कथा ३७
उपासनेसाठी एक मंडप
हा मंडप कसला, ते तुम्हाला माहीत आहे का? तो, यहोवाची उपासना करण्यासाठी बनवलेला विशेष तंबू आहे. त्याला निवासमंडपही म्हणतात. इजिप्त सोडल्यावर एका वर्षानं, लोकांनी तो बांधून पुरा केला. तो बांधण्याची कल्पना कोणाची होती, ते तुम्हाला ठाऊक आहे का?
ती यहोवाची कल्पना होती. मोशे सिनाय पर्वतावर असताना, तो कसा बांधावा, हे यहोवानं त्याला सांगितलं. त्याचे भाग सहज सुटे करता येतील, असा तो बनवायला त्यानं सांगितला. अशानं ते भाग दुसरीकडे नेऊन तिथे परत जोडता येतील. त्यामुळे, अरण्यात इस्राएल लोक जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात, तेव्हा ते तो तंबू आपल्या बरोबर नेत असत.
तंबूच्या शेवटाला असलेल्या लहान खोलीत तुम्ही पाहिलंत तर, एक डबी अथवा पेटी दिसते. तिला कराराचा कोश म्हणतात. तिच्या प्रत्येक टोकाला एक, असे दोन सोन्याचे देवदूत वा करूब होते. मोशेनं पहिल्या दगडी पाट्या तोडल्यामुळे, देवानं दोन नव्या पाट्यांवर दहा आज्ञा पुन्हा लिहिल्या. त्या कराराच्या कोशात ठेवण्यात आल्या. तसंच, मान्ना भरलेली एक बरणीही त्यात ठेवण्यात आली. मान्ना काय आहे, ते तुम्हाला आठवतं का?
मोशेचा भाऊ अहरोन यालाच यहोवा महायाजक म्हणून निवडतो. यहोवाच्या उपासनेत तो लोकांचा पुढारी होतो. त्याची मुलंही याजक आहेत.
आता, तंबूच्या मोठ्या खोलीकडे पहा. ती, लहान खोलीच्या दुप्पट आहे. जिच्यातून धूर येत आहे, अशी एक लहान डबी किंवा पेटी तुम्हाला दिसते का? ही वेदी आहे. याजक तिच्यावर सुगंधी धूप जाळतात. त्याशिवाय सात दिवे असलेला दीपवृक्ष आहे. त्या खोलीतली तिसरी वस्तू आहे, एक टेबल. त्याच्यावर १२ भाकऱ्या ठेवल्या आहेत.
निवासमंडपाच्या अंगणात पाण्यानं भरलेलं एक मोठं भांडं वा गंगाळ आहे. धूण्यासाठी याजक त्याचा उपयोग करतात. तिथे मोठी वेदीही आहे. तिच्यावर यहोवाला अर्पण म्हणून, मेलेली जनावरं जाळली जातात. तो तंबू छावणीच्या मध्यभागी असून, इस्राएल लोक आपापल्या डेऱ्यांत त्याच्या सभोवती राहतात.