व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कथा ८९

येशू मंदिराची सफाई करतो

येशू मंदिराची सफाई करतो

इथे येशू खरोखर रागावलेला दिसतो, नाही का? तो इतका का संतापला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचं कारण, जेरूसलेममधल्या देवाच्या मंदिरातली ही माणसं फार लोभी आहेत. देवाची उपासना करायला इथे आलेल्या लोकांपासून, ती पैसे उकळण्याचा प्रयत्न करताहेत.

ते सगळे गोऱ्‍हे, कोकरं आणि ती कबुतरं तुम्हाला दिसतात का? ती माणसं या प्राण्यांना इथे अगदी मंदिरातच विकताहेत. का, ते तुम्हाला ठाऊक आहे का? त्याचं कारण, देवाला होमार्पण करण्यासाठी इस्राएलांना प्राणी आणि पक्षी लागतात.

देवाच्या नियमात म्हटलं होतं की, एखाद्या इस्राएली माणसाची चूक झाल्यास, त्यानं देवाला अर्पण आणलं पाहिजे. शिवाय, इस्राएलांना अर्पणं आणावी लागण्याचे इतरही प्रसंग होते. पण देवाला अर्पण करायला, एखाद्या इस्राएली माणसाला प्राणी आणि पक्षी कोठून मिळणार?

काही इस्राएल लोकांपाशी प्राणी व पक्षी होते. त्यामुळे ते त्यांना अर्पण करू शकत होते. पण अनेकांपाशी प्राणी किंवा पक्षी नव्हते. आणि इतर काही जेरूसलेमहून इतक्या दूर राहात होते की, ते आपल्या प्राण्यांच्यातला एखादा मंदिरात आणू शकत नव्हते. म्हणून, इथे येऊन लोक त्यांना हवे असलेले प्राणी विकत घेत असत. परंतु हे लोक त्यांना जास्त किंमत आकारत होते. ते लोकांना फसवत होते. त्याशिवाय, इथे अगदी मंदिरात, त्यांनी विकायला नको.

याच गोष्टीचा येशूला राग येतो. तो, पैसे घेऊन बसलेल्या लोकांची टेबलं उलटतो, आणि त्यांची नाणी उधळून टाकतो. तसंच, तो दोऱ्‍यांचा एक आसुड बनवतो, आणि सर्व जनावरांना मंदिराबाहेर हाकलतो. कबुतरं विकणाऱ्‍या माणसांना तो हुकूम करतो: ‘त्यांना इथून बाहेर न्या! माझ्या पित्याच्या घराचा बाजार करू नका.’

जेरूसलेममधल्या मंदिरात येशूचे काही शिष्य त्याच्यासोबत आहेत. येशू करत असलेल्या गोष्टी पाहून त्यांना आश्‍चर्य वाटतं. मग, ‘देवाच्या घराविषयीची तळमळ त्याच्या उरात आगीसारखी जळेल’ असं बायबलमध्ये देवाच्या पुत्राबद्दल लिहिलेली जागा त्यांना आठवते.

वल्हांडण सण साजरा करण्यासाठी येशू जेरूसलेममध्ये असताना, तो अनेक चमत्कार करतो. त्यानंतर, येशू यहूदीया सोडतो आणि गालीलाला परतण्याच्या प्रवासाला लागतो. पण वाटेत तो शमरोन प्रांतातून जातो. तिथे काय होतं, ते आपण पाहू या.