व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ८०

देवाचे लोक बॅबिलोन सोडतात

देवाचे लोक बॅबिलोन सोडतात

मेदी आणि पर्शियन लोकांनी बॅबिलोन काबीज केल्याला जवळपास दोन वर्षं उलटली आहेत. आणि काय होत आहे पाहा! होय, इस्राएल बॅबिलोन सोडून निघाले आहेत. ते कसे स्वतंत्र झाले? त्यांना कोणी जाऊ दिलं?

पर्शियाचा राजा कोरेश यानं. कोरेशाचा जन्म होण्याच्या खूप आधी यहोवानं, यशया नावाच्या आपल्या संदेष्ट्याकडून त्याच्याबद्दल असं लिहून घेतलं: ‘मला हवं तेच तू करशील. तू शहर काबीज करावं म्हणून दरवाजे उघडे टाकले जातील.’ त्यानुसार, बॅबिलोन काबीज करण्यात कोरेशानंच पुढाकार घेतला. उघड्या टाकलेल्या दरवाज्यांतून रात्री मेदी आणि पर्शियन लोक शहरात शिरले.

पण यहोवाचा संदेष्टा यशया यानं असंही म्हटलं की, जेरूसलेम आणि त्यातलं मंदिर बांधण्याची आज्ञा कोरेश देईल. कोरेशानं अशी आज्ञा दिली का? होय दिली. कोरेश इस्राएल लोकांना म्हणतो: ‘आता यरुशलेमेला जा, आणि तुमचा देव यहोवा याचं मंदिर बांधा.’ आणि तेच करायला हे इस्राएली निघाले आहेत.

पण बॅबिलोनमधल्या सर्वच इस्राएल लोकांना जेरूसलेमला परतण्याचा लांबचा प्रवास करणं शक्य नाही. सुमारे ५०० मैलांचा (८०० किलोमीटर) हा दूरवरचा प्रवास आहे; आणि कित्येक जण फार म्हातारे किंवा अतिशय आजारी असल्यामुळे, त्यांना तो झेपणार नाही. त्याचप्रमाणे, इतर कारणामुळे काही लोक जात नाहीत. पण न जाणाऱ्‍यांना कोरेश सांगतो: ‘यरुशलेम आणि तिथलं मंदिर बांधायला परत जाणाऱ्‍या लोकांना सोनं, चांदी आणि इतर भेट-वस्तू द्या.’

त्यामुळे, जेरूसलेमला निघालेल्या या लोकांना खूपशा भेट-वस्तू दिल्या जातात. तसंच, नबुखद्‌नेस्सर राजानं जेरूसलेमचा नाश केला तेव्हा, त्यानं यहोवाच्या मंदिरातून नेलेली भांडी आणि प्याले कोरेश त्यांना देतो. त्या कारणानं, परत नेण्यासाठी लोकांपाशी खूप सामान आहे.

साधारण चार महिन्यांच्या प्रवासानंतर, इस्राएल लोक अगदी वेळेवर जेरूसलेमला पोचतात. त्या शहराचा नाश होऊन आणि देश पूर्णपणे ओसाड पडून, बरोबर ७० वर्षे झाली आहेत. आता इस्राएल लोक स्वदेशी परतले असले तरीही, त्यांना काही कठीण परिस्थितीतून जावं लागेल. या नंतर आपण त्याबद्दल शिकू.