व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ४७

इस्राएलांमध्ये चोर

इस्राएलांमध्ये चोर

हा माणूस त्याच्या डेऱ्‍यात काय पुरत आहे, पाहा! एक सुंदर झगा, एक सोन्याची वीट आणि काही चांदीची नाणी. या गोष्टी त्यानं यरीहो शहरातून घेतल्या आहेत. पण यरीहोतून घेतलेल्या गोष्टींचं काय करायला हवं होतं? तुम्हाला आठवतं का?

त्यांचा नाश करायचा होता आणि सोनं-रुपं यहोवाच्या निवासमंडपाच्या भांडारात जमा करायचं होतं. तेव्हा, या लोकांनी देवाची अवज्ञा केली आहे. त्यांनी देवाच्या मालकीची वस्तू चोरली आहे. या माणसाचं नाव आहे आखान. आणि त्याच्या बरोबरचे लोक त्याच्या कुटुंबातले आहेत. आता काय होतं, पाहू या.

आखानानं या वस्तू चोरल्यावर, आय नगराशी लढायला यहोशवा काही माणसं धाडतो. पण लढाईत त्यांचा पराभव होतो. काही मारले जातात आणि बाकीचे पळून जातात. यहोशवा फार खिन्‍न होतो. जमिनीवर पालथा पडून तो यहोवाला प्रार्थना करतो: ‘तू आमच्यावर अशी गोष्ट का येऊ दिलीस?’

यहोवा उत्तर देतो: ‘ऊठ! इस्राएलांनी पाप केलं आहे. ज्यांचा नाश करायचा होता किंवा ज्या यहोवाच्या मंडपाला द्यायच्या होत्या, अशा काही वस्तू त्यांनी घेतल्या आहेत. त्यांनी एक सुंदर झगा चोरून लपवला आहे. तू त्याचा आणि या वस्तू घेणाऱ्‍याचा नाश करीपर्यंत मी तुम्हाला आशीर्वाद देणार नाही.’ यहोवा म्हणतो की, तो दुष्ट माणूस कोण, हे तो यहोशवाला दाखवील.

त्यामुळे यहोशवा सर्व लोकांना गोळा करतो; आणि यहोवा त्या दुष्ट माणसाला, आखानाला, पकडतो. आखान म्हणतो: ‘मी पाप केलं आहे. मला एक सुंदर झगा, सोन्याची ती वीट आणि चांदीची नाणी या गोष्टी दिसल्या. मला त्यांचा इतका लोभ वाटला की, मी त्या घेतल्या. माझ्या डेऱ्‍यात त्या पुरलेल्या आढळतील.’

त्या शोधून यहोशवापुढे आणल्यावर तो आखानाला म्हणतो: ‘तू आमच्यावर संकट का आणलंस? आता यहोवा तुझ्यावर संकट आणील!’ तेव्हा, सर्व लोक आखान आणि त्याच्या कुटुंबाला दगडमार करतात. यावरुन, आपली नसलेली वस्तू कधीही घेऊ नये, हे आपल्याला दिसून येत नाही का?

त्यानंतर इस्राएल पुन्हा आय नगरावर चढाई करायला जातात. या वेळी यहोवा त्याच्या लोकांना मदत करतो, आणि ते लढाई जिंकतात.