व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ११

पहिलं मेघधनुष्य

पहिलं मेघधनुष्य

नोहा आणि त्याचं कुटुंब तारवातून बाहेर आल्यावर, त्यानं प्रथम काय केलं, हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्यानं देवाला हवन अथवा भेट सादर केली. खालच्या चित्रात तो ते करताना तुम्हाला दिसतो. जलप्रलयातून त्याच्या कुटुंबाला वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानण्याकरता नोहानं प्राण्यांची ही भेट सादर केली.

त्या भेटीनं यहोवा प्रसन्‍न झाला असं तुम्हाला वाटतं का? होय, झाला. आणि म्हणून, जलप्रलयानं पुन्हा कधीही जगाचा नाश करणार नाही, असं वचन देवानं नोहाला दिलं.

लवकरच सर्व जमीन कोरडी झाली. नोहा आणि त्याच्या कुटुंबानं तारवाबाहेर नवं जीवन सुरु केलं. देवानं त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं: ‘तुम्हाला अनेक मुलं होऊ द्या. सर्व पृथ्वीवर लोक राहतील इतके तुम्ही बहुगुणित व्हा.’

पण पुढे जलप्रलयाबद्दल लोक ऐकतील तेव्हा, तसाच जलप्रलय पुन्हा येईल अशी भीती त्यांना वाटेल. म्हणून, सर्व जगावर पुन्हा कधीही जलप्रलय आणणार नसल्याच्या त्याच्या वचनाची आठवण करून देण्यासाठी, देवानं एक गोष्ट दिली. त्यानं त्यांना काय दिलं, ते तुम्हाला माहीत आहे का? ते होतं मेघधनुष्य.

पावसानंतर सूर्य चमकायला लागला की, आकाशात अनेकदा मेघधनुष्य दिसतं. मेघधनुष्यात अनेक सुंदर रंग असतात. तुम्ही एखादं मेघधनुष्य पाहिलं आहे का? चित्रातलं मेघधनुष्य तुम्हाला दिसतं का?

देवानं म्हटलं: ‘पुन्हा कधीही, सर्व लोक आणि प्राण्यांचा जलप्रलयानं नाश होणार नाही, असं मी वचन देतो. ढगात मी मेघधनुष्य ठेवतो आहे. मेघधनुष्य दिसेल तेव्हा मी ते पाहीन, आणि माझ्या या वचनाची आठवण ठेवीन.’

तुम्ही मेघधनुष्य पाहता तेव्हा, त्यानं तुम्हाला कशाची आठवण व्हावी? होय, जलप्रलयानं देव पुन्हा कधीही या जगाचा नाश करणार नाही, या त्याच्या वचनाची.