व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ७७

ते दंडवत घालीनात

ते दंडवत घालीनात

या तीन तरुण मुलांबद्दल ऐकल्याचं तुम्हाला आठवतं का? होय, त्यांच्याकरता हितकारक नसलेल्या गोष्टी खायला नकार देणारे, हे दानीएलाचे मित्र आहेत. बॅबिलोनच्या लोकांनी त्यांना शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो अशी नावं दिली. पण आता त्यांच्याकडे पाहा. इतर सर्वांसारखे, ते या प्रचंड मूर्तीला दंडवत का करत नाहीत बरं? चला पाहू या.

दहा आज्ञा म्हटलेले, यहोवानं स्वत: लिहिलेले नियम तुम्हाला आठवतात का? त्यातला पहिला आहे: ‘तुला माझ्याशिवाय दुसरे देव नसावेत.’ असं करणं सोपं नसलं तरी, ही तरुण मुलं इथे हा नियम पाळताहेत.

बॅबिलोनचा राजा नबुखद्‌नेस्सर यानं स्थापन केलेल्या या मूर्तीचा सन्मान करण्यासाठी, त्यानं अनेक प्रतिष्ठित लोकांना बोलावलं आहे. त्यानं नुकतंच लोकांना सांगितलं आहे: ‘शिंग, वीणा आणि इतर वाद्यांचा आवाज ऐकू आल्याबरोबर दंडवत घालून तुम्ही या मूर्तीची उपासना करायची आहे. जो कोणी दंडवत घालणार नाही व उपासना करणार नाही, त्याला तात्काळ धगधगत्या भट्टीत टाकलं जाईल.’

शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांनी दंडवत घातलं नाही असं कळल्यावर नबुखद्‌नेस्सर अतिशय रागावतो. तो त्यांना आपल्यापुढे आणवतो आणि दंडवत घालण्याची आणखी एक संधी देतो. पण ती तरुण मुलं यहोवावर भिस्त ठेवतात. ती नबुखद्‌नेस्सराला सांगतात: ‘आम्ही ज्याची उपासना करतो, तो देव आम्हाला वाचवू शकतो. आणि त्यानं आम्हाला वाचवलं नाही तरी, आम्ही तुमच्या सोन्याच्या मूर्तीला दंडवत करणार नाही.’

हे ऐकल्यावर नबुखद्‌नेस्सराला आणखीनच संताप येतो. तिथे जवळच एक भट्टी आहे. तो आज्ञा देतो: ‘भट्टीला आधीपेक्षा सातपट जास्त तापवा!’ मग सैन्यातल्या सर्वात बळकट लोकांकडून तो शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांच्या मुसक्या बांधवतो आणि त्यांना आगीत टाकवतो. ती भट्टी इतकी तापली आहे की, ज्वाळांनी ती बळकट माणसं मरण पावतात. पण त्यांनी आगीत टाकलेल्या तीन तरुण मुलांचं काय होतं?

राजा भट्टीत पाहातो आणि भयभीत होतो. ‘आपण तिघांना बांधून भट्टीत टाकलं ना?’ तो विचारतो.

‘होय, टाकलं,’ त्याचे दास उत्तरतात.

‘पण मला तर आगीत चार माणसं फिरत असलेली दिसतात. ती बांधलेली नाहीत, नि आगीनं त्यांना अपाय होत नाही,’ तो म्हणतो. भट्टीच्या दरवाज्याकडे सरकून राजा मोठ्यानं आवाज देतो: ‘शद्रख! मेशख! अबेद्‌नगो! सर्वसमर्थ देवाच्या सेवकांनो, बाहेर या!

ते बाहेर आल्यावर सर्वांना दिसतं की, त्यांना इजा झालेली नाही. मग राजा म्हणतो: ‘शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगोच्या देवाचा धन्यवाद असो! त्यानं आपला दूत पाठवून त्यांना वाचवलं आहे, कारण आपल्या देवाखेरीज इतर कोणत्याही देवाला दंडवत करणं त्यांनी नाकारलं.’

यहोवाशी प्रामाणिक राहण्याचं, आपण अनुसरावं असं हे एक उत्तम उदाहरण नाही का?