व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २३

फारोची स्वप्नं

फारोची स्वप्नं

दोन वर्ष उलटतात. योसेफ अजून तुरुंगातच असतो. प्यालेबरदाराला त्याची आठवण होत नाही. मग एका रात्री फारोला दोन फारच विशेष स्वप्नं पडतात. आणि त्यांचा अर्थ काय असावा, असा त्याला प्रश्‍न पडतो. इथे तो झोपलेला तुम्हाला दिसतो का? दुसऱ्‍या दिवशी तो आपल्या पंडितांना बोलावतो आणि स्वप्नातल्या सर्व गोष्टी त्यांना सांगतो. पण ते त्याला त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकत नाहीत.

शेवटी एकदाची प्यालेबरदाराला योसेफाची आठवण होते. तो फारोला म्हणतो: ‘मी तुरुंगात असताना, स्वप्नांचा अर्थ सांगू शकणारा एक माणूस तिथे होता.’ तात्काळ फारो योसेफाला तुरुंगातून बाहेर आणवतो.

फारो योसेफाला त्याची स्वप्नं सांगतो: ‘मी सात धष्टपुष्ट व सुंदर गाई पाहिल्या. मग मला सात रोड आणि हडकुळ्या गाई दिसल्या. आणि त्या रोड गाईंनी पुष्ट गाईंना खाऊन टाकलं.

‘दुसऱ्‍या स्वप्नात, मी एकाच ताटाला सात भरदार, आणि पिकलेल्या दाण्यांची कणसं लागलेली पाहिली. मग मला सात खुरटी व वाळकी कणसं दिसली. ती खुरटी कणसं भरदार कणसांना गिळू लागली.’

योसेफ फारोला म्हणतो: ‘दोन्ही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. सात पुष्ट गाई आणि सात भरदार कणसं म्हणजे सात वर्षं. सात रोड गाई व सात खुरटी कणसं म्हणजे आणखी सात वर्षं. मिसरात भरपूर धान्य पिकेल अशी वर्षं येतील. त्यानंतर फारच थोडं धान्य पिकेल, अशी सात वर्षं येतील.’

त्या कारणानं योसेफ फारोला सांगतो: ‘एखादा शहाणा माणूस निवडावा व सुकाळाच्या सात वर्षात धान्य गोळा करण्याच्या कामावर त्याला नेमावं. म्हणजे, अत्यंत कमी धान्य पिकेल अशा सात वर्षांच्या काळात लोकांची उपासमार होणार नाही.’

फारोला ती कल्पना पसंत पडते. अन्‍न गोळा करून भरून ठेवण्यासाठी तो योसेफाची निवड करतो. फारोच्या खालोखाल, योसेफ इजिप्तमधला सर्वात महत्त्वाचा माणूस बनतो.

आठ वर्षांनी, दुष्काळात, योसेफ काही लोकांना येताना पाहतो. ते कोण आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? अरे, हे तर त्याचे १० थोरले भाऊ आहेत! माघारी कनानमध्ये, त्यांचं अन्‍न संपत आल्यानं त्यांचा बाप याकोब यानं त्यांना इजिप्तला धाडलं आहे. योसेफ त्याच्या भावांना ओळखतो, पण त्याचे भाऊ त्याला ओळखत नाहीत. का, ते तुम्हाला ठाऊक आहे का? कारण योसेफ मोठा झाला आहे. आणि त्यानं वेगळ्या प्रकारचे कपडे घातले आहेत.

आपले भाऊ आपल्याला दंडवत करायला येतील, असं स्वप्न लहानपणी पाहिल्याचं योसेफाला आठवतं. त्याबद्दल वाचल्याचं तुम्हाला आठवतं का? तेव्हा, देवानंच चांगल्या कारणासाठी त्याला इजिप्तला पाठवलं असल्याचं योसेफाच्या ध्यानात येतं. योसेफ काय करतो, असं तुम्हाला वाटतं? चला, पाहू या.