व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा १०१

येशू मारला जातो

येशू मारला जातो

किती भयंकर गोष्ट घडते आहे, पाहा! येशूला मारलं जात आहे. त्यांनी त्याला एका खांबावर टांगलं आहे. त्याच्या हाता-पायात खिळे ठोकले आहेत. येशूला कोणीही असं का करील?

त्याचं कारण, काही लोक येशूचा द्वेष करतात. ते कोण, हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्यातला एक आहे, दुष्ट देवदूत दियाबल सैतान. त्यानंच आदाम आणि हव्वेकडून देवाची अवज्ञा करवली. आणि येशूच्या शत्रूंकडून हा भयंकर गुन्हा घडवणाराही सैतानच आहे.

येशूला असा खांबावर टांगण्यापूर्वीही त्याचे शत्रू त्याला नीचपणानं वागवतात. गेथशेमाने बागेत येऊन, त्यांनी त्याला कसं नेलं, ते आठवतं का? ते शत्रू कोण होते? होय, ते होते धार्मिक नेते. चला, पुढे काय होतं, पाहू.

धार्मिक नेत्यांनी त्याला धरून नेल्यावर, त्याचे प्रेषित पळून जातात. ते घाबरतात, व म्हणून येशूला त्याच्या शत्रूंच्या हाती एकटा सोडतात. पण प्रेषित पेत्र आणि योहान फार दूर जात नाहीत. येशूचं काय होतं, हे पाहण्यासाठी ते पाठोपाठ जातात.

ते याजक येशूला म्हाताऱ्‍या हन्‍नाकडे नेतात. हा आधी महायाजक होता. तो जमाव तिथे फार वेळ राहात नाही. त्यानंतर येशूला, सध्या महायाजक असलेल्या कयफाच्या घरी नेलं जातं. त्याच्या घरी अनेक धार्मिक नेते गोळा झाले आहेत.

इथे, कयफाच्या घरी, ते चौकशी करतात. येशूच्या बाबतीत खोट्या गोष्टी सांगण्यासाठी लोकांना आणलं जातं. सर्व धार्मिक नेते एकमुखानं म्हणतात: ‘येशूला जिवे मारलं पाहिजे.’ मग त्याच्या तोंडावर थुंकून, ते त्याला बुक्या मारतात.

हे सर्व होत असताना, पेत्र बाहेर अंगणात असतो. ती रात्र गारठ्याची असल्यामुळे, लोकांनी शेकोटी केली आहे. तिच्या भोवती ते ऊब घेत असताना, एक दासी पेत्राकडे पाहाते, आणि म्हणते: ‘हा माणूसही येशूबरोबर होता.’

पेत्र उत्तरतो: ‘छे, मी मुळीच नव्हतो!’

तो येशूबरोबर होता, असं तीन वेळा लोक पेत्राला म्हणतात. पण दर वेळी पेत्र म्हणतो की, ते खरं नाही. पेत्र तिसऱ्‍यांदा तसं म्हणतो तेव्हा, येशू वळून त्याच्याकडे पाहातो. असं खोटं बोलल्याबद्दल पेत्राला अतिशय वाईट वाटतं; आणि दूर जाऊन तो रडतो.

शुक्रवारी सकाळी सूर्य वर येऊ लागल्यावर, याजक येशूला त्यांच्या मोठ्या सभास्थानात—सन्हेद्रिन कचेरीत नेतात. इथे, येशूचं काय करावं, याची चर्चा ते करतात. ते त्याला, यहूदीया प्रांताचा सुभेदार पंतय पिलात याच्याकडे नेतात.

याजक पिलाताला सांगतात: ‘हा माणूस दुष्ट आहे. याला ठार मारलं पाहिजे.’ येशूला प्रश्‍न विचारल्यावर, पिलात म्हणतो: ‘त्यानं काही चूक केल्याचं मला दिसत नाही.’ मग पिलात येशूला हेरोद अंतिपाकडे पाठवतो. हेरोद गालीलाचा सुभेदार आहे. पण तो जेरूसलेममध्ये राहात आहे. येशूनं काही चूक केली आहे, असं हेरोदालाही दिसत नाही. म्हणून तो त्याला पिलाताकडे परत पाठवतो.

येशूला सोडून द्यावं असं पिलाताला वाटतं. पण त्याच्याऐवजी दुसऱ्‍या एका कैद्याला सोडलं जावं, अशी येशूच्या वैऱ्‍यांची इच्छा आहे. तो माणूस आहे, बरब्बा नावाचा चोर. पिलात येशूला बाहेर आणतो, तेव्हा मध्यान्हाचा सुमार आहे. तो लोकांना म्हणतो: ‘पाहा! तुमचा राजा!’ पण प्रमुख याजक ओरडतात: ‘ह्‍याची वाट लावा! त्याला मारा! त्याला मारा!’ त्यामुळे पिलात बरब्बाला सोडून देतो; आणि ते येशूला मारण्यासाठी घेऊन जातात.

शुक्रवारी दुपारी येशूला खांबावर खिळतात. येशूच्या दोन्ही बाजूला एक एक अपराधी खांबाला खिळून मारला जात आहे. पण तुम्हाला ते चित्रात दिसत नाहीत. येशू मरण्यापूर्वी, त्यातला एक अपराधी येशूला म्हणतो: ‘तुम्ही राज्याधिकारानं याल तेव्हा, माझी आठवण ठेवा.’ येशू उत्तर देतो: ‘तू माझ्यासोबत नंदनवनात असशील, असं मी तुला वचन देतो.’

ते एक आश्‍चर्यजनक वचन नव्हे का? येशू कोणत्या परादीसाबद्दल बोलत आहे, ते तुम्हाला माहीत आहे का? सुरवातीला देवानं बनवलेलं परादीस कोठे होतं? बरोबर, पृथ्वीवर. आणि राजा या नात्यानं येशू स्वर्गात राज्य करील तेव्हा, पृथ्वीवर नवीन परादीसाचा आनंद लुटण्यासाठी, तो या माणसाला परत जिवंत करील. या गोष्टीचा आपल्याला आनंद होत नाही का?