व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा २१

योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात

योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करतात

हा मुलगा किती उदास अन्‌ निराश आहे पाहा. हा योसेफ आहे. त्याच्या भावांनी त्याला नुकतंच, इजिप्तच्या वाटेवर असलेल्या या लोकांच्या हाती विकलं आहे. तिथे योसेफाला गुलाम केलं जाईल. त्याच्या सावत्र भावांनी ही वाईट गोष्ट का केली बरं? कारण त्यांना योसेफाचा हेवा वाटतो.

त्यांचा बाप याकोब याचं योसेफावर फारच प्रेम होतं. त्याच्यासाठी एक सुंदर पायघोळ झगा बनवून त्यानं त्याला माया दाखवली. याकोबाचं योसेफावर किती प्रेम आहे, हे त्याच्या १० थोरल्या भावांनी पाहिलं तेव्हा, ते योसेफावर जळायला लागले नि त्याचा द्वेष करायला लागले. पण त्यांनी त्याचा द्वेष करण्याचं आणखी एक कारण होतं.

योसेफाला दोन स्वप्नं पडली. त्याच्या दोन्ही स्वप्नात त्याच्या भावांनी त्याला दंडवत घातलं. ही स्वप्नं योसेफानं त्याच्या भावांना सांगितल्यावर त्यांचा द्वेष अधिकच वाढला.

एका दिवशी, योसेफाचे थोरले भाऊ त्यांच्या वडिलांच्या मेंढरांची राखण करत असताना, याकोब योसेफाला त्यांची खुशाली पाहून यायला सांगतो. योसेफाला येताना पाहून, त्यातले काही म्हणतात: ‘आपण त्याला मारुन टाकू!’ पण सर्वात थोरला रऊबेन म्हणतो: ‘नका, तसं करु नका!’ मारण्याऐवजी ते योसेफाला धरून एका कोरड्या खाड्यात टाकतात. आणि मग त्याचं काय करावं हे ठरवायला बसतात.

त्याच बेताला, काही इश्‍माएली लोक त्या बाजूला येतात. यहूदा त्याच्या सावत्र भावांना म्हणतो: ‘आपण त्याला या इश्‍माएली लोकांना विकून टाकू या.’ ते तसंच करतात. ते योसेफाला चांदीच्या २० रुपयांना विकतात. असं करणं किती नीच आणि निर्दयपणाचं होतं!

आता ते भाऊ त्यांच्या वडिलांना काय सांगतील? ते एक बकरा मारतात आणि योसेफाचा सुंदर झगा त्यात वारंवार बुडवतात. मग तो झगा, घरी त्यांच्या वडिलांकडे नेऊन म्हणतात: ‘हा आम्हाला सापडला. पहा, हा योसेफाचाच झगा तर नाही?’

तो योसेफाचा झगा असल्याचं याकोबाला दिसतं. तो आक्रोश करतो: ‘एखाद्या जंगली जनावरानं योसेफाला मारलं असावं.’ त्यांच्या वडिलांची अशी कल्पना व्हावी, हीच योसेफाच्या भावांची इच्छा आहे. याकोब अतिशय उदास आहे. तो खूप दिवस अश्रू ढाळतो. परंतु योसेफ मेलेला नाही. त्याला जिथे नेलं आहे, तिथे त्याचं काय होतं पाहू या.