व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६५

राज्य विभागलं जातं

राज्य विभागलं जातं

हा माणूस आपले कपडे का फाडत आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे का? यहोवानं त्याला तसं करायला सांगितलं. हा माणूस देवाचा संदेष्टा अहीया आहे. संदेष्टा म्हणजे काय, तुम्हाला माहीत आहे का? ती अशी व्यक्‍ती असते की, जिला, जे घडणार आहे ते, देव आधीच सांगतो.

इथे अहीया यराबामाशी बोलत आहे. शलमोनानं आपल्या काही बांधकामावर या यराबामाला नेमलं होतं. अहीया यराबामाला इथे रस्त्यात भेटतो तेव्हा, एक विचित्र गोष्ट करतो. तो आपल्या अंगावरचा नवा झगा काढतो आणि फाडून त्याचे १२ तुकडे करतो. तो यराबामाला सांगतो: ‘यातले १० तुकडे तू घे.’ अहीया यराबामाला १० तुकडे का देतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

अहीया खुलासा करतो की, यहोवा शलमोनापासून राज्य काढून घेणार आहे. यहोवा १० वंश यराबामाला देणार आहे, असं तो म्हणतो. याचा अर्थ, शलमोनाचा मुलगा रहबाम याला राज्य करायला फक्‍त दोनच वंश उरतील.

अहीयाने यराबामाला सांगितलेली गोष्ट शलमोनाला कळते तेव्हा, तो अतिशय संतापतो. आणि यराबामाला मारण्याचा प्रयत्न करतो. पण यराबाम इजिप्तला पळून जातो. काही दिवसांनी शलमोन मरण पावतो. त्यानं ४० वर्षं राज्य केलं. पण आता रहबामाला राजा केलं जातं. इजिप्तमध्ये यराबामाला कळतं की, शलमोन मरण पावला आहे. त्यामुळे तो परत येतो.

रहबाम चांगला राजा नाही. त्याचे वडील शलमोन यांच्यापेक्षा नीचपणानं तो लोकांशी वागतो. यराबाम आणि काही प्रतिष्ठित लोक रहबाम राजाकडे जातात, आणि त्याला, लोकांशी प्रेमानं वागण्याची विनंती करतात. पण रहबाम ऐकत नाही. उलट तो आधीपेक्षा आणखीनच नीच होतो. त्यामुळे लोक यराबामाला १० वंशांवर राजा करतात. पण बन्यामीन आणि यहूदा हे दोन वंश रहबामालाच आपला राजा म्हणून ठेवतात.

आपल्या लोकांनी यहोवाच्या मंदिरात उपासनेसाठी जेरूसलेमला जाऊ नये, असं यराबामाला वाटतं. म्हणून तो दोन सोन्याची वासरं बनवतो आणि १० वंशाच्या राज्यातल्या लोकांना त्यांची उपासना करायला लावतो. लवकरच तो देश गुन्हे आणि जुलुमांनी भरून जातो.

दोन वंशांचं राज्यही संकटात असतं. रहबाम राजा झाल्यावर पाच वर्षांच्या आत इजिप्तचा राजा जेरूसलेमवर चाल करून येतो. तो यहोवाच्या मंदिरातलं पुष्कळ धन लुटतो. त्यामुळे ते मंदिर जसं बांधलं तसं फारच थोडे दिवस टिकतं.