व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ६९

मुलगी बलवान माणसाला मदत करते

मुलगी बलवान माणसाला मदत करते

ही लहान मुलगी काय म्हणत आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? यहोवाचा संदेष्टा अलीशा आणि ज्या अद्‌भुत गोष्टी करायला यहोवा त्याला मदत करतो, त्यांच्याबद्दल ती त्या स्त्रीला सांगते आहे. ती स्त्री इस्राएली नसल्यामुळे, तिला यहोवाबद्दल माहीत नाही. तर मग, ही मुलगी या स्त्रीच्या घरात कशी, ते पाहू या.

ही अरामी स्त्री आहे. अरामी सैन्याचा सेनापती नामान, तिचा नवरा आहे. अरामी लोकांनी या लहानशा इस्राएली मुलीला कैद करून दासी म्हणून, नामानाच्या बायकोकडे आणलं होतं.

नामानाला कोड नावाचा एक वाईट रोग आहे. या रोगानं माणसाचं मांसही झडू शकतं. त्यामुळे, ती मुलगी नामानाच्या बायकोला सांगत आहे: ‘माझ्या धन्याला इस्राएलातल्या यहोवाच्या संदेष्ट्याकडे जाता आलं तर बरं. तो त्याचं कोड बरं करील.’ पुढे, ही गोष्ट त्या स्त्रीच्या नवऱ्‍याला सांगतात.

नामानाला बरं व्हायची फारच इच्छा आहे. त्यामुळे तो इस्राएलला जायचं ठरवतो. तिकडे पोहचल्यावर, तो अलीशाच्या घरी जातो. नामानाला, यार्देन नदीत सात वेळा अंघोळ करायला सांगण्यासाठी, अलीशा आपल्या दासाला पाठवतो. त्यामुळे नामानाला फार राग येतो आणि तो म्हणतो: ‘इस्राएलातल्या कोणत्याही नदीपेक्षा आपल्या देशातल्या नद्या चांगल्या आहेत!’ असं बोलून नामान चालता होतो.

पण त्याचा एक दास त्याला म्हणतो: ‘महाराज, अलीशानं एखादी अवघड गोष्ट सांगितली तर, तुम्ही ती कराल. तर मग, त्यानं म्हटल्याप्रमाणे, तुम्ही साधी अंघोळ का करत नाही?’ नामान आपल्या दासाचं ऐकतो, आणि जाऊन यार्देन नदीत सात वेळा बुचकळ्या मारतो. तसं केल्यावर, त्याचं अंग सुदृढ आणि निरोगी होतं.

नामानाला फार आनंद होतो. अलीशाकडे परत येऊन तो म्हणतो: ‘आता माझी खात्री पटली आहे की, इस्राएलातला देव, हा सर्व जगातला केवळ एकच खरा देव आहे. म्हणून कृपा करून, माझ्या या नजराण्याचा स्वीकार करा.’ पण अलीशा उत्तर देतो: ‘छे, मी तो मुळीच घेणार नाही.’ नामानाला यहोवानं बरं केलं असल्यामुळे, आपण तो नजराणा घेणं चूक असल्याचं अलीशाला ठाऊक आहे. पण अलीशाचा दास गेहजी याला स्वत:साठी तो नजराणा हवा आहे.

तेव्हा गेहजी काय करतो पहा. नामान निघून गेल्यावर, गेहजी त्याला गाठायला धावत जातो. ‘आताच भेटायला आलेल्या मित्रांसाठी, तुमच्या नजराण्यातला थोडा अलीशाला हवा आहे, असं तुम्हाला सांगायला त्यानं मला पाठवलं आहे,’ गेहजी म्हणतो. अर्थात, ही एक थाप आहे. पण ती थाप असल्याचं नामानाला ठाऊक नाही. त्यामुळे, तो गेहजीला काही वस्तू देतो.

गेहजी घरी परत येतो तेव्हा, त्यानं काय केलं, ते अलीशाला माहीत असतं. यहोवानं त्याला ते सांगितलं आहे. त्यामुळे तो म्हणतो: ‘तू अशी वाईट गोष्ट केल्यामुळे, नामानाचं कोड तुला लागेल.’ आणि तात्काळ तसं होतं!

या सर्वापासून आपल्याला काय शिकता येतं? प्रथम, आपण त्या लहान मुलीसारखं असलं पाहिजे आणि यहोवाबद्दल बोललं पाहिजे. त्यामुळे खूप फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, जसा नामान प्रथम होता, तसं आपण गर्विष्ठ असू नये; देवाच्या दासांची आज्ञा पाळावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, गेहजीप्रमाणे आपण खोटं बोलू नये. बायबल वाचल्यानं आपण बरचसं शिकू शकतो, नाही का?