कथा ८७
मंदिरात छोटा येशू
मोठ्या माणसांशी बोलणाऱ्या या लहान मुलाकडे पाहा. ते जेरूसलेममधल्या देवाच्या मंदिरातले गुरुजन आहेत. आणि तो मुलगा आहे येशू. तो बराच मोठा झाला आहे. आता तो १२ वर्षांचा आहे.
देवाबद्दल आणि बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींबद्दल येशूला बरीच माहिती असलेली पाहून त्या गुरुजनांना खूप आश्चर्य झालं आहे. पण योसेफ आणि मरीया देखील इथे का नाहीत? ते कोठे आहेत? चला, शोधू या.
वल्हांडण नावाच्या विशेष सणासाठी, दर वर्षी योसेफ आपल्या कुटुंबाला जेरूसलेमला आणतो. नासरेथ ते जेरूसलेम हा लांबचा प्रवास आहे. कोणाकडे मोटार नाही, आणि आगगाड्या नाहीत. त्या काळी या गोष्टी नव्हत्या. बहुतेक लोक पायी चालतात, व त्यांना जेरूसलेमला पोहोचायला तीन दिवस लागतात.
आता योसेफाचं कुटुंब मोठं आहे. त्यामुळे, ज्यांची काळजी घ्यावी लागते असे येशूचे लहान भाऊ व बहिणी आहेत. आता, या वर्षी, योसेफ आणि मरीया आपल्या मुलांबरोबर नासरेथला घरी परतण्याच्या लांबच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या इतर लोकांबरोबर येशू आहे, अशी त्यांची कल्पना आहे. पण दिवस सरल्यावर ते मुक्काम करतात तेव्हा, त्यांना येशू सापडत नाही. आपल्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये ते त्याला शोधतात. पण तो त्यांच्यासोबतही नाही! म्हणून, जेरूसलेममध्ये त्याला शोधण्यासाठी, ते परत जातात.
सरते शेवटी, येशू गुरुजनांसोबत त्यांना इथे सापडतो. तो त्यांचं भाषण ऐकतो आहे, नि त्यांना प्रश्न विचारत आहे. येशूच्या बुद्धीनं सर्व लोक थक्क झाले आहेत. पण मरीया म्हणते: ‘बाळा, तू आमच्याशी असा का वागलास? तुला शोधण्याच्या प्रयत्नात तुझ्या वडिलांना आणि मला मोठी चिंता पडली होती.’
येशू उत्तर देतो: ‘तुम्हाला माझा शोध का करावा लागला? मी माझ्या वडिलांच्या घरात असणार, हे तुमच्या ध्यानात आलं नाही का?’
जिथे देवाबद्दल शिकायला मिळतं, तिथे राहणं येशूला आवडतं. आपल्यालाही असंच वाटायला हवं, नाही का? माघारी नासरेथमध्ये, येशू प्रत्येक आठवड्याला उपासनेसाठी सभेला जाई. तिथे तो नेहमी ध्यान देऊन ऐकत असल्यानं, बायबलमधून तो खूप गोष्टी शिकला. आपणही येशूसारखे होऊन त्याचं अनुकरण करू या.