व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७६

जेरूसलेमचा नाश होतो

जेरूसलेमचा नाश होतो

नबुखद्‌नेस्सर राजानं सर्व सुशिक्षित इस्राएल लोकांना बॅबिलोनला नेल्याला १० वर्षांहून जास्त काळ झाला आहे; आणि आता पाहा काय होतं आहे! जेरूसलेम जाळून टाकलं जात आहे. आणि ज्या इस्राएलांना मारून टाकलेलं नाही, त्यांना कैदी म्हणून बॅबिलोनला नेत आहेत.

लोकांनी त्यांची वाईट वागणूक सुधारली नाही तर, हेच होईल असा इशारा यहोवाच्या संदेष्ट्यांनी दिला होता, याची आठवण करा. पण इस्राएलांनी संदेष्ट्यांचं ऐकलं नाही. यहोवा ऐवजी, ते खोट्या देवांची उपासना करतच राहिले. तेव्हा, त्या लोकांना शिक्षा झाली, हे योग्यच होतं. हे आपल्याला कळतं, कारण, देवाचा संदेष्टा यहेज्केल, इस्राएल लोक करत असलेल्या वाईट गोष्टींबद्दल आपल्याला सांगतो.

यहेज्केल कोण आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? जेरूसलेमचा हा मोठा विध्वंस होण्याच्या १० वर्षं आधी, नबुखद्‌नेस्सर राजानं बॅबिलोनला नेलेल्या तरुणांपैकी तो एक आहे. त्याच वेळी, दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांनाही बॅबिलोनला नेलं गेलं.

यहेज्केल अजून बॅबिलोनमध्येच असताना, माघारी जेरूसलेममधल्या मंदिरात घडत असलेल्या वाईट गोष्टी यहोवा त्याला दाखवतो. एका चमत्कारानं यहोवा हे करतो. यहेज्केल अजून खरोखर बॅबिलोनमध्येच आहे, पण मंदिरात काय चाललं आहे, ते यहोवा त्याला पाहू देतो. आणि यहेज्केलला जे दिसतं, ते धक्कादायक आहे.

‘लोक इथे मंदिरात करत असलेल्या किळसवाण्या गोष्टी पाहा. भिंतींवर काढलेली सापांची आणि इतर प्राण्यांची चित्रं पाहा. आणि त्यांची उपासना करणारे इस्राएल पाहा!’ यहोवा यहेज्केलला सांगतो. यहेज्केलला त्या गोष्टी दिसतात आणि घडत असलेल्या गोष्टी तो लिहून ठेवतो.

यहोवा यहेज्केलला विचारतो: ‘हे इस्राएली सरदार लपून-छपून काय करताहेत, ते तुला दिसतं का?’ होय, त्याला तेही दिसतं. ती ७० माणसं आहेत आणि खोट्या देवांची उपासना करताहेत. ते म्हणताहेत: ‘यहोवा आपल्याला पाहत नाही. तो देश सोडून गेला आहे.’

मग यहोवा यहेज्केलला उत्तरेच्या दरवाज्यापाशी असलेल्या काही स्त्रिया दाखवतो. तिथे त्या तम्मुज या खोट्या देवाची उपासना करत बसल्या आहेत. आणि यहोवाच्या मंदिराच्या दरवाज्यापाशी असलेल्या त्या माणसांकडे पाहा! ते जवळपास २५ जण आहेत. यहेज्केल त्यांना पाहतो. पूर्वेकडे दंडवत घालून ते सूर्याची उपासना करताहेत!

यहोवा म्हणतो: ‘या लोकांना माझ्याबद्दल जराही आदर नाही. ते वाईट गोष्टी करतात एवढंच नाही, तर थेट माझ्या मंदिरात येऊन त्या करतात.’ त्यामुळे यहोवा प्रतिज्ञा करतो: ‘माझ्या संतापाची झळ त्यांना लागेल आणि त्यांचा नाश होईल तेव्हा, मला त्यांची कीव येणार नाही.’

यहोवानं यहेज्केलला या गोष्टी दाखवल्यानंतर साधारण तीनच वर्षांनी इस्राएल लोक नबुखद्‌नेस्सर राजाविरुद्ध बंड करतात. त्यामुळे तो त्यांच्याशी लढायला जातो. दीड वर्षानं खास्दी जेरूसलेमच्या तटाला खिंड पाडतात आणि नगर जाळून खाक करतात. बहुतेक सर्व लोक मारले जातात किंवा कैदी म्हणून बॅबिलोनला धरून नेले जातात.

यहोवानं इस्राएल लोकांवर हा भयंकर नाश का येऊ दिला आहे? होय, कारण, त्यांनी यहोवाचं ऐकलं नाही, आणि त्याचे नियम पाळले नाहीत. यावरून, देव जे म्हणतो ते आपण पाळणं किती महत्त्वाचं आहे, हे दिसून येतं.

सुरवातीला मोजक्या लोकांना इस्राएलच्या प्रदेशात राहू दिलं जातं. नबुखद्‌नेस्सर राजा, गदल्या नावाच्या एका यहूद्याला त्या लोकांवर नेमतो. पण मग काही इस्राएली गदल्याचा खून करतात. आता, अशी वाईट गोष्ट घडल्यामुळे खास्दी येऊन त्या सर्वांचा नाश करतील, अशी भिती त्या लोकांना वाटते. तेव्हा, यिर्मयाला आपल्या बरोबर चलायला ते भाग पाडतात आणि इजिप्तला पळून जातात.

यामुळे इस्राएल देशात कोणीही लोक उरत नाहीत. ७० वर्षं एकही माणूस त्या देशात राहात नाही. तो पूर्णपणे रिकामा आहे. पण ७० वर्षांनी, तो आपल्या लोकांना परत त्या देशात आणील, असं आश्‍वासन यहोवा देतो. दरम्यान, देवाच्या लोकांना जिकडे नेलं आहे, त्या बॅबिलोन देशात त्यांचं काय होत आहे? चला पाहू या.