठवल्या. इजिप्तमधलं ते सर्वात वाईट गारांचं वादळ होतं.

आठवी पीडा होती टोळधाडीची. त्या वेळेच्या आधी किंवा नंतर इतके टोळ कधी झाले नाहीत. गारांतून वाचलेलं सर्व त्यांनी खाऊन टाकलं.

नववी पीडा होती अंधाराची. तीन दिवस देशात गडद अंधार पडला. पण इस्राएल लोक राहात होते तिथे उजेड होता.

शेवटी, देवानं आपल्या लोकांना एका लहान शेरडाचं किंवा मेंढराचं रक्‍त आपापल्या दरवाज्यांच्या चौकटीवर शिंपडायला सांगितलं. मग देवाचा दूत इजिप्तमधून फिरला. जिथे त्याला रक्‍त दिसलं, त्या घरातल्या कोणालाही त्यानं मारलं नाही. पण ज्या घरांच्या चौकटीवर रक्‍त नव्हतं, त्या घरांमधल्या माणसांचे पहिले मुलगे आणि जनावरांचे प्रथम जन्मलेले नर देवाच्या दूतानं मारून टाकले. ही १० वी पीडा होती.

या शेवटल्या पीडेनंतर, फारोनं इस्राएलांना जायला सांगितलं. देवाचे लोक सज्ज होतेच. त्याच रात्री त्यांनी इजिप्तमधून कूच करायला सुरवात केली.