कथा ५२
गिदोन आणि त्याची ३०० माणसं
इथे काय होत आहे, ते तुम्हाला दिसतं का? ही सर्व इस्राएलची लढाऊ माणसं आहेत. खाली वाकलेली माणसं पाणी पीत आहेत. त्यांच्या शेजारी उभा असलेला माणूस, शास्ता गिदोन आहे. ते पाणी कसं पीताहेत, त्याकडे तो पाहात आहे.
ती माणसं कशी वेगवेगळ्या रितीनं पाणी पीत आहेत ते निरखून पाहा. काहींनी थेट पाण्याला तोंड लावलेलं आहे. पण एक जण, आसपास काय चाललं आहे ते पाहता येण्यासाठी, ओंजळीनं पाणी उचलून पीत आहे. हे महत्त्वाचं आहे. कारण, पाणी पीत असताना सावध राहणाऱ्या लोकांना निवडायला यहोवानं गिदोनाला सांगितलं. देव म्हणाला की, इतरांना घरी पाठवून द्यावं. का, ते पाहू या.
इस्राएल परत मोठ्या संकटात सापडले आहेत. त्याचं कारण, त्यांनी यहोवाची आज्ञा मानलेली नाही. मिद्यानी लोक त्यांच्यावर प्रबळ झाले असून ते त्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे इस्राएल यहोवाचा धावा करतात व यहोवा त्यांची हाक ऐकतो.
यहोवा गिदोनाला एक सैन्य उभारायला सांगतो. म्हणून गिदोन ३२,००० लढाऊ माणसं गोळा करतो. पण इस्राएलांविरुद्ध १,३५,००० माणसांचं सैन्य उभं आहे. तरीही यहोवा गिदोनाला सांगतो: ‘तुझ्यापाशी फार जास्त लोक आहेत.’ यहोवानं असं का म्हटलं?
त्याचं कारण, इस्राएलांनी लढाई जिंकली तर, ती स्वतःच्या बळावर, असा विचार त्यांच्या मनात येऊ शकेल. जिंकण्यासाठी यहोवाच्या मदतीची त्यांना गरज नाही, असं त्यांना वाटण्याची शक्यता आहे. म्हणून यहोवा गिदोनाला म्हणतो: ‘भीती वाटत असलेल्या माणसांना घरी जायला सांग.’ गिदोनानं तसं केल्यावर, त्याची २२,००० लढाऊ माणसं घरी जातात. त्या १,३५,००० सैनिकांशी लढायला त्याच्यापाशी फक्त १०,००० माणसं उरतात.
पण ऐका! यहोवा म्हणतो: ‘तुझ्याजवळ अजूनही फार माणसं आहेत.’ तेव्हा, त्या माणसांना या झऱ्यावर पाणी प्यायला लावायला आणि पाण्याला तोंड लावून पिणाऱ्या सर्वांना घरी पाठवायला, यहोवा गिदोनाला सांगतो. यहोवा वचन देतो: ‘पाणी पिताना सावध राहणाऱ्या या ३०० माणसांकरवी मी तुला विजय मिळवून देईन.’
लढाईची वेळ येते. गिदोन आपल्या ३०० माणसांच्या तीन तुकड्या करतो. तो प्रत्येक माणसाला एक शिंग आणि आत दिवटी ठेवलेला एक घडा देतो. मध्यरात्रीच्या सुमाराला, ते शत्रूच्या सैनिकांच्या शिबिराच्या सभोवती जमतात. मग एकाच वेळी ते सर्व आपापली शिंगं फुंकतात, घडे फोडतात आणि आरोळ्या ठोकतात: ‘यहोवाची तरवार, नि गिदोनाची!’ शत्रूचे सैनिक घाबरून आणि गोंधळून जागे होतात. ते सर्व पळायला लागतात व इस्राएल लोक लढाई जिंकतात.