कथा १९
याकोबाचं मोठं कुटुंब
या मोठ्या कुटुंबाकडे पहा. हे याकोबाचे १२ मुलगे आहेत. त्याला मुलीही होत्या. त्या मुलांची नावं तुम्हाला माहीत आहेत का? चला, त्यातली काही आपण शिकू या.
लेआनं रऊबेन, शिमोन, लेवी आणि यहूदा यांना जन्म दिला. आपल्याला मुलं होत नाहीत, असं दिसल्यावर राहेल फार उदास झाली. त्यामुळे तिनं आपली दासी बिल्हा याकोबाला दिली. बिल्हाला दान व नफताली नावाचे दोन मुलगे झाले. मग लेआनंही तिची दासी जिल्पा याकोबाला दिली. जिल्पानं गाद आणि आशेर यांना जन्म दिला. लेआला शेवटी आणखी दोन मुलगे झाले, इस्साखार आणि जबुलून.
अखेरीस, राहेलीला मूल होऊ शकलं. तिनं त्याचं नाव योसेफ ठेवलं. पुढे आपण योसेफाबद्दल बरंच शिकू. कारण तो एक मोठा माणूस झाला. राहेलीचे वडील, लाबान यांच्याकडे राहात असताना याकोबाला झालेली ही ११ मुलं.
याकोबाला काही मुलीही होत्या. पण बायबल त्यातल्या एकीचंच नाव सांगतं. तिचं नाव दीना होतं.
मग अशी वेळ आली की, लाबानाला सोडून कनानला परत जाण्याचं याकोबानं ठरवलं. म्हणून त्यानं आपलं मोठं कुटुंब, आपल्या मेंढरांचे मोठे कळप व गुरांची खिल्लारं गोळा केली; आणि त्या लांबच्या प्रवासाला लागला.
याकोब व त्याचं कुटुंब कनानमध्ये परत आल्याला काही काळ लोटल्यावर, राहेलीनं आणखी एका मुलाला जन्म दिला. ते प्रवासात असताना ही घटना घडली. राहेलीला ते फार अवघड गेलं. प्रसूत होतानाच ती मरण पावली. तान्हा मुलगा मात्र सुखरुप होता. याकोबानं त्याचं नाव बन्यामीन ठेवलं.
इस्राएलांचं संपूर्ण राष्ट्र याकोबाच्या १२ मुलांपासून झाल्यामुळे, त्यांची नावं आपण लक्षात ठेवली पाहिजेत. वास्तविक, इस्राएलांच्या १२ वंशांची नावं, याकोबाच्या १० आणि योसेफाच्या दोन मुलांवरून पडली. या सर्व मुलांच्या जन्मानंतर, इसहाक अनेक वर्षं जगला. इतके नातू झाल्यानं त्याला नक्कीच खूप आनंद झाला असेल. पण त्याची नात दीना हिचं काय झालं, ते पाहू या.