व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ९६

येशू आजाऱ्‍यांना बरे करतो

येशू आजाऱ्‍यांना बरे करतो

देशभर प्रवास करताना येशू आजाऱ्‍यांना बरे करतो. सगळीकडे, खेड्यांत आणि गावांमध्ये या चमत्कारांची बातमी पसरते. त्यामुळे लुळ्या-पांगळ्या, आंधळ्या, बहिऱ्‍या आणि इतर अनेक आजाऱ्‍यांना लोक त्याच्याकडे आणतात. आणि येशू त्या सर्वांना बरे करतो.

योहानानं येशूला बाप्तिस्मा देऊन, तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. येशू त्याच्या शिष्यांना सांगतो की, लवकरच तो जेरूसलेमला जाईल. तिथे तो मारला जाईल, आणि मग मृतातून उठेल. दरम्यान, येशू आजाऱ्‍यांना बरे करत राहातो.

एकदा, शब्बाथ दिवशी येशू शिकवत असतो. शब्बाथ हा, यहूद्यांसाठी विश्रांतीचा दिवस असतो. इथे तुम्हाला दिसणारी स्त्री खूप दिवसांची आजारी आहे. १८ वर्षं ती सरळ उभी राहू शकत नव्हती. म्हणून येशू आपला हात तिच्यावर ठेवतो, आणि ती उभी राहायला लागते. ती बरी झाली आहे!

या गोष्टीनं धार्मिक नेते चिडतात. त्यातला एक ओरडून जमावाला सांगतो: ‘आपल्याला काम करण्यासाठी सहा दिवस आहेत. इलाज करून घ्यायला त्या दिवसांत आलं पाहिजे. शब्बाथ दिवशी नव्हे!’

पण येशू उत्तर देतो: ‘दुष्टांनो, तुमच्यातला कोणीही शब्बाथ दिवशी आपल्या गाढवाला सोडवून पाणी पाजायला नेईल. तर मग, १८ वर्षं आजारी असलेल्या या स्त्रीला, शब्बाथ दिवशी बरं करू नये का?’ येशूच्या उत्तरानं ते दुष्ट लोक खजील होतात.

पुढे, येशू आणि त्याचे प्रेषित जेरूसलेमच्या दिशेनं प्रवास करतात. ते यरीहोच्या वेशीबाहेर असताना, येशू तिकडून जात असल्याचं दोन आंधळ्या भिकाऱ्‍यांच्या कानावर पडतं. त्यामुळे, ते मोठ्यानं म्हणतात: ‘येशू, आम्हाला मदत कर!’

त्या आंधळ्या माणसांना येशू जवळ बोलावतो, आणि विचारतो: ‘मी तुमच्यासाठी काय करावं, अशी तुमची इच्छा आहे?’ ते म्हणतात: ‘प्रभुजी, आमचे डोळे उघडावे.’ येशू त्यांच्या डोळ्यांना शिवतो, आणि तात्काळ त्यांना दिसू लागतं! हे सर्व आश्‍चर्यजनक चमत्कार येशू का करतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का? कारण, त्याचं लोकांवर प्रेम आहे. त्यांनी आपल्यावर विश्‍वास ठेवावा, अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे, राजा म्हणून तो शासन करील तेव्हा, पृथ्वीवर कोणीही पुन्हा आजारी पडणार नाही, याची आपण खात्री बाळगू शकतो.