कथा ५१
रूथ आणि नामी
बायबलमध्ये तुम्हाला रूथ नावाचं पुस्तक सापडेल. शास्त्यांच्या आमदानीच्या काळातल्या एका कुटुंबाची ती कहाणी आहे. रूथ ही देवाच्या इस्राएल राष्ट्राची नव्हे, तर मवाब देशाची एक तरुण स्त्री आहे. पण यहोवा या खऱ्या देवाबद्दल माहिती झाल्यावर, ती त्याच्यावर अतिशय प्रेम करू लागते. रूथला यहोवाबद्दल माहिती करून घ्यायला मदत करणारी, नामी ही एक वयस्क स्त्री आहे.
नामी इस्राएली स्त्री आहे. इस्राएलात दुष्काळ पडला असताना, नामी, तिचा नवरा आणि दोन मुलगे मवाब देशात जाऊन राहिले. मग एका दिवशी नामीचा नवरा मरण पावला. त्यानंतर नामीच्या मुलांनी रूथ आणि अर्पा नावाच्या दोन मवाबी मुलींशी लग्न केलं. परंतु सुमारे १० वर्षांनी नामीचे दोन्ही मुलगे मरण पावले. नामी अन् त्या दोघी मुली अतिशय खिन्न झाल्या. आता नामी काय करील?
एका दिवशी नामी, आपल्या लोकांकडे परतण्यासाठी लांबचा प्रवास करायचा निर्णय करते. तिच्याबरोबर राहण्याची, रूथ आणि अर्पा यांची इच्छा आहे; व म्हणून त्याही सोबत जातात. पण काही वेळ प्रवास केल्यावर, त्या मुलींच्याकडे वळून नामी म्हणते: ‘तुम्ही तुमच्या माहेरी परत जा.’
नामी त्या मुलींचा मुका घेऊन त्यांना निरोप देते. तेव्हा, त्या रडायला लागतात कारण त्यांचं नामीवर फार प्रेम आहे. त्या म्हणतात: ‘नाही! आम्ही तुमच्यासोबत तुमच्या लोकांकडे जाऊ.’ पण नामी म्हणते: ‘माझ्या मुलींनो तुम्ही जाच. तुम्ही माहेरी जाणं बरं.’ त्यामुळे अर्पा घरी जायला निघते. पण रूथ जात नाही.
तिच्याकडे वळून नामी म्हणते: ‘अर्पा गेली. तूही तिच्याबरोबर घरी जा.’ परंतु रूथ उत्तर देते: ‘तुम्हाला सोडून जाण्याचा आग्रह मला करु नका! मला तुमच्या बरोबर येऊ द्या. तुम्ही जाल तिथे मी जाईन, तुम्ही राहाल तिथे मी राहीन. तुमचे लोक माझे लोक होतील, तुमचा देव माझा देव होईल. तुम्ही मराल तिथे मी मरेन, आणि तिथेच मला मूठमाती मिळेल.’ रूथनं असं म्हटल्यावर, नामी तिला घरी जायचा आग्रह करत नाही.
अखेरीस त्या दोघी स्त्रिया इस्राएलला पोहोचतात. इथे त्या स्थाईक होतात. तो सातूच्या कापणीचा हंगाम असल्यानं रूथ तात्काळ शेतात काम करू लागते. बवाज नावाचा एक माणूस तिला आपल्या शेतात सातू वेचू देतो. बवाजाची आई कोण होती, ते तुम्हाला माहीत आहे का? ती होती यरीहो नगराची राहाब.
एका दिवशी बवाज रूथला सांगतो: ‘मी तुझ्याबद्दल आणि तू नामीशी किती प्रेमानं वागलीस त्याबद्दल सर्व ऐकलं आहे. आपल्या आई-वडिलांना आणि देशाला सोडून, अनोळखी लोकांमध्ये तू राहायला कशी आलीस ते मला कळलं आहे. यहोवा तुझं भलं करो!’
रूथ उत्तरते: ‘महाराज तुम्ही माझ्यावर कृपा केली आहे. माझ्याशी ममतेनं बोलून तुम्ही मला समाधान दिलं आहे.’ बवाजाला रूथ फार आवडते नि लवकरच त्यांचं लग्न होतं. त्यामुळे नामीला खूप आनंद होतो. त्यानंतर रूथ आणि बवाज यांना ओबेद नावाचा पहिला मुलगा होतो तेव्हा, नामी जास्तच आनंदित होते. पुढे ओबेद दाविदाचा आजोबा होतो. आपण पुढे दाविदाबद्दल बरंच शिकू.
बायबलमधलं रूथ नावाचं पुस्तक.