व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ३८

बारा हेर

बारा हेर

ही माणसं नेत असलेली फळं पाहा. द्राक्षांचा तो घड किती मोठा आहे बघा. त्याला एका दांडीवर घालून न्यायला दोन माणसं लागतात. आणि ती अंजिरं नि डाळिंबं पाहा. ही सुंदर फळं कोठून आली? कनान देशातून. एका काळी, अब्राहाम, इसहाक आणि याकोब राहात, तो देश कनानच होता, याची आठवण करा. पण तिथे दुष्काळ पडल्यामुळे आपल्या कुटुंबाबरोबर याकोब इजिप्तला गेला. आता, २१६ वर्षांनी, मोशे इस्राएलांना कनानला परत आणत आहे. ते अरण्यात कादेश नावाच्या ठिकाणी आले आहेत.

कनान देशात वाईट लोक राहतात. त्यामुळे, मोशे १२ हेर पाठवतो; आणि त्यांना सांगतो: ‘तिथे किती लोक राहतात आणि ते किती शक्‍तीशाली आहेत, ते पाहा. तिथली जमीन सुपीक आहे की नाही, हे पाहून या. आणि तिथली फळं आणायला विसरू नका.’

ते हेर कादेशला परत येतात तेव्हा मोशेला सांगतात: ‘खरोखर, तो फारच चांगला देश आहे.’ आणि ते सिद्ध करण्यासाठी, त्यातली काही फळं ते मोशेला दाखवतात. पण त्यातले १० हेर म्हणतात: ‘तिथे राहणारे लोक धिप्पाड आणि बळकट आहेत. आपण हा देश घेण्याचा प्रयत्न केला, तर मारले जाऊ.’

हे ऐकून इस्राएल लोक घाबरतात. ते म्हणतात: ‘मिसरात (इजिप्त), किंवा इथे अरण्यातही मेलो असतो, तर बरं झालं असतं. लढाईत आपण मारले जाऊ आणि आपली बायका-मुलं लुटून नेली जातील. मोशेच्या जागी आपण एक नवा नेता निवडू या; आणि इजिप्तला परत जाऊ या!’

परंतु त्यातल्या दोन हेरांचा यहोवावर विश्‍वास आहे. ते लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची नावं आहेत, यहोशवा आणि कालेब. ते म्हणतातः ‘घाबरू नका. यहोवा आपल्यासोबत आहे. देश जिंकणं आपल्याला सोपं जाईल.’ पण लोक ऐकत नाहीत. ते तर यहोशवा आणि कालेबला मारायला उठले आहेत.

यामुळे यहोवाला संताप येतो आणि तो मोशेला म्हणतो: ‘२० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांपैकी कोणीही कनान देशात जाणारच नाही. मिसरात (इजिप्त) आणि अरण्यात मी केलेले चमत्कार त्यांनी पाहिले असूनही, ते माझ्यावर विश्‍वास ठेवत नाहीत. त्यामुळे त्यातल्या अखेरच्या माणसाचा मृत्यू होईपर्यंत, ४० वर्षं ते अरण्यात भटकतील. फक्‍त यहोशवा आणि कालेब कनान देशात जातील.’