व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ५३

इफ्ताहाचा नवस

इफ्ताहाचा नवस

एखादी शपथ घेतल्यानंतर, पुढे ती पाळणं तुम्हाला कठीण गेलं आहे का? चित्रातल्या या माणसाचं तसंच झालं; आणि म्हणूनच तो इतका दुःखी आहे. हा माणूस इफ्ताह नावाचा इस्राएलाचा एक शूर शास्ता आहे.

इस्राएलांनी यहोवाची भक्‍ती सोडून दिलेली असतानाच्या काळात इफ्ताह हयात असतो. ते परत वाईट गोष्टी करताहेत. म्हणून यहोवा अम्मोनी लोकांना त्यांचा छळ करू देतो. त्यामुळे इस्राएल यहोवाचा धावा करू लागतात: ‘आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केलं आहे. कृपा करून आम्हाला वाचव!’

आपण केलेल्या वाईट गोष्टींचा लोकांना पश्‍चात्ताप झाला आहे. परत यहोवाची भक्‍ती करून, ते आपला पश्‍चात्ताप दाखवतात. म्हणून यहोवा पुन्हा त्यांना मदत करतो.

त्या दुष्ट अम्मोन्यांच्याविरुद्ध लढायला, लोक इफ्ताहाची निवड करतात. लढाईत यहोवानं आपल्याला मदत करावी, अशी इफ्ताहाची फार इच्छा आहे. म्हणून तो यहोवाला नवस करतो: ‘तू अम्मोन्यांच्यावर मला विजय दिलास तर, विजयानंतर मी परत जाईन तेव्हा, मला भेटायला घरातून येणारी पहिली व्यक्‍ती मी तुला देईन.’

यहोवा इफ्ताहाचा नवस ऐकतो आणि विजय मिळवायला त्याला मदत करतो. इफ्ताह घरी परत येतो तेव्हा, त्याला भेटायला सर्वात प्रथम कोण येतं, हे तुम्हाला माहीत आहे का? ती आहे त्याची एकुलती एक मुलगी. इफ्ताह विव्हळून म्हणतो: ‘मुली! तू मला अतिशय कष्टी केलं आहेस. पण मी यहोवाला नवस करून चुकलो आहे, आणि माघार घेऊ शकत नाही.’

इफ्ताहाच्या नवसाबद्दल समजल्यावर त्याची मुलगीही प्रथम उदास होते. कारण त्याचा अर्थ, तिला आपल्या वडिलांना आणि मैत्रिणींना सोडावं लागेल. नि शिलोतल्या यहोवाच्या निवासमंडपात त्याची सेवा करण्यात उरलेलं आयुष्य घालवावं लागेल. तेव्हा ती आपल्या वडिलांना सांगते: ‘तुम्ही यहोवाला नवस केला असेल, तर तुम्ही तो फेडला पाहिजे.’

त्यामुळे इफ्ताहाची मुलगी शिलोला जाते आणि यहोवाच्या निवासमंडपात त्याची सेवा करण्यात आपलं आयुष्य घालवते. दर वर्षी चार दिवस, इस्राएलातल्या स्त्रिया तिला भेटायला तिथे जातात आणि त्या सर्व मिळून आनंद करतात. ती यहोवाची उत्तम रितीनं सेवा करत असल्यामुळे लोक इफ्ताहाच्या मुलीवर माया करतात.