व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९५

येशूची शिकवण्याची पद्धत

येशूची शिकवण्याची पद्धत

एके दिवशी येशू एका माणसाला सांगतो की, त्यानं आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करावं. तो माणूस येशूला विचारतो: ‘माझा शेजारी कोण?’ येशूला माहीत आहे की, हा माणूस विचारात पडला आहे. कारण, फक्‍त आपल्या वंशाचे आणि धर्माचे लोकच आपले शेजारी आहेत, अशी त्या माणसाची कल्पना आहे. तेव्हा, येशू त्याला काय म्हणतो, ते पाहू या.

कधी कधी, एखादी गोष्ट सांगून येशू शिकवतो. आताही तो तसंच करतो. तो, एका यहूद्याची आणि शोमरोन्याची गोष्ट सांगतो. बहुतेक यहूद्यांना शोमरोनी लोक आवडत नाहीत, हे आपण अगोदरच शिकलो आहोत. येशूची गोष्ट अशी:

एका दिवशी, एक यहूदी डोंगराच्या वाटेनं यरीहोला चालला होता. पण त्याला चोरांनी गाठलं. त्यांनी त्याचे पैसे हिसकावले, आणि त्याला अर्धमेला होईपर्यंत चोप दिला.

पुढे, एक यहूदी याजक त्या वाटेनं आला. त्यानं मार दिलेल्या माणसाला पाहिलं, आणि काय केलं असं तुम्हाला वाटतं? केवळ रस्ता ओलांडून तो चालत राहिला. मग एक मोठा धार्मिक माणूस तिकडे आला. तो होता एक लेवी. तो तरी थांबला का? छे, मार लागलेल्या माणसाला मदत करायला तोही मुळीच थांबला नाही. रस्त्यानं दूरवर तो याजक आणि तो लेवी जात असलेले तुम्हाला दिसतात.

पण त्या मार लागलेल्या मनुष्याजवळ कोण आहे पाहा. तो आहे एक शोमरोनी. आणि तो या यहूद्याला मदत करत आहे. तो त्याच्या जखमांवर एखादं औषध लावत आहे. त्यानंतर तो, त्या यहूद्याला आराम मिळेल आणि तो बरा होईल, अशा ठिकाणी नेतो.

गोष्ट संपल्यावर, त्याला प्रश्‍न विचारणाऱ्‍या माणसाला येशू म्हणतो: ‘तुझ्या मते, या तीघातला कोण त्या मार लागलेल्या इसमाशी शेजाऱ्‍यासारखा वागला? याजक, लेवी की शोमरोनी?’

‘तो शोमरोनी माणूस. त्यानं मार लागलेल्या माणसावर दया केली,’ तो माणूस उत्तरतो.

येशू म्हणतो: ‘तू बरोबर बोललास. तर जा, आणि तो जसा वागला, तसाच तू इतरांना वागव.’

येशूची शिकवण्याची रीत तुम्हाला आवडते ना? बायबलमध्ये येशू काय म्हणतो, त्याकडे आपण लक्ष दिलं तर, खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, नाही का?